कंदी पेढे / धारवाडी पेढा / मावा मोदक - एक वेगळी पद्धत (फोटोसहित)

Submitted by देवीका on 16 September, 2015 - 22:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दिड कप फ्रेश क्रीम किंवा ताजी साय फेटून,
अर्धा कप दूधाची भुकटी,
तूप लागेल तसे
एक कप साखर,
३ टेबलस्पून पाणी,
फक्त ३-४ थेंब लिंबू रस,
वेलची, केसर
केसरी रंग हवा असेल तर.

क्रमवार पाककृती: 

पाकात मुरायला ठेवल्यावर
mawa1.jpg

पाकात मुरल्यावर
mawa2.jpg

कंदी पेढा

pedha1.jpg

१.दूधाची भुकटी, साय /क्रीम, पाव कप साखर आणि तूप सर्व एकत्र करून माय्क्रोवेव बोलमध्ये ठेवून एक मिनिटासाठी ठेवून मग थांबवून ढवळावे.
२.असे दर एक मिनिटाने थांबवून घेवून ढवळून घ्यावे जोवर सर्व मिश्रण एकत्र होवून रवेदार मावा दिसत नाही.
३. पुर्ण थंड झाल्यावरच आता ब्लेंडर मध्ये मावा एकजीव करावा. पुन्हा एक मिनिटासाठी एकजीव झालेला मावा गरम करा.
४. आता उरलेली साखर घेवून पाक फक्त एक तारी वाटलेला झाला की त्यात लिंबाचे थेंब टाकून ब्लेंडर ने छान घुसळावे. मग गॅसवरून उतरवून मग वेलची पूड्,केसर काड्या पुन्हा घुसळावे.
५. पाक कोमट असतानाच थंड झालेला मावा टाकून तो एकत्र करून झाकून ५ मिनिटाने हव्या त्या आकारात मोदक साच्यात घालून मोदक करावे.
६. अतिशय सुंदर रवाळ चवीचे मोदक होतात. ह्याच पद्धतीने केसर बर्फी, आंबा बर्फी(आटीव आंबा रस टाकून), पिस्ता चुरा घालून पिस्ता बर्फी होवु शकते.

टीपः गॅसवर सुद्धा हि कृती होवु शकते. फक्त नॉनस्टीक तवा हवा. सतत ढवळून घ्यावे.

कंदी पेढे हवे असल्यास, मावा ज्यास्त खरपूर भाजून नैसर्गिक रित्या येणारा लालसर रंग झाला की कंदी पेढे वळावे.
धारवाडी हवे असल्यास : ह्याच माव्यात, माव्याच्या निम्म्या प्रमाणात ताजे पनीर चांगले परतून घालावे. पनीर हे पुर्ण खरपूस दिसायला हवे. आणि मग माव्यात मिसळावे व मळून पेढा करावा.

वाढणी/प्रमाण: 
गोड मावा मोदक कोणाला आवडत नाही?
अधिक टिपा: 

१.साय ताजी हवी, फ्रिजमध्ये ठेवलेली नको, नाहितर वास मारतो.

२. साजूक तूप घ्या. मला तरी वरील प्रमाणात एकच चमचा तूप लागले. ज्यास्त तूप घालू नका मिश्रण जरी सुरुवातीला कोरडे वाटले तरी. खूप तूपकट होतात व दिसतात.

३. १-२ दिवस वर बाहेर टिकतात. पण दूधाचा पदार्थ बाहेर ठेवू नका फ्रिजशिवाय. फ्रिज मध्ये एक आठवडाच ठेवा ज्यास्तीत ज्यास्त.

४. रंग टाकणार असाल तर पाक होतानाच टाका.

५. पाकाएवजी कॉर्न सिरप त्याच प्रमाणात घेवून सुद्धा होतात.

६. लिंबाचा रस हा पाक कडकडीत होवु देत नाही. मोदक / पेढे हे साखर /पाक शोषून घेतल्यावर कोरडे, भरभरीत होतात काहीच तासात. आणि आतून सुकतात. पाक ह्याच कारणासाठी करायचा.
पाकात लिंबू रस टाकल्याने नेमके शुष्कपणा कमी होतो. लिंबाची चव जाणवत नाही कारण पाक गरम असतानाच नेमके २-३ थेंब टाकून घुसळायचे आहे.

७. सहसा बिघडत नाहीत व चिकट होत नाहीत. कंडेन्स्ड मिल्क टाकलेले तर खूप गोड होतात व चिकट होतात बहुधा.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो?

साबा दरवर्शी माव्याचे मोदक करतात , यावेळी जमलं नाही .
त्या कठिण प्रकरणाकडे मी फिरकलेही नाही.

हे जरा प्रयत्न करायच्या आवाक्यातलं वाटतयं.
रविवारी मूड लागला तर करेन म्हणतेय Happy

छान आहे कृती.. काल पेढे केले तेव्हा हे लिंबाचे आठवले होते पण आमच्याकडे प्रसादात लिंबू वापरत नाहीत, म्हणून नाहीच वापरले. मी थोड्याच प्रमाणात केले त्यामूळे थेट गॅसवरच मिश्रण आटवले.

पाकातले पेढे पहिल्यांदाच ऐकले. कंदी पेढे म्हणजे जीव की प्राण असल्याने नक्की करून पाहिन.

दुधाची पाउडर खय्रा माव्यात थोडी टाकली तर ( एक वाटीला एक मोठा चमचा ) पेढे चांगले जमतात.सर्वच दुध पाउडर वापरल्यास त्याची चव लक्षात येते.मिठाईवाले कच्चा पाक आणि साईट्रीक अॅसीड चिमुटभर वापरतात कारण दुकानात ते आठ दिवस टिकवायचे असतात.
अगदी खरपुस खमंग पेढा हवा असल्यास-
एक वाटी खवा किंचीत गरम करून घ्या.
पाव वाटी साखर त्यात हळूहळू मळून जिरवा.
त्याचे पॅटीससारखे गोल करून तव्यावरती भाजा.
एक बाजू थोडी खरपुस झाली की उलटून दुसरी बाजू भाजा.सुगंध दरवळतो.
ही वस्तु कुठे विकत मिळत नाही.

>>>>दुधाची पाउडर खय्रा माव्यात थोडी टाकली तर ( एक वाटीला एक मोठा चमचा ) पेढे चांगले जमतात.सर्वच दुध पाउडर वापरल्यास त्याची चव लक्षात येते.मिठाईवाले कच्चा पाक आणि साईट्रीक अॅसीड चिमुटभर वापरतात कारण दुकानात ते आठ दिवस टिकवायचे असतात.<<<

बरोबर. टिकवण्याबरोबरच ते भुरभुरीत दिसत नाही आणि कोरडे होत नाहीत.