अर्धा-दशक लहान बायको - भाग १

Submitted by आशयगुणे on 2 October, 2015 - 04:00

प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जेव्हा त्याची चौकशी आणि उलटतपासणी एकदम होते! आणि साहजिकच तो दिवस त्याला स्वच्छ आठवतो. म्हणूनच ह्या गोष्टीची सुरुवात 'तो दिवस मला स्वच्छ आठवतो' ह्याच वाक्याने करतो आहे. अनेक मुलीकडल्यांच्या - पोलिस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या तशा - पायऱ्या चढून आणि तिथे 'चौकशी' शिवाय काहीही हाती न लागून आम्ही ह्या घराचे दार वाजवले. आधी एवढे अनुभव घेतल्यामुळे आमच्या घरच्यांचे चेहरे 'इथे तरी न्याय मिळेल काय' असे झाले होते. मी मात्र 'आता पुढे काय' असे भाव ठेवून होतो. लग्नासाठी मुलगी पहायची म्हणजे तिच्या घरच्यांच्या आधी तिला भेटले पाहिजे हे माझे तत्व निरुपयोगी ठरले होते. कारण ह्या आधी जवळ जवळ डझनभर मुलींच्या घरच्यांना मी तसदीच देऊ शकलो नव्हतो! शेवटी 'आम्ही सांगत होतो' ह्या ध्रुवपदाने सुरु होणारी गाणी मला ऐकावी लागली आणि घरच्यांनी सगळी सूत्र हातात घेतली. परंतु तिथे देखील लगेच यश मिळाले नाही. शेवटी हा दिवस उजाडला.
दार उघडले गेले. माझ्या स्वागताला ( खरं तर गराडा घालायला) एक आजोबा, एक पन्नाशीतले वाटणारे गृहस्थ, त्यांची बायको, एक आजी आणि दुसरी एक स्त्री एवढे सगळे एकदम आले. सुरुवातीचे पाणी वाटप झाले. आणि तिथे बसलेल्या आजोबांची मान माझ्याकडे वळली.
"काय करता?"
" मी ई- कॉमर्स क्षेत्रात काम करतो", मी उत्तर दिले.
" ई …?" आजोबांनी कदाचित तेवढंच ऐकलं. आणि तोच शब्द ताणून मला प्रश्न केला. तेवढ्यात,
" काय झालं आबा? काय झालं ", असं विचारत लगबगीने एक बाई धावत बाहेर आल्या. ताणून धरलेल्या 'ई' चा परिणाम असावा. शेवटी त्या क्षेत्राचे पूर्ण नाव मी पुन्हा एकदा सांगितले.
" काय कॉमर्स वगेरे केलंय का?" आजोबांनी पुन्हा माझ्या समोर पंचाईत उभी केली. ह्या क्षेत्राचा कॉमर्स शिक्षाणाशी काहीही संबंध नाही हे सांगायचा मी प्रयत्न करणार तेवढ्यात सुदैवाने विषय बदलला गेला. मग काही घरगुती, काही स्थानिक, काही राष्ट्रीय तर काही आंतरराष्ट्रीय (!) अशा विषयांवर माझ्या बसण्याची दाखल न घेता बरीच चर्चा झाली. हल्ली 'आपल्यात' उशीरा लग्न कशी होऊ लागली आहेत इथपासून इथले रस्ते कधीही दुरुस्त होत नाहीत इथपर्यंत आणि विरार लोकल म्हणजे एक दिव्यच इथपासून आता आमचा मनोहर आला आहे ना, बघा कसा पाकिस्तानवर हल्ला करतो ते, इथपर्यंत! पाकिस्तान बद्दल बोलताना त्या उत्साहात ह्यांना आता ठसका वगेरे लागतो की काय ह्याची मला एकदम काळजी वाटली. परंतु विषय 'आता अच्छे दिन येणार आहेत' पर्यंत गेला तेव्हा एका आश्वस्त मुद्रेत आजोबा गेले आणि भोवती बसलेल्या सर्वांनी होकारार्थी मान हलवली.
पुढे पारिवारिक पातळीवरच्या वाटाघाटी सुरु झाल्या. एखादी कंपनी समोरच्या क्लायंटने आपल्या बरोबर बिझनेस करावा म्हणून तो म्हणतो ते सगळे जसे ऐकते तसे माझ्याकडचे करत होते. त्या साऱ्या संभाषणात मला एवढेच शब्द ऐकू आले - 'मुलगी पसंत आहे'
" पण तुम्हाला वयाबद्दल काही म्हणायचे नाही ना? म्हणजे … तुमचा मुलगा २८ वर्षांचा आणि आमची मुलगी २२ वर्षांची … ", मुलीकडल्यांकडून एक शेवटचा प्रश्न आला.
"नाही हो", आईने सूत्र हातात घेतली. "आपल्या पिढीला कुठे त्रास झाला? आणि हे आता वाटते हो … पुढे एकदा पस्तीशी वगेरे ओलांडली की दोघेही एकाच लेव्हल वर येतात."
ह्या घरातले सगळे आता माझे नातेवाईक झाले होते.
लवकरात लवकर लग्न झालं पाहिजे असे संकेत मला आधीच मिळाले होते. ते संकेत समोरच्या पक्षाला दिले गेले. समोरच्या पक्षाचे प्रतिनिधी आणि आमचे प्रतिनिधी हे प्रत्येक निर्णय घेण्याआधी वाटाघाटी करायचा आव आणायचे. परंतु समोरचे प्रतिनिधी एकच वाक्य पाठ करून आले होते. 'आमची काही हरकत नाही' ह्या त्यांच्या ठरलेल्या वाक्याने चर्चा संपायची. त्यामुळे लग्नात ज्या पक्षाची बाजू वरचढ ठरते तो 'वर' पक्ष असे मला लहानपणापासून वाटायचे ते काही अगदी खोटे नव्हते ह्याची प्रचीती मला माझ्याच लग्नात येत होती. आणि ३० डिसेंबर २०१४ ही तारीख ठरली. माझ्या बऱ्याच मित्रांनी सुटकेचा निःश्वास टाकला. ३१ डिसेंबर नाही निवडली म्हणून! ( माझ्यासाठी नव्हे!).
बाकी माझी एकूण घडण ही इतकी नीरस का झाली आहे हे मला सांगता येत नाही. म्हणजे आयुष्यातल्या एका दिवसासाठी चेहरा गुळगुळीत करणे, त्यावर रंगकाम करणे हे आपण का करतो असा मला प्रश्न पडला. अजूनही त्याचे उत्तर मिळाले नाही. त्या एका दिवसासाठी घेतलेल्या कपड्यांचे पुढे काय झाले हे आता मला चांगलेच माहिती आहे. परंतु तरीही असे करावे लागते. आणि ह्याचे उत्तर 'असे करावे लागते' असेच असते! त्यात पुन्हा आपण त्यांच्यासाठी आणि त्यांनी आपल्यासाठी केलेली खरेदी असते. मग दोन्ही बिलांची घरातल्या गप्पांमध्ये होणारी तुलना आणि आपण दिलेलंच सरस हे ठरवायचा आटापिटा! आणि ह्या साऱ्यात रस दाखवला नाही तर 'पुढे तुझे कसे होणार' ह्याबद्दल व्यक्त होणारी चिंता. एकूण काय तर लग्न ह्या घटनेनंतर आयुष्यात प्रचंड बदल होणार आहे असे उगीचच सांगितले जाते. तसं काही होत नाही हे अर्थात काही आठवड्यांच्या कालावधीत समजतच. ही अवस्था म्हणजे आपल्याला पोहायला जाताना पाण्यात बुडू नाही म्हणून अगदी पाठीला डबा बांधायचा आणि उडी मारल्यावर खोली ३ फुटाची आहे असे समजण्यासारखे असते. पण ह्या साऱ्या गोंधळात खरेदी वगेरे वैताग देणाऱ्या प्रक्रियेत मित्स कधी कधी आमच्या बरोबर असायची.
मित्स म्हणजेच माझी बायको. तिचे नाव मिताली. परंतु ' एवढे मोठे नाव' कुठे घेत बसायचे म्हणून मला सगळे मित्स म्हणतात असं मला लग्न ठरल्याच्या काही दिवसातच सांगितले गेले होते. वर, आमच्या ग्रुप मध्ये आम्ही सर्वांना अशी नावं ठेवली आहेत असं देखील मला सांगण्यात आलं होतं. मला आठवलं की आमच्या कॉलेज मध्ये काही उत्साही मुलींनी असा प्रकार करायचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांनाच सर्वांनी नावं ठेवल्यामुळे त्यांनी हा नाव ठेवण्याचा प्रयत्न बाजूला ठेवला! परंतु आता मला हेच नाव वापरावे लागणार होते. असो.
लग्नाची खरेदी होत असताना नुसता मी आणि माझा परिवारच नाही तर अख्खं जग त्यात सामील होतंय असं मला काही दिवसात जाणवू लागलं. रिसेप्शनसाठी शर्ट घेताना अचानक माझा मोबाईल वाजला. मोबाईल बघितला तर शर्ट हातात घेऊन त्याच्याकडे बघतानाचा माझा फोटो मला फेसबुक वर दिसला. माझ्या होणाऱ्या बायकोने मला तेवढ्यात tag केले होते. आणि तो फोटो अपलोड करून २ मिनिटं ही झाली नाही तर त्यावर चार उत्साही मुला-मुलींचे कमेंट आले होते. 'हे माझे ग्रुप-मेट्स. नेहमी ऑनलाईन असतात' हे वाक्य माझ्या कानावर पडले. आणि पुढील दोन ते तीन दिवस माझ्या नकळत माझे बरेच फोटो फेसबुक वर येऊ लागले. आणि त्यामुळे माझे ऑफिसातले सहकारी आणि माझे इतर मित्रही प्रत्येक खरेदी बद्दल विचारायला लागले. शेवटी सुरुवातीला विनंती आणि नंतर विनवण्या करून मी तिला हा सारा प्रकार थांबवायला सांगितला. आणि लग्ना नंतर पुढे आयुष्यभर जे करायला लागणार होतं ( आणि आता करायला लागतंय) ह्याचा माझा सराव सुरु झाला. तिने देखील, नाखुशीने का होईना, पण हे सगळं थांबवलं. परंतु फेसबुकचा उल्लेख अधून मधून होयचा. म्हणजे एखादा शर्ट घेताना ' हा फेबुकवर छान दिसेल' अशी प्रतिक्रिया यायची. क्वचित कधीतरी फेसबुक स्टेटस मध्ये मी tagged असायचो. पण जेव्हा 'thinking about someone special' ह्या स्टेटस मध्ये मला tag केले गेले तेव्हा मात्र मी हे देखील थांबवायला सांगितले आणि माझ्या नीरस असल्याबद्दल पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले!
आणि शेवटी लग्नाचा दिवस उजाडला. इतके दिवस मित्राचे किंवा मैत्रिणीचे लग्न होताना त्याला/तिला ज्या गोष्टीसाठी हसायचो ती गोष्ट आज मला करायला लागणार होती. स्टेजवर वेळेचे ओझे डोक्यावर घेऊन येणाऱ्या सर्वांकडे बघून हसायचे होते आणि त्यांच्या बरोबर फोटो काढायचे होते. ह्यावर भर घालायला माझे काही मित्र ' आम्ही जेऊन घेतो' हे मुद्दाम सांगत होते.हे सगळं सुरु असताना साधारण ८ ते १० मुलामुलींचं टोळकं स्टेज चढून वर आलं. औपचारिक ओळख झाल्यावर असं कळलं की हा हिचा कॉलेजचा ग्रुप आहे. त्यांची ओळख आणि त्यांनी आमचे अभिनंदन केल्यावर फोटो काढायची वेळ आली आणि मला जवळ जवळ पन्नासाव्या वेळेस हसायची संधी मिळाली. त्यात अजून एकदा हसायची भर पडली जेव्हा त्यातील एकाने आपला मोबाईल बाहेर काढला आणि त्यावर आमचा सर्वांचा एक फोटो घेतला. आणि तेवढ्यात त्यातील एकाने सर्वांना थांबायची खूण केली. स्टेजच्या डाव्या बाजूला जो ग्रुप पुढे यायला व्याकूळ होता तो अधिक व्याकूळ झाला. क्षणभर कुणाला काही कळेना. ज्याने थांबायची खूण केली त्याने हातात काठी सारखं काहीतरी घेतलं. आणि दुसऱ्या क्षणी तिला ताणून लांब केले. आणि अगदी टोकावर स्वतःचा मोबाईल अडकवला. आणि गुढी उभारण्याच्या पोझ मध्ये ते सारे एका हातात धरले. त्या सबंध घोळक्यात मीच एकटा संभ्रमित दिसत होतो. आणि कानाला कांठळ्या बसाव्यात अशा आवाजात त्यातील तीन जणं ओरडले -- " सेल्फ़ीssssssss"
मला सेल्फी काय आहे ते माहिती होतं. परंतु त्यासाठी देखील यंत्र उपलब्ध आहेत ह्याची माहिती मला नव्हती.

लग्नात मला जी काही लोकं भेटायला आली त्यांच्यापैकी सेल्फीचा आग्रह मात्र ह्याच ग्रुप ने धरला होता. इतर बरीच लोकं येत होती. काही परिचित, काही अपरिचित आणि बरीचशी त्या वेळेपूर्ती परिचित! आता हेच बघा ना. मित्सच्या पुण्यातील एका काकांचे ज्येष्ठ मित्र आम्हाला भेटायला स्टेज वर आले. साधारण सत्तरी जवळ आलेल्या ह्या व्यक्तीची ओळख 'मंगळूरला असतात आणि बऱ्याच वर्षांनी पुण्यात आले आहेत' अशी झाली. आता हे काका पुण्यातच बऱ्याच वर्षांनी आले होते तर ते पुढे मुंबईला कधी येतील आणि आलेच तर आमच्या घरी कधी येतील हा प्रश्नच होता म्हणा! पण हाच तो तात्पुरता परिचय आणि लग्नात नेमकी ह्या अशाच लोकांची संख्या सर्वाधिक असते! माझ्यात मात्र स्टेज वर उभं राहून राहून दूरदृष्टी निर्माण झाली होती. म्हणजे आतापर्यंत मला आपण काही तासांनी जेवणार आहोत असे दिसू लागले होते. मात्र आता मी उद्या विमानात बसलो आहे, केरळला जाणारे विमान, त्या विमानात एयर-हॉस्टेस कशा असतील .… आणि एकदम " हे आपटे साहेब", असं म्हणत सासरेबुवांनी कुणाला तरी समोर उभे केले!
तर अशाप्रकारे लग्नाचा शेवट प्रचंड दगदग आणि कंटाळवाणा झाला हे मान्य करावे लागेल. दुसऱ्या दिवशी लगेच लवकर उठून कोचीला जाणारे विमान पकडायचे होते.

आम्ही विमानात बसलो. नाही म्हटलं तरी महिनाभर भरपूर दगदग झाली होती. सतत काहीतरी कामं असायची. भरपूर लोकांकडे जाणं, बऱ्याचदा त्यांच्याकडे जेवणं, त्यांचा तो वाट्टेल तसा आग्रह करणं आणि एवढं सगळं करून घरी उशिरा पोहोचून सकाळी वेळेवर कामावर जाणं. बरं, ही नातेवाईक मंडळी लग्नाला तर येणार होतीच. काही तर घरापासून अगदी जवळ राहणारी होती. पण तरीही 'आमच्याकडे जेवायला या' हे होतेच. आणि ते देखील त्यांच्या स्केड्युल प्रमाणे! नवरा मुलगा असलो तरीही मला कोणतीही सवलत नाही. एका उत्साही काका-आजोबांनी शेवटच्या क्षणी, 'आज जरा मला वेळ नाही मिळत आहे, उद्या ये' सांगून अशीच माझी पंचाईत केली होती. आणि अशा वेळेस आई नेमकी त्यांची बाजू घ्यायची. ' नेहमी कुठे बोलावतात ते' हा तिचा पवित्रा! ( तसं नेहमी कुणीच बोलवत नाही म्हणा!) तेव्हा पासून लग्न होईपर्यंत धावपळीतून अजिबात आराम मिळाला नव्हता. लग्न सुरु असताना मी झोपी जातोय का काय ह्याची मला भीती होती. परंतु सारखे 'सावधान' करणे सुरु असल्यामुळे तो प्रसंग टळला!
विमानात बसल्यावर हे सारे आठवून मी एक समाधानी सुस्कारा टाकला. परंतु कोची पर्यंत एक झोप होईल ह्याचा आनंद क्षणात मावळला.
" अरे झोपतोयस काय! आपल्याला एक सेल्फी काढायला हवा!"
" आत्ता? इथे?"
"अरे मग काय! सीटबेल्ट ची अनौंसमेंट होण्याआधी …. एक सेल्फी तो बंता है …. चल चल …लवकर … पुढे फोन स्विचऑफ करायला सांगतील …. आणि मग कोची पर्यंत नेट पण बंद होईल! त्याच्या आत आपण विमानात बसलोय हा सेल्फी फेसबुक वर नको टाकायला?"
हा एक सक्तीचा प्रोटोकॉल असल्यासारखी ही मला का सांगत होती देव जाणे! आणि त्याच क्षणी मी तो 'सेल्फी' 'फेस' केला!

आमचं फ्लाईट साधारण सकाळी ११ च्या सुमारास कोचीला उतरलं. मी जवळ जवळ तासभर का होईना झोप मिळवली होती. आता हनीमूनला जाताना प्रवासात झोपेला महत्व द्यावं हे मला देखील मान्य नव्हतंच! त्यामुळे आमच्या गप्पा देखील झाल्या. लग्न होण्या आधीच्या दोन-तीन महिन्याच्या काही आठवणी काढल्या गेल्या. काही विषयांवर गप्पा झाल्या, हसणं झालं, खिदळणं झालं. आणि विमानतळावर परत एकदा ….
" सेल्फी!!!"
'कोची विमानतळावर सेल्फी' हे शीर्षक लिहून फोटो फेसबुक वर गेला होता. आणि एका गहन हिशोबाकडे माझे लक्ष गेले.
" आपण मुंबईला विमानात सेल्फी काढलेला ना … त्याला बघ … १४८ लाईक्स आले पण", ही खूप उत्साहाने सांगत होती.
" बरं, मग?"
आणि…
" अरे मग काय … लोकांना आवडला फोटो… तुला काहीच कसं वाटत नाही… आणि त्यात तुझे मित्र खूप कमी आहेत … माझ्याच मित्र-मैत्रिणींकडून जास्त लाईक्स मिळाल्या आहेत … तुम्ही कुणीच फेसबुक वर नसता का? करता काय मग दिवसभर?"
शेवटच्या ' करता काय मग दिवसभर?' ह्या प्रश्नाला 'काम' असे उत्तर देण्याचा मोह मी टाळला. उगीच सहजीवनाच्या दुसऱ्याच दिवशी खटका नको उडायला! शिवाय आता काढलेल्या ह्या सेल्फीला किती 'लाइक्स' आले ह्याची मोजणी काही वेळेनंतर होणार होतीच. हॉटेलकडे घेऊन जाणाऱ्या कॅब मध्ये दर दोन मिनिटांनी फेसबुकवर फोटोची पाहणी होत असताना माझ्या हे लक्षात आले. त्यामुळे मी खिडकी बाहेर पाहू लागलो आणि माझी अरसिकता पुन्हा एकदा सिद्ध झाली.
हॉटेल मध्ये साधारण १ च्या सुमारास आम्ही चेक-ईन केलं आणि रूम मध्ये शिरतानाच माझा मोबाईल जवळ जवळ अर्धा मिनिट वाजत राहिला. अनलॉक करून पाहतो तर पंचवीस एक फोटोंनी माझ्या मोबाईल मध्ये शिरकाव केला होता. हिनेच पाठवले होते. पण एवढे?
" हो! एअरपोर्ट पासून हॉटेल पर्यंत काढले", तिने उत्तर दिले. अच्छा, म्हणजे माझे पाहणे सुरु होते तेव्हा हिने टिपणे सुरु केले होते. ह्या फोटोंमध्ये रस्त्यावर असलेली रहदारी, एअरपोर्टच्या बाहेर थोडीशी मोकळी जमीन, केरळ मधली एक बस, रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक गाय, रस्त्यावर मल्याळी अक्षरात लिहिलेले एक होर्डिंग इथपासून हॉटेल बाहेर ठेवलेल्या तीन कुंड्या, हॉटेलचे नाव ठळकपणे असलेला बोर्ड वगेरेचा समावेश होता. आता मल्याळी अक्षरं सोडली तर ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात सुद्धा होत्या. काही वेळाने मला लक्षात आले की ही मल्याळी अक्षरं फेसबुक मधल्या 'अपलोड' साठी होती. ' केरळ मध्ये आहोत ह्याचे प्रुफ' असे स्पष्टीकरण बायकोकडून मिळाले.

कॅमेराच्या नजरेतून पाहण्याआधी मी हॉटेल भोवती असलेले सौंदर्य माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहून घेतले. सकाळी वॉकला आलो होतो. कोणतेही चित्र कॅमेऱ्यात टिपण्याआधी ते आपल्या डोळ्यांनी टिपले गेले पाहिजे. त्याच्यासाठी काही सेकंदाचा अवधी हवा. तरंच एक सुंदर फोटो तयार येईल …. इतक्यात माझा फोन वाजला. एवढ्या सकाळी कुणाचा मेसेज म्हणून whatsapp उघडले तर बायकोचा मेसेज! एक चहा किंवा कॉफी असलेला कप आणि त्यातून वाफा येत आहेत, शेजारी एक गुच्छ ठेवलेला आहे आणि संदेश झळकतोय … गुड मॉर्निंग! हा मेसेज माझीच बायको मला का पाठवतेय हे काही मला कळेना. आणि ते सुद्धा ५०० मीटर लांब असलेल्या हॉटेलच्या खोलीतून! मोबाईल खिशात ठेवून मान वर केली तर समोरून ही चालत येत होती …. म्हणजे हिने येता येता हा मेसेज फॉरवर्ड केला होता!!
" गुड मॉर्निंग…", मी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. " छान होता ना मेसेज … आताच आला मला", समोरच्या दृश्याचा फोटो काढीत हिने माझ्या नैसर्गिक शुभेच्छांचा निकाल लावला. आणि ' मी तुला फोटोच्या नव्हे खऱ्या शुभेच्छा देतो आहे' असं मी सांगेपर्यंत ७ फोटो काढून झाले होते. मीच तो नाद सोडून दिला. त्यानंतर रोज सकाळी ६:३० ते ७:३० च्या दरम्यान माझ्या फोन मध्ये त्याच्या शेजारी ठेवलेल्या फोन मधून शुभ सकाळ वगेरे चे मेसेज येऊ लागले.

पण इथपर्यंत भागलं नाही. माझ्या फोन मध्ये आता काही नव्या मेसजेस नी देखील शिरकाव करायला सुरुवात केली होती. ह्यांची विशेषता अशी की हे संदेश काही विशिष्ट व्यक्तींच्या भोवतीच विणले जायचे. त्यात डॉ. कलाम, अब्राहम लिंकन आणि स्वामी विवेकानंद ह्यांचा सामावेश होता. मला खात्री आहे की ही माणसं आज जर जिवंत असती तर त्यांनी ह्या सर्वांवर अब्रु-नुकसानी पासून चुकीची माहिती पसरवल्याचा खटला नक्कीच भरला असता. म्हणजे I am not handsome but I can give my hand to someone who need help... Because beauty is required in heart not in face....असं कलाम कधी म्हणाले असतील असं वाटत नाही. हिच शिक्षा विवेकानंदांना देखील दिली होती. म्हणजे एक इंग्रज माणूस विवेकानंदांना विचारतो की तुमच्या देशात स्त्रिया 'shake hand' का करत नाही? तेव्हा विवेकानंद त्याला उलटा प्रश्न विचारतात की तुमच्या देशात तुम्ही राणीला 'shake hand' करता का …. आमच्या देशात प्रत्येक स्त्री राणी सारखी आहे --- गुड मॉर्निंग, असा तो संदेश पाहून मी चकित झालो. मला काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण झाली. काही मोठ्या लोकांनी ( काका वगेरे) WhatsApp वर ग्रुप काढलेला. अजून देखील आहे. पण त्यात मी नाहीये. त्यात देखील अशाच संदेशांचा भडीमार होयचा. काही लोकसंगीत प्रकार कसे त्याचा कवी माहिती नसतो पण ती वर्षानुवर्ष पुढे सरकत आपल्या पर्यंत येतात तसंच बहुदा ह्या संदेशांचे पुढे होणार आहे. मी दहावी-अकरावीत असताना ( म्हणजे बारा वर्षांपूर्वी) ई-मेल चेक करायला महिन्यातून एकदा सायबर कॅफे मध्ये जावे लागे. तेव्हा काही फार महत्वाची ई-मेल येत नसत , नुसती फॉरवर्ड असत. त्यात एक ई-मेल असे सांगायचे की भारतातील राष्ट्रगीताला UNESCO ने जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रगीत म्हणून सन्मानित केलंय. बारा वर्षांनी जेव्हा WhatsApp वर हाच मेसेज एका काकाने फॉरवर्ड केल्यावर मी सभात्याग करतात तसा ग्रुप-त्याग केला! इतकी वर्ष झाली तरी वाजपायी ह्यांच्यापासून डॉ. मनमोहन सिंग आणि आता मोदी हे कुणीच हा सन्मान स्वीकारायला गेले नाहीत ही साधी गोष्ट कुणाच्याही लक्षात न यावी? पण काका लोकांचं ठीक आहे. त्यांच्या हातात एकदम हे तंत्रज्ञान आले. पण शाळेपासून मोबाईल बरोबरच मोठ्या झालेल्या माझ्या बायकोला देखील अशा मेसेजसची चिकित्सा करावी वाटू नये ह्याचे मला आश्चर्य वाटले.

परंतु आश्चर्य वाटण्याची ही एक सुरुवात होती असं मला काही दिवसात कळलं. कोचीहून आम्ही आता मुन्नारला आलो होतो. तिथे आम्हाला जे हॉटेल मिळाले होते ते एकदम डोंगरात बसलेले असे होते. तिथली ती शांतता आठवली ना की आपण शहरात जन्माला आलोय ह्याचा प्रचंड पश्चाताप होतो! डोंगराचा तो भाग 'U' ह्या आकाराचा असल्यामुळे दोन बाजूंमध्ये प्रचंड मोकळी जागा होती. आमचं हॉटेल एका बाजूला तर दूर दुसऱ्या बाजूला पायथ्याशी एक मंदिर होते. परंतु परिसर इतका शांत की दूर मंदिरात लावले गेलेले दाक्षिणात्य संगीत अगदी स्पष्ट ऐकू येत होते. मी त्या जागेचा शांत उभं राहून, डोळे मिटून अनुभव घेताना हिने नेहमीप्रमाणे फोटो मोहीम सुरु केलीच! त्या दिवशी रात्री जेवायला बसलो होतो.
" काय शांत परिसर आहे … मुंबईला जावेच वाटत नाही ", मी म्हणालो. ही मोबाईल मध्ये काहीतरी टाईप करत होती. त्यामुळे माझ्याकडे न बघता 'हं' एवढा प्रतिसाद आला. त्यामुळे काही सेकंदांनी मी देखील माझे सूप चे बाउल न्याहाळू लागलो. आणि तेवढ्यात …
" ओह्ह्ह …. मोदी… "

टी.वी वर पंतप्रधान कुठेतरी बोलत होते त्याची बातमी दाखवत होते.
" तुला आवडतं का राजकारण?" मी विचारलं.
" ओह्ह प्लीज … नाही आवडत … खूप बोरिंग आहे पॉलीटिक्स", ती म्हणाली. " बट आय फाईंड मोदी वेरी कूल ", हे देखील पुढे जोडले तिने.
पंतप्रधान कूल कसे असू शकतात हा विचार मी मनात दाबून धरला.
" पण तुला माहितीय का …. मी वोट द्यायला गेले होते ना.… तर मला लिस्ट मध्ये मोदींचे नाव कुठेच दिसले नाही… … आय वॉस सो कंफ्युज्ड…"
पुढच्या क्षणी मला पाणी द्यायला धावलेल्या दोन वेटर्सना मी खुणेने मागे सारले होते. इतका प्रचंड ठसका लागला होता मला. पुढे मला सांगितले गेले की नेमके तिला कमळ असलेले बटण दाबा ही जाहिरात आठवली आणि कदाचित ते म्हणजे मोदी असं समजून तिने आपले मत व्यक्त केले होते. आणि तिच्या सुदैवाने ते बरोबर निघाले. मी हे सारे ऐकून घेतले. मग तिला समजवायला सुरुवात केली की कमळ ही भाजपची निशाणी आहे. आणि तू मत मोदींना नाही तर भाजपला दिले आहेस. त्यानंतर खासदार कोण, आमदार कोण आणि मोदी निवडणुकीला कुठून उभे होते वगेरे सर्व मी तिला समजावले. मोबाईल कडे पाहणे आणि माझ्याकडे पाहणे ह्याचा समन्वय साधत मान खाली-वर करीत ती सारे ऐकत होती. मागच्या निवडणुकीच्या वेळेस ती १७ वर्षांची असल्यामुळे तिची मत द्यायची संधी हुकली होती. राज्याच्या आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत तिला रस नव्हता. त्याचे कारण तिच्या शब्दात सांगायचे तर 'तेव्हा फेसबुक, ट्विटर नसल्यामुळे मला काहीही माहिती नव्हते'.
" मी गाडी चालवते तर रस्त्यावर खड्डे असतात…. आमच्या घरी पुण्यात २४ तास पाणी येत नाही… गाडी चालवते तर सारखा ट्राफिक असतो … सो मी ठरवले की आता चेंज हवा ", तिने शेवट केला.
" पण ह्यातली कोणती कामं केंद्र सरकार करतं?" मागवलेल्या आईस-क्रीमचा फोटो काढून WhatsApp वरून पाठवणे हे माझ्या ह्या प्रश्नाचे उत्तर होते. त्यामुळे विषय तिथेच संपला. तो अजून सुरु राहिला असता तर कदाचित मी तिला सोशल मिडियाच्या पलीकडे जाउन रोजचा पेपर वाच वगेरे सांगणार होतो. परंतु ज्या प्रकारे सोशल मिडियावर चाललेल्या चर्चा अचानक संपतात (किंवा संपवल्या जातात) तसा आमचा हा विषय संपला.

- आशय गुणे Happy

भाग २ इथे आहे - http://www.maayboli.com/node/55906

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आपला कट्टा ह्या पानावर ह्याबाबत अप्रत्यक्षपणे लिहिले होते कारण उगाच टीका करणे योग्य वाटले नाही. विषय निघाल्याचे दिसले म्हणून मत खरडतो. चु भु द्या घ्या. दुसरा भाग व त्यावरचे प्रतिसाद वाचलेले नाहीत.

मी नीधपंशी सहमत आहे. मुळात खूप विनोदी असे काही जाणवले नाही पण हे ललित असल्याने ती अपेक्षा ठेवणेही गैर असेल. पण लेखाचे स्वरूप मात्र 'अश्या प्रकारच्या स्त्रीशी विवाहबद्ध झाल्यामुळे' निर्माण होणारे प्रॉब्लेम्स व त्यांना दिलेली संयमी टीकेची व विनोदाची झालर असेच दिसत आहे. जर ते तसेच असेल तर अश्या प्रकारच्या विनोदांवर भरपूरजण हसतात आणि ते (माझ्यामते तरी) केविलवाणे आहे. म्हणजे, 'स्त्रीचा बावळटपणा' ह्या विषयाचे भांडवल करणे सोपे आहे. ह्यात अगदी समानता वगैरे विषय आणले जावेत असे वाटले नाही, पण एकांगी चित्र रंगवल्यासारखे वाटले.

तसेच, चिनूक्स ह्यांनी ह्याच ललितावर हा प्रश्न का विचारला हे खरंच मलाही समजलं नाही. पूर्णपणे काल्पनिक कथांवरसुद्धा लेखन करणार्‍यावर वैयक्तीक आकस असलेल्या प्रतिसादांचे ढीग लागत असतात.

शेवटी - माझा असा अंदाज आहे की ललित हे स्वतःच्याच मनातील व अनुभवातील गोष्टींवर असते. जे काल्पनिक असते ते कथा ह्या प्रकारात मोडते. ही माझी मते आहेत, चुकली असल्यास दुरुस्त व्हावीत.

धन्यवाद!

हे ललित जनरेशन gap आणि टेक्नोलॉजीचं एव्होल्युशन न बघता एकदम (सध्याच) फायनल product दिसणारी पिढी आणि किंचित मोठी पण एव्होल्युशन बघितलेली पिढी यावर आहे (असं मला वाटलं). यात स्त्री किंवा पुरुष यांना टोमणे मारलेत, विनोद केलेत असं अजिबात (मला) वाटलं नाही. बेफि पुढच्या भागात नायक पण बदलू लागलाय असा समाजमान्य शेवट आहे. Happy

हे ललित जनरेशन gap आणि टेक्नोलॉजीचं एव्होल्युशन न बघता एकदम (सध्याच) फायनल product दिसणारी पिढी आणि किंचित मोठी पण एव्होल्युशन बघितलेली पिढी यावर आहे (असं मला वाटलं). यात स्त्री किंवा पुरुष यांना टोमणे मारलेत, विनोद केलेत असं अजिबात (मला) वाटलं नाही. >>> +१

लेखाची कल्पना आवडली आहे हे हायलाइट करायला म्हणून संपादित केला प्रतिसाद.

जर हे फिक्सन असेल तर फिक्शनल कॅरेक्टरला डंब म्हणल्याचाका बरे राग यावा? बाकी लेख वाचून लेखकाला त्या बाअकोच्या डंब असण्यातून विनोदनिर्मिती कराय्चीए असेच जाणव्ले.
जे बोर आहे.

अमितव,

एकाहून बरेच अधिक भाग असलेल्या सुमारे सोळा कादंबर्‍या मी येथे खरडल्या आहेत. पण माझा असा अनुभव आहे की त्या त्या भागावर लोक प्रतिसाद देऊन मोकळे होत असत. पुढचा भाग वाचून मग आधीच्या भागावर किंवा एकदमच असा प्रतिसाद देण्याची प्रथा आढळली नाही. हे उपरोधिकपणे लिहीत नसून वास्तव लिहीत आहे. पुढचा भाग अजून आलेलाच नसता तर येथे जे वाटले ते लिहू नये असे म्हणता येईल का?

बाकी नुसतीच आकसाने री ओढणार्‍यांकडे 'य' वेळा जसे दुर्लक्ष केले तसेच आजही करत आहे.

अहो तुम्ही काढत असलेल्या अनुमानाला पुढच्या लेखात छेद जात होता म्हणून फक्त म्हटलं शेवट गोड आहे, पुढे वाचा. तुम्ही प्रतिसाद कुठे लिहावा यावर ती कमेंट न्हवती.

>>> अमितव | 2 October, 2015 - 22:37 नवीन

अहो तुम्ही काढत असलेल्या अनुमानाला पुढच्या लेखात छेद जात होता म्हणून फक्त म्हटलं शेवट गोड आहे, पुढे वाचा. तुम्ही प्रतिसाद कुठे लिहावा यावर ती कमेंट न्हवती.
<<<

पटले.

पण होते काय, की तुमच्या प्रतिसादाचा सोयीस्कर अर्थ लावून हिणकस दिशा देणारे पुढे येतात आणि त्यावर तुम्ही त्यांना असे म्हणत नाही की 'तुम्ही ज्या दिशेला चर्चा नेताय तिकडे मला न्यायचीच नाही आहे' त्यामुळे मी वर दिलेल्या प्रतिसादासारखा प्रतिसाद हातून लिहिला जातो.

मी दुसरा भाग वाचुनही नीधप +१

उगाच सारवासारव केली आहे. शेवटी फक्त एका गटगचा किस्सा टाकुन.

जर फक्त जनरेशन गॅपचा प्रश्न असता तर ज्या त्या गोष्टीचा फोटो काढायचे वेड इतपतच राहिले असते.
पुढचं कमळ..मोदी वै. आलं नसतं.

ह्याच गोष्टीला मित्सच्या नजरेतुन वाचायला आवडेल.
"मैं क्या करू राम मुझे बुड्ढा मिल गया" Biggrin

छान चर्चा चालू आहे.

मला तरी नाही वाटत की यात एका मुलीला किंवा बायकोला कशी वेंधळट आहे असे प्रोजेक्ट केलेय. तर यातील जोडीदार एका विशिष्ट वयोगटाचे प्रतिनिधित्व करतोय. त्यात मुले, मुली दोन्ही येऊ शकतात. आणि खरेच येतात. आपण आपल्या आजूबाजुची 18-20 वर्षांची मुलेमुली पाहता हे लक्षात येते.

गंमत म्हणजे या वास्तवाची दुसरी बाजू अशी आहे की हा 18-20 वर्षे वयोगटाचा ग्रूप त्यांच्यापेक्षा 6-8 वर्षे मोठे असणारे तसेच यांच्यासारखे न वागणार्यांना अंकल आणि बोर आयुष्य जगणारे समजतो. तर त्यांनाही सहानुभुती दाखवायच्या भानगडीत पडू नका Happy

प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद! मला ह्या विषयावर लिहिताना बरीच 'लेबलं' लागायची धास्ती होतीच. धास्ती म्हणण्यापेक्षा खात्री होती. कुणी मला म्हातारा म्हणून माझ्या वयाचा विचार करेल किंवा कुणी माझ्याबद्दल 'स्त्रियांच्या विरोधात लिहिलंय बहुतेक' असं देखील मत बनवेल ह्याची कल्पना होती. काहींना हे 'चीप' वाटलं असेल किंवा काहींना 'उगीचच' अशा स्वरूपाचे देखील वाटेल. आणि काही लोकांना लेख पटला देखील आहे. ह्या सर्वांना त्यांच्या परीने जे काही वाटायचं आहे त्याला माझी अजिबात हरकत नाही.

हा विषय केवळ आणि केवळ 'generation gap' ह्याच हेतूने लिहिला आहे. आणि ही gap उद्भवण्याचे कारण म्हणजे technology आणि झपाट्याने बदलणारी जीवनपद्धती. ह्याचा खुलासा पुढच्या प्रतिक्रियेत दिलेलाच आहे.

माझा बायकोला डंब म्हणून प्रस्तुत करण्याचा हेतू नाही. परंतु जर ते तसं वाटलं असेल तर ह्या वर्णन केलेल्या गोष्टी आपण 'डंब' समजतो ( आणि त्या लिहिल्या की डंब वाटतात) असाच त्याचा अर्थ होतो. ह्याच न्यायाने २१-२३ वर्षांच्या मुलांना देखील माझ्या वयोगटातील मुलांना 'डंब' समजण्याचा अधिकार आहे. कारण त्यांना जे 'कूल' वाटतं ते आपण करत नाही. पण सांगताना एवढेच सांगीन की ही निरीक्षणं आहेत. कुणीतरी प्रतिक्रिया दिली आहे की हाच लेख मित्स ने लिहिला असता तर तिला 'बुढ्ढा मिल गया' चे फिलिंग येईल. पण दुसऱ्या बाजूने पाहिल्यास लेखाचा हेतू सार्थकच होईल.
काहींना माझ्या वयाबद्दल विचारावेसे/लिहावेसे वाटले. त्यांना एवढेच सांगीन की मी २८ वर्षांचाच आहे आणि माझे लग्न झालेले नाही. हा लेख निरीक्षणांवर आणि आजू-बाजूला घडणाऱ्या घटनांवर लिहिला आहे.

सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून इतकेच सांगीन की माझ्या विचारांशी 'अमितव' आणि 'ऋन्मेऽऽष' ह्यांची प्रतक्रिया जुळली! आणि अर्थात त्यांच्या प्रतिक्रियेला दुजोरा देणाऱ्यांची सुद्धा. Happy

भारतात १९९१ ह्या वर्षी आर्थिक उदारीकरण आले. परिणामी तेव्हा पासून ते आतापर्यंत देशात प्रचंड प्रमाणात पैसा आणि गुंतवणूक आली. हे उदारीकरण १९९१ च्या वर्षी जरी लागू केले तरी त्याची फळं ही १९९४ पासून देशात दिसू लागली. त्यामुळे ज्या मुलांचा जन्म १९८५-१९९१ ह्या वर्षांमध्ये झाला ती साधारण ६ वर्षांची झाली तेव्हा हा बदल घडू लागला होता. आणि ह्याच वेळेस त्यांच्यापेक्षा ६ वर्षांनी लहान असलेल्या मुलांचा जन्म झाला. २००० हे वर्ष उजाडलं तेव्हा बराच बदल हा झालेला होता. तेव्हा मात्र १९८७ वाली पिढी १३ वर्षांची होती पण त्यांच्यापेक्षा ६ वर्ष लहान पिढी ७ वर्षांची! त्यामुळे ज्या गोष्टी १९८७ च्या पिढीने एका क्रमाने अनुभवल्या त्याच गोष्टी ६ वर्ष लहान पिढीने बऱ्याचशा एकदम. ह्या साऱ्या प्रकारामुळे आधी जो पिढी-बदल १० वर्षांनी होयच तो आता ५-६ वर्षांनी होतो आहे. आणि पुढे कदाचित हा आणखी देखील कमी होईल. ही सारी लेखा मागची प्रेरणा! धन्यवाद! Happy

कड़क निरीक्षण आणि मस्त लेखन..
शेवटचा प्रतिसाद > अगदी बरोबर.

रच्याकने, यात २२,२३ वयाचे बाबतीत जे लिहिलय ते तसच आहे पण हे १००℅ लोकांच्या बाबतीत असेल असे नाही. अपवाद असतात.

पु ले शू

मला या लेखाचे दोन्ही भाग आवडले. मी ३० वर्षाचा फेसबुक अकाउंट स्वेच्छेने नसलेला(आधी असून मग डिलीट केलेला नव्हे) प्राणी आणी ५०-६० वर्षाचे फेसबुकवर रोज स्टेटस आणी सेल्फी टाकणारे लोक याची देही याची डोळा पाहिले असल्याने बायको २२ किंवा मुलगा २८ किंवा कितीही असला तरी लेखापुरता चालेल.
तसेच मित्स च्या बुद्धीबद्दल इ शंका घेणारा लेख नसून तो मोअर ऑफ "दोघांच्या सोशल नेटवर्क प्रायोरीटीज" असा आहे हे वाटलं आणि पटलं.

कालच्या पहिल्या भागातल्या बर्याच प्रतिक्रिया मी वाचल्या होत्या. त्या कुठे गेल्या ? त्या आत्ता का दिसत नाहीत. धागा वाहता झालाय का ? Happy