मायबोली गणेशोत्सव २०१३: उपक्रम एस टी वाय : कथा १. रेवाचा निर्णय काय?

Submitted by संयोजक on 31 August, 2013 - 08:28

एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न!
धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने एखादी गोष्टं थोडी थोडी पुरी करावी.
एकेक सीन देत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------

STY2.jpg

लेखकः बेफिकीर

कथा: रेवाचा निर्णय काय?

रेवाच्या डोळ्यातून उतरत असलेली चमक निमितच्या वाक्याने पुन्हा झगमगू लागली. निमित स्वतःचे आवरताना स्वतःच्या आवरण्यापेक्षा रेवाच्या आवरण्याकडे अधिक लक्षपूर्वक पाहात होता. रेवाचे जवळपास होतच आलेले होते. मात्र तिने शेवटचे आरश्यात पाहिले तेव्हा निमितही तिच्यामागे उभा होता आणि त्याने आरश्यात रेवाचे डोळे पाहिले आणि व्यावसायिक कळकळ देहबोलीत ओतून रेवाला म्हणाला...

"यू शूड बी लूकिंग चीअरफुल, अ‍ॅज इफ यू नो?... यू आर सो हॅपी टू बी इन द ग्रूप"

रेवाने आरश्यातूनच किंचित उदासपणे निमितच्या त्या आग्रही चेहर्‍याकडे पाहिले आणि पुन्हा एक हलकासा ब्रश अप करत अचानक तिने स्वतःच्याच प्रतिमेकडे उत्फुल्लपणे पाहिले.

"दॅट्स इट रेवा... देअर यू आर"

निमितचा उत्साह आता शिगेला पोचला होता. रेवा त्याला याक्षणी जशी दिसायला हवी होती तशी दिसत होती.

टेक्नोझोन ईन्डियाचे टेक्निकल डायरेक्टर सुब्बी, त्यांची पत्नी उर्मिला, टेक्नोझोनचाच सप्लाय चेन चीफ अरोरा आणि डिझाईनचा सर्वेसर्वा नातू या चौघांना डिनरचे प्रपोजल देणे हे भल्याभल्यांना जमू शकले नसते. निमितने घाबरत घाबरत खडा टाकला आणि सगळे चक्क तयार झाले. या तयार होण्यामागे निमितच्या मितवा अ‍ॅन्सिलरीजचे उत्पादन सर्व तांत्रिक निकषांवर अगदी हवे तसे उतरणे हे कारण होते. तांत्रिकदृष्ट्याच जर काही कमतरता असत्या, तर अरोराने निमितचा एस एम एस सुद्धा वाचला नसता. अरोराला डिनर मान्य झाले नसते तर सुब्बींचा सेक्रेटरीही निमितला भेटला नसता. आणि सुब्बी आणि अरोराच्या पुढे जाण्याची नातूची पोझिशनच नव्हती.

मितवा अ‍ॅन्सिलरीज! निमित मधील 'मित' आणि रेवामधील 'वा' असे ते नांव तयार झाले होते. व्यावसायिक यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करणार्‍या मितवाचा होल अ‍ॅन्ड सोल निमित हा पंचेचाळिशीचा, गोरा पान, पोट सुटलेला, बेढब आणि अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता आणि साहस यांचा संगम असलेला माणूस होता. जे उद्दिष्ट आहे ते गाठण्यासाठी ज्या ज्या प्रकारचे प्रयत्न करणे आवश्यक आणि शक्य आहे त्यातील एकही करणे तो बाकी सोडायचा नाही. चोवीस तास व्यवसायाचे भूत मानगुटीवर बसलेला निमित एक माणूस म्हणून यांत्रिक झाला होता. यंत्रमानव, जो ठरवेल ते करतो, ते करण्यासाठी जे आवश्यक वाटेल ते करतो.

सुब्बींची मिसेस त्यांच्याबरोबर नसती तर आज निमित कोणाबरोबर डिनरला आहे हेही रेवाला माहीत झाले नसते. फक्त तो रोजच्याप्रमाणे एक ते दीड वाजता येईल आणि आपला एखादा नोकर दार उघडून त्याला आत घेईल आणि मग निमित झोपून जाईल इतकेच तिला माहीत असते. पण आज तो घरी आला तेच मुळी पावणे सातला आणि म्हणाला...

"रेवा, तुझ्याकडे पंचेचाळीस मिनिटे आहेत... रीजन्सीच्या सिक्स्थ फ्लोअरला डिनर आहे... सुपर हायक्लास ग्रूप आहे.. यू शूड लूक यूअर बेस्ट सो फार इन द लाईफ.. त्यात एकांची मिसेसही आहे.. सो यू कूड बी फ्रेंडली विथ हर... कॅरी सम फ्लॉवर्स विथ यू फॉर हर... आय अ‍ॅम टेलिंग यू... यू शूड लूक सिंपली स्टनिंग..."

एक बाहुली! जी त्याक्षणी दिवसभरच्या ड्रेसमध्ये होती. कोणत्यातरी कारणाने आज तिला नवर्‍याची साथसंगत मिळणार हेही तिच्यासाठी जरा वेगळे होते. ती इतकी काही भोळसट नव्हती की तेवढ्यावर समाधानी होईल, पण काहीच नाही तर निदान ते तरी! तिने ठरवले. हा आपल्याला सादर करणार! लोक आपल्याला बघणार! आपल्याला बघून निमितकडे असूयेने बघणार! मग आपल्याशी मैत्रीपूर्ण बोलू लागणार! आपल्याकडून अशी अपेक्षा असणार की आपण त्या लोकांना खेळवावे! त्यांना आपल्या विचारांचा तळ गाठता येऊ नये. या स्त्रीशी नेमकी किती घट्ट मैत्री होऊ शकेल याचा अंदाज बांधता येऊ नये. हे सगळे असेच होणार असेल, तर आज निमितसकट सगळ्यांनाच शॉक देऊ!

रेवा! चव्वेचाळिसाव्या मिनिटाला ती सिव्हिकमध्ये बसली तेव्हा निमित क्षणभर थांबला आणि तिच्याकडे बघत तारीफ करणार्‍या चेहर्‍याने हासत म्हणाला...

"रेवा... आय कान्ट बिलीव्ह.. तू अजूनही तितकीच सुंदर दिसतेस... आय.. आय लव्ह यू"

'आय लव्ह यू'! रेवाला ते शब्द ऐकू जरी असेच आलेले असले तरीही त्या शब्दांचा जो अर्थ तिच्या मनात पोचला तो असा होता...

'धन्यवाद तू सुंदर दिसत असल्याबद्दल! आज नक्की पब्लिक भाळणार तुझ्यावर'!

पण रेवामधील खूप जुनी झालेली कोणतीतरी एक निरागस नवयौवना मात्र त्यातही थोडीशी सुखावली, यामुळे, की ती आजही तितकीच सुंदर दिसते हे तितक्याच जुन्या झालेल्या तिच्या नवर्‍याला मान्य आहे. इतकेच नाही तर स्वीट सिक्स्टीन असलेली आपली मुलगी शीतल आणि आपण रस्त्यातून जात असताना लोक आपल्याचकडे पाहतात हेही रेवाला आठवले. सिव्हिकमध्ये रेवाच्या केसातील आणि हातातील मोगर्‍याचा गंध भरून उरला तेव्हा निमितचे मन रीजन्सीच्या सहाव्या मजल्यावर पोचलेदेखील होते.

रीजन्सीच्या पोर्चमध्ये मात्र वेगळेच समजले. सुब्बी, अरोरा आणि नातू एकाच गाडीतून उतरले. मिसेस सुब्बी दिसतच नव्हत्या. निमितने सगळ्यांशी रेवाची ओळख करून दिली. रेवाने सुब्बींना विचारले..

"मिसेस सुब्बी?"

"ओह शी हॅड सम क्लब मीटिंग अ‍ॅन्ड ऑल... लास्ट मिनिट चेंज.. सो सॉरी". सुब्बींनि दिलगीरी व्यक्त केली.

निमित म्हणाला...

"नो इश्यूज... बट शी मस्ट कम द नेक्स्ट टाईम सर"

"ओह श्योर"

"प्लीज"...

दाराकडे हात दाखवत निमितने सगळ्यांना एलेव्हेटरकडे गाईड केले. सगळ्यांच्या मागून चालताना अचानक निमित रेवाच्या कानात पुटपुटला..

"टेक्निकली वुई आर थ्रू... सो सुब्बी अ‍ॅन्ड नातू आर ऑलरेडी विथ अस रेवा.. वुई ओन्ली नीड टू टेक केअर ऑफ अरोरा... ओके?"

"हं"

रेवाला कश्यातच स्वारस्य नव्हते. मिसेस सुब्बी न आल्याने हातातील मोगर्‍याचा गजरा तिने नुसताच बाळगला.

सहाव्या मजल्यावरून शहर झगमगीत दिसत होते. एका अतिशय जाणीवपूर्वक निवडलेल्या टेबलभोवती सगळे स्थानापन्न झाले तेव्हा सुब्बी रेवाकडे बघत म्हणाले...

"आय अ‍ॅम सो सॉरी... आमच्या रुक्ष गप्पा तुम्हाला आता ऐकत बसाव्या लागणार... मी आधीच कळवायला हवे होते की विद्या येत नाही आहे म्हणून..."

रेवाने तोंडभर हासत उत्तर दिले...

"छे छे?... त्यात काय इतके? पण पुढच्यावेळी नक्की आणा त्यांना..."

"नक्की नक्की"

त्यानंतर ऑर्डर प्लेस होण्याचा कार्यक्रम झाला आणि मग रेवा ही एकटीच स्त्री असल्याने आणि तिला कंफर्टेबल वाटणे मस्ट असल्याने सुब्बींनी रेवाशी जुजबी चर्चा केली. रेवा एरवी काय करते, तिच्या हॉबीज काय, त्यांची मिसेस काय करते वगैरे चर्चा झाल्यावर आपसूकच बिझिनेसशी संबंधित गप्पा सुरू झाल्या.

तांत्रिकदृष्ट्या मितवा थ्रू असल्यामुळे सुब्बी आणि नातूला काहीच डिस्कस करायचे नव्हते. मात्र सुब्बी निमितशी आंतरराष्ट्रीय व्यापार, शेअर्स, मंदी, विकास असल्या विषयांवर बोलत असताना त्यात व्यत्यय आणून बिझिनेस डिस्कस करणे हे अरोराच्या दृष्टीने प्रोटोकॉलच्या विरुद्ध होते. काही झाले तरी सुब्बी खूपच वरिष्ठ होते. सुब्बी आणि निमितच्या गप्पा सुरू असताना अरोरा त्यांच्या गप्पात ब्रीफली सहभागी होत होता. रेवा मात्र त्या गप्पात काडीचाही इंटरेस्ट नसूनही फक्त त्यातच इंटरेस्ट असल्यासारखे आविर्भाव चेहर्‍यावर आणत होती. सुब्बींच्या दृष्टीने रेवाचे आता मीटिंगमध्ये काहीच काम नव्हते, पण ती एका बिझिनेस असोसिएटची पत्नी असल्याने तिच्याप्रती योग्य तो आदरभाव राखणे इतकेच ते आपले कर्तव्य समजत होते. अरोराला रेवामध्ये काहीही दिलचस्पी नव्हती कारण त्याच्यामते त्या बिझिनेस डिनरमध्ये ती असण्याचेच कारण नव्हते. नातू मात्र रेवाला पाहिल्यापासून किंचित गढूळला होता आणि रेवाला ते जाणवलेले होते. त्यामुळे नातूकडे ती जवळपास बघतच नव्हती. काही बोललीच तर ती अरोराशी बोलत होती.

अर्ध्या पाऊण तासाने गप्पांचा ओघ निमितने अलगदपणे मितवाच्या काँट्रॅक्टकडे वळवला तेव्हा वेटर सूप आणि कॉकटेल्सचे बोल्स आणि ग्लासेस क्लीअर करत होता. आता निघालेल्या विषयासंबंधात सुब्बींनी फक्त नातूला 'होप द प्रॉडक्ट इज क्लीअर?' असे विचारले आणि नातूने घाईघाईने 'येस सर' असे म्हणून हासत निमित आणि रेवाकडे पाहिले. रेवाने नातूची कीव केल्याप्रमाणे एक स्माईल फेकले.

आता खरी रंगत चढली गप्पांना! कारण आता सप्लाय चेनचा दादा अरोरा आणि मितवाचा ओनर निमित यांची जुंपणार होती. अरोराने इराक युद्ध, चायनातील स्टील रिक्वायरमेन्ट आणि ऑटोमोटिव्ह सेक्टरमधील जागतिक मंदी हे विषय आत्ता का काढलेले असावेत याची निमितला पूर्ण जाणीव होती. या विषयांकडून तो शेवटी प्राईस रिडक्शनवर येणार यात शंका नव्हती. एकमेकांना जोखत दोघे वरवर स्टायलिश वाटणार्‍या पण छुपे निगोसिएशन असलेल्या गप्पा मारत होते. सुब्बींना हे सगळे समजत होते, पण नातूच्या डोक्यावरून जात होते. रेवा हुषार होती. कोणत्या क्षणापर्यंत अरोराच्या बाजूने असल्यासारखे दाखवायचे आणि कोणत्यावेळी कोणाचातरी फोन आला असे दाखवून काही काळ लांब जायचे हे ती अनुभवाने शिकलेली होती. पण ती वेळ लवकर येत नव्हती. रेवा वैतागत होती. आजवरच्या अनुभवानुसार मेन कोर्स सर्व्ह होतो तेव्हा कमर्शिअल्स थ्रू झालेली असतात हे तिला माहीत होते. पण इथे तर मेन कोर्सही संपत आलेला होता.

आणि अचानक अरोरा आणि निमितच्या गप्पा चालू असताना सुब्बींनी काहीतरी लक्षात आल्याप्रमाणे रेवाकडे एकदम बघत विचारले...

"सॉरी... मगाशी तुम्ही काय म्हणालात? ... यू हॅव डन बिझिनेस अ‍ॅनलिस्ट्स डिप्लोमा फ्रॉम ओ आर?"

रेवा हबकली. तिच्या अंदाजाने गप्पांच्या सिक्वेन्समध्ये हा प्रश्न, तोही आत्ता, निघणेच शक्य नव्हते. अरोरा आणि निमित आता अक्षरशः बुद्धिमत्तेचा संपूर्ण कस लावून एकमेकांच्या अनुभवाला भिडत होते. मात्र सुब्बींनी विचारलेल्या या प्रश्नामुळे अर्थातच त्यांची ती चर्चा एकदम थांबलीच. हबकलेल्या रेवाने क्षणभर निमितकडे ओझरते पाहात आत्मविश्वासाने सुब्बींना उत्तर दिले..

"येस सर... आय हॅव डन इट"

"अरे देन व्हाय डोन्ट यू जॉईन अस इन एम आय एस? द पोझिशन इज अल्सो गूड... पॅकेज इज एक्सलंट..."

पोटात दचकून खड्डा पडलेला असताना अचानक सुखद कारंजी उडू लागावीत तसा रेवाच्या पोटातून आनंद ओसंडत तिच्या चेहर्‍यावर सांडला. डोळ्यांमधून तो उघडपणे व्यक्त होत असतानाच तोंडाने मात्र ती म्हणाली...

"आय मीन... आय मीन.. आय डोन्ट नो..."

चुटपुटत निमितकडे बघत ती पुन्हा सुब्बींकडे पाहू लागली. सुब्बींनी एका कोट्याधीशाच्या पत्नीला अ‍ॅक्रॉस द टेबल एका अतिशय रेप्यूटेड कंपनीतील उत्तम जागेवरील नोकरीची ऑफर देऊ केली होती. तीही तिच्या नवर्‍यासमोरच! क्षणाच्या एक लाखाव्या भागात निमितमधील बिझिनेसमन जागा झालस होता आणि रेवाला पुढचे काही सुचायच्या आत म्हणाला होता...

"बाय ऑल मीन्स! वुई बोथ वूड बी ऑनर्ड"

निमितचा डाव सरळ होता. ज्या कंपनीत बायकोच नोकरी करेल, तेही एम आय एस सारख्या इन्फर्मेशनच्या समुद्रात बुडून, तिथे बस्तान बसवणे त्याला अत्यंत सोपे जाणार होते. त्याने रेवाला काही चॉईसच विचारलेला नव्हता. सुब्बी फक्त म्हणाले...

"प्लीज इमेल यूअर सी व्ही अ‍ॅन्ड ऑल... अ‍ॅन्ड मे बी.. देअर आर सम फॉर्मॅलिटीज.. दॅट्स इट"

त्यांच्यासारख्या कंपनीला कोणीही उमेदवार मिळाला असता. त्यांनी ती ऑफर रेवालाच का केली होती? हा प्रश्न ते सोडून सगळ्यांच्या मनात आलेला होता. तो जाणवताच सुब्बी म्हणाले...

"कॉस्ट सेव्हिंग... यू नो मिस्टर निमित?... इफ आय हॅव टू सोर्स अ कँडिडेट फ्रॉम द जॉब मार्केट... आय हॅव टू पे... "

जोरजोरात हासत निमित म्हणाला...

"सो आय हॅव ऑलरेडी गिव्हन द डिस्काऊंट"

यावर मात्र अरोराही हासला. सुब्बी आणि अरोरांचे हासणे निर्मळ होते. नातूच्या हासण्यात 'रेवा आता रोज दिसणार' याचा आनंद झळकत होता. रेवाला कोणीच काही विचारले नव्हते.

अरोरा आणि निमितच्या पुढच्या डिस्कशनमधील वाक्ये रेवाच्या कानांवर आदळत राहिली. पण अर्थ मनापाशी पोहोचू शकला नाही.

रेवासमोर अनेक प्रश्न होते. फक्त नोकरी करावी की नाही इतकाच प्रश्न नव्हता. ही नोकरी करून किंवा न करून आपण आपल्या आयुष्यात नेमके काय काय हवे ते घडवून आणू शकतो अशी बरीच मोठी यादी होती मुद्यांची!

रेवासमोरचे प्रश्न असे होते:

- नोकरी करावी की करू नये

- केली तर आपल्यातील एक उच्चशिक्षित व्यक्ती योग्य त्या वळणावर आपले आयुष्य नेऊ शकेल का?

- केली तर शीतलला या वयात आईची अधिक गरज असताना आपले नोकरी करणे तिच्यासाठी काही प्रमाणात घातक ठरेल का?

- निमित आपल्या नोकरीमार्फत माहिती काढून स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करेल हे आपल्याला सहन होईल का?

- आपण नोकरी नाही केली तर आपण आयुष्यात नेमक्या कोण बनून राहू?

- ही नोकरी करण्यास निमित मान्यता देत आहे तर मग कोणतीही इतर चांगली नोकरी करण्यासही त्याने मान्यता का देऊ नये?

- आजवर निमितच्या मनात आपल्याबद्दल असा विचार का आला नाही?

- सुब्बींचा आणि त्यांच्या कंपनीचा माणूस शोधण्याचा खर्च वाचवण्याचा फायदा आपण का करून द्यावा?

- ही संधी समोर येईपर्यंत आपण कधीच असा विचार गांभीर्याने का केलेला नव्हता?

- निमितचे आणि आपले यापुढील नाते, नोकरी केली तर कसे असेल आणि नाही केली तर कसे असेल?

- आपण नेहमी निमितचा विचार का करायचा? त्याने आपला विचार नक्की किती वेळा केला आजवर?

- आपल्याला आर्थिक गरज नसताना आपण नोकरीत डोके का शिणवून घ्यायचे?

- आपण कधीकाळी केलेला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आज इतका महत्वाचा का ठरावा?

- ही ऑफर आहे की इतरच काही?

- अशी ऑफर मिळेल यासाठीच हे डिनर आयोजीत करावे असा निमितचा तर प्लॅन नसेल?

- ही ऑफर हा बिझिनेस डीलचा तर एक भाग नसेल? सुब्बी आणि अरोरा यांनी निमितला इंप्रेस करण्याचा?

- माझ्याबाबतीत इतरजण निर्णय घेतात हे मला का मान्य व्हावे? भले निर्णय योग्य असेल तरीही?

- एकदा बाहेरच्या जगात कर्तृत्व दाखवून निमितचा इगोच नष्ट करावा का?

विचारात गढलेल्या रेवाने शेवटी..... अत्यंत सूज्ञ निर्णय घेतला...

=========================================================
नियमावली:

१) कथेचा शेवट अतिरंजीत चालेल पण पटेल असा असावा
२) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
३) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
४) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परीचय करून देऊ नये.
५) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

==========================================================

रेवा-निमितची भेट होते.
...अँड दे लिव हॅपिली एवर आफ्टर असा शेवट अपेक्षित आहे.

दि. १२ सप्टेंबर २०१३ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता एस टी वायची ही कथा बंद करण्यात येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छेन्नई यक्सप्रेस गाठायची होती .. रेवाला खान्द्यावर टाकुन न्ययाचं होतं !
त्या आधी तिला खान्द्यावर घेतलेला ' दिलवाले दुल्हनिया ' स्टाइल फोटू काढून घ्याय्चा होता !
पण फाइव्ह स्टार हॉटेल ची उंची पर्शिअन कार्पेट्स हलाल झालेल्या मानवी रक्तानी माखली होती, भिती वर डाग पडले होते त्यामुळे फोटुला बॅग्राउंड मिळेना !!
शेवटी फोटो न काढता त्या घसरड्या रक्तचा सडा ओलांडून आणि खान्द्यावर ६० किलोच्या रेवाला घेऊन बिचारा नातू घाम पुसत पुढे जाउ लागला .. हॉटेल बाहेर येउन साठ किलोचं रेवाचं धूड रिक्शात टाकलं आणि निघाला ठेसनाच्या दिशेने !!! ' पण त्या रिक्शेला अजुन एक रिक्शा फॉलो करत होती , रॉ एजन्ट टायगरची !!
अरे हा नातू श्रीलंकेचा नातू कधी झाला , हा तर पूर्वी दुसर्या गँग मधे होता!! त्यावेळी तो 'उद्दाम हसेन' यांचा नातू 'मुद्दाम घुसेन' होता .. टायगर पुटपुटला !!!!

दिलवाले दुल्हनिया स्टाइल फोटो काढता आला नाही तरी त्याच चित्रपटातला एक सीन नातूच्या आयुष्यात प्रत्यक्षात उतरणार होता ह्याची त्याला सुतराम कल्पना नव्हती. रिक्षात बसल्यावर गार वार्‍याने रेवाला थोडी शुद्ध आली. परंतू शेजारी बसलेला निमित नसून नातू आहे आणि आपण सिव्हिकमध्ये नसून रिक्षात बसलो आहोत याची जाणीव तिला झाली नाही. रिक्षेवाल्याला आपला ड्रायव्हर समजून तिने फर्मान सोडलं, 'गंगाराम, एसी बढाओ'. नातू मिशनवर असलेला पाषाणहृदयी वराहमिहीर असला तरी मनाने मात्र रेवावर भाळलेला भोळा प्रेमिक होता. त्याने तत्परतेने गळ्यातल्या टायने तिला वारा घालायला सुरूवात केली. टायगरची रिक्षा आता रेवा आणि नातू होते त्या रिक्षेला समांतर जात होती. मिशनवर आलेला वराहमिहीर एका सुंदरीला टायने वारा घालत असलेला बघून टायगरला हसु आवरेना. त्याच्या गडगडाटी हास्याने रिक्षा भरून गेली. त्याच वेळी नातूचे लक्ष टायगरच्या रिक्षेकडे गेले.

'ओह क्रॅप!" त्याच्या तोंडातून उद्गार निघाला. त्याने रिक्षावाल्याच्या अंगावर खेकसत रिक्षा जोरात चालवायला सांगितले. सुदैवाने टायगरच्या रिक्षेसमोर एक गाय आडवी आल्याने ती मागे पडली आणि रेड सिग्नल ओलांडून नातू आणि रेवाची रिक्षा स्टेशनच्या आवारात शिरली. मधल्या वेळात रेवाच्या नाकाला क्लोरोफॉर्मचा रूमाल लावण्याची हुशारी नातूने दाखवली होती. रिक्षेचे पैसे न देतात तो रेवाचं पार्सल खांद्यावर वागवत शक्य तेवढ्या वेगात छेन्नई एक्स्प्रेसकडे निघाला. रिक्षावाला 'ओ साब पैसे दे दो' ओरडत त्याच्या मागे लागला परंतू रिक्षा तशीच सोडून फार दूर जाणे त्याला शक्य नव्हते. टायगरवर मात्र असे काही बंधन नव्हते. चपळाईने एकावेळी दोन तीन पायर्‍या चढत तो नातूच्या मागावर जात होता. नातू प्लॅटफॉर्मवर पोचला आणि ट्रेनने शेवटची शिट्टी दिली. नातू समोर येइल त्या डब्यात चढायला लागला आणि त्या घाईत रेवा प्लॅटफॉर्मवर पडली. आता टायगरपासून आपला जीव वाचवावा की रेवाला बरोबर घेऊन मिशन पूर्ण करावे अशा द्विधेत नातू सापडला. त्याचे नशीब जोरावर होते म्हणून की काय फार विचार करायच्या आतच प्लॅटफॉर्मवरच्या दोन जणांनी रेवाला उभी करून तिचा हात नातूच्या हातात दिला आणि नातूच्या कानात गाणे वाजायला लागले, 'तुझे देखा तो ये जाना सनम....'

सिंडे Rofl

इकडे हॉटेल मधे निपचित पडलेला निमित उठून सुब्बीजवळ गेला. "सुबन्या! सुबन्या! ऊठ"
सुब्बी हा इन्डस्ट्रियलिस्ट सुब्बी नसून दुबई गँग चा भाईचा उजवा हात चिकना सुबन्या होता. अरोरा पण खरा तर असलम बौना म्हनून फेमस असलेला भाईचाच एक शार्प शूटर होता. आत्त्ता हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात मरून पडले होते! इम्पॉसिबल!! फार मोठा सेटबॅक होता नावेद भाईच्या गँग ला!!
असलम आणि सुबन्याचा गेम झाल्याचे भाईला कळले तर च्यामारी भाई माझाच गेम करतील!
काय करावे??! अचानक निमित ला आयडिया सुचली!!
गळ्यातल्या लॉकेट मधे लपवलेला एक फोन वापरून निमित (?!)ने भाईला डाअय्रेक्ट दुबईला फोन लावला!
" भाई, लोफर लतिफ बोलतोय... इथे पंगा झालाय!! असलम भाईजान आणि सुबन्या दोघांचा गेम झाला! फिट्टे गँग चं काम आहे नक्की! रुक्सानाला पण उचललंय त्यांनी ! भाई! मदद! मला पण नक्की टपकवनार हे लोक! .. भाई ? भाई ? ..." आता निमित उर्फ लतिफ ला घाम फुटला होता..
भाईने तिकडून काहीच न बोलता फोन कट केला होता! छोटा तगडा ला आत बोलावत भाईंनी एकच सांगितले
"छोटे, बोटीच्या कप्तानाला ऑर्डर दे....जायची तयारी कर ताबडतोब..! "घर आजा परदेसी तेरा देस बुलाये रे..... " !! " (भाईला बॉलिवुडाचं फार वेड!!)

सिंडीने लिहिलेले बघून फार हसतेय Lol
ती रेवा बिचारी कसलाच निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नाही राहिलेली!! Happy

केली आहे दुरूस्ती. दुसरं कुणी लिहायच्या आत पोस्टलं पाहिजे ह्या भितीने जरा मिश्टेक झाली Proud

चिकना सुबन्या >>>> Biggrin

छोटा तगडा , भाई आणि गँग सोन्याचं पॉलिश केलेल्या बोटीतून मायदेशाकडे निघाली!
भाईला बॉलिवुड , सोनं याची फार आवड!
सोन्याची ज्वेलरी, सोन्याची सनग्लास फ्रेम, सोन्याचं घड्याळ , सोनेरी नौका , त्या नौकेत सोनेरी भिंती, सोनेरी वॉश बेसिन आणि सोनेरी कमोड !
मायदेशाच्या आठवणीन भाई गाउ लागला,
जहां डाल डाल पर सोनेकी चिडीया करती है बसेरा , वो भारत देश है मेरा'
" चान्दीकी सायकल सोनेकी सिट आओ चले डार्लिंग चले डबलसीट" , छोट्या तगड्याने साथ दिली , ( भाई आणि छोट्या तगड्याचा विशेष ' दोस्ताना' होता !
भाईने तगड्याच्या गळ्यात हात टाकून गाउ लागला "
"सोना कितना सोना है सोने जैसे तेरा मन , तू मेरा तू मेरा तू मेरा तगडा नंबर १"
इकडे रेवा उर्फ रुखसाना आणि नातू एका डब्यातल्या घामट कळकट -तोंडाला वास येणार्या जुन्या अंगाच्या लोकांच्या गर्दीत कोंबले गेले !
रेवाला पाहून स्त्री दाक्षिण्य दाखवत एका दगडु तेलीने तिला बसायला जागा करून दिली .
नातू सुध्दा तिला खेटून बसलाच!
इतक्यात नातूच्या थलायवा चा एसेमेस आला "कार्ट्या, तू जिला उचललस ती लोफर लतिफची लैला रुखसाना आहे, दुबईच्या भाईला हे कळलय आणि तो तुझ्या मागावर निघालाय ..अता तरी तुझे हे लंपट "विबासं "बन्द कर आणि त्या लैलाला टपकवून आपल्या गँग वार कडे फोकस कर!"
नातू इकडे पूर्ण मजनु झाला होता , त्याला अता फक्त " नातूभाई रुख्साना ले जायेंगे" स्टोरीत इंटरेस्ट होता ..त्याने आपला फोन छेन्नाई एक्स्प्रेस मधून फेकून दिला !
रुखसाना शुध्दीवर येऊन पळून जायच्या तयारीला लागली होती.. ते पाहून नातू गाउ लागला
रुख्सानाssssssss
रुक रुक
रुखसाना ओ जाना हमसे दो बाते
करके चली जाना ये मौसम है दिवाना , रुक रुक "
नातूला दिवाना झालेला पाहून रेवाने हळुच एक टेक्स्ट मेसेज केला ..
Agent Tigress reporting , he's totally trapped , continuing journey in Chennai express"
त्यावर उत्तर आलं " Don't let him escape , continue your journey ,मी छतावर छैय्या छैय्या करतोय- Tiger !

खूप दाटीने बसावं लागलं होतं आणि नातू अगदीच पिच्छा सोडत नव्हता. रेवाला त्याला खेळवत ठेवायचं होतं पण दुरूनच. दारासमोर बसलेल्या एका बाईचं शेंबडं पोर केकाटून रडत होतं. तिला स्वतःच्या जागेवर बसण्याची खूण करून रेवा उठली आणि दारात जाऊन उभी राहिली. तिथून ती नातूवर नजर ठेऊ शकणार होती आणि टायगरने आलेले मेसेजेस त्याने वाचण्याचा धोका पण नव्हता. टायगर! खरं तर तो होता ट्रेडर. ट्रेडरचा टायगर कसा झाला हा प्रवास फारच रोमांचकारी होता. रेवा सुद्धा रेवथीची रुकसाना आणि पुन्हा रेवा कशी झाली यावर तिचा स्वतःचा सुद्धा विश्वास बसला नसता. रेवाला जुने दिवस आठवु लागले. रेवथी आणि ट्रेडर एकाच कंपनीत होते. रेवथी ऑफशोअरिंग कंपनीतर्फे फ्रंट ऑफिस अनालिस्ट म्हणून शॉर्ट टर्म असाइनमेंटवर आली होती. पहिल्याच दिवशी तिची गाठ पडली ट्रेडरशी. तिथे प्रत्येकाला एक नाव होतं, ट्रेडर मात्र ट्रेडरच होता. स्वतःचं नाव न सांगता जो पेशा आहे त्याला शोभेल असं नाव घ्यायची ही त्याची जुनी खोड होती. म्हणूनच आता तो होता टायगर. खुंखार जांबांज टायगर! टॉल, डार्क आणि हँडसम, गालांना खळ्या, हनुवटीवर खड्डा. रेवथीला जॉन अ‍ॅब्राहमचीच आठवण झाली होती त्याला बघून. त्याच्या जुन्या आठवणींमध्ये रंगलेली रेवा उर्फ रुकसाना उर्फ रेवथी गोड हसली. डोळ्याची पापणी न लवता तिच्याकडे एकटक बघणार्‍या नातूला वाटलं ती त्याच्याकडेच बघून हसतेय. नातूच्या कानात गाणं वाजायला लागलं, 'तु सामने बैठी रहे मै तुझे देखा करुं...'

आयाबायांच्या बॉलीवुडी कृपेने भन्नाट निघालीय चेन्नई एक्सप्रेस.
संयोजकांपैकी कुणाला एखादा पार्ट लिहायला परबानगी असते का?
मलाहि लिहावंसं वाटू लागलंय. Wink

अर्र असामी तुझी स्टोरी लाइन वेगळी होती का? तू लिही, मी पोस्ट एडिट करते.

मै, ट्रेडिंग फ्लोअर संपला. फ्लॅशबॅक होता तो. आता तुम्ही चे ए सुरू ठेवा.

तू लिही, मी पोस्ट एडिट करते. >>> नाही सिंडी. मला एका मिटींग मधे जायचेय्ते विसरूनच गेलोहोतो म्हणून रुमाल उचलला. तुम्ही सुरू ठेवा मी पण नंतरच ठिगळे जोडीन Lol

बायकांनो, नातुने पण रुकसानाजवळ जाऊन उभे रहायला हवे हं... लुपहोल्स सोडु नका
(तुम्ही कथा इतक्या दूर नेऊन पोचवली आहे की आता कोणाला पुन्हा त्या टेबल व बिजनेसजवळ आणता येणार नाही).. Lol आणि कथेचे नाव विसरु नका Wink

रेवा विचारात पडली होती. माझ्या बाबतीतले सर्वच निर्णय इतरजण का घेतात?
आता आपला निर्णय आपणच घ्यायचा.
नातूंशी नाते जोडून नातूंच्या आईला नातू द्यायचा.
लतीफ ला भाईकडून टपकवायचे आणि त्याचा 'लेट' लतीफ करायचा.
पण कसं?
शीतलचं काय होईल? नातूबाई तिला नात म्हणून स्विकारतील का?
आपण आयुष्यात काय बनायचं रेवा की रुखसाना कि रेवती?

हो, प्लिजच.. नाहीतर बायांनीच बाईला निर्णय घेण्यापासुन वंचित ठेवले असा ठपका येईल. प्रदक्षिणा पुरी केली तरी दोघे मेलेच की एका झटक्यात. की "केकका कपुर" प्रमाणे पुन्हा जिवंत होणार ते? Proud (चला टाईम्पास बंद करते). Happy

Pages