साबुदाणा खिचडी फॅन क्लब

Submitted by टीना on 14 February, 2016 - 09:51

पेश है आपल्या सर्वांची (ज्यांची ज्यांची असेल त्यांनी हात वर करा रे) आवडती साबुदाण्याची उसळ्/खिचडी..

चतुर्थी म्हणु नका, एकादश्या घ्या, नवरात्री घ्या, हव तर रविवार (सोडून), सोमवार, मंगळवार, बुधवार (पण धरता का ?), गुरुवार, शुक्रवार, शनिवार धरणारे (म्हणजे उपासतापास करणार्‍या) सार्‍यांचीच आवडती ती ही साबुदाण्याची खिचडी..

ती कशापासुन बनते ते तिचे आहारातील चांगले वाईट स्थान इथवर सारे धागे दिसलेत मला पण फॅन क्लब दिसेना.. म्हणल आस कास ? ये धागा तो बनता ही है..
आता इथ जवळ जवळ सर्वांनाच माहिती आहे सलमान काय हाय, कस्सा हाय तरी त्याचे पंखे हायेच ना ? हायेच ना ? तस्सचं थोडूस साबुदाण्याचं हाय बघा.. वज्जेर कॅलरी का काय थे, उपयुक्तता म्हणाव तर अं अस म्हणत डोक्याले पार ताणेपर्यंत ताणा लागते पण तरी पाण्यात मुरलेली, गरम तेलात जिर्‍याच्या फोडणीत लाल हिरव्या मिरचीत ठसलेली, तळलेल्या आलुच्या काचर्‍यासंग, भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटात, जोडीला लिंबाची फोड अन तळलेल्या हिरव्या मिरच्या घेऊन सजलेली ती प्लेट दर उपासाले हाती पडावं म्हणुन हरेक माणुस मनोमन जप करतोच तस्सच...

तर इथं साबुदाणा खिचडी लव्हर्स चा कट्टा आपण सुरु करुया..
पयली मी..

तशे साबुदाण्याचे अजुनबी लय पदार्थ करता येतातच..
साबुदाण्याची खीर,
साबुदाणा वडे,
साबुदाण्याचे पापडं,
गेल्याबाजारी साबुदाण्याचा हलवा पन करुन टाका पण खिचडीची सर यातल्या कशालेच नाई म्हणजे नाई अस माजं सोच्च मत हयं.. तर जो जो या बाईचा (साबुदाण्याची खिचडी = स्त्रिलिंगी) पंखा असनं अन ज्याले ज्याले ती सार्‍या गुणदोषांसकट पसंत असन त्यानच तितक्याच सोच्च मनानं इथं हजेरी लावावी...

कृपया तिच्या दोषांचा पाढा इथं वाचु नये.. ती कोण हाय, कशी हाय सबकुछ हम जाणते हयं तरीबी, दिल क्या चीज है जानम अपनी जान इसके नाम करते है अशे डाय हार्ड फॅनच इथं येऊन या व्हॅलेंटाईन डे च्या पर्वावर काढलेल्या साबुदाणा खिचडी लव्हर्स च्या धाग्यावर तिच्या बद्दल असलेल प्रेम इथ व्यक्त करतीनं..

सोबत तिचा दिलखेचक फटू जो मीनं सोत्ताच्या कॅमेर्‍यान, सोत्ताच्या हातानं, सोत्ता कळ दाबुन (कॅमेराची..काय समजला)..आधी इटोबा न मंग पोटोबा म्हणत काल्ला तो देतायं..
भक्ताइनं भरपुर लाभ घ्यावा..

आरं काय राजेहो..
अँगल बिंगल काई पाहु नका..आरं प्रेम बगा प्रेम.. अन जोडीले समाजसेवा..पोटात भुकेचा आगडोंब उसयलेला अस्ताना त्याले चिमटा घेउन फक्त अन फक्त तुमाले दाखोता यावा म्हणुन तुमच्यासाटी काडलेला फट्टू..

नाइ नाइ .. माज्या मिरच्या खाण्यावर सुदीक घसरु नका.. अज्याब्बात तिखट नवत्या त्या..तुम्ही निर्र उसळीवरं आपलं हे खिचडीवर कॉन्सन्ट्रेट करा..

शुद्द भाषेत लिवायच ठरुन परत गोल फिरुन बोली भाषेतच घसरली..जाउद्या लहान आहे म्हणुन सोडून द्या अन भाषेचा जांगळबुत्ता गोड मानुन घ्या.. तर चला चला चला रे...साबुदाणा खिचडी लव्हर्स..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्‍याचदा, गरम गरम असते तेंव्हा अगदी मऊ आणि थंड झाल्यावर एक्दम कडक अशी खिचडी होते. त्यावरून बहुतांश वेळा साबु चांगला लागला नाही, असे अनुमान काढले जाते. दुकानातच चांगल्या साबुचे प्रकार ओळखण्यासाठी काही टिपा असतील तर द्याव्यात. आणि हळुहळू पंख्याच्या काठावरून बाहेर पडायच्या बेतात असलेल्या एकास आत खेचा.

सकाळी सकाळी अत्याचार!! फोटो पाहून साखिची अतिशय तीव्रतेने आठवण झाली. मला साजूक तुपातली, बटाटे घातलेली, दाण्याचे कूट घातलेली, किंचित गोडसर अशी खिचडी, वर हिरवी मिरची कातरून, भरपूर कोथिंबीर, सोबत लिंबाची फोड, घट्ट व गोडसर दही किंवा सुमधुर ताक अशी खिचडी परमप्रिय आहे. लहानपणी मी म्हणे या खिचडीला परीची खिचडी म्हणायचे. त्याला कोणत्यातरी गोष्टीचा संदर्भ होता. आता ती गोष्टच आठवत नाही!

दक्षिण भारतात एकदा महाशिवरात्रीला हळदीची फोडणी दिलेली, सिमला मिरची व टोमॅटो घालून केलेली (आणि तरी छान चवीची!) खिचडी खाल्ली आहे. तशी खिचडी घरी करून बघायचे डेअरिंग होत नाही. तसेच काहीजण कांदा घालून साबुदाण्याची खिचडी करतात व खातात हे बहुधा मायबोलीवरच प्राप्त झालेले ज्ञान आहे. तशी खिचडी चवीला कशी लागेल याची कल्पनाच करवत नाही. आपल्याला अशी साजूक खिचडीच आवडते. गेल्या आठवड्यात पुण्यातली फेमस अप्पाची खिचडी व दही-काकडी खाल्ली. तीही आवडली. दही-काकडी हा प्रकार खिचडीसोबत खाण्यासाठीच जन्माला आला असावा! Happy

मी साखि फॅनक्लबात.
पण माझी खिचडी कधीच बरोबर होत नाही. कधी चिकट्गुंडा तर कधी कडकडीत. नेहमी साबुदाणा बरोबर नव्हता हे कारण पुढे करते. Sad

मागे साबुदाणा कसा भिजवायचा हे इथेच माबोवर विचारलेल्ं / वाचलेलं. तसंही करुन पाहिलं पण रीझल्ट तोच. Sad

जमल्यास इथेच कुणीतरी-ज्यांची खिचडी वरच्या फोटोतल्यासारखी मउ, सुटी सुटी होते- त्यांनी, योग्य साबुदाणा ओळखुन, योग्य प्रकारे भिजवुन, योग्य भांडं, फोडणी, साखर, दाणेकुट, मीठ, हिमि इइ सगळं लिहुन रेसीपी लिहा.

मलाही आवडते साखि.. पण माझ्या नवरोबाचं नाव घ्या फॅन क्लबात! गुरुवारी माझा उपवास पण त्यालाच दोन टिफिन भरुन साखि! Happy

मायक्रोवेव्हमधे आताच साखि करायला सुरु केलयं .. एक्स्ट्रा टिपसाठी धन्यवाद नंदिनीतै Happy

@नीधप,

शंभर हिश्याने सत्य सांगितलेत बघा तुम्ही!. चिमुटभर साखरेने खरोखर बाकी फ्लेवर उभारुन येतात अगदी. कदाचित caramalization मुळे असेल पण असे होते खरे.

शिवाय "rataouille" मधे तो शेफ असणारा उंदीर मामा सांगतो त्याप्रमाणे ओदनकला ही बरीचशी एखादी सुंदर सप्तसुरांची चाल बांधणे किंवा एखादे मास्टरपीस पेंटिंग केल्यासारखी आहे एखादी बारकी लकेर किंवा तान गवयाने उचलावी अन अंगावर काटा यावा सरसरून किंवा एक ठिपका वेगळ्या रंगाचा देऊन पुर्ण पेंटिंगची खोली वाढणे असेच काहीसे ती एक चिमुट साखर करते बघा!

साबुदाणा खिचडी मधे दोन प्रकार,
१. हिरवी मिरची, बटाट, शेंगदाण्याचे कुट टाकुन,
२. लाल मिरची पुड, बटाट, शेंगदाण्याचे कुट टाकुन,

आम्ही खिचडी राहिली / उरली की वाळवतो उन्हात फॅन खाली असं

कडक होतो साबुदाना मस्त मग तेलात तळतो ते..

खुप्प्प्प मस्त लागतं ते..

हा त्यासाठी मात्र खिचडी थोडी जास्त करुन उरवायला हवी .. Happy

मला पण आव्डते वडा पण आवडतो; पण आता सोडली खायची. बबल ब्लास्ट गेम खेळताना ते साबुदाणे आहेत अशी कल्पना करून घेते.

मुंबईत गुजरात्यांना आजिबात आपल्या सारखी जमत नाही. नुसतेच शेंगदाणे घालतात भाजलेले. सॅक्रिलेज!!!

पण धनश्री फूडची रेडिमेड मस्त बनते. सर्व मिक्स एक तास भिजवायचे व अगदी एक चमचा तुपावर पाच मिनिटे परतले की बास्स.

मला बरोबर दह्यातली काकडीची कोशिंबीर आवडते.

डेक्कन जिमखान्यावरच्या ग्राउंड पासल्या आप्पाच्या खिचडीची आठव्ण का नाही निघाली अजून?
जनसेवात पण सुरेख मिळत असे खिचडी.

उरलेल्या थोड्याश्याच खिचडीत भरपूर ताक व शेंगदाण्याचे कूट घालून स्लर्प करत खायला पण मजा येते

एकदा माझ्या घरी हैद्राबादेस एका अ‍ॅड् चे शूटिंग होते. तर दुर्गा जसराज व एक मराठी हेअर मेकप गर्ल आली होती. आईचा उपास म्हणून मी खिचडी फोडणीस टाकली. तर काय जीभ खवळली असे त्या दोघींनी नंतर सांगितले

वाढदिवसाला एक प्लेट खाइन.

वैशालीतला साबुदाणा वडा खाल्लाय का? ऑस्सम. चटणी तर एकदम सुप्पर.
हमने खिचडीसे मोहोब्बत की है. ऐयाशी नही.

उपास नसेल तर कांदा, मिर्ची, हळद, दाण्याचे कूट, तेलात तळ्लेले बटाटे (लहान फोडी), कोथींबर, कडीपत्ता घालुन केलेली खिचडी छान लागते

मी आणि माझी मुले सुद्धा यात समाविष्ट आहेत. पण बायकोला आवडत नसल्यामुळे महिन्यातून फक्त ४ ते ५ वेळच फक्त होते. पण आम्हाला बटाटे घातलेले आवडत नाहीत...

मी एकदा एका राजस्थानी मैत्रिणीकडे आख्खे शेंगदाणे आणि टोमॅटो घातलेली खिचडी खाल्ली होती.

टीना, मस्त लिवलयस.

मी पण साखि फॅन क्लबात. पण दही पाहिजेच. नसेल तर साबुदाणा भिजलेला असला तरी ही खिचडी कँसल.

त्या छोट्या साबुदण्याची पण छान होते हल्ली तर मला त्याचीच जास्त आवडते.

टीना, भारीये हे... तोंपासु..
मी पण फॅन क्लबात.....
इकडे साबुदाणा नाही मिळत आता फोटो बघून भूक भागवते...

टिने असा जीवघेणा धागा काढलास त्याचं पाप कुठे फेडशील? Angry
साखि माझा जीव की प्राण एकदम. पण सध्या खायची नाहीये.
का गं असा जीव घेतेस Sad

आत्ता आत्तापर्यंत असलेल्या माझ्या आजेसासुबाई काय खिचडी बनवत. एखाद्या तान्ह्या बाळाचे करावेत तसे लाड करायच्या अगदी त्या खिचडिचे...

रात्री साबुदाणा धुवून मग रोवळीत उपसून ठेवायच्या. दुसर्‍या दिवशी सकाळी चितळेच्या फुल फॅट दुधाचा हबका द्यायच्या त्यावर. मग मोठ्या लोखंडाच्या कढईत, घरी कढवलेल्या भरपूर तुपाची, जिरे व मिरच्यांचे लांब तुकडे ( हो, म्हणजे हवे तो खाईल व नको तो काढून टाकेल) घालून ( शिवाय थोडे जिरे, मिठ व मिरची खरंगटून)
मग त्यातच उकडलेल्या बटाट्याचे तुकडे, त्याला तेवढ्यापुरतेच मिठ चोळून ( म्हणजे चव जिथल्यातिथे रहाते) मग झाकण ठेवून एक वाफ. तोवर सुरकुतलेल्या पण तुकतुकीत हातांच्या लाल-गोर्‍या बोटांनी थोडे सायीचे दही, मिठ, गोडसर चव येइल एवढी साखर, व भरपूर प्रमाणात घरचे दाण्याचे कूट (दाणे घरीच वाळूवर लालबुंद रंगावर भाजून, मग एकेक मुठ दाणे घेऊन त्याची अगदी निगुतीने साले काढून, खलबत्याने तयार केलेले कूट) एकत्र मिसळून मग ती खिचडी फोडणीस टाकायच्या. लोखंडी लांब दांड्याच्या उलथन्याने खरपूस होईपर्यंत परतून मग वरून परत थोडे साजूक तूप व नंतर खोबरे कोथिंबीर घालून वर लिंबाची चंद्रकोर ठेवून ती गुलाबी दिसणारी आंबट-गोड चवीची लुसलुशीत खिचडी सगळ्यांना मायेने खाऊ घालायच्या. आता नाही मिळणार तशी खिचडी.

मस्त कृती मेधावि. माझ्या पणजे सासू बाई सांगलीत अशीच करत असे नवर्‍या कडून ऐकले आहे.
चुलीवरची एकट्या सोवळ्या बाई साठी बनवलेली थोडीशीच खिचडी पन ही सर्व नातवंडे जीव
टाकत. माझी आई पण सुरेख बनवत असे खिचडी व कधी कधी मला भेटायला पुण्यास आली की प्लास्टिकच्या पिशवीतून उरलेली थोडीशी आणत असे. तिच्या खिचडीत साखर अंमळ जास्त असे. व दुधाच्या अर्ध्या लिटरच्या पिशवीत थोडीशी खिचडी . तिचे तूप पिशवीला लागलेले असे आतून. Happy
बहिणी घरी गरम गरम खात असतील.

खिचडी महात्म्य हे साबुदाण्याचे थालिपीठ ह्या बद्दल एक अध्याय लिहील्या शिवाय पूर्ण होणार नाही.
हे फारच ऑसम लागते दह्या बरोबर. एक बटाटा किसून घातला पाहिजे व ताकात भिजवले तर मस्त
चव येते.

आनंदी खिचडी वाळवून आम्हीपण करतो (तूप किंवा तेल नाही घालत) त्याला साबुदाणा चिवडा म्हणतो. मावेमध्ये पण करते मी.

मी या क्लबात तहहयात सामील! Wink कितीही दोष असले त्या साबुदाण्यात तरी वर म्हटल्याप्रमाणे गरम खिचडीची प्लेट पुढे आली की कुणीही नाही म्हणतच नाही!

ही मेघना च्या साखी ब्लॉगची लिंक - http://khaintartupashi.blogspot.in/2008/08/blog-post.html

अरे ब्बाप्परे..
इथं तर सुटलेच सगळे .. सुसाट एकदम..

तुम्हाला म्हणुन सांगते..अज्ज्याब्बात ऑऑऑऑऑऑ करायच नाय म्हणजे नाय..
गोस्ट अशी का आमी कदीच साबुदाण्याची उसळ तुपात करत नाय (हो .. इकडं खिचडी हा शब्द प्रचलित नाय)...
उपासाला काकडी, सांभार (कोथिंबीर) वगैरे चालत नाय आमच्याकडं..
दही मात्र पायजेलच सोबत वाटीभर..
आता एकवेळ घरी गेली का तुपामदी ट्राय मारते Wink

गजानन, ते कोनफळ आहे आणि तेही घरच्या कुंडीत वाढवलेले. ( त्यात साबुदाणा चीनचा, शेंगदाणे व्हीएटनामचे, ज्या बटरचे तूप केले ते डेन्मार्कचे, मीठ अंगोलाचे, जिरे भारतातले, मिरचीपूड श्रीलंकेतली आणि चिमूटभर साखर दक्षिण आफ्रिकेतली आहे )

Pages