मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे लिहायचं राहिले- मला हीरोपार्टीमध्ये भीमाचं काम कायम आवडलंय. त्याचं कॉमिकपणा जरा कमी दाखवला असता तर खरोखर भीम वाटला असता. राक्षसांना मारताना त्याने मजा आणली होती. आता शेवटच्या युद्धात पण तोच एकटा त्वेषाने वगैरे लढताना दिसेल.

कृष्ण, भिष्म आणि शकुनी हे कलाकार आवडले, दुर्योधन, अर्जुन आणि बाकी लोक्स पण छान आहेत.
सगळ्यात जास्त आवडलं ते, कथानकाला गती आहे, इतर साबणांप्रमाणे (daly soaps) अर्धा वेळ फक्त चेहरे आणि त्यावरचे भयाण expressions (मराठी शब्द माहित नाही) दाखवत नाहित.

शकुनी आणि कृष्ण हे दोघे ही अभिनयात सरस आहे... शकुनी तर क्षणात हावभाव बदलतो.. जेव्हा द्वारका मधे कृष्णभेटीस जेव्हा दुर्योधन जातो तेव्हा शकुनी दुर्योधनाशी बोलत असताना कुत्सदी भाव असत पण जेव्हा अचानक समोर कृष्ण येतो तेव्हा त्याचे भाव क्षणात बदलुन लाचारीचे होतात .. तो बदल एकदम बेस्ट होता

मागच्या पानावर कुणीतरी लिहिलेय ते पटलं - व्हिलन कंपनीचा अभिनय जास्त चांगला आहे , आणि अ‍ॅक्चुअली पांडवांच्य तुलनेत त्यांनाच जास्त सीन्स पण असतात. पांडव तर बेपत्ताच आहेत कित्येक एपिसोड्स !
अर्थात कृष्णाचा अभिनय सुरेखच. खट्याळ, मुत्सद्दी, धूर्त..सगळे भाव मस्त दाखवतो तो !! सध्या एकूण इन्टरेस्टिंग आहेत सगळेच भाग. कृष्णशिष्टाई, कर्णाचा लेटेस्ट भाग, दोन्हीत डायलॉग्ज मस्त होते.

आणि सगळ्या स्त्री व्यक्तिरेखा अगदी ग्लामरस -- चाळीशीला यांची मुले आली तरी फक्त काही बटामधल्या पांढऱ्या छटा वगळल्या तर वयोवृद्धीचे नामोनिशान नाही. याच्या रहस्यावर नवा धागा उघडावा म्हणते Happy

दुर्योधनाचा अभिनय म्हणजे एकदम रागावून मोठमोठ्याने बोलायचे असाच होता. या कृष्णाला अटक करण्याच्या सीनमुळे त्याला घाबरल्याचा अभिनय पण दाखवता आला. शिवाय त्याच सीन मधे त्याच्या मांडीवर प्रहार होतो हे कुणि पाहिले का? त्याला कारण आहे,
त्याबाबतची गोष्ट अशी की गांधारी (धन्यवाद अन्जू!!) दुर्योधनाला म्हणते विवस्त्र होऊन माझ्या कक्षात ये, तिथे डोळ्यावरील पट्टी काढून त्याच्याकडे दृष्टी टकली की त्याचे शरीर वज्रासारखे होईल असा तिचा बेत होता पण लबाड कृष्णाने त्याला मधेच थांबवून त्याची टिंगल केली नि निदान कमरेभोवती तरी वस्त्र ठेव असे सांगितले म्हणून दुर्योधनाचा तेव्हढा भाग वज्रासारखा झाला नाही. शेवटी मांडीवर घाव घातल्याशिवाय तो मरत नाही.
आता तसे दाखवणे शक्य नाही. कृष्ण कायमचा हस्तिनापूर सोडून गेला, दुर्योधन कृष्णावर जाम भडकला आहे, तो त्याचे काही ऐकणार नाही!
खरे तर मांडीवर मारणे नियमात नाही, पण सगळी कृष्णाची लबाडी. त्यासाठी एक सीन टाकून दा़खवले आहे की कृष्ण शकुनि नि दुर्योधनाला आधीच सांगतो, तुम्ही सगळे मरणार नि ते सुद्धा छल करून!!
आधी वार्निंग दिली की मग लबाडपणा होत नाही असे मी त्यातून शिकलो.

दोन दिवस, कर्ण अप्रतिमच. योग्य निवड कारण पंकज धीरने आधीच्या महाभारतात सुंदर काम केले होते. नवीन कर्ण पण खूप आवडला.

हे महाभारत चांगले चित्रित केलेले आहे परंतु काही आधी कुठे ही न वाचलेले अथवा कल्पलेल्या गोष्टी देखील दाखवण्यात आल्या आहेत जे थोडे फार खटकते
जसे की दौपदी ला कृष्ण आधीच परिणाम सांगतो तुझ्या सर्व पुत्रांचा सर्वनाश होईल वगैरे .. ही गोष्ट आधी कुठे वाचली नाही अथवा आधीच्या महाभारतात दाखवलेली देखील स्मरत नाही. जगात अशी कोणती स्त्री असेल जी धर्मासाठी स्वतःच्या मुलांचे बलिदान देण्यास तयार होईल. ? ती स्वतःचा अपमानाचा बदला घेण्याकरीता स्वतःच्या मुलांना युध्दात ढकलुन देईल का जेव्हा त्यांची हत्या होईल हे आधीच माहीत असेल ? मुळात द्रौपदीला युध्दाचे परिणाम माहीत नव्हतेच आणि कृष्णाने तिला सांगितलेले होते हे खोटे आहे .. इतका मुर्खपणा कृष्ण अजिबात करणार नाही.
हे युध्द होणे आणि घडवणे हे कृष्णाच्या हातात होते. म्हणुन या युध्दाला थांबवु शकणारे सगळे मुद्दे आणि व्यक्ती यांना त्याने सोईस्करपणे बाजुला केलेले होते.. जेणे करुन युध्द होईल अशी परिस्थितीच त्याने निर्माण केलेली. मग अश्या वेळेला तो द्रौपदीला या युध्दाच्या परिणामाची कल्पना आधीच कशी देणार ?

कृष्णाला माहीत होते की कर्ण हा कुंतीचाच पुत्र आहे परंतु कुंतीला हे आधी कधीच सांगितलेले नाही. उलट ऐन युध्दाच्या क्षणी सांगितले . कुंतीला "स्वतःच्या पाच मुलांचे जीवदान" हे दान मागण्याची सुचना देखील कृष्णानेच दिलेली कारण कृष्णाला माहीत होते की कर्ण हा कुंतीचे ऐकणार नाही आणि दान दिले तर तो पाच पुत्रांचे देईल आणि शब्द खेळ करुन अर्जुन या कर्ण या पैकी एकच जिवंत राहील आणि कुंतीचे "पाच पुत्रांचे दान" कायम राहील. अशी व्यवस्था कर्ण करुन ठेवेल.

कर्णाबद्दल जर पांडवांना कळाले तर पांडव युध्द करणार नाहीत मग जर खरच कृष्णाला युध्द थांबवायचे असेल तर जेव्हा कर्णाने नकार दिला तेव्हा पांडवांना कर्णाबद्दल का सांगितले नाही. वचन तर कुंतीने दिलेले कर्णाला न सांगण्याचे कृष्णाने नाही दिलेले.. मग का सांगितले नाही ?

तसेच या महाभारतात कृष्ण आणि कर्ण इतके काही मित्र दाखवले नाही परंतु कृष्ण आणि कर्ण हे खुप चांगले मित्र होते.
तसे या महाभारतात बघुन कुठेच वाटत नाही . कर्ण दुर्योधनाला सुयोधन म्हणायचा याचे कारण दुर्योधन सत्ताप्राप्तीसाठी काहीही करायची इच्छा राखत होता पण प्रत्यक्षात मात्र तो देखील सहजीवनात चांगला वागायचा. जो पर्यंत त्याच्या स्वाभिमानाला डिवचले जात नव्हते तो पर्यंत सामान्य वागणुक असायची .. परंतु दुर्योधनाला खलनायक ठरवायच्या प्रयत्न केला गेला. थोडीफार चांगली बाजु दाखवली गेली असती तरी चालले असते.. दुर्योधन काय दिवसरात्र वाईट कर्मच करत फिरत होता का ???????? जिथे जिथे त्याला आव्हान दिले गेले आणि तिथे शकुनीने अयोग्य सल्ला देउन त्याच्याकडुन ते कर्म करुन घेतलीत.. या कडे दुर्लक्ष केले गेले

उदयन, मला पण वाटते इथे खूप गोष्टी घुसवल्यात. द्रौपदीला माहित नसतं की पांडव सोडून सर्व मृत होणार आहेत, हे उगाच दाखवलंय. काही गोष्टीत जरा जास्तच लिबर्टी घेतली आहे.

मला कृष्ण भलता आवडतो. मस्त अभिनय केला आहे आनि दिसतो तर एक्दम हीरो Happy . मला तर तो दाक्षिणात्य अभेनेता महेशबाबु सारखा वाटतो. फक्त एकचं आहे कि, कृष्ण साव्ळा असतो असंचं वाचलेलं आत्तापर्यंत आणि हा अभिनेता एकदम गोराचिट्टा!:)

दुर्योधनाला सुयोधन, त्याची आई गांधारी म्हणायची,
दुर्योधनला सुयोधन असे युधिष्ठिर म्हणत असे मी ऐकले. एक तर 'दुर ' असे वाईट अर्थी म्हणण्या ऐवजी 'सु ' असे म्हणावे. दुसरे असे की ज्याला टंग इन चीक विनोद म्हणतात तसे. दुर्योधन म्हणजे त्याच्याशी युद्ध करणे 'दुर'
म्हणजे कठीण. पण सुयोधन म्हणजे युध करण्यास सोपा!

द्रौपदीला या युध्दाच्या परिणामाची कल्पना आधीच कशी देणार ?
खरे आहे. मी असे कधीहि ऐकले नव्हते!
ती स्वतःचा अपमानाचा बदला घेण्याकरीता स्वतःच्या मुलांना युध्दात ढकलुन देईल का जेव्हा त्यांची हत्या होईल हे आधीच माहीत असेल ?

ती असे करेल असे वाटत नाही.
उदयन.. यांनी कृष्ण व कर्ण यांच्याबद्दल लिहिलेलेहि पटले.

उगीचच खूपच काहीतरी वेगळे दाखवले आहे. एकदा कुठेतरी कृष्णाने म्हंटलेले दाखवलेले आहे की अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करायची तर आधी समूळ नाश केला पाहिजे! इतके सगळे लोक अधर्मी झाले होते नि फक्त पांडवच चांगले?

परवाच्या एपिसोड मधे कर्ण स्वतःची तुलना भीष्म यांच्याशी करत होता .. " मी इतके विजय दिग्विजय मिळवले आहे" मीच श्रेष्ठ आहे इत्यादी. कर्ण विसरुन गेलेला का की त्याच्याकडे कवचकुंडल आहे जे त्याला अमरत्व देते आणि भीष्म यांच्याकडे अश्याप्रकारचे कोणते ही कवच नाही आहे भले त्यांच्याकडे इच्छामरण आहे परंतु जखमी तर होणारच. शरीराचा कोणत्याही भागावर वार झाला तर कोणते कवच ते थांबवणार नव्हते.. याचा अर्थ जखमी अवस्थेत भीष्म पोहचु शकतात फक्त मरण येणार नाही इतकेच वरदान होते.. त्यामुळे जख्मी होण्याचे भय तर नक्कीच होते भीष्माला इथे कर्णाला कवच असल्याने तो मरण पावणे तर दुर तो जखमी देखील होणार नव्हता .. मग कसले भय .. अश्या अमरत्व आणि भयमुक्त असल्याने त्याने दिग्विजय आणि विजय मिळवले तरी काय महत्व त्याचे ????
कर्णाचे कवच कुंडल कपटाने काढुन घेतले म्हणुन अन्याय म्हणणारे....... युध्दात कर्ण स्वतःचे अमरत्व घेउन लढायला जाणे हे कोणते न्याय होते.. ? पांडवांकडे कुठे कवच होते कुठे इच्छा मरण चे वरदान होते ? मग बरोबरी कुठे होत होती युध्दात ? कर्णाकडे सामर्थ्य होते तर ते अर्जुनाकडे देखील होते . जर सामर्थ्याचेच युध्द होते मग त्यात कर्णाला कवचाची काय गरज ? इतके सामर्थ्य होते तर यक्षांकडुन कर्णाचा पराभव कसा झाला.. आणि तेच यक्ष अर्जुन ला कसे शरण आले ????????

कर्णाला कवच कुन्दल जन्मजात होते. आता एखाद्याला जनजात काही मिळाले असेल तर तो ते घेउनच लढणार. कर्णाचे वजन शम्भ र किलो नि अर्जुनाचे पन्नास किलो असले तर मग काय म्हननार? कर्नाने पन्नास किलो वजन कापुन लढावे ?

लढताना आपले नैसर्गिक वरदान व मिळवलेली शक्ती या दोन्हीचा वापर्च्करण्यार काही गैर नाही

यक्षांच्या अर्जून-कर्णाबद्द्ल घडलेल्या घटना वाचनीय आहेत.पुन्हा पुन्हा वाचाव्यत अशा..
कर्ण दुर्योधनासाठी कवच हवे असे म्हणतो,स्वतःसाठी नव्हे.अशी एक अख्यायीका आहे की खरेच असे आहे बरं..?

कवच कुंडले दिल्यानंतर पण कर्णाला हरवणं कठीणच गेले, त्याचा रथ रुतला म्हणून तो अर्जुन मारू शकला कर्णाला नाहीतर दोघे तोडीस तोड होते.

त्याचा रथ रुतला म्हणून तो अर्जुन मारू शकला >>> अर्जुन ने का मारले अश्यावेळेला ? कारण युध्दाचे नियम तोडण्याची सुरुवात अभिमन्युच्या हत्येने झालेली . जे सुरु होते ते संपते देखील या वेळेला संपवले अर्जुन ने.. Happy

मालिके मधे कवचकुंडल सुरुवातीलाच दिलेले दाखवले आहे ... जे बहुतेक चुकिचे आहे.. माझ्यामते कवचकुंडल हे कर्णाने युध्दात सहभाग घेतल्यानंतर इंद्राने काढुन घेतलेले कारण ते कवच असु पर्यंत कौरवांचा पराभव होणे अशक्य होते.

हो नक्कीच, अभिमन्यूला कपटाने मारले त्यामुळेच कर्णाला कपटाने मारणे चुकीचे नाही असं कृष्ण म्हणतो. अभिमन्युला मारतात कपटाने तेव्हा कर्ण कुठे म्हणतो की आता अभिमन्युला मारणे चुकीचे आहे हे.

मालिकेबरोबरच महाभारतातल्या अनेक घटनांवर वेगवेगळ्या दृष्टीकोनातून माहिती मिळाली. त्यादृष्टीने हा धागा फार वाचनीय आहे. धन्यवाद निमिष

मालिके मधे कवचकुंडल सुरुवातीलाच दिलेले दाखवले आहे ... जे बहुतेक चुकिचे आहे.. माझ्यामते कवचकुंडल हे कर्णाने युध्दात सहभाग घेतल्यानंतर इंद्राने काढुन घेतलेले कारण ते कवच असु पर्यंत कौरवांचा पराभव होणे अशक्य होते.>>>>

उदयन्,कवच आधीच काढून घेतेलेले असते.म्हणून दुर्योधनाच्या सांगण्यावरून कर्ण ब्रह्मास्त्र प्राप्तीसाठी परशुराम ऋषींकडे जातो.त्यानंतर त्याचा शाप आणि मग युध्द..

कर्ण ब्रह्मास्त्र प्राप्तीसाठी परशुराम ऋषींकडे जातो.त्यानंतर त्याचा शाप आणि मग युध्द.. >>>>>>>> परशुराम कडे तो आधीच जातो जेव्हा द्रोण त्याचा सुतपुत्र म्हणुन अपमान करतो तेव्हा तो ब्राह्मणचा वेश धारण करुन परशुराम कडे विद्येसाठी जातो. ब्रह्मास्त्र चे ज्ञान मिळाल्यानंतर त्याचा खोटेपणा उघड होतो.. तेव्हा परशुराम शाप देतो "जेव्हा तुला ब्रह्मास्त्राची गरज भासेल तेव्हा तुला त्याचा मंत्र आठवणारच नाही"

आणि युध्दात द्रोणपुत्राकडे ब्रह्मास्त्र असते त्याने ते चालवल्यावर उत्तरेच्या गर्भावर वळवतो..

Pages