ज्वारीची भाकरी

Submitted by अंजली on 11 February, 2016 - 23:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ज्वारीचे पीठ
किंचीत मीठ
पाणी

क्रमवार पाककृती: 

सोलापूर, कोल्हापूर भागात तसंच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात होणार्‍या भाकरी सर्वज्ञात आहेत. मोठ्या आकाराच्या पण पातळ, पापुद्रे सुटणार्‍या भाकरी इथली खासियत. उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीत गावी गेलो की परसात होणार्‍या चुलीवरच्या स्वैपाकाचं अप्रूप असायचं - चवीसाठी आणि स्वैपाक होता होता होणार्‍या गप्पांसाठी. घरात किमान ५० लोक तरी असायचे. त्यामुळे पोळ्या भाकरींसाठी गावात राहण्यार्‍या एकजण यायच्या. सकाळी ९ वाजता पोळ्यांसाठी बसायच्या त्या साधारण १ वाजेपर्यंत भाकरी झाल्यावर उठायच्या. चुलीतला जाळ सारखा करत, लोखंडी तव्याचं तापमान योग्य ते राखत भराभर भाकरी थापून तव्यावर टाकून आधीची भाकरी चुलीच्या तोंडाशी नीट शेकून दुरडीत ठेवणं 'स्किलफुल' काम होतं. चुलीच्या तोंडाशी शेकायला ठेवलेली भाकरी फुगली की खरपूस वास सुटायचा. पापुद्रा सुटा करून त्यावर नुसतं तूप मीठ लावूनही फार चवदार लागायची. आठवणीनंच तोंडाला पाणी सुटतं :).

मायबोलीवर ज्वारीची भाकरी कशी करावी याच्या काही कृती आहेत. प्रिती या आयडीची यूट्यूब लिंकपण आहे. एका मायबोलीकर मैत्रिणीनं काही दिवसांपूर्वी भाकरी कशी करावी याचं फोटो फिचर टिपांसहीत मायबोलीवर टाकण्याची विनंती केली होती. त्यामुळे डॉक्युमेंटेशनही होईल या हेतूनं अजून एक कृती.

साधारण दोन वाट्या होईल इतकं ज्वारीचं पीठ किंचीत मीठ घालून, पाणी घालून मळून घ्या. त्याचवेळेस तवा मिडीअम आचेवर तापायला ठेवा. पीठाची कंसीटन्सी फार पातळ नको, फार घट्टही नको. ज्वारीचं पीठ जितकं मळाल, तितकी भाकरी करायला सोपी जाते. मळताना तळहाताच्या मनगटा जवळच्या भागाने चांगले रगडत पीठ मळावं. जेव्हढी भाकरी मोठी हवी असेल, तेव्हढं पीठ घेऊन छान उंडा करावा. परातीत थोडं कोरडं पीठ घेऊन त्यावर उंडा ठेवावा.

तळहाताला आणि बोटांना थोडं कोरडं पीठ लावून भाकरी थापायला सुरूवात करावी. सुरवातीला तळहातानं मध्यभागी थापायला सुरूवात करावी. थोडी मोठी झाली की बोटांनी कडेनं थापत मोठी करावी. मध्यभागी जास्त पीठ असेल तर परत थोडी तळहातानं थापत, नंतर बोटांनी थापत भाकरीची जाडी एकसारखी करायचा प्रयत्न करावा.

तोपर्यंत तवा मिडीअम आचेवर व्यवस्थित तापला असेल. भाकरी अलगद उचलून पिठाची बाजू वर येईल अशी तव्यावर टाकावी (गॅस वाटल्यास किंचीत मोठा करावा).

त्या वरच्या (पिठाच्या) बाजूला नीट पाणी लावून घ्यावे.

पाणी सुकत आले की अलगद उलटावी. ती पाण्याची बाजू तव्यावर व्यवस्थित भाजून घ्यावी.

मग भाकरी तव्यावरून काढून वरची बाजू डायरेक्ट आचेवर भाजावी. पाणी नीट लागलेलं असेल आणि तव्याचं टेंपरेचर व्यवस्थित असेल तर मस्त फुगते.

वांग्याची भाजी, पिठलं, मिरचीचा ठेचा/खरडा, चुलीवर भाजलेल्या वांग्याचं भरीत याबरोबर वाढावी. बरोबर घरचं दही असेल तर डायरेक्ट स्वर्ग Wink

वाढणी/प्रमाण: 
आकार, जाडीनुसार ३ ते ४ भाकरी
अधिक टिपा: 

१. पिठ नीट मळून घ्यावं. जेवढं मळाल, तेवढी भाकरी करायला सोपी जाते. ताज्या ज्वारीच्या पिठाच्या अर्थातच चांगल्या होतात. पिठाची विरी गेली की भाकरी थापता येत नाहीत. थोडं जुनं पीठ असेल तर चमचाभर तेल आणि कणीक घालून बघावं.
२. भाजण्यासाठी नॉनस्टीक तवा शक्यतो नको(च).
३. भाजताना लावलेले पाणी फार सुकवू नये.
४. अमेरीकेत भाकरीचं पिठ चांगलं मिळत नाही, तेव्हा 'मासेका' पिठ वापरूनही करता येतील. पण या भाकरी गरमच चांगल्या लागतात. तसंच सुरवातीला सरावासाठीही हे पिठ चांगलं आहे.
५. भाकरीचा आकार सवय होईपर्यंत थोडा लहानच थापवा.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक, आई, काकू
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्वारीच्या प्रकारात अजून एक प्रकार आहे. लाह्यांसाठी वापरतात. कावळा ज्वारी.
(एका मायबोली मैत्रिणीकडून साभार Happy )

मस्त दिसतायत फोटो! सीमाचाही झब्बु छान! Happy

पण माझ्यासाठी ढोकळ्यासारखाच अजिबात न जमणारा प्रकार म्हणजे भाकरी. पण त्यातल्या त्यात मागे अमृताने लिहीलेली तांदळाची जमली होती. एकदा परत करून पाहीन हे मासेका काय आहे ते वापरून..

वॉव. अंजली... टम्म..सुबक, सुंदर्, भाकर्‍या..
हा प्रकार जमणे या जन्मी तरी अशक्यप्राय आहे.. तेंव्हा फोटोवर समाधान मानून घेतेय..
सीमा चे ताट ही नुस्ते स्लर्प स्लर्प आहे!!!

मस्त माहिती जमा होतेय.
माझ्या आजोळी मक्याच्याच भाकर्‍या असत. त्यापण पांढर्‍याशुभ्र असत. तसा मका आता कुणी लावत नाही.
म्हणून आता ज्वारीच्याच भाकर्‍या.

मस्त गं अंजली. तो शेवटचा फोटो बहुतेक तू बेकरीवर टाकला होतास Happy सगळं बैजवार लिहिलंस हे बरं केलं.

सीमांचं ताटही मस्त दिसतंय आणि सगळीच माहिती नवीन. गारव वगैएरे Wink

आईकडे भाकरी फक्त तांदळाच्या, उअकडीच्या. सासुबाई ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी अगदी दोन मिन्टांत करून पानात वाढतात त्याचीच आठवण आली. माझाएकंदरित भाकरीबाबतीत नन्नाचा पाढा अहे पण आत खावंच लागतं म्हणून बळंच छोटीशी करून खाते. एकदा साउथला यावं लागेल Wink

रश्मी , दह्याविषयी सही दही बाफवर लिहिलयं बघं.

सगळ्याना धन्यवाद. सासूबाईंना सांगितल तर , "सीमा, बासुंदी पुरीचा फोटो टाकायचीस . हे ताट काय आपल नेहमीचचं ". असं म्हणाल्या . Happy
अंजू तुला सेपरेट धन्यवाद. Happy

आमच्या कडे शिळ्या भाकरीचे एक दोन प्रकार करतात. पहिल्याचे नाव .... का कुणास ठाऊक ..... जहांगिर ... असे आहे. भाकरी कुस्करायची, त्यावर फोडणी द्यायची , लसूण कांद्याची अन मग खायची. मस्त लागते. दुसरा प्रकार कुस्करून दह्यात भिजवायची , चांगला घट्ट गोल गोळा करायचा. वर तळलेला उडदाचा पापड आणि तिख ट व हिंगाची पूड शिंपडायची. मस्त लागते.
या वरच्या पोष्टीत घरच्या घुसळऊन केलेल्या ताज्या शुभ्र लोण्याचा गोळा दिसला नाही, तसेच मेथीची पीठ लावून केलेली गोळा भाजी देखील दिसली नाही- तिच्यावर मेथी मिर्ची आणि लसणाची फोडणी.
धम्माल है भाई सब धम्माल है !!!!!!!!!!!

रेव्यु,
आमची आज्जी सकाळी नाश्त्याला गरम गरम दशमी, पीठ लावलेली मेथीची भाजी, उन्हाळ्यात कैरीचा तक्कू आणि दही असं खायची. अमेरीकेत कुठून पांढरा शुभ्र लोण्याचा गोळा मिळणार? पिवळसर रंगाचा मिळू शकेल ;).

माझ्या सासरी भाकरी बारीक कुस्करून त्यावर काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला, कच्चा कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक चिरून, मीठ-साखर आणि दही-ताक घालून कालवतात. वरून हिंग जीर्‍याची चरचरून फोडणी देतात. घरातल्या बाकी मेंब्रांना हे आवडत नाही. माझं मात्र कंफर्ट फूड आहे.

धन्यवाद विक्रमसिंह, तुमच्या मुळे विस्मरणात गेलेले धागे परत वर आले, भरत ना पण धन्यवाद..
अंजली भाकरी मस्त दिसताएत. टम्म फुगलेली आणि छान पातळ , गोल. शेवटचा फोटो पण मस्तच. आणि सीमा चा झब्बू तोडीस तोड आहे. त्यातल्या लोणच्याचा रंग कातील आहे.
अंजली तू जे लिहीलयस ना भाकरी बारीक करून कच्चा कांदा दही ताक, हे आमच्या कडचं ऑटाफे. शिळ्या भाकरीचा काला म्हणतो आम्ही त्याला. सांडगी मिरची तळून चुरायची वरून. आहाहा जेव्हढं मुरतं तेव्हढं ऑसम लागतं. मसाला नाही घालत आम्ही, नुसतं मिठ चवीपुरती साखर, दही आणि ताक आणि कच्चा कांदा बारीक चिरून, हे सगळं कुस्करलेल्या भाकरीवर घालून ठेवायचं

अरे वा काय सही भाकर्‍या जमल्यात गं !आणी ते जेवण मांडले आहेस ते पण एकदम मस्त! खावेसे वाटतेय लगेच Happy

मी ईथे फारशा कधी केल्या नाही भाकर्‍या. पीठ चांगले मिळत नाही म्हणून पण एवढ्यातच इकडे सोहम ब्रँडचे अतिशय भारी पिठ मिळतेय. त्याच्या निदान तळहाताएवढ्या तरी भाकर्‍या मला जमत आहेत. फक्त मला ना ते पाणी लावल्यानंतर हात परत चिकट होतात पुढची भाकरी करायला ते कसं मॅनेज करता येईल तेवढं सांग. Happy काहीतरीच प्रश्न वाटेल पण मी जिवनात पहिल्यांदा करतेय भाकरी. Happy

पुन्हा एकदा भाकर्‍या बघता आल्या आणि पुन्हा एकदा तोंडाला पाणी सुटलं. मला उकड काढून थोड्या जमायला लागल्या आहेत पण फार पातळ होत नाहीयेत अजूनही.
अंजली_१२, सोहमच्या पीठात सोयाबीनही आहे ना?

मलाही अंजलीच्या भाकर्‍या पुन्हा बघून लग्गेच कराव्याशा वाटत आहेत पण नेमकं पिठ संपलंय. मीही हल्ली सोहम चे ज्वारी पीठ वापरते. मस्त आहे. ते नसेल तर जलपुर नावाचा ब्रान्ड चांगला आहे (अमेरिकेत)

जलपुर नावाचा ब्रान्ड चांगला आहे (अमेरिकेत) >>> खर आहे पण तो बाजरीच्या पिठासाठी जास्त चांगला आहे. ज्वारिच्या माझ्यातरी एवढ्या छान होत नाहित, सध्या मी त्यात १ चमचा भर उडिद डाळ वाटुन लावते, त्याने चांगल्या होतात व तुटत नाहित. पण सगळ्यात जलपुरच चांगले आहे.

अंजली_१२, सोहमच्या पीठात सोयाबीनही आहे ना?>>>>>> सायो हो त्यात सोयाबीन बरोबर नाचणी, मका, तांदूळ, ऊडीद पण आहे Happy

सोहम चं फक्त ज्वारीचं पीठ मिळतं की. ते तुम्ही म्हणता ते भाकरीचे मिक्स पीठही पाहिले होते मी. पण मी वापरते ते नुस्ते ज्वारीचे पीठ आहे.
हे पहा ( उजवीकडचा फोटो)
bhakri.jpg

इथे एडिसन पटेल ला हे मल्टीग्रेन आहे. तेच आणते. दुसरं नाही कधी पाहिलं.

Pages