यू आर रिजेक्टेड

Submitted by बेफ़िकीर on 21 July, 2013 - 06:12

एन आय आय टी या संस्थेत मी गेले तीनएक महिने काम करत आहे. आय टी क्षेत्रात नोकरी मिळण्यासाठी आवश्यक असे लहानमोठे कोर्सेस या संस्थेत असतात हे बहुश्रुत आहे. याच कामाचा एक भाग म्हणून नुकतेच एक जॉब फेअर आयोजीत करण्यात आले होते, ज्यात अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी आपापले अधिकारी पाठवले होते व अडीच हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांनी तेथे मुलाखती दिल्या. संपूर्ण कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणावर, अतिशय प्रभावी व उत्तम झाला. मी उपस्थित असलेल्या मजल्यावर एका कंपनीच्या मुलाखतीसाठी इतकी गर्दी उसळली की मी त्या कंपनीच्या अधिकार्‍यांना 'काही मुलाखती मीच घेऊन आपणास मदत करू का' असे विचारले. मला परवानगी मिळाली व इंग्रजी संवादकौशल्य या सदरातील काही मुलाखती मी घेतल्या. त्या घेत असताना मला आलेला अनुभव येथे मायबोलीकरांना सांगावासा वाटत होता. तो अनुभव मनाला भिडला व बोचलाही.

================

आलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांशी विद्यार्थी पुणे, मुंबई, नाशिक व औरंगाबाद येथील रहिवासी होते. मात्र साधारण तीस टक्के विद्यार्थी हे बुलढाणा, सातारा, सांगली, अकोला, अमरावती, परभणी, लातुर अश्या ठिकाणांहून आलेले होते. हे किंचित अर्धविकसित विभागातील विद्यार्थी नुसते पाहूनही ओळखता येत होते. त्यांची मुलाखतीसाठी योग्य असे कपडे परिधान करण्याची जाण व आर्थिक क्षमता कमी असल्याचे लांबूनच जाणवत होते. या शिवाय चेहर्‍यावर एक प्रकारचे बुजलेपण होते. का कोणास ठाऊक, पण उगाचच एक लाचारीही होती व हा मला झालेला 'भास' नक्कीच नव्हे. दाढीचे खुंट वाढलेले विद्यार्थी व कॅज्युअल वेअरमध्ये असलेल्या विद्यार्थिनी तर प्रगत शहरातूनही आलेल्या होत्या, पण या अर्धविकसित भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा पोषाख, अ‍ॅक्सेसरीज, हेअर स्टाईल हे सर्वच तुलनेने 'साधेपणाचे' होते, 'स्वस्त' नव्हते.

यांच्यापैकी कोणाचा नंबर आला की त्यांची मुलाखत मी घेऊ लागायचो. तेव्हा जाणवायचे की त्यांच्या उभे राहण्यातही एक प्रकारची अजीजी होती. वरवर वाचायला हे खरंच भास वाटू शकतील, तेव्हा ज्या वाचकांना माझ्या गृहितकांबाबतच शंका आहे त्यांच्या मताचा आदर आहेच. पण निदान मी तरी प्रामाणिकपणे जे जाणवले ते लिहीत आहे. अर्थातच अश्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व खूपच कमी होते. त्याला 'प्रभुत्व' म्हणता येणारच नाही. ठराविक काही वाक्ये ते अगदी सलगपणे उच्चारू शकत होते याचा अर्थ तितकीच वाक्ये ते पाठ करून आलेले असावेत. त्या सर्वांच्या डोळ्यात 'नुसते माझ्या सहीवर बरेच काही अवलंबून असल्यासारखे' भाव होते. काहीजणांना तर मुलाखत केव्हा एकदा संपते आणि केव्हा एकदा आपण 'नेहमीप्रमाणे' रिजेक्ट होऊन येथून बाहेर पडतो असे झालेले असावे. यालाही कारण होते ते म्हणजे आजूबाजूला विकसित शहरांमधील जे विद्यार्थी वावरत होते त्यांच्या आत्मविश्वासयुक्त देहबोलीसमोर आपला निभाव लागणे शक्यच नाही याची या विद्यार्थ्यांना केव्हाच जाणीव झालेली होती.

यातील अनेकांना वडील नव्हते, अनेकांचे वडील शेतकरी होते किंवा गॅरेजवर कामाला होते. अनेकांनी निव्वळ नोकरीसाठी पुण्याचा रस्ता धरलेला होता पण पुण्यात वावरण्याचा आत्मविश्वास मात्र त्यांच्यापासून खूपच दूर होता. अनेकांवर लहान भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी होती. जवळपास सर्वांनीच 'छंद' या सदरात 'लिसनिंग टू म्यूझिक' आणि 'रीडिंग' असे लिहिलेले होते. मात्र कोणते म्यूझिक आणि कसले रीडिंग याची उत्तरे त्यांना देता येत नव्हती.

दुसर्‍या बाजूला फाडफाड बोलणारी मुले मुली एकमेकांना खाणाखुण करून हासत होती. त्यांचे पेहराव ग्रामीण युवक - युवतींना बावचळवणारे होते. त्यांचा वावर 'अ‍ॅट होम' होता. मुख्य म्हणजे 'नोकरी' ही त्यांची 'त्वरीत असलेली गरज' नव्हतीच, हे मला संभाषणातून सहज समजत होते.

एकुण वाईट वाटले.

संधी उपलब्ध असण्यात दरी होती. संधी उपलब्ध झाल्यानंतर आत्मविश्वासाच्या प्रमाणात तफावत होती. नोकरीची आवश्यकता ज्याला अधिक होती तो रिजेक्ट केला जात होता. ज्याला ती गरज कमी होती त्याला मुलाखतीच्या पुढच्या पायरीसाठी पाचारण करण्यात येत होते.

बिचार्‍या ग्रामीण विभागातील मुलांच्या डोळ्यात स्वप्ने दिसत होती. 'दोन तीन मिनिटे तर यांच्याशी बोलायचे, यांनी पास केले की मग थेट टेक्निकल मुलाखत, ज्यात आपण नक्की पास होऊ' अशी आशा दिसत होती. पण मला माहीत असलेल्या निकषांनुसार त्यांचे संवादकौशल्य तपासताना त्यांना रिजेक्ट करावे लागणे हे माझे तत्क्षणी कर्तव्य होते. एका वर्तुळात 'आर' लिहून त्यांचा बायोडेटा गठ्ठ्यात मागे सरकवताना आणि त्यांना 'ऑल द बेस्ट' असे 'खोटेच' हसून म्हणताना माझ्यातील कोणीतरी एक स्वतःच निराश होत चालला होता. चेहर्‍यावर व्यावसायिकतेचा मुखवटा मिरवणे भाग होते. मी त्यांना 'ओके, झाली मुलाखत' असे सांगितल्यावर ती मुले अजीजीने मान तुकवून 'थँक यू' म्हणून निघताना आशेने क्षणभर माझ्या डोळ्यांशी डोळे भिडवत होती. जणू त्यांना म्हणायचे असावे की 'आम्हाला फक्त हा इंग्लिशचाच एक प्रॉब्लेम आहे, तेवढा कराल ना दुर्लक्षित'!

आईच्ची जय त्या शिक्षणाच्या आणि विषमतेच्या! माझ्या मनावर गेले दोन दिवस जो परिणाम झाला तो कोणाला धड सांगताही येत नव्हता, माझीच थट्टा व्हायची असे वाटून! शेवटी मी माझ्या जगात पोचलो आणि प्रगत शहराचा एक भाग होऊन कंफर्टेबल झालो. आता असे वाटते साले आपल्याला देवाने इतके नशीबवान बनवले पण आपण त्या नशिबवान आयुष्याचे काय मातेरे करत आहोत?

माफ करा, विचार प्रकट करताना वाहवत गेलो, पण नेहमीप्रमाणेच हा लेखही जसा सुचला तसा एका बैठकीतच लिहून मोकळा झाल्याचे समाधान मनाला आहे.

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योग्य त्या वेळी योग्य ते मार्गदर्शन न मिळणे ही सर्वात मोठी ग्रामीण भागात रहाण्यातली अनुपलब्धि आहे असे मला वाटते. आई वडील शेती करून दोनवेळ सुखाने खाण्यासाठी झटत असताना तिथल्या मुलांना स्वतःलाच स्वतःचे मार्गदर्शक व्हावे लागते हा अनुभव आहे.>>+१००००

सगळे प्रतिसाद न वाचता लिहित आहे... मी पण सातारा जिल्ह्यातिल लहान खेड्यातलिच .. आत्ता मुंबई मध्ये चांगल्या पोस्टवर काम करत आहे .. मी ही हे अनुभवले आहे .. पण घरातिल शिकवणुकिमुळे आणि आत्मविश्वासामुळे कधी खुप अडचणी आल्या नाहित .. पण माझ्या स्वतःच्या अभियांत्रिकी महविद्यालयात तसेच इतरत्र ही मी असे मुलाखाती घेणारे बघितले आहेत जे समोरच्या उमेदवाराला रिलॅक्स करतात आणि कसा ड्रेस घातला आहे .. कसा दिसत आहे .. इंग्लिश कस आहे या पेक्शा ही नॉलेज कस आहे आणि जा कामासाठी निवड होत आहे त्यात तो नीट फिट होतो कि नाही हे बघताना पाहिले आहे..

आणि इंग्लिश बद्दल बोलायच तर कामाच्या ठिकाणी इंग्रजी आड येत नाही ... हा इंग्लिश चांगल असेल तर फायदा होवु शकतो पण एक मर्यादे पर्यन्तच .. सगळ्यात शेवटी तुमच नॉलेज .. काम करण्याची इच्छा ई. च उपयोगी पडतात...

काही ठिकाणी तर मी मुलाखत घेणार्यांनी उमेदवाराला .. " हव तर मराठी मध्ये उत्तर द्या " अस म्हणतना ही ऐकल आहे...

लेख आवडला.
फारेण्ड आणि मृण्मयीशी बर्‍याच अंशी सहमत आहे.

मी कधी नोकरी, इंटरव्ह्यू या मार्गांना गेलेच नाही त्यामुळे तिथलं वातावरण कल्पनेनेच समजू शकते पण केवळ 'इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास नसणे' या एकाच मुद्द्यामुळे एका महत्वाच्या अ‍ॅडमिशनच्या एन्ट्रन्सच्या लेखी परिक्षेत उत्तम मार्क मिळवूनही इंटरव्ह्यूला गेले नाही. सांगताना जायचेच नाहीये वगैरे कारणे कितीही सांगितली होती तरी मूळ कारण तेच होते. तिथे न गेल्याने माझे काही बिघडले नाही आयुष्यात तरी एका ठिकाणी आपण असा पळपुटेपणा केला ही टोचणी उरतेच. असो..

अजून एक थोडसं संबंधित पण मूळ विषयापासून किंचित दूर..
सर्वच जॉब्जमधे फाडफाड, अस्खलित, सुंदर वगैरे इंग्रजी बोलणे हे अगदी त्याशिवाय चालणारच नाही असे अनिवार्य नसते ना? ती एक चाळणीच म्हणायची झाली तर ती योग्य उमेदवार निवडायच्या शेवटाकडच्या पातळीला लावायला हवी ना? जेणेकरून जे काम करायचंय त्याचं ज्ञान असलेले उमेदवार आधी निवडले जातील?

नी, अगदीच अनिवार्य नसते वगैरे नाही म्हणता येणार कारण माझा एक कॉलेजमेट आमच्या सगळ्यांपेक्षा टेक्निकली अतिशय स्ट्राँग असुनही फक्त संभाषण कौशल्य नाही म्हणून कुठल्याही कंपनीत सिलेक्ट झाला नाहीये Sad

एक दोन ठिकाणी त्याने "माझा इंटर्व्युव हिंदीतून घेणार का?" अस विचारल्यावर "क्लाईंटशी कस बोलणार तुम्ही पुढे जाऊन? त्यामुळे इंग्लिश मधूनच घेतला जाईल" अस उत्तर दिलेलं..

जो पेपर इंग्लिशमधून लिहू शकतो, पुस्तक वाचू शकतो त्याला इंग्लिश समजत नाही, येत नाही अस म्हणणार तरी कस? पण त्याच्या तो आत्मविश्वास नाहीये त्यामुळे तो नाहीच बोलू शकत...कदाचित वर्कएन्वॉर्मेंटची सवय क्झाल्यावर जमुन जाईल त्याला पण तोपर्यंत काहीच होईना Sad

सर्वच जॉब्जमधे फाडफाड, अस्खलित, सुंदर वगैरे इंग्रजी बोलणे हे अगदी त्याशिवाय चालणारच नाही असे अनिवार्य नसते ना? ती एक चाळणीच म्हणायची झाली तर ती योग्य उमेदवार निवडायच्या शेवटाकडच्या पातळीला लावायला हवी ना? जेणेकरून जे काम करायचंय त्याचं ज्ञान असलेले उमेदवार आधी निवडले जातील?

अगदी सहमत!

रिया, अनिवार्य म्हणजे निवड क्रायटेरिया म्हणून म्हणत नाही मी. ज्या कामाची गरज म्हणून म्हणतेय.

म्हणजे उदाहरणार्थ काम आहे ग्रामीण भागात करायचं आणि पहिली निवडचाचणी फाडफाड, फर्डं इंग्रजीची... उपयोग काय?

ह्म्म्म!

तस नसावं बहुदा..
आयटीमध्ये मात्र संभाषणकौशल्य हा निवडीचा एक निकष आहेच

सर्वच जॉब्जमधे फाडफाड, अस्खलित, सुंदर वगैरे इंग्रजी बोलणे हे अगदी त्याशिवाय चालणारच नाही असे अनिवार्य नसते ना? ती एक चाळणीच म्हणायची झाली तर ती योग्य उमेदवार निवडायच्या शेवटाकडच्या पातळीला लावायला हवी ना? जेणेकरून जे काम करायचंय त्याचं ज्ञान असलेले उमेदवार आधी निवडले जातील?
<<
सहमत.

मी बर्‍याच कॉलेजेस मधे कँपस मुलाखतींसाठी गेलो आहे.

खुप वाईट अनुभव होता Engineering च्या मुलांचा. ही कॉलेजेस रेप्युटेड आहेत जसे की कराड चे Engg कॉलेज, सांगली चे वालचंद कॉलेज.

भाषेचा प्रश्न तर होताच, पण मी त्यांच्याशी हिंदी मराठी मधे पण बोललो होतो. तरी पण निराशाच पदरी आली.

१. त्यांना त्यांच्या Project बद्दल पण सांगता येत नव्हते ( ह्याचा अर्थ त्यांनी तो केला नव्हता ). त्यांना त्यांच्या विषयातील बेसिक माहीती पण नव्हती.
मीच त्यांना विचारायचो की तुम्ही च सांगा तुम्ही कुठल्या विषयात comfortable आहात आणि त्या विषयावर विचारायचो तरी काही ही यायचे नाही.
२. बेफी जींनी म्हणल्या प्रमाणे, कुठलीही "खरी" hobby नव्हती. त्यांनी लिहिलेल्या आवडीच्या विषयावरचे अगदी बेसिक प्रश्ना ची उत्तरे त्यांना माहिती नव्हती.
३. स्वताच्या आजुबाजुचे जनरल माहीती पण नव्हती. अमरावतीच्या , बुलढाण्याच्या मुलाला विचारले की तुमचे शहर कधी पासुन अस्तित्वात आहे, पुर्वी त्या भागात कोणी राज्य केले होते. काहीही माहीती नव्हते. हे असले प्रश्न विचारायची वेळ आली कारण त्यांना त्यांच्या विषयातील काहीही माहीती नव्हती.

१०० मधल्या ५ मुलांना पण शॉर्टलिस्ट करु शकत नव्हतो.

आपली शिक्षण्पद्धती पूर्ण पणे चुकली आहे

आपली शिक्षणपद्धती इन्फर्मेटिव्ह पद्धतीवर आधारीत आहे. लहानपणी सायकल शिकलो, पोहायला शिकलो,किंवा अजून काही शिकलो तर ते कितीही वर्षानंतर पुन्हा तसेच करता येते....,परंतु त्याच लहानपणी वाचलेल्या,पाठ केलेल्या ,घोकलेल्या कित्येक गोष्टी मुळीच लक्षात रहात नाहीत......

आपली शिक्षणपद्धती कुठेतरी चुकते आहे असे वाटते.

दोष विद्यार्थ्यांचा पण आहे.

म्हणुन मी त्यांच्या आवडी बद्दल आणि त्यांच्या गावा बद्दल पण विचारले.
मला संगीताची आवड आहे असे म्हणायचे आणि साधी माहिती सुद्धा नसावी. किंवा सिनेमा आवडतो म्हणायचे आणि त्यांनी सांगीतलेल्या सिनेमाचा दिग्दर्शक पण माहीती नसावा.

Engg च्या ४ थ्या वर्षा च्या त्यांच्याच प्रोजेक्ट बद्दल विचारले तर २ वाक्य पण सांगता येऊ नयेत ( मातृभाषेत सुद्धा )

हे नक्कीच शिक्षण पद्धतीचा दोष नाही.

दोष विद्यार्थ्यांचा पण आहे.>> +१११११

दोष तर आहेच.... कारण आज काल हे मोबाईल, वॉट्स अप, सोशल साइट्स हे प्रकार करुन वाचायला कोणाला वेळ आहे. नुसतं लाइक केलं की आपली रसग्रहणाची जबाबदारी संपली..... सी.व्ही. मधे छंद लिहायचे आहेत ना... मग द्या ठोकुन "संगीत आणि वाचन" ... कोण विचारतय..... आणि संगीत म्हणजे एफ.एम. वरुन सतत ऐकायला येणारा गोंगाटच ना .... वाचन म्हणजे कदाचित कोणीतरी लाइक केलेला उथळ लेख......

बेफी, लेख १०० % पटला. तुमचं निरीक्षण प्रामाणिक आणि योग्य आहे.
१२ वी च्या परीक्षेनंतर पेपरात आलेली जाहीरात पाहुन मी आणि माझी एक मैत्रीण इंटरव्युला गेलो. नावाजलेली कापड कंपनी आहे. नाव लिहित नाही आता. मी वर्नॅक्युलर स्टुडंट आहे, इंग्लिशची बोंब आहे म्हणुन तिथल्या इंटरव्यु घेणार्‍या बाईंनी अस्सा काही अपमान केला की बास. रडलेच मी. त्यानंतर पुर्ण शिक्षण होइपर्यंत कुठेच इंटरव्युला गेले नाही. आज ह्या पोस्टला आल्यावर, क्लायंटशी, फ्रेंड्सशी, घरी, मुलीशी इंग्लिश्मधुन बोलताना अचानक त्या बाई आठवतात आणि हसु येतं.

असाच एक अनुभव...

सांगलीच्या सरकारी Engg कॉलेज चा. एक धुळ्याचा मुलगा. वडील MSEB मधे वायरमन.

एकाही प्रश्नाचे उत्तर येत नाही, म्हणुन अवांतर विचारणे चालु माझे. त्याच्याकडे लॅपटॉप आहे का असे विचारले. मला वाटले घरची परिस्थिती खास नाही म्हणुन त्याला परवडत नसेल.

पण मुलगा मोठा दिमाखात सांगतो सोनी चा आहे लॅपटॉप. मी उगाचच विचारतो, इतका महागातला का? स्वस्तातला घेता नाही का आला?

मुलाचे उत्तर : "मला Branded गोष्टी वापरायला आवडतात"

हे ऐकुन मी त्याला रिजेक्ट केले ( तसेही केलेच असते पण मराठी आहे, परिस्थिती चांगली नसेल म्हणुन विचार करत होतो ).

एकतर त्याचा बाप पैसे खात असणार म्हणुन मुलाला चैन जमतीय
किंवा मुलाला आई-बापाच्या कष्टाची किंमत नाही.

दोन्ही परिस्थितीत त्याला रिजेक्टच करायला हवे होते.

@सस्मित: सेम पिन्च...
मी ही लहान गावतुनच आलो आहे. आरशा समोर इन्ग्रजि पेपर वाचणे, कुठलीही १-२ इन्ग्रजि गाणी पाठ करणे आणी मोठ्मोठ्याने गाउन बघणे असे प्रकार केले आहेत. याने थोडा आत्मविश्वास वाढ्तो आणि उच्चार सुधारतात.
खुप मजा ही येते.

एक उलट परीस्थिती:

माझ्या ऑफिसातलीच.
७-८ जण,
अनुभव: प्रत्येकी १२-१४ वर्षे,
शिक्षण: डिप्लोमा
इंग्रजी प्रभुत्वः बेसिकपेक्षा कमी
कम्युनिकेशन कॉन्फिडन्सः नसल्यात जमा
करंट अफेअर्स् बद्दल जाणीवः तुरळक
कोषः घर, जवळचे नातेवाईक, देवधर्म
लीडरशिप क्वालिटी: ते काय असत?
कामाचा आलेखः जे काम पहिल्या दिवशी करत होते तेच करत आहेत, वेग वाढलाय, जबाबदारी तीच
कामाची पद्धत: मॅनेजर सांगेल ते करा, स्वत:चं डोकं मुळीसुद्धा लाऊ नका

सध्याची पोझिशनः सीनियर कन्सल्टंट / आर्किटेक्ट

तरक्की का राजः एकाच कंपनीत एकत्र काम करून मॅनेजर सोबत एक कंपू निर्माण केला, कंपूबाजी झिंदाबाद...

तस्मात, इंग्रजी येत नसेल तरी, ग्रामीण भागातून आलात तरी, मात्रुभाषेत शिक्षण झालं तरी काहीही अडंत नाही... कंपूबाजी करा...

छान लेख बेफीकीर. अभिनंदन !

माझ्यामते प्रश्न इंग्रजीच्याही पलीकडचा आहे. या सगळ्या प्रश्नाच मुळ आपली "रोट" ( रुटीन, रेपीटेटीव..) शिक्षणपद्धती आहे अस माझं मत. या शिक्षणपद्धतीतन जे बळ मिळायला हवं ते विद्यार्थ्यांना मिळतय का तो प्रश्न आहे. मध्यम्तरी रिडर्स डायजेस्टनं हार्वर्ड विद्यातीठाचा हवाला देत लिहीलं होतं की भारतातील ७०% हुन जास्त पदवीधर मुलं ही " employable" नसतांत...

मी जपानी -चिनी-कोरीयन्स बरोबर काम केलय ( अगदी फ्रेंचसुद्धा ) ज्यांच इंग्रजी अगदीच यथातथा पण आपल्या कामाबद्दल प्रचंड विश्वास जो त्यांच्या शिक्षणपद्धतीमुळे असावा... मुळात शिक्षणपध्दतीत सुधारणा आवश्यक आहे...

सर्वच जॉब्जमधे फाडफाड, अस्खलित, सुंदर वगैरे इंग्रजी बोलणे हे अगदी त्याशिवाय चालणारच नाही असे अनिवार्य नसते ना? ती एक चाळणीच म्हणायची झाली तर ती योग्य उमेदवार निवडायच्या शेवटाकडच्या पातळीला लावायला हवी ना? जेणेकरून जे काम करायचंय त्याचं ज्ञान असलेले उमेदवार आधी निवडले जातील?
>>सहमत
बी जे मेडिकलचा एक अनुभव. जेव्हा entrance exam. नव्हती तेव्हा BJ मधे शहरी भागातील (मुख्यत्वे FC,SP,Modern,गरवारे,loyala) मुलांचे प्रमाण जास्त होते.ग्रामीण मुले पण well off family मधील किंवा ग्रामीण भागतल्या reputed educational institue मधील असायची. entrance सुरु झाल्यापासुन हे चित्र बदलले. ग्रामीण टक्का वाढला कारण भाषेचा अडसर दुर झला.
entrance ला लोक नावे ठेवतात . पण मी म्हणेन कि entrance मुळे सगळ्यांना समान संधी मिळाली.काही अति शहाणे लोक भाषाच काय पण accent बघुन doctor कडे जायचे ठरवतात तेव्हा मात्र हसावे कि रडावे कळत नाही.

बरेचदा नुकतीच पदवीधर झालेली मंडळी आपल्याला न कळणार्‍या इंग्रजीला 'फ्लुएंट इंग्लिश' म्हणतात असं वाटते. असो.
केवळ शिक्षणपद्धतीला दोष देउन चालणार नाही. एका इंग्लिश वर्क्शॉपमधील अनुभव. इंग्रजी बोलता न येणे किंवा बोलण्याचा आत्मविश्वास नसण्याची विद्यार्थ्यांच्या मते काही कारणे आणि त्यांचं खंडण

१. साहित्याची अनुपलब्धता :- अतिशय चुक - आपण किती इंग्रजी ऐकतो/ पाहतो? इंग्रजी ऐकण्यासाठी अनेक चॅनेल्स आहेत, नाहीच टीव्ही तर रेडिओ आहे, पण वापरत नाही. एक इंग्रजी पुस्तक रद्दी/ जुन्या बाजारात (अगदी बकवास कादंबरी का असेना) १०-२० रुपयात मिळायला हरकत नाही ! पण किती लोकं घेतात आणि वाचतात?

२. इंग्रजी शब्द (vocabulary) :- साधारण रोजच्या व्यवहारातलं इंग्रजी बोलायला फार फार तर २५०० शब्द पुरेसे असतात, आणि आश्चर्य म्हणजे हे सगळे शब्द आपल्याला माहिति आहेत. जगातील अनेक भाषा अश्या आहेत, ज्यात तांत्रिक वस्तू (उदा. टीव्ही, फ्रिज, इ.) यांना स्थानिक भाषेतील नावे आहेत, सुदैवाने (की दुर्दैवाने) मराठीत यांना प्रतिशब्द असले तरी प्रचलित नाहीत.

३. बोलण्याची संधी :- संधी मिळत नसते, तयार करावी लागते.
समजा मी पंतप्रधान झालो आणि आजच्या अमुक समस्येवर माझी मुलाखत आहे, तर मी काय सांगेन?
आज शाळेत/ कॉलेजमध्ये काही कार्यक्रम आहे, त्याचे सुत्रसंचालन तुमच्याकडे आहे, तर तुम्ही ते कसे पार पाडाल?
आज मुलाखत आहे, कशी द्याल?
अश्या काल्पनिक प्रसंगांना मनात किंवा प्रकटपणे बोलुन तयार करण्यासाठी कोणाचीही गरज नसते, नाही का?

आणखी दोन मुद्दे होते, आठवले की टाकतो.

३.

रोचक चर्चा. सगळ्यांचेच प्रतिसादही वाचनीय.
पण ही परिस्थीती बदलण्यासाठी काय उपाय करता येतील?
भारतातली तरुणाई हे इथल्या लोकसंख्येचे बळ आहे, but India has failed to realise this demographic dividend, असे कालच एका लेखात वाचले.
यात बदल होण्यासाठी आपण काय करु शकतो याबद्दल लिहिलेले वाचायला आवडेल.

इब्लिस +१००. मुद्द्याचे बोललात.

मला वाटते की अश्या तरुणांना कश्याप्रकारे स्वतःचा न्युनगंड कमी करता येईल याबद्दल मार्गदर्शन करावे. मुळात ही मुले कमी नसतातच फक्त एक बुस्टर डोस लागतो Happy

(भारताबाहेरुन असं काही जमेल का?)

सी लॅण्ग्वेजचा प्रोग्राम लिहीण्याइतकं जुजबी इंग्लीश येत असेल,
प्रोग्राम लिहीण्यात एक्सपर्ट असेल तर त्याचं कम्युनिकेशन स्कील
कसं आहे हे तपासून काय डोंबलं मिळणार आहे ? काही जणांना इंग्रजी
लिहता येतं. पण बोलता येत नाही. मग त्यांना इंग्लीश समजत नाही
असं म्हणणार का तुम्ही? आम्हाला काय कस्टमर आणायचेत का ?
कॉर्पोरेट ऑफीसमधे ठेवा कि कम्युनिकेशन स्कील.

तरी पण इंग्रजी बोलता येणं हे पाहीजे असल तर आमच काही
म्हणणं नाही. इतर ब-याच वाटा आहेत. ड्राफ्टसमन, आयटीआय ट्रेड्समन,
मेकॅनिक अशा. या कमी पगाराच्या नोक-यात ग्रामीण भागातली पोरं
जास्त करून दिसतात. कारण इथं इंग्लीश बोलायची सक्त नाही. पण इथंही
कामात हुषारी लागते. ती या पोरांकडं असते. फाडफाड इंग्लीश बोलणा-या
इंजिनियरला पन इंजिनमधला फॉल्ट सापडत नाही तो खेडवळ मेकॅनिक पटकन
सांगतो असे अनुभव नेहमीच येतात.

काय क्रायटेरिया लावायचा हा एम्प्लॉयरचा प्रश्न आहे
शेवटी त्याच्या कंपनीची काळजी त्यालाच जास्त .

आपल्या देशात "इंग्लिश"ला अवाजवी महत्व हाच एक मुख्य अडथळा आहे..
इंटरनॅशनल कंपनी मधे या कॉल सेंटर इत्यादी ठिकाणी इंग्रजीची मागणी रास्त आहे..
परंतु ज्यात त्यात इंग्रजी यायलाच हवे नाही आले तर हेटाळणी वगैरे या सार्‍या गोष्टींचा परिणाम इतर विद्यार्थ्यांवर होतो..आत्मविश्वासच गमावुन बसतात..
चीन, जर्मनी, फ्रांस, रशिया, जपान यासारख्या देशांची प्रगती ही "इंग्रजी" न येता सुध्दा झाली आहे...तिथल्या विद्याथ्यांना इंग्रजी नाही आली तरी काहीच नुकसान होत नाही ...मल्टीनॅशनल कंपनी मधे त्यांना जॉब व्यवस्थित मिळतात ..ज्यांचे काम इतर देशांतल्य लोकांबरोबर जास्त असते तिथे "इंग्रजी" येत असलेल्या लोकांना पाठवतात अथवा जर ती व्यक्ती महत्वाची असेल तर त्या व्यक्तीबरोबर "दुभाषी" देतात... परंतु त्या व्यक्तीला कुठेही जाणवत नाही की "मला इंग्रजी येत नाही म्हणुन मला ती संधी देत नाही"...
भारतात हीच परिस्थिती उलट आहे.. साधे कोर्टाचे कामकाज देखील इंग्रजी मधुन जास्तच ...काय गरज आहे इंग्रजी मधुन करण्याची???????? आरोपी भारतीय ...केस दाखल करणारा भारतीय . वकिल भारतीय... जज भारतीय..मग इंग्रजीचा अट्टाहस कशाला ? आणि कुणासाठी ?????

विद्यार्थ्यांना मनावर बिंबवणे महत्वाचे आहे की त्यांना इंग्रजी नाही आली व्यवस्थित तरी त्यांना त्यांचे लक्ष्य गाठणे सोपे आहे...
तुमची प्रगती ही तुमच्या आत्मविश्वासावर आणि तुमच्या कार्यावर अवलंबुन आहे ...तुमच्या भाषेवर नाही......

चर्चेसाठी सर्वांचे आभार!

एक खुलासा पुन्हा करावासा वाटत आहे.

मी ज्या कंपनीच्या मुलाखतींचे उदाहरण दिलेले आहे त्या कंपनीतील पद हे 'इंग्रजी संवादकौशल्य' अत्यावश्यक असलेले पद होते.

(या खुलाश्याचा हेतू हा, की इंग्रजी येत नसले तरीही करता येण्यासारखी, प्रतिष्ठित समजली जाणारी, भरपूर मोबदला मिळणारी अनेक कामे आहेत हे ज्ञात असल्याचे सांगणे व या विशिष्ट उदाहरणात मात्र इंग्रजी संवादकौशल्याला महत्व असल्याचे सांगणे)

धन्यवाद

बेफी, खरतर मनात असलेल्या गोष्टीला तुम्ही शब्दात मांडल. काल क्लास मध्ये एका मुलाला हे वाचायला लावलं आणि विचारलं खरं असेल का हे? उत्तर होतं... हो.

आता या विषयावर बरीच चर्चा झाली आहे. पण प्रश्न फक्त इंग्रजीचाच नाही आहे तर हव्या असलेल्या संवाद कौशल्याचा आहे. संवाद मला वाटते कि अगदी शेतात भांगलायला जाणार्‍या लोकां पासुन ते एखाद्या मोठ्या कं. च्या अधिकार्‍यापर्यंत सारख्याच महत्वाचे आहेत. (अगदी घरातसुध्दा). अगदी खेड्यातुन क्वचित शहरात आलेला काका /मामा देखिल बसमध्ये शेजारी बसलेल्याशी गट्टी करु जातो पण खेड्यातुन शहरात शिकायला गेलेला पहिल्या दिवशी आपला क्लास कोठे आहे हे विचारण्यासाठी "आपलं" कोणी दिसतं का? याची वाट पाहतो.

हे बुजलेपण नेम़के या कौशल्याआड येत असावे का? मग हे बुजलेपण नेमके कशामुळे येते? ते कसे दुर करता येइल?
गल्लीत चारचौघात बिन्धास्त वावरणारी ही मुले या ठिकाणीच का बुजतात?

बाकि सलग ६ वर्षे इंग्रजी माध्यमातुन शिक्षण घेउन मला इंग्रजी नाही आले तरी चालेल अशी स्वतःची समजुत घालणे तरी किती योग्य आहे?

साध्या ओरलसाठी मुले येतात तेंव्हा त्यांच्या चेहर्‍यावर अगदी हेच भाव असतात.

अगदीच विस्कळित झालंय पण लिहण्यामागचा हेतु लक्षात घ्या. Happy

Pages