मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो बस्के तिने उपरोधाने लिहिलं आहे ते कळलं मला पण त्यावेळी पुष्पक विमान आठवलं मला.

शिखंडिणी खरंच फक्त एकच दिवस शिखंडी झाला, हे खरं आहे का पण.

ती अभिनेत्री नेहेमीच काम छान करत, 'इस देशमे ना आना लाडो' मध्ये पण छान काम केले होते तिने.

नाही
शिखंडी हा अर्धनारीश्वर आणि हे युध्द व्यापक लढले गेलेले कौरव शिखंडी ला भीष्मा पासून लांबच गुंतवून ठेवायचे 10 व्या दिवशी कृष्णामुळे त्याला भीष्मासमोर उभे केले

शिखंडी हा पुरूषच होता जन्मावेळी आधि पण अंबाला पण शरीरात जागा दिल्यामुळे कनवर्ट झाला

तेच ह्या महाभारतात काही गोष्टी उगाच घुसवल्या आहेत. शिखंडीची पण गोष्ट थोडी चुकीची दाखवली.

कदाचित कुठल्या तरी वर्जन मधे असेल तसेही. कारण त्यांनी फार डीटेल्स दाखवलेत. यक्षराजाची पूजा, वर देणे वगैरे.
महिन्याभरात संपतंय म्हणे महाभारत. दुसरी मालिका सुरु होणार आहे.

शिखंडीणीला आधीपासून स्त्री दाखवलेले मला आवडले. एवढ्या सगळ्या बायांच्यत हीच एक योद्धा दाखवली आहे. द्रौपदीजन्माच्या आधी द्रुपद आणी शिखंडीणीचा कन्याजन्मावर खूप सुंदर प्रसंग घेतला होता.

नंदिनी, पण मी अशी स्टोरी ऐकलीय की कन्या म्हणून जन्माला आल्यानंतर थोडी मोठी झाल्यावर तिचे रुपांतर पुरुषात होते, आधीच्या महाभारतात 'पेंटल' ने शिखंडीची भूमिका केली होती आणि तो जन्माला कन्या म्हणून आला म्हणून त्याच्यावर शस्त्र उचलत नाहीत भीष्म, असं बघितल्याचे मला आठवते.

ज्या भीष्म, द्रोण यांच्याबद्दल प्रचंड अभिमान, आदर होता, ते करतील ते सर्व बरोबर असे वाटायचे त्यांनी या मालिकेत स्वतःच स्वतःचे दोष दा़खवले आहेत.
कृष्णाने फारच मोठा मुद्दा उपस्थित केला आहे - तो म्हणजे स्वतःचा अभिमान, प्रतिष्ठा, कीर्ति, प्रतिज्ञा, कृतज्ञता, गर्व, स्वार्थ इ. पेक्षा धर्माचे रक्षण, देशासाठी काय चांगले, जास्तीत जास्त लोकांसाठी काय चांगले होईल याचा विचार महत्वाचा.
एव्हढे या भीष्माने प्रतिज्ञेसाठी, दिलेला शब्द पाळण्यासाठी इतके मनाविरुद्ध सहन केले, अधर्म होताना बघितला, त्याला साथ दिली - काय झाले? मनःशांति कायमची ढळली. शेवटी काहीतरी करून प्राणत्याग!

त्यापेक्षा धर्म नि राज्याची सुव्यवस्था या साठी स्वतःच्या प्रतिष्ठेची चिंता न करता जे योग्य आहे तेच केले असते तर...? सुखाने प्राणत्याग करता आला असता!!

भीष्माचा वध एकटा अर्जुन करतो . ते ही शिखंडीच्या आडाने ... इथे तर सगळे युध्दाचे नियम धाब्यावर बसवुन सगळ्या पांडवांना हल्ला करायला लावले आहे Uhoh काहीही दाखवत आहे Angry जे पहिल्यांदा महाभारत बघत असतील ते काय विचार करणार ? अभिमन्यु वधाच्या वेळी त्या गोष्टीला योग्य ठरवतील ... कारण युध्दाचे नियम तोडुन भीष्माचा वध सगळ्यांनी मिळुन केलेला आहे दाखवले ..........

मला पण आत्ताच्या महाभारतातले शिखंडी प्रकरण अतिरंजित वाटले. आधीच्या महाभारतात योग्य पद्धतीने हाताळले होते हे प्रकरण, अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.

हे महाभारत पण मला खूप आवडतं पण ह्यातल्या काही गोष्टी खटकतात.

आधीच्या महाभारतात 'पेंटल' ने शिखंडीची भूमिका केली होती<< माफ करा... पेंटल कोण? गुफी पेंटल असेल तर इट वॉज शकुनीज रोल हि प्लेड... पेंटल आणि शिखंडी जुन्या म.भा.त..? दुसरं कोणी पेंटल होतं का?

पेंटल नुसता........... जो सत्ते पे सत्त्ता मधे अमिताब चा भाउ होता बुध नाव होते

आणि गुफी पेंटल हा त्याचा मोठा भाउ

धन्स..हे नवीन होतं.. एकच पेंटल नाव माहीती होतं.. Happy 'पेंटल'च्या एवढ्या भूमिका बघितल्यात तरी नाव मात्र आत्ताच कळाले..
रच्याकने बघा जनरेशन बदल...
mahabharat-13th-march-2014-ep-13.jpg

कोण भारी वाटतो?
Happy

दोघे ही उत्तम आहेत.. गुफी पेंटल यांनी स्वतःच्य घार्या डोळ्यांचा पुरेपुर वापर केलेला तर प्रणित भट याने स्वतःच्या चेहर्याचा वापर केला

हो तेही आहेच...गुफी साहेबांचे डोळे जास्त बोलके आहेत निदान शकुनि इमेजला तरी... आत्ता सहज जुन्या मभाचे फोटो बघत होतो... फारच कॉमेडी वाटतात आता... त्यात्या काळात जाऊन ती फिल्म बघावी म्हणतात तेच खरं..

बघते मी. कालचा बरा होता पण परवाचं जरा बोअर वाटलं. भीष्मांना खरंच माहीती होतं का आधीपासून की कर्ण हा कुंतीपुत्र आहे?

मला तर जे दाखवतायेत तेच खरे वाटते, ह्या आधिचे महाभारत लागायचे ते आठवत्त नाहि शाळेत असेल त्यावेळेस

भीष्मांना खरंच माहीती होतं का आधीपासून की कर्ण हा कुंतीपुत्र आहे?<<ह्म्म, ते गंगापुत्र असतात.कुंती गंगेत जेव्हा कर्णाची परडी सोडते ती गोष्ट त्यांना माहीती असते.
कालचा भाग आवडला.

मला आपली उगीच एक शंका आहे.
तो शकुनी गांधार चा होता ना मग त्याला गांधारच्या शैलीत बोलतांना दाखवले असते तर...

आता पांडवांची ३ अक्षहौणी सेना कौरवांच्या ७-८ अक्षहौणी सेनेसोबत कसे युद्ध करणार? काहीतरी हटके करावे लागणार आहे. नाहीतर २-३ दिवसात पांडवांची सर्व सेना संपुन जाईल.

...नाहीतर २-३ दिवसात पांडवांची सर्व सेना संपुन जाईल.
येत्या २-३ दिवसांत कौरव सेनेचा मोठा संहार घटोत्कच (भीमपुत्र), अर्जुन आणि भीम यांच्याकडून होईल.

घटोत्कचाचा सॉलिड महत्वाचा रोल आहे, त्याचा संहार करायला शेवटी कर्णाला इंद्रास्त्राचा उपयोग करायला लागतो, जे त्याने अर्जुनासाठी राखुन ठेवले असते. मरता मरता घटोत्कच शत्रुसैन्यावर पडून अनेक लोक मारतो.

Pages