अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१४० प्रतिसाद बघुन वाटले की भुतांचे पेव फुटले की काय?
पण एथे तर एका आयडीचा मड्डर झाला ना, आता तो भुत होवुन
परत आला म्हंजे ?>>>>>>

आत्मा हा अमर असतो
तो फक्त शरीर बदलत असतो

आत्मा हा आपल्याला दिसत नसतो
पण तो आपल्या भोवतालीच असतो

आत्मा हा अमर असतो
तो फक्त शरीर बदलत असतो

त्यापेक्षा
कट्टर माबोकर अमर असतो
तो फक्त आयडी बदलत असतो

Very True

मागे कुणीतरी म्हट्ले होते,अमावस्येच्या दर्म्यान हा धागा अक्टिव्हेट होतो....काय राव घाबरव्ता तुम्ही लोक...अमावस्या कालच होती कि....
.
.
.
.
श्श्श्श्....

माझे किस्से लवकरच....

नमस्कार ब्रो
मी तुमचे एअरपोर्ट चे किस्से वाचले त्यातले काही किस्से मी देखिल ऐकले होते ,

मी देखिल मुंबई एअरपोर्ट , एयर इंडिया ला असते ,तुम्ही कुठे असता ?

ब्रो आणि जाइ हे तुमचे मानवीय डिस्कशन विपु मध्ये सुद्धा करता येईल.

अमानवीय किश्श्यांच्या बाफवर मानवीय गप्पा कशाला

मी देखिल ATC च्या विहिरी बद्दल खुप एकलय पण तिथे जायचा कधी प्रसंगच आला नाही आणि काही कारण नसताना आम्ही PICKUP CAR तिथे नेऊ शक़त नाही तर तुम्ही ATC ची विहीर मला दाखवाल का ?

केदार Lol

नमस्कार,
भूत हे माणसाच्या मनातच तयार होतं हे सत्य आहे.इथे जेवढ्या कथा आहेत त्यांमागे त्या-त्या वेळेचं,त्याचं सबळ कारण आहेच.झोप्,ताण अशा अवस्थांमध्येच हे किस्से घडतात शिवाय निगेटीव्ह ऊर्जेच्या लहरी रात्री जास्त सक्रीय होत असाव्यात,ज्यांची भर त्यात पडते.

माझं ग्रॅज्यूएशन चालू असताना पर्यावरणावरचा एक प्रोजेक्ट करायचा होता.प्रत्येकाचा स्वतंत्र प्रो.असल्याने वैयक्तीकरीत्या काम करायचं होतं.मी ज्या विषयात काम करत होतो तो शेतीमुळे होणार्‍या प्रदूषणाशी संबंधीत असल्याने नदीकडेची शेतं पालथी घालणं चालू होतं.माहीती घेता घेता एकाने मला सांगीतले अमूक एका ठिकाणी तुम्हाला चांगली माहीती मिळेल...त्यांची केळीची बाग नदीकाठाला आहे.त्याला हो म्हट्लो खरं पण कां कोण जाणे एक थंड लहर दवडून गेली.पण तरीही जायचंच तिकडे असं ठरलं.

ती जागा शहराच्या बाहेर होती.मुख्य रस्ता ओलांडून गेला की दूरदर्शनचं छोटं ऑफीस...त्यासमोर नदीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता,जो तेव्हा बांधायचा चालू होता.पत्ता सापडायला कुठ विचारावं म्हणून पाहीलं तर दोन पोरं चाललेली सायकलवर.त्यांना पत्ता विचारला तर ती माझ्याकडे विचीत्रपणे बघत सायकल दामटत गेली.तसाच पुढे गेलो. इथे पत्ता विचारावा असं म्हणून त्या घरासमोर गाडी नेली,तर एक हिरवी साडी नेसलेली-कुंकवाची चिरी ओढलेली बाई बाहेर आली.अर्थात ती कामवाली बाई होती.पण पत्ता सांगायला नेमकी 'त्या' अटायरमधली बाई समोर यावी..? :o पत्ता विचारून पुढे आलो.पावसाळ्याची दलदल होती.उजव्या बाजूला निशीगंधाचं शेत.विरूद्ध बाजूला तो दुमजली बंगला.तिकडे पाहीलं आणि क्षणभर काहीतरी 'अ‍ॅबनॉर्मल' जाणवलं.मी तिकडे जायला वळलो तर ती मगाची बाई माझ्याकडे बघत पुढे निघून गेली.ज्या क्षणी गाडी कच्च्या रस्त्यावर गेली त्याच वेळी निर्वातात आलोय की काय याची जाणीव झाली पण तसे वाट्ले काहीच नव्हते.जरा पुढे गेलो तर निशीगंधाच्या बांधावर काळी मांजर तटस्थपणे बसलेली.अगदी ग्रामोफोनच्या त्या श्वानासारखी.जणू ती काही ऐकते आहे.समोर घर.मी गाडी लावली.गेटपाशी आलो.भिंतींना भेगा गेल्या होत्या.गेटला कुलूप होतं.समोर दुमजली बंगलो.घराच्या मागे लांबवर केळीची बाग पसरलेली.ती झाडं निम्मीअर्धी जळत चालली आहेत अशी अवस्था होती.बहूदा बागेकडे बरेच दिवस लक्ष्य नसाव कुणाचं.मी गेटवरची बेल दाबली तसा लककन आतला पडदा हालल्याचा भास झाला.मागे ती मांजर म्यॅव म्हणून बांधावरून खाली शेतात शिरली.मगाची बाई आता परत माझ्या मागून पुढे गेली.तशीच एक गाडीसुद्धा.पण आवाज कुणाचाच नाही.बर एवढी सगळी साईन्स दिसल्यावर परत जायचं सोडून मी गेटवर चढून आत उतरू लागलो.अचानक एक विचार आला आणि तेव्हाच पुन्हा आत कुणी आहे असं जाणवलं.मी बाहेर परत उतरलो.गाडी फिरवली आणि जी सोडली ते थेट सांगली-कोल्हापूर रोडला आणली.अचानक कानातले दडे सुटल्यासारखं वाटलं.परत दंगा,गाड्यांचा आवाज...जरा रिलॅक्स झालो आणि थेट घरी.चार दिवसांनी असं कळलं की ते घर,ती बाग एका म्हातार्‍या डॉक्टरांची होती/आहे.मुलं.सुनांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली,तेच ते घर.

यात ऊर्जाविज्ञान आहेच.पण एक मात्र कोडं अजूनही डोकं खातं...त्या दिवशीच ती बाई हिरव्या साडीत कशी आली ? तेव्हाच ते मांजर कसं उपटलं...योगायोग...की आकर्षण..? निर्वात भासणे हासुद्धा निगेटीव्ह ऊर्जेचा परीणाम होता तसाच बाहेर गच्च भरलेल्या आभाळाचाही...

(समाप्त)

मी लहानपणीही भूत पाहिले आहे.ती आमच्या इथल्या उंच रेल्वे ट्रॅकवरून जायची.भर दिवसा.बर तो ट्रॅक आमच्या आजोंबांच्या बंगल्यापासून लांब असल्याने काडीटाईप माणसे दिसत.त्या पांढर्‍या आकृत्या पाहून 'होम अलोन' पोरासारखं ओरडत पांघरूणात जाऊन लपलेलो.नंतर कळलं की ते जैनधरर्मीय लोक होते...पांढरे झगे आणि तोंड झाकलेलेअसं Lol .... (धार्मिक भावना सांभाळून)

भूत आणि भिती हे मनात असतं असं मला आजही वाटतं...आज त्या बंगल्यामागची बाग आहे.चांगली बहरते.मागे सुंदर नदी आहे.पण कधीकधी दिमाग पे डर हवी हो जाता है....प्रत्येक घटनेमागे विज्ञान असतं आणि असतंच...याची जाणीव ठेवली की झालं...

विज्ञानदास तुम्ही काहीही म्हणा पण तुमच्या लिखाणाची शैलीच असली जबराट आहे की माझी जाम्टरकलीये Sad

ही घटना इतर कोणाकडुन ऐकली असती तर इतका इम्पॅक्ट झाला असता की नाही ते माहीत नाही Sad

त्यावेळीही माझा चेहराही तुम्ही वापरलेल्या स्मायलीसारखाच झालावता. Wink

आजकाल इकडे किस्से लिहीणारे कुठे गेले...अनिसची लिंक फिरून गेल्याने भागोभूत झाले की काय सगळे?

छान लिहीलाय किस्सा विज्ञानदास, भुतापेक्षा वातावरण निर्मीतीने घाबरवलत

भूत हे माणसाच्या मनातच तयार होतं..... नाही पटत
निगेटीव्ह एनर्जी काही काळात प्रभावी असते असे माझे व्ययक्तिक मत आहे, त्याला कारणेही तशीच आहेत. माझ्या आयुष्यात सायकल आणि टू व्हीलरवर माझे एकूण ७ अपघात झाले आहे आणि विशेष म्हणजे सर्वच्या सर्व पैर्णिमेला झाले आहेत.
एक गावाकडील किस्सा असा आहे. उन्हाळ्याच्या सुट्यात आम्ही नेहमीच विहीरीवर पोहायला जायचो.मी नेहमीचा पोहणारा असल्याने माझे स्वीमींग चांगले आहे. एक दिवस आमचेच काही मित्र विहीरीत एकमेकांना बुडविण्याची मस्ती करु लागले त्यातील काही नुकतेच पोहायला शिकलेले होते जे बटरफ्लाय स्टाईलने (बेड्कासारखे) पोहायचे, आणि खूपच हळू अंतर कापायचे . त्या मस्तीमध्ये तीन मित्र एकमेकांना मिठी मारुन बसले. मग काय तिघेही बुडायला लागले तब्बल तीन ते चार वेळा पाण्याच्या वर खाली झाले पण ती मीठी सोडून आपापले पोहून विहीरीच्या काठावर यावे असे कोणालाच सुचले नाही नाही. हे फक्त त्यांचे सुदैव होते की मी पोहण्यासाठी नुकतेच विहीरीच्या काठावर पोहचलो. आज पाणी किती वर आहे हे पाहण्यासाठी मी विहीरीत डोकावले तर ह्या तीन मुर्खांची मस्ती यांचा जीव घ्यायला निघालेली दिसली त्यांच्या तोंडून अ,बुडबुड किंवा यापलिकडे काहीही निघत नव्हते ,मी क्षणात काठावरुन आहे त्या कपड्यावर विहीरीत उडी मारली मला त्यांच्या पोझीशन चा करेक्ट अंदाज आला नाही त्यामुळे मी त्यातल्या एकाच्या डोक्यावर जाउन पडलो त्यात त्यांची मिठी सुटली , पण ज्याच्या डोक्यावर पडलो तो आणि मी दोघे तळाशी पोहचलो.तो आधीच अर्धमेला झाला होता त्याला कसेबसे हाताच्या दंडाला पकडून वर काढला. पण विहीरीच्या मध्यातून कडेपर्येंत येण्यासाठी मला त्या नवशिक्या पोरांची मदत घ्यावी लागली कारण माझेही हात पाय हालत नव्हते. उडी मारताना मित्राचे डोके आदळल्याने माझ्या पाठीची वाट लागली . कसाबसा विहीरीचा काठ गाठला .पुढचे सात दिवस मी झंडूबामवर होतो. ( इथे ज्या विहीरीचा उल्लेख आहे तीचा व्यास १८ मी म्हणजे अंदाजे ५१ फूट आहे आणि खोली ३० फूट आहे.)

हे सांगण्याचे उद्देश एवढाच कि ही घटनाही पौर्णिमेला घडली होती.कदाचित यात चंद्राचे पाण्याबाबत असणारे आकर्षण असू शकेल. मी निगेटीव्ह एनर्जी अंधश्रद्धा म्हणून मानत नाही ,त्यामागेही काही वैज्ञानिक कारणे असू शकतील पण अशी शक्ती आहे ............................................

भूत हे माणसाच्या मनातच तयार होतं..... नाही पटत<<<बर्‍याच वेळेला असंच घडतं...

झोपेचा अंमल्,स्ट्रेस (वा इतर काही कारणांनी अपमान्,अल्कोहल्स,अतिविचार) मन(डो़कं) तार्किकतेने विचार करण्याची सहजप्रवृत्ती जी मेंदूमध्ये अनैच्छीक(Involuntary) असते,थोड्यावेळासाठी हरवून बसतो माणूस.त्याच दरम्यान या गोष्टी घडतात.लख्ख उजेडात्,सकाळी किंवा फ्रेश असताना भूत वगैरे कुणाला दिसत असेल तर सांगा...
बाकी तो विहीरीतला प्रसंग त्या पोरांचा मुर्खपणा होता.जरी अमा./पौ. दरम्यान अपघात्/आत्मह्त्या प्रकार होत असले तरी लोक तिच मानसिकता बनवण्याच्या मागे लागतात.अर्थात याला अपवादही आहेत,तुमच्यासारखे थोडे.

____________________________________________________

रिया,आमच्या वडलांच्या बदल्यांमुळे आमचं राहणं एवढ्या ठिकाणी झालय आणि त्यात भटकंतीची आवड.त्यामुळे तिथल्या बोल्या कानावर आहेत.त्या वापरताना मजा येते.तशीच ही कोल्हापुरी... Happy
जमल्यास आणखी एक-दोन किस्से नंतर टाकेन.

Smite Lol

Pages