साबुदाणा खिचडी फॅन क्लब

Submitted by टीना on 14 February, 2016 - 09:51

पेश है आपल्या सर्वांची (ज्यांची ज्यांची असेल त्यांनी हात वर करा रे) आवडती साबुदाण्याची उसळ्/खिचडी..

चतुर्थी म्हणु नका, एकादश्या घ्या, नवरात्री घ्या, हव तर रविवार (सोडून), सोमवार, मंगळवार, बुधवार (पण धरता का ?), गुरुवार, शुक्रवार, शनिवार धरणारे (म्हणजे उपासतापास करणार्‍या) सार्‍यांचीच आवडती ती ही साबुदाण्याची खिचडी..

ती कशापासुन बनते ते तिचे आहारातील चांगले वाईट स्थान इथवर सारे धागे दिसलेत मला पण फॅन क्लब दिसेना.. म्हणल आस कास ? ये धागा तो बनता ही है..
आता इथ जवळ जवळ सर्वांनाच माहिती आहे सलमान काय हाय, कस्सा हाय तरी त्याचे पंखे हायेच ना ? हायेच ना ? तस्सचं थोडूस साबुदाण्याचं हाय बघा.. वज्जेर कॅलरी का काय थे, उपयुक्तता म्हणाव तर अं अस म्हणत डोक्याले पार ताणेपर्यंत ताणा लागते पण तरी पाण्यात मुरलेली, गरम तेलात जिर्‍याच्या फोडणीत लाल हिरव्या मिरचीत ठसलेली, तळलेल्या आलुच्या काचर्‍यासंग, भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटात, जोडीला लिंबाची फोड अन तळलेल्या हिरव्या मिरच्या घेऊन सजलेली ती प्लेट दर उपासाले हाती पडावं म्हणुन हरेक माणुस मनोमन जप करतोच तस्सच...

तर इथं साबुदाणा खिचडी लव्हर्स चा कट्टा आपण सुरु करुया..
पयली मी..

तशे साबुदाण्याचे अजुनबी लय पदार्थ करता येतातच..
साबुदाण्याची खीर,
साबुदाणा वडे,
साबुदाण्याचे पापडं,
गेल्याबाजारी साबुदाण्याचा हलवा पन करुन टाका पण खिचडीची सर यातल्या कशालेच नाई म्हणजे नाई अस माजं सोच्च मत हयं.. तर जो जो या बाईचा (साबुदाण्याची खिचडी = स्त्रिलिंगी) पंखा असनं अन ज्याले ज्याले ती सार्‍या गुणदोषांसकट पसंत असन त्यानच तितक्याच सोच्च मनानं इथं हजेरी लावावी...

कृपया तिच्या दोषांचा पाढा इथं वाचु नये.. ती कोण हाय, कशी हाय सबकुछ हम जाणते हयं तरीबी, दिल क्या चीज है जानम अपनी जान इसके नाम करते है अशे डाय हार्ड फॅनच इथं येऊन या व्हॅलेंटाईन डे च्या पर्वावर काढलेल्या साबुदाणा खिचडी लव्हर्स च्या धाग्यावर तिच्या बद्दल असलेल प्रेम इथ व्यक्त करतीनं..

सोबत तिचा दिलखेचक फटू जो मीनं सोत्ताच्या कॅमेर्‍यान, सोत्ताच्या हातानं, सोत्ता कळ दाबुन (कॅमेराची..काय समजला)..आधी इटोबा न मंग पोटोबा म्हणत काल्ला तो देतायं..
भक्ताइनं भरपुर लाभ घ्यावा..

आरं काय राजेहो..
अँगल बिंगल काई पाहु नका..आरं प्रेम बगा प्रेम.. अन जोडीले समाजसेवा..पोटात भुकेचा आगडोंब उसयलेला अस्ताना त्याले चिमटा घेउन फक्त अन फक्त तुमाले दाखोता यावा म्हणुन तुमच्यासाटी काडलेला फट्टू..

नाइ नाइ .. माज्या मिरच्या खाण्यावर सुदीक घसरु नका.. अज्याब्बात तिखट नवत्या त्या..तुम्ही निर्र उसळीवरं आपलं हे खिचडीवर कॉन्सन्ट्रेट करा..

शुद्द भाषेत लिवायच ठरुन परत गोल फिरुन बोली भाषेतच घसरली..जाउद्या लहान आहे म्हणुन सोडून द्या अन भाषेचा जांगळबुत्ता गोड मानुन घ्या.. तर चला चला चला रे...साबुदाणा खिचडी लव्हर्स..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी खिचडीत साखर घालत नाही, आई घालते. नवऱ्याला साखरेचा डबा जवळ देते. हवी असल्यास घाल. >>>> है शाब्बास. आमच्याकडे साखर न घालणे हा ऑप्शनच नसतो. म्हणुन आईकडे गेल की बिनसाखरेची खिचडी खाण्याचा आनंद घेते.

धन्यवाद हो सगळ्यांना....मंजूडी, मस्त दिसतीये खिचडी. नॉस्टॅल्जिक व्हायला झालंय.

आज साबा असत्या तर उत्साहात परत पदर खोचून परत उभ्या राहिल्या असत्या. अनेक वर्षे अनेक कार्यक्रमांसाठीचा त्यांचा हा सोप्पा हातखंडा पदार्थ.

बरं ...एक टीप अजून माझ्याकडून...खलबत्ता वापरून दाण्याचे कूट न करू शकणार्‍यांसाठी, थोड्या दाण्यांचे कूट मिक्सरमधून जरा जाडसर करावे व थोडे दाणे पोळपाटावर लाटून घेऊन मग साबुदाण्यात मिसळावेत. एकूण कन्सिस्टन्सी चांगली येते त्याने.

आजे साबांच्या रेसिप्या त्यांच्याच शब्दात उतरवून ठेवायला हव्यात खरं तर. करमरीत, दरदरीत, सरसरीत, उलुस्सं, उगाच आपलं शास्त्र केल्यासारखं, सालासुद्धा, चळचळीत वगैरे विशेषणे वापरत.

जरास्से ठेचून, मोडून, चुरडून, खरंगटून, चिमट्यात चेचून, पोळपाटावर लाटून, पालथ्या वाटीने खरडून, पाट्यावर वाटून, उगाळून अश्या अनेक प्रकारे त्या पदार्थ प्रोसेस करीत. मिक्सर वापरायची वेळ सहसा येत नसे त्यांच्यावर. पण आलीच तर.... मउ पातळात गुंडाळून ठेवलेला तो मिक्सर लोखंडी कपाटाच्या खालच्या कप्यातून बाहेर काढला जात असे. मग त्यातून तो खोक्यातला मिक्सर बाहेर काढून परत एकदा पुसणे, मग वाटण्याचे काम झाले की परत सगळे सोपस्कार पार पाडून परत मउ फडक्यात गुंडाळून परत एकदा कपाटात स्थानापन्न करणे. पहाणार्‍यालाही ही शिक्षा वाटे. नंतर नव्या पिढितल्या घरी सिंकमधे इतर भांड्याबरोबर घासायला टाकलेले मिक्सरचे भांडे पाहून व ३ माणसांच्या घरात दोन दोन मिक्सर पाहून त्या कावर्‍याबावर्‍या झाल्या होत्या. Happy

गोडसर चवीचीच मुगाची किंवा चवळीची उसळ करताना त्या कुकरमधे शिजलेले कडधान्य हातानेच जरासे मोडून , पाणी घालून सारखं करून मग त्यात एक आमसूल, सुके खोबरे, गोडा मसाला, मिठ, गूळ, कोथिंबीर, लाल तिखट हे सर्व मिश्रण हाताने जरासे कालवून मग त्यात मिसळून मग हे सगळे फोडणीस घालून अक्षरशः ५ मिनिटात स्वर्गीय चवीची उसळ करत. फोडणीत मोहोरी, घरी कुटलेला हिंग व जरास्सा चुरडून टाकलेला कढिपत्ता, लसूण व हळद बास. सगळ्यात सोप्पा स्वैपाक ब्राम्हणांचा असे म्हणायच्या. खिचडीच्या धाग्यावर जरा अवांतर झालेय खरं पण नंतर योजाटा. Happy

देवीका, छान आहे रेसिपी.अश्या पद्धतीने केलेली नाहीये कधी पण वाचताना तोंपासु झालं की ती रेस्पी छानच असते Happy

(मेधावि, खूप गोड लिहिलंयस. तुझ्या आजे साबांच्या रेस्पीज आवडतील करायला.. Happy )

मेधावि, मस्त पोस्ट!
नंतर नव्या पिढितल्या घरी सिंकमधे इतर भांड्याबरोबर घासायला टाकलेले मिक्सरचे भांडे पाहून त्या कावर्‍याबावर्‍या झाल्या होत्या. ह्याबाबत मी आसांशी सहमत.

सुमेधा मस्त पोस्ट! बऱ्याच गोष्टींशी रिलेट झाले. वेगळ्या स्वतंत्र धाग्यावर लिहीच नक्की.
तुझ्या खिचडीच्या पोस्टमधलं काय मनावर कोरलं गेलं ( What made me cook khichadee so instantly) तर तू वापरलेली 'सुरकुतलेले तुकतुकीत हात' ही शब्दरचना Happy खरंच आजीचा हात आपल्या गालावरून फिरतोय असं वाटलं. मी एकदम बालवयात शिरले.

सुमेधा, तू म्हणतेयस ते सगळे शब्द आईकडून ऐकलेले आहेत घरात.
हे असे खास शब्द मला फार आवडतात. भाषा समृद्ध अश्याच शब्दांमुळे असते.

तिखट खाणार्यांसाठी - शेंगदाणे बारीक करतांना त्यात हिरवी मिरचीही मिक्सर मधे बारीक करा. मस्त युनिफार्म तिखट चव लागते.

मेधावि, छान लिहितेस. वेळ मिळाला की तुझ्या आजे सासुबाईंबद्दल जरुर जरुर लिहि. एक छान व्यक्तिचित्र उभे राहते आहे डोळ्यासमोर. त्याला पुर्ण कर.

मेधावि, छान लिहितेस. वेळ मिळाला की तुझ्या आजे सासुबाईंबद्दल जरुर जरुर लिहि. एक छान व्यक्तिचित्र उभे राहते आहे डोळ्यासमोर. त्याला पुर्ण कर.

+१

त्यांच्या रेसिपीज पण लिही.

धन्यवाद. मी खरंच भाग्यवानच. कारण नुसत्या आजे नाही तर मला पणजेसासूबाईंचा (आ. साची आई) ही सहवास लाभलाय. त्या स्वातंत्र्य-सैनिक होत्या. ९९ वर्षे व्यवस्थित होत्या. त्यामुळे आमच्या घरी शंभर वर्षांचा इतिहास नांदता होता. माझी मुलगी त्यांच्याबरोबर असायची त्यामुळे तिच्या बोलण्यात झग्याची गुंडी, पोलके, लुगडे, मी निजले होते, उन उन भात खाल्ला, अमूक अमूक बाहेर गेलाय तो परतून आला की मग मी जाईन, तुझा का चुळचुळ मुंगळा झालाय वगैरे भाषा असे...... ऐकणार्‍याला जरा जडच जाई.

इथे अनेक जण आणि अनेक जणी पाककृती फक्त वर वर सांगतात. धागा उघडून सचित्र पाककृती लिहायला इतका प्रचंड स्कोप आहे पण लक्ष मात्र इतर गोष्टींकडेच जास्त वळलेले असते तर काय करणार Happy वेळात वेळ काढून तुमच्या कडच्या पाककृती लिहा. मग त्या भाज्यांच्या असतो, डाळींच्या असोत, उपहारांच्या असोत, चटण्यांच्या असोत, आमट्यांच्या, वरणांच्या कशाच्याही असोत.. पण लिहाच.

सुमेधा, वाचतानाच किती मस्त वाटतंय. अगदी माझ्या आज्जीची आठवण आली. छानपैकी एक व्यक्तीचित्र नक्की लिही.

साखित साखर टाकणार्‍यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे. हे इथे अशासाठी लिहिलेय की हल्ली आपल्या विचारांशी विचार जुळले नाही की त्याला पाकिस्तानात डिपोर्ट करण्याची शिक्षा देण्याची पद्धत आहे ::फिदी:

मेधावि.. कित्ती छान लिहलयसं .. Happy

वेळ मिळाला की तुझ्या आजे सासुबाईंबद्दल जरुर जरुर लिहि. एक छान व्यक्तिचित्र उभे राहते आहे डोळ्यासमोर. त्याला पुर्ण कर. +१

फारच क्यूट लिहिलय सुमेधा..
भाषा समृद्ध अश्याच शब्दांमुळे असते >> +३६९

तिच्या बोलण्यात झग्याची गुंडी, पोलके, लुगडे, मी निजले होते, उन उन भात खाल्ला, अमूक अमूक बाहेर गेलाय तो परतून आला की मग मी जाईन, तुझा का चुळचुळ मुंगळा >>> गुंडी, पोलके, निज, चुळ्चुळ मुंगळा....... माझी आज्जीच उभी केलीस समोर .............

सेम माझ्या आजीचे शब्द.
पण चुळचुळ मुंगळा हा शब्द आमच्या घरात आई, काकू सर्वांनी आपापल्या मुलांसाठी पुरेपूर वापरलेला आहे. त्यामुळे अर्थातच तो माझ्याही तोंडात असतो. Happy

मस्त चर्चा! मी पन फॅन क्लबात.
"एकादशी आणि दुप्पट खाशी" ही म्हण अगदी सार्थ होईल एवढी साखि खायचो. त्यात बटाटा चिवडा, ताक आणि केळी सोबत असल्यावर तर जन्नतच.

अप्पाची खिचडी आणि बिपीन स्टॉलला भेट दिलीच पाहिजे आत्ता.

सुमेधा, मस्त पोस्ट्स! माझ्या आजीची आठवण आली. सायीसारखे मऊ हात.. शंभर मेनीक्युअरांच्या तोंडात मारावी.
मिक्सरचे कौतुक अप्रतिम उतरवले आहेस!
माझी आई अतिशय सुंदर खिचडी बनवते साबुदाण्याची. दर शुक्रवारी आमच्या घरी वाड्यातली सगळी लहान मुलं छोट्या ताटल्यांमधे साखि खातायत असं दृश्य असायचं. आईच्या साखिची फर्माईश आता नेहमी तिन्ही जावयांकडून असते. Happy सढळ हातांनी घातलेला भरड दाण्याचा कूट हीच गुरूकिल्ली.
माझ्या साबा साखिमध्ये कायम रताळ्याचा कीस घालतात त्याने मिळून येते म्हणे खिचडी आणि पौष्टिक पण होते. हे मला अतिशय अन्याय्य वाटतं. पार्टीला जाताना सुंदर स्लीव्हलेस इव्हनिंग गाऊन वर जाडा स्वेटर चढवल्यासारखं. Proud

पार्टीला जाताना सुंदर स्लीव्हलेस इव्हनिंग गाऊन वर जाडा स्वेटर चढवल्यासारखं >>> Lol
भारी उपमा आहे.

माझ्या साबा साखिमध्ये कायम रताळ्याचा कीस घालतात त्याने मिळून येते म्हणे खिचडी आणि पौष्टिक पण होते. हे मला अतिशय अन्याय्य वाटतं. >>>> अगदी अगदी. साखिमध्ये बटाटे सोडुन इतर काहीही शोभत नाही..

खरेच, या साखि ने जुन्या आठवणी जाग्या केल्यात. माझ्या दोन्ही आज्या उत्तम साखि करायच्या. एक आजी मराठवाडी पध्द्तीने (लाल तिखट, दाण्याचा भरडा घालुन) आणि दुसरी आजी साखर, उकडलेला बटाटा, हिरव्या मिरच्या घालुन. मी आणि आइ मराठवाडी पध्द्तीने सखि करतो पण साखि मध्ये कडिपत्ता? हे काय कळले नाहि ब्बा!

Pages