अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधारण सहा सात वर्ष्ण्पुर्वीची गोष्ट.
नित्या.. माझा नातेवाईक आणि जिवलग मित्र. साताऱ्याला लॉ शिकायचा. साताऱ्याच्या उत्तरेला तीसेक किलोमीटरवर गाव. हिरो होंडा मैत्रीण, जीवनसाथी. कॉलेज संपलं कि पोरं आधी लायब्ररीत आणि नंतर शहरातल्या मित्राच्या घरी आणि रात्र पडायला लागली कि किक मारून घराकडे (आजूबाजूंच्या गावात).
..एके रात्री गप्पा बऱ्याच लांबल्या.. घरून भाऊंचा (वडील) फोन.. हा निघालोच.. (तेव्हाचे ते रिलायंस चे पोलीफोनिक रिंगटोन वाले फोन) बारा वाजत आलेले. पोरं तशी बिनधास्त. निघतो सांगून थोडा उशीराच निघाला..
निघाला... देशावर काय रात्री तसा गार वारा असतोच.. त्यात बाईकवर फुल स्पीड वर विचारायलाच नको. हेल्मेट तरी कुठलं आलंय. फुल सुसाट.. वेग अंगात भिनलेला.. शिरूर-सातारा ६१ राज्य महामार्ग उजवीकडे सोडून स्वारी लेफ्टीला निघाली गावाकडे.. वातावरणात गारठा पडू लागलेला.. पेंग येऊ लागलेली.. पण भुका पण लागलेल्या.. त्यामुळे अक्सेलेतर पिरगाळण चालू.. आतला रस्ता.. त्यामुळे रात्री वाहतूक नाही.. चिटपाखरूच नाही.. आपल्याच बाईकीचा आवाज.. फक्त समोर रोडवर प्रकाश.. मागे ठार अंधार.. तोही आरशात “दिसणारा”. त्याला गाडी चालू झाल्यापासून रस्त्यावर काही वेगळेपण, काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं.. पण काय ते कळत नव्हतं आणि त्यावर फार विचार पण चालाल नव्हता..
असं फुल सुसाट असताना, बराच वेळ एक निश्चित स्पीड पकडला असताना आणि त्याची सवय झाली असताना जादूची कांडी फिरावी तसा मोटारसायकलचा आवाज बंद... इंजिन बंद.. खड खड करीत गाडी बंद... अशक्य दुर्दैव... हेडलाईट्स टेललाईट्स बंद! आवंढा गिळला तसे कान मोकळे झाले.. आजूबाजूची निरव शांतता ‘ऐकू’ आली. गडी तसा धीराचा.. धडधडत्या छातीने पुढे मागे काही वाहन येतंय का बघितलं.. अंधार गुडूप. किक मारून बघितल्या सगळं व्यर्थ... काय करायचं? तसं अंदाजे बरंच अंतर कापून झालेलं.. गाडी बाजूला लाऊन चालत जायचं? चालेल मोठ मोठ्याने गाणी म्हणत जाऊया? दबक्या आवाजात गायला लागला.. थोडसंच.. मग थांबला.. गाणं थांबलं तसं कसलीतरी भीती मानेवर येऊन बसली... असं वाटलं कि कुणीतरी त्याचं गाणं कान देऊन ऐकलं.. कुणी ते माहित नाही.. दिसत नाही..
चालत जाणं रद्द. फोन काढला वडलांना फोन लावायला.. रेंज नव्हती.. का रेंज नाही.. हि उगाचची हॉरर स्टोरी माझ्या बाबतीत का घडतेय.. रेंज पकडत नाही असं एकच ठिकाण आहे.. बाग .. खिंड.. अंधाराला नजर सरावली होती.. उजवीकडे पाहिलं.. हो बागच.. खिंड.. कधीच दगा न देणारी हि इथेच का बंद पडली.. बागेत आणि खिंडीत भूतच असतात ऐकून माहित. कपाळावर घाम जमा झाला कॉलर चिंब..
पण तरी बहाद्दर अजून पूर्ण गळपटला नव्हता (तो पटकन गळपटत नाही याचा प्रचीती मला कर्नाळा किल्ल्यावर (किल्ला सोपाय, आडबाजूच जंगल नाही..) जाताना मोरवाटा रुटवर कम्प्लीट चुकून भलतीकडे गच्च जंगलात पूर्ण फसलो तेव्हा आली).
गाडी का बंद पडली असेल याचा विज्ञानाधारित विचार करण्याचा प्रयत्नच केला फक्त आणि संध्याकाळच मित्राचं वाक्य आठवलं... शुभ बोल ये माकडा.. सर्वपित्री आहे आज..
... एका क्षणात कोडं उलगडलं काय चुकत होतं आज ते.. अमावस्या तीही सर्वपित्री.. ऐकलेल्या गोष्टींचा परिणाम एव्हढा जबरदस्त.. भीतीची प्रचंड लाट छातीतून पोटात आणि पाय दगड.. हृदय बाईक पेक्षाही फुल स्पीड वर..

रामरक्षा येत नाही.. हनुमान स्त्रोत्र कुठून सुरु होतं माहित नाही.. गणेश स्त्रोत्र कधी म्हटलं नाही.. करायचं काय... स्वतला समजावलं पितर म्हणजे काय.. आपलेच बापजादे ते मला कशाला काय करतील.. पण मग गाडी बंद पडायची काय कारण..
... भीतीने सर्व शक्ती निघून चालली... रेंज नाहीच.
.. इतक्यात दूरवर दप्रकाश दिसला.. मोटरसायकलच.. पांढरा सदरा आणि लेंगा.. भूतबित तर असं येणार नाही.. माणूसच.. आकृती जवळ आली... अगदी जवळ येऊन उभी राहिली.. नजरेवर विश्वास बसेना.. भाऊ!!... बाप!
गडी ओला चिंब झाला होता..
काय रं? काय झालं?
गाडी बंद पडली.. तुम्ही कसं काय आला?
म्हन्ल एवडा यळ का लाग्तुय.. बघावं.. फोनबी लागना?
सिग्नल गेला...
बस...
बसायच्या आधी एकदा सहज म्हणून गड्याने किक मारली.. गाडी चालू.. आक्रीत?? विज्ञान? सत्य.. भ्रम...
...............

जबरीच

चांगला आहे किस्सा.पण यात तर सॉलीड सायन्स आहे...पण ते इथे नको...अवांतर होईल.
तुमची अवस्था काय असेल तेव्हा? ये तो डरावना रहा होगा सर...

भारी किस्सा स्मित एवढ्या अंधारात २ मि च्या वर राहण म्हण्जे बापरे..
<<<<<<<<<<< मी असतो तर एक मिनिट आणि साधारण तीन सेकंदांनी पितरांना भेटायला गेलो असतो... Happy

चांगला आहे किस्सा.पण यात तर सॉलीड सायन्स आहे...पण ते इथे नको...अवांतर होईल.
<<<<<<<<<<<<,
सांगाच प्लीज.. नाही होणार अवांतर...

DANGER Sad
विज्ञानदास, मला वाटतं चालेल इथे सांगितलं तरी... म्हणजे मला तरी चालेल. सगळ्यांना चालणार असेल तर सांगता का? नाही तर माझ्या विपूत सांगा प्लिज Happy

नक्कीच! फार विशेष उत्तर नाही ते.त्यामगचं लिटरेचर सॉलिड आहे असा त्याचा अर्थ आहे.मग ते ऊर्जा विज्ञान असेल किंवा टेलीपॅथीसारख्या गोष्टी,किंवा मग गाडीचं साधं मेकॅनिझम.नॉट अ बिट ऑफ रॉकेट सायन्स...तिथेच उत्तर आहे.
सौमीच्या भाउंनी किक मारताच गाडी चालू झाली.

बाकी आईने पोराच्या काळजीने वडलांना पाठवलं असणार..काय सौमीजी...?

कुलकर्णी सर... काय इकडे कशी काय स्वारी आज? Wink

1702773sgcd0x6utd.gif

गाडी अशी अचानक कम्प्लीट बंद का पडावी? त्याला स्वतःला असं वाटतय की त्यामागे काहीतरी वैद्न्यानिक कारण असावं मात्र ते काय असावं?

काय तुम्हाला भुत प्रेत आत्मा यात विश्वास आहे? अस म्हणतात त्याच आत्मा या दोन्ही जगात भटकतात ज्यांची काही इच्छा बाकी राहिली आहे . जे मेल्यानंतर ही जिवंत राहतात फक्त बदला घेण्यासाठी , काही इच्छा पूर्ति साठी , तर काही मुक्ति साठी,

मी मानतो की सगळयाना याचा अनुभव नाही येत पण असे खुप लोक आहेत ज्यांना ही गोष्ट नुसती जाणवली नाही तर बघितली देखिल आहे . कोणतीही घटना किंवा गोष्ट तो पर्यंतच अन्धविश्वास म्हणून राहते जो पर्यन्त ती तुमच्या बरोबर नाही घडत , आणि ते तेंव्हाच होउ शकत जेंव्हा तुमच्या आयुष्यात खरच भुत येइल .....

कालच तलाश बघितला.
माणसाला आत्मे माणसांचंच रूप घेऊन का भेटतात याची कारणमिमांसा छान आहे.
चित्रपटाच्या शेवटी अमिरइतकाच आपलाही आत्म्यांवरचा विश्वास दृढ होत जातो.

दुचाकीचे इंजिन बंद पडण्याची अनेक भोळी कारणे असू शकतात. (सर्वसाधारण म्हणजे गाडीतील इंधन संपून गाडी रिसर्व ला लागणे, अधिक तापमान, अधिक वेग, ई.) पण यापैकी कोणते कारण नक्की आहे ते इथे सांगणे कठीण आहे. किंबहुना कोणते कारण नसेल हे सुद्धा चालकाशिवाय व गाडीच्या तपासणीशिवाय सांगता येणार नाही. Happy
बर्यापैकी प्रमाणात दुचाकी चालवणाऱ्या जवळपास प्रत्येकाची दुचाकी कधी ना कधी बंद पडतेच. काही वेळा त्याचे कारण लक्षात येत नाही.

टीप : कोणाच्याही अनुभवाला आव्हान देण्याचा उद्देश नाही. फक्त गाडी बंद पडण्याची अनेक करणे असू शकतात से म्हणायचे आहे. कदाचित अनुभव धारकाने सांगितल्याप्रमाणे एखादे अमानवीय कारण पण असेल. कोणास माहित? Happy

अवांतर? : http://en.wikipedia.org/wiki/Vapor_lock
http://en.wikipedia.org/wiki/Stall_(engine)

मला आजपर्यंत अमानवीय म्हणावा असा एकच प्रत्यक्ष अनुभव आलाय तो सांगायचा प्रयत्न करतो.
असे प्रसंग या अनुभवापुर्वी ऐकले होते बर्याचदा पण ह्या एकमेव प्रसंगात तिथे घडलेल्या बहुतांशी घटना मी स्वतः प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. परंतु त्या घटना जेंव्हा प्रत्यक्ष घडत होत्या तेंव्हा त्याची तर्कसंगती मला लावता आली नव्हती.यामागचे कारण कदाचित मी तेंव्हा वयाने आणि समजुतीने देखील लहान असल्यामुळे असावे.लेखनाची फारशी सवय नसल्यामुळे तितक्या प्रभावीपणे मांडता येईल का माहित नाही पण प्रयत्न करतो.ह्यात बरेचसे बारीकसारीक तपशील वाचायला मिळतील पण ते सगळेच माझ्या स्मरणातले नसून ह्या अनुभवावर त्या नंतर सोबत असलेल्या सगळ्यांबरोबर झालेल्या चर्चेमुळे लक्षात आलेले आहेत.

ही गोष्ट २००० या वर्षीची आहे. तेंव्हा मी शाळेत सहावीत शिकत होतो.दिवाळीच्या सुट्ट्यात माझं संपूर्ण कुटुंब (एकूण ४ जण) आणि माझ्या २ मावश्या आणि त्यांचे कुटुंब असे एकूण १२ जण कोकण आणि गोव्याच्या सहलीसाठी निघालो होतो.सगळ्यांसाठी मिळून २ गाड्या केल्या होत्या.महाबळेश्वर येथून संध्याकाळी ४ च्या सुमारास आम्ही महाड कडे निघालो.आमच्या योजनेनुसार साधारण दीड तासात महाडला पोचून तिथे एका नातेवाईकांना भेटून साधारण साडेसात च्या सुमारास महाड हून निघून ४ तासात म्हणजे रात्री साडे अकरा पर्यंत राजापूर इथे पोचयाच होतं.पण महाडला नातेवाईकांच्या भेटीत निघायला आठ वाजले.तरी ते मुक्काम करा म्हणत होते पण आम्ही निघायचं ठरवलं कारण राजापूरला गेस्ट हाउस मध्ये येणार आहोत हे आधीच सांगितलं होतं.महाड हून ८ च्या सुमारास निघालो खरे पण वाटेत खेड पार केल्यावर एका गाडीत काहीतरी प्रोब्लेम आल्यामुळे थांबावं लागणार होतं.खेड आणि चिपळूण च्या मध्ये कुठेतरी एका निर्जन ठिकाणी एका हॉटेल वर थांबण्याशिवाय पर्याय नव्हता.

हॉटेल तसं एकदम छान होतं (म्हणजे आमच्या भाषेत भव्य आणि posh). हॉटेलच्या आजूबाजूला संपूर्ण मोकळी जागा होती.पहिल्यांदा जेंव्हा गाडीतून उतरल्यावर हॉटेलचा प्रवेशद्वार पाहिलं तेंव्हा विश्वास बसत नव्हता की अशा निर्जन जागी ते ही खेड आणि चिपळूणच्या मधे एव्हढे अलिशान हॉटेल कोणी बांधले असेल.आमच्या आधी तिथे एक कुटुंब एका गाडीतून आधीच आले होते. आमची एकूण ३ कुटुंब (१२ माणस) आणि त्या आमच्या आधी आलेल्या कुटुंबा व्यतिरिक्त त्या भल्यामोठ्या हॉटेलात दुसरं कोणीही नव्हतं.

हॉटेल मध्ये प्रवेश करता एक मोठ्ठा hall होता ज्यात जवळपास सोळा tables मांडून ठेवले होते.त्या tables च्या अवस्थेवरून तिथे जेवायला कोणीच कधीच आलं नसेल असे वाटत होते. त्या hall च्या दुसर्या टोकाला वर जाण्यासाठी दुहेरी जिना होता.त्या दुहेरी जिन्यावरून वर गेल्यावर दोन्ही बाजूंना मिळून एकूण सोळा खोल्या होत्या (एका बाजूला ८ अशा).खोल्यान्स्मोरची lobby आणि जिना असे मिळून एका मोठ्या लम्ब वर्तुळाकार परिघाच्या रेलिंग पाशी उभं राहून खाली पाहिलं की तो प्रवेशद्वारा नंतरचा मोठा hall दिसत होता. एव्हढ्या मोठ्या हॉटेल मध्ये फक्त एकच माणूस सर्व काम पाहत होता.

आम्ही ३ खोल्या book केल्या तर त्या माणसाने २ खोल्या एका टोकाला तर तिसरी दुसऱ्या टोकाला अशा दिल्या कारण बाकीच्या खोल्यांचं काम पूर्ण झालं नव्हतं.आमच्या आधी तिथे आलेल्या कुटुंबाला देखील त्याने तिसऱ्या टोकाची खोली दिली होती.खोल्या अगदी नव्या कोऱ्या होत्या.अगदी पडद्यांपासून bathroom मधल्या bathtub आणि नळापर्यंत सगळ नवीन होतं.रात्री उशीर झाल्यामुळे आम्ही सोबत आणलेलं जेवण करून झोपलो.त्या रात्री जवळपास आमच्यापैकी प्रत्येकाला काहीतरी विचित्र अनुभव आले.सर्व प्रथम आम्ही ज्या खोलीत थांबलो होतो त्याच्यात एक विलक्षण सुवास (कुठल्यातरी फुलांचा) येत होता. पण आजूबाजूला एकही झाड नव्हते.रात्री झोपल्यावर तो एकमेव caretaker माणूस दर एक दीड तासानी येऊन काही प्रोब्लेम नाही ना याची चौकशी करायचा आणि विक्षिप्त हसायचा.आमच्या सोबतचे सगळे प्रौढ रात्री जागे होते.माझ्या आईला आणि मावशीला रात्री घुन्घरांचा आवाज ऐकू येत होता.रात्री जवळपास २ च्या सुमारास माझे बाबा खाली जाऊन त्या caretaker माणसाशी जवळपास अर्धा तास बोलले आणि hotel तसेच त्याच्याबद्दल जुजबी माहिती घेण्याचा प्रयत्न केला.तेंव्हा त्या माणसाने तो स्वतः केरळचा असून हॉटेल चे नुकतेच उद्घाटन झाले आहे असे संगितले तसेच मूळ hotel मालक कोणीतरी पंजाबी असल्याचे संगितले.त्यानंतर माझे बाबा हॉटेल बाहेर एक चक्कर चालत मारून आले तेंव्हा हॉटेल च्या डाव्या बाजूला ख्रिश्चन लोकांची स्मशानभूमी आढळली.बाबा बाहेर गेलेले असतानाच इथे माझी एका मावस बहिणीला अचानक प्रचंड थंडी वाजायला लागली.इतकी की त्या खोलीतील इतर सगळ्यांची मिळून जवळपास सहा पांघरूण एकावर एक अशी टाकून देखील थंडी कमी होईना.दुसरीकडे तिचीच लहान बहिण झोपेत सतत खिडकीकडे चालत जात होती.हा झोपेत चालत जाण्याचा प्रकार लागोपाठ ४ वेळा घडला.आणि माझ्यासाठी सगळ्यात shocking गोष्ट म्हणजे मी स्वतः झोपेत काहीतरी अगम्य बडबड करत होतो(अर्थात मला त्याच भान नव्हत आईनी सकाळी उठल्यावर सांगितलं).आणि अगम्य म्हणजे not even in marathi ती वेगळीच कुठलीतरी भाषा वाटत होती.पण ह्या सगळ्यातला एक प्रसंग जो मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पहिला तो म्हणजे माझे काका(मावशीचे मिस्टर) हे सकाळी bag मधून कपडे काढायला वाकले आणि त्याच अवस्थेत जवळपास २० मिनिटं स्तब्ध झाले होते. त्यांना ना बोलता येत होतं ना हालचाल करता येत होती.त्यांना नॉर्मल व्हायला जवळपास अर्धा तास लागला.

सकाळी शक्य तेव्हढ्या लवकर आम्ही तेथून निघालो त्यानंतर जवळपास एक तास सगळे गप्प बसले होते.मग हळूहळू एक एक जण आपल्या अनुभवांबद्दल बोलायला लागला.प्रत्येक जण असा अनुभव फक्त मलाच आला का इतर कोणालाही आलाय याची दबकत खात्री करून घेत होता.

त्या सहलीवरून परत आल्यावर हा किस्सा आम्ही आमच्या मामाला सांगितला.तो सिविल engineer आहे आणि त्याचे महाड जवळच्या भागात जाणे येणे होत असते.त्या दिवाळीनंतर पुढच्याच महिन्यात मामा चिपळूणला जाऊन आला.त्याने खेड ते चिपळूण दरम्यानच्या रस्त्यावर अशा हॉटेलचा शोध घ्यायचा प्रयत्न केला.पण त्याच्या मते त्या रस्त्यावर असं कुठलंही मोठं हॉटेल नव्हतंच मुळी.ज्या ठिकाणी आपण एक अख्खी रात्र काढली ती देखील अशा चित्रविचित्र अनुभवांसोबत ते हॉटेल मुळी अस्तित्वातच नाही ही सगळ्यात धक्कादायक गोष्ट आम्हाला त्या प्रसंगानंतर जवळपास २ महिन्यांनी कळाली.

राजेश के...प्रतिसाद आवडला... रात्रीचा प्रवास लहान मुला-बाळांसोबत करणार्‍यांचा मला राग येतो...एवढी काय घाई असते राव...एखाद्या ठिकाणी थांबून मग सकाळी निघावं.
अनुभव खरच खतरनाक अबीर... तुमचे अनुभव सत्य असू शकतात...पण हॉटेल गायब होण्याची/अस्थित्वातच नसण्याची गडबड वाटतेय...

मला उगाच असं वाटायला लागलंय की घोस्ट्बस्टर म्हणून पार्ट्टाइम करीअर करावं का?कसा ऑप्शन आहे.. Wink

2325881pifl6jtbnd.gif

मी अभिजित ब्रों सोबत त्यांनी टाकलेल्या किस्स्या मधल्या सर्व ठिकानानवर जाऊंन आले आणि पुढील गोष्टी पाहून आले

1)ATC टावर ची विहीर
2)रनवे जवळ ची कबर
3)ओल्ड एअरपोर्ट

आणि काही CISF स्टाफ कडुन तिथले किस्से देखिल ऐकले.खरच खुप डेंजर जागा आहेत त्या. काही लोकांना हे किस्से खोटे वाटलेले पण मला तरी ते खोटे नाही वाटत.

धन्यवाद

>>तुमचे अनुभव सत्य असू शकतात...पण हॉटेल गायब होण्याची/अस्थित्वातच नसण्याची गडबड वाटतेय...>>

विज्ञानदास,
हो अनुभव तर खरच कोड्यात टाकणारे होते.जिथपर्यंत हॉटेल अस्तित्वात नसण्या/असण्या चा प्रश्न आहे तर ज्या नातेवाईकांकडे महाडला भेटायला गेलो होतो त्यांना देखील नंतर याबद्दल विचारले असता असे कुठलेही हॉटेल नसल्याचे त्यांनी संगितले.खर तर खेड ते चिपळूण हे अंतर फार तर ३५ ते ४० किमी च्या दरम्यान असावे.एव्हढया कमी अंतराच्या रस्त्यावर एव्हढे अलिशान हॉटेल शोधणे (ते देखील हॉटेलचे नाव माहित असताना)फारसे कठीण नाही.पण त्या रात्री अनुभव घेणार्यांपैकी कोणीही त्या भागात प्रत्यक्ष जाऊन आले नाही त्या मुळे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ठाम असा कुठलाही निष्कर्ष देखील काढता येत नाही.

@ जाई, >>> खरच खुप डेंजर जागा आहेत त्या <<<<
कोणत्या अर्थाने ??? दिसायला कि त्यांचाशी निगडीत भयकथांमुळे ???

>>>> काही लोकांना हे किस्से खोटे वाटलेले पण मला तरी ते खोटे नाही वाटत. <<<< कोणत्या कारणामुळे तुम्हाला ते खरे वाटतात?
मी त्या अनुभवांना आव्हान देत नाही; मला फक्त जाणून घेण्याची जिज्ञासा आहे. कृपया गैरसमज नसावा .

1)त्या जागा खरच खुप भयानक आहेत कारण तिथे माणसांचा वावर खुप कमी आहे, आणि VISIBILITY LOW
2)भयान कथांचा थोडा प्रभाव
3)तिथल्या सिक्यूरिटी CISF स्टाफ ने सांगितलेल्या कथा ज्या बर्याच लोकांनी सांगितलेल्या होत्या त्यातला सारखेपना.
4)एक वेगळ (निगेटिव) वातावरण
5) स्व संरक्षणासाठी CISF नि बांधलेले छोटेसे देवीचे मंदिर.
6)त्यांनी सांगितलेले स्वताचे खरे अनुभव

माझ्यासाठी सगळ्यात shocking गोष्ट म्हणजे मी स्वतः झोपेत काहीतरी अगम्य बडबड करत होतो(अर्थात मला त्याच भान नव्हत आईनी सकाळी उठल्यावर सांगितलं).आणि अगम्य म्हणजे not even in marathi ती वेगळीच कुठलीतरी भाषा वाटत होती>>>>>>>>>... मला exorcism पुस्तकाची आठवण झाली.. Sad ती सुदधा अशीच काहीतरी अगम्य ,लॅटीन + इंग्लिश अश्या भाषेत बडबड करायची.. अर्थात ते पुस्तक आहे Wink

Pages