ज्वारीची भाकरी

Submitted by अंजली on 11 February, 2016 - 23:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ज्वारीचे पीठ
किंचीत मीठ
पाणी

क्रमवार पाककृती: 

सोलापूर, कोल्हापूर भागात तसंच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात होणार्‍या भाकरी सर्वज्ञात आहेत. मोठ्या आकाराच्या पण पातळ, पापुद्रे सुटणार्‍या भाकरी इथली खासियत. उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीत गावी गेलो की परसात होणार्‍या चुलीवरच्या स्वैपाकाचं अप्रूप असायचं - चवीसाठी आणि स्वैपाक होता होता होणार्‍या गप्पांसाठी. घरात किमान ५० लोक तरी असायचे. त्यामुळे पोळ्या भाकरींसाठी गावात राहण्यार्‍या एकजण यायच्या. सकाळी ९ वाजता पोळ्यांसाठी बसायच्या त्या साधारण १ वाजेपर्यंत भाकरी झाल्यावर उठायच्या. चुलीतला जाळ सारखा करत, लोखंडी तव्याचं तापमान योग्य ते राखत भराभर भाकरी थापून तव्यावर टाकून आधीची भाकरी चुलीच्या तोंडाशी नीट शेकून दुरडीत ठेवणं 'स्किलफुल' काम होतं. चुलीच्या तोंडाशी शेकायला ठेवलेली भाकरी फुगली की खरपूस वास सुटायचा. पापुद्रा सुटा करून त्यावर नुसतं तूप मीठ लावूनही फार चवदार लागायची. आठवणीनंच तोंडाला पाणी सुटतं :).

मायबोलीवर ज्वारीची भाकरी कशी करावी याच्या काही कृती आहेत. प्रिती या आयडीची यूट्यूब लिंकपण आहे. एका मायबोलीकर मैत्रिणीनं काही दिवसांपूर्वी भाकरी कशी करावी याचं फोटो फिचर टिपांसहीत मायबोलीवर टाकण्याची विनंती केली होती. त्यामुळे डॉक्युमेंटेशनही होईल या हेतूनं अजून एक कृती.

साधारण दोन वाट्या होईल इतकं ज्वारीचं पीठ किंचीत मीठ घालून, पाणी घालून मळून घ्या. त्याचवेळेस तवा मिडीअम आचेवर तापायला ठेवा. पीठाची कंसीटन्सी फार पातळ नको, फार घट्टही नको. ज्वारीचं पीठ जितकं मळाल, तितकी भाकरी करायला सोपी जाते. मळताना तळहाताच्या मनगटा जवळच्या भागाने चांगले रगडत पीठ मळावं. जेव्हढी भाकरी मोठी हवी असेल, तेव्हढं पीठ घेऊन छान उंडा करावा. परातीत थोडं कोरडं पीठ घेऊन त्यावर उंडा ठेवावा.

तळहाताला आणि बोटांना थोडं कोरडं पीठ लावून भाकरी थापायला सुरूवात करावी. सुरवातीला तळहातानं मध्यभागी थापायला सुरूवात करावी. थोडी मोठी झाली की बोटांनी कडेनं थापत मोठी करावी. मध्यभागी जास्त पीठ असेल तर परत थोडी तळहातानं थापत, नंतर बोटांनी थापत भाकरीची जाडी एकसारखी करायचा प्रयत्न करावा.

तोपर्यंत तवा मिडीअम आचेवर व्यवस्थित तापला असेल. भाकरी अलगद उचलून पिठाची बाजू वर येईल अशी तव्यावर टाकावी (गॅस वाटल्यास किंचीत मोठा करावा).

त्या वरच्या (पिठाच्या) बाजूला नीट पाणी लावून घ्यावे.

पाणी सुकत आले की अलगद उलटावी. ती पाण्याची बाजू तव्यावर व्यवस्थित भाजून घ्यावी.

मग भाकरी तव्यावरून काढून वरची बाजू डायरेक्ट आचेवर भाजावी. पाणी नीट लागलेलं असेल आणि तव्याचं टेंपरेचर व्यवस्थित असेल तर मस्त फुगते.

वांग्याची भाजी, पिठलं, मिरचीचा ठेचा/खरडा, चुलीवर भाजलेल्या वांग्याचं भरीत याबरोबर वाढावी. बरोबर घरचं दही असेल तर डायरेक्ट स्वर्ग Wink

वाढणी/प्रमाण: 
आकार, जाडीनुसार ३ ते ४ भाकरी
अधिक टिपा: 

१. पिठ नीट मळून घ्यावं. जेवढं मळाल, तेवढी भाकरी करायला सोपी जाते. ताज्या ज्वारीच्या पिठाच्या अर्थातच चांगल्या होतात. पिठाची विरी गेली की भाकरी थापता येत नाहीत. थोडं जुनं पीठ असेल तर चमचाभर तेल आणि कणीक घालून बघावं.
२. भाजण्यासाठी नॉनस्टीक तवा शक्यतो नको(च).
३. भाजताना लावलेले पाणी फार सुकवू नये.
४. अमेरीकेत भाकरीचं पिठ चांगलं मिळत नाही, तेव्हा 'मासेका' पिठ वापरूनही करता येतील. पण या भाकरी गरमच चांगल्या लागतात. तसंच सुरवातीला सरावासाठीही हे पिठ चांगलं आहे.
५. भाकरीचा आकार सवय होईपर्यंत थोडा लहानच थापवा.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक, आई, काकू
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं, मस्तं!
अगदी टिपीकल आमच्या भागातली पात्तळ आणि टम्म फुगणारी भाकरी झाली आहे. शाब्बास!

रत्नागिरीत असेपर्यंत तांदळाच्या भाकरीसारखी जाडजाड ज्वारीची भाकरी खात असल्यामुळे कधी आवडली नव्हती
जास्तच गोड लागायची.

इकडे मात्र पातळ, खरपूस भाकरी खायला आवडते.
या भाकर्‍या (भाकरी Happy ) थंडही चांगल्याच लागतात.
थंड भाकर्‍या वापरून करायच्या चपातीच्या मनोहरसारख्या कित्येक पाकृ या भागात प्रचलित आहेत.

पिठाची विरी गेली की भाकरी थापता येत नाहीत. थोडं जुनं पीठ असेल तर असे होते..
त्यावेळी गरम पाणी घालुन पीठ मळले तर नीट थापता येतात.

मस्तच, आणि हे सगळे इथे सविस्तर लिहून खुप छान केलेत.
.. भाकरी खुप आवडीची. चव तर आहेच आणि त्यासोबत आजी, मावशी, मामी यांच्या आठवणीही आहेत.
त्यांचे तल्लीन होऊन भाकरी थापणे, चुली समोरच बसलेली पंगत. शेकलेली भाकरी थेट ताटात, त्याबरोबर रंगलेल्या गप्पा... अहाहा !

अंजली....

~ मी कोल्हापूरचा...त्यामुळे तुम्ही लेखाच्या शेवटी जे म्हटले आहे ".....वांग्याचं भरीत याबरोबर वाढावी. बरोबर घरचं दही असेल तर डायरेक्ट स्वर्ग...." याला दहापैकी दहा गुण. माझी आई हयात होती तोपर्यंत असे डायरेक्ट स्वर्गाला जाण्याचे प्रसंग रोजचेच....कारण ज्वारीची भाकरी....तीही तिच्याच हातची खाण्याचे भाग्य (गरमागरमही आणि शिळीही....दोन्ही प्रकार चांगलेच लागायचे). ती गेली आणि सोबत भाकरीही घेऊन गेली....असो. आज या लेखाच्या निमित्ताने चूल आणि इंगळ आठवले...इंगळावर खरपूस जशी भाजली जाते तशी गॅसवरही भाजली जात असेल तर आनंदच आहे....पण ती शक्यता काहीशी धूसर आहे.

बाकी "किंचित मीठ" जिन्नसाच्या यादीत पाहून काहीसे आश्चर्य वाटत आहे. कोल्हापूर भागात भाकरीच्या पिठात मीठ मिसळत नाहीत.

छान भाकरी.
"बाकी "किंचित मीठ" जिन्नसाच्या यादीत पाहून काहीसे आश्चर्य वाटत आहे. कोल्हापूर भागात भाकरीच्या पिठात मीठ मिसळत नाहीत " >>>+१११

कसल्या पातळ, सुबक भाकरी आहेत!! मस्तच

खान्देशात पुर्वी जाड भाकरी चान्गली, अस मत होते. "कशी सान्जोरीसारख्या भाकरी करते आमची पोरगी' अस म्हणायचे. Lol बाजरीच्या भाकरीला कडक पोपडा असायचा. तो पोपडा काढला की आत लसणाचे तिखट, कच्च तेल, मीठ टाकुन वरुन पोपडा परत लावायचा. .. एकदम तोम्पासु लागते!

रच्याकने, खान्देशात पण ज्वारी-बाजरीच्या भाकरीत मीठ टाकत नाहीत...फक्त कळण्याच्या भाकरीत http://www.maayboli.com/node/22499 टाकतात.

अंजली,

फार छान लिहिली आहेस भाकरीकरण्याची पद्धत. फोटोमुळे ही पद्धत लवकर कळते आहे. फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले.

छान भाकर !
कर्नाटकसीमेकडच्या गावात पहिल्यांदा पातळ भाकरी पाहुन अशी पण भाकरी असु शकते ह्यावर क्षणभर विश्वासच नव्हता बसला.

अहाहा! ज्वारीची भाकरी हा माझा वीक पॉईन्ट.

सातीकडच्या भागामध्ये एकदम पातळ पापडासारख्या कडक भाकरी करतात त्या मला फार आवडतात, पण घरी करता येत नाहीत. त्या भाकरी तीन चारदिवस छान राहतात. सोबत मटकीची उसळ, पुंडीपल्ल्या, किंचितसा खर्डा आणि दही असेल तर अंजली म्हणते तसं डायरेक्ट स्वर्गातच.

भाकरी, कारळाची चटणी आणि तिखटजाळ खरडा विथ नोदाणेकूट्/कोथिंबीर, फक्त लसूण मिरची आणि मीठ...तोंपासु.

आता आपण सगळे भाकर्‍यांचे कौतूक करतो खरे, पण समाज जीवनात तिला काहीसे कनिष्ठ स्थान होते.
उदा. राजवाड्यात भाकरी करायची नाही, असा दंड्क होता. कोल्हापूरांच्या शाहू महाराजांना भाकरी प्रिय, पण त्यांना राजवाड्यात ती कधीच मिळत नसे.

कुणालाही भाकरी देताना, ती नुसती देत नाही. सोबत, कांदा आणि मीठ दिले जातेच अर्थात खर्डा, भाजी, कोरड्यास, पिठले असेल तर ते देतात.

कोल्हापूरलाच कलेक्टर बंगल्याजवळ, बांबू हट का अश्याच काहिश्या नावाचे छोटेसे हॉटेल होते. तिथे भाकरी, उसळ, खर्डा, दही वगैरे फर्मास मिळत असे.

आहाहा मस्त, सुरेख.

आम्ही सर्व भाकरीत मीठ घालतो. मीठ घालत नाहीत काहीजण मला शेजाऱ्यांकडून कळले पण ते आमच्या कोकण भागातलेच आहेत.

कोकणात आमच्याकडे तांदूळ, नाचणीची भाकरी जास्त फेमस पण जाड नाही करत. तशा पातळच करतात.

दिनेशदा, बरोबर. माझा एक तमिळ रुममेट होता मी त्याला एकदा भाकरी दिली खायला तर तो म्हणाला हिला आम्ही 'गोदुमा' म्हणतो आणि हे गरीबाचे अन्न समजतो म्हणून घरी कधी पाव्हनारावना आला तर त्याला भाकरी देणे म्हणजे त्याचा दर्जा कमी करणे असे आहे. आपल्याकडे झुणका भाकरी केन्द्र सुरु झाले तेंव्हा ते देखील गरिब लोकांना स्वस्तात अन्न मि़ळावे म्हणून. मला तिथली झुणका भाकरी कधीच आवडली नाही. मी दादरला पुलाखालील झुणका भाकरी केन्द्रात कित्येकदा जेवण केले आहे सुरुवातीच्या हलाखिच्या काळात. पुण्यात देखील अगदी पुणे स्टेशन समोर एक झु. भा. के. होते. तिथेही अगदी बेचव झु. भा. मिळायचे. पण दोन रुपयात आण़खी असे काय चांगले मिळणार ना!!!!

इथे पूनम बोरकर ह्या मुलीनी तूनळीवर छान भाकरी शिकवली आहे. तीही बघण्यासारखी पद्धत आहे तिची भाकरी करण्याची. जरुर बघा: https://www.youtube.com/watch?v=5l0_y5s-E28

माझ्याकडे खापरी तवा आणि बिडाचा तवा नाही आहे. पण एकदा हे दोन्ही तवे मिळवून भाकरी करणार आहे. बिडाचा तवा मिळून जाईन पण खापरी तवा मिळणे जरा दुर्मिळ आहे. मधे रैनाने विकत घेतला होता असे ती म्हणाली होती.

अन्जली क्या बात है! अगदी नवशिक्या लोकान्साठी आदर्श स्टेप बाय स्टेप कृती. भाकर्‍या अप्रतीम दिसतायत. ताट तर अन्नपुर्णेचा ठेवा वाटतय.:स्मित:

हो, पीठाला जर विरी जात असेल तर गरम पाण्याने पीठ मळुन घ्यावे मग भाकरी उत्तम थापली जाते,भेगा पडत नाही. माझ्या साबा म्हणतात की पीठ हाताला लोण्यासारखे लागले पाहीजे इतपत मळावे. मग भाकर्‍या सुन्दर होतात

तो म्हणाला हिला आम्ही 'गोदुमा' म्हणतो >>> मित्राचा काहीतरी गैरसमज झाला आहे, कारण गोदुमै म्हणजे गव्हाचे पीठ. तमिळमद्ये ज्वारीला चोलम म्हणतात तरीही मी आजवर विचारल्यावर बहुतेक दुकानदारांनी ज्वारी बघून "व्हाईट कॉर्न" असलं भलतंच नाव सांगितलेलं आहे. तमिळी या पिठाचे डोसेच करतात किंवा कस्लंतरी हेल्थ मिक्स नावाचा प्रकार बनवून खातात. पण खाण्यात फारसे वापरताना मी तरी पाहिले नाहीत. पण कर्नाटका अथवा आंध्र सीमेजवळ खात असावेत.

अजून काही रेसिपीज http://www.mytaste.in/s/cholam.html इथे वाचल्या होत्या.

मागे एका तमिळ फूडग्रूपवर एका बाईने "मी गव्हाच्या भाकर्‍या केल्या, टिपिकल मराठी स्टाईलने" अशी पोस्ट टाकली होती. तिला गव्हाची भाकरी होत नाही, हे सांगूनही पटत नव्हतं.

वॉव गव्हाच्या भाकर्‍या.
म्हणजे तिने थालिपीठ केले असावे काही पीठं मिक्स करुन.
मला मनोगतावरची 'कणकेचे डोसे' रेसिपी आठवली.घरात भाज्या नसताना या रेसिपीने काहीवेळा तारुन नेले आहे.
आता फक्त कणकेचा मसालेभात करणं बाकी राहिलं.

Pages