एन आय आय टी या संस्थेत मी गेले तीनएक महिने काम करत आहे. आय टी क्षेत्रात नोकरी मिळण्यासाठी आवश्यक असे लहानमोठे कोर्सेस या संस्थेत असतात हे बहुश्रुत आहे. याच कामाचा एक भाग म्हणून नुकतेच एक जॉब फेअर आयोजीत करण्यात आले होते, ज्यात अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी आपापले अधिकारी पाठवले होते व अडीच हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांनी तेथे मुलाखती दिल्या. संपूर्ण कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणावर, अतिशय प्रभावी व उत्तम झाला. मी उपस्थित असलेल्या मजल्यावर एका कंपनीच्या मुलाखतीसाठी इतकी गर्दी उसळली की मी त्या कंपनीच्या अधिकार्यांना 'काही मुलाखती मीच घेऊन आपणास मदत करू का' असे विचारले. मला परवानगी मिळाली व इंग्रजी संवादकौशल्य या सदरातील काही मुलाखती मी घेतल्या. त्या घेत असताना मला आलेला अनुभव येथे मायबोलीकरांना सांगावासा वाटत होता. तो अनुभव मनाला भिडला व बोचलाही.
================
आलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांशी विद्यार्थी पुणे, मुंबई, नाशिक व औरंगाबाद येथील रहिवासी होते. मात्र साधारण तीस टक्के विद्यार्थी हे बुलढाणा, सातारा, सांगली, अकोला, अमरावती, परभणी, लातुर अश्या ठिकाणांहून आलेले होते. हे किंचित अर्धविकसित विभागातील विद्यार्थी नुसते पाहूनही ओळखता येत होते. त्यांची मुलाखतीसाठी योग्य असे कपडे परिधान करण्याची जाण व आर्थिक क्षमता कमी असल्याचे लांबूनच जाणवत होते. या शिवाय चेहर्यावर एक प्रकारचे बुजलेपण होते. का कोणास ठाऊक, पण उगाचच एक लाचारीही होती व हा मला झालेला 'भास' नक्कीच नव्हे. दाढीचे खुंट वाढलेले विद्यार्थी व कॅज्युअल वेअरमध्ये असलेल्या विद्यार्थिनी तर प्रगत शहरातूनही आलेल्या होत्या, पण या अर्धविकसित भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा पोषाख, अॅक्सेसरीज, हेअर स्टाईल हे सर्वच तुलनेने 'साधेपणाचे' होते, 'स्वस्त' नव्हते.
यांच्यापैकी कोणाचा नंबर आला की त्यांची मुलाखत मी घेऊ लागायचो. तेव्हा जाणवायचे की त्यांच्या उभे राहण्यातही एक प्रकारची अजीजी होती. वरवर वाचायला हे खरंच भास वाटू शकतील, तेव्हा ज्या वाचकांना माझ्या गृहितकांबाबतच शंका आहे त्यांच्या मताचा आदर आहेच. पण निदान मी तरी प्रामाणिकपणे जे जाणवले ते लिहीत आहे. अर्थातच अश्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व खूपच कमी होते. त्याला 'प्रभुत्व' म्हणता येणारच नाही. ठराविक काही वाक्ये ते अगदी सलगपणे उच्चारू शकत होते याचा अर्थ तितकीच वाक्ये ते पाठ करून आलेले असावेत. त्या सर्वांच्या डोळ्यात 'नुसते माझ्या सहीवर बरेच काही अवलंबून असल्यासारखे' भाव होते. काहीजणांना तर मुलाखत केव्हा एकदा संपते आणि केव्हा एकदा आपण 'नेहमीप्रमाणे' रिजेक्ट होऊन येथून बाहेर पडतो असे झालेले असावे. यालाही कारण होते ते म्हणजे आजूबाजूला विकसित शहरांमधील जे विद्यार्थी वावरत होते त्यांच्या आत्मविश्वासयुक्त देहबोलीसमोर आपला निभाव लागणे शक्यच नाही याची या विद्यार्थ्यांना केव्हाच जाणीव झालेली होती.
यातील अनेकांना वडील नव्हते, अनेकांचे वडील शेतकरी होते किंवा गॅरेजवर कामाला होते. अनेकांनी निव्वळ नोकरीसाठी पुण्याचा रस्ता धरलेला होता पण पुण्यात वावरण्याचा आत्मविश्वास मात्र त्यांच्यापासून खूपच दूर होता. अनेकांवर लहान भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी होती. जवळपास सर्वांनीच 'छंद' या सदरात 'लिसनिंग टू म्यूझिक' आणि 'रीडिंग' असे लिहिलेले होते. मात्र कोणते म्यूझिक आणि कसले रीडिंग याची उत्तरे त्यांना देता येत नव्हती.
दुसर्या बाजूला फाडफाड बोलणारी मुले मुली एकमेकांना खाणाखुण करून हासत होती. त्यांचे पेहराव ग्रामीण युवक - युवतींना बावचळवणारे होते. त्यांचा वावर 'अॅट होम' होता. मुख्य म्हणजे 'नोकरी' ही त्यांची 'त्वरीत असलेली गरज' नव्हतीच, हे मला संभाषणातून सहज समजत होते.
एकुण वाईट वाटले.
संधी उपलब्ध असण्यात दरी होती. संधी उपलब्ध झाल्यानंतर आत्मविश्वासाच्या प्रमाणात तफावत होती. नोकरीची आवश्यकता ज्याला अधिक होती तो रिजेक्ट केला जात होता. ज्याला ती गरज कमी होती त्याला मुलाखतीच्या पुढच्या पायरीसाठी पाचारण करण्यात येत होते.
बिचार्या ग्रामीण विभागातील मुलांच्या डोळ्यात स्वप्ने दिसत होती. 'दोन तीन मिनिटे तर यांच्याशी बोलायचे, यांनी पास केले की मग थेट टेक्निकल मुलाखत, ज्यात आपण नक्की पास होऊ' अशी आशा दिसत होती. पण मला माहीत असलेल्या निकषांनुसार त्यांचे संवादकौशल्य तपासताना त्यांना रिजेक्ट करावे लागणे हे माझे तत्क्षणी कर्तव्य होते. एका वर्तुळात 'आर' लिहून त्यांचा बायोडेटा गठ्ठ्यात मागे सरकवताना आणि त्यांना 'ऑल द बेस्ट' असे 'खोटेच' हसून म्हणताना माझ्यातील कोणीतरी एक स्वतःच निराश होत चालला होता. चेहर्यावर व्यावसायिकतेचा मुखवटा मिरवणे भाग होते. मी त्यांना 'ओके, झाली मुलाखत' असे सांगितल्यावर ती मुले अजीजीने मान तुकवून 'थँक यू' म्हणून निघताना आशेने क्षणभर माझ्या डोळ्यांशी डोळे भिडवत होती. जणू त्यांना म्हणायचे असावे की 'आम्हाला फक्त हा इंग्लिशचाच एक प्रॉब्लेम आहे, तेवढा कराल ना दुर्लक्षित'!
आईच्ची जय त्या शिक्षणाच्या आणि विषमतेच्या! माझ्या मनावर गेले दोन दिवस जो परिणाम झाला तो कोणाला धड सांगताही येत नव्हता, माझीच थट्टा व्हायची असे वाटून! शेवटी मी माझ्या जगात पोचलो आणि प्रगत शहराचा एक भाग होऊन कंफर्टेबल झालो. आता असे वाटते साले आपल्याला देवाने इतके नशीबवान बनवले पण आपण त्या नशिबवान आयुष्याचे काय मातेरे करत आहोत?
माफ करा, विचार प्रकट करताना वाहवत गेलो, पण नेहमीप्रमाणेच हा लेखही जसा सुचला तसा एका बैठकीतच लिहून मोकळा झाल्याचे समाधान मनाला आहे.
-'बेफिकीर'!
।म्म्म् ह्म्म्म्म्म्मंम्म....
।म्म्म्
ह्म्म्म्म्म्मंम्म.......विचार प्रवर्तक लेख.....
काय लिहावे हा विचार करतोय ...
लेखाशी सहमत ! बहुतांशी
लेखाशी सहमत !
बहुतांशी ग्रामीण भागातील विद्यार्थी हे मराठी माध्यमातून शालेय शिक्षण पूर्ण केलेले असतात.
एक स्वानुभव... कुठल्याही इंग्लिश मेडीयम स्कूलमधे शिक्षकांच्या पदासाठी साधा अर्ज दाखल करताना जर शालेय शिक्षण 'व्हरनॅक्यूलर लँगवेजमधे' झालेले असेल तर तो अर्जदार अपात्र ठरवला जातो.
त्याचे पुढील शिक्षण, पात्रता काही काहीही मुळीच लक्षात न घेता
आणि हो ! अशा अनुभवी अर्जदाराला मात्र प्राधान्य असतं . ( नोकरी मिळाली तर अनुभव मिळेल ना पण ? )
असो !
-सुप्रिया.
अतिशय प्रामाणिक लेख. ग्रामीण
अतिशय प्रामाणिक लेख.
ग्रामीण भागातच जडणघडण झालेली असल्यामुळे त्या मुलांमधे मला माझ्यातलाच कुणीतरी दिसला. ह्याबाबत काही गोष्टी मांडतो,
१. बहुतांशी ग्रामीण विद्यार्थ्यांची कुठलेही कोर्सेस करण्यामागची भावना ही आपल्याला नोकरी मिळाली की हलाखी सरेल अशी असते. त्यामुळे अनेक ठिकाणी अपयश आल्यानंतरही असे कोर्सेस ते करत रहातात.
२. जे मुळातच मेरीटमधले ग्रामीण विद्यार्थी असतात ते इंग्रजीवर प्रभुत्व म्हणविण्याइतपत "प्रभुत्व" एका विशिष्ट कालावधीनंतर मिळवितातच. शिवाय त्यांना आत्मविश्वास असतो की त्यांच्या बौद्धिक हुशारीच्या बळावर ते नक्की पुढे जातीलच. लेखात उल्लेखलेले विद्यार्थी हे मेरीटच्या(अॅकेडेमिक्समधल्या) दृष्टीने मागे असणारे असावेत असा एक अंदाज आहे.
३. योग्य त्या वेळी योग्य ते मार्गदर्शन न मिळणे ही सर्वात मोठी ग्रामीण भागात रहाण्यातली अनुपलब्धि आहे असे मला वाटते. आई वडील शेती करून दोनवेळ सुखाने खाण्यासाठी झटत असताना तिथल्या मुलांना स्वतःलाच स्वतःचे मार्गदर्शक व्हावे लागते हा अनुभव आहे.
४. माझे काही क्लासमेट्स जे माझ्याबरोबर इंजिनिअर झाले परंतू नोकरी निमित्ताने अजूनही ग्रामीण भागातच आहेत त्यांना आजही इंग्रजी बोलता किंवा लिहीता येत नाही हे सत्य आहे. कसे बोलावे हे त्यांना सभोवतालच्या परीस्थितीतून शिकताच येत नाहीये. ह्याशिवाय वाचनही नाही त्यामुळे आत्मविश्वासही नाहीये.
धन्यवाद!
ह्म्म ... सोचतोय....
ह्म्म ... सोचतोय.... सोचतोय.... सोचतोय.... सोचतोय.... काहिच सुचत नाहिये..... कठिण आहे हे नक्की .....
सहमत! मीही थोडीफार याच
सहमत! मीही थोडीफार याच स्थितीतुन गेली आहे.. इंटरव्ह्यु तर माझ्याच गावातल्या कॉलेजमधे झाला होता त्यामुळे आजुबाजुचं पब्लिक ओळ्खीच होत.. तेव्हा काही प्रॉब्लेम वाट्ला नाही
पण जेव्हा ट्रेनिंगसाठी म्हैसुरला गेले तेव्हा देशभरातुन आलेली मुलं आरामात हिंदी, इंग्रजी बोलत.. मला तर हिंदी इतकं बोलायचा कधी प्रश्नच नाही आला...तोपर्यंत कोल्हापुर-कराड सेपरेट ग्रुप होता.. मग हळुहळु क्लासमधे बाकी लोक आजुबाजुला बसली तेव्हा जमलंच ..:-)
सध्या अशी जे ज्युनियर / भावाची मित्रमंड्ळी येतात त्यांना थोडी कल्पना देणे, इंग्लीशमधे बोलणे असा प्रयत्न करते.. गावी पण असा एक रविवारी क्लास सुरु आहे..
विदिपा...नेमका प्रतिसाद!
इंग्रजी चांगल बोलता न येण
इंग्रजी चांगल बोलता न येण एखाद्या भारतीयाच्या रोजगार मिळण्याच्या आड याव हे खरोखरच दुर्दैवी आहे.
ह्म्म! विचार करतेय. याबाबत
ह्म्म!
विचार करतेय. याबाबत काय करता येइल?
बेफी, हे जॉब फेअर एन आय आय टीत कोर्स करणार्या मुलांसाठी होते का? तसे असल्यास संस्थेने या मुलांना मॉक इंटरव्यू वगैरे करुन थोडेफार तयार केले असते तर काही फरक पडू शकला असता. खरे तर अगदी सीव्ही लिहिण्यापासून, फर्म हॅन्डशेक, संभाषण कपडे वगैरे प्रत्येक पायरीवर मदतीची, मार्गदर्शनाची गरज असते. परीक्षेला जाताना जसे आपला अभ्यास झालाय या जाणीवेतून आत्मविश्वासाने पेपर लिह्णे होते तसेच या बाबतीत आपण छान सराव केलाय, सगळे नीट जमतेय हा आत्मविश्वास या मुलांना आला तर नक्कीच फरक पडेल.
कपड्यांच्या बाबतीत नुसते मार्गदर्शन पुरेसे नसते. त्या जोडीला इंटरव्यूला योग्य कपडे माफक भाडे देऊन का होइना, पण मिळू शकले तर त्यानेही फरक पडतो.
Dress for Success यासारखे काहीतरी ग्रामिण भागातील मुलांसाठी आधार म्हणून उपलब्ध झाले तर विकसित आणि अर्धविकसित भागातील मुलांमधील दरी मिटवायला मदत होईल.
बेफिकीर लेख आवडला. अगदी असाच
बेफिकीर लेख आवडला.
अगदी असाच अनुभव मेडिकल शिक्षणाच्या वेळी घेतला आहे.
मात्रं आम्हाला फक्तं विषयासंबंधीच बोलावं लागत असल्याने विषय पक्का असला तर भाषेचा इतका प्रॉब्लेम येत नसे.
म्हणूनच तुम्ही जो अर्धमागास भाग म्हटलाय त्यातले हुषार विद्यार्थीही वायवा उत्तम होऊन एम डी ,डी एम. होऊ शकले.
याउलट इंजीनिअरींग आणि तत्सम क्षेत्रात प्रभावी ब्यक्तीमत्त्व आणि इंग्रजीवर प्रभुत्त्व गरजेचे आहे.
गावोगाव फाडफाड इंग्लिश शिककवणारे स्पोकन इंग्लिशचे क्लासेस निघालेत पण त्यांच्यात शिकवणारेही महान असतात.
मूळात तुम्ही वर्णिलेली नोकरी मिळालीच पाहिजे ही अजिजी ज्या सामाजिक विषमतेने निर्माण झालीय ती विषमता नष्ट व्हायला हवी.
आजकाल मुलांना फाडफाड इंग्रजी यावे म्हणून वर्नाक्युलर शाळांतही पहिलीपासून इंग्रजी सुरू झालीय.
पण शिक्षकांनाच बेसिक उच्चार ठाऊक नाहीत मग मुले काय शिकणार?
आमच्या मुलांच्या शाळेत 'वन्न बाय केम्म रन्निंग' असे काहीसे कानडीमिश्रित उच्चार शिकवतात .
उद्या ही मुले पुण्या मुंबईच्या मुलांसमोर ग्रूप डिस्कशन मध्ये मागेच पडणार.
तुम्ही म्हणतायत तसे डोळ्यातले
तुम्ही म्हणतायत तसे डोळ्यातले भाव खूप वेळा खूप ठीकाणी पाहिलेयत. खूप वाईट वाटते अशा विद्यार्थ्यांबद्दल. पण जेव्हा या सगळ्यामधूनही ते जेव्हा धडपड करत शहरांमध्ये नोकरी आणि व्यवसायासाठी स्थिरावयाचा प्रयत्न करतात, ते बघून खरच थक्क व्हायला होते.
माझ्या लॉ कॉलेज मधले कितीतरी विद्यार्थी ग्रामीण भागातून आले होते. इंग्रजी जवळपास यायचे नाही. तरीसुद्धा वायवा, मूट कोर्ट मध्ये केस प्रेझेंट करण्यासाठी इकडून तिकडून धडपड करून जास्त कष्ट घेउन, ते परीक्षा उत्तीर्ण व्हायचे. भलेही या विद्यार्थ्यांना कँपस मधून मोठमोठ्या लॉ फर्म्स मध्ये नोकर्या नसतील मिळालेल्या, तरीही हे व्यवसायात/ कोर्ट प्रॅक्टिसमध्ये बाकिच्यांपेक्षा जास्त लवकर रुळले, कारण आपल्या डिस्ट्रिक्ट कोर्टात मराठीत काम चालते, जिथे मग बाकीच्यांना स्ट्रगल करावा लागतो किंवा मग हे बाकीचे हे मराठीत लिहीले आहे मला वाचता येत नाही म्हणून सरळ हात वर करतात!
स्वाती२ यांनी संगितलेल्या सोयी जर आपल्या इथे मिळाल्या, तर बर्याच विद्यार्थ्यांना मदत होइल. ग्रुमिंग सर्वच विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.
इन्टरेस्टिंग ऑनेस्ट
इन्टरेस्टिंग ऑनेस्ट ऑब्झर्वेशन.
डिड यु कन्टेम्प्लेट अबाऊट सोल्यूशन्स टु द सिच्युएशन?
अवांतरः अशा दरीच्या 'असण्या'मुळेच आरक्षण नामक प्रकार समर्थनिय ठरावा का?
इंग्रजी संवादकौशल्य या
इंग्रजी संवादकौशल्य या सदरातील काही मुलाखती मी घेतल्या >> हे आता नविन निघाले आहे का? १२-१३ वर्षांपुर्वि असे नव्हते काहि.
इथे नॉर्थ अमेरिकेत आणि युरोपात सुद्धा कामानिमित्त बर्याच भारतिय कंपन्यांच्या कंन्सल्टंट बरोबर काम करायला मिळाले आणि अजुनहि मिळते. पण सगळेच काहि इंग्रजी मधे अगदि फ्ल्युएंट नव्हते. खरेतर मी बर्याच दक्शिणभारतिय लोकांबरोबर जास्त काम केले आहे. ७५% लोकांचे इंग्रजी संवादकौशल्य चांगले नसेल , पण टेक्निकली त्यांचा हात धरणारे कोणिहि नव्हते.अगदि अमेरिकन माणसाने २ आठवडे लागतिल म्हणुन सांगितलेलि कामे त्यांनि २-३ तासात केले आहेत..
पण फक्त भारतिय कंन्सल्टंटच नव्हे तर इथे हि आयटिमधे काम करणारे बरेच भारतिय/चायनिज लोक कंपन्यांमधे आहेत कारण त्यांच्या टेक्निकल स्किल्समुळे असे मला वाटते. मी माझ्या टिम मधे जेंव्हा हायर करते तेंव्हा मी जॉबची गरज काय आहे हे बघते. मला तरि असे वाटते इंग्रजी संवादकौशल्य जॉब काय आहे यावर अवलंबुन असावे.
खूप छान केलत शेअर करून. सर्व
खूप छान केलत शेअर करून. सर्व थरात मिसळण्याचे जे काही पायदे असतात त्यातला हा एक. नेटवर जितं जितं च्या अभिनिवेशात पोस्टी टाकणं वेगळं आणि अशा अनुभवातून परिस्थितीचं अवलोकन, आकलन करणं वेगळं. एक लेखक म्हणून आवश्यक असलेल्या संवेदनशीलतेने आजूबाजूला पहायला हवं जे नेमकं इथे केलं गेलंय. यातल्या नायकाने म्हटल्याप्रमाणे तो हेल्पलेस आहे, पण त्याला झालेली जाणीव त्याला हे सर्व शेअर करायला भाग पाडतेय. बस्स्स.. . हेच नेटवर सांगून दमलो. पण अनुभवासारखा गुरू नाही. इतर अनेकांनी कोषातून बाहेर येऊन आपल्या देशाचं खरं खुरं अवलोकन केलं तर पोकळ देशप्रेमाच्या गप्पा कमी होऊन नेटवरचं ट्रॅफिक थोडं कमी होण्यास मदत होईल.
( आता लॉगीन केल्यावर एक एकदमच होपलेस धागा पाहीला आणि त्यानंतर हा धागा. या धाग्याबद्दल तुमचं करावं तितकं कौतुक थोडं आहे. धन्यवाद)
आरक्षणाचा काय संबंध इथे? जर
आरक्षणाचा काय संबंध इथे? जर तुम्ही नोकरी मिळनायला लायक असाल तर मिळेल! केवळ तुम्हाला गरज आहेहया कारणाने नोकरी मिळत नसते. एम्प्लॉयर ला जे हवे ते तुमच्यात आहे का हाच क्रायटेरिआ असतो.
ग्रामीण, अर्धविकसित भागातलेही हजारो लोक आज आयटीत यशस्वी असतीलच. मी तरी कित्येक पाहिलेत.
फार तर त्यांना आधी लहान कंपन्यात सुरुवात करून मग मोठ्या कंपनीत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. पण पात्रता अन क्षमता असेल तर मिळेलच कुठे ना कुठे नोकरी. मात्र केवळ आयटीत जास्त पगार आहेत म्हणून अॅप्टिट्युड नसताना उगीच रट्टा मारल्यासारखे काहीतरी कोर्सेस करून फक्त त्या सर्टिफिकेटाच्या जोरावर नोकरी मिळणे शक्य नाहीच.
फक्त इंग्रजीचा अत्मविश्वास कमी असेल तर वर स्वातीने म्हटलेय तसे, एन आय आय टीने आधी तयारी करून घ्यायला हवी होती, इतर तशाच संस्था, जसे सिडॅक वगैरे आपल्या कोर्स बरोबर पर्सनॅलिटी डेवलपमेन्ट आणि इन्टरव्यू टेक्निक्स, ग्रुप डिस्कशन अशी तयरी करून घेतात.
बेफिकीर, तुमचं निरिक्षण खरं
बेफिकीर, तुमचं निरिक्षण खरं आहे.
सुप्रियांनी लिहिल्याप्रमाणे इंग्रजीत कच खाण्याचं एक कारण मराठीमाध्यमातून झालेलं शिक्षण आणि शिक्षण संपल्यावर त्यापुढच्या जगात वावरण्यासाठी जे काही लागतं त्यासंबंधीची जाण, मार्गदर्शन यांचा अभाव. माझ्या मताप्रमाणे कॉलेजच्या प्रोफेसरांनी हे मनावर घ्यायला पाहिजे (स्वप्नरंजन?). या भागातल्या बहुतांश उमेदवारांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत एखादा तासभर पूर्णवेळ इंग्रजीच काय हिंदीतूनही बोलण्याची गरज भासत नाही. त्यामुळे या भाषांत संभाषणकौशल्य कसे विकसित होणार? जोपर्यंत यासाठीचे योग्य मार्गदर्शन सहज उपलब्ध होत नाही तोपर्यंत अशा उमेदवारांची संख्या जास्तच असणार. हे वास्तव आहे. चेहर्यावर अजीजी/लाचारी दिसते कारण समोरच्या आव्हानाची नेमकी व्याप्ती किती आहे, ते झेलण्यासाठी काय आणि कशी तयारी करायची यासंबंधी विचार करून तशी वाटचाल करण्याऐवजी त्याचा बाऊच केला जातो. मग अशा अनुत्तीर्ण मुलाखतीतून टप्पेटोमणे खात पुढे जाणे आणि शिकणे याला पर्याय नाही.
बेफिकीर लेख आणि प्रामाणिकपणा
बेफिकीर लेख आणि प्रामाणिकपणा आवडला.
स्वाती२ ह्यांच्याशी सहमत , अशा मुलांची तयारी करुन घ्यायला हवी , अशी शिबिरं आयोजीत करणं खुप गरजेचं अर्थात ह्यासाठी तळमळ , आर्थीक बळ जमलचं तर सरकारी मदत मिळणं गरजेचं आहे.
श्री + 1000
श्री + 1000
चेहर्यावरची अजीजी लाचारी हे
चेहर्यावरची अजीजी लाचारी हे मनातले भाव मीही नोकरीसाठीच्या मुलाखती वेळी अनेकांपुढे अजाणतेपणी एक्स्पोज केलेत त्यामुळे लगेच डोळ्यापुढे आले
>>>>भावना वेगळ्या चेहरा वेगळा हीच आहे यशाची खरी पायरी<<<< हा शेर आठवल्यावाचून राहिला नाही
मुळात गावाकड्चे आहोत इंग्रजी कमी येते आपल्याला ...समोरचे आपल्यापेक्षा प्रगत आहेत हे सगळे ऐकीव माहीतीवरून आपण ठरवतो व घाबरून असतो ...ऐन्वेळी बिथरतो ...मुळात आपले इंग्रजी तसेही कच्चे वगैरे नसते
वापर कमी असतो आपला व वावरही त्यामुळे असे होते
कर्मचारीनिवड करणार्या मध्ये मॅनेजमेंट व ह्यूमन रीसोर्सवाले लोक काम जास्त पाहतात (त्याना टेक्निकल बाबी माहीत नसतात भावनिक बाजूशी इतिकर्तव्य नसते ..ते लोक संभाषण कौशल्य वागणूक ..व्यक्तिमत्त्व विकास असल्या बाबीना जरा गरजेपेक्षा जास्त महत्त्व देतात असे मला अनुभवास आले आहे मुळात ते लोक जे निकष पाळातात तेही पुस्तकी ज्ञानाशी संबंध तपासून पाहणारे वहिवाटीचे फालतू नियम आहेत त्याचा कामाचा अनुभव व कामाच्या दर्जातील सुधारणा याच्याशी काही संबंध नाही
तसेही ह्या लोकाना कसे टॅकल करायचे याचे मात्र रीतसर प्रशिक्षण वगैरे असेल तर फायदा होतो हे नक्की
सर्वात महत्त्वाचे वाजवी आत्मविश्वास !!!..... गझलेचे तंत्र जसे शिकवता येते मंत्र नाही असे म्हणतात तसेच आहे हे आत्मविश्वास हे प्रकरण आहे ....जरासा बेरकी व निगरगट्ट बेदरकार असा तो असला की नोकरी मिळते मुलाखतीत पास होता येते असा माझा अनुभव आहे
असो
उपयुक्त लेख !! प्रतिसादही उपयुक्तच सर्वांचे आभार !!!
बाकी बेफीजी मुळात तुम्ही तसले "एच आर" वाले नसल्याने व असताना कविमनाचे असल्याने तुम्हाला ही संवेदना चिकटली असावी बाकी त्या व्यवसायातले मुरलेले लोक अगदी दगडी मनाने ही कामे करत असतात
(या भावभूमीवर तुमचा एखादा शेर वाचायला व्यक्तिशः मला खूप आवडेल शेरातून व्यक्त झाल्यावर तुमच्या मनाचा जो दाह /घालमेल होतेय तीही कमी होईल अशीही खात्री वाटते )
आपला नम्र
~वैवकु
इंग्रजीवर प्रभुत्व अन ते
इंग्रजीवर प्रभुत्व अन ते नसल्यास न्यूनगंड.. आपल्या कॉलोनियल भूतकाळातून उगवलेला वर्तमानकाळ.चांगले लिहिले आहे पण वाईट वाटते हे सर्व वाचून. या मुलांना थोड्या समुपदेशनाची, मार्गदर्शनाची गरज आहे , एवढे काही कमी नसते त्यांच्यात.आपण मराठी माणसे जरा जास्तच पड खातो की काय.. गुजराथी लोक रेटून अत्यंत चुकीचे इंग्लिश अत्यंत आत्मविश्वासाने बोलताना पाहिले आहेत. शिवाय एक कम्युनिटी म्हणून ते एकमेकांना सांभाळूनही फार घेतात.
आवडला लेख व त्यामागचा विचार.
आवडला लेख व त्यामागचा विचार. आपल्याकडे इंग्रजी संभाषण, रोजच्या प्रोफेशनल वागण्यातले मॅनर्स ई. शिकवणार्यांची (फिनिशिंग स्कूल?) प्रचंड गरज आहे, विशेषतः मराठी माध्यमातून येणार्या मुलामुलींसाठी.
विशेष म्हणजे फाड फाड इंग्रजी फेकणार्या बर्याच मुलामुलींचे इंग्रजी (व मराठीही) अत्यंत भिकार असते. त्यांना फक्त कोठे काय बोलायचे व काय स्पेसिफिक शब्द वापरायचा याचे ज्ञान सवयीने, अ-मराठी लोकांत वावरल्याने झालेले असते. त्यापुढचे त्यांचे ज्ञान अत्यंत पोकळ असते.
पुलंच्या भाषेत सांगायचे अर "फोर कप्स ऑफ टी अॅण्ड बिस्कुट्स" हे आधी अर्धा तास काय म्हणायचे ते न कळाल्यावर नंतर घाबरत घाबरत सांगण्यापेक्षा वेटर कडे थेट पाहून "फोर टीज" हे सांगता येणे एवढ्यापर्यंतच हे स्किल बहुधा असते
पण हाच आत्मविश्वास भारतातच नव्हे तर जगात अनेक दारे खुली करतो!
वाईट वाटलं. >>फाड फाड इंग्रजी
वाईट वाटलं.
>>फाड फाड इंग्रजी फेकणार्या बर्याच मुलामुलींचे इंग्रजी (व मराठीही) अत्यंत भिकार असते. त्यांना फक्त कोठे काय बोलायचे व काय स्पेसिफिक शब्द वापरायचा याचे ज्ञान सवयीने, अ-मराठी लोकांत वावरल्याने झालेले असते.
अगदी अगदी! 'वन ऑफ माय फ्रेंड' आणि 'डिड यु वेंट' सारख्या चुका फक्त फाडफाडमुळे खपून जातात.
इंग्रजी संभाषणाचं ज्ञान मिळवण्याची संधी आणि न मिळताही 'माझं ज्ञान मला बोलता येणार्या भाषेत व्यवस्थीत प्रगट करता येतं' हा आत्मविश्वास महत्त्वाचा हे कळतं. तो समजून घेऊन नोकरीची संधी देता येणारं वातावरण असायला हवं हा आशावाद भाबडा म्हणायचा का?
अमेरिकेत युनिव्हर्सिटीमधे पोस्ट डॉक करायला येणार्या जपानी, चिनी आणि रशियन शास्त्रज्ञांकडे बघून हे 'आत्मविश्वास' प्रकरण फारच पटायला लागलं. बरेच फाडफाड नुस्तेच बोलण्यातून छाप पाडू शकणारे निघाले.
भाषेचा वापर करायची संधी
भाषेचा वापर करायची संधी मिळाली की आपोआप चुकत माकत आत्मविश्वास येतो पण खेडेगावी, किंवा अगदी पुण्यातसुद्धा इंग्रजी भाषा वापराची संधी मिळत नाही. मग भाषेचा वापर कसा वाढणार? आणि मग आत्मविश्वास तरी कसा वाढणार ? हुशार मुलांना कसेतरी ज्ञानाच्या जोरावर ह्या भाषेच्या संकटातून बाहेर पडता येते व त्यांच्या कामामधली हुशारी दाखवता येते. व हळूहळू वापर वाढल्यानंतर इंग्रजीतही पारंगत होता येते. परंतु अभ्यासात यथातथा मुलांना अगदी रिसेप्शनीस्ट्चे काम असेल तरी मग इंग्रजी न येण्याचा फटका बसतो आणी मठ्ठ पण चांगले इंग्रजीवाली मुले त्यांच्या नोकर्या घेउन जातात.
ह्यासाठी एखादी इंग्रजीसाठी वेबसाईट केली तर किंवा असली तर? जिथे वेगळेवेगळ्या आजूबाजूच्या विषयांवर चर्चा असतील ज्या ऐकता येतील. तिथे असलेले प्रश्नांची उत्तरे ऑडिओ रेकॉर्डींग करून ही मुले पाठवू शकतील व नंतर एक्स्पर्ट्स त्यांना एमेल्/फोनवर मार्गदर्शन करू शकतील. त्या मुलांनाही अनेक अशा मुलांशी फोनवर संभाषण करता येउ शकेल. रिटायर्ड लोक सुद्धा समाजकार्य म्हणून हे काम करू शकतील.
>>ह्यासाठी एखादी इंग्रजीसाठी
>>ह्यासाठी एखादी इंग्रजीसाठी वेबसाईट केली तर किंवा असली तर? >>
ESL (english as a second language) साठी उत्तम वेबसाईट्स उपलब्ध आहेत. तसेच सराव करण्यासाठी फेसबुक ग्रुप देखील आहेत.
मुलाखत घेण्याचे फारसे प्रसंग
मुलाखत घेण्याचे फारसे प्रसंग आले नाही, पण विद्यार्थ्यांना त्यासाठी मार्गदर्शन करण्याचे प्रसंग बरेच आले, आणि त्यात बरेचसे चांगले अनुभव. ग्रामीण भागातील विद्यार्थी "आपल्याला जमणारच नाही" याच आत्मविश्वासावर (?) मुलाखतीसाठी जातात आणि अपेक्षेप्रमाणे निराशा घेउन येतात.
मी स्वत: मेरठ (मीरत, उ.प्र.) च्या जवळच्या खेड्यातील विद्यार्थ्यांना मुलाखतीविषयी शिकवत होतो. त्यात एका मुलीला इंग्रजीतुन प्रेझेंटेशन देणे अपेक्षित होते. (वेळ - अंदाजे २ मिनिट). ती मुलगी २ वाक्य बोलून थांबली आणि "सर मै नही कर सकती" म्हणुन रडायला लागली. जवळजवळ वर्गातल्या सगळ्याच मुली "सर जाने दिजिए... कल कर लेगी..." वगैरे म्हणायल्या लागल्या. पण मी तिला पाणी प्यायला सांगीतलं. आणि "टेक युअर ओन टाईम" म्हणत एका बेंचवर जाउन बसलो. सोबत "यस यु कॅन डू इट, इट्स व्हेरी सिंपल.... .." वगैरे बोलत होतो. जवळजवळ १०-१२ मिनिटे गेली असतील, मग हळूहळू ती बोलायला लागली....
आज ती एका नामांकीत कंपनीत आयटी इंजिनिअर (सॅप की काय ते...) आहे. आजही त्या वर्गातले सगळे विद्यार्थी तो अनुभव विसरले नाही.
माझ्म त्यांना नेहमी एकच सांगणं असायच. परिक्षा असो किंवा मुलाखत, "जे येते ते चांगले (लिहा) सांगा आणि नाही येत ते त्याहीपेक्षा चांगलं (लिहा) सांगा".
जवळजवळ ९०% अधिक विद्यार्थांना संवाद साधण्याची संधीच मिळत नाही, जी इंग्रजी (कॉन्व्हेंट) शाळात मिळते, बाकी फारसा फरक नाही... तेही करु शकतात, बस संधी उपलब्ध करुन द्यायला हवी.
अवांतर :- कोरियात आल्यावर जवळजवळ सगळ्याच भारतीयांची इंग्रजी अत्यंत धीमी आणि विचित्र झाली आहे. आधी आम्ही सरळ वाक्यच्यावाक्य बोलायचो, आता मोजुन शब्द बोलतो
बेफि, तुमचं निरीक्षण खूप
बेफि, तुमचं निरीक्षण खूप मार्मिक आहेत.
फारेंड, पुलंच्या उदाहरणासाठी +१
माझ्याही मनात तोच विचार आला की पुलंनादेखील " फोर कप्स ऑफ टीज" ची इंग्रज आवृत्ती " फोर टीज" आहे हे कळायला माँजिनीज चा चहा अंगावर सांडून घ्यावा लागला.
मला वाटतं की विपुल वाचन हा या समस्येवरचा तोडगा ठरु शकतो. किती मुलं अवांतर वाचन करतात? इंग्रजी तर सोडाच पण मराठी मिडीयमवाली मुलं, पाठ्यपुस्तकाबाहेरचं मराठी साहित्य, लेख, गेला बाजार रोजचं वर्तमानपत्र(अग्रलेखासहित) किती वाचतात? एकदा शाळेत इंग्रजी सुरु झाले की त्या त्या लेव्हलची पुस्तके वाचणे, न कळलेल्या शब्दांचे अर्थ पाहणे वगैरे गोष्टी अपरिहार्यपणे करायला पाहिजेत. वाचनाने बहुश्रुतता तर येतेच, शिवाय शब्दसंपत्ती पण वाढते. खेडोपाड्यातून येणार्या मुलांसाठी त्यांच्या शाळा - कॉलेज मधे कमीत कमी या बाबतीतील समुपदेशकांची सोय असायला हवी.
वाचक व प्रतिसाददात्यांसाठी
वाचक व प्रतिसाददात्यांसाठी काही खुलासे:
त्यापूर्वी मतप्रदर्शनासाठी सर्वांचे आभार!
१. हे सर्व विद्यार्थी ६० टक्क्याहून अधिक गुण (दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन व पोस्ट ग्रॅज्युएशनही) मिळवलेले होते. त्याशिवाय ते तेथे उपस्थित राहू शकले नसते हा संस्थेचा नियम होता, जो कटाक्षाने पाळण्यात आलेला होता व माझ्याच केंद्रातून मी जे विद्यार्थी पुढे पाठवले होते त्यांच्या त्या प्रक्रियेत मी व्यवस्थित सहभागी असल्याने हा नियम पाळण्यातील दक्षता मला ठाऊक आहे.
२. संस्थेतील विद्यार्थ्यांपेक्षा हे जॉब फेअर बाह्य विद्यार्थ्यांसाठी अधिक होते व त्यामुळे जवळपास २५०० पैकी जेमतेम ४००च विद्यार्थी हे आमचे इन्टरनल स्टुडंट्स होते, बाकीचे विद्यार्थी हे निव्वळ गुणवत्ता निकषावर तेथे वॉक इन झालेले होते. एन आय आय टी स्वतःच्या रजिस्टर्ड विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्लिश व ग्रूमिंगचे सेशन्स घेतेच, त्यामुळे वरील लेख हा मी बाह्य विद्यार्थ्यांसाठी लिहिलेला आहे हे नमूद करायला हवे होते, जे राहून गेले.
३. इंग्रजी संवादकौशल्य हे नवीन निघालेले नाही, तर अनेक प्रकारच्या आय टी जॉब प्रोफाईलमध्ये कम्युनिकेशन स्किल्स महत्वाची ठरतात व मुलाखतींच्या अनेक पातळ्यांपैकी त्यामुळे ती पहिली पातळी ठरते. जर तेथेच उमेदवार नापास होत असेल तर पुढील पातळ्यांमधून त्याला नेण्यात तितकासा अर्थ उरलेला नसतो.
धन्यवाद!
फारएंड आणी शुगोल तुम्हाला
फारएंड आणी शुगोल तुम्हाला भरपूर मोदक. तुम्हा दोघांचेही निरीक्षण अचूक आहे. आणी शुगोल तुम्ही तर वर्मावरच बोट ठेवलत. अगदी खरे आहे तुमचे की आजकाल वाचनच खूप कमी झालेय. अगदी दररोजच्या बातम्या सुद्धा लोक मुले मुली बघण्याचे वा वाचण्याचे कष्ट घेत नाहीत. म्हणूनच माझ्या पिल्लुला मी वाचनाची आवड लावायचा प्रयत्न करतेय.
बेफिकीरजी तुम्हाला लोकांची मने कशी वाचता येतात देव जाणे.:स्मित: अगदी बर्याच जणांची दुखरी नस पकडलीत तुम्ही. इंग्रजांची गुलामी आणी त्यातुन तयार झालेली इंग्रजीची मानसीक गुलामगिरी यातुन आपले भारतीय बाहेर यायला तयार नाहीतच. वास्तविक पहाता आपल्या अठरापगड भाषेत आता कंप्युटरचे ज्ञान तयार होतेय, पण इंग्रजीशिवाय पर्याय नाहीच अशा समजातुन आपले तज्ञ, मग ते ग्रामिण भागातले का असेनात, मागेच रहातात.
जर्मनी, फ्रांस चे कुठे अडलेय इंग्रजीवाचुन? असो, अजून लिहीत रहा.
इंग्रजी संवादकौशल्य हे नवीन
इंग्रजी संवादकौशल्य हे नवीन निघालेले नाही, तर अनेक प्रकारच्या आय टी जॉब प्रोफाईलमध्ये कम्युनिकेशन स्किल्स महत्वाची ठरतात व मुलाखतींच्या अनेक पातळ्यांपैकी त्यामुळे ती पहिली पातळी ठरते. जर तेथेच उमेदवार नापास होत असेल तर पुढील पातळ्यांमधून त्याला नेण्यात तितकासा अर्थ उरलेला नसतो. >>> माफ करा बेफिकीर पण चुकताय तुम्ही , अशी कित्येक उदाहरण आहेत की इंग्रजीत मागे असलेल्या मुलांनी पुढे जाउन नाव कमावलयं. अशी चाळणी त्या मुलांसाठी पण चांगली नाही आणि सामाजिक समतोलासाठी पण चांगली नाही.
>>इंग्रजीशिवाय पर्याय नाहीच
>>इंग्रजीशिवाय पर्याय नाहीच अशा समजातुन आपले तज्ञ, मग ते ग्रामिण भागातले का असेनात, मागेच रहातात.
जर्मनी, फ्रांस चे कुठे अडलेय इंग्रजीवाचुन?
पण खरंच अडलंय इंग्रजीवाचून, निदान सॉफ्ट वेअर मध्ये तरी. अगदी जर्मनी फ्रांसचं सुद्धा.
संभाषण कौशल्याची चाचणी करतांना , इंग्रजीची व्होकॅबलरी चेक करतच नाहीत. फक्त तुम्ही आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहचवू शकता का? आणि समोरचा बोलेल ते समजून घेऊ शकता का? ह्या दोन मुख्य गोष्टीच बघितल्या जातात. त्या दृष्टीने ग्रामीण भागामधल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रयत्नही केले जातात. निदान माझ्या गेल्या पाच सहा वर्षांच्या मुलाखती घेण्याच्या अनुभवातून हेच समोर आलेलं दिसलं की सरावाचा अभाव हे एकमेव कारण असतं या विद्यार्थांमधल्या न्यूनगंडाचं.
माफ करा बेफिकीर पण चुकताय
माफ करा बेफिकीर पण चुकताय तुम्ही , अशी कित्येक उदाहरण आहेत की इंग्रजीत मागे असलेल्या मुलांनी पुढे जाउन नाव कमावलयं. अशी चाळणी त्या मुलांसाठी पण चांगली नाही आणि सामाजिक समतोलासाठी पण चांगली नाही.<<<
श्री, मला तसे म्हणायचे नव्हते. असे म्हणायचे होते की सध्या काही कंपनीजमधील मुलाखतींची पहिली पातळी 'इंग्रजी संवादकौशल्य' ही असते व त्यात अनुत्तीर्ण झालेल्याला पुढील पातळ्यांमध्ये बोलावण्यात काही मुद्दा उरलेला नसतो कारण कामाच्या स्वरुपानुसार हे इंग्रजी संवादकौशल्य अत्यावश्यक असते.
इंग्रजीत मागे पडलेल्यांनी नाव कमावलेले असणे, अशी चाळणी मुलांसाठी योग्य नसणे या आपल्या मुद्यांशी सहमत! फक्त, माझा तो मुद्दा नव्हता इतकेच.
धन्यवाद!
बेफी.. आपला लेख आवडला. मी ही
बेफी.. आपला लेख आवडला. मी ही माझ्या जॉब मधे अनेक वेगवेगळ्या पातळी वरच्या लोकांशी डिल केलेले आहे. प्रत्येक वेळेलाच इंग्रजीची गरज असते असे नाही. आर्थात त्या साठी काही मुद्दे असतिल...
१)आपल्याला म्हणजेच इंडियन एंप्लॉयरला आधी ठरवावं लागेल की चांगले इंग्रजी बोलणारे लोक हवे आहेत की कामात पारंगत असणारे. एखादा जॉब जर नॉन काँटॅक्टेबल म्हणजेच जिथे बाहेरच्या जगाशी फारसा संबंध नाही येणार आहे, त्या जॉब साठी काय करायचेय इंग्लिश येवुन?... आजकाल मुळात जी माणसे सिलेक्शन ला बसवतात ती काहीतरी फॅन्सी आयडिया घेवुन इंटर्व्यु घ्यायला बसतात. एखाद्याचा जॉब जर येणार्या रुटीन अकांउंटिंगचा डेटा सिस्टीम मधे फिड करण्याचा आहे त्या माणसाला काय करायचे आहे स्पोकेन इंग्रजी येवुन..... मी तर अशा पोस्ट साठी येणार्या "फाड्फाड" वाल्यांना धडाधड रिजेक्ट केलं आहे. कारण त्यांच्या पगाराच्या अपेक्षाही फाडफाड असतात.... इकडे कामचं भान आणि ज्ञान महत्वाचं
२) मुळात स्वतःवरचा विश्वास खुपच गरजेचा आहे. बिहार मधुन हिंदी माध्यमातुन एम.बी.ए. झालेले खुप लोक आज मुंबईत फायनान्स क्षेत्रात आपला जम बसवुन आहेत. इन्कम्टॅक्स खात्यात तर सग्ळ्या वरच्या पदांवर हीच माणसे आहेत. ती सगळी आपल्या भाषेत परिक्षा देवुन पुढे आलेली आहेत. ती पण शेतकर्यांचीच मुलं आहेत. आपण हिंदी बोलतो आणि डोक्यावर उग्र वासाचे तेल लावतो, पान खावुन थुंकतो ह्याचा त्यांना अजिबात न्युनगंड नाही. बहुतेक नॅशनलाइज्ड बँकर/ मॅनेजर्स हे ह्याच कॅटेगरीतले असतात..... तीच कथा गुजराथ्यांची..... आपणच का मग मनात कसले कसले गंड मनात धरुन बसतो..... की आपण सरकारी कार्यालयात फक्त चपरासी आणि बँके वा एल.आय.सी मधे युनीयनचे नियम घट्टपणे पाळणारे "क्लार्क" होण्यातच इतिकर्तव्यता मानणार आहोत...
३) अनेक क्षेत्रात आपण आज पाश्चिमात्यांची मानसिक गुलामगीरी मान्य केलेली आहे... मग त्यात लाज काय बाळगायची. सरळ इंग्रजी हा अनिवार्य विषय करुन प्रत्येक अभ्यास्क्रमात त्याला अग्रक्रम देवुयाकी.... मी पण मराठी मिडियम मधे शिकले. ह्या सगळ्या "गंडां" वर मी ही लढाई दिली. छोटे छोटे विजय मीही मिळवले. पण मुळात अंतरिक इच्छा पाहिजे.
मला वाटतं आपल्या मुलांमध्ये क्षमता आहे, पण दिशा नसल्याने, अवेअरनेस नसल्याने आज ती मागे पडलेली आहेत. त्या साठी जर कोणी काही प्रोग्रॅम करायचा ठरवला किंवा काही उपक्रम राबवायचा ठरवला तर मी एका पायावर यायला तयार आहे.
Pages