मायबोली गणेशोत्सव २०१३: उपक्रम एस टी वाय : कथा १. रेवाचा निर्णय काय?

Submitted by संयोजक on 31 August, 2013 - 08:28

एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न!
धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने एखादी गोष्टं थोडी थोडी पुरी करावी.
एकेक सीन देत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------

STY2.jpg

लेखकः बेफिकीर

कथा: रेवाचा निर्णय काय?

रेवाच्या डोळ्यातून उतरत असलेली चमक निमितच्या वाक्याने पुन्हा झगमगू लागली. निमित स्वतःचे आवरताना स्वतःच्या आवरण्यापेक्षा रेवाच्या आवरण्याकडे अधिक लक्षपूर्वक पाहात होता. रेवाचे जवळपास होतच आलेले होते. मात्र तिने शेवटचे आरश्यात पाहिले तेव्हा निमितही तिच्यामागे उभा होता आणि त्याने आरश्यात रेवाचे डोळे पाहिले आणि व्यावसायिक कळकळ देहबोलीत ओतून रेवाला म्हणाला...

"यू शूड बी लूकिंग चीअरफुल, अ‍ॅज इफ यू नो?... यू आर सो हॅपी टू बी इन द ग्रूप"

रेवाने आरश्यातूनच किंचित उदासपणे निमितच्या त्या आग्रही चेहर्‍याकडे पाहिले आणि पुन्हा एक हलकासा ब्रश अप करत अचानक तिने स्वतःच्याच प्रतिमेकडे उत्फुल्लपणे पाहिले.

"दॅट्स इट रेवा... देअर यू आर"

निमितचा उत्साह आता शिगेला पोचला होता. रेवा त्याला याक्षणी जशी दिसायला हवी होती तशी दिसत होती.

टेक्नोझोन ईन्डियाचे टेक्निकल डायरेक्टर सुब्बी, त्यांची पत्नी उर्मिला, टेक्नोझोनचाच सप्लाय चेन चीफ अरोरा आणि डिझाईनचा सर्वेसर्वा नातू या चौघांना डिनरचे प्रपोजल देणे हे भल्याभल्यांना जमू शकले नसते. निमितने घाबरत घाबरत खडा टाकला आणि सगळे चक्क तयार झाले. या तयार होण्यामागे निमितच्या मितवा अ‍ॅन्सिलरीजचे उत्पादन सर्व तांत्रिक निकषांवर अगदी हवे तसे उतरणे हे कारण होते. तांत्रिकदृष्ट्याच जर काही कमतरता असत्या, तर अरोराने निमितचा एस एम एस सुद्धा वाचला नसता. अरोराला डिनर मान्य झाले नसते तर सुब्बींचा सेक्रेटरीही निमितला भेटला नसता. आणि सुब्बी आणि अरोराच्या पुढे जाण्याची नातूची पोझिशनच नव्हती.

मितवा अ‍ॅन्सिलरीज! निमित मधील 'मित' आणि रेवामधील 'वा' असे ते नांव तयार झाले होते. व्यावसायिक यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करणार्‍या मितवाचा होल अ‍ॅन्ड सोल निमित हा पंचेचाळिशीचा, गोरा पान, पोट सुटलेला, बेढब आणि अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता आणि साहस यांचा संगम असलेला माणूस होता. जे उद्दिष्ट आहे ते गाठण्यासाठी ज्या ज्या प्रकारचे प्रयत्न करणे आवश्यक आणि शक्य आहे त्यातील एकही करणे तो बाकी सोडायचा नाही. चोवीस तास व्यवसायाचे भूत मानगुटीवर बसलेला निमित एक माणूस म्हणून यांत्रिक झाला होता. यंत्रमानव, जो ठरवेल ते करतो, ते करण्यासाठी जे आवश्यक वाटेल ते करतो.

सुब्बींची मिसेस त्यांच्याबरोबर नसती तर आज निमित कोणाबरोबर डिनरला आहे हेही रेवाला माहीत झाले नसते. फक्त तो रोजच्याप्रमाणे एक ते दीड वाजता येईल आणि आपला एखादा नोकर दार उघडून त्याला आत घेईल आणि मग निमित झोपून जाईल इतकेच तिला माहीत असते. पण आज तो घरी आला तेच मुळी पावणे सातला आणि म्हणाला...

"रेवा, तुझ्याकडे पंचेचाळीस मिनिटे आहेत... रीजन्सीच्या सिक्स्थ फ्लोअरला डिनर आहे... सुपर हायक्लास ग्रूप आहे.. यू शूड लूक यूअर बेस्ट सो फार इन द लाईफ.. त्यात एकांची मिसेसही आहे.. सो यू कूड बी फ्रेंडली विथ हर... कॅरी सम फ्लॉवर्स विथ यू फॉर हर... आय अ‍ॅम टेलिंग यू... यू शूड लूक सिंपली स्टनिंग..."

एक बाहुली! जी त्याक्षणी दिवसभरच्या ड्रेसमध्ये होती. कोणत्यातरी कारणाने आज तिला नवर्‍याची साथसंगत मिळणार हेही तिच्यासाठी जरा वेगळे होते. ती इतकी काही भोळसट नव्हती की तेवढ्यावर समाधानी होईल, पण काहीच नाही तर निदान ते तरी! तिने ठरवले. हा आपल्याला सादर करणार! लोक आपल्याला बघणार! आपल्याला बघून निमितकडे असूयेने बघणार! मग आपल्याशी मैत्रीपूर्ण बोलू लागणार! आपल्याकडून अशी अपेक्षा असणार की आपण त्या लोकांना खेळवावे! त्यांना आपल्या विचारांचा तळ गाठता येऊ नये. या स्त्रीशी नेमकी किती घट्ट मैत्री होऊ शकेल याचा अंदाज बांधता येऊ नये. हे सगळे असेच होणार असेल, तर आज निमितसकट सगळ्यांनाच शॉक देऊ!

रेवा! चव्वेचाळिसाव्या मिनिटाला ती सिव्हिकमध्ये बसली तेव्हा निमित क्षणभर थांबला आणि तिच्याकडे बघत तारीफ करणार्‍या चेहर्‍याने हासत म्हणाला...

"रेवा... आय कान्ट बिलीव्ह.. तू अजूनही तितकीच सुंदर दिसतेस... आय.. आय लव्ह यू"

'आय लव्ह यू'! रेवाला ते शब्द ऐकू जरी असेच आलेले असले तरीही त्या शब्दांचा जो अर्थ तिच्या मनात पोचला तो असा होता...

'धन्यवाद तू सुंदर दिसत असल्याबद्दल! आज नक्की पब्लिक भाळणार तुझ्यावर'!

पण रेवामधील खूप जुनी झालेली कोणतीतरी एक निरागस नवयौवना मात्र त्यातही थोडीशी सुखावली, यामुळे, की ती आजही तितकीच सुंदर दिसते हे तितक्याच जुन्या झालेल्या तिच्या नवर्‍याला मान्य आहे. इतकेच नाही तर स्वीट सिक्स्टीन असलेली आपली मुलगी शीतल आणि आपण रस्त्यातून जात असताना लोक आपल्याचकडे पाहतात हेही रेवाला आठवले. सिव्हिकमध्ये रेवाच्या केसातील आणि हातातील मोगर्‍याचा गंध भरून उरला तेव्हा निमितचे मन रीजन्सीच्या सहाव्या मजल्यावर पोचलेदेखील होते.

रीजन्सीच्या पोर्चमध्ये मात्र वेगळेच समजले. सुब्बी, अरोरा आणि नातू एकाच गाडीतून उतरले. मिसेस सुब्बी दिसतच नव्हत्या. निमितने सगळ्यांशी रेवाची ओळख करून दिली. रेवाने सुब्बींना विचारले..

"मिसेस सुब्बी?"

"ओह शी हॅड सम क्लब मीटिंग अ‍ॅन्ड ऑल... लास्ट मिनिट चेंज.. सो सॉरी". सुब्बींनि दिलगीरी व्यक्त केली.

निमित म्हणाला...

"नो इश्यूज... बट शी मस्ट कम द नेक्स्ट टाईम सर"

"ओह श्योर"

"प्लीज"...

दाराकडे हात दाखवत निमितने सगळ्यांना एलेव्हेटरकडे गाईड केले. सगळ्यांच्या मागून चालताना अचानक निमित रेवाच्या कानात पुटपुटला..

"टेक्निकली वुई आर थ्रू... सो सुब्बी अ‍ॅन्ड नातू आर ऑलरेडी विथ अस रेवा.. वुई ओन्ली नीड टू टेक केअर ऑफ अरोरा... ओके?"

"हं"

रेवाला कश्यातच स्वारस्य नव्हते. मिसेस सुब्बी न आल्याने हातातील मोगर्‍याचा गजरा तिने नुसताच बाळगला.

सहाव्या मजल्यावरून शहर झगमगीत दिसत होते. एका अतिशय जाणीवपूर्वक निवडलेल्या टेबलभोवती सगळे स्थानापन्न झाले तेव्हा सुब्बी रेवाकडे बघत म्हणाले...

"आय अ‍ॅम सो सॉरी... आमच्या रुक्ष गप्पा तुम्हाला आता ऐकत बसाव्या लागणार... मी आधीच कळवायला हवे होते की विद्या येत नाही आहे म्हणून..."

रेवाने तोंडभर हासत उत्तर दिले...

"छे छे?... त्यात काय इतके? पण पुढच्यावेळी नक्की आणा त्यांना..."

"नक्की नक्की"

त्यानंतर ऑर्डर प्लेस होण्याचा कार्यक्रम झाला आणि मग रेवा ही एकटीच स्त्री असल्याने आणि तिला कंफर्टेबल वाटणे मस्ट असल्याने सुब्बींनी रेवाशी जुजबी चर्चा केली. रेवा एरवी काय करते, तिच्या हॉबीज काय, त्यांची मिसेस काय करते वगैरे चर्चा झाल्यावर आपसूकच बिझिनेसशी संबंधित गप्पा सुरू झाल्या.

तांत्रिकदृष्ट्या मितवा थ्रू असल्यामुळे सुब्बी आणि नातूला काहीच डिस्कस करायचे नव्हते. मात्र सुब्बी निमितशी आंतरराष्ट्रीय व्यापार, शेअर्स, मंदी, विकास असल्या विषयांवर बोलत असताना त्यात व्यत्यय आणून बिझिनेस डिस्कस करणे हे अरोराच्या दृष्टीने प्रोटोकॉलच्या विरुद्ध होते. काही झाले तरी सुब्बी खूपच वरिष्ठ होते. सुब्बी आणि निमितच्या गप्पा सुरू असताना अरोरा त्यांच्या गप्पात ब्रीफली सहभागी होत होता. रेवा मात्र त्या गप्पात काडीचाही इंटरेस्ट नसूनही फक्त त्यातच इंटरेस्ट असल्यासारखे आविर्भाव चेहर्‍यावर आणत होती. सुब्बींच्या दृष्टीने रेवाचे आता मीटिंगमध्ये काहीच काम नव्हते, पण ती एका बिझिनेस असोसिएटची पत्नी असल्याने तिच्याप्रती योग्य तो आदरभाव राखणे इतकेच ते आपले कर्तव्य समजत होते. अरोराला रेवामध्ये काहीही दिलचस्पी नव्हती कारण त्याच्यामते त्या बिझिनेस डिनरमध्ये ती असण्याचेच कारण नव्हते. नातू मात्र रेवाला पाहिल्यापासून किंचित गढूळला होता आणि रेवाला ते जाणवलेले होते. त्यामुळे नातूकडे ती जवळपास बघतच नव्हती. काही बोललीच तर ती अरोराशी बोलत होती.

अर्ध्या पाऊण तासाने गप्पांचा ओघ निमितने अलगदपणे मितवाच्या काँट्रॅक्टकडे वळवला तेव्हा वेटर सूप आणि कॉकटेल्सचे बोल्स आणि ग्लासेस क्लीअर करत होता. आता निघालेल्या विषयासंबंधात सुब्बींनी फक्त नातूला 'होप द प्रॉडक्ट इज क्लीअर?' असे विचारले आणि नातूने घाईघाईने 'येस सर' असे म्हणून हासत निमित आणि रेवाकडे पाहिले. रेवाने नातूची कीव केल्याप्रमाणे एक स्माईल फेकले.

आता खरी रंगत चढली गप्पांना! कारण आता सप्लाय चेनचा दादा अरोरा आणि मितवाचा ओनर निमित यांची जुंपणार होती. अरोराने इराक युद्ध, चायनातील स्टील रिक्वायरमेन्ट आणि ऑटोमोटिव्ह सेक्टरमधील जागतिक मंदी हे विषय आत्ता का काढलेले असावेत याची निमितला पूर्ण जाणीव होती. या विषयांकडून तो शेवटी प्राईस रिडक्शनवर येणार यात शंका नव्हती. एकमेकांना जोखत दोघे वरवर स्टायलिश वाटणार्‍या पण छुपे निगोसिएशन असलेल्या गप्पा मारत होते. सुब्बींना हे सगळे समजत होते, पण नातूच्या डोक्यावरून जात होते. रेवा हुषार होती. कोणत्या क्षणापर्यंत अरोराच्या बाजूने असल्यासारखे दाखवायचे आणि कोणत्यावेळी कोणाचातरी फोन आला असे दाखवून काही काळ लांब जायचे हे ती अनुभवाने शिकलेली होती. पण ती वेळ लवकर येत नव्हती. रेवा वैतागत होती. आजवरच्या अनुभवानुसार मेन कोर्स सर्व्ह होतो तेव्हा कमर्शिअल्स थ्रू झालेली असतात हे तिला माहीत होते. पण इथे तर मेन कोर्सही संपत आलेला होता.

आणि अचानक अरोरा आणि निमितच्या गप्पा चालू असताना सुब्बींनी काहीतरी लक्षात आल्याप्रमाणे रेवाकडे एकदम बघत विचारले...

"सॉरी... मगाशी तुम्ही काय म्हणालात? ... यू हॅव डन बिझिनेस अ‍ॅनलिस्ट्स डिप्लोमा फ्रॉम ओ आर?"

रेवा हबकली. तिच्या अंदाजाने गप्पांच्या सिक्वेन्समध्ये हा प्रश्न, तोही आत्ता, निघणेच शक्य नव्हते. अरोरा आणि निमित आता अक्षरशः बुद्धिमत्तेचा संपूर्ण कस लावून एकमेकांच्या अनुभवाला भिडत होते. मात्र सुब्बींनी विचारलेल्या या प्रश्नामुळे अर्थातच त्यांची ती चर्चा एकदम थांबलीच. हबकलेल्या रेवाने क्षणभर निमितकडे ओझरते पाहात आत्मविश्वासाने सुब्बींना उत्तर दिले..

"येस सर... आय हॅव डन इट"

"अरे देन व्हाय डोन्ट यू जॉईन अस इन एम आय एस? द पोझिशन इज अल्सो गूड... पॅकेज इज एक्सलंट..."

पोटात दचकून खड्डा पडलेला असताना अचानक सुखद कारंजी उडू लागावीत तसा रेवाच्या पोटातून आनंद ओसंडत तिच्या चेहर्‍यावर सांडला. डोळ्यांमधून तो उघडपणे व्यक्त होत असतानाच तोंडाने मात्र ती म्हणाली...

"आय मीन... आय मीन.. आय डोन्ट नो..."

चुटपुटत निमितकडे बघत ती पुन्हा सुब्बींकडे पाहू लागली. सुब्बींनी एका कोट्याधीशाच्या पत्नीला अ‍ॅक्रॉस द टेबल एका अतिशय रेप्यूटेड कंपनीतील उत्तम जागेवरील नोकरीची ऑफर देऊ केली होती. तीही तिच्या नवर्‍यासमोरच! क्षणाच्या एक लाखाव्या भागात निमितमधील बिझिनेसमन जागा झालस होता आणि रेवाला पुढचे काही सुचायच्या आत म्हणाला होता...

"बाय ऑल मीन्स! वुई बोथ वूड बी ऑनर्ड"

निमितचा डाव सरळ होता. ज्या कंपनीत बायकोच नोकरी करेल, तेही एम आय एस सारख्या इन्फर्मेशनच्या समुद्रात बुडून, तिथे बस्तान बसवणे त्याला अत्यंत सोपे जाणार होते. त्याने रेवाला काही चॉईसच विचारलेला नव्हता. सुब्बी फक्त म्हणाले...

"प्लीज इमेल यूअर सी व्ही अ‍ॅन्ड ऑल... अ‍ॅन्ड मे बी.. देअर आर सम फॉर्मॅलिटीज.. दॅट्स इट"

त्यांच्यासारख्या कंपनीला कोणीही उमेदवार मिळाला असता. त्यांनी ती ऑफर रेवालाच का केली होती? हा प्रश्न ते सोडून सगळ्यांच्या मनात आलेला होता. तो जाणवताच सुब्बी म्हणाले...

"कॉस्ट सेव्हिंग... यू नो मिस्टर निमित?... इफ आय हॅव टू सोर्स अ कँडिडेट फ्रॉम द जॉब मार्केट... आय हॅव टू पे... "

जोरजोरात हासत निमित म्हणाला...

"सो आय हॅव ऑलरेडी गिव्हन द डिस्काऊंट"

यावर मात्र अरोराही हासला. सुब्बी आणि अरोरांचे हासणे निर्मळ होते. नातूच्या हासण्यात 'रेवा आता रोज दिसणार' याचा आनंद झळकत होता. रेवाला कोणीच काही विचारले नव्हते.

अरोरा आणि निमितच्या पुढच्या डिस्कशनमधील वाक्ये रेवाच्या कानांवर आदळत राहिली. पण अर्थ मनापाशी पोहोचू शकला नाही.

रेवासमोर अनेक प्रश्न होते. फक्त नोकरी करावी की नाही इतकाच प्रश्न नव्हता. ही नोकरी करून किंवा न करून आपण आपल्या आयुष्यात नेमके काय काय हवे ते घडवून आणू शकतो अशी बरीच मोठी यादी होती मुद्यांची!

रेवासमोरचे प्रश्न असे होते:

- नोकरी करावी की करू नये

- केली तर आपल्यातील एक उच्चशिक्षित व्यक्ती योग्य त्या वळणावर आपले आयुष्य नेऊ शकेल का?

- केली तर शीतलला या वयात आईची अधिक गरज असताना आपले नोकरी करणे तिच्यासाठी काही प्रमाणात घातक ठरेल का?

- निमित आपल्या नोकरीमार्फत माहिती काढून स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करेल हे आपल्याला सहन होईल का?

- आपण नोकरी नाही केली तर आपण आयुष्यात नेमक्या कोण बनून राहू?

- ही नोकरी करण्यास निमित मान्यता देत आहे तर मग कोणतीही इतर चांगली नोकरी करण्यासही त्याने मान्यता का देऊ नये?

- आजवर निमितच्या मनात आपल्याबद्दल असा विचार का आला नाही?

- सुब्बींचा आणि त्यांच्या कंपनीचा माणूस शोधण्याचा खर्च वाचवण्याचा फायदा आपण का करून द्यावा?

- ही संधी समोर येईपर्यंत आपण कधीच असा विचार गांभीर्याने का केलेला नव्हता?

- निमितचे आणि आपले यापुढील नाते, नोकरी केली तर कसे असेल आणि नाही केली तर कसे असेल?

- आपण नेहमी निमितचा विचार का करायचा? त्याने आपला विचार नक्की किती वेळा केला आजवर?

- आपल्याला आर्थिक गरज नसताना आपण नोकरीत डोके का शिणवून घ्यायचे?

- आपण कधीकाळी केलेला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आज इतका महत्वाचा का ठरावा?

- ही ऑफर आहे की इतरच काही?

- अशी ऑफर मिळेल यासाठीच हे डिनर आयोजीत करावे असा निमितचा तर प्लॅन नसेल?

- ही ऑफर हा बिझिनेस डीलचा तर एक भाग नसेल? सुब्बी आणि अरोरा यांनी निमितला इंप्रेस करण्याचा?

- माझ्याबाबतीत इतरजण निर्णय घेतात हे मला का मान्य व्हावे? भले निर्णय योग्य असेल तरीही?

- एकदा बाहेरच्या जगात कर्तृत्व दाखवून निमितचा इगोच नष्ट करावा का?

विचारात गढलेल्या रेवाने शेवटी..... अत्यंत सूज्ञ निर्णय घेतला...

=========================================================
नियमावली:

१) कथेचा शेवट अतिरंजीत चालेल पण पटेल असा असावा
२) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
३) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
४) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परीचय करून देऊ नये.
५) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

==========================================================

रेवा-निमितची भेट होते.
...अँड दे लिव हॅपिली एवर आफ्टर असा शेवट अपेक्षित आहे.

दि. १२ सप्टेंबर २०१३ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता एस टी वायची ही कथा बंद करण्यात येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेवाने हसून सुब्बीचे आभार मानले, नवर्याचा खांद्यावर एक क्षण डोके टेकवून त्यालाही हसून थान्क्स म्हणाली आणि मग शांतपणे सांगितले "तुमची कंपनी जॉईन करायला हजारो अर्ज येतील पण मितवा मध्ये योगदान न देता तुमच्याकडे काम करण्यासाठी मला तितकेच सबळ कारण हवे. कमी पगाराची ऑफर न देता पूर्ण पगार दिलात तर निश्चित कन्सिडर करेन."

घे साती पुड्या सोडायला काय जात!! तू लपेट मात्र आता... Wink Happy

*

एस टी वाय म्हणजे छोटी सुरूवात करून देऊन मग इतरांनी कथा पुढे न्यायची असं असतं. ही एवढी मोठी कथा वाचून वाचकांनी फक्त शेवट लिहायचा आहे का?

सिंडरेला,कथेचा विस्तार तुम्हाला हवा तसा तुम्ही करु शकता. कथा पुढे जाईल अशा पद्धतीने तिचा एक भाग तुम्हाला लिहिता येईल.

मी तेच लिहिणार होते कि सुरवातीची कथा मोठी वाटली !
मागे संयोजकांनी थ्रेड ची सुरवात करताना थोडक्यात पात्रं परिचय, साधारण कथेचं बीज आणि काही रुल्स ही दिले होते ( जसे ' हे सगळं स्वप्नं होतं वगैरे लिहून शेवट गुंडाळता येणार नाही , कुठल्या तारखेला किती वाजल्या नंतर कथेचा शेवट कार्णं आपेक्षित आहे इ.)

लोला आधी परिक्षा तरी दे त्याआधीच गजाला का पास करायला सांगतेयस Lol
तुम सब लिख्खो , हम वाचींग .

देवा अख्खा सीन लिहायचा होता काय! आमची फूल ना फुलाची पाकळी गोड मानून घ्या. जिथे जिथे काही लिहायला सुचत नसेल तिथे "नवर्याचा खांद्यावर एक क्षण डोके टेकवून त्याला हसून थान्क्स म्हणाली" अक्षतेसारख वहा पण पुढे लिहित रहा Wink

Lol लोकहो तुम्हाला हे आवडले नसेल तर तुम्ही तुम्हाला हवी तशी सूतकताई करू शकता ना! जसे

रेवा पूर्ण पगार दिला तरच काम करेन असे म्हणाली आणि तेव्हाच हॉटेलच्या बाहेरून फटाके फुटल्यासारखे आवाज आले. एक क्षण प्रत्येकाला वाटले की बाहेर काही लग्न वगैरे कार्यक्रम सुरू असेल पण तेव्हड्यात रेस्त्राँच्या दरवाजातून घाबरलेल्या अवस्थेत, धावत पळत काही हॉटेलस्टाफ आणि गेस्ट आत आले आणि त्यांच्या मागोमाग हातात मशिनगन्स घेतलेले आणि पाठीला बॅकपॅक्स लावलेले दोन अतिरेकी!
निर्विकार चेहर्‍याने दोघांनी मशिनगन्स मधून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. ज्यांना सुचले ते लोक टेबलाखाली लपून बसले, काही किचनच्या दिशेनी पळाले. दुर्दैवानी रेवा आणि कंपनी दरवाज्याजवळ असल्याने सुब्बी आणि अरोराला टेबलाखाली वाकून जीव वाचवायची संधी देखील मिळाली नाही. निमित रेवाचा हात धरून तिला ओढणार इतक्यात एक गोळी त्याच्या कानशिलाला लागून गेली आणि तो खाली कोसळला. रेवा स्तब्ध होऊन बघत राहिली. तेव्हड्यात अतिरेक्यांपैकी एकाचे लक्ष रेवाकडे गेले. त्याने तिच्याकडे मशिनगन रोखली. भितीने रेवाच्या घशातून आवाजही निघत नव्हता. पण रेवाचा काळ आला असला तरी अजून वेळ आली नव्हती. त्याने तिच्यावर गोळ्या नं झाडता तिचा हात खसकन पकडला आणि दुसर्‍याला डोळ्यानेच ईशारा करून हिला हॉस्टेज म्हणून घेऊन जाऊ या अर्थाचे बोलला...

(पुढच्या लिहिणार्‍यांसाठी - निमित फक्त जखमी होऊन खाली कोसळला आहे. नातू चे काय करायचे ते लोणचे घाला. :फिदी:)

नातू , एका टेबलाखालून त्याच्या घड्याळ्याच्या तबकड्या फिरवतो. ऑपरेशन स्टार्टेड ! एंजल्स स्ट्रक.
२ डाउन ,१ होस्टेज .

आता नातू अतिरेक्यांतर्फे आहे का एजंट नातू ?!

संयोजक, लोक एक/ दोन वाक्ये लिहित आहेत. त्याबद्दल काही सांगणार का ? एका पोस्टीत किमान अमूक ओळी असाव्यात असे काही?

मैत्रेयी, एका पोष्टीत इतक्या ओळी असा नियम नाही, पण किमान कथेला एक छोटंसं का होईना वळण मिळून कथा पुढे सरकली पाहिजे.
ह.ह. धन्यवाद.

चला लोकहो, चालवा डोके.

... संयोजक मंडळातर्फे.

संयोजक,
नियम अ‍ॅड केल्या बद्दल थँक्स :).
पण मैत्रेयी म्हणतेय तसे नियम अजुन क्लिअर हवेत !!
जसे:
१.फक्त १-२ ओळी चाल्णार नाहीत , मिनिमम आणि मॅक्सिमम वर्ड लिमिट मेन्शन करा!
२.मुख्य पात्रांना मारलेलं चालणार आहे का ?
(उदा. मला सुरवातीच्या पोस्ट मधल्या रेवाच्या कथेत काहीच इंटर्स्स्टींग पात्रं नाहीयेत.. त्यावर उपाय म्हणून मी माझ्या हतात सूतकताई आल्यावर रेवाला मारून अतिरेक्यांवर फोकस करणारी पोस्ट टाकु शकते का , कारण मला HH नी आणलेली पात्रं ओरिजनल पोस्ट च्या पात्रां पेक्षा इंटरेस्टींग वाटली !)
३.जुन्या एसटीवाय मधे रुमाल टाकायचा रुल होता बहुदा ( म्हणजे जो कोणी पुढची पोस्ट टाकणार तो आधी तिथे फक्त रुमाल टाकेल मग ती पोस्ट एडीट करून तिथे सूतकताई करेल, नाही तर एकाच संदर्भाच्या डबल ट्रिपल पोस्ट्स पडतील)
४.अत्ताच्या नियमात कथेचा शेवट कधी झाला पाहिजे याची तारीख नाही दिलेली , अमुक एका तरखेला/ इतके वाजल्यानंतर कनल्कुडींग पोस्ट्स हव्यात हे क्लिअर होउ दे नियमात !
या शिवाय गेल्या काही गणपती उत्सवाच्या एसटीवाय थ्रेड्स च्या लिंक्स देता येतील लोकांना उदाहरण म्हणून !

नातूने टेबलाखाली बसून घड्याळासारखे दिसणार्‍या उपकरणाची डायल फिरवली. तो खरा तर एक सॅटेलाइट फोन होता. वरची बटने दाबताच तिकडच्या बाजूने आधी खरखर आली आणि मग एक गंभीर, करडा पण कमालीच शांत आवाज म्हणाला " नातूंचा नातू ना तू ?" हे त्याचं सांकेतिक वाक्य होतं... " डोन्ट मिस द चान्स थलैवा! "
नातू त्याचं सांकेतिक वाक्य उद्गारला. त्याचं नाव नातू नव्हतंच मुळी. तो होता श्रीलंकेत लपलेल्या फिट्टे गँग चा शार्प शूटर आणि आत्मघातकी पथकाचा मेन्टॉर वराहमिहीर थंगबली सुरेन्द्रनाथन ! तरी अपण नातूच म्हणू त्याला.
नातू तिकडून बोलनार्‍या त्याच्या बॉस ला रिपोर्ट करत होता " २ डाउन थलैवा! टार्गेट बेशुद्ध! त्याची बायको ताब्यात घेऊन येतो आहोत - छेन्नई एक्सप्रेस ने"

मितवा च्या निमित चा वर वर दिसणारा कारोबार वेगळा असला तरी छुप्या मार्गाने फिट्टेला लागनारी स्फोटकं बनव्णे हा त्याचा मुख्य धंदा होता.दुबईच्या भाई गँग कडून कच्चा माल बोटीने आयात करून तयार स्फोटके तो फिट्टे ला पुरवत होता.
झाले होते काय, की इतक्यात पैश्याच्या कडकीमुळे दुबईहून येणारा माल परवडेना म्हणून कमी पडायला लागल्याने निमित ने सप्प्लाय मधे भेसळ सुरु केली होती. त्याचा परिणाम म्हनून परवाचेच एक फिट्टे चे मिशन टोटल फ्लॉप झाले होते! त्यामुळे निमित चा समाचार घ्यायच्या ऑर्डर्स नातूला मिळाल्या होत्या.
ऐन वेळी रेवाला पाहून प्लॅन बदलून तिला किडनॅप करण्याचे त्याने ठरवले.जेणे करून निमित ला नीट कह्यात ठेवता यावे.
इकडे रेवा घाबरलेली , तिकडे निमित हळू हळू हाल्चाल करायला लागला होता... छेन्नै एक्सप्रेस याच सुमाराला स्टेशनात येतेय...
आता नातूला झटपट हालचाल करणे भाग होते ......

Pages