मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युध्दात कवच काढुन घेतले जाते .. सुरुवातीला युध्दात कर्ण भाग घेत नाही जो पर्यंत भीष्म सेनापती असतात.. भिष्म यांचा पडाव केल्यावर कर्णाचा हरवण्यासाठी कृष्ण ही चाल खेळतो ..

<<ब्रह्मास्त्र चे ज्ञान मिळाल्यानंतर त्याचा खोटेपणा उघड होतो.. तेव्हा परशुराम शाप देतो >> त्यावेळी कर्णाचा खोटेपणा कसा उघड होतो?

ती गोष्ट आहे ना. एकदा कर्णाच्या मांडीवर डोके ठेऊन परशूराम झोपलेले असतात. कर्णाच्या पायाला काहीतरी किडा चावत्तो व पाय रक्तबंबाळ होतो, तरीही तो अजिबात न हलता संयमाने बसतो. व परशूरामांना जेव्हा हे कळते तेव्हा ते म्हणतात ब्राह्मणाच्या अंगी इतका संयम असणे शक्य नाही, तू (क्षत्रिय का शूद्र) असणार. व मग संतापून शाप देतात.
चुभुद्याघ्या..

ती गोष्ट आहे ना. एकदा कर्णाच्या मांडीवर डोके ठेऊन परशूराम झोपलेले असतात. कर्णाच्या पायाला काहीतरी किडा चावत्तो व पाय रक्तबंबाळ होतो, तरीही तो अजिबात न हलता संयमाने बसतो. व परशूरामांना जेव्हा हे कळते तेव्हा ते म्हणतात ब्राह्मणाच्या अंगी इतका संयम असणे शक्य नाही, तू (क्षत्रिय का शूद्र) असणार. व मग संतापून शाप देतात>> बरोबर मीसुद्धा असेच ऐकले आहे

कवच दान्,दुर्योधनाचा ब्रह्मास्त्र प्राप्तीचा आग्रह्,परशुराम सेवा,परशुराम शाप्,पांडवांचा अज्ञातवास्,त्यांना शोधणे मग युध्द...कर्ण नंतर सेनापती होतो हे म्हणणे मान्य..परंतु युध्दाची खरी सुरुवात अज्ञातवासाच्य समाप्ती कालावधी दरम्यान शमीमधून शस्त्रे काढल्याने झाली आहे.मालिकेमध्ये कदाचीत उलटे झाले आहे.आपणाकडे काही पुस्तकाचा संदर्भ असेल तर सांगावे.
ध.

शाम्भवी दॅट्स इट.... कवच नसल्याने असे त्यचे उत्तर... मृत्युंजय वाचा उदयन..शिवाय त्यामागे एक संदर्भसूची आहे..त्यातले कौंतेय आणि टाकलेलं पोर हेही मिळाल्यास वाचणे...आणखी काही संदर्भात मिळू शकेल उत्तर..
ध.

मृत्युंजय , राधेय सगळे वाचुन कोळुन झालेले आहे Happy
मृत्युंजय मधे त्याने कानाचे कवचकुंडल काढुन दिलेले तर राधेय मधे ओठांच्या आतुन त्याने स्वतची चमडी सोलुन दिलेली असे सांगितलेले आहे Happy

कालच्या भागात कृष्णाने अप्रतिम भाव दाखवले चेहेऱ्यावरचे. भीष्म यांना मारायची योजना करायलाच लागेल हे सांगताना, त्याला खूप त्रास होत होता, हे जाणवत होते.

एक गोष्ट पटली नाही. नकुल आणि सहदेव जेव्हा कर्णाच्या मदतीला जातात तेव्हा त्यांच्या मामाचे (शल्य), स्वागत करायला युधिष्ठिर, भीम, अर्जुन का जात नाहीत किमान ह्यांच्यापैकी एकतरी जाऊ शकला असता.

शल्याने कौरवांकडून लढण्याचा निर्णय "चुकीन" घेतला हे दाखवण्याच्या नादांत कालचा अख्खा सीन गंडला होता. मला फक्त सहदेव शकुनीला धमकी देतो तो भाग आवडला.

कालचा कर्ण आणि नकुल सहदेवाचा सीन आवडला. या महाभारतामधे या दोनही पात्रांना बर्‍यापैकी महत्त्व दिलंय.

हो तो 'चुकीने ' निर्णय घेतला ते पटले नाही. युद्धात सगळे माफ असते. असं नुसतं शब्द दिला म्हणून कुणी युद्धात दुसर्‍या पार्टीकडून लढेल हे काही च्या काही वाटलं. मूळ कथा काय आहे ?
मला शल्य नंतर कर्णाचा सारथी होतो आणि सतत त्याचा अपमान करून त्याचं "मोराल डाउन" करतो हे माहित आहे- त्यावरून एखाद्या गोष्टीचे शल्य टोचत असणे' असा वक्प्रचार वापरला जातो.
बाकी सध्या कृष्ण कमाल करत आहे. सगळे डायलॉग्ज मस्त आहेत. मला परवा कृष्ण - शकुनी सीन पण आवडला. त्यात कृष्ण शकुनीच्या स्टाइल मधे एक डायलॉग म्हणून त्याला चिडवतो ते फार फार मस्त घेतलं होतं !!

हो नकुल आणि सहदेवला इथे जरातरी महत्व दिलंय, आधीच्या महाभारतात दिलं नव्हतं, अगदी हेच मी काल नव-याला म्हणाले.

मला परवा कृष्ण - शकुनी सीन पण आवडला. त्यात कृष्ण शकुनीच्या स्टाइल मधे एक डायलॉग म्हणून त्याला चिडवतो ते फार फार मस्त घेतलं होतं !!<<< हो.. सर्वात भारी होतं.

मूळ कथा काय आहे ?>> मी वाचलंय त्यानुसार शल्याला पांडवांबद्दल काहीही प्रेम माया नसते आणि माद्रीच सती गेल्याने कुंतीवर फार राग असतो. म्हणून तो पांडवांविरूद्ध लढतो. शल्य उत्तम सारथी असल्याने त्याची नियुक्ती कर्णाच्या रथावर केली जाते. (शल्य क्षत्रिय आणि कर्ण सूतपुत्र) म्हणून तोच उलटा कर्णाचा अपमान वगैरे करत असतो.

कालच्या त्या शल्याची हेअरस्टाईल मेजर गंडली होती. पूर्ण टकला दाखवलं अस्तं तर काय प्रॉब्लेम होता? महाभारतात टकलं कोण नव्हतंच का?

महाभारतात टकलं कोण नव्हतंच का? >> Lol कुणाला माहिती असणार? अश्वत्थामा जर चुकून भेटला तर त्याला विचारता येईल.

हो ना. ते लिहिलेले खोडले मी. Happy अनेकांना भेटल्याचे संदर्भ पुस्तकातून येतात. कुणाला अश्वत्थामा तर कुणाला हनुमान महोदय असे दोघांपैकी एक जण भेटतात म्हणे !

शल्य एपिसोड मध्ये जे दाखवले ते फार वरवरचे वाटले मला.

उल्लेख असा आहे की दुर्योधन युद्धाआधीच शल्यालापण भेटतो. आणि त्याच्याकडून मदत मागतो, जी शल्य देऊ करतो. अन मग "प्राण जाये पर वचन ना जाये" मुळे ते पाळावे लागलेच. मला वाटतं वचनामुळे लोकं त्याकाळी काहीही करत (आठवा जंजीर मधील प्राण की मुछो का एक बाल Happy )

त्यापेक्षा लेटेस्ट असे उदाहरण म्हणजे हंबीरराव मोहिते सेनापती ह्यांनी त्यांच्या सख्या बहिणीचा पक्ष न घेता संभाजी महाराजांचा पक्ष घेतला त्यामुळे संभाजीचे पारडे जड झाले. (अर्थात खुद्द राजारामाला संभाजी प्रिय होते ती गोष्ट वेगळी, पण मी भाच्याचा विरोधी मामाने जाणे ह्याचे उदा देतोय. ते सरळ सरळ इथे लागू होत नाही, काही भागच लागू होतो ह्याची कल्पना आहे.)

अश्वत्थामा आणि दुशासन अगदी दुय्यम दर्जाचे खलनायक दाखवले आहेत. दुशासन तर प्रत्येक वेळी मिशीला हात लावून हसत असतो. हेअर स्ट्रेटनर लावून केलेले केस आणि ते हसू - मुळीच खलनायकी वाटत नाहीत. अश्वथामाबद्दल इतर ठिकाणी फारच चांगले लिहिले आहे. स्वभावाने गंभीर, तत्ववेत्ता अशी प्रतिमा होती. इथे मात्र तो अगदी नुकताच इलेक्शन मध्ये पार्टीचा प्रचार करताना दिसला - शल्य की विजय हो Happy सीनमध्ये. दोघांना बघून काल दिवार, जंजीर मध्ये दुसरऱ्या फळीला म्यकमोहन सारखे खलनायक असत त्यांची आठवण झाली

दु:शासन चा अभिनय अतिशय सुंदर आहे........ माझ्यामते कृष्णापेक्षा ही अतिशय गंभीर आहे त्याचा अभिनय .. Wink

त्याच्या अभिनयाचे काही मुद्दे नोटीस केलेले आहे:-

डोळे बारीक करुन खाली मुंडी केलेली वर सतत करत राहणे.
मिशांवरुन हात फिरवत असताना डोळे बारीकच ठेवणे..
स्वतःवर कॅमेरा कधी येईल याची खात्री नसल्याने सतत डोळे बारीक ठेवणे
कधी कधी कॅमेरा दुर्योधनवर फोकस असतो. परंतु हे मागे उभे असलेल्या बिचार्‍या दु:शासन ला सांगत नाही अश्यावेळेला ३ सेंकेंदाचा शॉट ( खालची मुंडी डोळे बारीक करुन वर करणे) सतत करत असतो ... हा शॉट बघण्यासाठी / शोधण्यासाठी दु:शासन कडे सतत लक्ष द्यावे लागते Biggrin

दु:शासनाला बिचार्‍याला प्रथमच काल डायलॉग सकट अभिनयाची संधी मिळाली होती! आधीच्या सगळ्या एपिसोड्स ची कसर भरून काढण्यासाठी खूप खूप अ‍ॅक्टिंग करत होता !! Lol

कालचे दृश्य बघुन मला शाळेतल्या गॅदरिंग ची आठवण आली.. निमुट पणे , सांगेल ते काम करणार्यांसाठी संबंध नाटकात १-२ दृश्य दिग्दर्शक मधे घुसवुन देतात Happy तेवढाच पाठीमागे उभे राहणार्यांना हुरुप वाढवण्यास कामी येतो Happy

हो ह्यात वनवास, अज्ञातवास लवकर गुंडाळला पण काही काही गोष्टी उगाच घुसवतात असं वाटतं. खरं म्हणजे इंद्राने कवचकुंडले काढल्यानंतर कर्णाला स्वतःच चमत्काराने बरे करायला हवे होते.

Pages