साबुदाणा खिचडी फॅन क्लब

Submitted by टीना on 14 February, 2016 - 09:51

पेश है आपल्या सर्वांची (ज्यांची ज्यांची असेल त्यांनी हात वर करा रे) आवडती साबुदाण्याची उसळ्/खिचडी..

चतुर्थी म्हणु नका, एकादश्या घ्या, नवरात्री घ्या, हव तर रविवार (सोडून), सोमवार, मंगळवार, बुधवार (पण धरता का ?), गुरुवार, शुक्रवार, शनिवार धरणारे (म्हणजे उपासतापास करणार्‍या) सार्‍यांचीच आवडती ती ही साबुदाण्याची खिचडी..

ती कशापासुन बनते ते तिचे आहारातील चांगले वाईट स्थान इथवर सारे धागे दिसलेत मला पण फॅन क्लब दिसेना.. म्हणल आस कास ? ये धागा तो बनता ही है..
आता इथ जवळ जवळ सर्वांनाच माहिती आहे सलमान काय हाय, कस्सा हाय तरी त्याचे पंखे हायेच ना ? हायेच ना ? तस्सचं थोडूस साबुदाण्याचं हाय बघा.. वज्जेर कॅलरी का काय थे, उपयुक्तता म्हणाव तर अं अस म्हणत डोक्याले पार ताणेपर्यंत ताणा लागते पण तरी पाण्यात मुरलेली, गरम तेलात जिर्‍याच्या फोडणीत लाल हिरव्या मिरचीत ठसलेली, तळलेल्या आलुच्या काचर्‍यासंग, भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटात, जोडीला लिंबाची फोड अन तळलेल्या हिरव्या मिरच्या घेऊन सजलेली ती प्लेट दर उपासाले हाती पडावं म्हणुन हरेक माणुस मनोमन जप करतोच तस्सच...

तर इथं साबुदाणा खिचडी लव्हर्स चा कट्टा आपण सुरु करुया..
पयली मी..

तशे साबुदाण्याचे अजुनबी लय पदार्थ करता येतातच..
साबुदाण्याची खीर,
साबुदाणा वडे,
साबुदाण्याचे पापडं,
गेल्याबाजारी साबुदाण्याचा हलवा पन करुन टाका पण खिचडीची सर यातल्या कशालेच नाई म्हणजे नाई अस माजं सोच्च मत हयं.. तर जो जो या बाईचा (साबुदाण्याची खिचडी = स्त्रिलिंगी) पंखा असनं अन ज्याले ज्याले ती सार्‍या गुणदोषांसकट पसंत असन त्यानच तितक्याच सोच्च मनानं इथं हजेरी लावावी...

कृपया तिच्या दोषांचा पाढा इथं वाचु नये.. ती कोण हाय, कशी हाय सबकुछ हम जाणते हयं तरीबी, दिल क्या चीज है जानम अपनी जान इसके नाम करते है अशे डाय हार्ड फॅनच इथं येऊन या व्हॅलेंटाईन डे च्या पर्वावर काढलेल्या साबुदाणा खिचडी लव्हर्स च्या धाग्यावर तिच्या बद्दल असलेल प्रेम इथ व्यक्त करतीनं..

सोबत तिचा दिलखेचक फटू जो मीनं सोत्ताच्या कॅमेर्‍यान, सोत्ताच्या हातानं, सोत्ता कळ दाबुन (कॅमेराची..काय समजला)..आधी इटोबा न मंग पोटोबा म्हणत काल्ला तो देतायं..
भक्ताइनं भरपुर लाभ घ्यावा..

आरं काय राजेहो..
अँगल बिंगल काई पाहु नका..आरं प्रेम बगा प्रेम.. अन जोडीले समाजसेवा..पोटात भुकेचा आगडोंब उसयलेला अस्ताना त्याले चिमटा घेउन फक्त अन फक्त तुमाले दाखोता यावा म्हणुन तुमच्यासाटी काडलेला फट्टू..

नाइ नाइ .. माज्या मिरच्या खाण्यावर सुदीक घसरु नका.. अज्याब्बात तिखट नवत्या त्या..तुम्ही निर्र उसळीवरं आपलं हे खिचडीवर कॉन्सन्ट्रेट करा..

शुद्द भाषेत लिवायच ठरुन परत गोल फिरुन बोली भाषेतच घसरली..जाउद्या लहान आहे म्हणुन सोडून द्या अन भाषेचा जांगळबुत्ता गोड मानुन घ्या.. तर चला चला चला रे...साबुदाणा खिचडी लव्हर्स..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीना, भारी धागा उघडलात. खिचडीचा फोटो मस्तं आहे.

साबुदाणा खिचडी न आवडणारा जीव अजूनतरी बघितला नाही.

त्रिशंकू, हो हो. मस्तं होते किन्व्याची साबुदाणास्टाइल खिचडी. पण अनेकांना ती भगरीच्या जवळपास जाणारी चव वाटते.

मायबोलीवरची कल्पु ह्यांची पाककृती इथे आहे:
किन्वाची साबुदाणा खिचडी

आजी बाळंतिणींसाठी स्पेशल साबुदाणा खिचडी करायची. बाळंतपणात उपास्तापास आणि हे अनहेल्दी प्रकार कशाला असं कुणी विचारायला गेलं नाही. ह्याचं कारण बहुतेक घरच्यांना ह्या निमित्तानं मिळणारी स्पेशल खिचडी मिळाली नसती.

कृती: मीठ, मिरं, ओलं खोबरं वाटून घ्यायचं. साजुकतूप जिर्‍याच्या फोडणीत किंचित परतून घेऊन त्यात भिजवलेला साबुदाणा+ बदामाचा कूट घालायचा. थोडी साखर, जरासं अधमुरं दही किंवा ताज्या लिंबाचा थोडा रस घालून एक वाफ काढायची. अप्रतिम खिचडी होते.

साबुदाण्याची खिचडी विथ चिकन अशी प्रिपरेशन मी याची देहा याचि डोळा फुडफुड किंवा तत्सम च्यानेलवर पाहिलेली आहे. सापडली, की तात्काळ लिंक व फोटू टाकीन. 19.gif

दीमा, साबुदाणा खिचडी विथ चिकन/ मटण किंवा साबुदाणा खिचडीवर चिकनची/मटणाच्या रश्शाची ग्रेवी हा आमच्या सगळ्या केरळी स्टाफचा आवडता पदार्थ आहे.

आपण जसे घरी जाऊन आईच्या हातची खिचडी आणि काची को खाऊ असा प्लान करतो तसे त्या षठी -सामाशी घरी जाऊन खिचडी आणि ग्रेवी खाऊया असे प्लान करतात.
Happy

>>साबुदाण्याची खिचडी विथ चिकन

ह्या पदार्थाच्या कल्पनेला जन्म देणार्‍या व्यक्तीला पुढला जन्म कोंबडीचा मिळो!

ह्या पदार्थाच्या कल्पनेला जन्म देणार्‍या व्यक्तीला पुढला जन्म कोंबडीचा मिळो!
<<
कुकूऽच कू? 52.gif व्हाय नॉट कोंबडा जी?

साबुदाण्याच्या खिचडीत साखर असेल तर आम्ही तिला हातही लावीत नाही. रच्याकने ही आप्पाची खिचडी जिमखान्याव्र नक्की कुठे आहे हो? गेली कित्येक वर्षे सापडत नाहीये मला. चितळ्याच्या कॉर्नरला काही चहा स्नॅक्सच्या गाड्यांजवळ की जिमखना गाऊंडच्या मेन गेट्जवळ?

साबुदाणा खिचडी विथ चिकन मटण ग्रेवी खाणारा साखि चा फॅन असु शकत नाही. त्याला फार तर चिकन्/मटण फॅन म्हनता येईल.

मी पण फॅन क्लबात. फोटो बघुन भुक लागली, आत्ताच साबुदाणा भिजवते..

>>साबुदाण्याच्या खिचडीत साखर असेल तर आम्ही तिला हातही लावीत नाही.

दुकानभौ, बरूबर! अश्यावेळी चमच्यानं खावी.

बरं कोंबडा तर कोंबडा! Happy

दुकान भाउ नावाचा एक आय डी होता पूर्वी माबो वर तो कोणता बरे? दुर्योधन असे काहीसे होते का?

I hate sabudana khichdi..
मला बघा मला बघा Proud
गार गरम तेलात तुपात दही काकडी कशाही सोबत साखर घालून वा न घालता, अगदी कशीही द्या, जास्तीत जास्त चार चमचे साखि कशी बशी पोटात ढकलते मी. त्यानंतर तिचा वासही नकोसा होतो

अग तो योकु अन् ती मृण म्हणे ना असा जीव पाहिला नाही म्हणुन वाटलं पटकन सेलिब्रिटी बनुन घ्यावं Proud
हेट क्लब काढण्यापुर्ता पण साखिचा विचार करवत नाहीये Proud

उरलेल्दुसर्‍य्ची दुसर्‍या दिवशी सकाळी कांदाबिंदा घालून फोची साखि करावी असा एकांनी सल्ला दिला होता.
तर मला मुळात साखि उरतेच कशी हा प्रश्न पडला.
आणि साखि मधे कांदा??? लाहौलबिलाकुबवत.. पापं अशीच वाढतात जगातली! Wink

नी

00020468.gif

आप्पाची खिचडी - डेक्कनची बंद झाली. शनिवार पेठेत ओंकारेश्वराजवळ या डेक्कनच्या अप्पा खिचडीच्या एका चाहत्याने स्वत:चं हॉटेल काढलंय. त्याला 'अप्पा' हे नाव दिलं आहे. Happy येथे मिळणारी साखि व दका ही मूळ अप्पा खिचडीच्याच चवीची असल्याचा लोकांचा निर्वाळा आहे! मी मूळ अप्पा खिचडी खाल्ली नाही कधी, पण या ठिकाणी मिळणारी खिचडी खाल्ली आहे. मऊसूत, साजूक चवीची व लुसलुशीत होती. आवडलीच! Happy

साखी आवडतेच.
पुण्याला अप्पा (अरे! बंद झालं वाटतं), जनसेवा... त्याही पेक्षा भारी भरपेट खिचडी न्यू पुना बोर्डिंगला आषाढी इ. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळच्या जेवणाला मिळते. एकदा दिलेल्या पैशात खिचडीचा रिपीट सर्विंग अहाहा स्वर्ग. खिचडीला अनलिमिटेड रिफील कल्पनेनेच भारी वाटतंय... Happy
अरे बिपीन snacks माहित नाही का जनतेला? सह्याद्रीच्या बाहेरच्या टपऱ्यामध्ये. तिकडे खिचडी काकडी आणि तो खिचडीवर बटाट्याचा तळलेला चिवडा टाकून देतो थोडा. अशक्य खिचडी असते ती पण.

सुमेधाने लिहिल्याबर हुकूम सा.खि. केलीच आज. भिजलेल्या साबुदाण्यावर सकाळी दुधाचा हबका मारला आणि फोडणीला टाकायच्या आधी दही घातलं त्यात Happy मस्त झाली आहे. ती खात खातच फोटो डकवते आहे.

sa.khi_..jpg

कातिल फोटो Happy
बिपीनची आठवण कधीच काढून झाली. समस्त गरवारे स्टूडंट्सचं आराध्य दैवत आहे ते!! सह्याद्रीला नका देऊ तो मान :p

मंजूडी , कातिल फोटो.

एका बाऊल मध्ये आधी खिचडी घालायची त्यावर मग शेंगदणा बटाटा रस्सा त्यावर दह्यातली काकडीची कोशिंबीर त्यावर तिखट बटाटा सळ्या आणि वर शोभेसाठी डाळींबाचे दाणे आणि थोडी कोथिंबीर . जोडीला गोड म्हणून भरपुर नारळ आणि वेलची घातलेला रताळ्याचा गोड कीस . जेवणच होऊन जात.

नका रे असे त्रासदायक फोटो इथे देऊ!

मी आजन्म सभासद!
नवरा उपासाच्या वाटेला जात नाही. मी संकष्टीचा उपास करते. तेव्हा माझ्यापेक्षा जास्त खिचडी तो खाईल हे ग्रूहीत धरून साबुदाणा भिजत पडतो.

आवडते. खुप आवडते पण आरोग्याला चांगली नाही म्हणुन आणि त्याहीपेक्षा एका मैत्रिणीने, 'काय गं, शाकाहारी ना तु? मग साबुदाणा काय खातेस, कसा बनवतात माहिती आहे का? हे सांगितल्यावर 'कसा बनवतात' हे माहिती करुन घ्यायची तसदी न घेता खायची बंद केली. काय करायचे, मन असेच असते. माहीत नव्हते तोवर सर्व ठीक होते पण शंकेचा जंतु मनात शिरल्यावर जमेना. Sad

मला वाटत इथेच कुठेतरी दिनेशदांनी साबुदाणा कसा तयार केला जातो त्याची प्रक्रिया दिली होती. ती प्रक्रीया वाचल्यावर लक्षात येत की फेसबुक किंवा व्हॉट्ट्स अ‍ॅपमधुन पसरली गेलेली माहिती चुकीची आहे. दिनेशदांच्या लेखनात असेल तर शोधुन टाकते इथे कारण मला चांगल आठवतय मी त्या पोस्टला रिप्लाय केला होता...

किंवा दिनेशदा तुम्हाला विनंती की ती कृती तुम्ही परत शेअर करावीत...

Pages