रसाच्या पोळ्या

Submitted by मनीमोहोर on 21 March, 2015 - 08:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

नाव बुचकळ्यात पाडणारे आहे खरे. पण कोकणात आमच्याकडे हेच नाव आहे ह्या पोळ्यांचे, म्हणून मी ही हेच दिले आहे. वाचा पुढे म्हणजे उलगडा होईल.

जनरली पाडव्याचं पक्वान्न म्हणजे श्रीखंड. पण आमच्या़कडे पाडव्याला आमरस करायची प्रथा आहे. पहिला आमरस पाडव्याला होतो. आंबे घरचे असल्यामुळेच हे शक्य होतं. एखाद वर्षी आंबा मागास असला, म्हणजे पाडव्याला आमरस करण्याएवढे आंबे नसतील, तर मग आम्रखंड करायचं आणि तेवढे ही नसतील आंबे एखाद्या वर्षी तर ह्या रसाच्या पोळ्या करायच्या पाडव्याला. पण आंब्याचचं काहीतरी करायचं पाडव्याला.

हा रस म्हणजे आंब्याचा आटवलेला रस. मे महिन्यात हा रस केला जातो आणि पुढे वर्षभर खाल्ला जातो. बाजारात हल्ली आंब्याचा मावा म्हणून एक प्रकार मिळतो तो हाच असावा असं वाटतं. कारण मी तो अ़जून बघितलेला नाहीये.

आंब्याचा रस काढुन त्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि एका भल्या मोठ्या परातीत तो चुलीवर ठेऊन आटवायला घ्यायचा. हा मी नेहमी मोठ्या प्रमाणावरच केलेला पाहिला आहे. रस चुलीवर ठेवला आणि उकळायला लागला की तो फार उडतो सगळीकडे आणि त्यात असलेल्या साखरेमुळे हातावर उडला तर चांगलचं भाजतं म्हणुन चुलीपासून लांब उभं रहायचं आणि लांब दांड्याचा कालथा वापरायचा ढवळण्यासाठी. तसेच हा सारखा ढवळत रहावा लागतो नाहीतर खालुन लागतो. भरपूर कष्टाचं काम आहे हे पण कामवाल्या बायका असतात हाताशी म्हणूनच जमतं. मोठी परातभर रस आटायला चांगले दोन तीन तास लागतात. रस साधारण आटत आला की त्यात थोडी साखर घालायची प्रिझर्वेटिव म्हणून आणि पुन्हा थोडा आटवायचा. साधारण मऊ गूळाएवढी कंसिस्टंसी असते ह्याची. अगदी गार झाला की मोठया मोठ्या चीनी मातीच्या बरणीत भरायचा. वर परत टिकण्यासाठी म्हणून थोडी पिठीसाखर भुरभुरवायची आणि दादरा बांधुन बरणी ठेऊन द्यायची. ह्याचा रंग फार सुंदर येतो आणि चवीलाही छानच लागतो. असा तयार रस मुलाना खाऊ म्हणून कधीही देता येतो. उपासाच्या दिवशी हा रस खाऊन वर दूध प्यायले तर पोट मस्त भरतं. हा रस आणि भाजलेले शेंगदाणे हा आजच्या काळातही आवडता खाऊ आहे आमच्या घरातल्या लहान मुलांचा. तसचं ह्यापासून आंब्याच्या वड्या आणि आता मी सांगणार आहे त्या पोळ्या सुद्धा छान होतात.

नमनाला चांगलं लिटर भर तेल घालुन झालं आहे आता प्रत्यक्ष कृतीकडे वळू या .

साहित्य:
सारणासाठी
एक वाटी आटवलेला रस
एक वाटी साखर ( मिक्सर मध्ये दळून )
एक चमचा तूप आणि थोडी वेलची पावडर.

कव्हर साठी

दोन वाट्या कणीक
दोन चमचे डाळीचं पीठ ( पोळ्या खुसखुशीत होतात या मूळे)
दोन चमचे गरम तेलाचं मोहन आणि किंचित मीठ.

पोळ्या लाटण्यासाठी तांदळाची पीठी. ( कणीक शक्यतो घेऊ नये. पीठीच घ्यावी. )

क्रमवार पाककृती: 

प्रथम कणकेमधे बेसन, तेल आणि मीठ घालुन आपण नेहमी पोळ्यांना भिजवतो त्या पेक्षा थोडी घट्ट भिजवून मुरण्यासाठी झाकून ठेवावी.

रस किसणीवर किसून घ्यावा आणि पिठीसाखर त्यात मिसळून नीट एकत्र करावे. नंतर हे मिश्रण मिक्सर मधुन फिरवून घ्यावे म्हणजे रस आणि साखर चांगल मिक्स होईल. आता ह्यात एक चमचा साजुक तूप, वेलची पावडर घालावी आणि दुधाचा हात लावून लावून मळून मळून त्याचा गोळा करावा. एकदम दूध घालु नये. साधारण आपण गूळ पोळीचा गूळ करतो तसा रसाचा गोळा तयार करावा.

कणीक आणि रस असे दिसेल

From mayboli

मग कणकेच्या दोन छोट्या लाट्यांमध्ये एक रसाची लाटी ठेऊन कडा बंद कराव्यात आणि आपण गूळाची पोळी लाटतो तशी ही पोळी लाटावी आणि मंद गॅसवर दोन्ही बाजुनी खरपूस भाजावी. ही अगदी ट्म्म फुगते आणि हलकी होते.

ही घ्या तयार पोळी

From mayboli

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे पण ह्या पुपो प्रमाणे जड होत नाहीत.
अधिक टिपा: 

मंद गॅस वरच भाजावी.
लाटताना रस कडेपर्यंत जाईल हे पहावे.
अगदी हलक्या आणि खुसखुशीत होतात. मुलांना हातात धरून खाता येतात.
खाताना साधारण पातळ केलेले तूप यावर घातले तर ह्यांची चव अजून खुलते.
पाडव्यासाठी म्हणून दारची पांढर्‍या चाफ्याची फुलं आणि कडुनिंबाची पानं यांनी सजावट केली आहे.

माहितीचा स्रोत: 
कोकणातील पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट दिसतायत. जाम खटपट आहे पण.
कुणी केल्या तर बोलवा मला. Proud

आम्हा पश्चिम महाराष्ट्रातल्यांसाठी रसाच्या पोळ्या हे प्रकरण थोडे वेगळे आहे. कणिक भिजवताना पाण्याऐवजी उसाच्या रसात भिजवून केलेल्या पोळ्या त्या रसाच्या पोळ्या. कुठल्याही एकदिवसीय ट्रिपसाठी नेताना रसाच्या पोळ्या, ब भाजी आणि शिरा हा मेनू फिक्स असे. शाळेच्या ट्रिपला हा मेनू नाही नेला तर ट्रिप झाल्यासारखी वाटत नसे. Happy

वा! मनीमोहर तो रसाचा गोळा खूपच छान दिसतो आहे. रस आटतो हे महिती नव्हते.

नवीन वर्षांच्या शुभेच्छा.

धन्यवाद सगळ्यांना .
नीधप. आमच्या एक शेजारीण बाई करीत असतं उसाच्या रसातल्या पोळ्या. नी, एवढ्या कठीण नाहीयेत. करुन बघु शकतेस किंवा माझ्याकडेच ये खायला.

प्लोमा, आहे ही हटके पाकृ. दक्षिण कोकणातली. आणि दक्षिण कोकणात सुद्धा अगदी सर्वांना माहितेय असं नाही.

बी, रस टिकवण्यासाठी तो आटवला जातो. पाण्याचा अंश गेला की टिकायला मदत होते.

नमनाला चांगलं लिटर भर तेल घालुन झालं आहे आता प्रत्यक्ष कृतीकडे वळू या .>>>> तेल नाही ममो, 'रस' घातलाय. 'रस' पोळ्या शिर्षक वाचून पाकृ वाचण्यात 'रस' वाटला व ' रसाळ' वर्णन व फोटू बघून मुख'रस' वाहू लागला. रस आटवण्याची कृती वाचून अगदी अगदी झालं. आजोळी आमराई होती. आंबे एक्दम पिकले की रस आटवून ठेवायचो चुलीवर हाताल फडकं बांधून, चटक्यांपासून बचाव ... पोळ्या करतात माहीत नव्हते. वर्षभर आंबावडी खाता यायची.

नमनाला चांगलं लिटर भर तेल घालुन झालं आहे आता प्रत्यक्ष कृतीकडे वळू या .>>>> तेल नाही ममो, 'रस' घातलाय. 'रस' पोळ्या शिर्षक वाचून पाकृ वाचण्यात 'रस' वाटला व ' रसाळ' वर्णन व फोटू बघून मुख'रस' वाहू लागला. रस आटवण्याची कृती वाचून अगदी अगदी झालं. आजोळी आमराई होती. आंबे एक्दम पिकले की रस आटवून ठेवायचो चुलीवर हाताल फडकं बांधून, चटक्यांपासून बचाव ... पोळ्या करतात माहीत नव्हते. वर्षभर आंबावडी खाता यायची.

वा, सुरेख !!!

तुमच्या पाककृती, कोकणातलं अस्सल वर्णन हे सगळं वाचताना खूप छान वाटतं नेहेमीच Happy

शेवटचा फोटो, सजावट फारच मस्त.

आमच्याकडे पण दर वर्षी आंब्याचा रस आटवण्याचा कार्यक्रम असतो. मात्र असा साठवणीसाठी नाही. त्याच्या लगेचच वड्या करते आई. पोळ्या प्रकार नवीनच माहिती झाला. आईला सांगेन नक्की.

तो आटलेला गोळा तसाच खायला फार मस्त लागतो मात्र. आमचा पण लहानपणी आवडता खाऊ होता तो.

अहाहा! काय सुरेख दिसतोय रस! आणि पोळ्या पण!
यंदा रसाच्या पोळ्या म्हणजे आंबे कमी असणार का यंदा? सिरीयसली विचारत्येय, तुम्ही तिथेच राहता म्हणून. जानेवारीच्या पुढे पावसाची बातमी ऐकली की पहिला विचार आंब्यांचा येतो डोक्यात (खायला मिळणार नसले तरी).

मंजू , प्रतिसाद खूप म्हणजे खूपच आवडला.

अगो, धन्यवाद मनापासून प्रतिसादासाठी. कोकणाबद्दल वाचायला मला ही आवडतं माझं घर कोकणातच आहे तरीही.

नी , मी विकतचा मावा पाहिलेला नाहीये. पण आमचा हा रस मऊ गूळासारखा असतो. तसा असेल मावा तर होतील.

वेल, घरी बनवायचा असेल रस तर निर्लेपचं फ्राय पॅन घ्यावं. पण मी सांगीन की तुम्ही शहरात रहात असाल तर नका ह्या भानगडीत पडू. खूप खटाटोप आहे त्याचा. ओट्यावर , गॅसवर, मागच्या टाईल्सवर खूप उडतो. वेळ ही खूप लागतो. आम्ही ही गावाला बाहेर चुलीवरच आटवतो रस म्हणून कळत नाही. रेडीमेड रस मिळतो कुठे का बघा. तो मिळाला तर पुढे पोळ्या सोप्या आहेत.

सिंडरेला, आंब्याच्या वड्या ही सुंदरच लागतात. त्याची कॄती परत कधीतरी. आम्ही आमच्या कडच्या मुलींच्या लग्नात वगैरे रुखवतावर ठेवायला हमखास करतो. शंकरपाळ्याच्या आकारात करुन त्या कमळाच्या आकारात सजवायच्या. कोकणातले ना आम्ही ( स्मित) म्हणून.

जिज्ञासा, ग्रेट!! अचूक अनुमान आणि निष्कर्ष. हो खरच यंदा आंबे कमी आंणि मागास ही आहेत.

मनीमोहोर, मलाही तेच वाटते आहे की रस आटायला फार जड जाऊ नये. मी नक्की करुन बघेन.

तू ऐरवीसुद्धा कणकेत बेसन घालतेस का?

बी, उत्साह असेल तर जरुर करुन बघा छोट्या प्रमाणात. थोडा केला तर नाही एखाद वेळेस त्रास होणार. मी नेहमीच खूपच मोठ्या प्रमाणावर पाहिला असल्याने मला तसं वाटतं असेल कदाचित.

रोजच्या पोळ्यात नाही मी बेसन घालतं पण ह्यात किवा गूळ पोळीच्या कणकेत घालते.

धन्यवाद मनीमोहोर. उत्साह खूप आहे Happy आता हापूस येतीलच तेंव्हा आधी रसपोळ्या.

बादवे, विदर्भात आंब्याच्या रसात तळलेल्या कुरडया पापड बुडवून खातात. तो प्रकार मला जास्त आवडतो. माझी आई रस आणि भात किंवा रस आणि शेवई असेही कॉम्बीनेशन खाते.

मस्त कृती आहे. देसाई बंधुचा रेडीमेड आंबा मावा मिळतो त्याच्या पोळ्या कदाचित होऊ शकतील. मी आंबावडीसाठी आणि साठवणीसाठी आटवलेला रस पाहिलाय. पण पोळ्या पहिल्यांदाच बघतेय. फोटो एकदम टेम्प्टिंग.

आंब्याचा रस आटवायला ठेवला की जो काय अगदी आसमंतात वगैरे वास पसरतो तो आठवून आताच्या आता आंबा हवा झाला Sad

बी, घरी रस आटवनार असशील तर एका लिटर रसाचा जेमतेम वर दाखवलाय तितकाच गोळा होइल. थडाथडा उडतो रस त्यामुळे कालथा लांबलचक हवा आणि भांडं चांगलं जाड बुडाचं हवं. अन्यथा खाली लागेल.

नमनाला लीटरभर तेलाने अर्धा लीटर लाळ आणली .. ते वर्णन वाचून.. उरली सुरली फोटो बघून..
मी कोकणातला असून कधी हे खालेले नाही Sad घरी विचारायला हवे..
पुरणपोळी माझी फेव्हरेट, कडक गूळपोळ्या खायलाही मजा येते, या सुद्धा नक्कीच आवडतील.. त्या फोटोमध्ये दिसत आहेत तश्याच कोणी दिल्या तर नक्कीच Happy

हेमाताई मस्तच. फार सुंदर.

रसाचे वर्णन परफेक्ट. दोन तीनदाच केलाय गावाला सासरी आणि माहेरी. माहेरी रसाच्या पोळ्या माहिती नव्हत्या. सासरी करतात. माहेरी रायवळ जास्त आणि सासरी हापूस.

रस बहुतेकदा गावाहून आयताच येतो, मला नुसताच खायला खूप आवडतो पण नवऱ्यासाठी चार पोळ्या करते. क्वचित खवा घालूनही करते पण जास्त अशाच. मी पुरणपोळीला भरतात तसेच भरते.

रस किसणीने किसत नाही. मिक्सरवर करते. पण मोठ्या प्रमाणात नाही केल्या कधी.

माझे मोठे दीर आणि जाऊ फार सुंदर पोळ्या करतात. नोव्हेंबरमध्ये नवरा गावाला गेला तेव्हा माझ्या दिरांनी पोळ्या केल्या आणि मलापण पाठवल्या. Happy

रसाच्या पोळ्या कोकणात सगळीकडेच नाही माहीती. माझ्या माहेरी नव्ह्त्या. माहेर चिपळूणजवळ (संगमेश्वर तालुका) पण सासरी देवगड तालुक्यात फार फेमस आहेत ह्या पोळ्या.

ओह वॉव.. सुंदर मखमली दिस्ताहेत पोळ्या.. चवीला अप्रतिम असतील नक्कीच!!

गोड खाणार्‍यांना जळवलंस कातिल फोटू टाकून, ममो!!!! Happy

खरच नळ सुटला तोंडाला...
कोकणातली असून माहीत नाही हे...
अत्रुप्त च्या मागोमाग मी पण उडी मारलीये ...

मारा उड्या.... फक्तं बी.वाय. ओ. तूप Happy

Pages