एन आय आय टी या संस्थेत मी गेले तीनएक महिने काम करत आहे. आय टी क्षेत्रात नोकरी मिळण्यासाठी आवश्यक असे लहानमोठे कोर्सेस या संस्थेत असतात हे बहुश्रुत आहे. याच कामाचा एक भाग म्हणून नुकतेच एक जॉब फेअर आयोजीत करण्यात आले होते, ज्यात अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी आपापले अधिकारी पाठवले होते व अडीच हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांनी तेथे मुलाखती दिल्या. संपूर्ण कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणावर, अतिशय प्रभावी व उत्तम झाला. मी उपस्थित असलेल्या मजल्यावर एका कंपनीच्या मुलाखतीसाठी इतकी गर्दी उसळली की मी त्या कंपनीच्या अधिकार्यांना 'काही मुलाखती मीच घेऊन आपणास मदत करू का' असे विचारले. मला परवानगी मिळाली व इंग्रजी संवादकौशल्य या सदरातील काही मुलाखती मी घेतल्या. त्या घेत असताना मला आलेला अनुभव येथे मायबोलीकरांना सांगावासा वाटत होता. तो अनुभव मनाला भिडला व बोचलाही.
================
आलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांशी विद्यार्थी पुणे, मुंबई, नाशिक व औरंगाबाद येथील रहिवासी होते. मात्र साधारण तीस टक्के विद्यार्थी हे बुलढाणा, सातारा, सांगली, अकोला, अमरावती, परभणी, लातुर अश्या ठिकाणांहून आलेले होते. हे किंचित अर्धविकसित विभागातील विद्यार्थी नुसते पाहूनही ओळखता येत होते. त्यांची मुलाखतीसाठी योग्य असे कपडे परिधान करण्याची जाण व आर्थिक क्षमता कमी असल्याचे लांबूनच जाणवत होते. या शिवाय चेहर्यावर एक प्रकारचे बुजलेपण होते. का कोणास ठाऊक, पण उगाचच एक लाचारीही होती व हा मला झालेला 'भास' नक्कीच नव्हे. दाढीचे खुंट वाढलेले विद्यार्थी व कॅज्युअल वेअरमध्ये असलेल्या विद्यार्थिनी तर प्रगत शहरातूनही आलेल्या होत्या, पण या अर्धविकसित भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा पोषाख, अॅक्सेसरीज, हेअर स्टाईल हे सर्वच तुलनेने 'साधेपणाचे' होते, 'स्वस्त' नव्हते.
यांच्यापैकी कोणाचा नंबर आला की त्यांची मुलाखत मी घेऊ लागायचो. तेव्हा जाणवायचे की त्यांच्या उभे राहण्यातही एक प्रकारची अजीजी होती. वरवर वाचायला हे खरंच भास वाटू शकतील, तेव्हा ज्या वाचकांना माझ्या गृहितकांबाबतच शंका आहे त्यांच्या मताचा आदर आहेच. पण निदान मी तरी प्रामाणिकपणे जे जाणवले ते लिहीत आहे. अर्थातच अश्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व खूपच कमी होते. त्याला 'प्रभुत्व' म्हणता येणारच नाही. ठराविक काही वाक्ये ते अगदी सलगपणे उच्चारू शकत होते याचा अर्थ तितकीच वाक्ये ते पाठ करून आलेले असावेत. त्या सर्वांच्या डोळ्यात 'नुसते माझ्या सहीवर बरेच काही अवलंबून असल्यासारखे' भाव होते. काहीजणांना तर मुलाखत केव्हा एकदा संपते आणि केव्हा एकदा आपण 'नेहमीप्रमाणे' रिजेक्ट होऊन येथून बाहेर पडतो असे झालेले असावे. यालाही कारण होते ते म्हणजे आजूबाजूला विकसित शहरांमधील जे विद्यार्थी वावरत होते त्यांच्या आत्मविश्वासयुक्त देहबोलीसमोर आपला निभाव लागणे शक्यच नाही याची या विद्यार्थ्यांना केव्हाच जाणीव झालेली होती.
यातील अनेकांना वडील नव्हते, अनेकांचे वडील शेतकरी होते किंवा गॅरेजवर कामाला होते. अनेकांनी निव्वळ नोकरीसाठी पुण्याचा रस्ता धरलेला होता पण पुण्यात वावरण्याचा आत्मविश्वास मात्र त्यांच्यापासून खूपच दूर होता. अनेकांवर लहान भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी होती. जवळपास सर्वांनीच 'छंद' या सदरात 'लिसनिंग टू म्यूझिक' आणि 'रीडिंग' असे लिहिलेले होते. मात्र कोणते म्यूझिक आणि कसले रीडिंग याची उत्तरे त्यांना देता येत नव्हती.
दुसर्या बाजूला फाडफाड बोलणारी मुले मुली एकमेकांना खाणाखुण करून हासत होती. त्यांचे पेहराव ग्रामीण युवक - युवतींना बावचळवणारे होते. त्यांचा वावर 'अॅट होम' होता. मुख्य म्हणजे 'नोकरी' ही त्यांची 'त्वरीत असलेली गरज' नव्हतीच, हे मला संभाषणातून सहज समजत होते.
एकुण वाईट वाटले.
संधी उपलब्ध असण्यात दरी होती. संधी उपलब्ध झाल्यानंतर आत्मविश्वासाच्या प्रमाणात तफावत होती. नोकरीची आवश्यकता ज्याला अधिक होती तो रिजेक्ट केला जात होता. ज्याला ती गरज कमी होती त्याला मुलाखतीच्या पुढच्या पायरीसाठी पाचारण करण्यात येत होते.
बिचार्या ग्रामीण विभागातील मुलांच्या डोळ्यात स्वप्ने दिसत होती. 'दोन तीन मिनिटे तर यांच्याशी बोलायचे, यांनी पास केले की मग थेट टेक्निकल मुलाखत, ज्यात आपण नक्की पास होऊ' अशी आशा दिसत होती. पण मला माहीत असलेल्या निकषांनुसार त्यांचे संवादकौशल्य तपासताना त्यांना रिजेक्ट करावे लागणे हे माझे तत्क्षणी कर्तव्य होते. एका वर्तुळात 'आर' लिहून त्यांचा बायोडेटा गठ्ठ्यात मागे सरकवताना आणि त्यांना 'ऑल द बेस्ट' असे 'खोटेच' हसून म्हणताना माझ्यातील कोणीतरी एक स्वतःच निराश होत चालला होता. चेहर्यावर व्यावसायिकतेचा मुखवटा मिरवणे भाग होते. मी त्यांना 'ओके, झाली मुलाखत' असे सांगितल्यावर ती मुले अजीजीने मान तुकवून 'थँक यू' म्हणून निघताना आशेने क्षणभर माझ्या डोळ्यांशी डोळे भिडवत होती. जणू त्यांना म्हणायचे असावे की 'आम्हाला फक्त हा इंग्लिशचाच एक प्रॉब्लेम आहे, तेवढा कराल ना दुर्लक्षित'!
आईच्ची जय त्या शिक्षणाच्या आणि विषमतेच्या! माझ्या मनावर गेले दोन दिवस जो परिणाम झाला तो कोणाला धड सांगताही येत नव्हता, माझीच थट्टा व्हायची असे वाटून! शेवटी मी माझ्या जगात पोचलो आणि प्रगत शहराचा एक भाग होऊन कंफर्टेबल झालो. आता असे वाटते साले आपल्याला देवाने इतके नशीबवान बनवले पण आपण त्या नशिबवान आयुष्याचे काय मातेरे करत आहोत?
माफ करा, विचार प्रकट करताना वाहवत गेलो, पण नेहमीप्रमाणेच हा लेखही जसा सुचला तसा एका बैठकीतच लिहून मोकळा झाल्याचे समाधान मनाला आहे.
-'बेफिकीर'!
लेख खूप आवडला. त्याखालील
लेख खूप आवडला. त्याखालील चर्चाही उत्तम प्रकारे चालली आहे
छान लेख व चर्चा! आपल्याकडे
छान लेख व चर्चा!
]
आपल्याकडे इंग्लिशचा उगीचच बाऊ बनवून ठेवलाय. असं का आहे कोण जाणे! मी मराठी (सेमी इंग्लिशमधून) शिकले आहे. मला इंग्लिश या विषयात मार्कही चांगले मिळायचे व मी बोलूही शकायचे. पण कितीतरी काळ "मी बरोबर बोलतीय ना?" अरे हा काळ चुकला" "ते तसं म्हणायला हवं होतं" ही असली मनातली वाक्यं काही लवकर गेली नाहीत..
[याच्याच उलट, इथे अमेरिकेत आल्यावर, ओळखीतील इथे जॉब करणारी, इथे येऊन दशकं लोटलेली लोकं सुद्धा भयाण इंग्लिश बोलतात तेव्हा ते मला चांगलंच खटकतं. एका अर्थाने मीही बाऊच करतीय इंग्लिशचा. त्यांना त्यांचे म्हणणे समोरच्याला पटवून देता येतंय, व समोरच्याला ते कळतंय तर माझं काय बिघडलं? बहुतेक इतक्या वर्षांचं कंडीशनिंगच असावे हे.. ते घालवायचा प्रयत्न करत आहे..
अरे आपण सगळे उगाचच चर्चा
अरे आपण सगळे उगाचच चर्चा करतोय असे काही पोस्टींवरून वाटत आहे. काही साध्या गोष्टी आपल्याला कोणालाच कळालेल्या दिसत नाहीत्/माहीत नाहीत असे दिसते
ऑन स सिरीयस नोटः या चर्चेच्या विषयाला आक्षेप घेतलेल्या काही लोकांसाठी - मुद्दा त्या स्पेसिफिक मुलाखतीत ती स्पेसिफिक मुले रिजेक्ट झाली ही केवढी मोठी ट्रॅजेडी होती हा नाही. मुद्दा साधारण असा आहे:
१. जेथे इंग्रजी बोलण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते त्या सगळीकडे ते आवश्यक असते का खरेच?
२. समाजातील एका प्रचंड मोठ्या गटाला इंग्रजी वर प्रभुत्व मिळवणे जमत नसेल तर त्याबाबतीत आपण काय करू शकतो?
३. केवळ इंग्रजी येत नसल्याने अनेक संधी मिळत नाहीत (विशेषतः खेड्यापाड्यातील मुलांना), त्याबाबत एक काय तोडगा निघू शकतो.
(लोकहो, दुरूस्त करा जरूर)
नंदिनीचे मुद्दे ही बरोबर आहेत. ते धरून येथे आपण ती स्वतंत्र कौशल्ये धरू:
१. इंग्रजी "फाड-फाड"
२. प्रोफेशनल सेट अप मधे आत्मविश्वास येण्यासाठी आवश्यक मॅनर्स, शब्दसंपदा (व्होकॅब) असणे
३. संभाषण कौशल्य (जे नोकरीत नंतर जास्त उपयोगी पडते).
यातील #३ ची तर भारतात खूप दयनीय अवस्था होती पूर्वी तरी. लोक बोलताना मधेच तोडणे, किंवा आपण बरळायचे ते बरळून झाल्यावर दुसरे बोलत असताना एकतर डोके बंद असणे किंवा आपण काय बोलायचे याचा विचार करत राहणे असले प्रकार मीटिंग्स मधे असंख्य वेळा पाहिलेले आहेत. येथे जरा अस्थानी होईल ही कॉमेंट - पण अमेरिकन लोकांना भारतीय लोकांवर वैतागण्याची जर काही कारणे असतील तर हे एक मुख्य त्यातले - being a bad listener
(अपवाद वगैरे नेहमीचे कॅव्हिअॅट्स धरा)
ओये फारेण्डा, प्लस
ओये फारेण्डा, प्लस बस्के!


राईट ट्रॅक अन, एकदम टाळ्या पोस्ट!
मी लिहिणार होतो तेच तुम्ही लिहिले आहेत आधीच.
थोड्या वेळात एलॅबोरेटिव्ह पोस्ट टाकतो
बेफिकीर - मुलाखत जरी
बेफिकीर - मुलाखत जरी मराठीमधूनही असती तरी त्यातले खूपजण व्यवस्थित संभाषण करू शकले नसते तुमचा अनुभवही तेच दर्शवतो असे वाटते. त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेउ नका. तसेच तुम्हाला जे प्रगत भागातील वाटले त्यातलेही (माझ्या अनुभवानुसार) नीट संभाषण करू शकत नाहीत असे सांगतो.
संभाषण कलेमधे - भाषण, हावभाव+देहबोली, लि़खाण, संवाद, बातचीत/घासाघिस (negotiation) ह्या बाबी येतात. हे साध्य करण्यासाठी खालील गोष्टींची आवशक्यता आहे.
१) विषय-ज्ञान व सामान्य ज्ञान - ह्यासाठी अभ्यासाला व शिक्षणाला पर्याय नाही.
२) अनुभव - संभाषण नीट करण्यासाठी अनुभव हवाच. हा अनुभव शेवटच्या वर्षी एक-दोन वर्ग करून गेता येत नाही. त्यासाठी सहान्पणापासून संधी निर्माण करून, वापरल्या पाहीजेत.
३) भाषा-ज्ञान - भाषाज्ञान हेही आवश्यक आहेच. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी हे वेगवेगळ्या प्रकारे बघितले जाते. (e.g. CAT - grammar and vocabulary based, TOFEL - communication and
understanding)
४) आत्मविश्वास - वरील १,२,३ तीनही असले तरी आत्मविश्वास नसेल तर सगळे असून नसल्यासारखे आहे. पण १,२,३ असेल आत्मविश्वास येणे सोपे जाते.
शिक्षणपद्धतीमधे सध्या १ व ३ वर भर आहे. पण २ व ४ वर अजिबत लक्ष नाही.
१ साठी - शाळेत भर पाठांतरावर आहे (किमान १० पर्यन्त तरी). - म्हणून बदल हवेत.
२ साठी - शाळेत. विद्यालयामधे (सर्व भाषांमधे) भाषण, चर्चा, संवाद, प्रकल्प-दर्शन इ. साठी आठवड्यामधून तास राखीव ठेवलॅ पाहिजेत. गटाभ्यास चालु केला पाहिजे.
३ साठी - मौखिक परीक्षा हवी.
४ साठी - १, २, ३ नियमित व्हावे.
बेफिकिरजी, उत्तम
बेफिकिरजी, उत्तम निरीक्षण.
मुळात जोपर्यंत विचार इंग्रजीमधुन करत (येत) नाहीत तो पर्यंत प्रभुत्व मिळणे अशक्य आहे.
अस पाहण्यात आलय की, बरेच जण मनात मराठी वाक्य तयार करून, त्या त्या शब्दाचे इंग्रजी शब्द आठवून इंग्रजी वाक्य तयार करतात. ह्या पध्द्तीत बराच वेळ लागतो. त्यामुळे आत्मविश्वास गमावला जातो.
त्यात त्यांचा काहीच दोष नाही. आपल्या मेंदूला इंग्रजी-मराठी जोड्या लावयच्या शिकविल्यामूळे तस होणं स्वाभाविक आहे. ते पुर्णतः चूकिचे हे पण म्हणन नाही. पण आपण जस हिंदी शिकतो (शाळेत, संभाषणातुन, फिल्म-गाणी पाहून ई.) त्या प्रमाणे इंग्रजी शिकलो तर बराच फरक जाणवेल.
अवांतर पण अगदी राहवलच
अवांतर पण अगदी राहवलच नाही.
२. समाजातील एका प्रचंड मोठ्या गटाला इंग्रजी वर प्रभुत्व मिळवणे जमत नसेल तर त्याबाबतीत आपण काय करू शकतो? >> इंग्लिश-विन्ग्लीश असा चित्रपट काढू आणि/किंवा पाहू शकतो.
माझ्या मते एक महत्त्वाचा
माझ्या मते एक महत्त्वाचा मुद्दा आपण टाळतोय की काय. आज इंग्रजी संभाषण आवश्यकच आहे, हे गृहीत धरुन का चालत नाही? उगाच अनेक उद्योग आहेत, जे इंग्रजी न येण्यानेही करता येतात, वगैरे स्वतःची समजुत घालण्यासारखे आहे.
इंग्रजी न शिकता (किंवा दुर्लक्षित करुन) ज्या देशांनी प्रगती केली त्यात किती देश असे आहेत, ज्यांत भाषावार प्रांत/ राज्य आहेत? आज त्या देशात राहणार्या परदेशी लोकांची काय कुचंबणा होते ते तिथे गेल्याशिवाय कळणारच नाही. एक तर त्यांची भाषा शिका नाहीतर त्यांच्यावरच विसंबुन रहा. शेजारी माणसे असुन नसल्यासारखी, कारण मी काय बोलतो ते त्यांना कळत नाही आणि ते काय बोलतात ते मला कळत नाही. अशी परिस्थिती भारतात येऊ नये, हेच उत्तम. (उदा. एक कानडी, एक मराठी, एक बंगाली, असे कंपनीत लोकं असतील, तर कोणती भाषा बोलाल?)
कदाचित आश्चर्य वाटेल, पण ज्या वेगाने ही मंडळी आता इंग्रजीच्या मागे लागली आहे, त्या वेगाने पुढिल १० वर्षात ते इंग्रजीत आपल्याला मात देतील यात शंकाच नाही. (द. कोरियाने मागील १० वर्षात १५००० हुन अधिक अमेरिकन शिक्षक इंग्रजी शिकवायला बोलावले होते आणि आज इथले सगळे हायस्कूलचे विद्यार्थी झकास इंग्रजी बोलू शकतात). आपण इंग्रजी आपला अडसर म्हणतो
दुसरं म्हणजे बेफिकीर यांनी 'आयटी' क्षेत्रातलं उदाहरण घेतलय, त्याला उगाच जिथे इंग्रजी संभाषण गरजेचे नाही, हा सूर नकोच. हे दिलेले नियम समजा, तुम्ही फीट तर आंत नाहीतर बाहेर फेकल्या जाणार.
संभाषण म्हणजे केवळ फाडफाड इंग्रजी बोलणे नसले तरी आपले विचार इंग्रजीतून व्यक्त करणे ही सुरुवात आहे हे निश्चित.
तिसरं म्हणजे नोकरी महराष्ट्रातच मिळेल ही भाबडी आशा सोडुन देणे आणि त्या दृष्टिने तयारी करणे हेच उत्तम. प्रत्येक क्षेत्राची तांत्रिक भाषा वेगवेगळी असते, ती पुढे (next higher step) शिकायला मिळते/ शिकावी लागते, पण त्यासाठी किमान आकलन आणि प्रकटन अत्यावश्यक आहेत. इंग्रजीचा बाऊ किंवा तिला डोक्यावर का बसवावी याचा विचार करणे म्हणजे क्रिकेटमध्ये २२ यार्डाचीच पीच का असावी असं काहीस होईल. ते आजच्या जगाचे नियम, गरज आहे, म्हणुन accept करुन आपण त्या नियमांनुसार कसं सुधरु हे महत्त्वाचं.
थोडसं वाईट किंवा अधिक मुजोरपणाचं वाटेल, पण बेफिकीर, तुम्ही रिजेक्ट केलेल्या मुलांना रिजेक्ट करणेच योग्य. कारण आजच्या जगात आवश्यक ते शिकावंच लागतं आणि त्यासाठी त्यांची तयारीच नव्हती. इंजिनिअरींगला कम्युनिकेशन हा विशेष विषय असतो, तो उगाच नव्हे. पण तो फक्त पास होण्यापुरसा असम म्हणुन टाळला जातो. हातात मोबाईल, ज्यावर गाणे ऐकता येतात पण इंग्रजी शिकण्यासाठी काहीच नाही, वर्तमानपत्रही वाचायची इच्छा नाही, मग इंग्रजी वर्तमानपत्र दुरच, अवांतर वाचन म्हणजे फेसबुकवरचं एखादं लेखन, किंवा लिखाण म्हणजे लाईकचं बटन, ही ज्यांची व्याख्या असेल, ते रिजेक्ट होण्याच्याच लायकीचे आहेत. आणि याउपर आपण सतत रिजेक्ट का होतोय याचे खरं कारणं जाणून घेउन त्यानुसार स्वतःला तयार करणे तर सोडाच, उलट 'आमच तेव्हडं इंग्रजी सांभाळुन घ्या' ही अजिजी दाखवणारे रिजेक्टच केले पाहिजे.
आयटी मधील वॉईसचॅट शी संबंधीत
आयटी मधील वॉईसचॅट शी संबंधीत जॉब असेल तर वर मुलाखतीत रिजेक्ट केले ते ठिक आहे. पण जर टेक्नीकल जॉब असेल तर इंग्रजी संभाषणाचा बाऊ मुलाखत कर्त्यांनी (तुम्ही स्वत: नाही पण जे नोकरी देणार आहेत ते) करण्याची काही अवश्यकता नाही.
मुलाखत कोण घेणार त्यांना नोकरी देणार्यांनी स्पष्ट कल्पना देणे आवश्यक आहे.
पण कामचलावू इंग्रजी आवश्यक आहेच.
आणखी एक. एकदा नोकरी लागली की काम महत्वाचे हे नोकरी देणार्यांनी ध्यानात घेतले पाहीजे. बाह्य दिसणे, कपडे, वागणूक आदींना कमी रेटींग (अगदीच नाही असे नाही पण) दिले पाहीजे.
आणखी एक. वॉईस चॅट जॉबला कोण
आणखी एक.
वॉईस चॅट जॉबला कोण कसा दिसतो याला महत्व नाही. संवादकौशल्य महत्वाचे.
मुलाखतकर्त्यांनी आपली पद्धत बदलायला पाहीजे.
मला कल्पना सुचली की अशा किंवा सर्वच पदांसाठीच्या (अगदी एमपीएसी, युपीएससी साठीच्या)
उमेदवारांची मुलाखत पडदानशीन (Hidden Identity) पद्धतीने घ्यावी.
होते काय की मुलाखत कर्त्याकडे उमेदवाराचा बायोडेटा असतो. त्यात उमेदवाराची माहीती नाव/ गावानिशी असते. मुलाखतकर्ता हा माणूसच असतो. त्याच्या मनात काही नावांविषयी (आडनावांविषयी), गाव/ प्रदेश (खेडेगाव इ.) ग्रह, पुर्वग्रह, दुषितग्रह असू शकतात. (उदा. ग्रामीण भाग म्हणजे मागासलेले, संवादकौशल्य नसलेले इ.)
आडनावावरून जातीभेद होवू शकतो.
हे सर्व टाळायचे असेल (कंपनीला जास्त लायक उमेदवार हवे असतील) तर उमेदवारांची मुलाखत पडदानशीन (Hidden Identity) पद्धतीने घेणे हा उत्तम उपाय आहे.
उमेदवारांची मुलाखत पडदानशीन (Hidden Identity) घेण्याची साधारण पद्धत अशी असावी:
१) मुलाखतकर्त्याकडे उमेदवाराचा बायोडेटा हा नाव गाव, आडनाव, गोत्र आदी टाळून देण्यात यावा.
२) उमेदवाराला टोकन किंवा रोल नंबर देण्यात यावे.
३) मुलाखतकर्त्याने उमेदवाराचे नाव विचारू नये.
४) उमेदवार व मुलाखतकर्त्यामध्ये एक पडदा (पार्टीशन) असावा जेणेकरून उमेदवाराचा चेहेरा, कपडे, आदी बाह्य अॅपीअरन्स (द्विरूक्ती होतेय का?) मुलाखतकर्त्याला दिसणार नाही.
५) हे करण्यामागे दोघांचे पुर्वग्रह टाळणे हा उद्देश आहे.
हे करूनच मुलाखत घ्यावी. अंतीम मुलाखतीत उमेदवाराची जी काय छाननी करायची ती करावी.
लेख आवडला आणि त्यापेक्षा
लेख आवडला आणि त्यापेक्षा जास्त भावले ते तुमचे निरीक्षण... जबरी.
कामासाठी इग्रजी भाषा आवश्यक असेल तर तसे प्रयत्न करणे आवश्यक आहे, आणि हा प्रयत्न आपण स्वत: करायचा आहे. आज परिस्थिती खुप बदललेली आहे. दुरचित्रवाणी, आणि इन्टरनेट मुळे भाषा कानावर पडते त्यामुळे उच्चार कळतात आणि अर्धे काम होते. एक ४-५ जणान्चा ग्रुप करुन बोलण्याचा प्रयत्न करायचा... भाषा (किवा अजुन काही) शिकण्याची इच्छाशक्ती तिव्र असेल तर हे सहज शक्य आहे.
पाषाणभेद ... गोत्र पण कल्पना
पाषाणभेद ... गोत्र
पण कल्पना आवडली. त्याहीपेक्षा अधिक ... स्कायपे किंवा तत्सम फक्त ऑडिओ. (पण बँड्विड्थ कमी असेल तर आवाज ऐकू न येण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण जाण्यायेण्याचा खर्च, वेळ आणि गर्दी टाळता येउ शकते. तसेच उमेदवार हे रेकॉर्ड करुन स्वत:साठी (improvement) वापरु शकतो.
अरे ! यावरुन कल्पना सुचली. जी माबोकर मंडळी मुलाखत घेणे या विषयाशी संबंधीत आहेत, ती असे मॉक इंटरव्ह्यु घेउ शकतील का? त्याने बर्याच तरूणांना फायदा होईल. काय म्हणता ?
माबो असे कार्यक्रम प्रायोजित करते का? करु शकते का?
उमेदवार व मुलाखतकर्त्यामध्ये
उमेदवार व मुलाखतकर्त्यामध्ये एक पडदा (पार्टीशन) असावा जेणेकरून उमेदवाराचा चेहेरा, कपडे, आदी बाह्य अॅपीअरन्स (द्विरूक्ती होतेय का?) मुलाखतकर्त्याला दिसणार नाही.
>> अशी मुलाखत आकाशवाणी केंद्रासाठी घेण्यात येते. कारण तिथे फक्त आवाजाला महत्त्व असते. पण या प्रकारामधे मुलाखत देणार्याच्या मनावर फार प्रेशर येत जाईल असा माझा अंदाज. एकट्या खोलीत बसून प्रश्नांची उत्तरे देणे हे उलट फार कठीण पडेल. माझा स्वानुभव तरी तसाच आहे.
आकाशवानीच्या युवावाणी कार्यक्रमासाठी अर्ज केला होता. तेव्हा नववीमधे असल्याने "मुलाखतयोग्य" असे ड्रेसेस नव्हतेच माझ्याकडे. पण आयुष्यातली पहिलीच मुलाखत म्हणून त्या मुलाखतीला जाताना मी नवीन ड्रेस शिवून घेतला होता. मुलाखत घेणारे दुसर्या खोलीत बसले होते आणि तिथून प्रश्न विचारत होते. काय करतेस कुठली शाळा वगैरे प्रश्न फक्त ऐकू येत होते, दिसत कुणीच नाही. आपण माईकमधे उत्तर द्यायचं.... आपणच एकटे येड्यासारखे भिंतीकडे बोलतोय असं वाटायला लागलेलं दोन मिनिटं. इकडे तिकडे नुसती बघत होते आधी. मग नंतर आपला "ऑडियन्स" पलिकडे बसलाय हे लक्षात आलं आणि मग जणू काही ते समोर बसलेत हे व्हिज्युअलाई करून उत्तरे दिली.
त्यात मला उत्स्फूर्तपणे बोलायला विषय मिळाला "पावती". जल्ला पावतीवर पाच मिनिटं सलग (!!!) काय बोलणार? तरीपण बोलत गेले. दिनूचे बिल ही कथा आठवली त्यचा संदर्भ देऊन झाल्यावर पावतीला इंग्लिशमधे बिल म्हणतात आणि अमेरिकन लोकं आपल्या मुलांची नावं "बिल" का बरे ठेवत असतील, आपण पावती असे मुलीचे नाव ठेवत नाही... वगैरे काहीतरी मजेदार बोलल्यावर अचानक कुणाच्यातरी हसण्याचा आवाज आला... मुलाखत जिंकली ते तिथेच समजलं होतं मला.
सर्व प्रथम, हा धागा इतके दिवस
सर्व प्रथम, हा धागा इतके दिवस वाचलाच नाही कारण कविता नाहीतर कथा असेल अश्या समजा मुळे. त्या बद्दल सॉरी. उत्तम लेख. मी ह्या अवस्थेतून गेले आहे त्या मुलांचे अजीजीचे भाव समजू शकते. आपण ह्या मुलांना ग्रूमिन्ग चे शिक्षण देऊ शकतो का?
एका ज्वलंत सामाजिक प्रश्नाला
एका ज्वलंत सामाजिक प्रश्नाला वाचा फोडल्याबद्धल बेफिकीरचे धन्यवाद. मीही आइटी प्रशिक्षण व नोकरभरतीच्या क्षेत्रात आहे आणि मागच्या दशकभरात बेफिकीरला आलेला अनुभव वारंवार घेतला आहे.
खेळाचे नियम जगजाहीर असताना त्या दृष्टीने तयारी न करणाऱ्यांबद्धल मला केवळ सहानुभूतीच वाटेल; त्यांना;माझ्याकडून (पक्षपाती) मदत मिळणार नाही.
खेळाचे नियम जगजाहीर असताना
खेळाचे नियम जगजाहीर असताना त्या दृष्टीने तयारी न करणाऱ्यांबद्धल मला केवळ सहानुभूतीच वाटेल; त्यांना;माझ्याकडून (पक्षपाती) मदत मिळणार नाही.<<<
चांगला प्रतिसाद बाळासाहेब!
काही प्रतिसाददाते असे म्हणत आहेत की 'मुलाखतीचे व पदाचे निकष व्यवस्थित ज्ञात असताना तयारीच न करणार्यांबाबत' कीव का वाटावी!
यावर असे म्हणावेसे वाटते की:
१. परभाषेतील संवादकौशल्य, काहीसे प्रभुत्व वगैरे बाबी अश्या अचानक तयारी करण्यासारख्या नसून सुरुवातीपासून त्यावर काम करावे लागते. अर्थातच, कुटुंबातून प्रोत्साहन, शालेय शिक्षणात त्याचा समावेश असणे वगैरे गहन बाबी त्यात अंतर्भूत व्हायला लागतात.
२. मुद्दा असा आहे की मुळातच समाजातील एक मोठा भाग कोणत्याही भाषेतील संवाद कौशल्य व विशेषतः इंग्रजी संवाद कौशल्य यापासून दूर आहे. मला अभिप्रेत विषमता ही आहे की सस्माजातील एक थर शहरी एक्स्पोजरमुळे आपोआपच एका पातळीला ओलांडून पुढे पोचलेला असतो तर दुसरा थर निव्वळ ग्रामीण सभोवतालामुळे त्या पातळीच्या मागे राहिलेला असतो. ही पातळी जेव्हा उदरनिर्वाहाच्या संधी मिळण्याचा एक निकष ठरतो तेव्हा आपोआप पातळी ओलांडलेला क्लास हा सहज पुढे जाऊ शकतो. मात्र पातळी न ओलांडलेला वर्ग इतर निकषांनुसार (कदाचित) सुपात्र असूनही मागे पडतो व यात त्यांचा दोष (स्वतः तयारी केली नाही याशिवाय) तितकासा नसतो कारण त्यांच्या सभोवताली ते वास्तावरणच नसते.
कदाचित, या चर्चेमुळे, मलाच 'मला काय म्हणायचे आहे' हे अधिकाधिक उल्गडत जात असावे किंवा गोंधळ होत असावा. नक्की समजत नाही.
-'बेफिकीर'!
मात्र पातळी न ओलांडलेला वर्ग
मात्र पातळी न ओलांडलेला वर्ग इतर निकषांनुसार (कदाचित) सुपात्र असूनही मागे पडतो व यात त्यांचा दोष (स्वतः तयारी केली नाही याशिवाय) तितकासा नसतो कारण त्यांच्या सभोवताली ते वास्तावरणच नसते.
वातावरण नसते हे नाहीच पटत बेफिकिर. तुम्ही म्हणताय ते अगदीच थोड्या अंशी बरोबर असेल, पण इतर सर्व गोष्टींसाठी (कपडे, वेषभुषा, मेकअप, शुज, घड्याळ, मोबाईल.... आणि बर्याचश्या वस्तू) लेटेस्ट वगैरे बघता येते, ते कळते आणि स्वतःला मुलाखतीसाठी कसं तयार करायचं हे कळत नाही हे म्हणजे अश्या मुलांचा एकतर आळशीपणा म्हणावा किंवा मुद्दाम केलेले दुर्लक्ष.
याउअलट शहरी वातावरणातील मुले-मुली २४ तास इंग्रजी संभाषण कौशल्याचाच अभ्यास/ सराव करत असतात असेही नाही. किंवा केवळ शहरीच मुले शेवटच्या टप्प्यापर्यंत जातात असेही नाही. एकवेळ पैसा कमी पडतो, हे मान्य करता येईल, पण वातावरण आणि संधी ह्या बाबी किमान आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तर केवळ आंधळ्यालाच दिसणार नाहीत, किंवा मुद्दाम झोपेचं सोंग घेतलेल्याला.
मी स्वतः ज्याना परवडत नाही अश्या लोकांना १०००-१२०० चे शुज आणि महगडे मोबाईल घेउन फिरताना पाहिलंय, पण कधी त्या मोबाईलचा उपयोग गाणे ऐकण्यापलिकडे केल्याचे त्यांनाही आठवत नाही.
मला अभिप्रेत विषमता ही आहे की
मला अभिप्रेत विषमता ही आहे की सस्माजातील एक थर शहरी एक्स्पोजरमुळे आपोआपच एका पातळीला ओलांडून पुढे पोचलेला असतो तर दुसरा थर निव्वळ ग्रामीण सभोवतालामुळे त्या पातळीच्या मागे राहिलेला असतो. ही पातळी जेव्हा उदरनिर्वाहाच्या संधी मिळण्याचा एक निकष ठरतो तेव्हा आपोआप पातळी ओलांडलेला क्लास हा सहज पुढे जाऊ शकतो. << यावर मी आधीच लिहिले होते. एक्स्पोझरचा मुद्दा बर्याचदा येतो पण तो तितकासा बरोबर नाही. ग्रामीण भागातून देखील शाळांमधून विविध स्पर्धा असतात. वाचनालये असतात. ग्रामीण भागातून शिकून पुढे गेलेली कित्येक उदाहरणे सापडतील. उलट ग्रामीण मुलांचे अनुभव विश्व अधिक समृद्ध असते असे मानायला हरकत नसावी. ऊदरनिर्वाहाच्या संधी हा शब्दप्रयोग फारच ढोबळ आहे. ऊदरनिर्वाहाच्याआधी शैक्षणिक, सामाजिक, वैचारिक प्रगतीचा विचार करणे फार गरजेचे आहे. प्रत्येक शहरी मुलांला बसल्या जागी नोकरी मिळत नाही त्याला त्याचा स्ट्रगल करावाच लागतो.
"मला अमुक क्षेत्रात काम करायचे आहे" असं किती मुलं ठरवतात? त्यानुसार शिक्षण घेतात? मराठी माध्यमातून बी ए झाल्यावर मला "कॉल सेन्टरमधे काही काम असलं तर बघा. पगार चांगला असतो तिथे" असं माझ्या वडलांना एका तरूणाने ऐकवलेले आहे. शिक्षणाच्या अमाप संधी उपलब्ध आहेत, पण त्यांचा कितीजण वापर करून घेतात. आर्थिक दृष्ट्या शक्य नसेल तर किती मुलं वर्षभर नोकरी करून मग शिक्षण घेईन असं ठरवतात? सिस्टीमवर, शिक्षणपद्धतीवर दोष देणं सोपं आहे पण आहे ती पद्धत वापरून तुम्ही काय करता त्यालादेखील तितकंच महत्त्व आहे ना. शिक्षण झालं की नोकरी हवी, पण शिक्षण आणि नोकरी यामधे तुम्ही स्वत:ला तयार करण्याचा किती प्रयत्न करता?
सध्या इंटरनेट तर खेड्यापाड्यात पोचलेले आहेच. मोबाईलवर झटाझट गाणी डाऊनलोड करता येतात मग इंग्रजी वर्तमानपत्रे वाचता येत नाहीत का? चालू घडामोडींमधे लक्ष देता येत नाही का? ग्रूपमधे भंकस करत बसण्यापेक्षा चर्चा, ग्रूप डिस्कशन्स करता येत नाही का? करायचेच म्हटले तर बरंच काही करता येइल. करण्याची जिद्द पाहिजे, महत्त्वाकांक्षा पाहिजे. अन्यथा शहरी-ग्रामीण वगैरे एक्स्ज्युजेस आहेतच.
- नगर पालिकेच्या शाळेतून शिकलेली नंदिनी.
नंदीनी >>> माझ्या मनातलच
नंदीनी >>> माझ्या मनातलच लिहिलय...
थोडक्यात सूर असा आहे की
थोडक्यात सूर असा आहे की इंग्लिश आलीच पाहिजेल. पण त्याच बरोबर स्वतःच्या वा हिंदीतुन त्याच गोष्टी सांगता आल्या आणि कामापुरते इंग्लिश आले तर चालणार नाही असाच सूर दिसतो आहे. आमच्या कोरियन डीव्हीजन मध्ये इमेल इंग्लिश मधून आली तरी खूप नाहीतर गुगल ट्रान्सलेशन वापरून लोक काम करतात. त्याचा त्यांना आणि इंग्रजाला काही फरक पडलेला दिसत नाही. मग आपल्याकडेच का ऐवढे इंग्लिशचे प्रेम? आयटी मध्ये एकवेळ समजू शकेल की क्लायंट बरोबर बरेच वेळा बोलावे लागते पण बाकी ठिकाणी कशासाठी पाहिजेल? ज्याला इंग्लिश सुधारायचे आहे तो कसही करून सुधारेलच. ह्याशिवाय ते प्रत्येकाच्या क्षमतेवर अवलंबून आहे. मुळात बराच झगडा स्वताची भाषा असताना दुसरी लादलेली भाषा का शिकायची ह्यातच जातो. ते एकदा झाले की मग बाकीचे सोपे आहे.
नंदिनी.. सगळ्या पोस्ट्स अतिशय
नंदिनी.. सगळ्या पोस्ट्स अतिशय उत्तम!
चैतन्य ईशा :- कोरियातील
चैतन्य ईशा :- कोरियातील इंग्रजी प्रेमाबद्दल आधीच मी लिहिलय. तेही बदलत आहेत आणि त्याचा वेग आपल्यापेक्षा कित्येकपटींनी जास्त आहे.
आपणच उगाच झोप काढतोय आणि कोंबड झाकुन अजुन आरवलच नाही म्हणतोय
विजय>> मला असे वाटते की जिथे
विजय>> मला असे वाटते की जिथे रोजच्या रोज अगदी सध्या सध्या गोष्टी म्हणजे बँक, ऑटोमोबाईल वगैरे जिथे लोकल भाषा चालू शकते तिथेही उत्तम इंग्लिश अलि पाहिजेल हा अट्टाहास आहे.
थोडक्यात सूर असा आहे की
थोडक्यात सूर असा आहे की इंग्लिश आलीच पाहिजेल.<< हो. आलीच पाहिजेल. किमान दुसर्या व्यक्तीशी संवाद साधण्यापुरती तरी आलीच पाहिजे. कारण शालेय शिक्षणामधे ती भाषा तुम्ही सलग "पाच वर्ष" शिकत आहात. या पाच वर्षामधे भाषाशिक्षनाच्या दृष्टीने बर्याच गोष्टी अंतर्भूत केलेल्या असतात. त्यानंतर अकरावी बारावीला ती भाषा आहेच, सायन्सला गेला तर माध्यम इंग्रजीच असणार आहे. नंतर इंजीनीअरिंग अथवा डिग्रीला "इंग्लिश फॉर कम्युनिकेशन" असा विषय बहुतांशकरून असतोच (कर्नाटकात इंजीनीअरिंगला फर्स्ट सेमीस्टरला स्टेटबाहेरील मुलांना कानडी हा विषय कंपल्सरी आहे. मार्क्समधे धरला जात नाही, पण परीक्षा द्यावी लागते. कर्नाटक सरकारच्या मते, या विषयामुळे ही मुले लोकल भाषेशी परिचित होतात)
) त्यामुळे इंग्रजी बोलता येणे अशी आवश्यकता ठेवणे हे काही फार अगदी चुकीचे नाही. इंग्रही ही आता फक्त इंग्रजांची भाषा राहिली नाही, ती जागतिक भाषा बनत चालली आहे. त्यामुळे ज्याला जागतिकीकरणाम्धे टिकून रहायचे आहे त्याने इंग्रजी बोलायलाच हवे. भले अगदी शेक्सपीअर इंग्लिश बोलू नका. पण किमान बेसिक संवाद तरी साधता आलाच पाहिजे. तिथे शहरी ग्रामीण वगैरे भेदभाव असायचे कारण नाही. दरवेळेला तुमचा बॉस, तुमचे कलीग्ज, तुमचे ज्युनिअर्स तुम्हाला मराठी अथवा हिंदी बोलणारेच कसे काय मिळणार?
याचा अर्थ असा नव्हे की, नुसते उत्तम इंग्रजी बोलता येणे हीच एक आवश्यक गोष्ट आहे. तो एक अॅडेड अॅड्व्हान्टेज मात्र नक्कीच आहे. तुमच्याकडे नसला आणि दुसर्याला नोकरी मिळाली तर मग दोष दुसर्याला देऊ नका.
सुनिधीला उत्तम आई मिळालीय.
सुनिधीला उत्तम आई मिळालीय.:स्मित: नंदिनी तुझ्या सर्व पोस्ट अभ्यासपूर्ण आणी उत्तम मार्गदर्शक आहेत, त्याबद्दल धन्यवाद्.:स्मित:
फारएंड तुमचा ०२:२५ चा "एक उत्तम श्रोता आधी बना."वाला प्रतीसाद अतीशय जबरी. बरोबर आहे जो दुसर्याचे आधी ऐकुनच घेत नाही, तो उत्तम श्रोता किंवा वक्ता तरी कसा बनणार?
विजय देशमुख भारतात कायमचे याल तेव्हा खरेच अशा विद्यार्थ्यांना उपयुक्त गोष्टींचे मार्गदर्शन जरुर करा. मग ते सकाळ सारख्या वृत्तपत्र समुहाद्वारे का असेना. तुमचे प्रतीसाद पण आवडले.:स्मित:
बाकी सगळ्यांनी पण छान लिहीलय. कारण प्रत्येकाचे वेगवेगळ्या क्षेत्रातले अनूभव तेवढेच मौल्यवान आहेत.
याचा अर्थ असा नव्हे की, नुसते
याचा अर्थ असा नव्हे की, नुसते उत्तम इंग्रजी बोलता येणे हीच एक आवश्यक गोष्ट आहे. तो एक अॅडेड अॅड्व्हान्टेज मात्र नक्कीच आहे. तुमच्याकडे नसला आणि दुसर्याला नोकरी मिळाली तर मग दोष दुसर्याला देऊ नका.>> ह्या वाक्याला अनुमोदन. पण बरेचदा उत्तम इंगजी आलीच पाहिजेल असा अलिखित नियम असतो आणि एकंदरीत लोक ह्याकडे अॅडेड अॅड्व्हान्टेज म्हणून पाहत नाहीत आणि तोच मुख्य अॅड्व्हान्टेज आहे हेच मानून बसले आहेत किंवा तसे बिंबवले जाते.
एकंदरीत लोक ह्याकडे अॅडेड
एकंदरीत लोक ह्याकडे अॅडेड अॅड्व्हान्टेज म्हणून पाहत नाहीत आणि तोच मुख्य अॅड्व्हान्टेज आहे हेच मानून बसले आहेत किंवा तसे बिंबवले जाते.
>>
मूळ निवड चाळणी त्यांचे आय. टी. स्किल्स वरच असावी. पण अत्यंत कमी जागा आणि भरपूर उमेदवार ते ही रिक्वायर्ड स्किल्स मध्ये तुल्यबळ असतील तर मग अॅडेड अॅड्व्हान्टेज चाळणीसाठी वापरले जातात.
पण अत्यंत कमी जागा आणि भरपूर
पण अत्यंत कमी जागा आणि भरपूर उमेदवार ते ही रिक्वायर्ड स्किल्स मध्ये तुल्यबळ असतील तर मग अॅडेड अॅड्व्हान्टेज चाळणीसाठी वापरले जातात.>> थोडासा ईनडस्ट्रीचा पण प्रभाव असावा असे मला वाटते. आयटी मध्येच प्रोडक्ट बेस्ड कंपनी मध्ये फार त्रास होत नाही. निदान माझ्या जुन्या कंपनी मध्ये तरी असला काही प्रकार नव्हता. अख्या भारतभरातून लोक पहिले जे आपल्यासारखेच पूर्णपणे त्यांच्या भाषेतून शिकलेले होते पण टेक्निकल स्किल्स महत्वाची असल्याने इंग्लिश हा मुख्य मुद्दा कधीच नव्हता. ह्याउलट भारतीय आयटी कंपन्यांमध्ये जास्त करून क्लायंट बेस्ड असल्याने इंग्लिशला जास्त वेटेज असावे असे मला वाटते.
एकंदरीत लोक ह्याकडे अॅडेड
एकंदरीत लोक ह्याकडे अॅडेड अॅड्व्हान्टेज म्हणून पाहत नाहीत आणि तोच मुख्य अॅड्व्हान्टेज आहे हेच मानून बसले आहेत >>>>>> अहो " या जॉब ला अमूक स्किल ची गरज काय" असे उमेदवाराने म्हणून काय उपयोग ?! शेवटी एम्प्लॉयर ठरवणार त्यांना काय हवेय ते. त्यात टेक्निकल स्किल्स असतील, संभाषण कौशल्य असेल, एवढेच काय,"बाकीच्या टीम शी फिट पर्सनॅलिटी" हाही एक अन रिटन फॅक्टर मोठा परिणाम करतो हायरिंग डिसिजन वर - तुम्ही टेक्निकली कितीही क्वालिफाइड असाल तरी !! त्यामुळे पाषाणभेद यांच्या पोस्ट मधला पडदानशीन मुलाखत हा प्रकार बहुतेक नोकर्यांच्या सिलेक्शन मधे वापरणे प्रॅक्टिकली उपयोगाचे होणार नाही!
मी स्वतः हायरिंग मध्येच काम करते. आमच्या साइड ने बघायचे तर जॉब ची जी रिक्वायरमेन्ट असेल त्याप्रमाणे उमेदवार असेल तर चाळण्यांमधे तो पुढे जाईल नाही तर नाही! समोरच्या उमेदवाराला काम शोधून देणे, किंवा सर्वांना समान संधी देणे हा एम्प्लॉयर्सचा क्रायटेरिआ नसतो !
तुम्हाला अमूक जॉब हवाय तर तो मिळवायला लायक हर तर्हेने तुम्ही आहात का, नसलात तर उरलेल्या स्किल्स वर काम करणे भाग आहे... किंवा तुम्हाला योग्य असा जॉब शोधावा! तिथे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आपोआप जास्त! त्यामुळे या चर्चेतली बरीच पोस्ट्स मला trying to fit a square peg into a round hole अशी वाटते आहे!
नंदिनी, विजय देशमुख यांची पोस्ट्स पटली.
स्कायपे किंवा तत्सम फक्त ऑडिओ
स्कायपे किंवा तत्सम फक्त ऑडिओ >> फक्त टेलिफोनिक मुलाखतीनं सिलेक्ट करण्यात फसवणुकीचा धोका असतो. खरा उमेदवार वेगळा आणि फोनवर मुलाखत देणारा वेगळा अशी उदाहरणं बघितली आहेत.
नंदिनीच्या पोस्टस मस्त आहेत
Pages