भाषेचं शिक्षण आणि शिक्षणाची भाषा

Submitted by अपूर्व on 6 June, 2016 - 01:46

ब्लॉग दुवा - http://www.apurvaoka.com/2016/06/mother-tongue-education-india.html

विषय जुना आहे, काथ्या कुटून झालेला आहे. पण रहावलं नाही म्हणून पुन्हा तोच राग आळवतोय. ज्यांची मतं ठाम आहेत त्यांनी दुर्लक्ष करावं, डळमळीत आहेत त्यांनी जरूर वाचावं, आणि तटस्थ असलेल्यांनी क्षमा करावी किंवा मजा घ्यावी.

पुढचा लेख वाचला नाहीत तरी ही चार वाक्य कृपया वाचा. जरी शिक्षण म्हणजे इंग्रजी माध्यम असं पक्कं समीकरण आजकाल झालेलं असलं, तरीही मातृभाषा शिक्षणाबद्दल काही सत्य आणि त्यासंबंधी जगात बळावत असलेली भावना सांगण्याचा इथे प्रयत्न आहे. हा एखादा प्रादेशिक भाषेसंबंधीचा लेख न समजता वैश्विक विषयासंबंधी काहीतरी माहिती म्हणून इथला मजकूर लिहिलेला आहे. मुलांच्या शाळेच्या प्रवेशाच्या तारखा कदाचित उलटल्या असतील, कदाचित अजून प्रवेश बाकी असतील. तेंव्हा निर्णय घेण्याआधी लेखात दिलेले दुवे (लिंक्स) जरूर बघा, वाचा, विचार करा आणि जमलं तर पूर्वग्रह बाजूला ठेवून निर्णय घ्या.

आपण अनेकदा एखाद्या गोष्टीबद्दल काही मतं करून घेतलेली असतात. ही मतं बहुतांशी विचारांती केलेली नसतात तर ऐकीव, गोष्टींवर, किंवा कसल्यातरी प्रभाव किंवा दडपणामुळे केलेली असतात. आणि या मतांचा अणूस्फोटाप्रमाणे प्रसार होत जातो आणि त्याचं प्रथेत रुपांतर होतं. भारतातील लोक हे ठराविक बाबतीत इतके अनुकरणप्रिय आहेत की त्यांच्यावर कुठल्याही विचाराचा प्रभावच होत नाही. आणि भारतात, किंबहुना कुठेही एखादा नवा विचार साधारण तीन अवस्थांतून जातो. प्रथम काहीतरी नवीन, म्हणून त्याच्याकडे लोकं आकृष्ट होतात. नवं ते हवं, अशा भावनेने तो विचार अनेकांच्या मनत घर करतो. मग पुढे सगळेच जण त्या मार्गाने जाऊ लागले की त्याचा 'ट्रेंड' होतो. आणि मग तो ट्रेंड एखाद्या लाटेसारखा सगळ्यांना वाहून नेऊ लागला की त्याची पद्धत किंवा प्रथा होते, आणि इतर पर्यायच दिसेनासे होतात. असंच काहीसं शिक्षणाच्या बाबतीत झालेलं आहे.

हा विषय तसा नवीन नसला, आणि गेले काही महिन्यात याबद्दल बरंच लिहिलं गेलेलं असलं तरी याच्याशी निगडीत काही बाबी लक्षवेधी आहेत, प्रामुख्याने शिक्षणाच्या माध्यमाबद्दल. इंग्रजांपासून दाखला द्यायचा झाला तर इंग्रज अधिकारी लॉर्ड मॅकॉले याने इंग्रजीतून शिक्षणाची मुळं भारतात रोवली. भारतासारख्याच ब्रिटिशांच्या इतर कॉलन्या होत्या त्यांच्यावर अधिक चांगल्या प्रकारे राज्य करता यावं याकरता घेतलेला हा धोरणात्मक निर्णय होता. पुढे कॉलन्या संपल्या, देश स्वतंत्र झाले, जग खुलं झालं आणि लोकांना, देशांना काही गोष्टींचे परिणाम खुपायला, जाणवायला लागले. त्याबद्दल अभ्यास केला गेला, संशोधन केलं गेलं, आणि अनेक गोष्टी समोर आल्या.

a
#macaulayism

युनेस्को ही जागतिक स्तरावरची संस्था मातृभाषेतून शिक्षणाबद्दल आग्रही आहे. १९९० च्या दशकापासून युनेस्को ने यासंबंधी अनेक लेख, अनेक पेपर प्रकाशित केले असून बहुभाषिक देशांना मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार करण्याचं सतत आवाहन केलेलं आहे. जगातील ४०% मुलं अशा भाषेत शिक्षण घेतात जी त्यांना सहज समजत नाही आणि जी त्यांची मातृभाषा नाही. पण पुलंनी म्हटल्याप्रमाणे, सायबाची मुंबई म्हटलं की जसा आजही मुंबईकराचा ऊर भरून येतो, तसंच इंग्रजीत बोललं की अजूनही त्या माणसाबद्दल आपल्या मनात श्रेष्ठत्वाची भावना येते. परंतु युनेस्कोच्या या आवाहनांमुळे असेल किंवा स्वजाणिवेतून असेल, इतर अनेक देशांनी मात्र मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. काही देशात तर तसे कायदेही आहेत.

नेमके दाखले द्यायचे म्हटले तर, ज्या इंग्लंड देशाची ही भाषा आहे, तिथलीच नावाजलेली संस्था ब्रिटिश काउन्सिल आपल्या 'व्हॉईसेस' मासिकात 'व्हाय स्कूल्स शुड टीच यंग लर्नर्स इन होम लँग्वेज' या शीर्षकाने लेख लिहिते आणि त्यात मातृभाषेतून शिक्षणाचा आकलनशक्ती, बौद्धिक विकास यावर होणारा सकारात्मक परिणाम सांगते. गव्हर्नमेंट ऑफ हाँग काँग ने आपल्या शैक्षणिक धोरणात स्पष्टपणे या विषयी तरतुदी केलेल्या आहेत. युनायटेड अरब अमिराती, अनेक अफ्रिकन देश, जर्मनी, टर्की यासारख्या देशातही या विषयी आवाज उठवला जातोय, बदल घडत आहेत. अफ्रिकेत आणि अनेक युरोपियन देशात तर लोकांनी चळवळी उभा केलेल्या आहेत. आंतरजालावर, सोशल मिडियावर या संबंधीची मुबलक माहिती मिळते.

सोयीस्करपणे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचा स्वभाव समजू शकतो. परंतु आपल्या मुलाच्या भविष्यासाठी, वाढीसाठी, प्रगतीसाठी जर एखादी गोष्ट चुकीची आहे, आणि जे जागतिक स्तरावर वारंवार सिद्ध होत आहे, तरीही तीच गोष्ट योग्य आहे म्हणण्याला काय म्हणावं हे समजत नाही. हे कुणाला सांगायचा प्रयत्न केला की मात्र मराठी मराठी करणार्‍या कुठल्यातरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं सांगणार्‍याकडे बघितलं जातं. हा झाला महाराष्ट्राचा भाग. इतर राज्यातही बहुतेक इंग्रजीचाच पगडा आहे त्यामुळे भाषिक वैविध्यतेतून खुलणारी संस्कृती आणि तिची संपन्नता ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

वैज्ञानिक दृष्ट्या हे मानवजातीच्या वाढत्या वैफल्याचं मुख्य कारण होऊ शकतं कारण व्यक्त होता येणं ही नुसती भावनिक गरज नसून आरोग्यासाठी अनिवार्य अशी गोष्ट आहे. बहुभाषिक व्यक्तीलाही व्यक्त होण्यास मदत करते ती म्हणजे मातृभाषा. परंतु मातृभाषेतून ज्यांचं शिक्षण झालेलं नसतं त्यांना इतर भाषा शिकणंही अतिशय कठीण जातं आणि मेंदू आणि जग यात भक्कम असा दुवाच निर्माण होत नाही. त्याचं पर्यवसान वैफल्य आणि मानसिक दुर्बलतेत होतं.

या गोष्टी भंपक वाटू शकतात, किंवा वैयक्तिक मतं वाटू शकतात. परंतु याबद्दल अनेक पुस्तकं, अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यापैकी काहींचे दुवे खाली दिलेले आहेत. ते वाचावेत अशी विनंती आहे.

a2qq

आपण अनेकदा समाजाच्या विरुद्ध जायला घाबरतो. सगळे एकीकडे जात असतील तर आपण दुसरीकडे तोंड करायला कचरतो. पण मेंढरं आणि आपण मानव यात फरक आहे हे सिद्ध होत असेल तर ते या एकाच गोष्टीतून आणि ती गोष्ट म्हणजे विचार. विचार केला तर पटतं, की इंग्रजी माध्यमातून न शिकल्याने आपलं काहीही अडलं नाही. वाचलं तर कळतं, की आपल्यासारखेच अनेक आहेत ज्यांचंही काही अडलं नाही. पण 'सगळे' नावाची मंडळी आपापल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात मग आपणहही तेच केलं पाहिजे हे ठरवताना विचार होत नाही, कारण वेगळं पडणं म्हणजे मागे पडणं नव्हे हेच मुळी लक्षात घेतलं जात नाही. जे योग्य ते योग्यच म्हटलं पाहिजे, कारण मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. भविष्य हे मिळणारी नोकरी, आणि पैसे इथेच संपत असेल तर मात्र मातृभाषेचं स्थान भविष्यात न दिसणं स्वाभाविक आहे.

मुंबई पुण्यातही मातृभाषेचं महत्व पटतंय. हळू हळू का होईना, मनं बदलतायत. इंग्रजी'च्या' शिक्षणासाठी इंग्रजी'तून' शिकण्याची गरज नाही याची जाणीव होते आहे. शासनाकडूनही याला प्रोत्साहन मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. पण त्या आधी एकत्र यायची तयारी दाखवायला हवी. मग शाळांची अवस्था, तिथली मुलं, तिथले शिक्षक या सगळ्या सबबी सहज दूर होण्यासारख्या वाटायला लागतील. पण एकत्र यायला हवं. मराठीसाठीच नव्हे, प्रत्येक प्रादेशिक भाषेसाठी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी. शेवटी माणसं घडवायची आहेत; शर्यतीचे घोडे नव्हेत.

https://www.britishcouncil.org/voices-magazine/why-schools-should-teach-...
http://www.edb.gov.hk/en/edu-system/primary-secondary/applicable-to-seco...
http://timesofindia.indiatimes.com/home/education/news/Kids-fare-better-...
http://www.thenational.ae/opinion/comment/learning-in-your-mother-tongue...
https://www.culturalsurvival.org/news/mother-tongue-based-education-phil...
http://www.fremdsprachendidaktik.rwth-aachen.de/Ww/programmatisches/pach...
http://www.sbs.com.au/news/article/2016/04/01/calls-increased-mother-ton...
http://www.cu.edu.ph/?page_id=3290
https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-prim...
https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-prim...
http://www.un.org/apps/news/story.asp?NewsID=50147
http://www.isaet.org/images/extraimages/P1214011.pdf

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमी तर्काधारीत विचारांचा पुरस्कार करण्या-यांकडुन "विश्वास" नाही अशा पद्धतीचे अंधश्रद्धाळू मत वाचुन गंमतच वाटली.
युनेस्को व इतर संशोधकांनी वगैरे जेव्हा हे संशोधन केले किंवा मत मांडले तर ते ही असेच "विश्वासावर" आधारीत मांडले असेल की शास्त्रीय विचार करुन मांडले असेल?
येथील अनेक मातृभाषेविरोधी मते जी आहेत ज्यात तोटे सांगीतलेले आहेत, तर ते तोटे, जर्मनी, जपान, चायना ई. अनेकांना का नाही जाणवत? मराठी लोकांनाच कसे काय जाणवतात?
विरोधी मत मांडणा-यातील किती जणांनी लेखातील लिंक्स खरेच वाचुन समजुन घेतलया? लेखाव्यतिरिक्त इतर ठिकाणचे शास्त्रीय विवेचन वाचुन समजुन घेतले?
-----------------
येथील पराग यांचे एकमेव मत पटण्यासारखे व समतोल विचार करुन लिहिलेले वाटले.

बाकी माहीती नाही पण चीनी लोकांना पुरेपूर जाणवत असतात, इंग्रजी भाषा न येणारी भरपुर जनता असल्यामुळे तांत्रिक अन विषय संबंधी ज्ञान असूनही चीनी लोकं सर्विस इंडस्ट्री मधे खुप मागास आहेत/होते, आता बहुदा तिथे सरकार ने इंग्रजी शिक्षणावर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे असे समजते

आता बहुदा तिथे सरकार ने इंग्रजी शिक्षणावर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे असे समजते
>>
याचा अर्थ शिक्षणाचे माध्यम चायनीज बंद करुन इंग्रजी केले का बालवाडीपासुन? की दुसरी काही जास्त योग्य उपाययोजना केली?
लक्ष देणे म्हणजे मराठीचा खुन करणे / संस्क्रुतीशी / भुभागाशी / इतिहासाशी नाळ तोडणे असे असे जे मराठी लोकांना वाटते तेच केले का त्यांनी ? की योग्य विचार करुन उपाय्योजना केली?

दहावीनंतर इंग्रजी मुळे अचानक समस्यायेणे बाबतः पुर्ण मराठी माध्यमात असतान सातवीपासुरच तुम्ही स्वतः / तुमच्या मुलांना लिखित व बोलण्याच्या इंग्रजीचा सराव रोज १५ मिनिटे करुन घेऊ शकत नाहीत का? यासाठी स्वतःची सांस्कृतीक ओळख सोडुन थेट माध्यमच बदलण्याचे काय प्रयोजन? आजकाल तर एवढे चांगले इंग्रजी चित्रपट एवढ्या सोप्या रितीने उपलब्ध आहेत. त्या चित्रपटांची चर्चा करा ना इंग्रजीत?

हो हो सांभाळतो हो. कधीपासुन तुम्ही तोच राग आळवता आहात.
इथे घाईत लिहिताना तसे टाईप केले जाते आहे हे तुम्हालाही चांगलेच माहिती आहे. तरी विषय सोडुन खुसपट काढू नका.
विषयावर बोला.

तुमचा एवढा विरोध आहे मराठीला तर तुम्ही व इतर सगळे अमेरीकन हुच्चशिक्षीत ज्यांच्यामुळे आज मायबोली उभी आहे ते येतातच कशाला मायबोलीवर? इंग्रजी साईटी कमी पडल्या का?
तुमची मातृभाषेची व स्वतःच्या संस्कृतीची भुक भागवण्यासाटीच ना?

शालेय शिक्षणाचे माध्यम बदलल्याने एकदम 'सांस्कृतीक ओळख' नष्ट होत असेल तरी इतकी तकलादू ओळख त्याच लायकीची असेल.
भाषेचा विषय आला की जर्मनी, चीन, जपान इत्यादी देशांची उदाहरणे सुरु होतात. पण हे सर्व देश आर्थिक व जागतिक राजकारणाच्यादृष्टीने आपल्यापेक्षा कितीतरी जास्त ताकदवान आहेत हे सोयिस्कररित्या विसरले जाते. ज्यांच्या हाती अर्थसत्ता त्यांची भाषा पुढे जाते, ते आपल्या भाषेचा माज करु शकतात त्यामुळे ही उदाहरणे मराठीला लागू होत नाहीत. इथे मुंबईत मराठी टिकत नाहीए आणि गप्पा चालल्यात जर्मनीच्या!

मग तशा पद्धतीची सत्ता आणण्यासाठी एकत्रीत काय प्रयत्न केले? काहीतरी प्र्यत्न केले का?
जर्मनी जपान यांना हे सगळे आयते बसुन मिळाले का?
सुरुवातील मोडी शिक्षणातुन हद्दपार केली तेव्हाही कोणी विरोध का केला नाही?
आजही नव्याने सुरुवात का करत नाहीत? आजही एकत्र का येत नाही? एकत्र येऊन काय करता येईल यावर उपाय का चर्चीले जात नाहीत?
सोपा मार्ग म्हणजे हातावर हात ठेवुन बसणे का पसंत केले जाते? हा सोपा मार्ग आचरणा-यांत मराठीलोकंच अग्रेसर आहेत.
तामीळनाडून सगळे लिन्कस ग्रुप, साईट्स, टेक्नॉलॉजी विषयांवरील पुस्तके/ईपुस्तके व टेक्नॉलॉजी सेमिनार्स ही तामीळमधे खास आयोजीत केले जतात.
ते नाही हातावर हात ठेवुन बसले.
ती खासीयत आपली.

मग शांतपणे हळूहळू टाईप करा ना... मुळात घाईघाईत किंवा शांतपणे - जर हाताला शुद्धलेखनाचं वळण असलं तर - टाईप करताना शुद्धलेखनाच्या इतक्या चुका होऊ शकतात हे पटायला अंमळ जडच आहे. आणि एरवीपेक्षाही भाषाभिमानाच्या बाफवर अशा चुका दाताखाली खडे आल्यासारख्या लागतात. हे सगळ्याच अशुद्धलेखन असलेल्या प्रतिसादाबाबत लागू आहे.

आगावा, हा नीचा, अधमा, बुप्रावादी सेक्युलर कम्युनिस्टा, तुझी बोटं झडली कशी नाहीत रे सांस्कृतिक ओळखीला तकलादू म्हणताना..

लक्ष देणे म्हणजे मराठीचा खुन करणे / संस्क्रुतीशी / भुभागाशी / इतिहासाशी नाळ तोडणे असे असे जे मराठी लोकांना वाटते तेच केले का त्यांनी ? की योग्य विचार करुन उपाय्योजना केली?

तानाजीराव मालुसरेंनी प्राण दिला पण सिंहगड घेतला हे , इंग्रजीत वाचल्याने भूभाग अन इतिहास वगैरे सोबत नाळ तुटते हे नव्यानेच कळले.असो. तुमचा कदाचित इंग्रजी माध्यम , इंग्रजी माध्यम असलेल्या मिशनरी शाळा, अन गडगंज श्रीमंत लोकांची पोरे जातात त्या इंटरनॅशनल बॅकल्युरेट स्कूल ह्या तीन संकल्पनांबद्दल कमालीचा गोंधळ आहे उडलेला असे वाटते मला. पहिल्या २ पर्यायात शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असूनही संस्कृती वगैरे सोबत नाळ वगैरे तुटत नाही हा स्वानुभव आहे,

शिवाय आता संस्कृती , परंपरा, भुभागाला भुगोल वगळता एका भावनिक दृष्टीने पाहणे ह्याच्याकरता सुद्धा जर आपण शाळेवर विसंबलो तर पालक म्हणून आपण काय करणार?? महाराष्ट्र भारतातले एक राज्य आहे/ Maharashtra is a state in India. इतके जरी शाळेने शिकवले तरी महाराष्ट्र हे आपले राज्य आहे इतके सुद्धा पालक शिकवु शकत नाहियेत का? अजुन एक बेसिक प्रश्न आपण पाल्यांना शाळेत संस्कृती /भूभाग/इतिहास शिकायला पाठवतो की तो पाठ करुन सर्टिफिकेट मिळवायला पाठवतो ?? कृपया ह्यात मराठी/इंग्लिश असा भेद करू नका हुशार विद्यार्थी मग तो जिल्हा परिषद शाळेचा असो वा डॉन बॉस्कोचा शिकतो फ़क्त मार्क्स कमवायलाच, आजवर एखादे पोरगे एखाद्या कंपनी मधे गेला अन मुलाखतीत "मला भूगोलात मार्क कमी आहेत पण माझे महाराष्ट्र/भारतावर प्रेम आहे म्हणुन मला निवडा" असं म्हणालाय अन कौतुकने कंपनी ने त्याला नोकरी दिली असं माझ्यातरी ऐकिवात नाही, तुमच्या ऐकण्यात असेल तर नक्की सांगा , अस्मिता शिकवायच्या तर त्या चार भिंतीच्या आत शिकवा शाळेत सामयिक अभ्यासक्रम असतो अन तिथे कोरडा सिलेबस शिकवल्या जातो इतके लक्षात घेतले तरी पुरे.

ता क - विषयावरील माझी पहिली कॉमेंट परत एकदा वाचा ही विनंती

सोन्याबापू ती वाचली आहेत. तुमच्या त्या मतांबद्दल व कामाबद्दल आदर आहेच. तो वेगळा मुद्दा आहे.
असो.
मला इथे सांस्कृतीक नाळ अस्मिता, अभिमान या अर्थाने म्हणायचे नव्हते.

तरी इथे मला जे म्हणायचेय ते घाईत लिहिताना वेळेअभावी थोडे वेगळे मांडले जाते आहे. म्हणुन या धाग्यावर लेखनसीमा.
नंतर या मुद्द्यावर काम सुरु करेन तेव्हा परत लिहेन.

जपान मधे इग्लिश शिकवण्यावर भर दिला जात आहे तसेच इथल्या पालकांची पण सुप्त इच्छा असते त्यांच्या मुलांना इग्लिश यावे म्हणुन आमच्या सारखे फॉरिनर त्यांना इग्लिश बोलायला मिळालेला बकरा वाटतो..
माझ्या मुलिने ITतला जॉब सोडुन इग्लिश टिचरचा जॉब प़कडला आहे तो ही एका अमेरिकन कंपनी मार्फत खुप सार्‍या इंटरव्यज पार पाडुन
पालकांना इग्लिश टिचरला भेटुन खुप आनंद होत असतो..आणि त्याची इग्लिश शिकण्याची इच्छा ते बोलुन दाखवतात..
थोडक्यात घरात बोलायला मातृभाषा ठिक आहे पण सध्याच्या पिढिला शिक्षण व करियर साठी इग्लिश शिवाय पर्याय नाही

चिडताय कशाला तुम्ही?
माझ्या संशोधनाचं उद्दिष्ट माझ्या भाषेशी निगडित अजिबात नाही आणि माझी सांस्कृतिक ओळखही आधुनिक मराठी भाषेवर पूर्णतया/मुख्यत्वे अवलंबून नाही. आमच्या क्षेत्राचा मूळ उद्देश हा भौतिक अवशेषांवरून घडून गेलेल्या मानवी व्यवहारांचा अभ्यास करणे हा आहे, त्याच्या उद्दिष्टांत संशोधकाच्या भाषा-प्रांत-अभिनिवेशाला स्थान नाही... गेले दोन हजार वर्षे इथली भाषा सतत बदलत आहे.... पण हे सगळंच इथे अवांतर आहे. Happy

तुम्ही तुमचे मुद्दे न चिडता शांतपणे संगतवार अचूक लिहा की इथे, करणारे लोक मुद्यावर प्रतिवाद करतील

आणि आगावाला मी काय म्हणते आहे ते त्याला कळेल. इतरांना नाही कळलं तरी मला चालणार आहे Proud

पहिल्या २ पर्यायात शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असूनही संस्कृती वगैरे सोबत नाळ वगैरे तुटत नाही हा स्वानुभव आहे,>> आणि तिसर्‍या प्रकारातही तसे काही होत नाही हा माझा स्वानुभव आहे. उलट आपल्या आणि इतरांच्या संस्कृतीकडे संतुलीत आणि अभिनिवेषविरहीत नजरेतून पाहण्याचे शिक्षण मिळते.

जर्मनी जापानची उदाहरणे टोटल हुकलेली आहेत हे नोंदवतो. जर्मनी जपान किंवा अगदी चीन हे एकसांस्कृतिक एकभाषिक देश आहेत पुर्ण देशाची मातृभाषा एकच आहे तिकडे त्यामुळे त्यांना ती सामयिक अस्मिता जपणे जमते भारत तसा नाही १४०० भाषा असलेला देश आहे हा कुठली भाषा करायची म्हणे मग राष्ट्रभाषा??

बाकी तमिळ मधुन लिनक्स शिकणारे तुमचे मित्र आजकाल हे ही म्हणत आहेत ! खालील बातमी २०१२ मधील आहे दोन हजार सोळा साली ह्यात वृद्धी झाली असेल असे मानायला काही हरकत नसावी, नाही का?

http://www.newindianexpress.com/states/tamil_nadu/article544856.ece

आगाऊ,

धन्यवाद! मला आयबी curiculum बद्दल माहीती नव्हती म्हणून मी वगळले होते ते स्पष्टीकरण दिल्यामुळे बरेच क्लियर झाले बेसिक्स

च्यायला आमची शाळाच न्यारी होती आम्ही सगळे मध्यमवर्गीय घरातले शाळेत टाय लावुन सुद्धा तोंड उघडले की वंगाळच बोलणार कार्टी! नावाला मिशनरी स्कूल पण डिवीज़न लेवल पर्यन्त खोखो मधे आमचा दबदबा लोकांना वाटे की टाय लावणारे काय खोखो खेळतील ! पण पोरे बिलंदर इतका बेक्कार रफ गेम होता की पावले फाटुन रगत सुरु झाले तर घातल्या बनियानी फाडून पोरे चिंध्या गुंडाळात पण परत येऊन पाटीवर बसत

Proud

मागे एका धाग्यावर तुमचे माध्यम कोणते हे विचार्ल्यावर पळुन गेलेले महोदय पुन्हा नवे तोंड घेउन आले वाटतं !

विद्यार्थ्याला विशेषतः एखाद्या लहान मुलाला जो प्रथमच औपचारिक शिक्षण घेण्याची सुरुवात करत आहे त्याला नजरेसमोर / केंद्रस्थानी ठेवून विचार करायचा झाला तर त्याने आपापल्या मातृभाषेतून शिक्षण घेतले असता त्याला वेगेवेगेळ्या विषयांचा अभ्यास / ज्ञानग्रहण करण्याची प्रक्रिया आनंददायी होऊ शकते.

हे मान्य करणं इतकं अवघड आहे का?

हर्पेन जी,

हे मान्य केले तरी साध्य (चांगला जॉब) साधायला उत्तम इंग्रजी भाग आहे मग साधनाचा बाऊ कश्याला करावा? (बाऊ तुम्ही करताय असे म्हणणे नाही पण सर्वसाधारण बोलतोय, नेमकॉलिंग आम्हाला पटत नाही)

हर्पेन, मान्य-अमान्य चा प्रश्न नाहीये इथे. पण तेच एक सर्वसिद्ध अंतिम सत्य असल्याचा हेका अमान्य आहे. सगळेच जण अविचारी मॉब-मेन्टॅलिटीची मेंढरं नसतात. प्रत्येक जण त्याच्या/तिच्या दृष्टीने विचार करून निर्णय घेत असतो. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात आणि दृष्टीकोनही. हे मान्य करणंही अवघड आहे का?

जर्मनी जापानची उदाहरणे टोटल हुकलेली आहेत हे नोंदवतो. >> याच संदर्भात आगावुंना प्रतिसाद देताना मी काही प्रश्न विचारले होते. त्याची उत्तरे अजुन मिळालेली नाहीत.

जर्मनी जपान किंवा अगदी चीन हे एकसांस्कृतिक एकभाषिक देश आहेत पुर्ण देशाची मातृभाषा एकच आहे तिकडे त्यामुळे त्यांना ती सामयिक अस्मिता जपणे जमते भारत तसा नाही १४०० भाषा असलेला देश आहे हा कुठली भाषा करायची म्हणे मग राष्ट्रभाषा?? >> राष्ट्रभाषा असावीच असे कोण म्हणाले? ती एकच असावी (असलीत तर) असे कोण म्हणाले?
स्वतःची ओळख जपुनही दुस-याचा आदर करता येतो की? त्यासाठी स्वतःची ओळख सोडण्याचा हट्ट कशाला?
त्यांना तसे करणे जमले कारण त्यांच्याकडे अमुक एक गोष्ट आहे. मग आपल्याला ते जमवण्यासाठी थोडे जास्त प्रयत्न करावे लागतील, पण जमेल ना. प्रयत्न तर करुया? ते प्रयत्नच नको हे कशाला?

खालील बातमी २०१२ मधील आहे >>
School teachers too feel that learning Hindi in addition to one’s mother tongue gives students an edge when it comes to relocating outside Tamil Nadu in later years.

Learning Hindi or any other language is a matter of choice and no one can be forced to learn or shun a language. Today, with students reaching out and making their mark at the national and international arenas, it is an important advantage to know the language.

१००% सहमत.
पण मुळात माझा विरोध हिंदी किंवा इंग्रजीला आहे असे मी कुठे व कधी म्हणालो?
विरोध हिंदि / इंग्रजी शिकण्याला नाहीचै.
मला स्वता:ला कधीपासुन कन्नड व इतर भाषा शिकायच्य्हा आहेत. वेळेअभावी राहुन जातेय.
(एवढे करुन नक्की किती शाळा, त्यातील किती शिक्षक/विद्यार्थी असे म्हणतायत की कोइंबतुर मधील एकच संस्था असे म्हणतेय, हे काही त्या बातमीतुन कळत नाहीये.)

एखादा माणूस काय म्हणाला आहे त्यावर पुढचे प्रतिसाद येतातच असे नाही अभिनव! 'तो जे काही म्हणाला ते वाचून त्याला काय म्हणायचे असावे असे मला वाटले' ह्यावर मी लिहिणार! Wink

ह्यावर अजुन एक मुद्दा मांडतो हर्पेनजी, तुम्ही म्हणालात तसे शिक्षण सुरु करताना मातृभाषा माध्यम grasping करता उत्तम ! मान्य करतो मी, पण ज्या मराठी माध्यमाबद्दल आपण हे म्हणता आहात ती मराठी खरंच आपली मातृभाषा आहे का?? 'त्वरक' 'उत्प्रेरक' 'संप्रेरक' ह्या वैज्ञानिक संकल्पना म्हणा किंवा सामाजिक शास्त्र विषयातील भौगोलिक ऐतिहासिक जारगन म्हणा ही छापील मराठी आपली मातृभाषा आहे का?? कुठल्या घरातली कुठली माता अशी दिव्य छापील मराठी बोलत असेल? ही प्रमाणित मराठी आहे मातृभाषा अहिराणी, कोकणी, वर्हाड़ी इत्यादी म्हणता येतील मग काय करावे बुआ?? माझी मातृभाषा वर्हाड़ी आहे मग उद्या मी पुस्तक मागतो ज्यात लिहिले असेल की बुआ 'लोकमान्य टीळकायनं अंग्रेजाले बेज्या झाबु देल्ला! इतला का त्याहीनं टिळक महाराजाले उचलून मंडाले ले पाठोले' ही आहे बुआ माझी मातृभाषा

मुद्दा काय तर ही प्रमाणित मराठी मातृभाषा नाहीच अन त्यामुळे ती सुद्धा बहुसंख्य पाल्यांस इंग्रजी इतकीच जड़ जाते गणित शिकताना 'simultaneous equation' हे जर वाचायला जड़ जात असेल तर 'एकसमयावच्छेदक समीकरण' सुद्धा काही नीट पचत नाही कारण मुळात ती आपली मातृभाषा नाही!

मागे एका धाग्यावर तुमचे माध्यम कोणते हे विचार्ल्यावर पळुन गेलेले महोदय पुन्हा नवे तोंड घेउन आले वाटतं !

अच्छा, जोशींनी त्यांचा प्रतिसाद संपादित केला का? मी तर्कशुद्ध उत्तर दिलं म्हणून? डोळा मारा
>>
अरे देवा. तरीच मी विचार करत होतो की वरदाताई मला अशापद्धतीने का प्रतिसाद देतायत.
तर लोकहो, तो मी नव्हेच. आपला काहीतरी गैरसमज झालेला आहे.
तो प्रतिसाद संपादीत केला कारण, या वाक्यामुळे मला कळले की आपण इतका वेळ जो अनअ‍ॅक्सेप्टेबल टोन मधे रिप्लाय देत होता तो मला दुसराच कोणी समजुन देत होता. तेव्हा जो प्रतिसाद मला दिलाच नाही त्याचा प्रतिसाद मी संपादीत केला.
---
तो जे काही म्हणाला ते वाचून त्याला काय म्हणायचे असावे असे मला वाटले' ह्यावर मी लिहिणार!
>> तेच तर. म्हणुनच लेखनसीमा म्हटलो होतो. असो.

लोकमान्य टीळकायनं अंग्रेजाले बेज्या झाबु देल्ला! इतला का त्याहीनं टिळक महाराजाले उचलून मंडाले ले पाठोले
Rofl
-------
सोन्याबापू, व्यक्तीगत माझा अशा मुळच्या ख-या मातृभाषेतुन शिक्षणाला पाठिबा आहे. पण इथे प्रमाण मराठीलाच कोणी विचारत नाही.

Pages