चिकन बिर्याणी

Submitted by सामी on 4 March, 2013 - 05:44
chicken biryani
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

एक किलो चिकन, 7/8 कांदे , ४/५टॉमेटो, आले, लसूण 15-20 पाकळ्या, 5-६ लवंग, 7-8 मिरी, ३ बडी वेलची, 4 लहान वेलची, दालचिनी १ इंच, 2 लहान चमचा धणे, खसखस 1/2 चमचा, तमालपत्र, लाल मिरची पूड , कोथींबीर, पुदीना, तेल, तूप, ४ वाटी बासमती तांदूळ.

क्रमवार पाककृती: 

ही रेसिपी मी वेगवेगळ्या स्टेप्स मध्ये ब्रेक करून टाकत आहे. माझ्या बहुतेक मैत्रीणीना मी कृती अशीच सांगितली आणि त्यांना अश्या प्रकारे सोप्पी वाटली.

माझ्या बरयाच मैत्रीणी/मित्र चिकन बिर्याणी ही हॉटेल मध्येच जाऊन खायची किंवा घरी मागवायची या मतावर ठाम होते. इव्हन नवर्याला ही घरी हॉटेल सारखीच किंवा अजून चांगली बिर्याणी बनू शकते यावर विश्वास न्हवता. पण घरी केलेली चिकन बिर्याणी खाल्ल्यापासून महिन्यातून एकदा तरी बिर्याणी होतेच.

१. चिकन ला दोन चमचे चमचे मिरची पूड , हळद , मीठ , अर्धी लहान वाटी दही लावून ठेवावे
01_1.jpg

२. नॉर्मल साईझ चे 7/8 कांदे उभे कापून घेउन तेलात गोल्डन ब्राउन रंगावर फ्राय करून वेगळे ठेवणे. कढईत तेल न टाकता कापलेले कांदे मंद आचेवर ठेवावेत .थोड्यावेळाने तेल घालावे. हे सारखे बघावे लागत नाही. थोड्यावेळाने मध्ये मध्ये परतावे.
कांदा व्यवस्थित फ्राय व्हायला १ तास लागतो. पण मंद आचेवरच फ्राय करून घ्यावा. ज्या दिवशी बिर्याणी बनवायची त्यादिवशी उठल्या उठल्या कांदा फ्राय करायला गॅस वर ठेवून द्यावा .
फूड प्रोसेसर मध्ये कापलेला कांदा.
onion.jpgफ्राय केल्यावर
onion1.jpg

३. ४/५ टोमॅटो कुकर मध्ये शिजवून घ्यावेत . २ शिट्या काढाव्यात. थंड झाल्यावर सालं आणि बिया काढून मिक्सर मधून प्युरी करून घ्यावी. ती वेगळी ठेवावी.
टोमॅटो प्युरी/वाटलेला मसाला
tometo.jpg

४. खाली दिलेला गरम मसाला तेलात थोडा परतून त्याची मिक्सर वर बारीक पूड करावी.
2 1/2 इंच आले , लसूण 15-20 पाकळ्या , 5-६ लवंग , 7-8 मिरी , 2 बडी वेलची, 4 लहान वेलची, दालचिनी १ इंच , 2 लहान चमचा धणे , खसखस 1/2 चमचा

वरील प्रमाणात मी नॉर्मल साईझ च्या चार वाट्या बासमती तांदूळ घेते. अर्धा तास आधी बासमती तांदूळ धुऊन पाण्यात बुडवून ठेवावे. टोमेटो प्युरी , गरम मसाला , कांदे फ्राय करून झाले कि भात कारायला घ्यावा.

५. एका मोठ्या पातेल्यात थोडे तेल तापवून त्यात तमाल पत्र टाकावे . तांदूळ पाण्यातून गाळून घेऊन तेलावर परतावेत . तांदळाच्या चौपट पाणी दुसर्या टोपात उकळायला ठेवावे . पाणी उकळल्यावर तांदळात टाकावे . आच मोठी ठेवावी. मीठ टाकावे. थोड्या वेळाने तांदूळ अर्धा कच्चा शिजला असे वाटले कि गॅस बंद करून मोठ्या चाळणीतून भात गाळून घ्यावा. भात ताटात मोकळा करून ठेवावा .भात लगेच गाळून घ्यावा नाहीतर चिकट होतो
rice.jpg
आता फायनल स्टेप.

६. ज्या टोपात बिर्याणी करायची त्या टोपात प्रथम तूप आणि तेल टाकावे. शक्यतो जाड बुडाचा टोप घ्यावा. नुसत्या तुपातली बिर्याणी अप्रतीम होते .

तेलात 2 मोठी वेलची कुटून , तमाल पत्र, दालचिनी , वाटलेला मसाला, लाल मिरची पूड २ चमचे , मीठ टाकून परतावे . मग त्यात चिकन टाकून परतावे. मग टॉमेटो प्युरी टाकून नीट परतून घ्यावी. चिकन ला सगळा मसाला लागेल अश्या पद्धतीने परतावे. मग फ्राय केलेला कांदा . पुन्हा परतून त्यात एक वाटी कापलेली कोथिम्बीर , एक वाटी पुदिना , आवडी प्रमाणे काजू टाकावेत . आणि नीट मिक्स करून टोप खाली उतरावा. हे सगळे मोठ्या आचेवर करावे.

टोप खाली उतरल्यावर चिकन एकसारखे करून त्यावर अर्धाकच्चा शिजवलेल्या भाताचा थर लावावा . भातावर हवे असल्यास केशराचे पाणी शिंपडावे. थर लावल्यावर अर्धा वाटी पाणी भातावर शिंपडून , कडेने तूप सोडावे .
layers.jpg

टोपावर अ‍ॅल्युमिनिअम फॉईल लावावी . किंवा गव्हाच्या पिठाची पेस्ट लावावी. दोन चमचे पिठात थोडे पाणी घालून पातळ पेस्ट करावी . टोपावर निट बसणारे झाकण लावून टोपाची कडा आणि झाकणाच्या मध्ये जी गॅप असेल तिथे ही पेस्ट भरावी.
गव्हाची पेस्ट
paste0.jpgटोपाला पेस्ट लवल्यावर
paste.jpg

45 मिनिटे मंद गॅस वर अ‍ॅल्युमिनिअम फॉईल लावून टोप ठेवून द्यावा .

बिर्याणी अजून मुरण्यासाठी तवा तापवून त्यावर २० मिनिटे मंद गॅस वर भांडे ठेवावे .

अ‍ॅल्युमिनिअम फॉईल काढून मस्त बिर्याणीचा आस्वाद घ्यावा. Happy

बिर्याणी करणे मला मनापासून आवडते कारण सगळे खूप आवडीने खातात . कुणी जर पहिल्यांदाच बिर्याणी करणार असेल आणि काही अडल्यास मला फोन वरून मार्गदर्शन करायला आवडेल.

याचे कारण . माझी ताई अप्रतीम बिर्याणी करते. तिने मला पहिल्यांदा जेव्हा मला घरी (सासरी ) बिर्याणी करण्यास सांगितले तेव्हा मी हसण्यावर नेले कारण तोपर्यंत मी फक्त खाण्यातच एक्स्पर्ट होते . पण आता मी बर्यापैकी बिर्याणी करण्यामध्ये एक्स्पर्ट झाले आहे, आणि जर मी एक्स्पर्ट झाली आहे तर इतर कुणीही होऊ शकेल .
biryaanee.jpg

वाढणी/प्रमाण: 
६ /७ जणांना व्यवस्थित पुरते.
अधिक टिपा: 

१. कांदा कढईत तळून घेतल्यास बिर्याणी अजून चविष्ट होते पण खूप तूपकट होते. आवडत असल्यास कांदा तळून घेऊ शकता.
२. बिर्याणी आणि भाताचा थर लावताना सगळ्यत खाली बटटायाच्या कापांचा थर लावल्यास खाली करपत नाही आणि यातले बटाटे छान लागतात. पण खूपसा मसाला बटाटयामधे अ‍ॅब्सोर्ब होतो.
३. जाड बुडाचे भांडे नसल्यास १५ मिनिटांनी टोप तव्यावर ठेऊन बिर्याणी शिजवावी.
४. बिर्याणी वाढताना वरतून तळलेला कांदा , तळलेले काजू टाकावे.
५. अश्याच पद्ध्तीने मटण बिर्याणी करावी पण मटण आधी शिजवून घ्यावे.
६. कांदे फ्राय करून फ्रिज मधे ठेवू नका. चव बदलते. फूड प्रोसेसर मधे उभे कापून फ्रिज मधे ठेवल्यास चालेल.

माहितीचा स्रोत: 
माझी ताई (कल्पना)
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामी, तुला कित्ती कित्ती म्हणुन धन्यवाद देउ गं....

कालच केली.. अफलातुन झालेली.... खुपच मस्त झालेली.. मधे थोडा प्रॉब्लेम आलेला, म्हणजे तिखट २ चमचे म्हणजे केव्हडा चमचा वगैरे.. पण तेव्हडं जमवलं अंदाजाने.. Happy

नवर्‍याने स्पेशल थॅन्क्स म्हणायला सांगितलय त्याच्याकडुन.. Happy

सामी
खुपच छान लिहिता तुम्ही - step by step सांगितल्यामुळे क्रुती सोप्पी वाटली आणि करायला हिम्मत आली.

गेल्या आठ्वड्यात केली मी होती - मी brown rice वापरला. तळायचा कांदा सुकवलेला वापरला. छान झाली होती. आता तुमच्या इतकी छान होणे कठीण - माझ्या स्वयंपाक कलेच्या basic limitations आहेत ना Happy

अने सोया चंक्स कितीवेळ भिजवून ठेवलेले? काल चिकन स्टाईल केलेले. टेस्ट डिट्टो आलेली फक्त चंक्स थोडे शिजायला हवे होते असं वाटलं...

सामी, येत्या रविवारी वेज बिर्याणी करायची आहे, तुझ्याच रेसिपीवर मदार आहे माझी. किती वेळ लागेल ग शिजायला?
४५ मिनिटं जास्ती होतील ना?
भात थोडा जास्ती शिजवून घेते, मग २० मिनिटं पुरेत का?

भानुप्रिया, भात जास्त शिजवू नकोस. तो चिकन ला सुटलेल्या पाण्यात आणि वाफेवरच शिजवायला पाहिजे.
लवकर सगळी तयारी केलीस तर ४५ मिनिटे जास्त नाही वाटणार. ऑल दी बेस्ट Happy

me_mastani , निशिगंध धन्यवाद , आजच रिप्लाय बघितला.

सामी, चिकन नाही घालायचंय ना, सगळे शाकाहारी!
त्यातून अधिकाचं जेवण म्हणून येणारेत सगळे घरी.

चिकन नसेल तर शिजायला म्हणून थोडं पाणी लागेल का?

अरे व्वा..
मी बरेचदा करत असते चिकन बिर्याणी .. थोडी वेगळी Wink

सर्वात पहिले चिकन कितीही मुरवल तरी वाफवणं मस्ट.. त्यात टोमॅटो कधीच टाकत नाही..
किलोभर चिकन ला ६ कांदे पुरतात मला.. त्यातले अडिच भाजुन भाजीत टाकायला पेस्ट करण्यासाठी आणि उरलेले तळण्यासाठी..कांदे बारीक कापल्यावर त्यांना चांगल्या टिश्युपेपर मधे घेऊन त्यावर लाटण फिरवायच आणि मग तळून घ्यायचे अथवा सकाळी कापल्यावर थोड उन्ह द्यायच चिवड्याच्या कांद्यांना देतो तस आणि मग ते तळायचे.. पटकन आणि कुरकुरीत तळल्या जातात..भाजी आणि बिर्याणीच भांड वेगळ.. तुपाचा हात लावुन मग तळलेला कांदा, वर भात्,त्यावर भाजी..परत भात, कांदा, भात आणि मग भाजी असे थरावर थर लावते.. त्यांना दाबुन बसवते आणि मग सर्वार वर उरलेला तळलेला कांदा टाकुन ताक घुसळायच्या रई/रवी ने खालपर्यंत छिद्र पाडते.. त्यात मग केशरमिश्रीत दुध टाकते आणि शेवटी ताट ठेउन सील करुन तव्यावर ठेवते .. Happy
चिकन आधीच वाफवून घेतल्याने दम करायला ३०मिनिटं पुरेसे होतात.. चिकन पण छान शिजतं..

हुश्श .. अख्खी एक पाकृ लिहिण्याचा फिल आला मला Lol

काल मी केली, छान झाली होती

फक्त थोडा वेळ जास्त लागला Happy

बायकोला पण आराम मिळाला त्या निमीत्ताने Wink

आभार सामी

कधीपासून निवडक दहा मध्ये टाकली होती . गेल्या शनिवारी मुहुर्त लागला .
आयुश्यात पहिल्यान्दाच मी चिकन बिर्यानी बनवली .
पहिल्या प्रयतनाच्या मानाने मस्तच झाली होती . घरी सगळ्याना आवडली .

फ्रीजमध्ये आलं, कपाटात गरम मसाल्याच सामान शोधण्यापासून सगळी तयारी सकाळीच केली .
बाकीची काम करत करत , सुरवात केल्यापासून दोन तासात बिर्यानीचं सील्ड पातेलं शिजायला गॅसवर चढलं , त्यामुळे फार खटाटोप दिसत असला तरी बिर्यानी खरच झटपट बनते असं म्हणेन मी Happy .

तरी मी थोडी फार गडबड केलीच . "थर लावल्यावर अर्धा वाटी पाणी भातावर शिंपडून , कडेने तूप सोडावे ." हे पातेलं सील केल्यावर वाचलं .
त्यामुळे भात थोडा सुका झाला . जरा पाण्याचा हबका हवा होता असं वाटलं . तिखटाचा अंदाज आला नाही . आणखी एखादा चमचा चाललं असतं .

सामी चार वाट्या तांदूळ म्हण्जे एक किलो का?
मी सातशे ग्रॅ चिकनला ३ वाट्या ( अर्ध्या किलो पेक्शा थोडे जास्त) वापरले . बहुतेक त्यामुळे मसाल्याचे प्रमाण कमी जास्त झाले .

ज्या कोणाला ही बिर्यानी करणं कठिण वाटतयं , त्याना स्वानुभवावरून सांगतेय "go for it!!" .
जर मला जमू शकते तर कोणालाही करता यीईल Happy . आणि सुधारणेला नक्कीच वाव असतो पूढच्यावेळी . पहिला प्रयत्न तरी करा .

सामी फार फार धन्यवाद .

ग़ेल्या शनिवारी मुहुर्त केला बिर्यानी बनवायचा..... लाईफ़ मध्ये पहिल्यान्दाच बनवली.
तूमची रेसीपी सोपी वाटल्याने मी हिम्मत केली.
खुप छान बनली होती. खुप खुप धन्यवाद सामी ...... Happy

या पद्धतीने केलेली बिर्याणी. घरात सर्वांनी चवीने खाल्ली. मी घाईत न वाचता कांदा आधी तळून ठेवला मग तो वरती वापरला आणि थोडा ताजा तळून घातला. धन्यवाद सामी
1F9273B3-3B80-45A4-9A6E-363A5E8C830F.jpeg

जर मला जमू शकते तर कोणालाही करता यीईल> मला पण हेच वाटलेले ग जेव्हा मी पाहिल्यांदा बनवली होती. Happy
टीना, निलुदा, plooma, स्वस्ति, saare_ga_ma_pa, वेका> धन्यवाद.
टीना तुझी पण रेसिपी मस्त आहे. कांदा तळून पण छान होते बिर्याणी.
plooma , वेका बिर्याणी छान दिसतेय.

शाली च्या अल-अझीज मुळे माझा गरीबाचा पण बिर्याणी चा धागा वर आला>>>>>आणि मी काल व्हेज बिर्याणी खाल्ली, अर्थात बाहेरुन मागवुन Happy

Pages