वेदाध्ययनातील- संथा देणे... अर्थात वेदाभ्यास शिक्षण/पाठांतर पद्धती.

Submitted by अत्रुप्त आत्मा on 25 March, 2015 - 08:42

खुलासा:- वेदपाठशाळांमधे प्राचीन काळापासून अध्ययन/अध्यापनाची एकच एक अशी, परंपरागत पद्धती रहात आलेली आहे. ही पद्धती फक्त पाठ करून ठेवण्याच्या विषयाकरिताच निर्माण झालेली आहे. हिला सामन्यतः मौखिकी अध्यापन पद्धती असे म्हटले जाते. ह्या पद्धती विषयी खूप जणांच्या मनात कुतुहल,आस्था,चिकित्साभाव इत्यादी असते. आंम्हा पुरोहित मंडळीना काम करत असताना,पाठांतर पाहुन ह्या अनुषंगानी काहि प्रश्नंही विचारले जात असतात. अश्या सर्व प्रश्नकर्त्यांना हा विषय नीट माहिती व्हावा,एव्हढ्याच हेतूने हा सदर लेख येथे देत आहे.

@संथा देणे म्हणजे काय? >> संथा देणे म्हणजे ,वेदपाठ शिकविणारे गुरुजी , समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचे छोटे तुकडे(चरण)पाडून ,वदवून आपल्या मागे घोकायला/म्हणायला सांगतात..याला प्राथमिक अर्थानी संथा-देणे असे म्हटले जाते. यापुढे...(विद्यार्थ्यांनी)संपूर्ण पाठांतर करण्याच्या विशिष्ट पद्धतीला, संथा घालणे अगर संथा म्हणणे ..असे म्हटले जाते. एखादा विषय/याज्ञिकातला प्रयोग/संहितेचा अध्याय (तोंड)पाठ करताना, संथा म्हणण्याचे ४ ट्प्पे असतात.
१) चरणाची संथा(४वेळा) २) अर्धनीची संथा(४वेळा) ३) ऋचेची संथा(४वेळा) ४) गुंडिकेची संथा(४वेळा) = एकंदर १६ संथा.

१)चरणाची संथा:- चरणाच्या संथेत, गुरुजिं..प्रथम समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचा एकेक चरण दोनदा सांगतात.. मग विद्यार्थ्यांनी पोथित बघून तो त्यांच्या मागून ७वेळा घोकायचा. यात म्हणताना चूक झाली,की पुन्हा सुरवात. यात शुद्धअक्षर,जोडाक्षर,त्याचे गुरुत्व,अनुस्वारांचे उच्चार,स्वराघात,र्‍हस्व आणि दीर्घ/प्रदीर्घ-अश्या काना ,मात्रा,वेलांट्या,उकार, विसर्ग आणि त्यांचे तसेच उच्चार ,हे शंभर टक्के शुद्ध होत आहेत की नाहीत? हे गुरुजी कसून तपासत असतात. (कारण एकदा अशुद्ध पाठ झालं..की ती (मेंदूत उमटलेली) प्रींटाऊट,नंतर पुसणं कर्मकठीण असतं.) तर..हे स्तोत्रातले पाडलेले एकेक चरण ७ वेळा घोकत संपूर्ण अध्याय वा स्तोत्र - पूर्ण केलं जातं... ही झाली "चरणाची" पहिली संथा. अश्या चार संथा झाल्या की 'चरण' पूर्ण होतो. ही सगळी संथा गुरुजिंसमक्ष होते. (कारण तेच-मंत्रात अजिबात अशुद्धी राहू नये.)

२)अर्धनीची संथा:- अर्धनीच्या संथेत ,सामान्यतः दोन चरण एकत्र घेऊन..किंवा मंत्राची अर्धी ओळ सात वेळा म्हटली जाते. (काहि वेळा जगतिच्छंदा सारखा,मंत्राचा लांबलचक छंद असेल,तर एका ओळीत ४/४ किंवा अगदी ६/६ चरणंही पाडावे लागतात) आधी चरण डोक्यात-बसलेला असतोच..त्यामुळे इथपासून गुरुजी समोर नसले,तरी चालते. तर.. ही...एकामागून एक ओळ पूर्ण ७ वेळा घोकत ...संपूर्ण अध्याय पूर्ण केला... की अर्धनीची १ संथा झाली...आता अश्याच पुढे अजुन ३ संथा म्हणायच्या..म्हणजे या अर्धनीच्या चार संथा होतात.

३)ऋचेची संथा:- ऋचेच्या संथेत..मागील अर्ध्या ओळीच्या संथेचा पुढचा भाग सुरु होतो..म्हणजे आता २ ओळिंची संपूर्ण ऋचा ,आणि पुढच्या ऋचेचा पहिला चरण(धरुन) ..,तसे ७ वेळा म्हणायचे. यातील पुढच्या ऋचेचा पहिला चरण त्यात घेण्याचे वैशिष्ठ्य असे..की यामुळे संपूर्ण अध्यायातल्या प्रत्येक पहिल्या ऋचेची-दुसर्‍या ऋचेशी गुंफण तयार होते. (कनेक्टींग होते.) ऋचे'तल्या या (पहिल्या)संथेवर,शिकविणार्‍या गुरुजिंचे बारीक लक्ष असते. (कारण तेचः- अशुद्धी आली कींवा मधे कुठे तयार झालेली आहे काय? हे पहाणे.) ह्या ऋचेच्या परत पुढे तीन संथा म्हणायच्या. म्हणजे या ऋचेच्याही एकंदर चार संथा पूर्ण होतात.

४) गुंडीकेची संथा:-..हा शेवटचा, परंतू अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. आता मागील ऋचेच्या संथेनी हीचेच निम्मे काम केलेले असते. पण तरिही.., आता कितीही पाठ येत असले..तरी(यातल्या पहिल्या संथेला) पोथीत पाहूनच..सदर पाठांतराच्या अध्यायाचा एकेक अनुवाक अथवा वर्ग (पॅरेग्राफ) ७/७ वेळा म्हणायचा असतो. आणि तो सगळा अध्याय पूर्ण करायचा असतो. ही झाली गुंडिकेची पहिली संथा.. अश्या अजुन तीन म्हणून ,ह्या गुंडिकेच्या चार संथा पूर्ण करायच्या. या गुंडिकेच्या संथेमधे, साधारणपणे दुसर्‍या किंवा तिसर्‍या संथेपासून ,(आता) विद्यार्थ्याची..इच्छा अगर तयारी-नसली तरी विद्यार्थ्यांनी पोथित न पहाताच ,मान वर करुन संथा म्हणायची असते. कारण त्याशिवाय-पाठ येणे..ही क्रीयाच आकाराला येऊ शकत नाही. अर्थात कोणत्याही सर्व सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याला यातल्या शेवटच्या २ संथांमधे सर्वकाहि बिनचूक तोंडपाठ-येतेच. पण त्याहून(बुद्धिनी) आगे/मागे जे असतील..त्यांना कमी अगर जास्त कष्ट घ्यावे लागतात. तर,अश्या ह्या एकंदर १६ संथा घातल्या की आपल्याला अपेक्षित असलेला पाठांतराचा विषय-तयार होतो.

आता आपण याचे-संकलित..,एका स्तोत्रपाठांतराच्या उदाहरणाद्वारे पाहुया. (हे आणखि डिटेलिंग,विशिष्ट हेतूनी आणि जाणिवपूर्वक करत आहे.)

चरणाची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं,(७वेळा) गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा)
भक्तावासं स्मरेन्नित्यं, (७वेळा)आयुःकामार्थसिद्धये॥(७वेळा)

प्रथमं वक्रतुण्डं च,(७वेळा) एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा)

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं,(७वेळा)गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा).....
असेच प्रत्येक चरण म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे चरणाची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की चरणाची मुख्य संथा पूर्ण होते.

अर्धनिची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा)
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥(७वेळा) ॥

प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा)

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा).....
अशीच प्रत्येक अर्धनि/अर्धी ओळ म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे अर्धनिची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की अर्धनिची मुख्य संथा पूर्ण होते.

ऋचेची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥..प्रथमं वक्रतुण्डं च(७वेळा)

प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ लम्बोदरं पञ्चमं च(७वेळा).....
अशीच प्रत्येक ऋचा ,पुढल्या ऋचेचा पहिला चरण तिच्यात लावुन म्हणत स्तोत्र एकेक ऋचेनी म्हणत पूर्ण घोकायचे असते..मग येथे ऋचेची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की ऋचेची मुख्य संथा पूर्ण होते.

गुंडिकेची म्हणायची संथा:-
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥ (सुरवात ते शेवट -७वेळा..)
.....असेच सुरवात ते शेवट -७वेळा.. म्हटले,की मग येथे गुंडिकेची एक संथा पूर्ण होते.अश्याच प्रकारे अजुन तिन संथा म्हटल्या,की गुंडिकेची मुख्य संथा पूर्ण होते.

आता आपल्याला आवश्यमेव असा एक प्रश्न पडेल,की "(बुद्धिचा..)इतका बारीक किस पाडून, ही पाठांतर पद्धती तयार होण्या/करण्यामागचे प्रयोजन काय बरे असावे???" Happy

उत्तरः- ज्या काळात ही पद्धती आली/विकसीत झाली.तो काळ लेखनकलेची सुरवातहि न झालेला असा काळ होता. अश्या वेळी आपल्या जिवापाड जपाव्याश्या वाटणार्‍या गोष्टींपैकी, ही मंत्र /काव्य/स्तोत्र जतनाची एक गोष्ट होती. आणि याशिवायंही ,पुढे लेखनकला विकसीत झाल्यावर..जो विषय वारंवार म्हणावा,वापरावा लागणार आहे..त्यासाठी भल्यामोठ्ठ्या पोथ्यांची बाडे बरोबर घेऊन हिंडणे.हे ऋषीमुनिंपासून ते सामन्यजनांपर्यंत सर्वांनाच त्याकाळी सोपे नव्हते. त्याशिवाय पोथ्या पाण्यानि/आगिमुळे,वाळवी/कसर लागण्यापुळे खराब होणे अशिही कारणे होतिच. आणखि म्हणजे, परस्पर विरोधीमतांच्या गटांनी एकमेकाचे लिखित स्वरुपातिल वांङगमय नष्ट करणे,हे ही एक प्रबळ कारण त्याकाळी होतेच...या अश्या सर्व कारणांसाठी हे ज्ञान मुखोद्गत-पाठ ठेवावे लागले असेल.(आमच्याकडला अचुक शब्द म्हणजे-जिवंत ठेवावे लागले असेल.) आणि विशेषतः जर ते जसे च्या तसे पाठ ठेवावे लागले असेल,तर त्याला अशीच तंतोतंत शब्दपाठांतराची पद्धती असायला हवी होती. आणि म्हणुन तसे जर का एकदा पाठ झाले,आणि त्याच्या वारंवार आवृत्या* म्हणुन पाठ ठेवलेही गेले, तर वरिल कारणांनी येणारे नष्टतेचे भय बाळगावे लागत नाही, हे तर निश्चित आहे. (आज आपण हे आपल्याला हव्या त्या सर्व विषयांसाठि, हजारो प्रकारच्या रेकॉर्डिंगच्या साधनांनि करतच असतो. Happy )

आता जसेच्या तसे...म्हणजे काय हो नक्की? तर खाली दिलेले हे गणपतिस्तोत्र पहात पहात ह्या लिंकवर http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3 जाऊन हे क्लिपिंग ऐका. जेणेकरुन ह्या पद्धतिनी पाठ केले असता,जसेच्या तसे मेंदुत उमटते..म्हणजे काय होते? ते कळणे सहज होइल Happy
(गायकबियक कुणी नाही.. मीच आमच्या(उच्चार)पद्धतिनी म्हटलेलं आहे हां! Wink )
http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥

.........................................................................................................................

आवृत्ति*:- हा वेदाध्ययनातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. एकदा पाठ झालेला विषय/अध्याय..किमान २ वर्ष तरी दररोज १ आवृत्ती म्हणून जिवंत-ठेवावा लागतो. नाहितर आमच्याकडल्या प्रसिद्ध म्हणी प्रमाणे..तो नवव्या दिवशी नवा-होतो. म्हणजे अक्षरशः पुन्हा संथा-घेऊन शिकण्याच्या पातळीवर येतो. आणि असंही हे सोपं काम नसतच. नुसती ऋग्वेदाची संहिता घेतली..तरी त्यात आठ अष्टके..म्हणजे ६४ अध्याय आहेत. अध्ययन सुरु झाल्यापासून जसजसे पाठांतर वाढत जाइल..तसतसा हा आवृतीचा काळ वाढत जातो. आणि दर दोन वर्षानी समांतर होत रहातो. मग पुढे ब्राम्हण/आरण्यक्/उपनिषदे/शिक्षाचतुष्टय/ज्योतिष(फलज्योतिषवालं नव्हे!)/शास्त्र/निरुक्त असे अनेक ग्रंथोपग्रंथ पचवत, जिवंत ठेवत, अध्ययन करावे लागते..एका वेदाच्या दशग्रंथांच्या अध्ययनाला पहिल्या वर्षाला ६ तास.. इथून सुरवात होऊन..शेवटच्या वर्षाला हा शिक्षण कालावधी १६ ते १८ तासांपर्यंत जाऊन बसतो. म्हणूनच ऋग्वेदाचे दशग्रंथ पूर्ण कंठस्थ (पाठ) होण्याचा कालावधी किमान १२ वर्षे आहे.

पाठांतरातील अग्निदिव्य :- संचार जाणे .. संचार.., हा पाठांतराच्या वाटेतला अटळ सहप्रवासी आहे. आता संचार म्हणजे काय? तर एकसमान किंवा तोच तोच.. शब्द वा मंत्र ,संपूर्ण अध्ययनाच्या विषयांमधे कुठेही वारंवार येणे.. यामुळे काय होते? तर ..एका महारस्त्यावर जवळ जवळ सारखी नावं असलेले दोन फाटे असतील..तर नामसाधर्म्याच्या गोंधळामुळे, माणूस जसा या ऐवजी त्या गावात पोहोचावा. तसे काहिसे, हे सारखे-मंत्र अथवा शब्द करीत असतात. ऋग्वेदाच्या नुसत्या संहितेमधे असे हजारो संचार आहेत. नुसतं त्याच संहितेमधून वेगवेगळे पाच अध्याय व दोन सूक्त एकत्र करून निर्मिलेलं जे पंचसूक्त पवमान आहे..त्यात सुमारे आडिचशे संचार आहेत. बरं.., हे संचार म्हणजे फक्त (समान)शब्द आणि संपूर्ण अथवा अर्ध्या (समान)मंत्राचेच आहेत काय? आणि नुसते तेव्हढेच आहेत काय? तर..तसे नाही. काहि ठिकाणी तर, फक्त या अध्यायात या ओळीत विशिष्ट शब्दावर मात्रा आहे ..आणि एकदम पुढच्या कुठल्या तरी अध्यायात तोच मंत्र पण त्याच ओळिवर विशिष्ट शब्दावर (आता) मात्रा नाही, एव्हढाच फरक आहे. म्हणजे ही पवमानातली गंमत बघा. एके ठिकाणी "शुंभमा ऋतायुभि:" असे आहे,तर दुसरीकडे , "शुंभमानो ऋतायुभि:" असे आहे. परत दोन्ही कडच्या पुढच्या ओळी निसंशय वेगळ्याच असतात. आणि मग जर का हे लक्षात राहिले नाही..तर या अध्यायातून त्या अध्यायात उडी पडते. याच घडणार्‍या प्रकाराला म्हणतात, संचार-जाणे! उदाहरणा दाखल आपण आजुन एक दोन संचार पाहू .. सुदुघाहि-पयस्वती: आणि सुदुघाहि-घृतःश्चुतः.. हा शब्दाचा संचार झाला.हा ही सहज लक्षात रहातो. पण अनुस्वारांचे संचार म्हणजे,मेंदूची शस्त्रक्रीया करतांना जितकं बारीक..आणि नजर न हलता लक्ष ठेवावं लागेल..तसला भयंकर प्रकार. तो असा - पतामांतरिक्षा आणि पवंतामांतरिक्षा - या शब्दातल्या दुसर्‍या अक्षरावर ,म्हणजे व - वर ..प्रथम अनुस्वार नाही आणि नंतर पुढे, तोच अनु-स्वार-झालेला आहे!!! इतका सूक्ष्म फरक लक्षात राहाणे मुश्किल..आणि मग इकडून तिकडच्या आध्यायात उडि पडणे निश्चित! (यातलं पंचसूक्त पवमान..हे पाठ-ठेवायला अत्यंत कर्मकठिण आहे. मला स्वतःला हे पाठ झाल्यापासून सलग तिन महिने याची आवृती ठेवल्यानंतरही..पुढे पुन्हा सलग २ महिने पाठ म्हणताना, रोज २ अथवा ३ संचार-जायचेच! आणि ते ही रोज वेगवेगळे! आज ह्या गल्लीत चुकलो,की उद्या त्या गल्लीत! रामा..शिवा..आणि गोविंदा..बाकि काही नाही! )

आता आपल्या सुप्रसिद्ध रुद्रातला हा शब्दसंचार..,प्रत्यक्षच कसा-जातो..?ते पहा...
(रुद्रामधे, आकरा नमका'चे आणि आकरा चमका'चे असे एकंदर २२अनुवाक आहेत.)

यातल्या नमकाच्या पहिल्या अनुवाकातल्या तिसर्‍या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनुरघोरा पापकाशिनी। आणि पुढची (वेगळी)ओळः- तयानस्तनुवा शंतमया गिरिशंता भिचाकशीहि॥

आता इथून सरळ नमकाच्या दहाव्या अनुवाकातली दुसर्‍या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनु:शिवाविश्वा हभेषजी। आणि पुढची (वेगळी)ओळ:- शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥

आता यात जर का रुद्र म्हणणारा माणूस पहिल्या अनुवाकात , यातेरुद्र शिवातनु च्या पुढे शिवाविश्वा हभेषजी असे चुकून म्हणून गेला..तर त्याची पाठांतर पद्धतीमुळे मेंदूत कोरली गेलेली पुढची ओळ ही दहाव्या अनुवाकातली ,म्हणजे शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥
.., हीच तोंडातून उमटणार. हा गेला संचार! आणि याच्याही अगदी उलट घडून दहाव्या अनुवाकातून पहिल्या अनुवाकात असा उलटंही तो येणार.म्हणजे - संचार जाणार!

आणि कित्तीही कुशाग्र बुद्धिमत्तेचा माणूस असला , तरी संपूर्ण एका वेदातले असे हजारो संचार लक्षात ठेवणं हे सामान्य बुद्धीमत्तेच्या बाहेरचचं काम.. मग हे काम सोप्प व्हावं म्हणून पुढे .. वेदांमधे पद/क्रम/जटा/माला/घन अशी सोय निर्माण करण्यात आली. याचा उचित वापर केला..कि हे संचारचं गाडं आडवं आलं, तरी त्याला नीट उभं करता येतं. (याविषयी पुन्हा केंव्हा तरी असच लिहिन! ) अर्थात, ज्या अध्ययनाचा आधार फक्त आणि फक्त पाठांतर हाच (राहिला)होता, त्या अतीप्राचीन (लेखनकलेची सुरवातही न झालेल्या) कालखंडात अश्या तर्‍हेच्या युक्त्या अथवा सोयी सुचणं, हे ही त्याच मानवी बुद्धीशी सुसंगतच म्हटलं पाहिजे. मग त्याचं समर्थन आजच्या आणि यापुढच्या काळात कोणत्याही पद्धतीनी अगर हेतूनी होवो.

आज हा पाठांतर पद्धतीचा छोटासा आढावा घेणारा लेख लिहुन झाला याचं समाधान एका कारणानी तर आहेच आहे.

१) वेदज्ञान.., हे त्या किंवा आजच्या अथवा पुढच्या काळात उपयोगी/अनुपयोगी .. उपकारक/अनुपकारक..असं कसंही असलं .तरी .. हे ज्ञान पूर्वी आणि आजही पाठ ठेवणारे जे वेदाध्यायी आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेची जाणिव..या लेखनामुळे करवून देता आली.(एरवी..हे नुसतं सांगून शक्य नाही,आणि नसलंही पाहिजे. Happy ) याशिवाय.., जे लोक:- "ह्हॅ!...हे शिकायला काय अक्कल अथवा बुद्धी लागते?" असे (कोणत्याही हेतूने) म्हणतात..त्यांना.. किमान हा लेख वाचल्यानंतर,पुन्हा असं म्हणताना,काहि क्षण थांबून विचार करावा लागेल...
धन्यवाद. Happy
===============================================
पराग दिवेकर..(हिंदू पुरोहित.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रॉबीनहूड |
ही तुमची पोस्ट आवडली आत्माराव...>> आभारी आहे.

नंदिनी

अतृप्त फॅन क्लब काढा. सुरेख आणि अस्सल पोस्ट. >> धन्यवाद.. वेगळा क्लब वगैरे नको हो __/\__ ..
आपण समतेची तत्व पाळून प्रसृत करायला लागणे..हाच आपला क्लब.

आत्माराव, या पोस्टबद्दल अजून एकदा साष्टांग नमस्कार.
प्रत्येक धर्मीयच आपापल्या धर्माबद्दल असा चिकीत्सक विचार करू लागेल तर जगातले बरेचसे थोतांड नाहीसे होईल.

अत्रुप्त, उत्तम पोस्ट. आजकाल मला माहित असलेला हिंदू धर्म आणि हिंदुत्त्ववादी म्हणणाऱ्यांचा हिंदू धर्म यात काहीच साम्य वाटेनासं झालेलं. तुमची पोस्ट प्रचंड आवडली.
कबीर, तृ आणि त्रु यात खरं खोटं काय आलंय ?

@ तृ आणि त्रु यात खरं खोटं काय आलंय ? >>> अहो ती माझ्याकडूनच अशुद्धी राहिलीये..सुधारतो..थांबा. Happy

निव्वळ गंम्मत म्हणुन लिहिले.
इतक्या थोरांना आम्ही काय पामर शुध्दलेखन शिकवणार ?

@ अत्रुप्त

आपला फॅन आहेच. ब्लोअर व्हायच्या विचारात आहे. आपल्या सर्व लिखाणाशी सहमत. पण त्या एका रॉहु वाल्या पोस्टशी मात्र सहमत !!

बाकी मामा पेलवना नेमकं कुठल्या अंमलाखाली लिहीत असतात हे त्यांनी स्वतःच जाहीर केलेलं असल्याने त्याबद्दल न बोललेलं बरं. त्या अंमलाखाली माणूस हसत सुटतो, रडत बसतो, नाचत सुटतो, कसलीच शुद्ध नसल्यासारखा पळत सुटतो ... हो आणि असंबद्ध आणि बेताल लिहू सुद्धा शकतो.

५:०२ ची पोस्ट मस्त!
आपल्याच फॅनला असं करता येणं धैर्याचं - त्यासाठी स्वतःशीपण प्रांजळ असावं लागतं

लेखाचा (एक) मूळ मुद्दा 'ट्रु ट्रान्समिशनचा'.
त्यासाठी घनादी दिव्य आवश्यक होती का? त्यापेक्षा सोपे मार्ग नव्हते का?
संचाराचेही पूर्ण पटले नाही

एखादा अल्गोरिदम बनतो तेंव्हा त्यामगे खास लॉजीक असतं - या पद्धतिंमागचं तसं लॉजीक कुठे दिलं आहे का?

@ एखादा अल्गोरिदम बनतो तेंव्हा त्यामगे खास
लॉजीक असतं - या पद्धतिंमागचं तसं लॉजीक कुठे
दिलं आहे का?>>> या बद्दल मला ( आज ) काहीही माहिती नाही. आमच्या लोकात विचारून कळलि तर सांगेन.

अतृप्त तुमची लेटेस्ट पोस्ट फार आवडली. तुम्ही डेंजरसली प्रामाणिक अहात. आहे तेच चालू रहण्यात तुमचा व्यक्तीगत आर्थिक फायदा होणार असला तरीही हे चूक आहे ते मी सांगणार हा तुमचा बाणा खरोखर आवडला.

>एकंदर पहाता,महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात कोणताही धर्म दुय्यमच होता.हे माहित नाही काय?

या एकाच वाक्यासाठी तुम्हाला शंभर बिनसाखरेचे लो फॅट मोदक, फॅट फ्री तुपाच्या धारेसह.

>आमच्या एखाद्या वेदपाठशाळेत जाऊन आपल्यातल्या एखाद्या हुशार सत्शील ब्राम्हणेतर मुलाला तिथे वेदोक्त अध्ययन करविण्यासाठी प्रवेश मिळवून दाखवू शकाल काय?

तुमची सर्व पोस्ट इंग्रजीत अनुवादीत करून अ फ्यू गूड मेन मधल्या जॅक निकोल्सन च्या आवाजात म्हणून पहायला हवी. "गामा, यू कांट हॅंडल द ट्रुथ !"

@बाकी मामा पेलवना नेमकं कुठल्या अंमलाखाली लिहीत असतात हे त्यांनी स्वतःच जाहीर केलेलं असल्याने त्याबद्दल न बोललेलं बरं. >>> बाप रे!!! हे असलं काहि आहे की काय? रामा परमेश्वरा. अवघड आहे रे बाबा.. Sad

आत्मारामपंत, तुमची ही डेंजरसली प्रामाणिक पोस्ट प्रचंड आवडली, फार सुरेख आणि सडेतोड लिहिलंय.

अर्थात, कोट्यावधी वर्षे चालत आलेल्या, अस्तित्वात असलेल्या सृष्टी उर्फ बायोस्फीअरला सुरळीत चालण्यासाठी साडेतीन्चार हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या आणि दक्षिण आशियातील एका प्रदेशात काही काळ प्रामुख्याने होणार्‍या (आणि तेही नियमित नव्हे तर अधूनमधून) कर्मकांडातल्या एवढुश्शा आगीची आणि त्याबरोबरच्या मंत्रांची गरज असते असे मानणार्‍यांशी काय तर्क लढवणार? जौद्या झालं.

गापै - जगातील सजीव सृष्टीचं वय, व्याप्ती याच्याशी यज्ञव्यवस्थेचं वय, भौगोलिक प्रसार, यज्ञकर्मात व्यतीत होणारा काल, त्या आगीची तीव्रता याचं त्रैराशिक तुमचं तुम्हीच जुळवा आणि काय ते उत्तर काढा. मला असले निरर्थक हिशोब करायचा कंटाळा आहे. अर्थातच तुमचा हिशोब हा या गोष्टींमधला कार्यकारणभाव दर्शवणारा असण्याचीच संभावना जास्त आहे. Wink

परागशास्त्री दिवेकरांस बालके गामा पैलवानाचा आदरपूर्वक प्रणाम.

आपला इथला प्रतिसाद वाचला. मला उद्देशून केलेल्या टिपणीवरील माझं मत नोंदवतो.

१.
>> वर्ण-व्यवस्था, ही समाजात प्राचीन काळापासून लोकमानसानी धारण करुन ठेवलेल्या कुळगटांची धर्मशास्त्रीय
>> कल्पनांमधे लाऊन-दिलेली सोय आहे. आणि तिचं प्रमुख कारण किंवा वापर.., त्या त्या वेळेसची राजसत्ता
>> अनुकुल असेल,तर आपल्याला हवी ती पिळवणूक निर्माण करुन घेणं..,हे आहे. ..

हे जरा विस्ताराने सांगाल का. एखाद्या कुळाने राजसत्तेला हाताशी धरून पिळवणूक केलीही असेल. पण ही कुळं क्षत्रिय होती. त्यांनी केलेल्या अन्यायाला वर्णव्यवस्था कशी जबाबदार ते कृपया स्पष्ट करावे.

२.
>> शिवाजीमहाराजांनीहि राजकारणात धर्म बाजुला ठेवलेला होता..आणि हरएक धर्माला ..त्याच्या मार्तंडांना
>> ताकिद अगर शिक्षाहि दिलेली होती. गरज पडेल तेथे प्रोत्साहनंही दिलेलें होतं..

बरोबर.

३.
>> एकंदर पहाता,महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात कोणताही धर्म दुय्यमच होता.हे माहित नाही काय?

असं असेल तर रामदासस्वामींनी महाराजांना उद्देशून 'धर्मरक्षी ऐसा नाही' असं का म्हंटलं असावं? (संदर्भ : http://mr.wikisource.org/wiki/निश्चयाचा_महामेरु) तसंच समर्थांच्या आनंदवनभुवनी या रचनेत धर्माचा ठायीठायी उल्लेख आढळून येतो. काही उल्लेख येणेप्रमाणे :

येथून वाढला धर्मु । रमा धर्म समागमे ।
संतोष मांडला मोठा । आनंदवन भुवनी ॥

नाना तपे पुरश्चरणे । नाना धर्म परोपरी ।
गाजली भक्ती मोठी । आनंदवन भुवनी ॥

वेद शास्त्र धर्म चर्चा । पुराने महात्मे किती ।
कवित्वे नूतने जीर्णे । आनंदवन भुवनी ॥

तर रामदासस्वामी म्हणतात तो शिवाजीमहाराजांनी पाळलेला धर्म कोणता?

४.
>> तुमची ही सगळीच समजूत आत्मसमजांवर आधारलेली आणि म्हणूनच भाबडट आहे.

ही माझी समजूत नव्हे. ही पारंपारिक शिकवण आहे. स्वामी विवेकानंदांनी हेच म्हटलंय. विवेकानंद भाबडे होते का? हां, त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस भोळेभाबडे होते. पण विवेकानंद मात्र अजिबात भाबड्या समजुतींच्या आहारी गेलेले नव्हते. ते ब्राह्मोसमाजी नास्तिक होते. श्रीरामकृष्णांनी अनुभूती आणून दिल्यावर मगच ते आस्तिक झाले.

५.
>> सृष्टीनियमनातलं नैसर्गिक उच्चनीचत्व हे अत्यंत वेगळं आहे.आणि काहिही असलं,तरी ते धर्मातल्या मनुष्यनिर्मित
>> उच्चनीचत्वा इतकं घृणास्पद नाहीये.

या घृणास्पद रीतींचा वेदाध्ययनाशी काय संबंध? अर्थात, नैसर्गिक नियमांना अनुसरणारा धर्म आचरण्यास काहीच हरकत नसावी.

६.
>> मी स्वतः जात पाळत नसलो,तरी तुम्ही मला ब्राम्हण समजत असालच..

मी तुम्हाला वेदशास्त्रसंपन्न समजतो. तुम्ही जातीने ब्राह्मण आहात का इतर कोणी यांत मला रस नाही.

७.
>> मग आपलं हे वर्गी-करण नैसर्गिक आहे...,असं तुम्ही प्रामाणिक पणे म्हणाल काय?

हो. जो वेदांचं अध्ययन करतो तो मला सदैव वंदनीय आहे.

८.
>> आपल्या महान वैदिक धर्मानी दिलेलं "जरी जीव उच्चनीच असले तरी त्यांना व्यापून दशांगुळे उरणारा ईश्वर सर्व
>> भूतांच्या ठायी वास करून असतो." हे तत्व आजपर्यंत सार्वत्रिक रित्या पाळलं का गेलं नाही?
>> ...
>> ...सर्वांचा आत्मा एक असतो..हे धर्मतत्व पुढे केलेलं होतंच ना? मग त्यांनाही आपण बासनात का बरे गुंडाळून
>> ठेवत आलो आहोत?

यासाठी शिवाजीमहाराजांसारखा राज्यकर्ता लागतो.

९.
>> अगदी स्वेच्छेनी अंतर्जातीय विवाह करु इच्छिणार्‍यांची आजंही हत्या होण्यापर्यंत मजल जाते? हे कोणता आत्मा
>> एक असल्याचं लक्षण मानावं?

या पाशवी कृत्याचा वेदांशी काहीही संबंध नाही.

१०.
>> आणि सर्वांना व्यापून शिवाय वर दहा आंगुळे उरणारा इश्वर त्या नश्वर देह धारणेवर विश्वास असलेल्या
>> अंतर्जातीय विवाहकांना संरक्षायला एकदाही कसा येत नाही? ते ही सांगा.

तुमची तळमळ मी समजू शकतो. मात्र हा प्रश्न शासनाला करायला हवा. नागरिकांच्या जिवाची प्राथमिक जबाबदारी शासनाची आहे.

एखाद्याने पशुवत वर्तन केलं तर त्याचा दोष ईश्वरावर कसा काय ढकलता येईल?

११.
>> वादात इथे एव्हढं बोललात..व्यवहारात हे स्मृतींचे पुनर्लेखन करायला घेतलयत का?

सर्वात बदनाम स्मृती आहे ती मनुस्मृती. तिची साधी प्रतही मिळत नाही बाजारात. तिच्यात बदल करायचे ठरवले, चर्चा व्हायला हवी ना? चर्चेचं सोडा, इथे मनुस्मृती फक्त जाळण्यात अनेकांना रस आहे. आगोदर जाळपोळीची भाषा थांबवायला हवी. मगंच पुढचा विचार करता येईल.

हिंदूंना नवी स्मृती लिहिण्याचा अनुभव आहे. सिंधप्रांती जेव्हा मुस्लिम आक्रमणे आणि बाटवाबाटवी सुरू झाली तेव्हा देवल नामे ऋषींनी देवलस्मृती लिहिली होती. तिच्यात घरवापसीची प्रक्रिया वर्णिलेली आहे.

१२.
>> आमच्या एखाद्या वेदपाठशाळेत जाऊन आपल्यातल्या एखाद्या हुशार सत्शील ब्राम्हणेतर मुलाला तिथे वेदोक्त
>> अध्ययन करविण्यासाठी प्रवेश मिळवून दाखवू शकाल काय?

हे तुम्ही कुठल्या अर्थी म्हंटलंय ते माहीत नाही. एकंदरीत वेदपाठशाळा चालवण्यात अनेक गंभीर त्रुटी असाव्यात असं दिसतंय. हे तुमचं निरीक्षण पूर्णपणे मान्य. त्रुटी दूर करायलाच हव्यात.

१३.
>> तर स्मृतींमधला "कलियुगात दोनच वर्ण अस्तित्वात आहेत..ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर" हा एक कायदा,आणि त्याला
>> पूर्ण न्याय देणारा "त्रैवर्णिकांना वेदाध्ययन करता येते..(पण पौरोहित्य फक्त ब्राम्हणच करु शकतात..) हा पाचर
>> मारुन ठेवलेला अजुन एक कायदा...स्मृतीग्रंथात आणि व्यवहारात पुनर्लिखित-आचरीत करावा लागेल...दाखवाल
>> करून.. ? मग...आपली वैदिक शिकवण जन्म-जातीवरून उच्चनीचत्व ठरविते, हे क्रूर आणि कपटी पणाचं
>> द्योतक वाटत नाही काय आपल्याला?

वर एके ठिकाणी तुम्ही वेदाध्ययन करणाऱ्याला अर्थज्ञान नसतं असं म्हंटलं आहे. नसतं म्हणण्यापेक्षा अपेक्षित नसतं असं आपण म्हणूया. तर मग वेदाध्यायी हा केवळ भारवाही झाला, नाहीका? तुकोबा म्हणतात की :

वेदाचा तो अर्थ आम्हांसी च ठावा । येरांनी वाहावा भार माथां ॥
- २२५६

तर मग भारवाही येर शूद्राहून श्रेष्ठ मानायचाच कशाला? वेदांमुळे उच्चनीचत्व यायलाच नको माणसामाणसांत.

१४.
>> (सगळ्यांचे आत्मे समान..यानुसार..) ही असली गोंडस दिखाऊ तत्व.. आपल्या धर्माच्या प्रॉडक्ट्ची जाहिरात
>> करण्यासाठी तयार केली जात असतात हो.पण माल-हतात पडायची वेळ आली..की बरोब्बर विक्रेत्याला
>> स्वतःचा लबाड स्वार्थ आठवतो. त्याचे काय???

असतीलही. पण हीच तत्त्वे अनुभवून घ्यायची आहेत यावरही लक्ष हवं. खोट्या नोटा छापून खपवल्या म्हणून खऱ्या नोटांची किंमत कमी होत नसते.

असो.

मी एकंच प्रश्न विचारतो. तुम्हाला प्रश्न योग्य वाटला तरंच उत्तर द्या :

तुम्ही वेदाध्ययन आणि पौरोहित्य का करता?

संभाव्य कारणे (एक वा अधिक) : १. दैववशात हे कार्य अंगावर पडलंय. २. आवडतं म्हणून. ३. दुसरं काही जमत नाही म्हणून निरुपायाने. ४. परंपरेचा अभिमान आहे म्हणून.

उत्तर देण्याची सक्ती नाही. Happy

आपला नम्र,
-गामा पैलवान

गामा पैलवान >>> तुमचा सगळा प्रतिसाद पाहू जाता , तुमचे धर्माशास्त्राबद्दलचे स्वत:चेच समज तुम्ही मुळ धर्मशास्त्र म्हणुन गृहीत धरून जगत आहात असे दिसते. त्यामुळे इथे अजुन एक लांबलचक समजावणुकिचा प्रतिसाद टंकत बसणे मला योग्य वाटत नाही. यावर उत्तर अगर समाधान, आपल्या प्रत्यक्ष भेटीत अथवा फोन वरुनच शक्य आणि ठीक राहील. तो पर्यंत मेलवर बोलू.
माझा मेल आय डी घ्या व आपला ही द्या
Parag.divekar4@gmail.com

तरीही एक आवश्यक उत्तर देऊन मी थांबतो. मी वेदपाठशाळेत (दहाविनंतर..) स्वेच्छेनि गेलेलो आहे.

येथे मी थांबतो.
धन्यवाद. प्रणाम. Happy

@ अतृप्त - तुम्ही एक पारंपरिक व्यवसाय स्वेच्छेने निवडला आहे. पण या व्यवसायात असूनही तुमची निरीक्षणशक्ती, विश्लेषण, आकलन हे सर्व थक्क करणारं आहे. वैज्ञानिक दृष्टीकोण आणखी कशाला म्हणायचं ? अजून काही वर्षांनी तुमचं लिखाण हे याहीपेक्षा प्रगल्भ असणार आहे.

@ गामा
प्रत्येक धागा भकटवलाच पाहीजे का ? तुम्हीच वर्णव्यवस्थेचा विषय काढलाय, त्याला उत्तर दिल्यावर आणखी भरकटत जाऊन पुन्हा प्रतिप्रश्न केले आहेत. या धाग्याचा संबंध आहे का त्याच्याशी ? तुमचं शंकासमाधान व्हावं यासाठी मेलामेलीचा पर्याय आहेच किंवा तुम्हाला आखाड्यातच (फोरममधे) कुस्ती खेळायची असेल तर फीदरवेटमधेच खेळा ना (वेगळा धागा काढा. संबंध नसताना जबरदस्ती कशाला ? ).

लेख उत्तम आणि त्याखालील चर्चाही उत्तम. अत्यंत संयत भाषेत प्रतिसाद दिल्याबद्दल विशेष अभिनंदन..

लेखात सांगितलेली पद्धत साधारण वयाच्या किती वर्षापासून सुरु करायला पाहिजे?

हिम्सकूल

@लेखात सांगितलेली पद्धत साधारण वयाच्या किती
वर्षापासून सुरु करायला पाहिजे?…>>> आमच्याच सारखा शिक्षण विषय असेल, तर ५वे किंवा ८वे वर्ष. पण एखादा दूसरा विषय पाठ करायचा असेल, तर अशी कोणतीच अट नाही.

मी गापैच्या पोस्टमधील मजकुराशी बहुतांशी सहमत आहे. Happy पण मुळात या धाग्याचा तो विषयच नसल्याने त्यावर भाष्य करीत नाही. परत कधीतरी.

परागशास्त्री दिवेकरांस बालके गामा पैलवानाचा आदरपूर्वक प्रणाम.

आपला इथला प्रतिसाद वाचला.

१.
>> यावर उत्तर अगर समाधान, आपल्या प्रत्यक्ष भेटीत अथवा फोन वरुनच शक्य आणि ठीक राहील.

आपली चर्चा जाहीर ठेवता आली असती तर इतरांनाही लाभ झाला असता असे वाटते. मात्र या बाबतीत तुमची इच्छा बलीयसी.

२.
>> तुमचे धर्माशास्त्राबद्दलचे स्वत:चेच समज तुम्ही मुळ धर्मशास्त्र म्हणुन गृहीत धरून जगत आहात असे दिसते.

धर्मशास्त्र म्हणजे काय हे मला नीटसं ठाऊक नाही. श्रुती, स्मृती आणि पुराणे यांच्याखेरीज अधिक काही आहे का? त्यावरही प्रकाश पाडलात तर बरं होईल.

३. मला स्वत:ला काही प्रश्न पडले आहेत. आपली खाजगी चर्चा मुद्देसूद होण्यासाठी या प्रश्नांचा उपयोग होईल असे वाटते.

प्रश्न :

१. जर वेदाध्ययन करणाऱ्यास अर्थज्ञान नसेल तर तो (तुकोबा म्हणतात तसा) भारवाही येरा म्हंटला पाहिजे. तर मग भारवाही येरा हा समाजात उच्चस्थानी का म्हणून धरायचा?

२. भारवाही येऱ्याची निपज उत्तम राहावी म्हणून नियम करावेत का? घोडा, गाढव इत्यादी भारवाही जनावरांचा आपसांत संकर केलेला चालतो. कारण जन्माला येणारं खेचर त्याच प्रकारची ओझी वाहायला उपयुक्त असतं. मात्र घोड्याचा उंटाशी वा हत्तीशी संकर केला जात नाही. कारण त्यांची वजन वाहून न्यायची बलस्थाने घोड्याहून वेगळी असतात. तर वेगवेगळ्या भारवाही वेदाध्ययकांची अशीच विविध बलस्थाने हुडकून विकसित करावी का?

३. तुम्ही एके ठिकाणी म्हटलंय की :

>> वर्ण-व्यवस्था, ही समाजात प्राचीन काळापासून लोकमानसानी धारण करुन ठेवलेल्या कुळगटांची धर्मशास्त्रीय
>> कल्पनांमधे लाऊन-दिलेली सोय आहे.

यावरून एक पुस्तक आठवलं : America's 60 Families

वर दिलेल्या दुव्यावरचा रिव्ह्यू कृपया वाचाच. अमेरिकेत भारतीय वर्णव्यवस्था नसतांनाही संपत्ती मूठभर कुळांच्या हातात एकवटलीच ना? हे पुस्तक १९३७ सालचं आहे. तेव्हापासून अमेरिकेत संपत्तीची एकाधिकारशाही आहे. जगात सगळीकडे तेच चालू असतं.

भारतीय धर्मशास्त्रांनी या वस्तुस्थितीला थेट भिडण्याची हिंमत दाखवली. तर मग त्यांचा उगीच कमी लेखण्यात काय अर्थ आहे?

असो.

मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे या बाफवर मिळणे अपेक्षित नाही. मात्र आपली खाजगी चर्चा मुद्देसूद होण्यास निश्चितच मदत होईल. Happy

आपला नम्र,
-गामा पैलवान

बाळू प्याराजम्प्ये,

१.
>> तुम्हीच वर्णव्यवस्थेचा विषय काढलाय, त्याला उत्तर दिल्यावर आणखी भरकटत जाऊन पुन्हा प्रतिप्रश्न केले आहेत.

वर्णव्यवस्थेचा प्रथम उल्लेख परागशास्त्रींच्या संदेशात आला आहे.

२.
>> या धाग्याचा संबंध आहे का त्याच्याशी ?

मलाही नेमका हाच प्रश्न पडलाय. वर्णव्यवस्थेचा या धाग्याशी संबंध मुळी यायलाच नको.

तसेच परागशास्त्रींनी भारतीयांच्या आपसांतल्या फुटीसाठी वर्णव्यवस्थेला जबाबदार धरलंय. ते कशाच्या आधारावर, असा माझा उपप्रश्न आहे.

आ.न.,
-गा.पै.

वर दिलेल्या दुव्यावरचा रिव्ह्यू कृपया वाचाच. अमेरिकेत भारतीय वर्णव्यवस्था नसतांनाही संपत्ती मूठभर कुळांच्या हातात एकवटलीच ना? हे पुस्तक १९३७ सालचं आहे. तेव्हापासून अमेरिकेत संपत्तीची एकाधिकारशाही आहे. जगात सगळीकडे तेच चालू असतं.
>>>

गापै, तुम्हाला भारतातील जातीव्यवस्था ही निसर्गनियमाला अनुसरून होती, उच्चवर्णीय वा ज्यांचे हाती संपत्ती साठली वा ज्ञान साठले ते त्यांच्या जनुकांमुळे/निसर्गदत्त गुणांमुळे होते व ज्यांच्याकडे पक्षी शूद्रादी लोकांकडे असे गुण नसल्यामुळे ते अज्ञानी, रंक, कष्टकरी राहिले असे म्हणायचे आहे का? थेटच म्हणा की.
आणि तसे म्हणणार असाल तर तुमचे युक्तिवाद, तर्क हे घृणास्पद आहेत. तुमचा प्रतिवाद करू नये असे मनापासून वाटते मात्र तो केला नाहीत व तुमच्या विचारासारखे हजारो - लाखो उभे झाले तर किती भयाण परिस्थिती येईल असे वाटून भिती वाटते.

भारतात indiana religious freedom bill (हे गूगल करा अधिक माहितीसाठी) सारखे काही येवू नये ही नसलेल्या इश्वरचरणी प्रार्थना.

गामांचे युक्तिवाद व विचारधारेचा स्रोत कुठे आहे ते माहिती नाही. वर कुणीतरी नागपूरकडे निर्देश केला होता. नागपूर कितीही प्रतिगामी असले अनेक बाबतीत तरी जात-पात मोडणे व ती व्यवस्था हे भारतातील हिंदू समाजाच्या र्‍हासाचे एक मोठे कारण आहे असे मी बघितलेल्या नागपूरात दिसले. तेव्हा टिका करा मात्र पडताळून केलीत तर उत्तम.
बन्च ऑफ थॉट्समध्ये चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला आहे असा आरोप होतो. मात्र बन्च ऑफ थॉट्स नागपूरची घटना नव्हे तसेच नागपूर बन्च ऑफ थॉट्स वर चालते असेही नाहिये.
-एक नागपूर विरोधी.

घो

घोड्याचा उंटाशी वा हत्तीशी संकर केला जात नाही. कारण त्यांची वजन वाहून न्यायची बलस्थाने घोड्याहून वेगळी असतात.

....

Proud

Pages