भाषेचं शिक्षण आणि शिक्षणाची भाषा

Submitted by अपूर्व on 6 June, 2016 - 01:46

ब्लॉग दुवा - http://www.apurvaoka.com/2016/06/mother-tongue-education-india.html

विषय जुना आहे, काथ्या कुटून झालेला आहे. पण रहावलं नाही म्हणून पुन्हा तोच राग आळवतोय. ज्यांची मतं ठाम आहेत त्यांनी दुर्लक्ष करावं, डळमळीत आहेत त्यांनी जरूर वाचावं, आणि तटस्थ असलेल्यांनी क्षमा करावी किंवा मजा घ्यावी.

पुढचा लेख वाचला नाहीत तरी ही चार वाक्य कृपया वाचा. जरी शिक्षण म्हणजे इंग्रजी माध्यम असं पक्कं समीकरण आजकाल झालेलं असलं, तरीही मातृभाषा शिक्षणाबद्दल काही सत्य आणि त्यासंबंधी जगात बळावत असलेली भावना सांगण्याचा इथे प्रयत्न आहे. हा एखादा प्रादेशिक भाषेसंबंधीचा लेख न समजता वैश्विक विषयासंबंधी काहीतरी माहिती म्हणून इथला मजकूर लिहिलेला आहे. मुलांच्या शाळेच्या प्रवेशाच्या तारखा कदाचित उलटल्या असतील, कदाचित अजून प्रवेश बाकी असतील. तेंव्हा निर्णय घेण्याआधी लेखात दिलेले दुवे (लिंक्स) जरूर बघा, वाचा, विचार करा आणि जमलं तर पूर्वग्रह बाजूला ठेवून निर्णय घ्या.

आपण अनेकदा एखाद्या गोष्टीबद्दल काही मतं करून घेतलेली असतात. ही मतं बहुतांशी विचारांती केलेली नसतात तर ऐकीव, गोष्टींवर, किंवा कसल्यातरी प्रभाव किंवा दडपणामुळे केलेली असतात. आणि या मतांचा अणूस्फोटाप्रमाणे प्रसार होत जातो आणि त्याचं प्रथेत रुपांतर होतं. भारतातील लोक हे ठराविक बाबतीत इतके अनुकरणप्रिय आहेत की त्यांच्यावर कुठल्याही विचाराचा प्रभावच होत नाही. आणि भारतात, किंबहुना कुठेही एखादा नवा विचार साधारण तीन अवस्थांतून जातो. प्रथम काहीतरी नवीन, म्हणून त्याच्याकडे लोकं आकृष्ट होतात. नवं ते हवं, अशा भावनेने तो विचार अनेकांच्या मनत घर करतो. मग पुढे सगळेच जण त्या मार्गाने जाऊ लागले की त्याचा 'ट्रेंड' होतो. आणि मग तो ट्रेंड एखाद्या लाटेसारखा सगळ्यांना वाहून नेऊ लागला की त्याची पद्धत किंवा प्रथा होते, आणि इतर पर्यायच दिसेनासे होतात. असंच काहीसं शिक्षणाच्या बाबतीत झालेलं आहे.

हा विषय तसा नवीन नसला, आणि गेले काही महिन्यात याबद्दल बरंच लिहिलं गेलेलं असलं तरी याच्याशी निगडीत काही बाबी लक्षवेधी आहेत, प्रामुख्याने शिक्षणाच्या माध्यमाबद्दल. इंग्रजांपासून दाखला द्यायचा झाला तर इंग्रज अधिकारी लॉर्ड मॅकॉले याने इंग्रजीतून शिक्षणाची मुळं भारतात रोवली. भारतासारख्याच ब्रिटिशांच्या इतर कॉलन्या होत्या त्यांच्यावर अधिक चांगल्या प्रकारे राज्य करता यावं याकरता घेतलेला हा धोरणात्मक निर्णय होता. पुढे कॉलन्या संपल्या, देश स्वतंत्र झाले, जग खुलं झालं आणि लोकांना, देशांना काही गोष्टींचे परिणाम खुपायला, जाणवायला लागले. त्याबद्दल अभ्यास केला गेला, संशोधन केलं गेलं, आणि अनेक गोष्टी समोर आल्या.

a
#macaulayism

युनेस्को ही जागतिक स्तरावरची संस्था मातृभाषेतून शिक्षणाबद्दल आग्रही आहे. १९९० च्या दशकापासून युनेस्को ने यासंबंधी अनेक लेख, अनेक पेपर प्रकाशित केले असून बहुभाषिक देशांना मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार करण्याचं सतत आवाहन केलेलं आहे. जगातील ४०% मुलं अशा भाषेत शिक्षण घेतात जी त्यांना सहज समजत नाही आणि जी त्यांची मातृभाषा नाही. पण पुलंनी म्हटल्याप्रमाणे, सायबाची मुंबई म्हटलं की जसा आजही मुंबईकराचा ऊर भरून येतो, तसंच इंग्रजीत बोललं की अजूनही त्या माणसाबद्दल आपल्या मनात श्रेष्ठत्वाची भावना येते. परंतु युनेस्कोच्या या आवाहनांमुळे असेल किंवा स्वजाणिवेतून असेल, इतर अनेक देशांनी मात्र मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. काही देशात तर तसे कायदेही आहेत.

नेमके दाखले द्यायचे म्हटले तर, ज्या इंग्लंड देशाची ही भाषा आहे, तिथलीच नावाजलेली संस्था ब्रिटिश काउन्सिल आपल्या 'व्हॉईसेस' मासिकात 'व्हाय स्कूल्स शुड टीच यंग लर्नर्स इन होम लँग्वेज' या शीर्षकाने लेख लिहिते आणि त्यात मातृभाषेतून शिक्षणाचा आकलनशक्ती, बौद्धिक विकास यावर होणारा सकारात्मक परिणाम सांगते. गव्हर्नमेंट ऑफ हाँग काँग ने आपल्या शैक्षणिक धोरणात स्पष्टपणे या विषयी तरतुदी केलेल्या आहेत. युनायटेड अरब अमिराती, अनेक अफ्रिकन देश, जर्मनी, टर्की यासारख्या देशातही या विषयी आवाज उठवला जातोय, बदल घडत आहेत. अफ्रिकेत आणि अनेक युरोपियन देशात तर लोकांनी चळवळी उभा केलेल्या आहेत. आंतरजालावर, सोशल मिडियावर या संबंधीची मुबलक माहिती मिळते.

सोयीस्करपणे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचा स्वभाव समजू शकतो. परंतु आपल्या मुलाच्या भविष्यासाठी, वाढीसाठी, प्रगतीसाठी जर एखादी गोष्ट चुकीची आहे, आणि जे जागतिक स्तरावर वारंवार सिद्ध होत आहे, तरीही तीच गोष्ट योग्य आहे म्हणण्याला काय म्हणावं हे समजत नाही. हे कुणाला सांगायचा प्रयत्न केला की मात्र मराठी मराठी करणार्‍या कुठल्यातरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं सांगणार्‍याकडे बघितलं जातं. हा झाला महाराष्ट्राचा भाग. इतर राज्यातही बहुतेक इंग्रजीचाच पगडा आहे त्यामुळे भाषिक वैविध्यतेतून खुलणारी संस्कृती आणि तिची संपन्नता ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

वैज्ञानिक दृष्ट्या हे मानवजातीच्या वाढत्या वैफल्याचं मुख्य कारण होऊ शकतं कारण व्यक्त होता येणं ही नुसती भावनिक गरज नसून आरोग्यासाठी अनिवार्य अशी गोष्ट आहे. बहुभाषिक व्यक्तीलाही व्यक्त होण्यास मदत करते ती म्हणजे मातृभाषा. परंतु मातृभाषेतून ज्यांचं शिक्षण झालेलं नसतं त्यांना इतर भाषा शिकणंही अतिशय कठीण जातं आणि मेंदू आणि जग यात भक्कम असा दुवाच निर्माण होत नाही. त्याचं पर्यवसान वैफल्य आणि मानसिक दुर्बलतेत होतं.

या गोष्टी भंपक वाटू शकतात, किंवा वैयक्तिक मतं वाटू शकतात. परंतु याबद्दल अनेक पुस्तकं, अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यापैकी काहींचे दुवे खाली दिलेले आहेत. ते वाचावेत अशी विनंती आहे.

a2qq

आपण अनेकदा समाजाच्या विरुद्ध जायला घाबरतो. सगळे एकीकडे जात असतील तर आपण दुसरीकडे तोंड करायला कचरतो. पण मेंढरं आणि आपण मानव यात फरक आहे हे सिद्ध होत असेल तर ते या एकाच गोष्टीतून आणि ती गोष्ट म्हणजे विचार. विचार केला तर पटतं, की इंग्रजी माध्यमातून न शिकल्याने आपलं काहीही अडलं नाही. वाचलं तर कळतं, की आपल्यासारखेच अनेक आहेत ज्यांचंही काही अडलं नाही. पण 'सगळे' नावाची मंडळी आपापल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात मग आपणहही तेच केलं पाहिजे हे ठरवताना विचार होत नाही, कारण वेगळं पडणं म्हणजे मागे पडणं नव्हे हेच मुळी लक्षात घेतलं जात नाही. जे योग्य ते योग्यच म्हटलं पाहिजे, कारण मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. भविष्य हे मिळणारी नोकरी, आणि पैसे इथेच संपत असेल तर मात्र मातृभाषेचं स्थान भविष्यात न दिसणं स्वाभाविक आहे.

मुंबई पुण्यातही मातृभाषेचं महत्व पटतंय. हळू हळू का होईना, मनं बदलतायत. इंग्रजी'च्या' शिक्षणासाठी इंग्रजी'तून' शिकण्याची गरज नाही याची जाणीव होते आहे. शासनाकडूनही याला प्रोत्साहन मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. पण त्या आधी एकत्र यायची तयारी दाखवायला हवी. मग शाळांची अवस्था, तिथली मुलं, तिथले शिक्षक या सगळ्या सबबी सहज दूर होण्यासारख्या वाटायला लागतील. पण एकत्र यायला हवं. मराठीसाठीच नव्हे, प्रत्येक प्रादेशिक भाषेसाठी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी. शेवटी माणसं घडवायची आहेत; शर्यतीचे घोडे नव्हेत.

https://www.britishcouncil.org/voices-magazine/why-schools-should-teach-...
http://www.edb.gov.hk/en/edu-system/primary-secondary/applicable-to-seco...
http://timesofindia.indiatimes.com/home/education/news/Kids-fare-better-...
http://www.thenational.ae/opinion/comment/learning-in-your-mother-tongue...
https://www.culturalsurvival.org/news/mother-tongue-based-education-phil...
http://www.fremdsprachendidaktik.rwth-aachen.de/Ww/programmatisches/pach...
http://www.sbs.com.au/news/article/2016/04/01/calls-increased-mother-ton...
http://www.cu.edu.ph/?page_id=3290
https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-prim...
https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-prim...
http://www.un.org/apps/news/story.asp?NewsID=50147
http://www.isaet.org/images/extraimages/P1214011.pdf

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उद्या इंग्रजीची चलती संपली (जशी आज इंजिनीअरिन्ग कॉलेजांची संपली आहे) आणि मराठीची सुरू झाली तर हेच लोक मातृभाषेतून शिक्षणाकडे धाव घेतील.

Happy

असे कसे होईल ,
एकदा शिक्षण झाले की सम्प्ले

शिक्षणाच्या भाषेबद्दल माझे मत असे आहे की स्वतःच्या भाषेत निदान १० वी पर्यंत शिकावे. तोपर्यंत विषय नीट शिकायला अडचण येत नाही. उगाच दुसरी भाषा शिकून त्या भाषेत लिहायचे वाचायचे यात विषय शिकणे दुय्यम होते.
असे लक्षावधि लोक आहेत आमच्या वयाचे जे मातृभाषेतून १०व्वी (आमच्यावेळी ११वी) पर्यंत शिकले नि पुढे कॉलेजमधे इंग्रजी माध्यमातून शिकले. तिथेहि खूप यश मिळवले, परदेशात गेले, काहीहि अडचण आली नाही. वर्तुळ ऐवजी सर्कल हे शिकायला १० वी पास मुलाला/मुलीला काय कठीण असते? पण सर्कल, रेडियस, डायामिटर यांचे परस्पर संबंध जर पक्के कळले नसतील तर रेडियस ऐवजी डायामिटर म्हणण्याची चूक सहज होऊ शकते. (हे मुद्दाम सोप्पे उदाहरण लिहिले, कारण सध्या तरी, एकदम क्वान्टम मेकॅनिक्स मधली उदाहरणे दिली तर इंग्रजी मातृभाषा असलेल्यांना सुद्धा कळणार नाही) .
बाकी रोजच्या व्यवहारात वापरण्याच्या मराठी बद्दल मागे श्री. एलकुंचवार यांचे भाषण ऐकले ते मला पटले.
उगाच वांगे केव्हढ्याला ऐवजी ब्रिंजल केव्हढ्याला म्हणायचे नि अमेरिकेत आल्यावर ब्रिंजल म्हंटल्यावर इथले लोक म्हणतील आँ, ओह एगप्लाण्ट? मग असे जरा नीट इंग्रजी बोला की अशी तुमची इज्जत इथला एखादा दहावी नापास मुलगा काढू शकतो. काय उपयोग झाला इंग्रजीतून शिकण्यात?
नि हे तर साधे झाले, बोली भाषा तर प्रत्येक इंग्रजी भाषा बोलणार्‍या देशात वेगळी वेगळी.

Pages