वेदाध्ययनातील- संथा देणे... अर्थात वेदाभ्यास शिक्षण/पाठांतर पद्धती.

Submitted by अत्रुप्त आत्मा on 25 March, 2015 - 08:42

खुलासा:- वेदपाठशाळांमधे प्राचीन काळापासून अध्ययन/अध्यापनाची एकच एक अशी, परंपरागत पद्धती रहात आलेली आहे. ही पद्धती फक्त पाठ करून ठेवण्याच्या विषयाकरिताच निर्माण झालेली आहे. हिला सामन्यतः मौखिकी अध्यापन पद्धती असे म्हटले जाते. ह्या पद्धती विषयी खूप जणांच्या मनात कुतुहल,आस्था,चिकित्साभाव इत्यादी असते. आंम्हा पुरोहित मंडळीना काम करत असताना,पाठांतर पाहुन ह्या अनुषंगानी काहि प्रश्नंही विचारले जात असतात. अश्या सर्व प्रश्नकर्त्यांना हा विषय नीट माहिती व्हावा,एव्हढ्याच हेतूने हा सदर लेख येथे देत आहे.

@संथा देणे म्हणजे काय? >> संथा देणे म्हणजे ,वेदपाठ शिकविणारे गुरुजी , समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचे छोटे तुकडे(चरण)पाडून ,वदवून आपल्या मागे घोकायला/म्हणायला सांगतात..याला प्राथमिक अर्थानी संथा-देणे असे म्हटले जाते. यापुढे...(विद्यार्थ्यांनी)संपूर्ण पाठांतर करण्याच्या विशिष्ट पद्धतीला, संथा घालणे अगर संथा म्हणणे ..असे म्हटले जाते. एखादा विषय/याज्ञिकातला प्रयोग/संहितेचा अध्याय (तोंड)पाठ करताना, संथा म्हणण्याचे ४ ट्प्पे असतात.
१) चरणाची संथा(४वेळा) २) अर्धनीची संथा(४वेळा) ३) ऋचेची संथा(४वेळा) ४) गुंडिकेची संथा(४वेळा) = एकंदर १६ संथा.

१)चरणाची संथा:- चरणाच्या संथेत, गुरुजिं..प्रथम समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचा एकेक चरण दोनदा सांगतात.. मग विद्यार्थ्यांनी पोथित बघून तो त्यांच्या मागून ७वेळा घोकायचा. यात म्हणताना चूक झाली,की पुन्हा सुरवात. यात शुद्धअक्षर,जोडाक्षर,त्याचे गुरुत्व,अनुस्वारांचे उच्चार,स्वराघात,र्‍हस्व आणि दीर्घ/प्रदीर्घ-अश्या काना ,मात्रा,वेलांट्या,उकार, विसर्ग आणि त्यांचे तसेच उच्चार ,हे शंभर टक्के शुद्ध होत आहेत की नाहीत? हे गुरुजी कसून तपासत असतात. (कारण एकदा अशुद्ध पाठ झालं..की ती (मेंदूत उमटलेली) प्रींटाऊट,नंतर पुसणं कर्मकठीण असतं.) तर..हे स्तोत्रातले पाडलेले एकेक चरण ७ वेळा घोकत संपूर्ण अध्याय वा स्तोत्र - पूर्ण केलं जातं... ही झाली "चरणाची" पहिली संथा. अश्या चार संथा झाल्या की 'चरण' पूर्ण होतो. ही सगळी संथा गुरुजिंसमक्ष होते. (कारण तेच-मंत्रात अजिबात अशुद्धी राहू नये.)

२)अर्धनीची संथा:- अर्धनीच्या संथेत ,सामान्यतः दोन चरण एकत्र घेऊन..किंवा मंत्राची अर्धी ओळ सात वेळा म्हटली जाते. (काहि वेळा जगतिच्छंदा सारखा,मंत्राचा लांबलचक छंद असेल,तर एका ओळीत ४/४ किंवा अगदी ६/६ चरणंही पाडावे लागतात) आधी चरण डोक्यात-बसलेला असतोच..त्यामुळे इथपासून गुरुजी समोर नसले,तरी चालते. तर.. ही...एकामागून एक ओळ पूर्ण ७ वेळा घोकत ...संपूर्ण अध्याय पूर्ण केला... की अर्धनीची १ संथा झाली...आता अश्याच पुढे अजुन ३ संथा म्हणायच्या..म्हणजे या अर्धनीच्या चार संथा होतात.

३)ऋचेची संथा:- ऋचेच्या संथेत..मागील अर्ध्या ओळीच्या संथेचा पुढचा भाग सुरु होतो..म्हणजे आता २ ओळिंची संपूर्ण ऋचा ,आणि पुढच्या ऋचेचा पहिला चरण(धरुन) ..,तसे ७ वेळा म्हणायचे. यातील पुढच्या ऋचेचा पहिला चरण त्यात घेण्याचे वैशिष्ठ्य असे..की यामुळे संपूर्ण अध्यायातल्या प्रत्येक पहिल्या ऋचेची-दुसर्‍या ऋचेशी गुंफण तयार होते. (कनेक्टींग होते.) ऋचे'तल्या या (पहिल्या)संथेवर,शिकविणार्‍या गुरुजिंचे बारीक लक्ष असते. (कारण तेचः- अशुद्धी आली कींवा मधे कुठे तयार झालेली आहे काय? हे पहाणे.) ह्या ऋचेच्या परत पुढे तीन संथा म्हणायच्या. म्हणजे या ऋचेच्याही एकंदर चार संथा पूर्ण होतात.

४) गुंडीकेची संथा:-..हा शेवटचा, परंतू अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. आता मागील ऋचेच्या संथेनी हीचेच निम्मे काम केलेले असते. पण तरिही.., आता कितीही पाठ येत असले..तरी(यातल्या पहिल्या संथेला) पोथीत पाहूनच..सदर पाठांतराच्या अध्यायाचा एकेक अनुवाक अथवा वर्ग (पॅरेग्राफ) ७/७ वेळा म्हणायचा असतो. आणि तो सगळा अध्याय पूर्ण करायचा असतो. ही झाली गुंडिकेची पहिली संथा.. अश्या अजुन तीन म्हणून ,ह्या गुंडिकेच्या चार संथा पूर्ण करायच्या. या गुंडिकेच्या संथेमधे, साधारणपणे दुसर्‍या किंवा तिसर्‍या संथेपासून ,(आता) विद्यार्थ्याची..इच्छा अगर तयारी-नसली तरी विद्यार्थ्यांनी पोथित न पहाताच ,मान वर करुन संथा म्हणायची असते. कारण त्याशिवाय-पाठ येणे..ही क्रीयाच आकाराला येऊ शकत नाही. अर्थात कोणत्याही सर्व सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याला यातल्या शेवटच्या २ संथांमधे सर्वकाहि बिनचूक तोंडपाठ-येतेच. पण त्याहून(बुद्धिनी) आगे/मागे जे असतील..त्यांना कमी अगर जास्त कष्ट घ्यावे लागतात. तर,अश्या ह्या एकंदर १६ संथा घातल्या की आपल्याला अपेक्षित असलेला पाठांतराचा विषय-तयार होतो.

आता आपण याचे-संकलित..,एका स्तोत्रपाठांतराच्या उदाहरणाद्वारे पाहुया. (हे आणखि डिटेलिंग,विशिष्ट हेतूनी आणि जाणिवपूर्वक करत आहे.)

चरणाची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं,(७वेळा) गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा)
भक्तावासं स्मरेन्नित्यं, (७वेळा)आयुःकामार्थसिद्धये॥(७वेळा)

प्रथमं वक्रतुण्डं च,(७वेळा) एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा)

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं,(७वेळा)गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा).....
असेच प्रत्येक चरण म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे चरणाची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की चरणाची मुख्य संथा पूर्ण होते.

अर्धनिची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा)
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥(७वेळा) ॥

प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा)

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा).....
अशीच प्रत्येक अर्धनि/अर्धी ओळ म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे अर्धनिची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की अर्धनिची मुख्य संथा पूर्ण होते.

ऋचेची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥..प्रथमं वक्रतुण्डं च(७वेळा)

प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ लम्बोदरं पञ्चमं च(७वेळा).....
अशीच प्रत्येक ऋचा ,पुढल्या ऋचेचा पहिला चरण तिच्यात लावुन म्हणत स्तोत्र एकेक ऋचेनी म्हणत पूर्ण घोकायचे असते..मग येथे ऋचेची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की ऋचेची मुख्य संथा पूर्ण होते.

गुंडिकेची म्हणायची संथा:-
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥ (सुरवात ते शेवट -७वेळा..)
.....असेच सुरवात ते शेवट -७वेळा.. म्हटले,की मग येथे गुंडिकेची एक संथा पूर्ण होते.अश्याच प्रकारे अजुन तिन संथा म्हटल्या,की गुंडिकेची मुख्य संथा पूर्ण होते.

आता आपल्याला आवश्यमेव असा एक प्रश्न पडेल,की "(बुद्धिचा..)इतका बारीक किस पाडून, ही पाठांतर पद्धती तयार होण्या/करण्यामागचे प्रयोजन काय बरे असावे???" Happy

उत्तरः- ज्या काळात ही पद्धती आली/विकसीत झाली.तो काळ लेखनकलेची सुरवातहि न झालेला असा काळ होता. अश्या वेळी आपल्या जिवापाड जपाव्याश्या वाटणार्‍या गोष्टींपैकी, ही मंत्र /काव्य/स्तोत्र जतनाची एक गोष्ट होती. आणि याशिवायंही ,पुढे लेखनकला विकसीत झाल्यावर..जो विषय वारंवार म्हणावा,वापरावा लागणार आहे..त्यासाठी भल्यामोठ्ठ्या पोथ्यांची बाडे बरोबर घेऊन हिंडणे.हे ऋषीमुनिंपासून ते सामन्यजनांपर्यंत सर्वांनाच त्याकाळी सोपे नव्हते. त्याशिवाय पोथ्या पाण्यानि/आगिमुळे,वाळवी/कसर लागण्यापुळे खराब होणे अशिही कारणे होतिच. आणखि म्हणजे, परस्पर विरोधीमतांच्या गटांनी एकमेकाचे लिखित स्वरुपातिल वांङगमय नष्ट करणे,हे ही एक प्रबळ कारण त्याकाळी होतेच...या अश्या सर्व कारणांसाठी हे ज्ञान मुखोद्गत-पाठ ठेवावे लागले असेल.(आमच्याकडला अचुक शब्द म्हणजे-जिवंत ठेवावे लागले असेल.) आणि विशेषतः जर ते जसे च्या तसे पाठ ठेवावे लागले असेल,तर त्याला अशीच तंतोतंत शब्दपाठांतराची पद्धती असायला हवी होती. आणि म्हणुन तसे जर का एकदा पाठ झाले,आणि त्याच्या वारंवार आवृत्या* म्हणुन पाठ ठेवलेही गेले, तर वरिल कारणांनी येणारे नष्टतेचे भय बाळगावे लागत नाही, हे तर निश्चित आहे. (आज आपण हे आपल्याला हव्या त्या सर्व विषयांसाठि, हजारो प्रकारच्या रेकॉर्डिंगच्या साधनांनि करतच असतो. Happy )

आता जसेच्या तसे...म्हणजे काय हो नक्की? तर खाली दिलेले हे गणपतिस्तोत्र पहात पहात ह्या लिंकवर http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3 जाऊन हे क्लिपिंग ऐका. जेणेकरुन ह्या पद्धतिनी पाठ केले असता,जसेच्या तसे मेंदुत उमटते..म्हणजे काय होते? ते कळणे सहज होइल Happy
(गायकबियक कुणी नाही.. मीच आमच्या(उच्चार)पद्धतिनी म्हटलेलं आहे हां! Wink )
http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥

.........................................................................................................................

आवृत्ति*:- हा वेदाध्ययनातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. एकदा पाठ झालेला विषय/अध्याय..किमान २ वर्ष तरी दररोज १ आवृत्ती म्हणून जिवंत-ठेवावा लागतो. नाहितर आमच्याकडल्या प्रसिद्ध म्हणी प्रमाणे..तो नवव्या दिवशी नवा-होतो. म्हणजे अक्षरशः पुन्हा संथा-घेऊन शिकण्याच्या पातळीवर येतो. आणि असंही हे सोपं काम नसतच. नुसती ऋग्वेदाची संहिता घेतली..तरी त्यात आठ अष्टके..म्हणजे ६४ अध्याय आहेत. अध्ययन सुरु झाल्यापासून जसजसे पाठांतर वाढत जाइल..तसतसा हा आवृतीचा काळ वाढत जातो. आणि दर दोन वर्षानी समांतर होत रहातो. मग पुढे ब्राम्हण/आरण्यक्/उपनिषदे/शिक्षाचतुष्टय/ज्योतिष(फलज्योतिषवालं नव्हे!)/शास्त्र/निरुक्त असे अनेक ग्रंथोपग्रंथ पचवत, जिवंत ठेवत, अध्ययन करावे लागते..एका वेदाच्या दशग्रंथांच्या अध्ययनाला पहिल्या वर्षाला ६ तास.. इथून सुरवात होऊन..शेवटच्या वर्षाला हा शिक्षण कालावधी १६ ते १८ तासांपर्यंत जाऊन बसतो. म्हणूनच ऋग्वेदाचे दशग्रंथ पूर्ण कंठस्थ (पाठ) होण्याचा कालावधी किमान १२ वर्षे आहे.

पाठांतरातील अग्निदिव्य :- संचार जाणे .. संचार.., हा पाठांतराच्या वाटेतला अटळ सहप्रवासी आहे. आता संचार म्हणजे काय? तर एकसमान किंवा तोच तोच.. शब्द वा मंत्र ,संपूर्ण अध्ययनाच्या विषयांमधे कुठेही वारंवार येणे.. यामुळे काय होते? तर ..एका महारस्त्यावर जवळ जवळ सारखी नावं असलेले दोन फाटे असतील..तर नामसाधर्म्याच्या गोंधळामुळे, माणूस जसा या ऐवजी त्या गावात पोहोचावा. तसे काहिसे, हे सारखे-मंत्र अथवा शब्द करीत असतात. ऋग्वेदाच्या नुसत्या संहितेमधे असे हजारो संचार आहेत. नुसतं त्याच संहितेमधून वेगवेगळे पाच अध्याय व दोन सूक्त एकत्र करून निर्मिलेलं जे पंचसूक्त पवमान आहे..त्यात सुमारे आडिचशे संचार आहेत. बरं.., हे संचार म्हणजे फक्त (समान)शब्द आणि संपूर्ण अथवा अर्ध्या (समान)मंत्राचेच आहेत काय? आणि नुसते तेव्हढेच आहेत काय? तर..तसे नाही. काहि ठिकाणी तर, फक्त या अध्यायात या ओळीत विशिष्ट शब्दावर मात्रा आहे ..आणि एकदम पुढच्या कुठल्या तरी अध्यायात तोच मंत्र पण त्याच ओळिवर विशिष्ट शब्दावर (आता) मात्रा नाही, एव्हढाच फरक आहे. म्हणजे ही पवमानातली गंमत बघा. एके ठिकाणी "शुंभमा ऋतायुभि:" असे आहे,तर दुसरीकडे , "शुंभमानो ऋतायुभि:" असे आहे. परत दोन्ही कडच्या पुढच्या ओळी निसंशय वेगळ्याच असतात. आणि मग जर का हे लक्षात राहिले नाही..तर या अध्यायातून त्या अध्यायात उडी पडते. याच घडणार्‍या प्रकाराला म्हणतात, संचार-जाणे! उदाहरणा दाखल आपण आजुन एक दोन संचार पाहू .. सुदुघाहि-पयस्वती: आणि सुदुघाहि-घृतःश्चुतः.. हा शब्दाचा संचार झाला.हा ही सहज लक्षात रहातो. पण अनुस्वारांचे संचार म्हणजे,मेंदूची शस्त्रक्रीया करतांना जितकं बारीक..आणि नजर न हलता लक्ष ठेवावं लागेल..तसला भयंकर प्रकार. तो असा - पतामांतरिक्षा आणि पवंतामांतरिक्षा - या शब्दातल्या दुसर्‍या अक्षरावर ,म्हणजे व - वर ..प्रथम अनुस्वार नाही आणि नंतर पुढे, तोच अनु-स्वार-झालेला आहे!!! इतका सूक्ष्म फरक लक्षात राहाणे मुश्किल..आणि मग इकडून तिकडच्या आध्यायात उडि पडणे निश्चित! (यातलं पंचसूक्त पवमान..हे पाठ-ठेवायला अत्यंत कर्मकठिण आहे. मला स्वतःला हे पाठ झाल्यापासून सलग तिन महिने याची आवृती ठेवल्यानंतरही..पुढे पुन्हा सलग २ महिने पाठ म्हणताना, रोज २ अथवा ३ संचार-जायचेच! आणि ते ही रोज वेगवेगळे! आज ह्या गल्लीत चुकलो,की उद्या त्या गल्लीत! रामा..शिवा..आणि गोविंदा..बाकि काही नाही! )

आता आपल्या सुप्रसिद्ध रुद्रातला हा शब्दसंचार..,प्रत्यक्षच कसा-जातो..?ते पहा...
(रुद्रामधे, आकरा नमका'चे आणि आकरा चमका'चे असे एकंदर २२अनुवाक आहेत.)

यातल्या नमकाच्या पहिल्या अनुवाकातल्या तिसर्‍या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनुरघोरा पापकाशिनी। आणि पुढची (वेगळी)ओळः- तयानस्तनुवा शंतमया गिरिशंता भिचाकशीहि॥

आता इथून सरळ नमकाच्या दहाव्या अनुवाकातली दुसर्‍या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनु:शिवाविश्वा हभेषजी। आणि पुढची (वेगळी)ओळ:- शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥

आता यात जर का रुद्र म्हणणारा माणूस पहिल्या अनुवाकात , यातेरुद्र शिवातनु च्या पुढे शिवाविश्वा हभेषजी असे चुकून म्हणून गेला..तर त्याची पाठांतर पद्धतीमुळे मेंदूत कोरली गेलेली पुढची ओळ ही दहाव्या अनुवाकातली ,म्हणजे शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥
.., हीच तोंडातून उमटणार. हा गेला संचार! आणि याच्याही अगदी उलट घडून दहाव्या अनुवाकातून पहिल्या अनुवाकात असा उलटंही तो येणार.म्हणजे - संचार जाणार!

आणि कित्तीही कुशाग्र बुद्धिमत्तेचा माणूस असला , तरी संपूर्ण एका वेदातले असे हजारो संचार लक्षात ठेवणं हे सामान्य बुद्धीमत्तेच्या बाहेरचचं काम.. मग हे काम सोप्प व्हावं म्हणून पुढे .. वेदांमधे पद/क्रम/जटा/माला/घन अशी सोय निर्माण करण्यात आली. याचा उचित वापर केला..कि हे संचारचं गाडं आडवं आलं, तरी त्याला नीट उभं करता येतं. (याविषयी पुन्हा केंव्हा तरी असच लिहिन! ) अर्थात, ज्या अध्ययनाचा आधार फक्त आणि फक्त पाठांतर हाच (राहिला)होता, त्या अतीप्राचीन (लेखनकलेची सुरवातही न झालेल्या) कालखंडात अश्या तर्‍हेच्या युक्त्या अथवा सोयी सुचणं, हे ही त्याच मानवी बुद्धीशी सुसंगतच म्हटलं पाहिजे. मग त्याचं समर्थन आजच्या आणि यापुढच्या काळात कोणत्याही पद्धतीनी अगर हेतूनी होवो.

आज हा पाठांतर पद्धतीचा छोटासा आढावा घेणारा लेख लिहुन झाला याचं समाधान एका कारणानी तर आहेच आहे.

१) वेदज्ञान.., हे त्या किंवा आजच्या अथवा पुढच्या काळात उपयोगी/अनुपयोगी .. उपकारक/अनुपकारक..असं कसंही असलं .तरी .. हे ज्ञान पूर्वी आणि आजही पाठ ठेवणारे जे वेदाध्यायी आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेची जाणिव..या लेखनामुळे करवून देता आली.(एरवी..हे नुसतं सांगून शक्य नाही,आणि नसलंही पाहिजे. Happy ) याशिवाय.., जे लोक:- "ह्हॅ!...हे शिकायला काय अक्कल अथवा बुद्धी लागते?" असे (कोणत्याही हेतूने) म्हणतात..त्यांना.. किमान हा लेख वाचल्यानंतर,पुन्हा असं म्हणताना,काहि क्षण थांबून विचार करावा लागेल...
धन्यवाद. Happy
===============================================
पराग दिवेकर..(हिंदू पुरोहित.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्मुगुरजी _/\_ जबरा!!!!

हे किती हजारो वर्षांपासून सुरु असेल नाही का!! मझ्यामते "मैनेजमेंट ऑफ़ इंफोर्मेशन सिस्टम्स" चा हा जगातला सर्वात जुना अन अजुन वापरात असलेला प्रकार असावा!!!

नुकताच वाराणसी ला जाऊन आलोय तिथे संथा घेत घाटावर बसलेली लहान मुले पाहून मस्त तंद्री लागत असे त्याचे तांत्रिक पृथक्करण दिल्या बद्दल आभारी आहोत

खूप छान लिहिलय.

इथे अस्थानी वाटेल तरी एक प्रश्न विचारते. मुलांची (आणि मुलींची सुद्धा) मुंज का करतात. आजच्या काळात त्याचे काय महत्त्व असू शकेल.

खुप छान वाटलं वाचून. पुर्वॉ शालेय अभ्यासातही पाठांतरावर भर असायचा.
पाठांतर जर योग्य तर्‍हेने केले तर पुढे त्याचा खुप उपयोग होतो, हे मीदेखील (अर्थात अभ्यासाच्या बाबतीत ) अनुभवले आहे. नंतर हि सवय राहिली नाही, याचा मात्र खेद होतोय.

माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद.
पूर्वी याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता क्लिष्ट भाषा आणि एकंदरीत उडवाउडवी यामुळे सगळे डोक्यावरुन गेले होते. तुम्ही उदाहरणे देत फार छान पद्धतीने सांगितल्याने पहिल्यांदाच नीट कळले. लिहित रहा.

सुंदर माहिती.

वेदांमधे पद/क्रम/जटा/माला/घन>> याबद्दल कुठंतरी वाचलंहोते. ती माहिती वाचूनच भांजाळायला झालं होतं>

गुरुजी,
सुंदर सुरुवात्,पु भा प्र,

(आप्ल्या या लिखाणाने काही तरी माझ्या या बथ्थड डोक्यात काहितरी चांगला प्रभाव पडावा हि ईश्वर चरणी प्रार्थना)

वरदा, बरोबर. तेच आठवत होतं. (तुझीच पोस्ट आहे हेहे आठवत होतं Happy )

यावर अजून जरा सविस्तर लिहिलंत तर बरे होइल.

परागशास्त्री दिवेकरांस बालके गामा पैलवानाचा विनम्र प्रणाम.

आपला लेख वाचून संतोष वाटला. वेदाध्ययन कसे चालते याविषयी उत्सुकता होती. ती हळूहळू शमते आहे. Happy

आपण म्हंटलेले स्तोत्र ऐकले. एक शंका मनी आली. सातव्या श्लोकात "फलं लभेत्" चा उच्चार "फलं लभेत" (शेवटचा त पूर्ण) असा ऐकू येतो. यामागे काही खास कारण आहे का? तसेच आठव्या श्लोकात "अष्टभ्यो" चा उच्चार "अष्टेभ्यो" असा ऐकू येतो. हे देखील सकारण आहे का?

आपण पूजेचे गुरुजी आहात हे ठाऊक होते. परंतु वेदशास्त्रसंपन्नही आहात हे नुकतेच विदित झाले. अतिपरिचयात् एखादा शब्द अधिकउणा गेला असल्यास कृपया क्षमा असावी.

आपला नम्र,
-गामा पैलवान

खूप दिवसांनी एक छान लेख वाचला. मला ह्या लेखाची मांडणी, प्रवाहीपणा, नेमकेपणा आणी नेटकेपणा आवडला.

खुपच मस्त. अगदी नविनच विषयाची माहिती मिळाली. पाठांतराची ही पद्धत वापरुन बघायला पाहिजे.
बरं जरा अवांतर: ऋग्वेदात काय सांगितलंय? म्हणजे "थीम" काय? माझ्या मुस्लिम मित्राने विचारलं तर मला सांगता आलं नाही.

वा! बरीच नवीन माहिती कळली आणि उदाहरणामुळे समजून घेणे सोपे झाले. धन्यवाद!
संचाराची संकल्पना खूपच भारी आहे! रामरक्षेतदेखिल कुठे संचार आहे का? पाठ आहे मला पण छंद बदलला की वाटत राहते की चुकीचे म्हणतेय की काय!

मस्त लेख. नताशा म्हणते तशी नविन विषयाची सविस्तर माहिती मिळाली.
या पाठांतराच्या पद्धतीचा बाकीच्याही गोष्टी पाठ करायला उपयोग होतो का हे खरच करून बघायला हवे.
जिज्ञासा, मला पण रामरक्षेचीच आठवण झाली. म्हणताना मध्येच ऑलरेडी म्हणून झालेलं परत म्हटलं जातय असं होतं अनेकदा ते त्या संचारामुळेच काय?

वा! खूप छान. खूपच कठीण आहे या पध्दतीने पाठांतर करणं आणि ही परंपरा हजारो वर्षं अशी जपली आहे.
अजूनही कुठे सिन्सियरली पठण सुरु असेल तर ऐकायला मस्त वाटतं. मग ते मंत्रपुष्पांजलीपासून अथर्वशीर्षापर्यंत काहीही असेल. कळत नाही फारसं पण ऐकून बरं वाटतं हे नक्की.

नताशा
@ऋग्वेदात काय सांगितलंय? म्हणजे "थीम" काय? माझ्या मुस्लिम मित्राने विचारलं तर मला सांगता आलं नाही.>>> असं एक तर्फी किंवा एका बाजुनी ,थीम काय? हे सांगता येणार नाही. तरिहि सामान्यतः ऋग्वेद हा देवतांना आवाहन करण्यास,म्हणजे मंत्र म्हणून बोलाविण्यास योग्य. यजुर्वेद हा यजनास, म्हणजे यज्ञयागास अनुकूल्,सामंवेद हा मंत्र गायनास,म्हणजे ..देवतांच्या स्तुतीवर्णनास वाहिलेला,आणि अथर्ववेद हा जारणमारणादी समस्त तंत्रोक्त क्रीयाकल्पांचा अधिपती...अशी विभागणी आपणाला गृहित धरता येइल.

अता यातला दुसरा भाग्,जो आपण म्हणता की "माझ्या मुस्लिम मित्राने विचारलं" ..,तर त्यासाठी एक सूचना अशी देऊन ठेवतो,की आपल्याला वेदांची भाषांतरे (इंग्रजी/मराठी/हिंन्दी) वाचावी लागतील..,आणि त्याला,काय ते.. सांगावं लागेल..हे एक.आणि दुसरं..त्याला,"तुमच्या धर्मपंडितांनी केलेली भाष्य माहित-नाहित काय?" ..असं सरळ विचारता येइल. लक्षात ठेवा की खास करून मुस्लिम अथवा ख्रिश्चन धर्मीय आपणास असे प्रश्न विचारत असतील्,तर तो त्यांच्या धर्मप्रसाराच्या मार्गातील एक महत्वाचा टप्पा,म्हणून त्यांनी केलेला हा "प्रश्न विचारण्याचा" (त्यांचा..)आचारर्धर्मच असू शकतो. कुठुनतरी ,समोरच्याचा धर्म आपल्यापेक्षा कमी-आहे,हे त्याचं त्याच्याच निदर्शनास आणुन देणं,हा त्यातला त्यांचा महत्वाचा भाग आहे. त्याला सरळ-"तू आमच्या हिंदू धर्म पंडितांनाच विचार"..,असे सांगुन आपण मोकळ्या व्हा..हे उत्तम. Happy
=====================================
जिज्ञासा
@रामरक्षेतदेखिल कुठे संचार आहे का? पाठ आहे मला पण छंद बदलला की वाटत राहते की चुकीचे म्हणतेय की काय!

रामो दाशरथिः शूरो, लक्ष्मणानुचरो बली ।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः, कौसल्येयो रघूत्तमः ।।२२।।
.................................................................................................
रामं लक्ष्मणपूर्वजम् रघुवरम्, सीतापतिं सुन्दरम्
काकुत्स्थङ् करुणार्णवङ् गुणनिधिं, विप्रप्रियन् धार्मिकम् ।
राजेन्द्रं सत्यसन्धन्, दशरथतनयं, श्यामलं शान्तमूर्तिम्
वन्दे लोकाभिरामम्, रघुकुलतिलकम्, राघवम् रावणारिम् ।।२६।।

@काकुत्स्थः >>> हा तो संचार आहे.

खूप छान वाटलं आणि २२ वर्षांनी हे सगळं माझ्यासाठी रिपीट झालं. मी २२ वर्षांपूर्वी अशीच भगवद्गीतेची संथा घेतली होती, पण सगळ्या अध्यायांची नाही घेता आली. ६ ते १० घेतली. बाकी मग नुसतं पठण. पण १८ पूर्ण शिकले.
आज हे सगळं वाचून खूप मस्त वाटलं आणि माझ्या सरांची खूप आठवण आली.
मनापासून आभार Happy

वेल
@ मुलांची (आणि मुलींची सुद्धा) मुंज का करतात. >> त्यांना वेदाध्ययन..म्हणजेच शिक्षण सुरु करायचे असते ,म्हणून. एका अर्थी मुंज.. हा वेदाध्ययनाचा गेटपास आहे.
@आजच्या काळात त्याचे काय महत्त्व असू शकेल.>> आता वेदाध्ययन कुणिही करत नाही. म्हणजे या अर्थी मुंज करणे निरर्थकच! पण आजच्या काळात महत्व..म्हणाल तर ह्याची उत्तरे बरीच येतील. ती सर्व देणे इथे अप्रस्तुत ठरेल. तरिही एक सांगतो..आपल्याला जर मनापासून आणि प्रामाणिक पणे असे वाटत असेल,की मुंज केल्यानी त्या मुला/मुलिचे शैक्षणिक जीवन उत्तम होणार आहे. आणि ते ही फक्त मुंज केल्याने नाही..तर मुंज झाल्यावर अध्ययन काळात जे नियम विद्यार्थ्यासाठी सांगितले आहेत. जसे की- नित्यस्नान,दंतधावन या सामान्य गोष्टींपासून ते नीटनेतके कपडे घालणे..आरोग्याची निगा राखणे. दररोज किमान सकाळी एकदा तरी १०८ वेळा गायत्रीमंत्र जप,सूर्यनमस्कार..इत्यादी करणे. आभ्यास विषय सोडून इतर विषयात आसक्त न होऊ देणे.(आणि त्यासाठी ते विषयच टाळणे) .... तर हा कार्यक्रम (प्रोग्रॅम) मुंजिच्या दिवसापासून्च लाऊन धरला..तर मग नक्किच फायदा होइल. आणि हेच त्याचे आजच्या काळातलेही महत्व असेल.
============================================================
स्वाती२
@पूर्वी याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता क्लिष्ट भाषा आणि एकंदरीत उडवाउडवी यामुळे सगळे डोक्यावरुन गेले होते. तुम्ही उदाहरणे देत फार छान पद्धतीने सांगितल्याने पहिल्यांदाच नीट कळले. लिहित रहा.>>> लिहित राहिन.. धन्यवाद. Happy
==========================================
अमितव

@संचार जाण्यावर असलेल्या उपायांवर वाचायला आवडेल>>>आपण एखादा विषय पाठ झाल्यावर ,वारंवार तो म्हणत असताना..लक्षपूर्वक -लक्षात ठेवणे,हाच सामान्यतः उपाय आहे. बाकि पद्,क्रम,जटा,माला , घन.. या विकृतींचा उपयोग करुन संचार-गेला असे निदर्शनास आल्यावर तो शोधता येतो.हे नक्की! त्यासाठी मी पुन्हा या विषयावर लिहिन्,तेंव्हाच डिटेल मधे सांगु शकेन. क्षमस्व.
=================================================
अनिरुद्ध प
गुरुजी,
सुंदर सुरुवात्,पु भा प्र,

@(आप्ल्या या लिखाणाने काही तरी माझ्या या बथ्थड डोक्यात काहितरी चांगला प्रभाव पडावा हि ईश्वर चरणी प्रार्थना)>>> अरे बाप रे! अहो असं काहि नसतं हो. तुंम्ही तुंम्हाला अजिबात न कळणार्‍या विषयांच्या बाबतीत,(स्वतःवर त्यासंमंधी न चिडता) असेच स्वतःला डि-टेलिंग करत रहा. तुमच्यात जर खरच बथ्थड्पणा असेल्,तर तो कायमस्वरुपी निघून जाण्याची प्रक्रीया सुरु होइल. मी ही तुमच्यासारखाच आहे. हे पौरोहित्याचं काम करताना..या डि-टेलिंगची माझी माझ्याबरोबरची सुरवात, माझ्याहुन २ पायर्‍या (मूलतः खरोखरच.. ) खाली असलेल्या लोकांना, पूजेच्या क्रीयांची कृती सांगण्यातून झाली.
म्हणजे मी पूजेला-बसलेल्या यजमानास म्हणालो...'आचमन करा'..त्याला कळले नाही. की अजुन एक पायरी खाली उतरायची.. 'डव्या हतानी पळिनी पाणि घेऊन्,उजव्या हतावर ते घ्या..आणि प्या...असे तिन वेळा करा..चौथ्यांदा ताम्हनात सोडा' . सामान्यतः या पायरीवरची आपण सांगितलेली कृती कळते. पण मला ज्यांनी खरं- तयार केलं..ते लोक याच्याही पुढचे होत. . त्यांना हे ही कळत नाही. (इथुन पुढे हसू आल्यास,मी जबाबदार नाही! क्षमस्व! Lol ) मग मी अजुन एक पायरी खाली उतरतो..' डाव्या हतात पळी घ्या,आता समोरच्या ह्या भांड्यात ती बुडवा..पळीत आलेले पाणि उजव्या हतावर ओता..उजवा हात आपल्या तोंडाजवळ न्या..आणि आता ते प्या...धन्यवाद..असेच पुन्हा एकदा करा..धन्यवाद..असेच अजुन एकदा..व्हेरी गुड..आता असेच पाणि घ्या..आणि-आणि--न पिता ते समोरच्या ताम्हणात सोडा.. वाहव्वा! छान! जमले हो जमले!'.. ..अशी ही कळवून-घेणारी माणसे आहेत.. आणि ह्याच्या नंतरची हे ही न कळणारी माणसे..खरच बिचारी मंद-गतीची तरी असतात..किंवा सरळ सरळ लबाड असतात..त्यांच्याशी हाच डायलॉग कसा होतो..पहा- (हा प्रसंग गेल्या १८ वर्षात माझ्यावर दोनच वेळा,,परंतू आलेला आहे! यावेळी आजुबाजुचं पब्लिक-हसून हसून लिक व्हायला आलेलं होतं..) पहिल्या तीन कृती पद्धती फसल्यामुळे...मी त्यांना सरळ बालवाडीत-घेऊन जातो. कारण त्यांना डाव्या हतात पळी घ्या...असं म्हटलं,तरी खरच काहिही कळत नाही...मग मी- 'काका...ओ काका.. हा जो आपला घड्याळ घालायचा हात असतो ना..त्याची बोटं.. ह्या तांब्याच्या जाड चमच्या जवळ नेऊन वरच्या भागाशी नेऊन दाबली,की ती पळी आपल्या हतात येते...करा बरं तसं...छान! आता ती पळी त्या भांड्यात बुदकन हापटली की तिच्यात पाणि येइल...ते घ्या (इथे माझं ही टेंपर-सटकायला लागतं.. Lol ) आणि उजव्या हातावर ते तळव्याच्या मध्यभागी ओतून...तो तळवा तोंडाजवळ नेऊन्,ते तोंडात घ्या...(व्वाहुव्वा!-हे मनात..उघड बोल्लो-तर तो उचकतो!) अता प्या... आणि असेच अजुन दोनदा करा' ............... ह्या चवथ्या उदाहरणातली दीर्घ अतिशयोक्ती सोडली..तर खरच अशीहि माणसे समाजात अत्यंत अपंवादानी असतात. आणि आपण त्यांना समजुन घेऊन त्यांच्याशी वागायला लागलो..तर हे बथ्थडपण आपल्याही मनाला अ‍ॅक्सेप्ट व्हायला सुरवात होतं. आणि आपलिही शक्ति वाढते,,इत्यर्थे- आपणंही अपडेट होतो. __/\__ (सदर विवेचनात कोणाचिही टवाळी उडविण्याचा कसलाच हेतू नाही..हे आवश्यक वाटले... म्हणून 'जसेच्या तसे' मांडले आहे. )
==================================================================
वरदा
सदर लिंक बद्दल मनःपूर्वक आभार. तेथे त्यांनी व आपण अतिशय छान व अचूक प्रकारे माहिती दिली आहेत. धन्यवाद. Happy

गामा_पैलवान_५७४३२

@परागशास्त्री दिवेकरांस बालके गामा पैलवानाचा विनम्र प्रणाम.>> आपल्या प्रणामाचा गळाभेटीने स्विकार.

@आपला लेख वाचून संतोष वाटला. वेदाध्ययन कसे चालते याविषयी उत्सुकता होती. ती हळूहळू शमते आहे. >> उत्तम. Happy

@आपण म्हंटलेले स्तोत्र ऐकले. एक शंका मनी आली. सातव्या श्लोकात "फलं लभेत्" चा उच्चार "फलं लभेत" (शेवटचा त पूर्ण) असा ऐकू येतो. यामागे काही खास कारण आहे का? >> अर्थ दृढतेसाठी तसा उच्चार काहिवेळा केला जातो..अन्य काहि नाही. Happy

@तसेच आठव्या श्लोकात "अष्टभ्यो" चा उच्चार "अष्टेभ्यो" असा ऐकू येतो. हे देखील सकारण आहे का?>> अष्टेभ्यो'च आहे. म्हणुन तसा उच्चार केलाय.

@आपण पूजेचे गुरुजी आहात हे ठाऊक होते. परंतु वेदशास्त्रसंपन्नही आहात हे नुकतेच विदित झाले. अतिपरिचयात् एखादा शब्द अधिकउणा गेला असल्यास कृपया क्षमा असावी.>> अहो,नाहि हो. तसे काहि मनातंही आणु नका. माझ्याही मनात तसे काहि नाही. Happy
=========================================
फेरफटका

@खूप दिवसांनी एक छान लेख वाचला. मला ह्या लेखाची मांडणी, प्रवाहीपणा, नेमकेपणा आणी नेटकेपणा आवडला.>>> विशेष धन्यवाद. __/\__ Happy
=============================================

अत्तापर्यंतच्या...
सर्व वाचक,प्रतिसादक,सहभागितांना धन्यावाद. आणि आभार.

परागशास्त्री दिवेकरांस बालके गामा पैलवानाचा विनम्र प्रणाम.

वेदकालीन लिपीतल्या एका अक्षराबद्दल विचारायचं होतं. 'स्थिरैरंगैस्तुष्ट्वां स्तनुभि' या दोन तुकड्यांच्या मध्ये एक चिन्ह असते. ते दिसायला चंद्रकोरीवर अनुस्वार आणि तिच्या खाली पाय मोडलेला असे असते. या चिन्हास काय म्हणतात? आणि त्याचा उच्चार कसा करावा? एका वेदविद्याशास्त्रसंपन्न व्यक्तीकडून ऐकलं होतं की तो उच्चार 'स्थिरैरंगैस्तुष्ट्वांङ्स्तनुभि' असा होतो. परंतु घाईत असल्यामुळे उरलेले विचारायला वेळ मिळाला नाही. त्यावर आपण कृपया आपले मत नोंदवावे अशी विनंती.

आपला नम्र,
-गामा पैलवान

Pages