यू आर रिजेक्टेड

Submitted by बेफ़िकीर on 21 July, 2013 - 06:12

एन आय आय टी या संस्थेत मी गेले तीनएक महिने काम करत आहे. आय टी क्षेत्रात नोकरी मिळण्यासाठी आवश्यक असे लहानमोठे कोर्सेस या संस्थेत असतात हे बहुश्रुत आहे. याच कामाचा एक भाग म्हणून नुकतेच एक जॉब फेअर आयोजीत करण्यात आले होते, ज्यात अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी आपापले अधिकारी पाठवले होते व अडीच हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांनी तेथे मुलाखती दिल्या. संपूर्ण कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणावर, अतिशय प्रभावी व उत्तम झाला. मी उपस्थित असलेल्या मजल्यावर एका कंपनीच्या मुलाखतीसाठी इतकी गर्दी उसळली की मी त्या कंपनीच्या अधिकार्‍यांना 'काही मुलाखती मीच घेऊन आपणास मदत करू का' असे विचारले. मला परवानगी मिळाली व इंग्रजी संवादकौशल्य या सदरातील काही मुलाखती मी घेतल्या. त्या घेत असताना मला आलेला अनुभव येथे मायबोलीकरांना सांगावासा वाटत होता. तो अनुभव मनाला भिडला व बोचलाही.

================

आलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांशी विद्यार्थी पुणे, मुंबई, नाशिक व औरंगाबाद येथील रहिवासी होते. मात्र साधारण तीस टक्के विद्यार्थी हे बुलढाणा, सातारा, सांगली, अकोला, अमरावती, परभणी, लातुर अश्या ठिकाणांहून आलेले होते. हे किंचित अर्धविकसित विभागातील विद्यार्थी नुसते पाहूनही ओळखता येत होते. त्यांची मुलाखतीसाठी योग्य असे कपडे परिधान करण्याची जाण व आर्थिक क्षमता कमी असल्याचे लांबूनच जाणवत होते. या शिवाय चेहर्‍यावर एक प्रकारचे बुजलेपण होते. का कोणास ठाऊक, पण उगाचच एक लाचारीही होती व हा मला झालेला 'भास' नक्कीच नव्हे. दाढीचे खुंट वाढलेले विद्यार्थी व कॅज्युअल वेअरमध्ये असलेल्या विद्यार्थिनी तर प्रगत शहरातूनही आलेल्या होत्या, पण या अर्धविकसित भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा पोषाख, अ‍ॅक्सेसरीज, हेअर स्टाईल हे सर्वच तुलनेने 'साधेपणाचे' होते, 'स्वस्त' नव्हते.

यांच्यापैकी कोणाचा नंबर आला की त्यांची मुलाखत मी घेऊ लागायचो. तेव्हा जाणवायचे की त्यांच्या उभे राहण्यातही एक प्रकारची अजीजी होती. वरवर वाचायला हे खरंच भास वाटू शकतील, तेव्हा ज्या वाचकांना माझ्या गृहितकांबाबतच शंका आहे त्यांच्या मताचा आदर आहेच. पण निदान मी तरी प्रामाणिकपणे जे जाणवले ते लिहीत आहे. अर्थातच अश्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व खूपच कमी होते. त्याला 'प्रभुत्व' म्हणता येणारच नाही. ठराविक काही वाक्ये ते अगदी सलगपणे उच्चारू शकत होते याचा अर्थ तितकीच वाक्ये ते पाठ करून आलेले असावेत. त्या सर्वांच्या डोळ्यात 'नुसते माझ्या सहीवर बरेच काही अवलंबून असल्यासारखे' भाव होते. काहीजणांना तर मुलाखत केव्हा एकदा संपते आणि केव्हा एकदा आपण 'नेहमीप्रमाणे' रिजेक्ट होऊन येथून बाहेर पडतो असे झालेले असावे. यालाही कारण होते ते म्हणजे आजूबाजूला विकसित शहरांमधील जे विद्यार्थी वावरत होते त्यांच्या आत्मविश्वासयुक्त देहबोलीसमोर आपला निभाव लागणे शक्यच नाही याची या विद्यार्थ्यांना केव्हाच जाणीव झालेली होती.

यातील अनेकांना वडील नव्हते, अनेकांचे वडील शेतकरी होते किंवा गॅरेजवर कामाला होते. अनेकांनी निव्वळ नोकरीसाठी पुण्याचा रस्ता धरलेला होता पण पुण्यात वावरण्याचा आत्मविश्वास मात्र त्यांच्यापासून खूपच दूर होता. अनेकांवर लहान भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी होती. जवळपास सर्वांनीच 'छंद' या सदरात 'लिसनिंग टू म्यूझिक' आणि 'रीडिंग' असे लिहिलेले होते. मात्र कोणते म्यूझिक आणि कसले रीडिंग याची उत्तरे त्यांना देता येत नव्हती.

दुसर्‍या बाजूला फाडफाड बोलणारी मुले मुली एकमेकांना खाणाखुण करून हासत होती. त्यांचे पेहराव ग्रामीण युवक - युवतींना बावचळवणारे होते. त्यांचा वावर 'अ‍ॅट होम' होता. मुख्य म्हणजे 'नोकरी' ही त्यांची 'त्वरीत असलेली गरज' नव्हतीच, हे मला संभाषणातून सहज समजत होते.

एकुण वाईट वाटले.

संधी उपलब्ध असण्यात दरी होती. संधी उपलब्ध झाल्यानंतर आत्मविश्वासाच्या प्रमाणात तफावत होती. नोकरीची आवश्यकता ज्याला अधिक होती तो रिजेक्ट केला जात होता. ज्याला ती गरज कमी होती त्याला मुलाखतीच्या पुढच्या पायरीसाठी पाचारण करण्यात येत होते.

बिचार्‍या ग्रामीण विभागातील मुलांच्या डोळ्यात स्वप्ने दिसत होती. 'दोन तीन मिनिटे तर यांच्याशी बोलायचे, यांनी पास केले की मग थेट टेक्निकल मुलाखत, ज्यात आपण नक्की पास होऊ' अशी आशा दिसत होती. पण मला माहीत असलेल्या निकषांनुसार त्यांचे संवादकौशल्य तपासताना त्यांना रिजेक्ट करावे लागणे हे माझे तत्क्षणी कर्तव्य होते. एका वर्तुळात 'आर' लिहून त्यांचा बायोडेटा गठ्ठ्यात मागे सरकवताना आणि त्यांना 'ऑल द बेस्ट' असे 'खोटेच' हसून म्हणताना माझ्यातील कोणीतरी एक स्वतःच निराश होत चालला होता. चेहर्‍यावर व्यावसायिकतेचा मुखवटा मिरवणे भाग होते. मी त्यांना 'ओके, झाली मुलाखत' असे सांगितल्यावर ती मुले अजीजीने मान तुकवून 'थँक यू' म्हणून निघताना आशेने क्षणभर माझ्या डोळ्यांशी डोळे भिडवत होती. जणू त्यांना म्हणायचे असावे की 'आम्हाला फक्त हा इंग्लिशचाच एक प्रॉब्लेम आहे, तेवढा कराल ना दुर्लक्षित'!

आईच्ची जय त्या शिक्षणाच्या आणि विषमतेच्या! माझ्या मनावर गेले दोन दिवस जो परिणाम झाला तो कोणाला धड सांगताही येत नव्हता, माझीच थट्टा व्हायची असे वाटून! शेवटी मी माझ्या जगात पोचलो आणि प्रगत शहराचा एक भाग होऊन कंफर्टेबल झालो. आता असे वाटते साले आपल्याला देवाने इतके नशीबवान बनवले पण आपण त्या नशिबवान आयुष्याचे काय मातेरे करत आहोत?

माफ करा, विचार प्रकट करताना वाहवत गेलो, पण नेहमीप्रमाणेच हा लेखही जसा सुचला तसा एका बैठकीतच लिहून मोकळा झाल्याचे समाधान मनाला आहे.

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कर्नाटकात इंजीनीअरिंगला फर्स्ट सेमीस्टरला स्टेटबाहेरील मुलांना कानडी हा विषय कंपल्सरी आहे. मार्क्समधे धरला जात नाही, पण परीक्षा द्यावी लागते. कर्नाटक सरकारच्या मते, या विषयामुळे ही मुले लोकल भाषेशी परिचित होतात
>>
हा चांगला उपक्रम आहे. नंदिनी तुमच्या पोस्ट अगदी परफेक्ट असतात.

मैत्रेयी आपण म्हणता ते बरोबर आहे. पण हा सध्याचा क्रायटेरीया आहे आणि तो बरोबरच आहे असे धरून सगळे मुद्दे योग्य आहेत आणि त्यामुळे इंग्लिश अनिर्वाय आहे असे सगळे आहे. सध्या दर आठवड्याला किमान ३-४ वेळा ब्राझील पासून कोरिया पर्यंत असलेल्या सगळ्या डिमांड प्लानेर्सशी बोलतो. तिथे आपल्याकडे असलेले मुद्दे कधीही माझ्या कामात आड आलेले मला दिसले नाहीत. त्या त्या देशात त्यांच्या त्यांच्या भाषेत एमैल्स जातात. सांगायचा मुद्दा हा आहे की आपण कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचे. असो. पण एकूण मतप्रवाह पाहता आहे असेच चालू राहणार पण मुळातून त्याची खरोखर गरज आहे का ह्याचा विचार करायची इच्छा दिसत नाहीये. इथे माझे म्हणणे एवढेच आहे. इंग्लिश रद्द करणे आणि त्याची गरजच नाहीये असे मी म्हणत नाहीये.

विजय +१
बाळ +१
नंदिनी, मैत्रेयी +१
पाषाणभेद>> अगदीच हास्यास्पद विचार. उद्या क्लायंटला भेटायला जाताना त्याने जाती-वर्ण्-लिंगभेद करु नये म्हणून सर्वांनी बुरखे घालून जायचं का? Lol
वरती विजय अन बाळ म्हणताहेत त्याप्रमाणे रुल्स आर नॉट हिडन. नाव-गाव्-जाती-धर्म-भाषा-लिंग्-वर्ण यावरुन कॉर्पोरेट्स मध्ये भेदभाव "एंट्री लेव्हल" ला तरी नक्कीच होत नाही. (पुढची कंपुशाही जाऊ द्या सध्या. तो विषय नाही इथे). तसं असतं तर कंपन्यांचे इतके बहुरंगी कँपस दिसलेच नसते. आणि गोत्र?? ते कोण लिहितं सीव्हीमध्ये?? जो लिहिल त्याला मी तरी एक प्रश्नही न विचारता रिजेक्ट करीन.

आजकाल सो कॉल्ड ग्रामीण मुलांनादेखील स्मार्टफोन्स कसे वापरावे, त्यावरनं काय डालो करावे, मॅक्डी मध्ये जाऊन काय खावे, इंटरनेटवर कुठे काय शोधावे वगैरे "नीट" कळते. हे कोण शिकवतं? खेड्यातले शिक्षक का पालक? मग हे जर स्वत:हून शिकता येतं तर स्वतःहून इंग्लिश शिकण्याचे प्रयत्न का करता येत नाहीत? ते ही पदवीधर मुलांना? (मी आधी लिहिल्याप्रमाणे इथे अति दुर्गम खेड्यातल्या, आदिवासी मुलांविषयी बोलतच नाहिये मी.)

चैतन्य इन्या>>> तुमचा तात्विक विरोध आहे इंग्लिशला, हे समजु शकते पण इथे तो विषयच नाही. जर ग्रामीण भागातले, सुशिक्षित मुलं (पदवीधर) इंग्लिश संभाषण करु शकत नाहीत तर तो प्रॅक्टीकल प्रॉब्लेम आहे अन तो कसा सोडवावा किंवा त्याला कसा वळसा घालून पुढे जावे का दुसरा रस्ता पकडावा याचा विचार उमेदवाराने स्वतः करणे महत्वाचे आहे.

सगळ्यांचेच बरोबर आहे अशी सकस सुदृढ चर्चा केल्या बद्दल करत असल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन
पुढील प्रतिसादांच्या प्रतिक्षेत ...............

Happy

जवळपास सर्वांनीच 'छंद' या सदरात 'लिसनिंग टू म्यूझिक' आणि 'रीडिंग' असे लिहिलेले होते. मात्र कोणते म्यूझिक आणि कसले रीडिंग याची उत्तरे त्यांना देता येत नव्हती.
>>

बेफिंच्या या निरीक्षणावरुन असे वाटते की बहुतेक ती मुले मुलाखतीची तयारीच करुन नव्हती आली. कदाचित त्यांना माहितच नसेल मुलाखतीत असे काही विचारु शकतात. जो कोर्स केलाय त्याचेच प्रश्न विचारतील मग तेवढीच तयारी करुया. अर्थात कोर्ससंबंधी प्रश्नपण इंग्रजीतूनच विचारतील एवढी तरी कल्पना असेलच.

कदाचित पहिलाच इंटरव्यू असेल, म्हणून असे अनपेक्षित(?) प्रश्न ऐकुन गांगरली असतील. असे होतेच बहुधा. पण न डगमगता पुढची उत्तरे द्यायला हवीतच.

जर पहिला इंटरव्यू नसेल तर आपली ओळख, छंद इ. बेसिक प्रश्नांची नीट उत्तरे देता यायला हवीत ना!

मुळात छंद नावाचं काहीतरी वांगं असतं आणि ते जोपासायचं असतं हे तर माहिती पाहिजे.>>>

सहमत.

ग्रामीण भाग, संवाद कौशल्य ह्या गोष्टी सोडा..... अगदी शहरी भागातल्या बहुतांशी मुलांना छंद, त्याचे जोपासणूक ह्या गोष्टी पुरेशा क्लिअर असतात का अशी शंका आहे.

मला वाटते आपण फार Simplistic कारण शोधत आहोत.

खरी कारणे सोडुन Blame it on something असे चाललय. ह्या बाबतीत English किंवा comms skill वर ढकला.

साधारण aptitude असेल आणि त्यांच्या विषयातील साधारण ( विषेश नाही ) ज्ञान असेल तरी नोकरी मिळते. कोणालाही दिलेले काम करु शकेल असा माणुस हवा असतो. आणि कंपन्यांना पण माहीती असते की त्या कामाला काय पाहिजे ते.

खरे असे आहे की, आपण सरसकट सर्व विद्यार्थ्यांना पदवी करायला लावत आहोत.
आपल्या क्षमता नसताना १० वी आणि १२ वी मधे पेपर सोप्पे काढुन मुलांना पदवी ची स्वप्ने दाखवली जातात. ( कारण राजकारणी लोकांची कॉलेज चालली पाहिजेत ना ).

मी बर्‍याच कॉलेजेस मधे कँपस मुलाखतींसाठी गेलो आहे.

खुप वाईट अनुभव होता Engineering च्या मुलांचा. ही कॉलेजेस रेप्युटेड आहेत जसे की कराड चे Engg कॉलेज, सांगली चे वालचंद कॉलेज.

ज्यांना साधी काळ काम वेगाची गणिते येत नाहीत ( ही सर्व कंपन्यांच्या लेखी परिक्षेत असतात ), ती मुले १२ वी पास होऊन Engg ला कशी आली ह्याचे मला आश्चर्य वाटत आले आहे.

भाषेचा प्रश्न तर होताच, पण मी त्यांच्याशी हिंदी मराठी मधे पण बोललो होतो. तरी पण निराशाच पदरी आली.

१. त्यांना त्यांच्या Project बद्दल पण सांगता येत नव्हते ( ह्याचा अर्थ त्यांनी तो केला नव्हता ). त्यांना त्यांच्या विषयातील बेसिक माहीती पण नव्हती. Engg च्या ४ थ्या वर्षा च्या त्यांच्याच प्रोजेक्ट बद्दल विचारले तर २ वाक्य पण सांगता येऊ नयेत ( मातृभाषेत सुद्धा ), हे कीती वाईट आहे.

मीच त्यांना विचारायचो की तुम्ही च सांगा तुम्ही कुठल्या विषयात comfortable आहात आणि त्या विषयावर अगदी साधे विचारायचो तरी काही ही यायचे नाही.

२. बेफी जींनी म्हणल्या प्रमाणे, कुठलीही "खरी" hobby नव्हती. त्यांनी लिहिलेल्या आवडीच्या विषयावरचे अगदी बेसिक प्रश्ना ची उत्तरे त्यांना माहिती नव्हती. मला संगीताची आवड आहे असे म्हणायचे आणि साधी माहिती सुद्धा नसावी. किंवा सिनेमा आवडतो म्हणायचे आणि त्यांनी सांगीतलेल्या सिनेमाचा दिग्दर्शक पण माहीती नसावा.

३. स्वताच्या आजुबाजुचे जनरल माहीती पण नव्हती. अमरावतीच्या , बुलढाण्याच्या मुलाला विचारले की तुमचे शहर कधी पासुन अस्तित्वात आहे, पुर्वी त्या भागात कोणी राज्य केले होते. काहीही माहीती नव्हते. हे असले प्रश्न विचारायची वेळ आली कारण त्यांना त्यांच्या विषयातील काहीही माहीती नव्हती.

तुम्हाला इतके वर्ष शिकलात त्यातले काही येत नाही, कुठलीही आवड किंवा छंद नाही. कशात झोकुन द्यायची इत्छा नाही. मग काय करायचे?

नक्की विषय काय चाललाय?

बेफिकिर यांनी लिहिलेले वाचुन वाटले की त्यांनी ग्रामिण भागातली मुलांवर लिहिलेय ज्यांच्यासाठी शिक्षण घ्यायची सोय उपलब्ध आहे पण शिकवण्याचा उत्साह्/माहिती असलेल्या शिक्षकांची मात्र सोय नाहीय. त्यामुळे मुले फक्त क्रमिक पुस्तकातले वाचुन तेवढेच शिकताहेत. त्याबाहेरचे त्यांना काहीच माहिती नाहीय आणि घरातले/समाजातले वातावरणही यासाठी पोषक नाहीय.

प्रतिसादात मात्र बहुतांशानी शहरी भागाचाच विचार दिसतोय.

प्रतिसादात मात्र बहुतांशानी शहरी भागाचाच विचार दिसतोय.>> कारण बरेचसे शहरात राहणारेच लोक आहेत.

प्रसाद ह्यांना पूर्ण अनुमोदन.

नताशा>> तुम्हाला माझे उदाहरण देतो. मी आयटी सोडून आता ३.५ वर्षे झाली. सध्याच्या कंपनी मध्ये मी युरोपचा डिमांड प्लानिग हेड आहे. २७ देशात माझी कंपनी आहे. तिथल्या सगळ्यांबरोबर काम करताना हे जाणवले की आपल्याकडे इंग्लीशचा प्रचंड उदोउदो आहे. युरोप, ब्राझील, चिली आणि साउथ अफ्रिकेमध्ये मी स्वतः मुलाखती घेतल्या आहेत. वर नंदिनी म्हणतात तसे इंग्लिश हा अडेड फाक्टर गंडला जातो. मुळात मी भारतात असतो तर खात्रीने सांगतो की मी इंग्लिश हा फार मोठा क्रायटेरिया ठेवला असता. एखाद्याला त्याचा विषय किती येतो ते जास्त महत्वाचे. बाकीच्या गोष्टी शिकता येतात पण आपल्याकडे इंग्लीशची इतकी हाईप आहे की ज्याचे नाव ते. असो. पुन्हा एकदा विरोध इंग्लिश नसून त्याच्यावरून सिलेक्शन ह्याला आहे. मुळात जिथे फार् बोलायचं संबंधाच येत नाही किंवा तोडके मोडके आले तरी चालेल दुसर्याला आपले म्हणणे कळले म्हणजे झाले हा दृष्टीकोन आपल्याकडे अजिबात नाहीये. आपल्याकडे म्हणजे एकदम सुसाट बोलता आले पाहिजेल असाच काहीसा प्रचार झाला आहे. ( अवांतर ह्यावर आमच्या एका मित्राचे म्हणणे असे आहे की आधीच्या लोकांनी कष्ट केले आणि इंग्लिश वर प्रभुत्व मिळवले मग त्यांची अपेक्षा की बाकीच्यांनी माझ्या सारखेच कष्ट केले पाहिजेत. हा सुप्त विचार असतो. तो कदाचित प्रूव्ह करणे कठीण आहे )

( अवांतर ह्यावर आमच्या एका मित्राचे म्हणणे असे आहे की आधीच्या लोकांनी कष्ट केले आणि इंग्लिश वर प्रभुत्व मिळवले मग त्यांची अपेक्षा की बाकीच्यांनी माझ्या सारखेच कष्ट केले पाहिजेत. हा सुप्त विचार असतो. तो कदाचित प्रूव्ह करणे कठीण आहे )
<<
हे भारी.

*

पण चर्चा परत वाघिणीच्या दुधावरच जाते आहे.

७०% पदवीधर भारतीय तरूण अनएंप्लॉयेबल आहेत, (या गृहितकात तथ्य आहे, असे गृहित धरून,) त्यांना अन-एंप्लॉयेबल बनविण्यासाठी फक्त 'इंग्रजी येत नाही' हा एकच फॅक्टर कारणीभूत आहे, की दुसरेही काही फॅक्टर्स आहेत? असतील तर कोणते व त्यांत बदल कसा करता येईल?

मला तरी या अनुषंगाने चर्चा वाचायला आवडेल.

वर साधना यांनी म्हटल्या प्रमाणे शहरी भागाचे, त्यातल्या त्यात मेट्रोजचे प्रतिनिधीच विचार मांडताना दिसताहेत. मायबोलीवर इतरही महाराष्ट्रभरातले सदस्य आहेत. सगळ्यांकडून इनपुट येऊ द्यात की!

लेख छान आहे, मुख्य म्हणजे थॉट प्रोव्होकिंग आहे.

लेख वाचून माझे दिवस आठवले. मी ही इयत्ता १० वी पर्यंत शुद्ध मराठीत शिकलेली. नंतर कळलं इंग्रजी नावाचा इंगा काय असतो ते. १२वीत असताना... बेळगावला आर्मीतल्या काकाच्या प्रोग्रॅम मध्ये गाणं म्हणल्यावर सर्व लोकांनी अ‍ॅप्रिशिएट केलं ते धड एन्ज्यॉय करता आलं नाही... कारण इंग्लिश अजिबातच येत नव्हतं. एका बाईने तिची ओळख करून दिल्यावर 'नाईस टू मिट यू' ऐवजी मी चक्क थँक्यू म्हणाले होते Uhoh ते ही आठवलं.
गेली दहा वर्ष आयटीमधे काम करतेय. नोकरीला लागले तेव्हाही माझं इंग्लिश अगदीच सो सो होतं. (मी सिलेक्ट झाले त्या पदाला उत्तम इंग्रजी येणं अत्यावश्यक असूनही मी कशी सिलेक्ट झाले होते याचं आश्चर्य अजूनही वाटतं) असो. पण म्हणतात ना प्रॅक्टीस मेक्स मॅन पर्फेक्ट... तेच खरं.. फाडफाड शिकायला जाऊन कुणालाही इंग्रजी येऊ शकत नाही, त्याला प्रॅक्टीस आणि वाचनच हवं. आपल्याकडे इंग्रजीला अवास्तव महत्व दिले जाते. रादर त्या व्यक्तीची स्किल्स न पाहता अ‍ॅपियरन्सला महत्व दिले जाते. मराठीत किंवा व्हर्नाक्युलर मध्ये शिकलेल्यांना आत्मविश्वास थोडा कमी असतो. मी तर पाहिलय की सौदिंडियन्स तर डांडरून चुकिचं इंग्रजी बोलतात. कॉन्फिडन्ट एकदम.
ते सोडा एक अत्यंत वरच्या पोस्टचा बिहारी माणूस 'i dont care' ऐवजी बिनधास्तपणे ' i doesn't care' म्हणतो. मला वाटते कॉन्फिडन्स इज इम्पॉरटंट.

कधी कधी इंग्लिश बोलताना माझीही फेफे उडते. बट एव्हरीवन गेट्स हिज्/हर ओन शेअर. keep faith in yourself.

चैतन्य, मला आलं ते लक्षात. माझा मुद्दा जरा वेगळा आहे. माझ्यामते केवळ फाडफाड इंग्लिश येत नाही या कारणाने रिजेक्शन होत नाही तर इतक्या वर्शात बेसिक संभाषणही शिकण्याचा अ‍ॅटिट्युड/aptitude उमेदवाराचा दिसला नाही म्हणूनही रिजेक्शन होते. म्हणजे फाडफाड इंग्लिश न येणे हे रुट कॉज नसून ते symptom of low aptitude/not so right attitude म्हणून बघितल्या जातं. तर हे असं का? हा जर प्रश्न असेल तर साधं उत्तर कदाचित कॉम्पिटिशन हे असावं. म्हणजे एका जागेसाठी दहा उमेदवार equally qualified आले तर तुम्ही कोणाला सिलेक्ट करणार? फिल्टर १. बॉडी लँग्वेज २. त्या जागेसाठी लागणारे स्किल्स, अनुभव ३. बेसिक communication skills, कॉन्फिडन्स ४. हजरजबाबीपणा ५. अ‍ॅडिशनल सर्टीफिकेट्स, स्किलसेट ६.इतर अवांतर छंद अन त्यातली सिन्सिअ‍ॅरिटी वगैरे. क्रम थोडाफार बदलु शकतो जागेप्रमाणे.
असं म्हणतात की इंटर्व्युला आलेल्या उमेदवाराच्या इंटर्व्ह्युच्या आधीच पहिल्या २०सेकंदात त्याला घ्यायचे का नाही हे डिसिजन बहुतेक वेळा सिलेक्टर मनोमन (sub conscious level ला) करत अस्तो. नंतर फक्त त्या निर्णयाला पुरक कारणे शोधतो. त्यामुळे जगभर बॉडीलँग्वेज हा निश्चीतच इंग्लिशपेक्षा मोठा क्रायटेरिया आहे.
तुम्ही म्हणताहात त्या देशातही एका जागेसाठी एक माणुस नेटीव्ह भाषा येणारा अन दुसरा नेटीव्ह +इंग्लिश येणारा असला तर (इतर सगळं सारखं असल्यास) बहुधा दुसरा सिलेक्ट होईल.

एवढया पोस्ट पडल्या तरी चर्चा मुद्द्याला धरुन चालली आहे.

दृष्टच काढुन टाकायला हवी ह्या बाफची..

वरील सर्वच प्रतिसादकर्त्यांचे अगदी मनःपूर्वक अभिनंदन !!!

बेफिकीर,
तुमच्या मूळ पोस्ट व अनुभवातील भावनिक गहीवर किंवा कळवळ मनाला भिडली तरी मुद्दा फक्त मुलाखत व निवडीच्या अटी व आवश्यकता एव्हडाच आहे असे मला वाटते.
त्या अनुशंगाने >> "आईच्ची जय त्या शिक्षणाच्या आणि विषमतेच्या!"" हे तुमचे विधान त्या भावनिक गहीवरातून आलेले आहे, व्यावहारीक व तर्क सुसंगत विचार केल्यास त्या विधानास फारसे 'बूड' नाही एव्हडेच म्हणायचे होते.
असो. संधी, सामाजिक, आर्थिक विषमता, ई. ई. सगळे मुद्दे नेहेमीप्रमाणेच ईथेही डोकावले आहेत...
बाकी चालू देत...
One has to follow the rules of the game and play; that is it. Either one is fit to play or not. Survival of the fittest still holds true! There are very few posts like Nandini's that talk about the 'fundamentals' of the issue and are fascinating to read.
['फाड फाड' ईंग्रजी चा आग्रह कुठलीच आयटी कंपनी धरत असेल असे वाटत नाही, तसे असेल तर जवळ जवळ सर्वच आय्ट्या कंपन्या बहुतेक बंद कराव्या लागतील.]

चर्चा आवडली.
मला तर वाटते 'Survival of the fittest' किंवा 'Natural selection' हे जे काही आपण शाळेत शिकलो ते लक्षात ठेवायला हवे नेहेमी. हा नियम तर तुमच्या DNA लाही लागू आहे. जर इंग्रजीमधे संवाद साधता येणे ही रिक्वायरमेंट असेल तर स्वतःला त्यासाठी तयार करणेच fittest होण्याकडे टाकलेले एक पाऊल आहे. तिथे उगाच कारणे देण्यात वेळ घालवणे योग्य नाही.
आणि आता तर तरूणाईला आवडतील अशी बरीच भारतीय लेखकांची (चेतन भगत, करन बजाज) इंग्लिश पुस्तके आहेत, जी वाचनाची आवड नसलेले लोकही आवडीने वाचतात, त्यामुळे जिद्द आणि इच्छा असेल तर अनेक सोपे मार्ग उपलब्ध आहेत.अशा दृष्टीने प्रयत्न केले तर आत्मविश्वास नक्कीच वाढतो.

बर्‍याच जणांनी लिहीले आहे की ईग्रजी शिवाय काही आडत नाही आणी काही देशातुन स्थानिक भाषेतही ईमेलस येतात आणी ती ईमेलस वाचणारे गूगल वर भाषांतर करुन वाचतात. ह्यात गरज कोणाची असते? ईमेल पाठवणार्‍याची की वाचणार्‍याची? माझ्या मते वाचणार्‍याची. काहीतरी कारणासाठीच तो ते सहन करतो. एकतर त्यांच्या कडुन (लोकल भाषेत ईमेल पाठवणार्‍यांचा) मिळणारा पैसा वा कमी किमतीत हव्या त्या क्वालीटीचे करुन मिळणारे काम. ह्या दोन्ही पैकी तुमच्याकडे काहीही नसेल तर तुमची ईमेल ट्रान्सलेट करायचे कष्ट कोणी घेणार नाही. तसाही इतरांपेश्या चांगल कम्युनिकेशन करता येणे हा अ‍ॅडेड अ‍ॅड्वॅन्टेज च आहे. त्यात आजच्या ग्लोबलाएझशन च्या काळात ईग्रजी येणे गरजेचे आहे.

?

अनावश्यक भावनाप्रधानतेने लिहिलेला पण काही महत्वाचे मुद्दे उपस्थीत करणारा धागा, व न भरकटलेली उत्तम चर्चा. बहुतांश पोस्ट्स चांगल्याच आहेत पण माझ्या मते विशेष उल्लेखनीय पोस्टी नंदिनी, योग आणि इब्लीस यांच्या.

माझे खुलभर दुध / खारीचा वाटा / चार आणे

मी स्वत: सिव्हील इंजीनीयर आहे, आमच्या क्षेत्रातील विविध विभागांमधे लागणार्‍या माणसांच्या मुलाखती गेले काही वर्षे नियमितपणे घेत असतो तसेच वेगवेगळ्या साईटस हॅंड ओव्हर करायच्या वेळेस नवीन भरती होत असताना, आयटी, हॉस्पिटॅलिटी, फार्मास्युटीकल सारख्या अनेकविध क्षेत्रातल्या विविध विभागांमधल्या पदांसाठी घेतल्या गेलेल्या मुलाखती बाजूने पण जवळून बघण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे माझे म्हणणे फक्त इंग्रजी संभाषण कौशल्य ह्या विषयाशी निगडीत नसून एकंदरीतच मुलाखती आणि नोकरभरती अशा (किंचितश्या व्यापक) विषयावर आधारीत आहे.
जेव्हा जेव्हा अशा मुलाखती, उमेदवारांना शॉर्ट्लिस्ट करून बोलावून घेतल्या जातात त्या वेळी त्यातल्या त्यात नीट पार पडतात. पण जेव्हा जेव्हा मुलाखती ह्या, 'मुलाखत जत्रा' स्वरूपात किंवा ज्याला वॉक इन असे म्हणतात अशा स्वरूपात आयोजित केल्या जातात, त्या त्या वेळी अक्षरशः हौशे-नवशे गवशे असे सर्व प्रकारचे लोक जमा होतात. आपण काय शिकलो आहोत, आपले स्किलसेट काय आहे हे माहीत असताना देखिल भलत्याच पण अर्थातच अधिक पगार मिळणाऱ्या पदांसाठी अप्लाय करून मुलाखती साठी येउन धडकणारे अनेक धाडसी उमेदवार रिक्रूटमेंट क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या चांगलेच परिचयाचे असतील. त्यामुळे मुलाखतीच्या वेळी व एरवी देखील अजीजी, लाचारी ई. तत्सम देहबोली वापरून आपला कार्यभाग साधतोय का हे बघणारे महाभाग, शक्यतो/बहुत करून ज्यांना आपण योग्य प्रमाणात लायक नाहीयोत हे माहिती असणारी माणसेच असतात.

माझ्या मते आणि अनुभवा नुसार ज्यां उमेदवारांना शिकलेला विषय नीट समजलेला असतो त्यांच्यात आत्मविश्वास वेगळा / मुद्दाम आणावा लागतच नाही. तो आपोआप येतो, अगदी इंग्रजी मधून विषय मांडण्या इतका देखील, वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे पोळपाट लाटणे सारखे ईतर शब्द उसने घेउन का होईना अशी माणसे नक्की बोलतात.

ज्यांना स्वतःचा विकास साधून घ्यायचा असतो तो येन केन प्रकारेण, कठोर परिश्रम करून, साधून घेतोच असा एक मत प्रवाह वर अनेक पोस्टस मधून मांडला गेला आहे तो खूप प्रमाणात खरा जरी असला तरी आपली शिक्षण किंबहुना परीक्षा व्यवस्था (घोका आणि ओका वगैरे वगैरे) हे(च) पदवीधर भारतीय तरूण अनएंप्लॉयेबल असण्या पाठीमागचे प्रमुख कारण आहे असे मला वाटते.

पदवीधर तरुणांची एम्प्लोयीबिलीटी वाढवायची असेल तर इंडस्ट्री आणि कोर्स करीक्युलम ह्यामध्ये सांधण पूल उभारावे लागतील. या संदर्भात शंतनुराव किर्लोस्करांच्या चरित्रात, ज्याला सँड्विच कोर्स म्हणतात अशा प्रकारच्या अभियांत्रीकी पदवी अभ्यासक्रमाची निकड / प्रस्ताव त्यांनी त्यांच्या काळातच नमूद केल्याचे आठवते.

सध्या माझ्या माहीतीत बिझनेस अ‍ॅड्मिनीस्ट्रेशनच्या तसेच सिव्हील इंजीनीयरिंगच्या पोस्ट ग्रॅज्यूएशनच्या अनेक कोर्सेस मध्ये कोर्सचा (अवांतर) भाग म्हणून इंडस्ट्री मध्ये काम करत असलेल्या माणसांना लेक्चर्स देण्यासाठी बोलावतात, त्याचा फायदा होताना दिसतो.

एम. एस. प्रोजेक्ट सारखी प्रोजेक्ट प्लॅनिंग साठी लागणारी सॉफ्ट्वेअर्सची वर्कशॉप्स अगदी सातारा, सांगलीकडच्या काही कॉलेजेस मधूनही घेतली जाताना दिसताहेत हा बदल स्वागतार्हच आहे.

आपण आपापल्या पातळीवर काय करू शकतो ह्या बाबत सुचलेला एक मुद्दा म्हणजे बरेच जण आपापल्या शाळेसाठी माजी विद्यार्थी समितीच्या माध्यमातून काहीना काही मदत करताना दिसतो त्याच धर्तीवर कॉलेजेस मधूनही माजी विद्यार्थी समितीच्या मार्फत काही शिबिरे घेता येतील ज्यामधून मुलाखती कशा द्याव्यात, आपापल्या क्षेत्रात नविन वारे काय वाहत आहेत, अजून कोणती सॉफ्टस्किल्स विकसित करता येतील या संदर्भात मार्गदर्शन करता येऊ शकेल.

भारतात नसणार्‍या लोकांना देखिल अशा प्रकारचे मार्गदर्शन लेखाद्वारे, ईमेल द्वारे, व्हिडीयो बनवून यूटयुब वर अपलोड करून तशा प्रकारची सुविधा असल्यास व्हिडीयो कॉन्फरन्स द्वारे करता येऊ शकेल असे वाटते.

प्रत्येकाने आपापल्या नोकरी व्यवसायतल्या सुरुवातीच्या काळात कशा प्रकारच्या चॅलेंजेसचा सामना, कशाप्रकारे केला या बाबतचे आत्मकथनही उपयुक्त ठरू शकते.

असो सध्या इतके पुरे....:)

मला एक कळत नाहीये की लोक मी मराठी शाळेतेली/ ला मी अमुक गावचा मी आय्टीतला मी अमुक हे मुद्दे का सांगत आहेत ???

मुद्दा विषमतेचा होता व ही विषमता कमी कशी करायची हा ही !!!

चैतन्य, तुमचा इंग्रजीचा भारतात केला जाणारा उदोउदो कदाचित बरोबर असेलही, पण (पुन्हा एकदा) कोरियाचं उदाहरण घेतलं तर इथे कोणत्याही विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी (अगदी तो कोर्स कोरियन भाषेत असेल तरीही) टोईक अत्यावश्यक आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण टोईकमध्ये ६५०+ साठी हि मंडळी अगदी आयएएस सारखी मेहनत घेतात आणि कशीबशी ६५० पर्यंत पोहचतात. भलेही त्यांच्या दैनंदीन जीवनात इंग्रजी कामाची नाही. आणि इथल्या सगळ्याच सोयी (अगदी वेब्साईटही) कोरियन भाषेतच आहेत, पण ज्याला थोडफारतरी इंग्रजी चांगलं येतं, त्याला एकदम वरची पोस्ट मिळते. राहिला प्रश्न गुगल ट्रान्स्लेटचा, ते मी बरेचदा कोरियन-इंग्रजी वापरलय आणि त्यापेक्षा माझं कोरियन (understanding) चांगलं वाटलं. असो.
अवांतर :- या लोकांचही लेखी इंग्रजी आपल्यासारखच चांगलं असतं फक्त बोलताना त्यांना आत्मविश्वास कमी असतो किंवा शब्द सुचत नाही, इतकच.

माझ्या मते अनेक चांगल्या पोस्ट इथे आल्या आहेत, पण उगाच खेळाचे नियम कसे चुकीचे आहेत, यापेक्षा त्या नियामांनुसार आपण कसा उत्तम खेळ खेळू शकतो, हे अधिक महत्त्वाचं. कदाचित आज (Entry Levelला) त्या मुलांना इंग्रजीचं खूपसारं ज्ञान हवं असही नाही, पण किमान आपलं म्हणणं इंग्रजीतुन मांडणे - मग ते थोडफार अडकत का होईना पण आत्मविश्वासाने आवश्यक आहे. कारण अशीच लोकं पुढे गरजेनुसार तांत्रिक इंग्रजी शिकुन घेउ शकतात. इथे (Entry levelला) इंग्रजीच ज्ञान नव्हे तर तुमचा आत्मविश्वास आणि attitude बघितला जातो, हे अधिक महत्त्वाचं.

मला एक कळत नाहीये की लोक मी मराठी शाळेतेली/ ला मी अमुक गावचा मी आय्टीतला मी अमुक हे मुद्दे का सांगत आहेत ???
<<
इंग्रजीच्या मुद्द्याबद्दल बोलताना त्यावर मात कशी केली हे स्वतःचे उदाहरण व अनुभव सांगून स्पष्ट करण्यासाठी हे असावे असे वाटते.

संवाद कौशल्य की नुसतेच इंग्रजी? मूळ विषयावर प्रभुत्व की बोलबच्चनगिरी करून उन्नीस-बीस ज्ञान खपवून नेण्याची बनचुकेगिरी? मुलांनी काय शिकायला हवे? अन मुख्य म्हणजे शिकायचे कसे, हेच शिकणे गरजेचे आहे असे मला वाटते.

शाळेत परिक्षेसाठी 'अभ्यास' होतो, करवून घेतला जातो. त्यातल्या 'अभ्यास' शब्दाचा अर्थच समजत नाही मुलांना. मुलांचा अभ्यास 'घेण्या'पेक्षा, विषयाचा अभ्यास कसा 'करावा', अन त्यासाठी पाठ्यपुस्तक हे केवळ एक बेसिक व तोकडे मार्गदर्शक आहे, हे मुलांच्या लक्षात आणून दिले तर जास्त योग्य होईल असे वाटते. हे लक्षात आणून देणारे व देवू शकणारे, व पुस्तकी घोकंपट्टीपलिकडे जाऊन त्या-त्या विषयाचे आकलन करणे कसे गरजेचे आहे, व पुस्तकी विषयांच्या पलिकडचे ज्ञानही जगणे कसे समृद्ध करते, हे त्यात्यावेळी समजेल अशा शब्दांत वा कृतीने दाखवऊन देणारे शिक्षक व पालकही मला तरी भेटले, हे माझे नशीब. आपण प्रत्येकाने आपल्या संपर्कात आलेल्या मुलांसाठी इतके करण्याचा प्रयत्न केला तरी पुरेसे होईल असे मला वाटते.

अवांतरः
इंग्रजी माध्यमाची मुले कॉन्फिडन्स बाय डिफॉल्ट आणतही असतील. पण मग सोप्या मराठीची देखिल वाट लागलेली असते अनेकदा.
कालचेच उदाहरण : ५ वीतल्या विंग्रजी माध्यम कन्येला, 'बंधुराज कुठे आहेत तुमचे?' असे विचारले असता, ती संपूर्ण कन्फ्यूज्ड होती की हा माणुस नक्की काय कुठे आहे म्हणून विचारतो आहे.
अन साधारण त्याच वयाची असताना माझ्या एका भाचीला मी 'गोजिरवाणी' म्हटल्यावर तिने जे काय भोकाड पसरले होते त्याची आठवण झाली. तो काहीतरी अपशब्द असावा अशी तिची समजूत झाली होती..

सांगायचा मुद्दा हा, की घरात प्रमाण मराठी बोलली जात असली, तरी अवांतर वाचन होणे गरजेचे. अन घरात २४ तास मुलांशी इंग्रजीत बोलून त्यांचे इंग्रजी संभाषणकौशल्य वाढवता आले, तरी त्यांना येते ती इंग्रजी 'संवाद' साधण्यासाठी पुरेशी होत नाही.. (हे निरिक्षण भारतातील मुलांबद्दल आहे, ज्यांच्या शाळा भारतातल्या आहेत)

हर्पेन यांच्या पोस्टीच्या अनुषंगाने.

>>पदवीधर तरुणांची एम्प्लोयीबिलीटी वाढवायची असेल तर इंडस्ट्री आणि कोर्स करीक्युलम ह्यामध्ये सांधण पूल उभारावे लागतील.<<
याला अगदीच अनुमोदन.

वैद्यकीय शिक्षण या विषयावर आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात या विषयावर चर्चा केल्याचे आठवते. तिथे भारतातील इंजिनियरिंग क्षेत्रात इंडस्ट्रीच्या गरजे नुसार करिक्युलममधे बदल होतात. असे एका वक्त्याने सांगितलेले आठवते.

या निमित्ताने भारतातली शिक्षणपद्धती ही मूलतः ब्रिटीश राजसाठी कारकून तयार करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बनवली आहे, हे वाक्य आठवले..

घरी (लहान मुले - प्राथमिक्/माध्यमिक) आल्यावर आज शाळेत काय शिकलास/ शिकलिस, इतकं विचारुन शांत बसलं आणि मुलांना बोलू दिलं तरी आत्मविश्वास वाढायला मदत होईल. हेच किंवा काहीतरी विशेष असं ४ लोकांसमोर बोलायला लावणेही फार काहि कष्टाचे नाही. पण चुप बस... कय कटकट आहे, किंवा जा अभ्यास कर, हे म्हणणे म्हणजे आत्मविश्वासाला तडा जाण्यासाथी मदतच Sad

मनीष | 24 July, 2013 - 20:00

स्कायपे किंवा तत्सम फक्त ऑडिओ >> फक्त टेलिफोनिक मुलाखतीनं सिलेक्ट करण्यात फसवणुकीचा धोका असतो. खरा उमेदवार वेगळा आणि फोनवर मुलाखत देणारा वेगळा अशी उदाहरणं बघितली आहेत>>>>>

१००% पटलं... इथेच कुठेतरी वाचलं होतं, एका कथेत.

माझ्या मते आणि अनुभवा नुसार ज्यां उमेदवारांना शिकलेला विषय नीट समजलेला असतो त्यांच्यात आत्मविश्वास वेगळा / मुद्दाम आणावा लागतच नाही. तो आपोआप येतो, अगदी इंग्रजी मधून विषय मांडण्या इतका देखील, <<
+१०००

नंदिनी, योग, इब्लिस आणि हर्पेन. पोस्ट आवडल्या पटल्या.

विषयाची उत्तम समज आणि आपला विषय/ मुद्दा समोरच्या पर्यंत पोचवता येण्याची क्षमता हे आणि हेच सगळ्यात महत्वाचे आहे. अश्या ठिकाणी इंग्रजी जुजबी येत असेल तरी चालण्यासारखे आहे. त्याचा बाऊ करण्याची गरज वाटत नाही.

पण आपली शिक्षणपद्धती विषयाची समज खरंच देते की विषयाचे पाठांतर अपेक्षित धरते?
१२ वी पर्यंतचा अभ्यास पाह्यला तर विषयाची समज यापेक्षा पाठांतर क्षमतेला जास्त गुणवत्ता मानले जाते असा माझा तरी अनुभव आहे. तेव्हाचे बेसिक गणित व शास्त्राचे समजलेले फंडे आज इतक्या वर्षांच्या नंतरही, आता काडीचाही संबंध उरलेला नसला तरी डोक्यात शाबूत आहेत. म्हणजे विषय समजलेला होता असे म्हणायला हरकत नाही. पण त्यापलिकडे जाऊन पाठांतर ह्या गोष्टीचा पेशन्स नव्हता त्यामुळे मार्क्स कधीच कुठल्याही झॉलिंग अ‍ॅडमिशनला उपयोगी पडण्यासारखे नव्हते. पण असेही मित्रमैत्रिणी होते की ज्यांना विषय समजलेला नव्हता पण घोकंपट्टी मात्र जबरदस्त चालायची. तेव्हा त्यांना मिळाल्या झॉलिंग अ‍ॅडमिशन्स. नंतर त्यांचे पुढे काय झाले कल्पना नाही. असो...

त्याहीपलिकडे जाऊन.. घोकंपट्टी आधारीत शिक्षणपद्धतीमुळे मुलांना मास्टर्स डिग्रीला आल्यावरही विषय किंवा फंडा समजून घ्यायचा असतो हे माहित नसते याचा गेले अकरा वर्ष अनुभव घेते आहे.

विषय भरकटला क्षमस्व.

http://www.youtube.com/watch?v=xw509aO6Vvo
http://www.youtube.com/watch?v=KerhBD_Wwog
http://www.youtube.com/watch?v=ubtd5oU7ORI

याबाबतीत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी श्री. विश्वास नांगरे पाटील यांची ही भाषणं फार उद्बोधक आहेत.

आत्ताच थोड्या वेळापूर्वी रेडिओ- मुंबई मराठी अस्मिता वाहिनीवर (किंवा पुणे रेडिओ स्टेशनवर) अविनाश धर्माधिकारी सरांनी इंग्रजी आणि मराठीतलं संवादकौशल्य, इंग्रजी शिकायच्या सोप्या पद्धती यावर फार सुरेख माहिती दिली. आधी खूप ऐका, मग बघा, मग बोला, मग लिहा- व्यक्त करा.

चुका प्रत्येक पायरीवर होतील तर त्या होऊदेत. ऐकल्यावर अर्थ कळायला, वाचल्यावर समजायला वेळ लगू शकतो. सिनेमा, सिरियल्स, इंग्रजी न्यूज बघताना अ‍ॅक्सेंट्सची अडचण आली तरी चालेल, पण प्रयत्न सतत आणि जीव ओतून करायचा हे मात्र नक्की. रोज जर २ तास संपूर्णपणे लक्ष देऊन असा अभ्यास केला तर ३५ दिवसांत चांगलं इंग्रजी येऊ शकेल असं त्यांचं म्हणणं. पुढे शब्दसंग्रह आणि सराव वाढवणं आपल्या हातात.

सुरूवातीला जे आपण बघू, ऐकू, वाचो ते इंग्रजीत नसेल तर लगेच जमेल तसं भाषांतरित करायचं. मग सिनेमाची गोष्ट असेल, पेपरातली बातमी असेल, जाहिराती असतील.... काहीही.

एकूणच कार्यक्रम छान होता. पुन्हा माहिती समजली तर प्रक्षेपणची वेळ इथे लिहीन. पण बहुतेक सकाळी साडेनऊला युवावाणी मधे होतं.

त्याहीपलिकडे जाऊन.. घोकंपट्टी आधारीत शिक्षणपद्धतीमुळे मुलांना मास्टर्स डिग्रीला आल्यावरही विषय किंवा फंडा समजून घ्यायचा असतो हे माहित नसते याचा गेले अकरा वर्ष अनुभव घेते आहे.

विषय भरकटला क्षमस्व.<<<

मला या प्रतिसादामुळे विषय भरकटला असे वाटत नाही आहे.

शिक्षणपद्धती
संधींची उपलब्धता
शहरी व ग्रामीण एक्स्पोजरमधील फरकामुळे पडणारी दरी
भाषा

हे व असेक अनेक विषय या चर्चेत आपोआप निघणार व निघत राहणार. दुर्दैवाने, मी बहुतेक लेख अचूक विषयांबाबत लिहू शकलो नाही असे वाटते व त्यामुळे अनेक विषयांना नुसताच स्पर्श झाला व ते विषय चर्चेत 'ट्रिगर' होऊ लागले / होत राहिले.

'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' हा मुद्दा चर्चेत निघेल असे मला कालपरवाच वाटलेले होते. तसा तो निघालाही!

योग - तुमचे म्हणणे पटत नाही असे म्हणायचे नव्हते. पण मुद्दा फक्त मुलाखत, निकष व आवश्यकता इतपतच मर्यादीत ठेवावा असे मला वाटत नाही. कदाचित या खालील यादीद्वारे मला अधिक अचूकपणे जे म्हणायचे ते म्हणता येईल.

१. इंग्रजी किंवा एखाद्या भाषेवरील प्रभुत्व हे शिक्षणपद्धतीतील 'इंटिग्रल पार्ट' का नसावे?
२. संवादकौशल्य असणे (मातृभाषेतील किंवा परभाषेतील) आणि बुजलेपण नसणे याची काळजी शहरी व ग्रामीण अश्या दोन्ही भागांमध्ये समसमान प्रमाणात का घेतली जात नसावी?
३. मातृभाषेत संवाद करूनही काम करता येईल अश्या संधी आपल्याकडे कमी का असाव्यात किंवा कमी पगाराच्या / उत्पन्नाच्या का असाव्यात?
४. ज्या नोकरीसाठी परभाषेतील संवाद कौशल्य हा एक निकष आहे अश्या नोकरीसाठी झुंबड उडावी अश्याच प्रकारचे आपले शैक्षणिक सिलॅबस का असावे वगैरे!

धन्यवाद!

Pages