डाळ - तांदूळ खिचडी

Submitted by योकु on 20 August, 2015 - 10:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- एक मध्यम वाटी तांदूळ
- एक मध्यम वाटी सालाची मुगाची डाळ
- मीठ
- हळद
- एक/ दोन तमालपत्रं
- भरपूर जिरं
- तिखट आवडत असेल तर काही मिरीदाणे (शक्यतो यात घालत नाहीत, पण खातांना मध्ये मध्ये आलेले मस्त लागतात; नाही घातले तरी चालेलच)
- तेल किंवा आवडीप्रमाणे साजुक तूप (शक्यतो गाईचं)

क्रमवार पाककृती: 

- डाळ + तांदूळ एकत्र करून स्वच्छ धूवून, १५/२० मिनिटं पाण्यात भिजवावे.
- कुकरला नेहेमीप्रमाणे खिचडी शिजवून घ्यावी. शिजतांना, मीठ + हळद घालावं.
- कुकरचं प्रेशर गेलं की गरम असतांनाच, त्यात खिचडी पातळसर/ पळीवाढी होईल इतकं पाणी घालावं. पुन्हा गरम करत ठेवावी ही खिचडी.
- आता आवडीप्रमाणे जरा सढळ हातानी तेल किंवा तुपाची फोडणी करावी. त्यात भरपूर जिरं अन तमालपत्र घालून खमंग फोडणी खिचडीवर ओतावी. मिरीदाणे घेतले असतील तर ते फोडणीत घालावे.
- नीट ढवळून रटरटू लागली की गरमागरमच खावी. हवं असेल तर अजून साजुक तूप वरून घेता येईल.

वाढणी/प्रमाण: 
एवढ्या प्रमाणात २ माणसांना पुरावी संध्याकाळचं जेवण म्हणून
अधिक टिपा: 

- तांदूळ जुना, फुलणारा घ्यावा. बासमती शक्यतो नकोच
- सालाची मुगाची डाळ नसेल तर साधी मूगडाळ वापरता येईल
- नवीन काहीच नाही या प्रकारात, फोडणीच काय ती जरा वेगळी; दोनच जिन्नस वापरून केलेली आहे. त्याचा वेगळा स्वाद जाणवतो. साजुक तूप + जिर्‍याचा स्वाद अन तमालपत्राचा सुवास मस्त येतो.
सर्दी, घसादुखी आणि तत्सम आजारात जराही मिरची/ तिखट खाल्लं की घसादुखी अ‍ॅग्रेव्हेट होते असा मलातरी अनुभव आहे. त्यावर हा गरम्मागरम आहार पोटभरीचा तर होतोच पण पचायला हलकाही आहेच.
- आता नेहेमी शक्यतो अशीच खिचडी केली जाते. इतरवेळी मात्र लाल मिरची तळून घालतो तिखटपणासाठी.

- ही खिचडी एकदा योगशिबीरामध्ये खाल्ली आहे. शेवटच्या दिवशी शंखप्रक्षालन योग प्रकारानंतर गुरुजिंनी ही खिचडी २ डाव + एक डाव गाईचं साजुक तूप असं खायला लावलं होतं.
- शंखप्रक्षालन योगाच्या कृतीकरता लापी वाजवा अन नक्की काय होतं त्यानी + बाकी टेक-डिटेल्स करता डॉक/ आयुर्वेद/ योगशिक्षकाला विचारा Happy

माहितीचा स्रोत: 
योगशिबीर
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक डाव तूप? बापरे!!!
खिचडीच्या रेसिपीचं नेहमीच स्वागत. एकदम कंफर्ट फूड. फक्त आमच्याकडे त्यातला तांदुळ वजा होऊन किन्वा आला आहे.

भरपूर तुपातली आसट व चविष्ट खिचडी! मस्त. काहीजण खिचडी पचायला आणखी हलकी व्हावी म्हणून तांदूळ भिजवल्यावर अगोदर खमंग भाजून घ्यायला सांगतात. सालाच्या मुगाच्या डाळीची स्वत:ची एक वेगळी चव असते. त्यामुळे खिचडीचा स्वादही खुलतो. आल्याचा छोटासा तुकडा किंवा किसलेले आलेही चांगले लागेल ह्यात.

मस्त .
**शंखप्रक्षालन योगाच्या कृतीकरता लापी वाजवा अन नक्की काय होतं त्यानी + बाकी****

लापी वाजवा=?
शंखप्रक्षालन बद्दल काही लेख अगोदर इथे आला असल्यास वाचतो.

व्वा. मस्त!
खिचडी म्हणजे... आमच्या कडे अगदी जीव की प्राण.. कोणत्याही प्रकारची आवडते.. ही वरून फोडणी ची आयडिया छान.. चविष्टच असेल.
शिजवताना छोटासा दालचिनी चा तुकडा टाकला तर छान, वेगळी चव येते.!!

योकू … नंतर पाणी घालून उकडायची आयडियाची कल्पना युनिक आहे हा … करून बघेन लवकरच

प्रमोदजी खिचडीच्या निमित्ताने एक चांगला ब्लॉग मिळालाय वाचायला. धन्यवाद

.

मला करावीच लागली आज रेसिपी वाचल्यावर. पण माझी नेहमीचीच रेसिपी. पुढच्यावेळी ह्या पद्धतीने ट्राय करेन.

आत्ताच केली ही खिचडी. अगदी मस्त सात्विक झालीय. बरोबर तळलेल्या कुरडया खाल्ल्या. (सात्विकतेचं अजीर्ण नको म्हणून...)
धन्यवाद योकु!

डा-तां-खि अत्यंत आवडता प्रकार असल्यानं नक्की करून बघेन. रच्याकने, लसूण न घातलेल्या खिचडीला आमच्यात सात्विक म्हणत न्हायीत Wink

छान कृती. मी थेट फोडणी घालूनच खिचडी शिजवतो. आणि माझ्याकडे मी ईन्डोनेशिआहून आणलेले मातिचे एक मडके आहे ते मी वापरतो त्यात ती आणखीनच फुलून येते. मी सहसा आंबे मोहोर, कोलम वापरतो. शंखप्रक्षालणानंतर भरपुर तुप घातलेली खिचडीच खावी लागते. मी एक डाव नाही घेत पण एक सढळ चमचा तरी घेतो.

मस्त. नक्की करुन बघेन. जिरं आणि भरडलेले मिरं ह्या काँबिनेशनबरोबर त्याच फोडणीत तळून घातलेला काजूतुकडाही भारी लागतो खिचडीत. मी करते जिर्‍या-मिर्‍याची खिचडी. थोडी चणाडाळही घालते.

सिंगापुरमधे इथल्या कुठल्याही हिन्दु मंदिरात तमिळ लोक पोंगल करतात. त्यात फक्त मिरी आणि भरपुर तुप असते डाळ तांदळात. मे यिशूनमधे राहायचो आणि ते मंदीर तर पोंगल साठी इतके प्रसिद्ध होते की फक्त पोंगल चाखायला लोक येत खरेखुरे दर्शनाला नाही. तमिळ लोकांमधे तांदळ्याच्या जेवढय पाककृत्या पाहिल्यात तेवढ्या इतर कुठेही नाही पाहिल्यात.

अकोला अमरावतीला तुर डाळ आणि तांदळाची खिचडी करतात त्यावर सुकलेल्या लाल मिरच्या कढवून त्या कुस्करुन खातात. सोबतीला चिंचवनी नाहीतर कढी केली जाते. मस्त बेत असतो हा.

हाय योकु….
४ दिवसांनी माबोवर फिरकले आणि माझ्या आवडत्या प्रांतात तुझी रेसिपी पाहिली आणि दिल खुश झाला कारण आज डब्यात मी दाल खिचडीच आणली आहे.
http://kha-re-kha.blogspot.in/2012/09/blog-post_23.html
ही माझी पद्धत!

जबरी आहे पाकृ. एकेक स्टेप डोळ्यासमोर आली आणि फायनल गरम गरम खावी वरून आणखी तुप घेता येईल या वाक्यावर जाणवलं आपण पाकृ नुसतीच वाचतोय. Sad
जेवून आले आहे तरी वाटिभर गरम गरम खिचडी खाण्याचा मोह झाला.

कालची खिचडी आवडली म्हणून आज परत फमाईश झाली.पण आज त्यात कांदा+आलेलसूण+पनीर + मसाला टाकून फ्यूजन केलं.कमी तूप घातले.मस्त झाले होते.२०-२५ दिवस खिचडी करणार नाही हे बजावले.

सिंडरेला, मी लसूण न घालता केली. लिहायचं राहिलं.

मी पण कांदा, लसूण आणि मसाले घातलेल्या पदार्थांना सात्विक समजत नाही.

Pages