मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद प्रकाश...

"I have measured my life with coffee spoons"
- T.S.Eliot

कालच निशाणी डावा अंगठा वाचून संपवलं. साक्षरता अभियानाच्या नावा खाली चालणार्‍या गोंधळाला विनोदातून वाचकांच्या समोर आणलेलं आहे. आवडलं पुस्तक.

हुडाने पण इकडे तिकडे बघितले असेल एकदम 'धन्यवाद प्रकाश' म्हटल्यावर Happy

हो ना, अगदी. असे फक्त प्रिया पाळन्दे म्हणत असे. त्यामुळे मीही चमकलोच. बट नो प्रॉब्लेम. Happy

***

ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...

(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)

नुकतंच मारूती चितमपल्ली यांचे 'जंगलाचं देणं' वाचलं.पुस्तक त्यांच्या जंगलातील अनूभवांवर बेतलेलं आहे.
त्यातील गांधारी तळ्यावरचा लेख खूपच मस्त आहे.
अजुन कोणाच्या वाचनात आले आहे का हे पुस्तक?

कोणाला माहीत आहे का कि झेल्या हि कथा कोणत्या पुस्तकातील आहे ते?
हा प्रश्न कुठे टाकायचा ते माहीत नसल्याने इथे विचारत आहे

कालच मी राजेश्री वाचले
पण आधी श्रीमानयोगी ची पारायणे झाल्यामुळे हे पुस्तक विषेश असे भावले नाही
पण जर इतर कोणी वाचले असल्यास मला प्रतिक्रिया कळाली तर छान वाटेल

मारुती चितमपल्लींचं हे पुस्तक अजुन वाचलं नाहीय पण त्यांचे आत्मचरित्र चांदणचकवा नुकतंच वाचलं. त्यातही गांधारीच्या तळ्याचे भरपुर उल्लेख आहेत.

चांदणचकवा जंगलातील माहितीच्या दृष्टीने खुप चांगलं आहे, पण बाकी मला थोडं विस्कळीत वाटलं. काही गोष्टींचे उल्लेख परत परत येतात.

त्यात ब-याच ठिकाणी उल्लेखलेली गोष्ट म्हणजे ब-याच वनाधिका-यांना जंगल, झाडे याच्यात काहीच रस नव्हता. ग्रंथालयाच्या अधिका-याला पुस्तकांमध्ये अजिबात रस नव्हता. हे वाचुन खुप वाईट वाटले. आपण उपजीविका आणि आपली एखाद्या विषयातील आवड ह्या दोन गोष्टींचा संबंध आहे, ह्या गोष्टी परस्परपुरक आहेत ह्याकडे पुर्ण दुर्लक्ष करतो. परिस्थितीमुळे ब-याच वेळा असे होत असेल. आवडीच्या विषयामधले शिक्षण आणि पुढे तेच उपजीविकेचे साधन असे भाग्य सगळ्यांनाच लाभत नसेलही. पण निदान जी नोकरी करतोय त्यात विषयात रस घेणे तर आपल्या हातात आहे ना? असो. विषयांतर भरपुर झाले.

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

झेल्या हे व्यक्तीचित्र व्यंकटेश माडगुळकरांचं आहे. बहुतेक "माणदेशी माणसे" त असावं. Happy

धन्यवाद ana_meera

'जंगलाचं देणं' ह्या पुस्तकामध्ये सुद्धा हा विस्कळीतपणा थोड्याफार प्रमाणात जाणवला.
काही पानं त्यांच्या रोजनिशीतील असल्यामुळे असेल कदाचित.
दुसरी गोष्ट जाणवली ती म्हणजे, पुस्तकातली भाषा.विशेषत: जंगलातील परिसराचे वर्णन करताना,भाषा थोडी जड वाटते.पण जंगल,तीथली झाडं,तळी,पशु,पक्षी,त्यांच्याबद्द्लच्या काही चमत्कारीक पण खरया गोष्टि वाचताना एका वेगळ्या जगाची ओळख होत जाते.:)

ह्या महिन्याचा अंतर्नादमध्ये खंदक नावाची अफलातून लघुकथा आलेली आहे. कर्णिक (आद्याक्षरे विसरलो)<<<<< यशवंत कर्णिक.. आजच अंक मिळाला. कथा चांगली आहे.

वैर्‍याची एक रात्र - जी एं नी भाषांतरीत केलेले हे एक पुस्तक अनेक वर्षे आउट ऑफ प्रिन्ट होते. जुन्या माबोवर पुजारिअन्स, रॉबीन वगैरेंच्यात ह्या पुस्तकासंबंधी चर्चा झालेली आठवते. मला हे पुस्तक काल पाथफाइन्डर ह्या पुण्यातील दुकानात मिळाले. गेल्या वर्षीची आवृत्ती आहे. तसेच 'एक अरबी गोष्ट' - शेविंग ऑफ शॅगपट ह्या इंग्रजी पुस्तकाचा जीएंनी केलेला अनुवाद देखील पुन्हा मुद्रीत झालेला आहे. पैलपाखरे ही जीएंनी अनुवाद केलेल्या चार दीर्घकथांच्या संग्रहदेखील मुद्रणात आलेला आहे (हर्मन हेसच्या दोन कथा, ओ हेन्री ची एक आणि द मॅन व्हू डाइड ह्या डीएच लॉरेन्सच्या प्रसिद्ध दीर्घकथा-कादंबरिकांचा अनुवाद)

कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रकाशित केलेले तीन महत्वाचे संकलित कथासंग्रह: गाडगिळांच्या कथा (संकलन-श्रीपु), अरविंद गोखल्यांच्या कथा आणि व्यंकटेश माडगुळकरांच्या कथा (संकलन- अरविंद गोखले): देखील पुनर्मुद्रणात आलेले दिसत आहेत. मराठी नवकथा-लघुकथा प्रांतात ह्या तीन कथाकारांचा फार मोठा ठसा आहे, योगदान आहे. ज्यांन लघुकथेत स्वारस्य आहे त्यांनी हे तीन कथासंग्रह संग्रही ठेवावेत.

'एक अरबी गोष्ट' - शेविंग ऑफ शॅगपट

मी वाचलेय हे पुस्तक. मला नीटसे कळले नाही काहीच. गोष्ट म्हणुन छान आहे. काही उतारेही सुंदर आहेत पण गोष्टीमागची गोष्ट असते ती कळली नाही.

अ‍ॅना बरोबर. झेल्या "माणदेशी माणसं" मधे आहे. मी वाचलय. उदास करुन जातं ते पुस्तक. पण एकदातरी वाचायलाच हवं.

शाम मनोहरांचे 'उत्सुकतेने मी झोपलो' वाचले.जबरदस्त आणि अत्यंत आगळी शैली,कारण लौकिकार्थाने कसलेही 'नाट्य' नसलेल्या घट्ना असतानाही पुस्तक कुठेही रटाळ होत नाही.आशयाच्या बाबतीत तर हे अत्यंत उच्च दर्जाचे पुस्तक आहे कारण ते केवळ तुम्हाला विचार करायला भाग पाडत नाही तर तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती,नातेसंबंध आणी घटना यांच्याकडे पाहण्याचा नवा द्ष्टीकोन,एक नवीन 'फ्रेम ऑफ रेफरन्स' देते.

दादा कोंडकेंचे आत्मचरित्र वाचले काही दिवसांपुर्वी ..बहुधा सोंगाड्या नाव होते.
आठवणी बर्‍याच पण एकान्गी वाटल्या. फार प्रामाणिकपणे लिहिले आहे असे वाटत नाही.

मागे वाचनात ' यथा काष्ठम च काष्ठम च' नावाचे एक प्रवासवर्णन आले होते. लेखिकेचे नाव आठ्वत नाही पण पुस्तक छान होते. आणखी एक होते " विसरु म्हणता विसरेना". दोन्ही पुस्तके छानच होती.
प्रवास वर्णनात मीना प्रभू यान्चे चीनी माती छानच आहे.

रामचंद्र गुहा यांचं 'इंडिया आफ्टर गांधी' गेल्या महिन्यात वाचलं. विस्ताराने लिहिलं असलं तरी लेखनाला ओघ असल्यामुळं बर्‍यापैकी सलग वाचून झालं. ढोबळ घटना तशा जवळपास प्रत्येकालाच माहीत असाव्यात, पण दिलेले संदर्भ आणि किस्से (उदा. पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारयादीत नाव नोंदवताना उ. भारतात अनेक स्त्रियांनी आपलं खरं नाव न देता, 'मुन्नू की माँ' छापाची नावनोंदणी केली होती :)). असं असलं, तरी काही विषयांना (उदा. भाषेवर आधारित राज्यनिर्मिती, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ) अगदीच ओझरता स्पर्श केल्याचं जाणवतं. पुस्तकभर जपलेल्या अलिप्तपणाचा तोल शेवटी शेवटी जरा ढळतो. पण तरीही पुस्तक वाचनीय आहे, यात शंकाच नाही.

पुपुल जयकर, इ. इन्दिरा गांधींच्या जवळच्या माणसानी लिहिलेली पुस्तके वाचनीय आहेत. अर्थात त्यात इन्दिरा गांधींचे समर्थन आणार हे उघड आहेपण तरीही ही माणसे वागताबोलतात कशी हे आणि त्यापेक्षा निर्णय कशी घेतात हे बघणे मनोरंजक असते. इन्दिरांजीवर मला वाटते निक्सनने अमेरिका दौर्‍यात जे प्रेशर आणले होते आणि त्या त्याला ज्या पद्धतीने पुरून उरल्या हे तर फारच अनुभवणीय आहे. आपण बहुतेक आपली मते माध्यमांच्या हितसंबंधी प्रचारला बळी पडून बनवत असतो. या निमित्तने ही माणसे वेगळ्या पद्ध्तीने कळतात. जगमोहनचे काश्मीरचे पुस्तक मला वाटते'धुमसते बर्फ' ही त्यातला एकांगीपणा लक्षात घेऊनही वाचनीयच आहे....

साधना, चकवाचांदणं, सलग पुस्तक म्हणून लिहिलेले नाही. लहानपणाचे संदर्भ हवेत व सलगता हवी म्हणून, आधी लिहिलेल्या स्वतंत्र लेखाना, त्या लेखांची जोड दिलीय.

'इंडिया आफ्टर गांधी' >> नंदन मलाही आवडला तो ग्रंथ. Happy २००७ सालच्या दिवाळी अंकातील १९४७ हा माझा लेख ह्याच पुस्तकावर आधारित होता. बर्‍याच गोष्टी नव्याने समजतात. संयुक्त महाराष्ट्र तर गुंडाळून ठेवली आहे त्यात. पण ते ही बरोबरच म्हणा, कारण लेखकाला महाराष्ट्रीय लोकांचा तेंव्हाच्या भावना कळाल्या नाहीत. मुख्य भर उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश असा वाटला, पण कदाचित ती माझी चुकीही असावी. पण मलाही ते पुस्तक आवडले आहे.
पुपुल जयकरांचे इंदिरा गांधीवरचे लेखण मी वाचले आहे, त्यातला १९७२-३ ते ७८ कालखंड मला आवडला नाही, पेक्षा अरुण साधुंनी एक पुस्तक लिहीले आहे, हे दोन्ही वाचल्यावर बर्‍यापैकी त्यांचा भूमीका स्पष्ट होतात. खास करुन १९७१ च्या युद्धाच्यावेळच्या. त्या पुस्तकाचे नाव विसरलो मी आता. गुगलवर मिळेल कदाचित.

इंदिरा गांधींचे पुपुल जयकर लिखित चरित्र वाचलं होतं... चांगलं आहे पुस्तक...

त्यात इन्दिरा गांधींचे समर्थन आणार हे उघड आहेपण तरीही ही माणसे वागताबोलतात कशी हे आणि त्यापेक्षा निर्णय कशी घेतात हे बघणे मनोरंजक असते. >>>> अगदी Happy

हायला- शिंडी- चौघीजणी आवडलं नाही अशी तू पयली.<<<<<<
नाही, दुसरी. मीही वाचलं. कंटाळवाणं झालं खूपच. सगळे म्हणतायत तर विशिष्ट वयात न वाचल्यामुळेच तसं वाटलं असावं, दुसरं काय.
निशाणी डावा अंगठा- वाचायला घेतलंय पण सुरुवात तरी कंटाळवाणं झालीये. बघू, कधी ग्रीप घेतंय.
गौरी देशपांड्यांची जी काय ४,५ पुस्तकं आत्तापर्यंत वाचलीत त्यातून एकच कळलंय की त्यांच्या नायिका एकदम डॅशिंग असतात. त्या नवर्‍याबरोबर नव्या जागी जातात नी मग त्याच्या मित्रांच्या आकंठ प्रेमात बिमात पडतात. Wink

मला पण चौघीजणी आवडलं नाही. शब्दशः अनुवादाबद्दल सिंड्रेलाला अनुमोदन. मी आधी लिटिल वुमेन वाचलं होतं म्हणूनही असेल कदाचित.

इंदर मल्होत्रा सध्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये चांगले वृत्तपत्र-स्तंभ लिहित आहे, इंदिरा गांधी, घटनेतील दुरुस्त्या, आणिबाणी, संस्थानिकांची सनद (पर्स) रद्द करणे, वित्तीय संस्थांचे राष्ट्रीयीकरण वगैरे वगैरे

http://www.indianexpress.com/columnist/indermalhotra/

पुपुल जयकर पेक्शा katharin frank ने लिहिलेले indira जास्त छान आहे. मी दोन्हीही वाचलेली आहेत.आता तर frank च्या Indira चा मराठी अनुवादपण आला आहे म्हणे.

श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे "कोरडी भिक्षा" हा ललितलेखसंग्रह वाचला. मौज प्रकाशन.
आवडला. काही प्रकरणं खरोखर उत्तम आहेत. पक्षी, प्राणी सृष्टीतले,आणि निसर्गचक्राशी एकरुप जगण्याचे दाखले खल्लास आहेत.
ग्रेटनेसच्या किंचीत(च) कमी पडतो असं माझं वै. मत, कारण घेतलाय त्याहून अजून खोल वैचारीक पातळीवर शोध घेता आला असता असं वाटलं. पण तो मा.बु.दो असण्याची शक्यता आहे. तुम्ही वाचून ठरवा.
पण ललितलेख म्हणजे कुठल्यातरी गुलमोहोराच्या, पदार्थांच्या, एकत्र कुटूंबाच्या किंवा कोकणाच्या किंचीत काव्यात्मक भाषेतल्या गतस्मृती, जोडीला एखाद दोन कवितांची कडवी आणि डायबेटिस ईंड्युसिंग गोड गोड..असाच वर्तमानपत्री समज करुन दिल्या जातो त्याला जबरदस्त उतारा.

या लेखकाच्या "डोह" बद्दल ऐकलय. कोणी वाचलं असेल तर लिहा ना त्याबद्दल.

ज्यांनी डोह वाचलय त्यांना कोरडी भिक्षा वाचून असा प्रश्न पडेल की का अशी भिक्षा मागत आहेत श्रिनिवास कुलकर्णी. 'डोह' मध्ये जी तरलता आहे ती क्वचितच कुठल्या मराठी लघुकथा संग्रहात दिसली असेल.

काल 'निळासावळा' हा जीएंचा पहिला प्रकाशित झालेला कथासंग्रह वाचला. त्यातली पहिलीच कथा 'चंद्रावळ' ही कबूतरबाजीवर आहे. सत्यकथेमध्ये जाने.१९५६ साली प्रकाशित झालेली. सप्टें-१९५६ मध्ये सह्याद्रीमध्ये श्रीदा पानवलकरांची एक कथा छापून आली होती (ही कथा त्यांच्या औदुंबर ह्या कथासंग्रहात सामाविष्ट केलेली आहे). नाव लक्षात नाही पण चंद्रावळ आणि पानवलकरांच्या कथेमध्ये गाभ्यात कणभरचाही फरक नाही. कथाबीज तेच, मुख्य पात्रे जवळपास तीच, कबूतरबाजीची स्पर्धा आणि त्याचा निकाल तोच. एव्हडे प्रचंड साम्य मी आजवर कधीच कुठल्या दोन ताकदीच्या लेखकांच्या कलाकृतीत बघितलेले नाही.

पण ललितलेख म्हणजे कुठल्यातरी गुलमोहोराच्या, पदार्थांच्या, एकत्र कुटूंबाच्या किंवा कोकणाच्या किंचीत काव्यात्मक भाषेतल्या गतस्मृती, जोडीला एखाद दोन कवितांची कडवी आणि डायबेटिस ईंड्युसिंग गोड गोड..असाच वर्तमानपत्री समज करुन दिल्या जातो>>> एकदम सही,
या सर्व घटकांबरोबरच नविन,आधुनिक,शहरी जीवन कसे 'वाईट्ट' आहे,त्यात नैतिकता,मूल्ये,माणूसकी कशी अज्जिबात नाही अशी हुकमी आसवे गाळली की लेख सुपरहिट.(कुणी पंखे असतील तर माफ करा पण अशा लेखनाला मी माझ्यापुरते 'प्रविण दवणे' लि़खाण असे नाव दिले आहे)
'डोह' अत्यंत सुंदर आहे.एका लहान मुलाच्या नजरेतून त्याचे घर,गाव,तिथला निसर्ग,प्राणी-पक्षी,लोक यांचे अत्यंत ह्र्द्य व चित्रदर्शी वर्णन आहे.गावातली माकडे,वटवाघूळे,नदी,त्यातल्या मगरी आपल्याला पात्रे बनून भेटतात.मुख्य म्हणजे ते केवळ वर्णनाच्या पायरीवर न थांबता त्या मुलाची या सर्वांबरोबरची भावनिक गुंतवणूक आणि त्यातूनच त्याची झालेली जडणघडण असा प्रवासही आहे.नॉस्टॅलजिआ नक्कीच आहे पण तो 'मॅटर ऑफ फॅक्ट' असा. तेच सर्व सुंदर होते,आता तसे काहीच नाही असला सुर मात्र नाही.
अजून खोल वैचारीक पातळीवर शोध घेता आला असता >> नक्कीच,तसे 'डोह' बद्द्लही म्हणता येईल.

कुणी पंखे असतील तर माफ करा पण अशा लेखनाला मी माझ्यापुरते 'प्रविण दवणे' लि़खाण असे नाव दिले आहे
>>>
Rofl

Pages