भाषेचं शिक्षण आणि शिक्षणाची भाषा

Submitted by अपूर्व on 6 June, 2016 - 01:46

ब्लॉग दुवा - http://www.apurvaoka.com/2016/06/mother-tongue-education-india.html

विषय जुना आहे, काथ्या कुटून झालेला आहे. पण रहावलं नाही म्हणून पुन्हा तोच राग आळवतोय. ज्यांची मतं ठाम आहेत त्यांनी दुर्लक्ष करावं, डळमळीत आहेत त्यांनी जरूर वाचावं, आणि तटस्थ असलेल्यांनी क्षमा करावी किंवा मजा घ्यावी.

पुढचा लेख वाचला नाहीत तरी ही चार वाक्य कृपया वाचा. जरी शिक्षण म्हणजे इंग्रजी माध्यम असं पक्कं समीकरण आजकाल झालेलं असलं, तरीही मातृभाषा शिक्षणाबद्दल काही सत्य आणि त्यासंबंधी जगात बळावत असलेली भावना सांगण्याचा इथे प्रयत्न आहे. हा एखादा प्रादेशिक भाषेसंबंधीचा लेख न समजता वैश्विक विषयासंबंधी काहीतरी माहिती म्हणून इथला मजकूर लिहिलेला आहे. मुलांच्या शाळेच्या प्रवेशाच्या तारखा कदाचित उलटल्या असतील, कदाचित अजून प्रवेश बाकी असतील. तेंव्हा निर्णय घेण्याआधी लेखात दिलेले दुवे (लिंक्स) जरूर बघा, वाचा, विचार करा आणि जमलं तर पूर्वग्रह बाजूला ठेवून निर्णय घ्या.

आपण अनेकदा एखाद्या गोष्टीबद्दल काही मतं करून घेतलेली असतात. ही मतं बहुतांशी विचारांती केलेली नसतात तर ऐकीव, गोष्टींवर, किंवा कसल्यातरी प्रभाव किंवा दडपणामुळे केलेली असतात. आणि या मतांचा अणूस्फोटाप्रमाणे प्रसार होत जातो आणि त्याचं प्रथेत रुपांतर होतं. भारतातील लोक हे ठराविक बाबतीत इतके अनुकरणप्रिय आहेत की त्यांच्यावर कुठल्याही विचाराचा प्रभावच होत नाही. आणि भारतात, किंबहुना कुठेही एखादा नवा विचार साधारण तीन अवस्थांतून जातो. प्रथम काहीतरी नवीन, म्हणून त्याच्याकडे लोकं आकृष्ट होतात. नवं ते हवं, अशा भावनेने तो विचार अनेकांच्या मनत घर करतो. मग पुढे सगळेच जण त्या मार्गाने जाऊ लागले की त्याचा 'ट्रेंड' होतो. आणि मग तो ट्रेंड एखाद्या लाटेसारखा सगळ्यांना वाहून नेऊ लागला की त्याची पद्धत किंवा प्रथा होते, आणि इतर पर्यायच दिसेनासे होतात. असंच काहीसं शिक्षणाच्या बाबतीत झालेलं आहे.

हा विषय तसा नवीन नसला, आणि गेले काही महिन्यात याबद्दल बरंच लिहिलं गेलेलं असलं तरी याच्याशी निगडीत काही बाबी लक्षवेधी आहेत, प्रामुख्याने शिक्षणाच्या माध्यमाबद्दल. इंग्रजांपासून दाखला द्यायचा झाला तर इंग्रज अधिकारी लॉर्ड मॅकॉले याने इंग्रजीतून शिक्षणाची मुळं भारतात रोवली. भारतासारख्याच ब्रिटिशांच्या इतर कॉलन्या होत्या त्यांच्यावर अधिक चांगल्या प्रकारे राज्य करता यावं याकरता घेतलेला हा धोरणात्मक निर्णय होता. पुढे कॉलन्या संपल्या, देश स्वतंत्र झाले, जग खुलं झालं आणि लोकांना, देशांना काही गोष्टींचे परिणाम खुपायला, जाणवायला लागले. त्याबद्दल अभ्यास केला गेला, संशोधन केलं गेलं, आणि अनेक गोष्टी समोर आल्या.

a
#macaulayism

युनेस्को ही जागतिक स्तरावरची संस्था मातृभाषेतून शिक्षणाबद्दल आग्रही आहे. १९९० च्या दशकापासून युनेस्को ने यासंबंधी अनेक लेख, अनेक पेपर प्रकाशित केले असून बहुभाषिक देशांना मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार करण्याचं सतत आवाहन केलेलं आहे. जगातील ४०% मुलं अशा भाषेत शिक्षण घेतात जी त्यांना सहज समजत नाही आणि जी त्यांची मातृभाषा नाही. पण पुलंनी म्हटल्याप्रमाणे, सायबाची मुंबई म्हटलं की जसा आजही मुंबईकराचा ऊर भरून येतो, तसंच इंग्रजीत बोललं की अजूनही त्या माणसाबद्दल आपल्या मनात श्रेष्ठत्वाची भावना येते. परंतु युनेस्कोच्या या आवाहनांमुळे असेल किंवा स्वजाणिवेतून असेल, इतर अनेक देशांनी मात्र मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. काही देशात तर तसे कायदेही आहेत.

नेमके दाखले द्यायचे म्हटले तर, ज्या इंग्लंड देशाची ही भाषा आहे, तिथलीच नावाजलेली संस्था ब्रिटिश काउन्सिल आपल्या 'व्हॉईसेस' मासिकात 'व्हाय स्कूल्स शुड टीच यंग लर्नर्स इन होम लँग्वेज' या शीर्षकाने लेख लिहिते आणि त्यात मातृभाषेतून शिक्षणाचा आकलनशक्ती, बौद्धिक विकास यावर होणारा सकारात्मक परिणाम सांगते. गव्हर्नमेंट ऑफ हाँग काँग ने आपल्या शैक्षणिक धोरणात स्पष्टपणे या विषयी तरतुदी केलेल्या आहेत. युनायटेड अरब अमिराती, अनेक अफ्रिकन देश, जर्मनी, टर्की यासारख्या देशातही या विषयी आवाज उठवला जातोय, बदल घडत आहेत. अफ्रिकेत आणि अनेक युरोपियन देशात तर लोकांनी चळवळी उभा केलेल्या आहेत. आंतरजालावर, सोशल मिडियावर या संबंधीची मुबलक माहिती मिळते.

सोयीस्करपणे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचा स्वभाव समजू शकतो. परंतु आपल्या मुलाच्या भविष्यासाठी, वाढीसाठी, प्रगतीसाठी जर एखादी गोष्ट चुकीची आहे, आणि जे जागतिक स्तरावर वारंवार सिद्ध होत आहे, तरीही तीच गोष्ट योग्य आहे म्हणण्याला काय म्हणावं हे समजत नाही. हे कुणाला सांगायचा प्रयत्न केला की मात्र मराठी मराठी करणार्‍या कुठल्यातरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं सांगणार्‍याकडे बघितलं जातं. हा झाला महाराष्ट्राचा भाग. इतर राज्यातही बहुतेक इंग्रजीचाच पगडा आहे त्यामुळे भाषिक वैविध्यतेतून खुलणारी संस्कृती आणि तिची संपन्नता ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

वैज्ञानिक दृष्ट्या हे मानवजातीच्या वाढत्या वैफल्याचं मुख्य कारण होऊ शकतं कारण व्यक्त होता येणं ही नुसती भावनिक गरज नसून आरोग्यासाठी अनिवार्य अशी गोष्ट आहे. बहुभाषिक व्यक्तीलाही व्यक्त होण्यास मदत करते ती म्हणजे मातृभाषा. परंतु मातृभाषेतून ज्यांचं शिक्षण झालेलं नसतं त्यांना इतर भाषा शिकणंही अतिशय कठीण जातं आणि मेंदू आणि जग यात भक्कम असा दुवाच निर्माण होत नाही. त्याचं पर्यवसान वैफल्य आणि मानसिक दुर्बलतेत होतं.

या गोष्टी भंपक वाटू शकतात, किंवा वैयक्तिक मतं वाटू शकतात. परंतु याबद्दल अनेक पुस्तकं, अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यापैकी काहींचे दुवे खाली दिलेले आहेत. ते वाचावेत अशी विनंती आहे.

a2qq

आपण अनेकदा समाजाच्या विरुद्ध जायला घाबरतो. सगळे एकीकडे जात असतील तर आपण दुसरीकडे तोंड करायला कचरतो. पण मेंढरं आणि आपण मानव यात फरक आहे हे सिद्ध होत असेल तर ते या एकाच गोष्टीतून आणि ती गोष्ट म्हणजे विचार. विचार केला तर पटतं, की इंग्रजी माध्यमातून न शिकल्याने आपलं काहीही अडलं नाही. वाचलं तर कळतं, की आपल्यासारखेच अनेक आहेत ज्यांचंही काही अडलं नाही. पण 'सगळे' नावाची मंडळी आपापल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात मग आपणहही तेच केलं पाहिजे हे ठरवताना विचार होत नाही, कारण वेगळं पडणं म्हणजे मागे पडणं नव्हे हेच मुळी लक्षात घेतलं जात नाही. जे योग्य ते योग्यच म्हटलं पाहिजे, कारण मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. भविष्य हे मिळणारी नोकरी, आणि पैसे इथेच संपत असेल तर मात्र मातृभाषेचं स्थान भविष्यात न दिसणं स्वाभाविक आहे.

मुंबई पुण्यातही मातृभाषेचं महत्व पटतंय. हळू हळू का होईना, मनं बदलतायत. इंग्रजी'च्या' शिक्षणासाठी इंग्रजी'तून' शिकण्याची गरज नाही याची जाणीव होते आहे. शासनाकडूनही याला प्रोत्साहन मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. पण त्या आधी एकत्र यायची तयारी दाखवायला हवी. मग शाळांची अवस्था, तिथली मुलं, तिथले शिक्षक या सगळ्या सबबी सहज दूर होण्यासारख्या वाटायला लागतील. पण एकत्र यायला हवं. मराठीसाठीच नव्हे, प्रत्येक प्रादेशिक भाषेसाठी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी. शेवटी माणसं घडवायची आहेत; शर्यतीचे घोडे नव्हेत.

https://www.britishcouncil.org/voices-magazine/why-schools-should-teach-...
http://www.edb.gov.hk/en/edu-system/primary-secondary/applicable-to-seco...
http://timesofindia.indiatimes.com/home/education/news/Kids-fare-better-...
http://www.thenational.ae/opinion/comment/learning-in-your-mother-tongue...
https://www.culturalsurvival.org/news/mother-tongue-based-education-phil...
http://www.fremdsprachendidaktik.rwth-aachen.de/Ww/programmatisches/pach...
http://www.sbs.com.au/news/article/2016/04/01/calls-increased-mother-ton...
http://www.cu.edu.ph/?page_id=3290
https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-prim...
https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-prim...
http://www.un.org/apps/news/story.asp?NewsID=50147
http://www.isaet.org/images/extraimages/P1214011.pdf

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणी कोणी मराठीमधे शिक्षण घेतले आहे आनि आपल्या पाल्यांना सुध्दा मराठी शाळेत भरती केले आहे. याची माहीती मिळू शकेल का?

सहज विचारले आहे.

त्यासाठी स्वतःची ओळख सोडण्याचा हट्ट कशाला?

इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे स्वतःची ओळख सुटते हे तुम्ही कुठल्या आधारावर म्हणता आहात ते सांगाल का ज़रा??

इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे स्वतःची ओळख सुटते हे तुम्ही कुठल्या आधारावर म्हणता आहात ते सांगाल का ज़रा?? >>
सांगतो. थोडा वेळ द्या. मलाही अजुन पक्के संशोधन करुन/ वाचुन अजुन मते अद्ययावर करायची आहेत. मग वेगळा लेख लिहितो नंतर.

एखादा माणूस काय म्हणाला आहे त्यावर पुढचे प्रतिसाद येतातच असे नाही अभिनव! 'तो जे काही म्हणाला ते वाचून त्याला काय म्हणायचे असावे असे मला वाटले' ह्यावर मी लिहिणार! डोळा मारा

हे कोणासाठी आहे ते कळूद्या अशी विनंती

आभारी

बाप्या

सोन्याबापू प्रमाण मराठी भाषा देखिल अवघड वाटू शकते हा मुद्दा मान्य !

वरदा, मूळ लेखात मला हेकेखोर पणा नाही जाणवला. पण तू म्हणत्येस म्हणजे लेख परत एकदा वाचून पहायला हवा.

कुठल्याही माध्यमातून शिकलो तरी आपण शाळा कॉलेजात जे शिकतो त्याचा आपले खरे आयुष्य जगण्यासाठी कितपत उपयोग होतो. फक्त परीक्षा देण्यासाठी जे शिकायचे आहे त्याचे माध्यम काही का असेना!

ज्या स्टेजला आपण स्पेशलायझेशन वगैरे करतो, त्या वेळेस माध्यमाचा प्रश्न गौण ठरतो असे मला वाटते.

आजकालच्या जगात पालक ज्या भाषेत मुलांना व्यव्स्थित मार्गदर्शन करू शकत असतील त्या माध्यमाच्या स्वीकार करावा असे वाटते. विद्यार्थी घडवण्याची १००% जबाब्दारी कुठलीच शाळा घेत नाही आणि तशी अपेक्षाही ठेवणे गैर आहे.

सोन्याबापूंसारखे कॉन्व्हेंट एज्युकेटेड गृहस्थ मायबोलीवर शुद्ध व उत्तम मराठीत प्रतिसाद कसे देतात? ह्याचे उत्तरही सोन्याबापूंच्याच प्रतिसादात आहे. शाळेतील माध्यम कोणतेही असले तरी घरी योग्य वाटणार्‍या भाषेसाठी पोषक वातावरण ठेवता येते. मातृभाषेत शिक्षण घेणार्‍यांच्या तोंडावर नोकर्‍यांची दारे धाडदिशी आपटली जात आहेत. एक्स्प्रेस वेगात आत्मविश्वासाने इंग्रजी बोलणार्‍या उमेदवारांना काही ठिकाणी डोळे झाकून नोकरीवर घेतले जात आहेत. तसेही, कामाचे जवळपास सगळेच ट्रेनिंग कामाला लागल्यावरच मिळते म्हणा!

By education I am an Englishman, by views an internationalist, by culture a Muslim,& a Hindu only by accident of birth.

आमचे लाडके भारतरत्न चाचा नेहरू

उदय,
मी मराठी माध्यमात शिकलो. माझी बायको कॉन्व्हेंट ची आहे. मला कामचलाऊ इंग्रजी येते. ओबामा प्रमाणे फर्‍ड्या इंग्रजीत भाषण देणे हे स्वप्नच आहे. सफाईदार इंग्रजी अभावी बरेचदा अडचण होते. पण भाषा विषयक म्हणाल तर मराठी सुद्धा यथातथाच आहे. पण मराठी बोलताना चुकल्याने अपराधी वाटत नाही, टिंगल होत नाही. पोहायला येत असताना थोडे उलट सुलट प्रकार आपण बिनधास्त करू तसच. परवा नागराज मंजुळे ला।हिंदीत अडचण आली. बरेच काही सांगायचे आहे पण शब्द सापडत नाहीत असे.
याउलट बायकोचं आहे. इंग्लिश मधल्या चुका पण आत्मविश्वासाने करते. कारण इंग्लीश्वr प्रभुत्व असल्याने बोली म्हणून बोलायला ग्रामर पाळणे आवश्यक नसते. तिला कुणी हसत नाही. हा आत्मविश्वास गरजेचा आहे. मुलांना त्यामुळे इंग्लिश , मराठी अशी अडचण आलेली नाही. आता इंग्लिश माध्यमात मुलांना शिकवले तर त्यांच्या मुलांना फायदाच होइल.

मराठीत शिकून पोट भरायच्या संधी असतील तर प्रश्नच येत नाही. नसतील तर किती काळ चक्रव्यूहात अडकून पडायचे? कित्येक मराठी शाळांमधील इंग्रजीच्या शिक्षकांना देखील इंग्लिश येत नाही. ते देखील मराठी माध्यमाचेच प्रॉडक्ट असतात. इंग्रजीत शिकलेल्यांना घेत नाहीत. अशा ठिकाणी शिजल्यावर विद्यार्थ्याने भाषा सुधारण्यासाठी कुणाच्या तोंडाकडे पाहायचे?

बरे, विरोधातील कोणाकडुनही मी आधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अजुन मिळालेली नाहीत.

१.
योग्य तो बोली व लिखित इंग्रजीचा लहानपणापासुन सराव करुन मराठी माध्यमात शिकण्यात काय समस्या आहे?

२.
जर जर्मनी, जपान यांच्याकडे आर्थीक व राजकीय सामर्थ्य आहे म्हणून ते त्यांच्या भाषेत शिकतात तर ६० साली राज्यस्थापन झाल्यनंतरपासुन आप्ल्याकडे असे कोणते सामर्थ्य नव्हते ज्यामुळे आपण स्वतःहुन मोडी मोडीत काढली?
६० पासुन असे कोणते सामर्थ्य आपल्यात नव्हते की व्यवस्थीत उच्चारु शकु असे नवे शब्द शोधण्यासाठी भाषाशास्त्रज्ञांची मदत घेतली गेली नाही व पर्यायी योग्य शब्द निर्माणे केले गेले नाहीत. (हे ते एकसमयाच्छेद का काय ते तत्सम साठी)
आपल्यात कोणते असे सामर्थ्य नव्हते की योग्य उच्चारण्याजोगे पर्यायी शब्द शोधुन, जिथे गरज तिथे इंग्रजीच शब्द ठेवुन पुर्ण मराठीत उच्चशिक्षण घेता येण्याच्या सोई नाहीत.
असे कोणते सामर्थ्य नव्हते ज्यामुळे बोलीभाषा अभ्यासक्रमात समाविष्ट नाहीत किंवा त्या शिक्षणाचे माध्यम नाहीत.
असे कोणते सामर्थ्य नव्हते
असे कोणते सामर्थ्य नव्हते किंवा नाही ज्यामुळे आपण स्वतःहुन हिरीरीने पुढाकार घेऊन मुंबई पुण्यात हिंदीत सुरु होतो?
ई!

आपल्याकडे राजकीय व आर्थीक नव्हे तर मानसीक सामर्थ्य नाही व नव्हते. त्यामुळे आपल्याकडे जरी खरोखर जर्मनी जपान सारखे सामर्थ्य असते तरी आपण काही करु शकलो नसतो व आज परत याच पहिल्या पायरी वर असतो.
जर तर कशाला, इंग्रजांनी भारत मराठ्यांकडुनच मिळवला. शिवाजी राजांपासुन आपल्याकडे एवढी सत्ता सामर्थ्य होते, काय उपयोग केला त्याचा? उलटे आम्ही परदेशात जाउन स्किंदिया झालो. पण बाकीजे लोक इथे आले तर लगेच इथले गाव पुना, कोलापुर, औरंगाबाद न बाँबे होतात.

जर जर्मनी जपान करु शकतात तर आपण का नाही?

मला कधी कधी असे वाटते की यावर संशोधनाची गरज आहे की मराठी माणुस सगळ्यात जास्त आपल्या भाषा - संस्कृतीपासुन अलिप्त का असतो व भाउबंदकी करण्यात दगा देण्यात (कंपेरेटीव्हली) पुढे का असतो?
डिएनए वगैरे चे सॅंपलींग करावे का एकदा?

शाळेतील माध्यम कोणतेही असले तरी घरी योग्य वाटणार्‍या भाषेसाठी पोषक वातावरण ठेवता येते - सहमत

मातृभाषेत शिक्षण घेणार्‍यांच्या तोंडावर नोकर्‍यांची दारे धाडदिशी आपटली जात आहेत. एक्स्प्रेस वेगात आत्मविश्वासाने इंग्रजी बोलणार्‍या उमेदवारांना काही ठिकाणी डोळे झाकून नोकरीवर घेतले जात आहेत.>>>>

नोकरीप्रवेश सुलभ होणे होत असावे काही ठिकाणी परंतू एकदा आत गेलात की रीझल्ट ओरीएंटेशन पाहूनच परफॉर्मन्स ठरवला जातो. त्याच्यात भाषेचे योगदान अत्यंत अल्प असते असे मला वाटते.

'मराठीचा खून पाडणे' वगैरे टोकाच्या आततायी प्रतिक्रिया का बरे याव्यात?
पुस्तकी आणि ग्रांथिक भाषेमुळे (ग्रंथांमुळे) भाषेचे वैभव वाढते हे खरे. पण भाषेचा जोम वाढणे हे त्या त्या भाषकांचा लोकव्यवहार/व्यापार किती व्यापक, तगडा आणि सर्वस्पर्शी आहे त्यावर अवलंबून असते. व्यवसायातले शब्द वेगळे असतात आणि ते व्यवसाय समाजात प्रतिष्ठा पावत असतील तर त्यातल्या भाषेलासुद्धा प्रतिष्ठा मिळते. आणि असे जोमदार समाजव्यवहार हा त्या भाषेचा एक मोठाच जिवंत स्रोत असतो .
लोकांवर कुठल्याही भाषेची सक्ती नसावी. सक्तीमुळे उलट तिटकारा वाढतो. लोकांना निवडीचे स्वातंत्र्य असावे. त्यांची नजीकची उद्दिष्टे आणि किमान प्राथमिक पातळीवरील आकांक्षा पूर्ण करू शकण्याची ज्यायोगे खात्री वाटेल ते शिक्षण, ती भाषा लोक निवडतील. तसेही आता संपर्कक्रांतीमुळे समाजव्यवहारात आणि त्यामुळे भाषेतही झपाट्याने बदल घडतो आहे. आपल्याला हवी तीच भाषा रूढ होईल असे नाही, आणि तीच टिकेल असेही नाही. सर्वांना जास्तीत जास्त सोयीची ठरेल ती भाषा त्या त्या काळाची चलनी भाषा असेल.
आणि प्रमाण भाषासुद्धा शिकायला नवीन भाषेइतकीच जड जाते असे वर कोणीसे म्हटले आहे त्याला अनुमोदन..

अॅड. ग. नी. जोगळेकर यांनी सकाळ मध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या आणि बहुजन समाजाच्या इंग्रजी बद्दल एक लेख संपादकीय म्हणून लिहीला होता. ते बहुधा प्रोग्रेसिव संस्थेचे मानद सदस्य होते. इंग्रजी भाषेच्या शिक्षक पदासाठी येणाऱ्या आणि चांगले गुण पडलेल्या उमेदवारांना उत्तम इंग्रजी लिहीता यायचे. पण तोंडी प्रश्न विचारले की ते लाजत असत. त्यांनी यथेच्छ टिंगल केली होती, पण हे खरेच आहे. शिकवताना मुले काहीही विचारू शकतात. अशा वेळी निव्वळ विषय नीट समजला आहे पुरेसे नसते.

'मराठीचा खून पाडणे' वगैरे टोकाच्या आततायी प्रतिक्रिया का बरे याव्यात?
>> कारण विरोध टोकाचा आहे म्हणुन.

ण भाषेचा जोम वाढणे हे त्या त्या भाषकांचा लोकव्यवहार/व्यापार किती व्यापक, तगडा आणि सर्वस्पर्शी आहे त्यावर अवलंबून असते.
>> मग कोणी करायचा हा लोकव्यवहार / व्यापार?

व्यवसायातले शब्द वेगळे असतात आणि ते व्यवसाय समाजात प्रतिष्ठा पावत असतील तर त्यातल्या भाषेलासुद्धा प्रतिष्ठा मिळते
>> कोणी रुढ करायचे ते मराठी शब्द?

लोकांवर कुठल्याही भाषेची सक्ती नसावी. >> इथे कोणी सक्ती केलीय? मी तरी नाही. माझा इंग्रजी माध्यमाला विरोध नाही व त्यात शिकण्यालाही विरोध नाही.

तसेही आता संपर्कक्रांतीमुळे समाजव्यवहारात आणि त्यामुळे भाषेतही झपाट्याने बदल घडतो आहे. आपल्याला हवी तीच भाषा रूढ होईल असे नाही, आणि तीच टिकेल असेही नाही. सर्वांना जास्तीत जास्त सोयीची ठरेल ती भाषा त्या त्या काळाची चलनी भाषा असेल.
>> मग आपली भाषा टिकावी म्हणुन प्रयत्न कोणी करायचे?
चायना, हाँगकाँग, तैवान मधुन आलेल्या सर्व उत्पादनांच्या खोक्यांवर त्यांच्या चायनीज मधे ही इंग्रजीच्या बरोबीरने सगळे का छापलेले असते?
प्रिंटर वगैरे घेतल्यावर त्यात तो कसा सेटाप करावा याचे भले मोठे पोस्टर इंग्रजी सोबत चायनिज मधे ही का असते?

हे सगळे आपोआप होते (जपान जर्मनांना आयते मिळाले) की त्यासाठी मुद्द्दम एकत्र येऊन वेळ काढुन इच्छेने काम करुन हे सगळे होते?

दोन देशांची तुलना एका अवाढव्य देशातील घटक राज्यासोबत करणे काही इतकेसे पटले नाही सतत >> राज्यालाजरी केंद्राएवढे नसले तरी बरेच अधिकार असतात. तसे नसते तर राज्य व केंद्रात फरक काय?
गोदरेजचे डास झुरळ मारायचे हिट येते त्यावर हे विषारी आहे, लहान मुलांपासुन देर ठेवा ई. मराठीतही लिहिलेले असते. ते गोव्यात बनते असे त्यावर लिहिलेले असते. गोवा करु शकतो तर आपण का नाही?

काहीच नाही. सोन्याबापू यांनी हाच मुद्दा मांडला होता त्याला सहमतीही दर्शवलेली आहे.
पराग यांनीही काहीसे असेच म्हटले आहे त्यालाही अनुमोदनच दिले व हा बेस्ट ऑप्शन आहे असेही म्हटले आहे.
तसेच तुमच्या प्रतिसादात "अस्मिता जपायची" असे तुम्ही म्हणता आहात. मी नाही.
हा विषय मांडताना मला तो अस्मिता/ अभिमान या अर्थाने अपेक्षीत नव्हता हे ही मी मागेच क्लिअर केलेले होते!
आता पुढे....

अभि.नव, मुद्दामहून दामून दपटून कोणीच करायला नको. लोकव्यवहार सशक्त असतील तर ते व्यक्त करण्यासाठी शब्द आपोआपच घडतात. आधी क्रिया आणि मग अभिव्यक्ती असेच बहुधा असते. म्हणजे एखादी नवी प्रक्रिया शोधणे, संकल्पना जाणवणे, नवे तंत्र वापरून बघणे, नवी संरचना उभी राहाणे हे आधी होते आणि मग त्याचे वर्णन, स्पष्टीकरण येते. 'वाचम् अर्थोsनुधावति'. तेव्हा उद्यमशील समाजाला भाषेचे कुंपण जाणवत नाही. असा समाज आपली भाषा आपणच शोधतो.
भाषा टिकण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. जोपर्यंत ती समाजव्यवहारास उपयुक्त आहे तोपर्यंत आणि तोपर्यंतच ती त्याच फॉर्ममधे टिकेल. तो फॉर्म तोकडा वाटू लागला की तो आपोआपच बदलतो. मग सप्तशतीची मराठी, यादवकालीन मराठी, वसाहतपूर्व आणि वसाहतोत्तर मराठी, स्वातंत्र्योत्तर मराठी असे वेगवेगळे आकारबंध निर्माण होतात. एकविसाव्या शतकातली मराठी ही विसाव्या शतकातल्या मराठीपेक्षा वेगळी असणारच. त्यामुळे मराठी बिघडतेय, मरतेय हे काही पटत नाही. उद्या विदर्भ मुख्य मराठीभूमीपासून वेगळा झाला तर तिथली मराठी कदाचित वेगळा फॉर्म स्वीकारेल. त्यांची प्रमाण मराठीसुद्धा उर्वरित महाराष्ट्रातल्या प्रमाण मराठीहून वेगळी असेल. काही काळाने कदाचित वैदर्भी ही वेगळी भाषा बनेल. असे सगळे जिओ-सोशिओ-पोलिटिकल आघात पचवत भाषा आपला मार्ग धुंडाळत असते. भाषानिर्मिती हा एक मोठ्या घुसळणीचा परिपाक असतो. समाजव्यवहाररूपी यंत्र हे सतत धडधडत असते आणि त्यातून अनुषंगाने भाषा हा एक बाय-प्रॉडक्ट बाहेर पडत असतो.

माणूस भाषेचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील असेल की ज्यामुळे रोजगार मिळेल, कौटुंबिक प्रगती साधता येईल यासाठी ?

'तो जे काही म्हणाला ते वाचून त्याला काय म्हणायचे असावे असे मला वाटले' ह्यावर मी लिहिणार!

जोपर्यंत लिहिणारा/री कोण आहे, ते कुठे रहातात, ते कुठल्या भाषेतून शिकतात, घरी काय करतात, (इथले लोक उद्या ते स्वतःच्या नवरा/बायको यांच्याशी खाजगीत काय करतात) याची चर्चा नको.

बेफिकीर, तुम्ही असे लिहिणार्‍या व्यक्तीबद्दल न बोलता, मुद्द्याबद्दल बोलता, म्हणून तुमचे प्रतिसाद मला वाचण्याजोगे वाटतात.

बाकीच्यांचे काय विचारता? विषय राहिला बाजूला, नि विषय मांडणार्‍याचीच टिंगल.

खरे तर अशी वैयक्तिक टिंगल, टवाळी करायला इथे दुसरे अनेक धागे आहेत, तिथे जावे.

इथे फुकट चर्चेचा विचका, नि मग म्हणायचे विषयाचेच गांभीर्य संपले. विषयाचे गांभीर्य हे ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहे, पण चर्चेचा विचका मात्र जरूर करता हे लोक.

Pages