ज्वारीची भाकरी

Submitted by अंजली on 11 February, 2016 - 23:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ज्वारीचे पीठ
किंचीत मीठ
पाणी

क्रमवार पाककृती: 

सोलापूर, कोल्हापूर भागात तसंच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात होणार्‍या भाकरी सर्वज्ञात आहेत. मोठ्या आकाराच्या पण पातळ, पापुद्रे सुटणार्‍या भाकरी इथली खासियत. उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीत गावी गेलो की परसात होणार्‍या चुलीवरच्या स्वैपाकाचं अप्रूप असायचं - चवीसाठी आणि स्वैपाक होता होता होणार्‍या गप्पांसाठी. घरात किमान ५० लोक तरी असायचे. त्यामुळे पोळ्या भाकरींसाठी गावात राहण्यार्‍या एकजण यायच्या. सकाळी ९ वाजता पोळ्यांसाठी बसायच्या त्या साधारण १ वाजेपर्यंत भाकरी झाल्यावर उठायच्या. चुलीतला जाळ सारखा करत, लोखंडी तव्याचं तापमान योग्य ते राखत भराभर भाकरी थापून तव्यावर टाकून आधीची भाकरी चुलीच्या तोंडाशी नीट शेकून दुरडीत ठेवणं 'स्किलफुल' काम होतं. चुलीच्या तोंडाशी शेकायला ठेवलेली भाकरी फुगली की खरपूस वास सुटायचा. पापुद्रा सुटा करून त्यावर नुसतं तूप मीठ लावूनही फार चवदार लागायची. आठवणीनंच तोंडाला पाणी सुटतं :).

मायबोलीवर ज्वारीची भाकरी कशी करावी याच्या काही कृती आहेत. प्रिती या आयडीची यूट्यूब लिंकपण आहे. एका मायबोलीकर मैत्रिणीनं काही दिवसांपूर्वी भाकरी कशी करावी याचं फोटो फिचर टिपांसहीत मायबोलीवर टाकण्याची विनंती केली होती. त्यामुळे डॉक्युमेंटेशनही होईल या हेतूनं अजून एक कृती.

साधारण दोन वाट्या होईल इतकं ज्वारीचं पीठ किंचीत मीठ घालून, पाणी घालून मळून घ्या. त्याचवेळेस तवा मिडीअम आचेवर तापायला ठेवा. पीठाची कंसीटन्सी फार पातळ नको, फार घट्टही नको. ज्वारीचं पीठ जितकं मळाल, तितकी भाकरी करायला सोपी जाते. मळताना तळहाताच्या मनगटा जवळच्या भागाने चांगले रगडत पीठ मळावं. जेव्हढी भाकरी मोठी हवी असेल, तेव्हढं पीठ घेऊन छान उंडा करावा. परातीत थोडं कोरडं पीठ घेऊन त्यावर उंडा ठेवावा.

तळहाताला आणि बोटांना थोडं कोरडं पीठ लावून भाकरी थापायला सुरूवात करावी. सुरवातीला तळहातानं मध्यभागी थापायला सुरूवात करावी. थोडी मोठी झाली की बोटांनी कडेनं थापत मोठी करावी. मध्यभागी जास्त पीठ असेल तर परत थोडी तळहातानं थापत, नंतर बोटांनी थापत भाकरीची जाडी एकसारखी करायचा प्रयत्न करावा.

तोपर्यंत तवा मिडीअम आचेवर व्यवस्थित तापला असेल. भाकरी अलगद उचलून पिठाची बाजू वर येईल अशी तव्यावर टाकावी (गॅस वाटल्यास किंचीत मोठा करावा).

त्या वरच्या (पिठाच्या) बाजूला नीट पाणी लावून घ्यावे.

पाणी सुकत आले की अलगद उलटावी. ती पाण्याची बाजू तव्यावर व्यवस्थित भाजून घ्यावी.

मग भाकरी तव्यावरून काढून वरची बाजू डायरेक्ट आचेवर भाजावी. पाणी नीट लागलेलं असेल आणि तव्याचं टेंपरेचर व्यवस्थित असेल तर मस्त फुगते.

वांग्याची भाजी, पिठलं, मिरचीचा ठेचा/खरडा, चुलीवर भाजलेल्या वांग्याचं भरीत याबरोबर वाढावी. बरोबर घरचं दही असेल तर डायरेक्ट स्वर्ग Wink

वाढणी/प्रमाण: 
आकार, जाडीनुसार ३ ते ४ भाकरी
अधिक टिपा: 

१. पिठ नीट मळून घ्यावं. जेवढं मळाल, तेवढी भाकरी करायला सोपी जाते. ताज्या ज्वारीच्या पिठाच्या अर्थातच चांगल्या होतात. पिठाची विरी गेली की भाकरी थापता येत नाहीत. थोडं जुनं पीठ असेल तर चमचाभर तेल आणि कणीक घालून बघावं.
२. भाजण्यासाठी नॉनस्टीक तवा शक्यतो नको(च).
३. भाजताना लावलेले पाणी फार सुकवू नये.
४. अमेरीकेत भाकरीचं पिठ चांगलं मिळत नाही, तेव्हा 'मासेका' पिठ वापरूनही करता येतील. पण या भाकरी गरमच चांगल्या लागतात. तसंच सुरवातीला सरावासाठीही हे पिठ चांगलं आहे.
५. भाकरीचा आकार सवय होईपर्यंत थोडा लहानच थापवा.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक, आई, काकू
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजली सुरेख ताट आणि भाकरी.
आमच्या सासरच्या घरच्या भाकर्‍या. आम्ही भाकरीत मीठ घालत नाही. पांढर्‍या शुभ्र भाकर्‍या शाळुच्या होतात.
सासर सांगली जिल्ह्यातल अगदी छोट गाव.

ताटात अंबाडीची भाजी, वांग्याची भाजी, कारळ्याची चटणी ,खरडा,घरच्या लोणची आंब्याच लोणचं,शेंगदाण्याच पळु (हे जनरली अस सुटं दिसत नाही. पण जाऊबाईंनी मिक्सर मध्ये केलय त्यामुळं. आई खलबत्त्यात करते.),डाळीची कैरी ऐवजी घरचे आंबट आवळे घातलेली चटणी आणि दही.

वरच्या बुट्टीला दुरडी म्हणतात. लग्न ठरल्यावर, वास्तु शांती ला वगैरे गारवा द्यायची पद्धत असते. आता डब्यात देतात पण त्यालाही अजुनही दुरडीच म्हणतात.
गावात ही पद्धत इतकी जास्त आहे कि अगदी नविन गॅस घेतला तरी गारवा देतील. Happy
मला वाटत गाव अत्यंत गब्बर आहे, उसाचा तुफ्फान पैसा आहे, बायांना/बापड्याना शेतीची काम जास्त नाहीत (उसामुळ,हेच जर तुर,मका असेल तर शेतीची काम जास्त) त्यामुळ हे सगळ करण्याचा उत्साह दांडगा.
गारव्यात भाकर्या, शेंगदाण्याच्या पोळ्या, पीठल, वांग्याची भाजी, खव्याच्या पोळ्या इत्यादी पदार्थ असतात.
लग्नात गारवा आला कि शेजारच्या पाजारच्या बघण्यासाठी बोलावतात. सगळे डबे मांडून ठेवतात. पाहुणे कसे मिळालेत याची पहिली चुणुक गारवा दाखवतो. थोडक्यात शक्ती प्रदर्शन. Happy

सीमा चा झब्बु पण भारी

शेंगदाण्याच पळु>> हे नविनच एकलय क्रुती देणे,

प्राजक्ता आम्ही शेंगदाण्याच्या चटणीला पळु म्हणतो आणि मेतकुटाला पळणीट.

गजानन, शिराळ्यात हेच खात असणार कि. Happy

बी..
अहो पानगे म्हणजे गोल असतात.. चपटे गोल डायरेक्ट निखार्‍यात भाजतात ते..

घरी पोळपाटावर थापलेल्या भाकरीपेक्षा हातावरच्या भाकरी जास्त आवडतात..
पोळपाटावर थापलेल्या भाकरीपेक्षा त्या जाड असतात पण गज्जब लागतात..
मला इथल्या तांदळाच्या भाकरी नै आवडत..
कुणास ठाऊक, आधीपासुन तश्या पातळ पांढर्‍या खाऊन नाही म्हणुनही असेल कदाचीत.. Happy

कसली भारी कृती आहे! मस्तच. शेवटचा फोटो जबराट आलाय. आत्ता बसून ओरपावसं वाटतंय!
सीमा, तू दिलेला फोटोही भारीच. कुठलं ताट घेऊन जेवू असं झालंय Wink

खेड्यात कण्या करतात..
जाडसर जात्यातुन काढलेलं ज्वारीच पिठ गंजात शिजवतात..सोबत ठेचा आणि बेसन..
मस्त लागतं Happy

संपदा, आता टेबल रनरपण सेमच होईल Wink

पग्या, धपाटे खायचे आहेत? इकडे ये Proud

मै, नुसत्या ज्वारीच्या पिठापेक्षा त्यात थोडं मासेका घालून बघ. थापता येतील नीट. मी सुरवातीला मासेकाच्याच करायची, त्यावर भरपूर सराव झाल्यावर नुसत्या ज्वारीच्या पिठाच्या करायला लागले :). शेवटी भाकरी काय आणि पोळी काय किंवा एकंदरीत स्वैपाक काय, सवयीचाच भाग.

सीमा, मस्त ताट.
गावीही ताटं, वाट्या घेऊन नीट ताट वाढणे निगुतीनं व्हायचं. ताटाच्या डावीकडं तांब्याभांड भरून ठेवलेलं. ताटात नाकासमोर मीठ. डावीकडं कैरीचं तक्कू/लोणचं, मिरचीचा कुट्टा, उखळात कांडलेली दाण्याची चटणी, कोशिंबीर. उजवीकडं भाज्या. आमटीची वाटी मधे. दहीही वाटीत पण दह्याची वाटी ताटाबाहेर उजवीकडं. सुरवात पहिल्या वाफेच्या गरम भातानं. नंतर पोळी किंवा भाकरी. सगळे काका लोक, बाबा भाकरीच घ्यायचे. आम्ही मुलं पोळ्या. परत शेवटचा दहीभात. मोठ्या काकू प्रत्येकाच्या नावच्या सेपरेट वाट्यात दही लावायच्या. ते म्हशीच्या दुधाचं पांढरंशुभ्र दही असायचं. मस्त कवड्या पडायच्या.

पोळपाटावर थापलेल्या भाकरीपेक्षा >>> भाकर काटवटीत थापतात ( अर्थात काटवट आता फारशी कुठे दिसत नाही, त्याला पर्याय परात ).
गारवा इंटरेस्टिंग आहे.

अंजु, ते दही अमेरिकेहून आलेल्या सुनबाईनी वाढलयं त्यामुळं ताटात आहे. Wink वाटीतच पाहिजे.
भाज्यांचा क्रमही चुकलाय. Proud
अमेरिकेच्या सुनबाईंना कागदी प्लेटात , फ्रोजन चपात्या घेवून खायची सवय. Proud

पांढर्‍या शुभ्र भाकर्‍या शाळुच्या होतात.
<<
शाळु अन दादर.

दोन्ही ज्वारीच्या प्रजाती आहेत. शाळु खास हुरड्यासाठीची अन दादर म्हणजे रब्बी हंगामातली ज्वारी.

दुरड भारी! आम्च्या शेजारच्या काकू दुरडित पोळ्या भाकरी ठेवाय्च्या त्यात एक पाढराशुभ्र लाल काड्याचा रुमाल आणी त्यात पोळ्या वर भाकरी असायची,

दीमा, शाळू खास भाकरीसाठीच लावतात. शाळूच्या भाकरी पांढर्‍याशुभ्र होतात. हुरड्यासाठी वेगळी असते. विचारून नाव सांगते. बाबांनी लावली आहे शेतात म्हणून सविस्तर माहिती.

दगडी, मालदांडी, शाळू भाकरीसाठी.
कुचकुची, गुळभेंडी हुरड्यासाठी.

सोलापूरा बाजूला दगडी जास्तकरून लावतात. कर्नाटकात जास्त करून शाळू .

गारव्याचे फोटो पाहून पोटात खरंतर भुकेचा आगडोंब उसळला. Happy त्या भाकरी किती सुंदर शुभ्र दिसतायत.

आईची एक खास मैत्रीण कोल्हापूरची आहे, त्या काकू आमच्याकडे काही कार्यक्रम झाला की "गारवा" घेऊन येतात.

सीमाचा फोटो पण जबरी आहे. सीमा ते कवडी दही कसे जमले हे दहीच्या बाफावर जमेल तेव्हा सान्गशील का? आमच्या दह्याला ( चितळेचे असुनही ) कवडी येतच नाही.

सीमा भाक-या आणि ताटातले सर्व पदार्थ सॉलिड भारी.

माहीतीही छान. गारव्याबद्दल माहीती नव्हतं. माझ्यासाठी नवीन माहीती Happy .

दगडी, मालदांडी, शाळू भाकरीसाठी.
कुचकुची, गुळभेंडी हुरड्यासाठी.>>>> हे सगळे ज्वारीचे प्रकार आहेत की वेगळी धान्यं? Uhoh

दगडी, मालदांडी, शाळू भाकरीसाठी.
कुचकुची, गुळभेंडी हुरड्यासाठी.>>>> हे सगळे ज्वारीचे प्रकार आहेत की वेगळी धान्यं?>>>> ज्वारीचे प्रकार.

कोकणातले तांदळाचे प्रकार देशावर माहित नसतात :).

रश्मी, दही लावताना फुलफॅट दूध असेल तर असं घट्ट, कवड्या पडणारं दही लागतं. गायीपेक्षा म्हशीच्या दुधाचं (फॅटच प्रमाण जास्त असल्यानं) घट्ट दही लागतं. विरजण चांगलं असणे, दूध व्यवस्थित तापवून घेणे, योग्य तापमान - कोमट - झाल्यावर विरजण लावून उबदार जागेत ठेवणे हे नीट पाळल्यास मस्त दही लागतं.

Pages