वेदाध्ययनातील- संथा देणे... अर्थात वेदाभ्यास शिक्षण/पाठांतर पद्धती.

Submitted by अत्रुप्त आत्मा on 25 March, 2015 - 08:42

खुलासा:- वेदपाठशाळांमधे प्राचीन काळापासून अध्ययन/अध्यापनाची एकच एक अशी, परंपरागत पद्धती रहात आलेली आहे. ही पद्धती फक्त पाठ करून ठेवण्याच्या विषयाकरिताच निर्माण झालेली आहे. हिला सामन्यतः मौखिकी अध्यापन पद्धती असे म्हटले जाते. ह्या पद्धती विषयी खूप जणांच्या मनात कुतुहल,आस्था,चिकित्साभाव इत्यादी असते. आंम्हा पुरोहित मंडळीना काम करत असताना,पाठांतर पाहुन ह्या अनुषंगानी काहि प्रश्नंही विचारले जात असतात. अश्या सर्व प्रश्नकर्त्यांना हा विषय नीट माहिती व्हावा,एव्हढ्याच हेतूने हा सदर लेख येथे देत आहे.

@संथा देणे म्हणजे काय? >> संथा देणे म्हणजे ,वेदपाठ शिकविणारे गुरुजी , समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचे छोटे तुकडे(चरण)पाडून ,वदवून आपल्या मागे घोकायला/म्हणायला सांगतात..याला प्राथमिक अर्थानी संथा-देणे असे म्हटले जाते. यापुढे...(विद्यार्थ्यांनी)संपूर्ण पाठांतर करण्याच्या विशिष्ट पद्धतीला, संथा घालणे अगर संथा म्हणणे ..असे म्हटले जाते. एखादा विषय/याज्ञिकातला प्रयोग/संहितेचा अध्याय (तोंड)पाठ करताना, संथा म्हणण्याचे ४ ट्प्पे असतात.
१) चरणाची संथा(४वेळा) २) अर्धनीची संथा(४वेळा) ३) ऋचेची संथा(४वेळा) ४) गुंडिकेची संथा(४वेळा) = एकंदर १६ संथा.

१)चरणाची संथा:- चरणाच्या संथेत, गुरुजिं..प्रथम समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचा एकेक चरण दोनदा सांगतात.. मग विद्यार्थ्यांनी पोथित बघून तो त्यांच्या मागून ७वेळा घोकायचा. यात म्हणताना चूक झाली,की पुन्हा सुरवात. यात शुद्धअक्षर,जोडाक्षर,त्याचे गुरुत्व,अनुस्वारांचे उच्चार,स्वराघात,र्‍हस्व आणि दीर्घ/प्रदीर्घ-अश्या काना ,मात्रा,वेलांट्या,उकार, विसर्ग आणि त्यांचे तसेच उच्चार ,हे शंभर टक्के शुद्ध होत आहेत की नाहीत? हे गुरुजी कसून तपासत असतात. (कारण एकदा अशुद्ध पाठ झालं..की ती (मेंदूत उमटलेली) प्रींटाऊट,नंतर पुसणं कर्मकठीण असतं.) तर..हे स्तोत्रातले पाडलेले एकेक चरण ७ वेळा घोकत संपूर्ण अध्याय वा स्तोत्र - पूर्ण केलं जातं... ही झाली "चरणाची" पहिली संथा. अश्या चार संथा झाल्या की 'चरण' पूर्ण होतो. ही सगळी संथा गुरुजिंसमक्ष होते. (कारण तेच-मंत्रात अजिबात अशुद्धी राहू नये.)

२)अर्धनीची संथा:- अर्धनीच्या संथेत ,सामान्यतः दोन चरण एकत्र घेऊन..किंवा मंत्राची अर्धी ओळ सात वेळा म्हटली जाते. (काहि वेळा जगतिच्छंदा सारखा,मंत्राचा लांबलचक छंद असेल,तर एका ओळीत ४/४ किंवा अगदी ६/६ चरणंही पाडावे लागतात) आधी चरण डोक्यात-बसलेला असतोच..त्यामुळे इथपासून गुरुजी समोर नसले,तरी चालते. तर.. ही...एकामागून एक ओळ पूर्ण ७ वेळा घोकत ...संपूर्ण अध्याय पूर्ण केला... की अर्धनीची १ संथा झाली...आता अश्याच पुढे अजुन ३ संथा म्हणायच्या..म्हणजे या अर्धनीच्या चार संथा होतात.

३)ऋचेची संथा:- ऋचेच्या संथेत..मागील अर्ध्या ओळीच्या संथेचा पुढचा भाग सुरु होतो..म्हणजे आता २ ओळिंची संपूर्ण ऋचा ,आणि पुढच्या ऋचेचा पहिला चरण(धरुन) ..,तसे ७ वेळा म्हणायचे. यातील पुढच्या ऋचेचा पहिला चरण त्यात घेण्याचे वैशिष्ठ्य असे..की यामुळे संपूर्ण अध्यायातल्या प्रत्येक पहिल्या ऋचेची-दुसर्‍या ऋचेशी गुंफण तयार होते. (कनेक्टींग होते.) ऋचे'तल्या या (पहिल्या)संथेवर,शिकविणार्‍या गुरुजिंचे बारीक लक्ष असते. (कारण तेचः- अशुद्धी आली कींवा मधे कुठे तयार झालेली आहे काय? हे पहाणे.) ह्या ऋचेच्या परत पुढे तीन संथा म्हणायच्या. म्हणजे या ऋचेच्याही एकंदर चार संथा पूर्ण होतात.

४) गुंडीकेची संथा:-..हा शेवटचा, परंतू अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. आता मागील ऋचेच्या संथेनी हीचेच निम्मे काम केलेले असते. पण तरिही.., आता कितीही पाठ येत असले..तरी(यातल्या पहिल्या संथेला) पोथीत पाहूनच..सदर पाठांतराच्या अध्यायाचा एकेक अनुवाक अथवा वर्ग (पॅरेग्राफ) ७/७ वेळा म्हणायचा असतो. आणि तो सगळा अध्याय पूर्ण करायचा असतो. ही झाली गुंडिकेची पहिली संथा.. अश्या अजुन तीन म्हणून ,ह्या गुंडिकेच्या चार संथा पूर्ण करायच्या. या गुंडिकेच्या संथेमधे, साधारणपणे दुसर्‍या किंवा तिसर्‍या संथेपासून ,(आता) विद्यार्थ्याची..इच्छा अगर तयारी-नसली तरी विद्यार्थ्यांनी पोथित न पहाताच ,मान वर करुन संथा म्हणायची असते. कारण त्याशिवाय-पाठ येणे..ही क्रीयाच आकाराला येऊ शकत नाही. अर्थात कोणत्याही सर्व सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याला यातल्या शेवटच्या २ संथांमधे सर्वकाहि बिनचूक तोंडपाठ-येतेच. पण त्याहून(बुद्धिनी) आगे/मागे जे असतील..त्यांना कमी अगर जास्त कष्ट घ्यावे लागतात. तर,अश्या ह्या एकंदर १६ संथा घातल्या की आपल्याला अपेक्षित असलेला पाठांतराचा विषय-तयार होतो.

आता आपण याचे-संकलित..,एका स्तोत्रपाठांतराच्या उदाहरणाद्वारे पाहुया. (हे आणखि डिटेलिंग,विशिष्ट हेतूनी आणि जाणिवपूर्वक करत आहे.)

चरणाची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं,(७वेळा) गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा)
भक्तावासं स्मरेन्नित्यं, (७वेळा)आयुःकामार्थसिद्धये॥(७वेळा)

प्रथमं वक्रतुण्डं च,(७वेळा) एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा)

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं,(७वेळा)गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा).....
असेच प्रत्येक चरण म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे चरणाची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की चरणाची मुख्य संथा पूर्ण होते.

अर्धनिची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा)
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥(७वेळा) ॥

प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा)

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा).....
अशीच प्रत्येक अर्धनि/अर्धी ओळ म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे अर्धनिची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की अर्धनिची मुख्य संथा पूर्ण होते.

ऋचेची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥..प्रथमं वक्रतुण्डं च(७वेळा)

प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ लम्बोदरं पञ्चमं च(७वेळा).....
अशीच प्रत्येक ऋचा ,पुढल्या ऋचेचा पहिला चरण तिच्यात लावुन म्हणत स्तोत्र एकेक ऋचेनी म्हणत पूर्ण घोकायचे असते..मग येथे ऋचेची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की ऋचेची मुख्य संथा पूर्ण होते.

गुंडिकेची म्हणायची संथा:-
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥ (सुरवात ते शेवट -७वेळा..)
.....असेच सुरवात ते शेवट -७वेळा.. म्हटले,की मग येथे गुंडिकेची एक संथा पूर्ण होते.अश्याच प्रकारे अजुन तिन संथा म्हटल्या,की गुंडिकेची मुख्य संथा पूर्ण होते.

आता आपल्याला आवश्यमेव असा एक प्रश्न पडेल,की "(बुद्धिचा..)इतका बारीक किस पाडून, ही पाठांतर पद्धती तयार होण्या/करण्यामागचे प्रयोजन काय बरे असावे???" Happy

उत्तरः- ज्या काळात ही पद्धती आली/विकसीत झाली.तो काळ लेखनकलेची सुरवातहि न झालेला असा काळ होता. अश्या वेळी आपल्या जिवापाड जपाव्याश्या वाटणार्‍या गोष्टींपैकी, ही मंत्र /काव्य/स्तोत्र जतनाची एक गोष्ट होती. आणि याशिवायंही ,पुढे लेखनकला विकसीत झाल्यावर..जो विषय वारंवार म्हणावा,वापरावा लागणार आहे..त्यासाठी भल्यामोठ्ठ्या पोथ्यांची बाडे बरोबर घेऊन हिंडणे.हे ऋषीमुनिंपासून ते सामन्यजनांपर्यंत सर्वांनाच त्याकाळी सोपे नव्हते. त्याशिवाय पोथ्या पाण्यानि/आगिमुळे,वाळवी/कसर लागण्यापुळे खराब होणे अशिही कारणे होतिच. आणखि म्हणजे, परस्पर विरोधीमतांच्या गटांनी एकमेकाचे लिखित स्वरुपातिल वांङगमय नष्ट करणे,हे ही एक प्रबळ कारण त्याकाळी होतेच...या अश्या सर्व कारणांसाठी हे ज्ञान मुखोद्गत-पाठ ठेवावे लागले असेल.(आमच्याकडला अचुक शब्द म्हणजे-जिवंत ठेवावे लागले असेल.) आणि विशेषतः जर ते जसे च्या तसे पाठ ठेवावे लागले असेल,तर त्याला अशीच तंतोतंत शब्दपाठांतराची पद्धती असायला हवी होती. आणि म्हणुन तसे जर का एकदा पाठ झाले,आणि त्याच्या वारंवार आवृत्या* म्हणुन पाठ ठेवलेही गेले, तर वरिल कारणांनी येणारे नष्टतेचे भय बाळगावे लागत नाही, हे तर निश्चित आहे. (आज आपण हे आपल्याला हव्या त्या सर्व विषयांसाठि, हजारो प्रकारच्या रेकॉर्डिंगच्या साधनांनि करतच असतो. Happy )

आता जसेच्या तसे...म्हणजे काय हो नक्की? तर खाली दिलेले हे गणपतिस्तोत्र पहात पहात ह्या लिंकवर http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3 जाऊन हे क्लिपिंग ऐका. जेणेकरुन ह्या पद्धतिनी पाठ केले असता,जसेच्या तसे मेंदुत उमटते..म्हणजे काय होते? ते कळणे सहज होइल Happy
(गायकबियक कुणी नाही.. मीच आमच्या(उच्चार)पद्धतिनी म्हटलेलं आहे हां! Wink )
http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥

.........................................................................................................................

आवृत्ति*:- हा वेदाध्ययनातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. एकदा पाठ झालेला विषय/अध्याय..किमान २ वर्ष तरी दररोज १ आवृत्ती म्हणून जिवंत-ठेवावा लागतो. नाहितर आमच्याकडल्या प्रसिद्ध म्हणी प्रमाणे..तो नवव्या दिवशी नवा-होतो. म्हणजे अक्षरशः पुन्हा संथा-घेऊन शिकण्याच्या पातळीवर येतो. आणि असंही हे सोपं काम नसतच. नुसती ऋग्वेदाची संहिता घेतली..तरी त्यात आठ अष्टके..म्हणजे ६४ अध्याय आहेत. अध्ययन सुरु झाल्यापासून जसजसे पाठांतर वाढत जाइल..तसतसा हा आवृतीचा काळ वाढत जातो. आणि दर दोन वर्षानी समांतर होत रहातो. मग पुढे ब्राम्हण/आरण्यक्/उपनिषदे/शिक्षाचतुष्टय/ज्योतिष(फलज्योतिषवालं नव्हे!)/शास्त्र/निरुक्त असे अनेक ग्रंथोपग्रंथ पचवत, जिवंत ठेवत, अध्ययन करावे लागते..एका वेदाच्या दशग्रंथांच्या अध्ययनाला पहिल्या वर्षाला ६ तास.. इथून सुरवात होऊन..शेवटच्या वर्षाला हा शिक्षण कालावधी १६ ते १८ तासांपर्यंत जाऊन बसतो. म्हणूनच ऋग्वेदाचे दशग्रंथ पूर्ण कंठस्थ (पाठ) होण्याचा कालावधी किमान १२ वर्षे आहे.

पाठांतरातील अग्निदिव्य :- संचार जाणे .. संचार.., हा पाठांतराच्या वाटेतला अटळ सहप्रवासी आहे. आता संचार म्हणजे काय? तर एकसमान किंवा तोच तोच.. शब्द वा मंत्र ,संपूर्ण अध्ययनाच्या विषयांमधे कुठेही वारंवार येणे.. यामुळे काय होते? तर ..एका महारस्त्यावर जवळ जवळ सारखी नावं असलेले दोन फाटे असतील..तर नामसाधर्म्याच्या गोंधळामुळे, माणूस जसा या ऐवजी त्या गावात पोहोचावा. तसे काहिसे, हे सारखे-मंत्र अथवा शब्द करीत असतात. ऋग्वेदाच्या नुसत्या संहितेमधे असे हजारो संचार आहेत. नुसतं त्याच संहितेमधून वेगवेगळे पाच अध्याय व दोन सूक्त एकत्र करून निर्मिलेलं जे पंचसूक्त पवमान आहे..त्यात सुमारे आडिचशे संचार आहेत. बरं.., हे संचार म्हणजे फक्त (समान)शब्द आणि संपूर्ण अथवा अर्ध्या (समान)मंत्राचेच आहेत काय? आणि नुसते तेव्हढेच आहेत काय? तर..तसे नाही. काहि ठिकाणी तर, फक्त या अध्यायात या ओळीत विशिष्ट शब्दावर मात्रा आहे ..आणि एकदम पुढच्या कुठल्या तरी अध्यायात तोच मंत्र पण त्याच ओळिवर विशिष्ट शब्दावर (आता) मात्रा नाही, एव्हढाच फरक आहे. म्हणजे ही पवमानातली गंमत बघा. एके ठिकाणी "शुंभमा ऋतायुभि:" असे आहे,तर दुसरीकडे , "शुंभमानो ऋतायुभि:" असे आहे. परत दोन्ही कडच्या पुढच्या ओळी निसंशय वेगळ्याच असतात. आणि मग जर का हे लक्षात राहिले नाही..तर या अध्यायातून त्या अध्यायात उडी पडते. याच घडणार्‍या प्रकाराला म्हणतात, संचार-जाणे! उदाहरणा दाखल आपण आजुन एक दोन संचार पाहू .. सुदुघाहि-पयस्वती: आणि सुदुघाहि-घृतःश्चुतः.. हा शब्दाचा संचार झाला.हा ही सहज लक्षात रहातो. पण अनुस्वारांचे संचार म्हणजे,मेंदूची शस्त्रक्रीया करतांना जितकं बारीक..आणि नजर न हलता लक्ष ठेवावं लागेल..तसला भयंकर प्रकार. तो असा - पतामांतरिक्षा आणि पवंतामांतरिक्षा - या शब्दातल्या दुसर्‍या अक्षरावर ,म्हणजे व - वर ..प्रथम अनुस्वार नाही आणि नंतर पुढे, तोच अनु-स्वार-झालेला आहे!!! इतका सूक्ष्म फरक लक्षात राहाणे मुश्किल..आणि मग इकडून तिकडच्या आध्यायात उडि पडणे निश्चित! (यातलं पंचसूक्त पवमान..हे पाठ-ठेवायला अत्यंत कर्मकठिण आहे. मला स्वतःला हे पाठ झाल्यापासून सलग तिन महिने याची आवृती ठेवल्यानंतरही..पुढे पुन्हा सलग २ महिने पाठ म्हणताना, रोज २ अथवा ३ संचार-जायचेच! आणि ते ही रोज वेगवेगळे! आज ह्या गल्लीत चुकलो,की उद्या त्या गल्लीत! रामा..शिवा..आणि गोविंदा..बाकि काही नाही! )

आता आपल्या सुप्रसिद्ध रुद्रातला हा शब्दसंचार..,प्रत्यक्षच कसा-जातो..?ते पहा...
(रुद्रामधे, आकरा नमका'चे आणि आकरा चमका'चे असे एकंदर २२अनुवाक आहेत.)

यातल्या नमकाच्या पहिल्या अनुवाकातल्या तिसर्‍या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनुरघोरा पापकाशिनी। आणि पुढची (वेगळी)ओळः- तयानस्तनुवा शंतमया गिरिशंता भिचाकशीहि॥

आता इथून सरळ नमकाच्या दहाव्या अनुवाकातली दुसर्‍या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनु:शिवाविश्वा हभेषजी। आणि पुढची (वेगळी)ओळ:- शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥

आता यात जर का रुद्र म्हणणारा माणूस पहिल्या अनुवाकात , यातेरुद्र शिवातनु च्या पुढे शिवाविश्वा हभेषजी असे चुकून म्हणून गेला..तर त्याची पाठांतर पद्धतीमुळे मेंदूत कोरली गेलेली पुढची ओळ ही दहाव्या अनुवाकातली ,म्हणजे शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥
.., हीच तोंडातून उमटणार. हा गेला संचार! आणि याच्याही अगदी उलट घडून दहाव्या अनुवाकातून पहिल्या अनुवाकात असा उलटंही तो येणार.म्हणजे - संचार जाणार!

आणि कित्तीही कुशाग्र बुद्धिमत्तेचा माणूस असला , तरी संपूर्ण एका वेदातले असे हजारो संचार लक्षात ठेवणं हे सामान्य बुद्धीमत्तेच्या बाहेरचचं काम.. मग हे काम सोप्प व्हावं म्हणून पुढे .. वेदांमधे पद/क्रम/जटा/माला/घन अशी सोय निर्माण करण्यात आली. याचा उचित वापर केला..कि हे संचारचं गाडं आडवं आलं, तरी त्याला नीट उभं करता येतं. (याविषयी पुन्हा केंव्हा तरी असच लिहिन! ) अर्थात, ज्या अध्ययनाचा आधार फक्त आणि फक्त पाठांतर हाच (राहिला)होता, त्या अतीप्राचीन (लेखनकलेची सुरवातही न झालेल्या) कालखंडात अश्या तर्‍हेच्या युक्त्या अथवा सोयी सुचणं, हे ही त्याच मानवी बुद्धीशी सुसंगतच म्हटलं पाहिजे. मग त्याचं समर्थन आजच्या आणि यापुढच्या काळात कोणत्याही पद्धतीनी अगर हेतूनी होवो.

आज हा पाठांतर पद्धतीचा छोटासा आढावा घेणारा लेख लिहुन झाला याचं समाधान एका कारणानी तर आहेच आहे.

१) वेदज्ञान.., हे त्या किंवा आजच्या अथवा पुढच्या काळात उपयोगी/अनुपयोगी .. उपकारक/अनुपकारक..असं कसंही असलं .तरी .. हे ज्ञान पूर्वी आणि आजही पाठ ठेवणारे जे वेदाध्यायी आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेची जाणिव..या लेखनामुळे करवून देता आली.(एरवी..हे नुसतं सांगून शक्य नाही,आणि नसलंही पाहिजे. Happy ) याशिवाय.., जे लोक:- "ह्हॅ!...हे शिकायला काय अक्कल अथवा बुद्धी लागते?" असे (कोणत्याही हेतूने) म्हणतात..त्यांना.. किमान हा लेख वाचल्यानंतर,पुन्हा असं म्हणताना,काहि क्षण थांबून विचार करावा लागेल...
धन्यवाद. Happy
===============================================
पराग दिवेकर..(हिंदू पुरोहित.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ तुम्ही दिलेल्या पठण पद्धतीत अर्थ सांगितल्या जातो असे कुठेच लिहिले नाही. >> अगदी बरोबर.

@माझा प्रश्न आहे: एखादा मंत्र पाठ आहे पण त्याचा अर्थ माहिती नाही. असा फक्त मंत्र शिकवून काय फायदा होतो ? >>> पौरोहित्य करण्यासाठी ,तो शिक्षित माणूस पौरोहित्य करवुन घेणार्‍या समोर,फक्त- अर्थज्ञान नसलेले मंत्र म्हणून,धार्मिक विधी करवून घेणारा एक पुरोहित होतो. हा प्राथमिक स्वरुपाचा फायदा होतो. अन्य खरच काहिही होत नाही.

@आपण फक्त मंत्र म्हणतो पण ज्ञान मिळत नाही.>>> खरच आहे हे ही. भारतातले (माझ्या माहिती प्रमाणे..) कर्नाटक आणि तामिळनाडू हे दोन प्रांत आणि त्यातीलंही काहि धर्मपीठांच्या पाठंशाळा वजा जाता अन्यत्र कुठेही संस्कृत व्याकरण/भाषा,ही विद्यार्थ्यांना वेदपाठशाळेत शिकविली जात नाही. (जे अत्यंत आवश्यक आहे,असे मलाही वाटते.) कारण पाठशाळांचा उद्देश, समाजात पौरोहित्य करणारे व हेच कथित ज्ञान पुढे शिकविणारे असे अध्यापक तयार करणे हा आहे. शिवाय यजमानाला अर्थ सांगत बसणे. याला यजमानांच्या अथवा आपल्या सर्व समाजाच्या मानसिकतेचा आजंही किती पाठिंबा अथवा इच्छा आहे? सांगा बरे. आपण बहुशः धार्मिक लोकं धर्मविधी केल्यामुळे मिळणारे ऐहिक स्वरुपाचे फायदे अथवा काहि सामाजिक कारणांची परिपूर्तता करणारे समाधान पदरी पाडून घेण्याकरिताच तर हे सर्व विधी गुरुजी/पुरोहितांना घरी बोलावून करवून घेत असतो. अर्थातच हे सदर स्पष्टीकरण ,ही अशीच पोपटपुरोहित अवस्था कायम रहावी,किंवा तिच योग्य आहे..याचे समर्थन करिण्याकरिता देत नाहीये. फक्त आपली सामाजिक वस्तुस्थिती काय आहे? ह्याची जाणिव,सदर प्रश्न विचारात घेताना व्हावी..इतकाच उद्देश आहे. Happy

परागशास्त्री दिवेकरांस बालके गामा पैलवानाचा आदरपूर्वक प्रणाम.

मी ऐकलंय की वेदघोषाचा आवाज सर्वत्र पसरणे आवश्यक असते. त्यामुळे सृष्टी सुरळीत चालते. मला आठवतंय त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठल्याश्या पाठशाळेत पाऊसपाणी ठीक होण्यासाठी दरवर्षी यज्ञ केला जातो आणि तिथे पावसाच्या नोंदीही ठेवल्या आहेत.

यज्ञासंबंधी थोडी माहिती इथे आहे : http://shivjagar.blogspot.co.uk/2012/09/blog-post.html

आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद.

मी जिथे योगाभ्यास शिकलो तिथे आम्हाला पंतजली ह्याचे योगसुत्रा आधी वाचून मग त्याचा अर्थ सांगून मग ते ते आसन वा श्वसन प्रकार शिकवत. ही पद्धत मला फार आवडली.

वरदा,

हसायला काय झालं? भारतात आणि युरोपात चाललेल्या संशोधन प्रकल्पांची यादी इथे आहे :
http://www.academia.edu/2603780/Vedic_and_Scientific_Research_Foundation...

यादीतला दुसरा प्रकल्प पर्यावरण संरक्षणाशी संबंधित आहे.

आ.न.,
-गा.पै.

@ मी जिथे योगाभ्यास शिकलो तिथे आम्हाला
पंतजली ह्याचे योगसुत्रा आधी वाचून मग त्याचा
अर्थ सांगून मग ते ते आसन वा श्वसन प्रकार शिकवत.
ही पद्धत मला फार आवडली.>>> योगाभ्यास आणि वेदाभ्यास, दोन्ही च्या मर्यादा ,पातळि, उपयोग , स्थान- हे सर्वच भिन्न असल्यामुळे हा फरक रहात आलेला आहे. Happy

भिन्न जरी असले तरी दोन्ही मौखिक होते म्हणून आपल्यापर्यंत पोचले आहे.

आणि मर्यादा कुठे आहेत हो? अर्थ सांगून शिकवणे हे फार अवघड नाही. एखाद्याला मंत्र शिकवताना शिकणारा हा मंत्र बरोबर म्हणत आहे की नाही हे जसे आपण तपासून बघतो तसे त्याला अर्थ कळला की नाही हे एक करता येऊ शकते.

लक्षात ठेवा की खास करून मुस्लिम अथवा ख्रिश्चन धर्मीय आपणास असे प्रश्न विचारत असतील्,तर तो त्यांच्या धर्मप्रसाराच्या मार्गातील एक महत्वाचा टप्पा,म्हणून त्यांनी केलेला हा "प्रश्न विचारण्याचा" (त्यांचा..)आचारर्धर्मच असू शकतो. कुठुनतरी ,समोरच्याचा धर्म आपल्यापेक्षा कमी-आहे,हे त्याचं त्याच्याच निदर्शनास आणुन देणं,हा त्यातला त्यांचा महत्वाचा भाग आहे. त्याला सरळ-"तू आमच्या हिंदू धर्म पंडितांनाच विचार"..,असे सांगुन आपण मोकळ्या व्हा..हे उत्तम
>>>
हे विधान धक्कादायक आहे. धक्कादायक या अर्थाने की तुमच्या इतर लिखाणात जी मॅच्युरिटी दिसते त्यातून तुमचे लिखाण उत्सुकतेने वाचावयास घेतले. माहितीपूर्ण लेख वाचता वाचता एकदम खडा लागावा तसे तुमचे हे वाक्य आहे. इतर धर्मियानी तुमच्या धर्माबद्दल माहिती विचारली तर ती त्यांच्या धर्मप्रसाराबद्दल एक महत्वाचा टप्पा हे कोणत्याही अंगाने स्वीकारार्ह नाही. एकमेकांच्या धर्माबद्दल जाणून घेतले तरच मानवधर्माकडे जाता येईल. माझे काही मुस्लिम मित्र गीतेचे अभ्यासक आहेत म्हणून ते कुठे तरवार अथवा ए के ४७ घेऊन त्याचा धर्मप्रसार करण्यास निघालेले दिसले नाहीत. उत्सुकता म्हणून परधर्माबद्दल आम्हीही त्याना प्रश्न विचारतो. दिनविशेषाचे प्रयोजन पार्श्वभूमी विचारतो.हा सगळा पॅराच निंदनीय आहे. चांगले चांगले म्हणता म्हणता तुम्हीही त्या बालके ' पैल्वानी' पंथाचे
अथवा लिंबाच्या झाडाखालचे निघालात हे पाहून भ्रमनिरास जाहला.... आणि तुम्ही केवळ पाठांतरित पंडित असल्याची खात्री पटली. व तुमच्याकडून हिन्दु परंपरंबद्दल योग्य माहिती मिळेल ही आशाही नष्ट झाली... असो रामराम !

गापै, सृष्टीची व्याख्या काय आणि सुरळीत ची व्याख्या काय नक्की?

आणि कृपया त्या अ‍ॅकॅडेमिया च्या लिंक्स देऊ नका. ती अ‍ॅकॅडेमिक्सची 'सोशल मीडिया' साईट आहे. तिथे कुणीही काहीही अपलोड करू शकतं - त्यावर त्याचा दर्जा ठरत नाही.
तुम्ही दिलेल्या लिंकमधे जे तीन प्रकल्प आहेत त्यांचा कार्यकाल संपला आहे. त्याचं फलित काय? अहवाल कुठल्या पीअर-रीव्ह्यूड जर्नलमधे प्रकाशित झालाय? त्याची उपयोजिता काय? त्याचा काही ठावाठिकाणा असेल तर सांगा.

@भिन्न जरी असले तरी दोन्ही मौखिक होते म्हणून आपल्यापर्यंत पोचले आहे.>>> अगदी बरोबर. काहिच शंका नाही. Happy

@आणि मर्यादा कुठे आहेत हो? अर्थ सांगून शिकवणे हे फार अवघड नाही. एखाद्याला मंत्र शिकवताना शिकणारा हा मंत्र बरोबर म्हणत आहे की नाही हे जसे आपण तपासून बघतो तसे त्याला अर्थ कळला की नाही हे एक करता येऊ शकते.>>> मी या अर्थाने मर्यादा..असं म्हटलेलं नाही. आपण म्हणता ते सहज साध्य आहेच. अवश्यही आहे. आमच्याकडे मंत्राच्या अर्थापेक्षा त्याची मंत्रशक्ति तो स्वरासहित नीट म्हटल्याने ,कशी प्रकट होइल..यालाच अधिक महत्व देऊन ठेवले आहे. मंत्रातून लहरी निघतात...कसली कसली किरणं निघतात,त्यात दिव्यशक्ति भव्यपणे एकवटते,प्रगटते...ह्याच काल्पनिक खेळांना महत्व दिले गेले आहे.. आणि हीच त्याची त्या अर्थानी मर्यादा आहे..आणि म्हणून ती योगाभ्यासापेक्षा भिन्न आहे.

अच्छा. धन्यवाद.
तुम्ही प्रत्यकाला भरभरुन प्रतिसाद देत आहात त्याचे फार कौतुक वाटते.

@हे विधान धक्कादायक आहे. >>> धक्का-दायक नाहि. तुम्ही त्यातून धक्का-घेतला आहात.

@धक्कादायक या अर्थाने की तुमच्या इतर लिखाणात जी मॅच्युरिटी दिसते त्यातून तुमचे लिखाण उत्सुकतेने वाचावयास घेतले. माहितीपूर्ण लेख वाचता वाचता एकदम खडा लागावा तसे तुमचे हे वाक्य आहे.>>> आपला इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म,तसेच त्यांची आजतागायत झालेली/चाललेली वाटचाल..या बद्दल किती ज्ञान अगर माहिती आहे? सांगाल का? माझ्या मते ती तुम्हाला नाही...असे या धक्का-लागण्यातून दिसून येत आहे. त्यामुळे खडा लागणं लांब ठेऊन्,वस्तुस्थितीचा समजावून घेऊन शांत मनाने आधी स्विकार करा. मला माहित नव्हतं,तेंव्हा मलाही असे खडे लागले आहेत.

@इतर धर्मियानी तुमच्या धर्माबद्दल माहिती विचारली तर ती त्यांच्या धर्मप्रसाराबद्दल एक महत्वाचा टप्पा हे कोणत्याही अंगाने स्वीकारार्ह नाही. >>> तुम्हाला नसेल स्विकार करायचा तर नका स्विकारु...पण पावसात छत्री न घेता उभे राहुन्,हा पाऊस नाहिच,असे म्हटल्यानी तुंम्ही भिजायचे रहाणारा नाहीत..हे ध्यानात घ्या. शिवाय ...त्यांच्या मुस्लिम मित्राने अगर मैत्रिणीने विचारलेला प्रश्न काय? त्याचा रोख काय? ह्याचा काहिच कानोसा लागत नाही का तुम्हाला? आणि अश्या पद्धतीने माहिती गोळा करून त्या संबंधीचं त्यांच्या धर्माज्ञेनुसारचं काम करणे...हा त्यांचा एक धर्माचार आहे...आणि तो ते आजंही पाळत आहेत..हे तुम्हाला माहिती नाही काय? तरि देखिल उपरोक्त धर्मात सर्वसामान्य माणसे आहेत्/असतात/ असतीलही..हे मी त्या आशयात जाणिवपूर्वक कुठे नाकारलय??? माणसं सगळ्याच धर्मातली चांगली/वाइट आहेत...पण त्यांचे धर्म त्यांना राक्षसी व्हा/बना.., अश्या आज्ञा देतात...हे नाकाराल काय आपणंही?

@एकमेकांच्या धर्माबद्दल जाणून घेतले तरच मानवधर्माकडे जाता येईल. >>> हो...पण त्यातून आपापल्या धर्मांनी जे जे दुसर्‍यांबद्दल वाइट-करायला सांगितलं आहे..ते सोडून देण्यसाठी ,आधी ते स्विकारून कबुल करून सोडावं लागतं...धर्मातला त्या त्या स्वरुपाचा भाग्,पोथ्यांमधून आणि आपल्या आचरणातून नष्ट करावा लागतो. त्या जागी योग्य घालावाही लागतो... हे सगळं झालं..तर सार्वत्रिक मानवतावाद येतो...एरवी हा फक्त भावनिक भाबडट पणा उरतो...त्याला कुठे नेऊन ठेवायचा?

@माझे काही मुस्लिम मित्र गीतेचे अभ्यासक आहेत म्हणून ते कुठे तरवार अथवा ए के ४७ घेऊन त्याचा धर्मप्रसार करण्यास निघालेले दिसले नाहीत. >>> नाही ना निघणार सगळेच्या सगळे..मी तरी कुठे सगळी जमात अथवा झुंड तशी वागणारीच असते असं म्हटलय? .. मी फक्त... -- "हा "प्रश्न विचारण्याचा" (त्यांचा..)आचारर्धर्मच असू शकतो. "--- असं म्हटलेलं आहे... आणि असू शकतो ,असं म्हणणं म्हणजे फक्त शक्यता असू शकते,असा त्याचा अर्थ होतो. एखादा चांगला मुस्लिम केवळ ज्ञान लालसेनी असे म्हणू शकतो,हे ही त्यातून मी ध्वनीत करून ठेवलेलं आहेच की! त्याखेरीज उरलेले जे धर्मपालन करणारे मुस्लिम आहेत..त्यांना धर्माज्ञेच्या कारणानीही परधर्मखंडनास्त्व असे विचारावे लागते..जे ते आजंही विचारत असतात..रोजच्या सामान्य जीवन व्यवहारातही. त्याला वाणीने करावयाचा जिहाद म्हटले जाते. कुराणात उठसुट हत्यारं घेऊन लोकांना इस्लाम मधे -आणायची परवानगी नाही... जिहाद हा आपली शत्रूप्रदेशात असलेली सांख्यिकी व सामाजिक ताकद लक्षात घेऊन आचारायचा धर्म आहे.. लेखणीने/वाणीने/शस्त्राने..असे तीन टप्पे त्याला आहेत. कुठच्याही मुस्लिम धर्मपंडिताला जिहादचा हा अर्थ दाखवा..तो हा नाकारणार नाही...ऊलट माना डोलावून स्विकारेल. तेंव्हा आपल्या म्हणण्याप्रमाणे- "तरवार अथवा ए के ४७ घेऊन त्याचा धर्मप्रसार करण्यास निघालेले दिसले नाहीत. " कारण त्यांना अत्ता तसे -निघण्याची धर्माज्ञा नाही. कारण आपल्या प्रदेशाचे अजुन काश्मिर-झालेले नाही. हे आपल्या लक्षात येत नाही. संख्याबळ कमी असताना... उरलेल्या दुसर्‍या धर्मसमाजात..गोडीगुलाबीने,मिळून मिसळून राहून...हे काम केलं जात असतं... जे आंम्ही होताना पहातो आहोत...पुण्यामधे आझम कॅम्पसला झालेले झाकिर नाइकाचे प्रवचन..., निवारा वृद्धाश्रम परिसर नवीपेठ येथे झालेले... असगर अली इंजीनियरचे भाषण ... अश्या एक ना अनेक ठिकाणी हे काम होत आहे..
असो... आपल्याला काहिच माहिती नाही या प्रांतातली...असे दिसते...

@उत्सुकता म्हणून परधर्माबद्दल आम्हीही त्याना प्रश्न विचारतो. दिनविशेषाचे प्रयोजन पार्श्वभूमी विचारतो.हा सगळा पॅराच निंदनीय आहे. चांगले चांगले म्हणता म्हणता तुम्हीही त्या बालके ' पैल्वानी' पंथाचे
अथवा लिंबाच्या झाडाखालचे निघालात हे पाहून भ्रमनिरास जाहला.... आणि तुम्ही केवळ पाठांतरित पंडित असल्याची खात्री पटली. व तुमच्याकडून हिन्दु परंपरंबद्दल योग्य माहिती मिळेल ही आशाही नष्ट झाली... असो रामराम !>>>> ह्या तुमच्या पॅराविषयी आणखिन काहि नंतर प्रतिसादतो... पण माहिती न घेता स्वखुषीनी अंधत्व पत्करून जगणे,हा आपल्यालाच आवडणार्‍या मानवतावादा नुसार मानवता द्रोह आहे..हे विसरू नका.

आत्माराम,
सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद.

"आपल्यालाच आवडणार्‍या मानवतावादा नुसार मानवता द्रोह आहे..हे विसरू नका."
+१ सहमत

परागशास्त्री दिवेकरांस बालके गामा पैलवानाचा आदरपूर्वक प्रणाम.

रॉबिनहूड यांच्या टिपणीचे तुम्ही केलेले तुम्ही केलेले खंडन मनापासून पटले. धन्यवाद! Happy

धर्माच्या बाबतीत हिंदूंनी सदैव सावध असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या वर्तनाने तसा आदर्श घालून दिला आहे. याबद्दल विनम्र अभिवादन.

आपला नम्र,
-गामा पैलवान

@ धर्माच्या बाबतीत हिंदूंनी सदैव सावध असणे
आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या वर्तनाने तसा आदर्श घालून
दिला आहे. याबद्दल विनम्र अभिवादन.>>> गा.पै . आपण आधी आपल्या धर्माबद्दलंहि सावधान असले पाहिजे. इस्लाम त्याच्या जागी त्याची फ़ळे भोगतो आहेच. आपण आज आपल्या फ़ुटिर रहाण्याच्या आणि त्याला आपल्या धर्मानी वर्ण व्यवस्थेच्या नावानी दिलेल्या पाठिंब्याच्या घटनेचे बळि आहोत, हे समजुन घेतले पाहिजे. उद्या इस्लाम व ख्रिश्चेनिटि सरळ झालि,म्हणुन आपल्या धर्मानी स्वत:च्याच बांधवांना दिलेलं उच्च नीचत्व संपून जाणार नाहिये. ते आपल्याला स्वत:च्या आचरणातून हद्दपार करून,पोथ्यांमधुनंहि बाहेर फेकून द्यावं लागणार आहे. याला तुमची तयारी आहे काय? ते सांगा. म्हणजे तुमच्या अभिवादानाचा मी ही स्वीकार करू शकेन. __/\__

वरदा,

१.
>> तुम्ही दिलेल्या लिंकमधे जे तीन प्रकल्प आहेत त्यांचा कार्यकाल संपला आहे. त्याचं फलित काय? अहवाल कुठल्या
>> पीअर-रीव्ह्यूड जर्नलमधे प्रकाशित झालाय? त्याची उपयोजिता काय? त्याचा काही ठावाठिकाणा असेल तर सांगा.

मला जे सापडलं ते देतो. इथे एका प्रकल्पावर अधिक माहिती आहे : http://www.vsrf.org.in/vedic-method.html

असे प्रयोग अधिकाधिक व्हायला पाहिजेत यावर दुमत नसावं.

२.
>> सृष्टीची व्याख्या काय आणि सुरळीत ची व्याख्या काय नक्की?

सृष्टी = पर्यावरण = बायोस्फियर.

विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यातल्या नवनवीन शोधांमुळे माणसाच्या हातात निसर्गाचं नियंत्रण करायची शक्ती आली आहे. हे नियंत्रणशक्ती विनाशाकडे न घेऊन जाणे म्हणजे सृष्टी सुरळीत चाल(व)णे. वैदिक मंत्रपठण ऐकल्याने मन संतुलित राहायला मदत होते.

आ.न.,
-गा.पै.

परागशास्त्री दिवेकरांस बालके गामा पैलवानाचा आदरपूर्वक प्रणाम.

आपला प्रतिसाद वाचला. माझं मत नोंदवतो.

१.
>> आपण आज आपल्या फ़ुटिर रहाण्याच्या आणि त्याला आपल्या धर्मानी वर्ण व्यवस्थेच्या नावानी दिलेल्या
>> पाठिंब्याच्या घटनेचे बळि आहोत,

शिवाजीमहाराजांच्या वेळीही हीच धर्मशास्त्रे होती. त्यांना बहुतेक विरोध स्वकीयांकडूनच झाला आहे. त्यामुळे आपसांतल्या फुटीचे कारण वर्णव्यवस्थेत शोधणे कितपत सयुक्तिक आहे?

२.
>> उद्या इस्लाम व ख्रिश्चेनिटि सरळ झालि,म्हणुन आपल्या धर्मानी स्वत:च्याच बांधवांना दिलेलं उच्च नीचत्व संपून
>> जाणार नाहिये.

तसं पाहायला गेलं तर उच्चनीचपणा हा सृष्टीचा नियमच आहे. जरी जीव उच्चनीच असले तरी त्यांना व्यापून दशांगुळे उरणारा ईश्वर सर्व भूतांच्या ठायी वास करून असतो. वैदिक साहित्यातून याच सत्याकडे अंगुलीनिर्देश होतो अशी माझी समजूत आहे. ही शिकवण आचरणात आणायला हवी.

३.
>> ते आपल्याला स्वत:च्या आचरणातून हद्दपार करून,पोथ्यांमधुनंहि बाहेर फेकून द्यावं लागणार आहे.
>> याला तुमची तयारी आहे काय?

वैदिक शिकवण आचरणात आणण्यासाठी स्मृतींचे पुनर्लेखन करावे लागले तरी हरकत नाही.

आपला नम्र,
-गामा पैलवान

@ संथावाल्यानी सुंतावाल्यांना डिस्कशनमध्ये का आणायचं ?>> जे स्वत:च मधे येत रहातात,त्यांच्याच विषयी असं उलटं प्रत्युत्तर का हाणायचं? Proud

आरारारारा, केवढे ते श्रम हो, मला तर वाचूनच दम लागला. या सर्व माहितीसाठी धन्यवाद!
<<पौरोहित्य करण्यासाठी ,तो शिक्षित माणूस पौरोहित्य करवुन घेणार्‍या समोर,फक्त- अर्थज्ञान नसलेले मंत्र म्हणून,धार्मिक विधी करवून घेणारा एक पुरोहित होतो. हा प्राथमिक स्वरुपाचा फायदा होतो. अन्य खरच काहिही होत नाही.>> आत्माराव, तुम्ही अत्यंत डेंजरसली प्रांजळ आहात, लैच आवडले हे.

<<तसं पाहायला गेलं तर उच्चनीचपणा हा सृष्टीचा नियमच आहे.>> तसं म्हंजे कसं पाहायचे? आणि कसेही पाहिले तरी हा 'सृष्टीचा' नियम'च' आहे हे कोणी सांगितले?

त्यांची सृष्टीच वेगळी आहे आगावा. तुम्ही कसंही पहा. ही माहिती नागपूर केन्द्रावरून प्रक्षेपित झालेली आहे...

साती

@आत्माराव, आम्ही परत परत तुमच्या फॅन क्लबात!
खूप चांगले प्रतिसाद देत आहात.>>> धन्यवाद.
..............................................................................
आगाऊ

@आत्माराव, तुम्ही अत्यंत डेंजरसली प्रांजळ आहात, लैच आवडले हे.>>> धन्यवाद. आभारी आहे.
...............................................................................................................
गामा_पैलवान_५७४३२
@शिवाजीमहाराजांच्या वेळीही हीच धर्मशास्त्रे होती. त्यांना बहुतेक विरोध स्वकीयांकडूनच झाला आहे. त्यामुळे आपसांतल्या फुटीचे कारण वर्णव्यवस्थेत शोधणे कितपत सयुक्तिक आहे? >> मी ते शोधत नाहिये. ते तिथे आहेच! ,असं म्हणतोय. वर्ण-व्यवस्था, ही समाजात प्राचीन काळापासून लोकमानसानी धारण करुन ठेवलेल्या कुळगटांची धर्मशास्त्रीय कल्पनांमधे लाऊन-दिलेली सोय आहे. आणि तिचं प्रमुख कारण किंवा वापर.., त्या त्या वेळेसची राजसत्ता अनुकुल असेल,तर आपल्याला हवी ती पिळवणूक निर्माण करुन घेणं..,हे आहे. .. दुसरं म्हणजे तुम्ही शिवाजीमहाराजांचा दाखला देत आहात. तो तुम्हाला प्रतिकूल आहे. शिवाजीमहाराजांनीहि राजकारणात धर्म बाजुला ठेवलेला होता..आणि हरएक धर्माला ..त्याच्या मार्तंडांना ताकिद अगर शिक्षाहि दिलेली होती. गरज पडेल तेथे प्रोत्साहनंही दिलेलें होतं.. एकंदर पहाता,महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात कोणताही धर्म दुय्यमच होता.हे माहित नाही काय?

@तसं पाहायला गेलं तर उच्चनीचपणा हा सृष्टीचा नियमच आहे. जरी जीव उच्चनीच असले तरी त्यांना व्यापून दशांगुळे उरणारा ईश्वर सर्व भूतांच्या ठायी वास करून असतो. वैदिक साहित्यातून याच सत्याकडे अंगुलीनिर्देश होतो अशी माझी समजूत आहे. ही शिकवण आचरणात आणायला हवी. >>> तुमची ही सगळीच समजूत आत्मसमजांवर आधारलेली आणि म्हणूनच भाबडट आहे. सृष्टीनियमनातलं नैसर्गिक उच्चनीचत्व हे अत्यंत वेगळं आहे.आणि काहिही असलं,तरी ते धर्मातल्या मनुष्यनिर्मित उच्चनीचत्वा इतकं घृणास्पद नाहीये. मानवात नैसर्गिक जाती दोनच आहेत. स्त्री आणि पुरुष . त्याही केवळ लिंगभेदी स्वरुपाच्या .आणि लिंगभेदंही सृष्टीच्या नियमनास अनुकुल. या नंतरचे सगळे धर्म/जाती-भेद मानव निर्मित आहेत.कृत्रिम आहेत..नैसर्गिक नव्हेत. तुम्ही स्वतः ब्राम्हणेतर आहात असे म्हणता..ठिक आहे. मी स्वतः जात पाळत नसलो,तरी तुम्ही मला ब्राम्हण समजत असालच..मग आपलं हे वर्गी-करण नैसर्गिक आहे...,असं तुम्ही प्रामाणिक पणे म्हणाल काय? आणि याच अनुषंगानी..आपल्या महान वैदिक धर्मानी दिलेलं "जरी जीव उच्चनीच असले तरी त्यांना व्यापून दशांगुळे उरणारा ईश्वर सर्व भूतांच्या ठायी वास करून असतो." हे तत्व आजपर्यंत सार्वत्रिक रित्या पाळलं का गेलं नाही? विरोधीच का राहिलं नेहमी? ते ही सांगाल काय? . जी जी संत आणि समाजसुधारक मंडळी हिंदू समाजाला जात तोडा.., असं स्वअचरणातून सिद्ध करवून देऊन सांगत होती,त्यांनी ही सर्वांचा आत्मा एक असतो..हे धर्मतत्व पुढे केलेलं होतंच ना? मग त्यांनाही आपण बासनात का बरे गुंडाळून ठेवत आलो आहोत? हे ही बोला. अगदी स्वेच्छेनी अंतर्जातीय विवाह करु इच्छिणार्‍यांची आजंही हत्या होण्यापर्यंत मजल जाते? हे कोणता आत्मा एक असल्याचं लक्षण मानावं? आणि सर्वांना व्यापून शिवाय वर दहा आंगुळे उरणारा इश्वर त्या नश्वर देह धारणेवर विश्वास असलेल्या अंतर्जातीय विवाहकांना संरक्षायला एकदाही कसा येत नाही? ते ही सांगा.

@वैदिक शिकवण आचरणात आणण्यासाठी स्मृतींचे पुनर्लेखन करावे लागले तरी हरकत नाही.>> या एका गोष्टीकरता तुमचं आधी स्वागत. वादात इथे एव्हढं बोललात..व्यवहारात हे स्मृतींचे पुनर्लेखन करायला घेतलयत का? आणि घेणार आहात का खरोखर??? कुठची हिंदुत्ववादी संघटना यात अग्रेसर आहे. ? अखंड भारतात हताच्या बोटावर सोडा,पेरावर तरी मोजायला हे खंडित हिंदुत्ववादी असलं काहि करताना सापडतात का? तुम्ही तरी ते करणार का? आमच्या एखाद्या वेदपाठशाळेत जाऊन आपल्यातल्या एखाद्या हुशार सत्शील ब्राम्हणेतर मुलाला तिथे वेदोक्त अध्ययन करविण्यासाठी प्रवेश मिळवून दाखवू शकाल काय? अयोग्य स्वरुपाचा-धर्म, पोथीत आणि तसाच व्यवहारात मोडून दाखवाल काय? हे करायला जायचं असेल..तर स्मृतींमधला "कलियुगात दोनच वर्ण अस्तित्वात आहेत..ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर" हा एक कायदा,आणि त्याला पूर्ण न्याय देणारा "त्रैवर्णिकांना वेदाध्ययन करता येते..(पण पौरोहित्य फक्त ब्राम्हणच करु शकतात..) हा पाचर मारुन ठेवलेला अजुन एक कायदा...स्मृतीग्रंथात आणि व्यवहारात पुनर्लिखित-आचरीत करावा लागेल...दाखवाल करून.. ? मग...आपली वैदिक शिकवण जन्म-जातीवरून उच्चनीचत्व ठरविते, हे क्रूर आणि कपटी पणाचं द्योतक वाटत नाही काय आपल्याला?

"जरी जीव उच्चनीच असले तरी त्यांना व्यापून दशांगुळे उरणारा ईश्वर सर्व भूतांच्या ठायी वास करून असतो."-(सगळ्यांचे आत्मे समान..यानुसार..) ही असली गोंडस दिखाऊ तत्व.. आपल्या धर्माच्या प्रॉडक्ट्ची जाहिरात करण्यासाठी तयार केली जात असतात हो..पण माल-हतात पडायची वेळ आली..की बरोब्बर विक्रेत्याला स्वतःचा लबाड स्वार्थ आठवतो. त्याचे काय??? Happy

आगाऊ,

जगातल्या कुठल्याही दोन गोष्टी एकसारख्या नाहीत. कुठलाही व्यवहार म्हंटला की काहीतरी देवघेव आलीच. काहीतरी दिलं जाणार आणि काहीतरी घेतलं जाणारंच. हाच उच्चनीचतेचा पाया आहे.

आ.न.,
-गा.पै.

Pages