मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुकतच मीना प्रभु यांचे गाथा ईराणी वाचलं. असं वाटलं जणु ईराणमध्ये आहोत. ईराणी लोकांचि आतिथ्यशिलता वाचून बरं वाटलं. एका पूर्णतः अनोख्या देशात एकट्या बाईनं फिरणं .......कुणाचंहि काम नव्हे.
परत हिजाबचा त्रास! खरंच मानलं पहिजे.

जयवंत दळवींचे 'अधांतरी' वाचतेय. खुपच परिणामकारक. वाचल्यावर काही सुचतच नाही. अतर्क्य नी अचाट असं काही घडत नसुनही पुस्तक खाली ठेवावसं वाटत नाही. डोक्यात लगेच विचार सुरु होतात नी आपल्या संकल्पना आपणच पडताळून पाहू लागतो. कथानक खुप लवकर पुढे सरकतं पण कुठेही link तुटत नाही. सावु/अपर्णा चं वागणं अजिबात पटत नाही. कोणी कोणी वाचलय? कसं वाटलं?
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------

रविंद्र पिंगेंचे ललित लेख छान असतात. नुकताच त्यांचा 'बकुळफुले, फुलं मोहाची' हा संग्रह वाचला. भाषेचा फुलोरा चांगला आहे.

माधवी. वाचलय. फारच वरवरचं वाटलं.

दि. बा. मोकाशी यांनी लिहीलेलं 'पालखी' पुस्तक वाचलं. पानशेत धरण फुटून पुण्यात पूर आला त्या वर्षी ते एका दिंडीत सामील होऊन वारीला गेले होते. वारीचा एक त्रयस्थपणे केलेला अभ्यास म्हणावा लागेल.
पुस्तक वाचल्यावर त्याच धर्तीवर आज पुन्हा एकदा कुणी पुस्तक लिहीलं तर कसं असेल असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.. पुन्हा एकदा हेच पुस्तक लिहायला हवं.. भाग २ हवं तर.

एक अधांतरी मराठी सिरियल आलेली.. या पुस्तकावरच काढली होती बहुतेक हो ना? गाथा इराणी, इजिप्तनामा अन तिसर कोणत बर? नाव नाही आठवत. मीना प्रभूंची तिन्ही पुस्तके वर्णनात्मक आहेत, पण वाचावी वाटतात..:)

अ‍ॅना,
अधांतरी सिरियल ही "अधांतरी" या जयवंत दळवींच्या कादंबरीवरूनच घेतली होती.
मीना प्रभूंचं इजिप्तनामा नाही इजिप्तायन.

मीना प्रभुंचे तुर्कनामा आहे...अजुन एक लंडन वर आणि चीन वर 'चिनी माती' कि काय ही आहे...

लंडन वरचे ' माझे लंडन' आहे बहुतेक!
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------

" अभ्यास कसा/ असा करावा? " मनोविकास प्रकाशन, लेखकः पु.ग.वैद्य. किंमत : सवलत १०% वगळता रु. १२५/-

ज्या ज्या पालकांना आपल्या पाल्यांचे अभ्यास घ्यावेसे वाटतात, घ्यावे लागतात, पाल्ये कमितकमी इयत्तेत असतांनाच त्यांना अभ्यासाची गोडी लागावी व त्यांनी " स्व--अध्यायाकडे" प्रेरित व्हावे असे मनोमन वाटते व त्यांना त्या वाटेकडेच वळण लावावेसे वाटते, पाल्यांनी एक "योजना-बद्ध" / "स्ट्रक्चर्ड पद्धतीने " जगातला कोणताही विषय समजून घ्यावे असे वाटते, पाल्यांची 'स्व--अध्यायना' च्या वाटचालीतले टप्पे / माइलस्टोन्स समजून त्यांची प्रगती मोजाविशी वाटते अशा सर्व पालकांसाठी खूप खूप उपयुक्त पुस्तक.

गंमत म्हणजे माझ्यावर अशी "पाळी" नसतांना देखील मी हे पुस्तक संपुर्ण वाचलं. अनेकांना अनाहूत सल्ला दिला, त्याचा त्यांना " एक निश्चीत दिशा लाभल्याचा " फायदाही झाल्याचं ऐकून मनोमन सात्विक समाधान पण झालं.

आपली उर्जा व अमुल्य वेळ घेतल्याबद्दल अनेक धन्यवाद

" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.
वायफळ लिहीण्यापेक्षा, इथे २ शब्द इतरांना सहाय्यक ठरू शकतात.
१. http://www.maayboli.com/node/8639
२. http://www.maayboli.com/node/8628

भारतात जायच्या आधी तेरुओ आणि काही दूरपर्यंत वाचलं. शुद्ध आचरटपणा आहेत दोन्ही कथा. तेरुओमधे नायिका तिच्या नवर्‍याच्या जपानी सहकार्‍याच्या प्रेमात पडते. तशी तिला प्रेमात पडायची सवय आहे म्हणे. एखादी व्यक्ती, तिचे गुणावगुण मनापासून आवडणे ह्याला प्रेमात पडणे म्हणत असतील तर ठिकाय. पण उगीच नवरा भला आहे, काही म्हणत नाही म्हणुन काहीतरी थातुरमातुर सिद्धांत मांडुन हे प्रेम शारिरीक पातळीवर नेणे म्हणजे गौरी देशपांडेच्याच भाषेत अनैतिकता "ग्रँड" करणे वाटते. तिच्या थांग/मुक्काममधेही विवाहबाह्य प्रेमप्रकरण आहे. पण तेथे नवर्‍याकडुन मिळणारी अपमानास्पद वागणुक, अपंग मुलीचा मृत्यु यांनी होरपळलेली कालिंदी इयन/दिमित्रीच्या हळुवार प्रेमाच्या मोहात पडली/भाळली हे एकवेळ समजू शकते. (तिथेही इयन/दिमित्री दोघे का ?) पण तेरुओमधे मात्र ह्या बाईंना घरकाम, वाचन-बिचन झाल्यावर वेळ घालवण्यासाठी प्रेमात पडायचा छंद आहे की काय असे वाटते. उगी कोण नवर्‍याच्या सहकार्‍याचे तळवे छान आहेत म्हणुन त्याच्या प्रेमात पडेल ? वर मी कशी इतर बायकांपेक्षा वेगळी अशा टिमक्या. मला तरी अजिबातच नाही समजले.

काही दूरपर्यंत देखील असाच काहीसा प्रकार आहे. बालीश, लाडाकोडात वाढलेली नायिका एका देखण्या (ते काय ओठांना मुरड्-बिरड पाडुन हसणार्‍या) राजकारण्याच्या प्रेमात पडते आणि शिर्षकात दर्शविले आहे तसे काही दूरपर्यंत जाऊन परत फिरते. त्या परत फिरण्यातही भोवतालची परिस्थिती अधिक कारणीभूत आहे, तिला स्वतःला काही धडा मिळाला, ह्यातनं काही शिकली असे काही येतच नाही. अजून पितृतुल्य अशा एका व्यक्तीरेखेबरोबर प्रेमाचा एक कोनही आहे. असो, पुस्तक उपलब्ध करुन दिल्याबद्दल पन्ना आणि सायोस धन्यवाद Happy

भारतात असताना मेघना पेठेंचं "अंधळ्याच्या गायी" आणि राही बर्वेचा एक कथासंग्रह वाचला. "अंधळ्याच्या.." मधील कथा वाचून (वर म्हंटल्याप्रमाणे) भयंकर उदास वाटतं. राही बर्वेच्या पुस्तकातील पहिली आजीविषयी जी कथा आहे ती वाचताना "गावशीव" आठवली Happy बाकी सर्व कथा मानवी आयुष्यातील अतिशय भकास, बकाल बाजूंवर आहेत. अगदी वाचवत नाहीत. मी तरी २-३ कथा पुर्ण वाचल्याच नाहीत Sad

सिंडे Happy तेरुओ बद्दल सहमत ! मी बर्‍याच पूर्वी वाचलंय ते पुस्तक , आता डीटेल्स आठवत नव्हते पण झेपले नव्हते मलाही अज्जिबात!

तेरुओ मी ही खूप दिवसापूर्वी वाचले होते. तेव्हाही मला ते फार बरे वाटले नव्ह्ते. पण तो काळ लेखिकानी ब.ण्ड करण्याचा होता. केवळ एक चूष म्हणून सनसनाटी असं काही विवाहबाह्य संबंधाबद्दल लिहून प्रसिद्धी मिळवण्याचा तो काळ होता. नवेपणा म्हणून फॉरीनची पात्रे. आता दोन्हीही बाबी चे नावीन्य राहिले नाही. बाकी कथानकातही फारशी तरलता नाहीच आहे. मध्यंतरी स्वत्:लाच तपासून पहाण्यासाठी पुनः तेरुओ वाचण्याचा प्रयत्न केला. अक्षरशः प्रयत्न करावा लागला. शेवटी पाच दहा पानानन्तर सोडून दिला. स्त्रीमुक्ती वाल्यानी गौरी देशपांडेंच्या लेखनातही 'पंथ ' तयार केला अन त्या भक्तगणात त्या लोकप्रिय आहेत...

रॉबिन अगदी बरोब्बर. मलाही नाही आवडल्या त्या कथा पण रॉबिन म्हणतो तसं तो त्या काळाचा महिमा होता. कदाचित त्या वेळी ते आवश्यकही होतं. तेव्हा गौरीने आणि इतरांनी ते लिहायचं धाडस केलं म्हणून आज कुणाला काही वाटत नाही ह्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलो. स्त्रियांना असे त्यांचे विचार व्यक्त करायचं किंवा त्यांच्या मनासारखं वागायचं स्वातंत्र्य मिळालं. ते बरोबर कि चूक हा मुद्दा वेगळा.

सिंडे, थांग्/दुस्तर हा घाट बद्द्ल दुमत.

सिंड्रेला, थांग-दुस्तर हा घाट बद्दल मी सहमत आहे.

गौरी देशपांडेची लेखनशैली मला आवडते आणि तिची वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळा विचार करणारी पात्र रंगवायची हातोटी सुद्धा. पण तिची सगळी पात्रे बहुधा विवाहबाह्य संबंधात अडकलेली दिसतात.
उदा. थांग मधला वनमाळी. उच्चशिक्षीत, देखणा, कमावता इ. बायकोवर, म्हणजे नमूवर जिवापाड प्रेम करत असतो. पण त्याला तर विवाहबाह्य संबंधात काही चूकही वाटताना दाखवलं नाहीये.
????
काळ कुठलाही असो, किंवा असे संबंध वास्तवात असतात हे जरी लक्षात घेतलं तरी त्याच लेखिकेच्या वेगवेगळ्या कथा/कादंबर्‍यातून होणारी रीपीटीशन खटकली मला.

खूप चर्चा वाचून मी ही लायब्ररीतून आणून 'एकटा जीव..' वाचलं.

तशी आत्मचरित्रं मी बर्‍यापैकी वाचली आहेत, पण हे पुस्तक म्हणजे काही दादा कोंडके यांचं आत्मचरित्र वाटत नाही. ह्या पुस्तकातल्या घटना वाचताना त्या सिनेजगतातल्या त्यांच्या कारकिर्दीतल्या गमती जमती माफ करा; पण मोअरओव्हर भानगडीच जास्त वाटल्या. (मला शोभा डे च्या सिलेक्टिव्ह मेमरी या पुस्तकाची अगदी राहून राहून आठवण झाली हे पुस्तक वाचताना)

अर्थात त्या काळच्या मराठी सिनेमाच्या एकूण सामान्य मराठी माणसाच्या बुद्धिमत्तेच्या मर्यादा लक्षात घेतल्या तर पुस्तक ज्या पद्धतीने लिहीलंय ते ठिक वाटतं. पण इतर दिग्गजांची आत्मचरित्रं वाचून मग हे वाचलं की मात्र अरेरे! हेच उद्गार बाहेर पडतील.

दादा कोंडके यांचं शिक्षण आणि त्यांचं अप्-ब्रिंगिंग त्याप्रकारे झालं त्या मानाने त्यांनी गाठलेला पल्ला पाहीला तर तो खूप मोठा होता. मिळालेल्या एक्पोजरचं योग्य चिज झालं असं त्यांच्या बाबतीत वाटत नाही.
एकूण पुस्तक फार 'मनोरंजक' Proud आहे. पुस्तकाच्या पान संख्येच्या मानाने कंटेंट अज्जिबात नाही.
भाषा सोप्पी असल्याने पटकन वाचून होतं. एकदा वाचन्याजोगं आहे.

>>काळ कुठलाही असो, किंवा असे संबंध वास्तवात असतात हे जरी लक्षात घेतलं तरी त्याच लेखिकेच्या वेगवेगळ्या कथा/कादंबर्‍यातून होणारी रीपीटीशन खटकली मला. >> भाग्या १००% सहमत.

सिंडी- तेरुओ बद्दल सहमत. तेरुओ एक प्रतीक आहे. तो काळ रॉबिन म्हणतात तसा.
लग्नसंस्थेच्या मर्यादा, त्यातील घुसमट, परिपूर्ण वगैरे प्रेम आणि त्याचा शोध (शारीरीक पातळीवरही) ह्या स्त्रीवादी दृष्टीकोनातून देशपांड्यांनी मांडल्या. मुळात शहरी स्त्रियांच्या जाणिवा मांडल्या गेल्या.
गरीब बिचारी पिचलेली, खस्ता वगैरे खाणारी सोशीक स्त्री, किंवा जिचे अंगोपांगीच्या वर्णनावर अनेक कागदांची रिळं भरून कविता लिहील्या गेल्या- त्या साहित्यात किलोने दिसतात.
अन्यायापासून मुक्ति वगैरे तरी लोकांच्या पचनी पडते. पण मुक्तिसाठीची मुक्ती, आणि स्वातंत्र्याची चुकवावी लागणारी किंमत हाही विचार त्यांच्या लेखनात दिसतो.
काहींच्या मते त्या elitist लेखिका आहेत. त्यांनी रंगवलेल्या स्त्रियांना भाकरीबिकरीचे प्रश्न नसतात. फक्त नात्यांच्या अर्थाचे शोध घेत बसायचे. असेनात का? असे लेखन असुच नये का?
तेरुओ च्या जागी कुमिको असती आणि एखाद्या पुरुषानी लिहीलं असतं तर muse, स्फुर्तीदात्री, हुच्च प्रेमाचा शोध वगैरे म्हणून गौरवलंही गेलंही असतं कदाचीत.
नैतिकता करकचून आवळली की अनैतिकतेच्या गाठी सैल होतात- Repression vents itself out.
ह्या संदर्भात चिनुक्सनी पोस्ट केलेले सुलभाताईंचे विचार महत्वाचे- ""मी तशी नाही, पण मी त्या व्यक्तिरेखेला समजू शकते.""
मिनूनी म्हणलय तसं-विद्रोहासाठी विद्रोहही ही एक अपरिहार्य पायरी.

मी अनंत मनोहरांचा फॅन आहे. त्यांच्या सर्व कादंबर्‍या व कथा सुपर्ब (फिनिक्स...त्या नदीच्या पार वेड्या...आवर्जून वाचण्याजोगे)
सांप्रत मनात घुसलेले पुस्तक म्हणजे
'डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे... नाही चीरा नाही पणती...'
लेखिका - वीणा गवाणकर (त्यांचे 'एक होता कार्व्हर'ही प्रसिद्ध आहे)
राजहंस प्रकाशन, पुणे

विकास स्वरूप यांचे Q & A (Slumgdog Millionaire) वाचले. चित्रपटापेक्षा खूप छान आहे. चित्रपटाला Oscars मिळाले आहेत, त्या बद्दल काही लिहित नाही. पण प्रश्न पडतो कि यापेक्षा चांगले चित्रपट पाठवले त्यावेळी का मिळाले नाही?

महेश एलकुंचवारांचे 'मौनराग' वाचतो आहे,अत्यंत वेगळा आणी जबरदस्त ललित लेख संग्रह आहे.शैली,विषय सगळेच निराळे.विशेषतः ललित लेखांबद्द्लचे त्यांचे चिंतन प्रत्येक नव्या,जुन्या वा बनचुक्या लेखकाने जरुर वाचावे.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

"उदकाचिये आर्ती" हे मिलिन्द बोकिलांचे पुस्तक वाचत आहे. सामाजिक कामासाठी झोकून दिलेल्या माणसांची पात्रे आणी त्यांचे गुणदोष इतके छान मांडले आहेत की आपण यांना कुठेतरी भेटलोय असेच वाटत राहते. फारच छान.

मीना प्रभूंचे रोमराज्य वाचतोय....

कालच रमेश इंगळे-उत्रादकर यांचे 'निशाणी - डावा अंगठा ' वाचले. भयानक अनुभव.

साक्षरता अभियानाचा राज्यात कसा बोजवारा उडाला आणि तरीही कागदोपत्री अभियान यशस्वी झाले आणि त्यातल्या यशस्वी कलाकारांना अगदी राष्ट्रपातळीवरही बक्षिसे मिळाली त्याचे भेदक चित्रण यात आहे. लेखक स्वतः प्राथमिक शिक्षक असल्यामुळे अनुभव अगदी जिवंत आहेत. विनोद, विसंगती, उपहासाने पुस्तक भरलेले आहे, प्रसंग वाचुन हसायलाही येते आणि त्याचबरोबर त्यात अडकलेल्या शिक्षकांची करुणा येते. साक्षरता अभियानामुळे निरक्षर काही साक्षर होणार नाहीत पण ज्यांना साक्षर व्हायचेय ती शाळेतली मुले मात्र कायमची निरक्षर राहणार हे अगदी पटते पुस्तक वाचल्यावर.

ह्या अभियानाबद्दल वाचताना सध्या सुरू असलेल्या सर्व शिक्षण अभियानाची आठवण झाली. देवाला ठाऊक त्यात किती शिक्षक पिळले जात असतील...

(साक्षरता अभियान सुरू असताना एकदा 'सिंधुदुर्ग जिल्हा पुर्ण साक्षर' अशी बातमी वाचली. माझ्या दोन्ही आज्या सिंधुदुर्गात राहणा-या. पुर्ण जिल्हा साक्षर म्हणजे त्या दोघीसुध्धा साक्षर झाल्या की काय?? मला राहवेना. मी लगेच घरी फोन लाऊन आजीला विचारले. ती म्हणाली, शिकवणा-या बाईने मला माझी सही करायला शिकवले. जी स्वतःची सही करेल ती साक्षर. मी डोक्याला हात लावला Happy आजीने शिकवताना सही केली तेवढीच. परत तिचा पेनाशी संबंध आलाच नाही. )

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

माफ करा थोड विषयांतर होतेय .
'सिंधुदुर्ग जिल्हा पुर्ण साक्षर' अशी बातमी वाचली. >>>>>
१०० % साक्षरता ही शक्य नसते. वयोवृध्द माणसे आणि काही कारणांमुळे जेव्हा ९४ % लोक साक्षर होतात. तेव्हा १०० % साक्षरता झाली असे मानले जाते. जिल्हायाचे साक्षरतेचे प्रमाण याच निकषाने पुर्ण केले आहे.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

अहो मला हे माहित नव्हतं ना... Happy

तुम्हालाही अनुभव आहे वाटते साक्षरता अभियानाचा... Happy Happy

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

१५ वर्षांपुर्वी जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याने १०० % साक्षरतेचे उद्दीष्ट्य पार केले म्हणुन एका IIT प्रमाणित संस्थेने जाहीर केले होते तेव्हा मी Curiosity ने चौकशी केली होती. कारण आमचे आजोबा तेव्हाही निरक्षरच होते. Happy
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

श्री ना पेंडसे - माणूस आणि लेखक
श्रींनांनी वामन नावाच्या एका मित्राला कल्पून तृतीय पुरुषी निवेदन शैलीत लिहिलेले आत्मचरित्र आहे. श्रीनांच्या कादंबरी-लेखन-साहित्य ह्यावरील विचार-विवेचन म्हणावे तेव्हडे येत नाही. त्यांनी वैयक्तिक आयुष्यात जे काही घडले वगैरे बैजवार लिहिले आहे. आत्मस्तुती-टिका - दोन्ही आहे. मला तरी खासे आवडले नाही.

रात्र काळी घागळ काळी - खानोलकर विचित्र लिहितात. एखादी कादंबरी वाचून संपूर्ण संभ्रमित होण्याचा अनुभव घेतला. कवितेसारखी हळु हळु ही झिरपत जाईल असे दिसते. कधी पूर्ण उलगडली तर सविस्तर लिहीन.

घाशीराम, सखाराम आणि शांतता - तिन्ही नाटके एका पाठोपाठ वाचून काढली (एका माबोकराचे आभार). घाशीराम वाचतानाच कळले की हे बघण्याचे नाटक. सखाराम नाही आवडले. विषय चांगलाच आहे. मांडला देखील चांगला आहे. पण नाटकाच्या मर्यांदामुळे (वेळ-व्याप्ती) खूप बंधने आली आहेत लिखाणावर असे वाटले. मी कादंबरीप्रिय माणूस असल्याने ह्यावर एक दीर्घकथा वा कादंबरी कशी झाली असती असा विचार मनात येउन गेला.

शांतता मात्र सुरेख. विषय, मांडणी सगळेच छान. समाजाची मानसिकता हा माणूस (तेंडूलकर) अचूक ओळखत होता. शांतता एका कुठल्या कालाशी निगडीत नसलेले नाटक. अशी साहित्यकृती लिहिण्यास फार औकात लागते.

ह्या महिन्याचा अंतर्नादमध्ये खंदक नावाची अफलातून लघुकथा आलेली आहे. कर्णिक (आद्याक्षरे विसरलो) नावाच्या गृहस्थांनी लिहिलेली ६२च्या युद्धाच्या पार्श्वभुमीवरील कथा आहे (हे गृहस्थ ४२-४४ दुसर्‍या महायुद्धात भारतीय वायुसेवेत होते. पुढे विविध सरकारी खात्यात काम करण्याचा अनुभव). ह्याच अंकात भानु काळ्यांचा समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणुन केलेले संपूर्ण भाषण छापलेले आहे. वाचनीय आहे. विषय आहे: जागतिकीकरण आणि समरसता. तसेच पं. अरविंद गजेंद्रगडकरांनी लहानपणी-तरुणपणी फुकटात ऐकलेल्या मैफिली व त्या फुकटात ऐकण्यासाठी केलेल्या खटपटी-लटपटींवर एक खुसखुशीत लेख लिहिला आहे.

Pages