यू आर रिजेक्टेड

Submitted by बेफ़िकीर on 21 July, 2013 - 06:12

एन आय आय टी या संस्थेत मी गेले तीनएक महिने काम करत आहे. आय टी क्षेत्रात नोकरी मिळण्यासाठी आवश्यक असे लहानमोठे कोर्सेस या संस्थेत असतात हे बहुश्रुत आहे. याच कामाचा एक भाग म्हणून नुकतेच एक जॉब फेअर आयोजीत करण्यात आले होते, ज्यात अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी आपापले अधिकारी पाठवले होते व अडीच हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांनी तेथे मुलाखती दिल्या. संपूर्ण कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणावर, अतिशय प्रभावी व उत्तम झाला. मी उपस्थित असलेल्या मजल्यावर एका कंपनीच्या मुलाखतीसाठी इतकी गर्दी उसळली की मी त्या कंपनीच्या अधिकार्‍यांना 'काही मुलाखती मीच घेऊन आपणास मदत करू का' असे विचारले. मला परवानगी मिळाली व इंग्रजी संवादकौशल्य या सदरातील काही मुलाखती मी घेतल्या. त्या घेत असताना मला आलेला अनुभव येथे मायबोलीकरांना सांगावासा वाटत होता. तो अनुभव मनाला भिडला व बोचलाही.

================

आलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांशी विद्यार्थी पुणे, मुंबई, नाशिक व औरंगाबाद येथील रहिवासी होते. मात्र साधारण तीस टक्के विद्यार्थी हे बुलढाणा, सातारा, सांगली, अकोला, अमरावती, परभणी, लातुर अश्या ठिकाणांहून आलेले होते. हे किंचित अर्धविकसित विभागातील विद्यार्थी नुसते पाहूनही ओळखता येत होते. त्यांची मुलाखतीसाठी योग्य असे कपडे परिधान करण्याची जाण व आर्थिक क्षमता कमी असल्याचे लांबूनच जाणवत होते. या शिवाय चेहर्‍यावर एक प्रकारचे बुजलेपण होते. का कोणास ठाऊक, पण उगाचच एक लाचारीही होती व हा मला झालेला 'भास' नक्कीच नव्हे. दाढीचे खुंट वाढलेले विद्यार्थी व कॅज्युअल वेअरमध्ये असलेल्या विद्यार्थिनी तर प्रगत शहरातूनही आलेल्या होत्या, पण या अर्धविकसित भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा पोषाख, अ‍ॅक्सेसरीज, हेअर स्टाईल हे सर्वच तुलनेने 'साधेपणाचे' होते, 'स्वस्त' नव्हते.

यांच्यापैकी कोणाचा नंबर आला की त्यांची मुलाखत मी घेऊ लागायचो. तेव्हा जाणवायचे की त्यांच्या उभे राहण्यातही एक प्रकारची अजीजी होती. वरवर वाचायला हे खरंच भास वाटू शकतील, तेव्हा ज्या वाचकांना माझ्या गृहितकांबाबतच शंका आहे त्यांच्या मताचा आदर आहेच. पण निदान मी तरी प्रामाणिकपणे जे जाणवले ते लिहीत आहे. अर्थातच अश्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व खूपच कमी होते. त्याला 'प्रभुत्व' म्हणता येणारच नाही. ठराविक काही वाक्ये ते अगदी सलगपणे उच्चारू शकत होते याचा अर्थ तितकीच वाक्ये ते पाठ करून आलेले असावेत. त्या सर्वांच्या डोळ्यात 'नुसते माझ्या सहीवर बरेच काही अवलंबून असल्यासारखे' भाव होते. काहीजणांना तर मुलाखत केव्हा एकदा संपते आणि केव्हा एकदा आपण 'नेहमीप्रमाणे' रिजेक्ट होऊन येथून बाहेर पडतो असे झालेले असावे. यालाही कारण होते ते म्हणजे आजूबाजूला विकसित शहरांमधील जे विद्यार्थी वावरत होते त्यांच्या आत्मविश्वासयुक्त देहबोलीसमोर आपला निभाव लागणे शक्यच नाही याची या विद्यार्थ्यांना केव्हाच जाणीव झालेली होती.

यातील अनेकांना वडील नव्हते, अनेकांचे वडील शेतकरी होते किंवा गॅरेजवर कामाला होते. अनेकांनी निव्वळ नोकरीसाठी पुण्याचा रस्ता धरलेला होता पण पुण्यात वावरण्याचा आत्मविश्वास मात्र त्यांच्यापासून खूपच दूर होता. अनेकांवर लहान भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी होती. जवळपास सर्वांनीच 'छंद' या सदरात 'लिसनिंग टू म्यूझिक' आणि 'रीडिंग' असे लिहिलेले होते. मात्र कोणते म्यूझिक आणि कसले रीडिंग याची उत्तरे त्यांना देता येत नव्हती.

दुसर्‍या बाजूला फाडफाड बोलणारी मुले मुली एकमेकांना खाणाखुण करून हासत होती. त्यांचे पेहराव ग्रामीण युवक - युवतींना बावचळवणारे होते. त्यांचा वावर 'अ‍ॅट होम' होता. मुख्य म्हणजे 'नोकरी' ही त्यांची 'त्वरीत असलेली गरज' नव्हतीच, हे मला संभाषणातून सहज समजत होते.

एकुण वाईट वाटले.

संधी उपलब्ध असण्यात दरी होती. संधी उपलब्ध झाल्यानंतर आत्मविश्वासाच्या प्रमाणात तफावत होती. नोकरीची आवश्यकता ज्याला अधिक होती तो रिजेक्ट केला जात होता. ज्याला ती गरज कमी होती त्याला मुलाखतीच्या पुढच्या पायरीसाठी पाचारण करण्यात येत होते.

बिचार्‍या ग्रामीण विभागातील मुलांच्या डोळ्यात स्वप्ने दिसत होती. 'दोन तीन मिनिटे तर यांच्याशी बोलायचे, यांनी पास केले की मग थेट टेक्निकल मुलाखत, ज्यात आपण नक्की पास होऊ' अशी आशा दिसत होती. पण मला माहीत असलेल्या निकषांनुसार त्यांचे संवादकौशल्य तपासताना त्यांना रिजेक्ट करावे लागणे हे माझे तत्क्षणी कर्तव्य होते. एका वर्तुळात 'आर' लिहून त्यांचा बायोडेटा गठ्ठ्यात मागे सरकवताना आणि त्यांना 'ऑल द बेस्ट' असे 'खोटेच' हसून म्हणताना माझ्यातील कोणीतरी एक स्वतःच निराश होत चालला होता. चेहर्‍यावर व्यावसायिकतेचा मुखवटा मिरवणे भाग होते. मी त्यांना 'ओके, झाली मुलाखत' असे सांगितल्यावर ती मुले अजीजीने मान तुकवून 'थँक यू' म्हणून निघताना आशेने क्षणभर माझ्या डोळ्यांशी डोळे भिडवत होती. जणू त्यांना म्हणायचे असावे की 'आम्हाला फक्त हा इंग्लिशचाच एक प्रॉब्लेम आहे, तेवढा कराल ना दुर्लक्षित'!

आईच्ची जय त्या शिक्षणाच्या आणि विषमतेच्या! माझ्या मनावर गेले दोन दिवस जो परिणाम झाला तो कोणाला धड सांगताही येत नव्हता, माझीच थट्टा व्हायची असे वाटून! शेवटी मी माझ्या जगात पोचलो आणि प्रगत शहराचा एक भाग होऊन कंफर्टेबल झालो. आता असे वाटते साले आपल्याला देवाने इतके नशीबवान बनवले पण आपण त्या नशिबवान आयुष्याचे काय मातेरे करत आहोत?

माफ करा, विचार प्रकट करताना वाहवत गेलो, पण नेहमीप्रमाणेच हा लेखही जसा सुचला तसा एका बैठकीतच लिहून मोकळा झाल्याचे समाधान मनाला आहे.

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रोग्राम लिहीण्यात एक्सपर्ट असेल तर त्याचं कम्युनिकेशन स्कील
कसं आहे हे तपासून काय डोंबलं मिळणार आहे ? <<< प्रोग्रम म्हणजे संगणकाशी कम्युनिकेशनच ना? Happy

हे बुजलेपण नेम़के या कौशल्याआड येत असावे का? मग हे बुजलेपण नेमके कशामुळे येते? ते कसे दुर करता येइल?
गल्लीत चारचौघात बिन्धास्त वावरणारी ही मुले या ठिकाणीच का बुजतात? <<<

प्रश्न आवडले निवांत पाटील! Happy

प्रतिसादासाठी आभार!

माझ्यामते उत्तरे अशी असावीत.

==============================

हे बुजलेपण नेम़के या कौशल्याआड येत असावे का?

होय, पूर्ण शक्यता आहे. किंबहुना, हीच एक शक्यता आहे.

==============================

मग हे बुजलेपण नेमके कशामुळे येते?

वर्षानुवर्षे गोर्‍या कातडीमुळे झालेला परिणाम! अधिक सुबत्तापूर्ण देशातील गोर्‍या कातडीच्या लोकांनी केलेले राज्य, त्यांच्या वर्तनातील कोणालाही बावचळू शकेल असा आत्मविश्वास, उंची वस्तू, वर्तनातील अदब, शिस्त, एकुण सामर्थ्य यामुळे पिढ्यानुपिढ्यांच्या मनावर 'आपल्यापेक्षा हे कोणी भारी आहेत' हा थर बसलेला असावा / आहे. आता ते गोरे लोक राहिलेले नाहीत, पण ते मागे सोडून गेलेल्या अनेक गोष्टींमुळे आपल्या समाजातील एक पातळी त्यांच्याच पाऊलखुणांवर चालते आहे. याची कारणे व्यावसायिक, आर्थिक उन्नती वगैरेसहितच इंग्रजी भाषेचा पगडा जागतिक बाजारपेठेवर असणे यातही असावीत. हे लोक येथील 'इंग्रजी कमी येणार्‍यांसाठी' थोडेफार 'गोरी कातडीवाल्यांसारखेच' आहेत. यामुळे बुजलेपण येत असावे.

==============================

ते कसे दुर करता येइल?

१. जवळपास अशक्य आहे, याची कारणे आयात निर्यात, जागतिक बाजारपेठेत आपले महत्व, नैसर्गीक सुबत्ता, लष्करी सामर्थ्य, एकुण अर्थकारणावर आपला ठसा असल्या प्रकारच्या 'नुसत्या उच्चांरांनीच घाबरवणार्‍या' संज्ञांमध्ये दडलेली आहेत व त्यांच्यावर काम करणे व यश मिळवणे हे कित्येक दशकांचे नियोजन ठरेल किंवा काही अचाट उलथापालथी घडाव्या लागतील.

२. ते 'बुजणे'च दूर करायचे असले तर मी उदाहरणात दिलेल्या नोकरीच्या मुलाखतींसारख्या ठिकाणचेच बुजलेपण दूर करण्याचे काही कारण नाही. जेथे हे विद्यार्थी बुजणार नाहीत अश्या ठिकाणी त्यांना रोजगार निर्मीती करून देणे व स्वयंपूर्ण बनवणे शक्य आहे. (मागे मी बी वाय एस टी तर्फे अश्या अनेकांना स्थानिक पातळीवर रोजगार निर्मीतिसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात हातभार उचलला होता. अगदी लग्नाचा रथ येथपासून ते गॅरेज टाकणे असे अनेक व्यवसाय जोरात चालू शकतात). याचाच दुसरा अर्थ, 'कन्व्हेन्शनल लर्निंग'ला 'फाटा' देण्याचे मानसिक बळ या पिढीने पुढच्या पिढीत तयार करायला हवे. त्यांच्या गरीबीवर व ग्रामीणतेवर हासण्याचे कारणच नाही.

=============================

गल्लीत चारचौघात बिन्धास्त वावरणारी ही मुले या ठिकाणीच का बुजतात?

मुद्दा क्रमांक एकमध्येच याचे उत्तर आलेले असावे. सांस्कृतीक, आर्थिक व तंत्रज्ञानाशी संबंधीत दरी यामुळे ही मुले शहरात बुजतात, आपल्या गावच्या गल्लीत बुजत नाहीत, कारण अर्थातच तेथे सगळेच त्यांच्यासारखेच असतात.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

चर्चा वाचत आहे. काही काही मुद्दे फार इंटरेस्टिंग वाटले. Happy

सर्वात आधी संवादकौशल्य (कम्युनिकेशन स्किल्स) म्हणजे इंग्रजी येणे अशी आपल्याकडे एक धारणा आहे. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांकडे जणू काही हे स्किल्स बाय डीफॉल्ट आलेले असतात असा बर्‍याच जणांचा समज असतो. संवाद कौशल्य कुठल्याही भाषेवर अवलंबून नसते. आपल्या शिक्षणपद्धतीमधे संवादकौशल्य वाढवण्यासाठी अभ्यासक्रम नियोजित केलेला आहे. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा अभ्यासक्रम (पहिली ते दहावी) पाहिल्यास ही गोष्ट सहज लक्षात येइल. शिक्षणक्रमामधे "तुम्हाला काय वाटले?" "स्पश्टीकरण द्या" "सारांश लिहा" "निबंध/कल्पनाविस्तार" यासारखे अनेक पाठ हे तुमचे संवादकौशल्य आणि तुमची वैचारिक कुवत वाढावी, तुम्ही स्वतः विचार करावा म्हणूनच घातले आहेत. आमच्या आधीच्या बॅचच्या मुलांसठी इंग्रजी हा गणित विज्ञानपेक्षा मोठा शत्रू होता. त्यावर उपाय म्हणून इंग्रजी भाषा ही आकलनपद्धतीवर शिकवली जाऊ लागली. मुलांनी किमान पास व्हावे यादृष्टीने इंग्रजीचे प्रश्नपत्रिका आखलेल्या असतात. सध्याचा अभ्यासक्रम माहित नाही, पण आमच्या अभ्यासक्रमामधे इंग्रजीमधे पत्रलेखन, बायोडेटा, जाहिरात लेखन, इंटर्व्ह्यु देणे वगैरे पाठ होते. त्यामधे नुसते पाठांतर आणि वाचन नव्हे तर शिक्षक आणि विद्यार्थी यांचा मौखिक संवाददेखील अपेक्षित होता. मराठीच्या प्रत्येक धड्याखाली "अधिक वाचन" अशी एक टीप दिलेली असायची, त्यापैकी कितीजण ते पुस्तकं वाचतात? वाचू इच्छितात?

मात्र, मराठीच्या अभ्यास तो काय करायचा? इंग्रजीचा पेपर म्हणजे काय उतारे वाचून प्रश्न सोडवा त्याला किती महत्त्व द्यायचं ही विचारसरणी पालकांची अस्ते, विद्यार्थ्यांची असते आणि शिक्षकांचीदेखील असते. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी वीस वीस निबंध तोंडपाठ करून आलेले तथाकथित "हुशार" मुले होती आमच्या वर्गात. वीसपैकी एकाही विषयाच्या जवळपासदेखील न जाणारा विषय असेल तर पोरं रडायची प्रीलिममधे. शालेय पुस्तकांव्यतिरीक्त अधिक एकही अवांतर पुस्तक आजवर न वाचलेले आणि मला "कॅन यु हेल्प मी इन इम्प्रोविन्ग माय कम्युनिकेशन स्किल्स फॉर कार्पोरेट वर्ल्ड" असं विचारणारे मित्रमैत्रीणी आहेत.

दहावीला गणितातले थेरम्स पाठ केल्याशिवाय गत्यंतर नाही, हे एका शिच्क्षकांनी इतक्या वेळा बजावून सांगितलं होतं आणि माझं पाठांतर कधीच चांगलं नसल्याने तेव्हापासून गणित हा विषय मी ऑप्शनला टाकत आले आहे. इंजीनीअरिंगची अ‍ॅडमिशन कॅन्सल केली, कारण परत चार वर्षं गणित शिकायला लागेल म्हणून. नंतर आठवी नववीच्या शिकवण्या घेत असताना थेरम्स पाठ करायची गरज नाही हे मलाच समजलं पण गणिताची भिती बसलीच.

स्वाती२ ने अमेरिकन शिक्षणपद्धतीबद्दल मध्यंतरी लिहिलं होतं. त्यामधे "मुलांनी स्वतःहून विचार करून प्रश्न सोडवायचे" हा भाग मला अतिशय आवडला होता. आप्ल्याकडे घटक चाचणी आली की आधी गाईड उघडा, नवनीत वाचा, २१ अपेक्षित पाठ करा. शिक्षणपद्धतीवर दोष ढकलणं सोपं आहे, पण जी शिक्षणपद्धती अस्तित्वात आहे त्याचा उपयोग कसा केला जातोय हे देखील तपासून पहायला हवं. मग त्यामधे अधिकाधिक सुधारणा करता येतील.

सर्वात आधी संवादकौशल्य (कम्युनिकेशन स्किल्स) म्हणजे इंग्रजी येणे अशी आपल्याकडे एक धारणा आहे. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांकडे जणू काही हे स्किल्स बाय डीफॉल्ट आलेले असतात असा बर्‍याच जणांचा समज असतो. संवाद कौशल्य कुठल्याही भाषेवर अवलंबून नसते. <<< अनुमोदन, नंदिनी.

>>>सर्वात आधी संवादकौशल्य (कम्युनिकेशन स्किल्स) म्हणजे इंग्रजी येणे अशी आपल्याकडे एक धारणा आहे. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांकडे जणू काही हे स्किल्स बाय डीफॉल्ट आलेले असतात असा बर्‍याच जणांचा समज असतो. संवाद कौशल्य कुठल्याही भाषेवर अवलंबून नसते.<<<

हा सहज पटण्यासारखा, योग्य, चांगला व 'क्लीअर कट' मांडलेला मुद्दा आहे. धन्यवाद!

यापुढील प्रतिसादही पटण्यासारखा वाटला (किंचित घाईत वाचला, त्यामुळे पुन्हा वाचेन). पण मला वाटते संवादकौशल्यातील विषमता हा विषय काहीसा शालेय शिक्षणातील समज-गैरसमज, प्रथा, अभाव यांना अ‍ॅट्रिब्यूट केल्यासारखा वाटला. अर्थातच काही प्रमाणात शालेय शिक्षणाचा या सर्वांशी संबंध आहेच, पण त्या व्यतिरिक्त खालील घटकही महत्वाचे असतील का?

१. घरच्यांनी, मोठ्यांनी वगैरे 'चपखल, समर्पक' शब्दांचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे
२. परकीय भाषेची भीती घालवण्यासाठी सहेतूक प्रयत्न करणे
३. शहरी संस्कृती नसल्यामुळे ग्रामीण संस्कृतीत संवादकौशल्य, परभाषेचा अभ्यास, देहबोली यांच्यावर अधिक परिश्रम घेण्यास विद्यार्थ्यांना भाग पाडणे

इत्यादी!

धन्यवाद!

नंदिनी पोस्ट आवडली Happy
मला माझे दहावीचे गुण आनि आईने केलेले कौतुक आठवल.. मराठीत ८१ आनि इंग्रजी मधे फक्त ७० मिळाले.. मराठीत स्कोर करण फार अवघड असत हे माझ तेव्हापासुनच ठाम मत अजुनही आहे.मुळ भाषा किवा बोलीभाषा , ती वापरण्याची ,त्यातुन व्यक्त होण्याची पदधत माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाच.. हा बेस पक्का असल्यामुळे.. इंग्रजी आनि जर्मन शिकण मी एंजॉय केल.. Happy
माझे शिक्षक ठाम पणे सांगायचे.. व्याकरणदॄष्ट्या मराठी मुलांच इंग्रजी कधी चुकणारच नाही.,, बोलताना जीभ वळणार नाही लवकर.. पण लिहताना बरोबरच लिहणार.. त्याउलट इंग्रजी माध्यामाची मुल.. बोलताना फाडफाड बोलतील.. अनि कदाचित भुत,भविष्य हे सगळे काळ एकत्र करतील Lol

मला वाटते आपण फार Simplistic कारण शोधत आहोत.
इंग्रजी बोलता येत नाही, संवाद कौशल्य नाही ही symptoms आहेत.

खरे असे आहे की, आपण सरसकट सर्व विद्यार्थ्यांना पदवी करायला लावत आहोत. युरोप, अमेरिकेत बरिच लोक आपली १० वी पण झालेली नसतात. पण त्यांच्याकडे दुसरी skills असतात जी त्यांना रोजगार देतात. तिथे कदाचित ५% पेक्षा कमी लोक पदवी साठी जात असतील.

आपल्या इथे क्षमता नसताना १० वी आणि १२ वी मधे पेपर सोप्पे काढुन मुलांना पदवी ची स्वप्ने दाखवली जातात. ( कारण राजकारणी लोकांची कॉलेज चालली पाहिजेत ना ).

ज्यांना साधी काळ काम वेगाची गणिते येत नाहीत ( ही सर्व कंपन्यांच्या लेखी परिक्षेत असतात ), ती मुले १२ वी पास होऊन Engg ला कशी आली ह्याचे मला आश्चर्य वाटत आले आहे.
मी घेतलेल्या कँपस निवडी मधे Engineering च्या मुलांना ५० प्रश्नां पैकी ५-१० सुद्धा बरोबर सोडवता येत नाहीत.

आपल्याकडे शिक्षण हे 'साच्यातले' असते. एका ठरावीक पध्दतीने अभ्यास केला की झाले. त्यामुळे ह्या साच्यापलीकडेही काही आहे आणी आपण ते एक्प्लोर करु शकतो ह्याबद्दल नॉलेज नसते किवा गरजच नसते.

सर्वात आधी संवादकौशल्य (कम्युनिकेशन स्किल्स) म्हणजे इंग्रजी येणे अशी आपल्याकडे एक धारणा आहे. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांकडे जणू काही हे स्किल्स बाय डीफॉल्ट आलेले असतात असा बर्‍याच जणांचा समज असतो. संवाद कौशल्य कुठल्याही भाषेवर अवलंबून नसते.<<< +१००

अनेक विषयांची खिचडी झालीय इथे.

काही निरिक्षणं:
१. साधारण इंग्लिश बोलता, लिहिता, वाचता येणं ही कॉर्पोरेट्सची आवश्यकता आहे. भारताबाहेरच्या अन भारतातल्या विविधभाषी लोकांना एकत्र एका टीममध्ये काम करता येणं ही जर का कामाची गरज असेल तर सगळ्यांना एक कॉमन भाषा येणं जरुरी आहेच. तिथे नुसतं टेक्निकल स्कील कामाचं नाही. अर्थातच टेक्निकल+ कम्युनिकेशन असं दोन्ही व्यवस्थित येणं आवश्यक आहे.

२. असे अस्ले तरी फारसं इंग्लिश बोलता येणं ही गरज नसणारे अनेक प्रकारचे जॉब्स आहेतच. त्यामुळे ज्याला इंग्लिश येत नाही तो काही तेवढ्या एकाच कारणामुळे बेरोजगार रहाणार नाही.

३. १०-१२ वी पर्यंत इंग्लिश शिकूनही कामापुरते चार वाक्य इंग्लिशमध्ये न बोलता-लिहिता येणं, हे केवळ Low aptitude आणि not so right attitude चं लक्षण आहे. आणि हेच अति महत्वाचं कारण आहे, रिजेक्ट होण्याचं.
कारण यावरुन हेच दिसते की इतक्या वर्षात त्या उमेदवाराने त्यावर स्वतःहून काहीही मेहनत घेतली नाहिये. कधी लायब्ररी जाऊदे, रोजचा इंग्लिश पेपर वाचलाय? टीव्हीवर अनेक इंग्लिश कार्यक्रम-सिनेमे येतात, समजून घ्यायच्या उद्देशाने बघितलेत? मित्रांमध्ये बोलायचा प्रयत्न केलाय? डिक्शनरी वापरायची सवय आहे? रोज पेपरमध्ये येणारं शब्दकोडं कधी दिसलंय? हे सगळे स्वस्त आणि प्रभावी उपाय आहेत. अर्थात मी इथे अतिदुर्गम अन अति ग्रामीण, आदिवासी मुलांविषयी बोलत नाहिये तर बेफिकीरने लिहिलेल्या प्रकारचे म्हणजे बर्‍यापैकी शिक्षण घेऊ शकणारे, परवडणारे, आयटीची स्वप्नं बघणारे जे आहेत त्यांच्याविषयी बोलतेय. म्हणजे त्यांचं स्वप्न तर आहे मोठ्या कंपनीत जायचं, पण त्यासाठी किमान आवश्यक स्कील्स डेव्हलप करायची तयारी/aptitiude/attitude नाही.
याउलट मी असे अनेक ग्रामीण भागातून आलेले मुलं/मुली बघितल्यात ज्यांनी स्वत: मेहनत घेऊन स्वतःचे हे प्रॉब्लेम्स सोडवलेत आणि अगदी परदेशी पण आरामात राहताहेत.

४. ज्यांना १०-१२ वर्ष ट्प्प्या- ट्प्प्याने शिकुनही एक विषय (इथे इंग्लिश चेक होतंय, पण खरं म्हणजे कुठलाही एखादा विषय) थोडाही apply करता येत नाही, त्यांना पुढचं नित्य्-नवीन येणारं काम अन त्यासाठी आवश्यक स्क्लील्स डेव्हलप करायला अन मग ते apply करायला किती वर्ष कंपनी देणार? हे पण महत्वाचं कारण आहे रिजेक्ट होण्याचं. तर हे थोडंसं शितावरुन भाताची परिक्षा म्हणतात तसं आहे. कारण मुलाखत घेणारा प्रत्येक उमेदवाराची हिस्टरी-जिऑग्रफी तपासु नाही शकत ना?

५. इंग्लिश नीट बोलता येत नाही, पण टेक्निकल व्यवस्थित आहे अन मुख्य म्हणाजे चटचट शिकण्याचा attitude+ aptitude आहे, तर मग असे लोक केवळ इंग्लिश येत नाही म्हणून रिजेक्ट होत नाहीत. सगळ्याच कंपन्या बेसिक अन अ‍ॅडव्हान्स्ड कम्युनिकेशन स्किल्स, इमेल रायटींग वगैरे कोर्सेस ठेवत असतात. त्यातनं ते कामापुरतं शिकतील एवढी खात्री मात्र कंपनीला असायला हवीच ना?

नताशा, अदीती +१

अधिक लिहायचे झाले तर क्रिकेटमध्ये जसं तुम्हाला नियम ठरवून दिले आहेत, षटकांची संख्या, पिच, हवामान, या सगळ्या बाबींना हारण्याचे कारण सांगता नाही, तसेच कंपनीत (जिथे इंग्रजी + संवाद कौशल्य गरजेचे आहे आणि जिथे नाही तिथेसुद्धा) मुलाखतीसाठी गेल्यावर, हे असच का? तेच का विचारलं असं तुम्ही कसं म्हणू शकता? कंपनीला 'मुलाखतीसाठी कशी चाळणी लावावी' हे ते ठरवणार. तुमचं काम आहे, स्वतःला त्या चाळणीतून पार कसं होता येईल याचा विचार करणे. आणि त्यासाठी अ‍ॅटीट्युड जास्त महत्वाचा आहे. उगाच मार्कलिस्ट्च्या भरवश्यावर नोकरी मिळवण्याचे दिवस संपले आहेत.

वाचतो आहे.

नंदीनी यांचा प्रतिसाद विचार करण्यासारखा वाटला.
कम्युनिकेशन स्किल्स बाय डीफॉल्ट आलेले नसले, तरी असे कोणते फॅक्टर्स आहेत, जे या मुलांपैकी अनेकांना स्किल डेव्हलप करण्यापासून रोखतात/वंचित ठेवतात? असा एक प्रश्न मनात आला.

नताशा यांनी म्हटल्याप्रमाणे खिचडी होतेय खरी, पण ती होणे अपरिहार्य आहे. कारण या विषयात एकमेकांत गुंतलेले अनेक उपविषय आहेत, असे मला वाटते.

भारतीय शिक्षणपद्धतीचे 'फिनिश्ड प्रॉडक्ट' म्हणून नोकरीच्या बाजारात उभी राहिलेली ही मुले आहेत. व हे प्रॉडक्ट डिफेक्टिव्ह आहे. आता यात नक्की प्रॉब्लेम कुठे येतोय?

लाँगटर्म गोल्स मनात ठेवून भारतात सर्वांना उपयोगी ठरेल अशी शिक्षणपद्धती तयार झाली पाहिजे यात कुणाचेच दुमत नसावे. पण अशी पद्धत तयार करताना भारताची प्रचण्ड लोकसंख्या व तिच्यातले अनेकानेक थर, यांचा एकप्रकारे अडथळा येतो आहे काय? सगळ्यांनाच सोपी वाटेल अशी पद्धत तयार करता करता आपण या साखळीतल्या सर्वाधिक कमकुवत दुव्याच्या लेव्हलला येऊन सगळी साखळीच कमालीची तकलादू बनवून टाकली आहे का?

नंदिनी यांनी म्हटल्याप्रमाणे मुलांना १०वी पास होता यावे, व किमान तंत्रकौशल्याचे शिक्षण जे आयटीआय मधे मिळते, ते घेण्याचा मार्ग खुला व्हावा, म्हणून बेसिक इंग्रजीचा अभ्यास 'सोपा' केला गेला. 'पास' होण्यासाठीचे निकष शिथिल केले गेले. पण मग यामुळे या विषयाचा (एकंदरितच भाषांचा) 'अभ्यास' न करण्याकडे कल वाढत गेला असे झाले असावे.

मग यासाठी "टायर्ड" शिक्षणपद्धती हवी का? उदा. ज्याला हवे त्याने 'हायर' इंग्लिश घ्यावे. नको त्याने 'लोअर', इत्यादि काही करता येईल का?

मुले अवांतर वाचन करीत नाहीत. पण त्यांना शिकविणारे शिक्षक तरी ते कुठे करीत आहेत? शिक्षकांची शिकवण्याप्रति अनास्था, वा शिकविण्याची कुवतच नसणे याची जबाबदारी मुलांच्या आजच्या परिस्थीतीत किती?

'हे सगळे राजकारण्यांमुळे खराब झाले' इतके म्हणून प्रश्न सुटत नाही सुटणारही नाही. काहीतरी चांगला मार्ग निघावा, ज्याद्वारे इन स्पाईट ऑफ करप्ट पीपल मेकिंग बिझिनेस ऑफ एज्युकेशन, आपल्या मुलांना अधिक चांगले शिक्षण मिळेल, असे मनापासून वाटते.

इंग्रजी चांगल बोलता न येण एखाद्या भारतीयाच्या रोजगार मिळण्याच्या आड याव हे खरोखरच दुर्दैवी आहे. <<<< +१००००००

कम्युनिकेशन स्किल्स बाय डीफॉल्ट आलेले नसले, तरी असे कोणते फॅक्टर्स आहेत, जे या मुलांपैकी अनेकांना स्किल डेव्हलप करण्यापासून रोखतात/वंचित ठेवतात? असा एक प्रश्न मनात आला.
<<< आवश्यकता काय? हा प्रश्न. मार्क चांगले पडले की नोकरी मिळणारच अशी एक श्रद्धा असते मुलांमधे आणि त्यांच्या पालकांमधे. खूप हुशार म्हणजे खूप जास्त मार्क असे समीकरण आहे. (इथे मला ती आईबाप पोरांच्या तोंडातून लाडू हिसकावतात ती जाहिरात आठवतेय).

ग्रामीण अथवा अर्धग्रामीण भागातल्या मुलांना एक्स्पोझर मिळत नाही असा एक प्रवाद आहे. माझ्या मते तो तित्कासा खरा नाही. या भागामधे विविध स्पर्धांचे आयोजन होत नाही का? या भागामधे स्पर्धापरीक्षा होत नाहीत का? वाचनालये नाहीत का? तरी मुले या सर्वांचा वापर व्यक्तीमत्व विकासासाठी करतात का? किती पालक स्वतःहून मुलाला एकतरी छंद खेळ अथवा कला आलीच पाहिजे असे मानून त्यासाठी प्रयत्न करतात? किती पालक माझ्या मुलाला "एकतरी" भाषा उत्तमरीतीने आली पाहिजे म्हणून कष्ट घेतात? इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलांचे पालक जेव्हा "आता आपण ईट करायचं आणि मग स्लीप करायचं हा" अशी वाक्ये बोलतात तेव्हा मला त्या मुलांची दया येते.

कम्युनिकेशन स्किल्स - संवादकौशल्य म्हणजे नुसते भडाभडा बोलणे नव्हे. समोरच्याचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेऊन त्यावर विचार करून त्याला समयोचित आणि व्यवस्थित मुद्देसूद प्रतिसाद देणे म्हणजे उत्तम संवाद. यासाठी मुळात नीट ऐकणे, ती माहिती नीट प्रोसेस करणे, ती माहिती स्वतःच्या अनुभवविश्वाशी पडताळून त्यावर प्रतिक्रिया देणे वगैरे प्रक्रिया समाविष्ट आहेत. यामधे बोलण्याइतकेच मौखिक, चेहर्‍यावरील हावभाव, देहबोली या सर्वांना प्रचंड महत्त्व आहे. इंग्रजी बोलणे (खरंतर कुठलीही भाषा न बोलतादेखील) उत्तम संवाद साधला जाऊ शकतो. मुलाखत वगैरे एका रीतीने बघायला गेलं तर एकंदरीत संवादकौशल्याचा एक छोटासा भाग आहे. मला इंटरव्ह्यु क्रॅक करायचा आहे म्हणून माझे कम्युनिकेशन स्किल्स चांगले हवेत असा बर्‍याचजणांचा अ‍ॅप्रोच असतो.

लेख आणि त्यावरची चर्चा दोन्ही उत्तम आहेत.

मुलाखतीत जे विचारतात त्यातुन मुलांशी संवाद घडवून मुलाचा स्वभाव, व्यक्तिमत्व, हुशारी (मार्कांची नव्हे) असे तपासले जाते.
आमच्या कॉलेजमधील एक किस्सा. एका मुलीला विचारले.
"छंद काय?"
"कुकिंग"
"काय काय बनवते?"
"वरण, भात, चपाती, इ."
"चपाती कशी बनवतात?"
पीठ भिजवणे, इ. नीट इंग्रजीतून सांगितले, पण आत्ता गाडी अडली पोळपाट आणि लाटण्यावर. यांना इंग्रजी शब्दच ठाऊक नाहीत. मुलगी क्षणभर थांबली आणि सुरु झाली. "देन युज वूडन इन्स्ट्रूमेंट व्हिच इस कॉल्ड अ‍ॅस "पोळपाट" अ‍ॅन्ड "लाटणे" इन मराठी....."
आणि ती सिलेक्ट झाली.
इथे तिची वॉक्येब्युलरी इ. न पाहता "हजरजबाबीपणा" पाहिला गेला.

लेख आवडला आणि पटला. कदाचित ही परिस्थिती स्वतः अनुभवली असल्याने आणि जवळून पाहिली असल्यामुळे असेल.
सांगलीत दहा वर्षांपुर्वी इंजिनीअरींग कॉलेजमध्ये हळूहळू ग्रुप डिस्कशन/इंटरव्यु ह्यांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांचे गट बनायला सुरुवात झाली होती. आता बरीच प्रगती झाली असावी अशी आशा आहे. पण त्यातसुद्धा तुम्ही कुठल्या पार्श्वभुमीतून आला आहात ह्याचा खूप परिणाम होतो. शेतकरी कुटुंबातली, खेड्यातली मुले तिथेही सांगलीतल्या मुलांच्या तुलनेत बुजलेली राहतात. अव्यावसायिक (बीएससी, बीकॉम) विद्यालयातील परिस्थिती त्यापेक्षाही वाईट असे.

या परिस्थितीला शिक्षक आणि शिकवण्याची पद्धत पण जबाबदार आहे.

आपली मराठी माध्यमाची इंग्रजीची पाठ्यपुस्तके पाहिली तर कळते की इंग्रजी धड्यानंतर संवाद, इंग्रजी शब्दसंपदा अश्या पूरक बाबी समाविष्ट केलेल्या आहेत. पण दुर्दैव असे की शिक्षकच या गोष्टी वगळतात.

हे झाले इंग्रजीचे. साध्या मराठी कविताही शिकवताना रसग्रहण, भावार्थ, इ. न समजवता नुसता शब्दार्थ सांगतात आणि करा कविता पाठ झाले. एका तासात ३-४ कविता शिकवल्या जातात.
परीक्षेत "संदर्भासहीत स्पष्ट करा" असा प्रश्न असतो. त्यात विद्यार्थ्याला "त्या" ओळी/वाक्या वरुन काय समजले हे लिहीणे अपेक्षित असते. पण जर एकुण शिकवणेच असे असेल तर मुले काय लिहीणार?

कम्युनिकेशन स्किल्स हे आम्हाला टर्मवर्क पुरते होते. त्याच्या ट्युटोरियलला हमखास बंकिंग व्हायचे. विद्यार्थ्यांचे नव्हे तर प्राध्यापकांचे Happy

अगदी तळमळीने लिहिलेला लेख..... आवडला.

" 'आम्हाला फक्त हा इंग्लिशचाच एक प्रॉब्लेम आहे, तेवढा कराल ना दुर्लक्षित'! " >>> हा मुद्दा छान फोकस केलाय.

इंग्रजीची पाठ्यपुस्तके पाहिली तर कळते की इंग्रजी धड्यानंतर संवाद, इंग्रजी शब्दसंपदा अश्या पूरक बाबी समाविष्ट केलेल्या आहेत. पण दुर्दैव असे की शिक्षकच या गोष्टी वगळतात.

<<< हो, ही पुस्तकं अशा पद्धतीनं लिहिलेली आहेत की मुलांनी शिक्षकांच्या मदतीने गट बनवून गटचर्चा करून ते धडे अभ्यासावेत. पण दुर्दैवाने फक्त परिक्षेत दिलेल्या पॅसेजमधून उअत्तरे शोधून कशी लिहावीत यावरच जास्त भर दिला जातो धडा शिकवताना.

बाफ अजून पूर्ण वाचला नाहीये, वाचत आहे.

नंदिनी तुला नक्की कुठल्या शब्दात धन्यवाद द्यावेत ते काही कळत नाहीये.:स्मित: टाळक्यात खूप वर्षानंतर मोठ्ठ्या ट्युबलाईटस पेटल्यासारखे झालेय्.:फिदी:

काही वेळा घरचे कानाकपाळी बोंबलुन देखील जो फरक पडत नव्हता, तो तुझ्या या संभाषण कौशल्याविषयीच्या पोस्ट मुळे पडलाय. निदान आता माझ्या पिल्लाबाबत्त तरी मला ती काळजी घेता येईल्.:स्मित:

बेफिकीर खूप धन्यवाद तुम्हालाही, कारण मनातले लाखमोलाचे बोललात.?:स्मित:

१९९३ मधे बाबांची बदली झाली म्हणुन पुण्यात आलो. तेव्हाच इंग्रजी बोलण्याचं महत्व आम्हाला कळलं होतं. तोडकं मोडकं इंग्रजीतुन आम्हीही बोलण्याचा प्रयत्न करायचो. मुलाखतीत अगदीच काही नाही तर समोरच्याने "टेल मी अबाउट युवरसेल्फ, किंवा स्ट्राँग पॉईंट्स/ विक पॉईंट्स" विचारले तर काय उत्तर द्यायचं हे घोकुन पाठ केलं होतं.
३-४ वर्षातच, नुकताच बी.ई. झालेला माझ्या मावशीचा मुलगा गावाकडुन आला. तो चाळीसगावजवळच्या शिरुड नावाच्या अत्यंत खेडेगावातुन आलेला. पण तेव्हा १०वी-१२वी बोर्डात आलेला. आणि नंतर जळगावला इंजिनियरींग ला फर्स्ट क्लास फर्स्ट. इंग्रजीची बोंब होतीच.
इथे आल्यावर बाबांनी त्याला प्रायव्हेट प्लेसमेंट एजंन्सीला नाव नोंदवायला सांगितलं आणि इंग्रजीची अडचण सांगितलीच. तरी त्याला थरमॅक्सला नोकरी मिळाली. आणि नंतर वर्षभरातच त्याला हिंदुस्थान एरोनॉटीक्सचा कॉल आल्यावर तिथे रुजु झाला. आता परदेश वारी पण करतो.

सांगाय्चा मुद्दा, टॅलेंट असेल तर इंग्रजी कम्युनिकेशनचा मुद्दा गौण ठरतो. अर्थात जिथे अनिवार्यता आहे तिथे असेलच.

टॅलेंट असेल तर इंग्रजी कम्युनिकेशनचा मुद्दा गौण ठरतो
>>
इच्छाशक्ती असेल तर इंग्रजी कम्युनिकेशनवर मेहनत घेऊन ते सुधारतादेखील येते. मराठी माध्यमातून म. न. पा. च्या शाळेतून शिकूनदेखील उत्तमरित्या इंग्रजी बोलणारी व्यक्ती ओळखीत आहे.

सगळी चर्चा वाचून झाली नाहीये पण तरी माझे २ सेंट -

सध्याचा काळात कष्ट आणि कौशल्ये ही यशाची पायरी आहे हे कुठेही मुलांच्या मनावर बिंबवले जात नाही. तू कोण आहेस पेक्षा तू कोणाचा कोण आहेस हे महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे इथे इंग्रजी-मराठी, ग्रामीण-शहरी इ इ भेद करणे परिस्थितीस फारसे जस्टीस करणारे नाही. कष्ट आणि कौशल्य ह्याला पर्याय आहे हा संदेश मुलांना कोण कोण आणि कुठे कुठे देतय हे तपासले पाहिजे.

मी पहिली ते सातवी मराठी आणि आठवी ते दहावी सेमी इंग्लिश अभ्यासक्रमात शिकलो. इंग्रजी शिकण्याची सुरुवात पाचवीपासून झाली. पण इंग्रजीमध्ये मला बरे मार्क्स पडायचे (सहसा १०० पैकी ८२ ते ८५ च्या दरम्यान, जे तृतीय भाषेसाठी असलेल्या मार्क्स देण्यातील ढिलाईला अनुसरून ठीकठाक मानले जायचे).

मात्र, नोकरी सुरू झाल्यानंतर इंग्रजी अधिक वेगात सुधारू लागले. आज मी जे इंग्रजी बोलतो, बोलू शकतो, त्यात नोकरीत रुजू झाल्यानंतर भेटलेली माणसे, इंग्रजीची आवश्यकता, इंग्रजी भाषेतील अनेक संवाद व लेखन यांना मी सामोरा जाणे यांचा सर्वाधिक प्रभाव आहे. मात्र, व्याकरण हे शाळेतच पक्के झालेले होते.

पण एकुण, माझी पिढी 'बिगिनर / फ्रेशर' होती तेव्हा 'आय टी' हे क्षेत्र नव्हते व इतर क्षेत्रात इंग्रजीची 'प्रचंड' वगैरे आवश्यकता नव्हती / नसावी.

आज अर्थातच निकष बदललेले आहेत.

पुन्हा एकदा हेल्दी चर्चेसाठी सर्वांचे आभार! तरीही, प्रश्नाचे मूळ अजून 'अ‍ॅड्रेस' झाले आहे की नाही हे माझ्यापुरते मला समजत नाही आहे किंवा असे वाटत आहे की नताशा म्हणतात त्याप्रमाणे अनेक विषयांची खिचडी (जी होणे अपरिहार्य असावे) होत आहे. अर्थात, या चर्चेतून काही ठोस तोडगा वगैरे निघू शकेल असे म्हणायचे नसून निदान 'रूट कॉज'वर चर्चा व्हावी इतकेच वाटत आहे.

मुद्दा अजून एक असाही आहे की हा जो इंग्रजी वरील सो कॉल्ड प्रभुत्त्वाचा मुद्दा मुलाखातीसाठी अनिवार्य मानला जातो त्यास मागणी व पुरवठा हा मुद्दाही जबाबदार असावा

अय टी मध्ये आजकाल एका जागेसाठी वॉक इन आहे असे समजले तरी २०० -३०० उमेदवार हजर होतात ....मग त्यातल्यात्यात नेमकेच निवडायचे म्हटल्यास अश्या लहान सहान मुद्द्यानाही अवाजावी महत्त्व द्यावे लागते जसे जर रिक्त जागा पुण्यात असेल तर उमेदवारही शक्यतो पुण्यात वास्तव्यास असलेला प्राधान्याने निवडतात काही जागी तर बोलवतानाच पुण्यात असलेले उमेदवारच बोलवतात

म्हणजे कम्युनिकेशन हा जो खरोखरच महत्त्वाचा मुद्दा असला तरी त्याचा हा जो बाऊ केला जातो म्त्याला लोकसंख्या हेही कारण असावे बहुधा

म्हणजे कम्युनिकेशन हा जो खरोखरच महत्त्वाचा मुद्दा असला तरी त्याचा हा जो बाऊ केला जातो म्त्याला लोकसंख्या हेही कारण असावे बहुधा>> +१००००० raised to n.

इतक्या वर्षांच्या अनुभवावरून असे वाटते की आपल्या विचारसरणीचा हा परिपाक आहे. एकतर ह्या देशात हजारो भाषा. कोणालाही कुठून कुठेही जायची परवानगी मग सगळ्यांना कळेल अशीच भाषा राहता राहिली इंग्रजी. हिंदीला दक्षिणेमध्ये विरोध. पूर्वी मला ते विचित्र वाटायचे पण ३-४ वर्षे तिकडे राहिल्याने कळते की त्यांना हिंदी काय आणि इंग्रजी काय सगळ्याच सारख्या. त्यातल्या त्यात इंग्रजीमुळे बाकीच्या संधी उपलब्ध होतात.

असो पण मुख्य मुद्दा सध्या जे वरती बसले आहेत त्यांचा आहे. त्यांना असे वाटते की इंग्रजी आले तरच तुम्ही लायक नाहीतर नालायक. जोपर्यंत सर्व भाषांना योग्य दर्जा मिळत नाही तोपर्यंत असेच होणार. सध्या ज्या कंपनी मध्ये काम करतो त्यांची सगळ्या युरोपात ऑफिसेस आहेत. त्या त्या देशात त्या त्या भाषेत सर्व कामकाज चालते. त्यांचा इंग्रजी तुटपुंजे आहे आणि आपल्या सारखेच आहे पण इंग्रज कधी त्यांना हसताना आणि कमी लेखताना पहिला नाही. आमच्या एका व्हाईस प्रेसिडेंटच्या एमैल्स कळायला दिवस लागतात. नाहीच कळले तर सरळ सांगतो बाबा तुझी अगम्य इंग्रजी मला कळत नाही मला नीट परत सांग. तो पण तितकाच निवांतपणे आणि बिनधास्त पणे मान्य करतो की त्याला इंग्रजी येत नाही. काम झाल्याशी कारण मग आपल्या कडेच काय इतके त्या इंग्रजीचा सोने लागून राहिले आहे काही कळत नाही. मुळात इंग्रजी आली पाहिजेल का नाही हे जो नोकरी देतो त्याचा निर्णय आहे. आपल्यासारखे त्या निर्णय प्रक्रियेमध्ये कुठेही नाहीयेत त्यामुळे फार काही निष्पन्न होईल असे वाटत नाही.

"इंग्रजी" येणे हा मूळ मुद्दा वा कारण नसावे असे मला वाटते.

जे घडले त्याच्या रूटकॉज बद्दल बोलणे व्हावे असे वर बेफी म्हणालेत.

उदा. आयएएस अधिकार्‍यांस त्यांच्या मातृभाषिक प्रांताबाहेर पोस्टींग देताना, विशिष्ट कालावधीच्या आत तिथली बोली भाषा शिकणे कंपल्सरी करतात. किंवा मला जर माझ्या पेशंटशी बोलायचे आहे, तर त्यांच्या बोली भाषेत संपर्क साधता येणे अत्यावश्यक आहे. मग ती भाषा इंग्रजीच असली पाहिजे असे नाही. इंग्रजी, मराठी, मारवाडी, गुजराती, हिंदी, अहिराणी, मोडकीतोडकी तेलुगू(जी बहुतांशी विसरलो) अशा सगळ्या भाषांत बोलणे मी प्रयत्नपूर्वक शिकलेलो आहे.

संपूर्ण मराठी माध्यमात शिकून (१०वीला इंग्रजीत ९१ मार्क आहेत Wink ) व ११-१२वीत 'यल यम यन'वाल्या टीचर्ससह असलेल्या ज्युकॉ मधे १२वी करून, बीजे ला अ‍ॅडमिशन घेतल्यावर एकदा माझ्या इंग्रजीची परिक्षा झाली होती, ती फर्स्ट इयरलाच. लॉयोलाच्या स्टुडंट मुलींचा स्मार्ट ग्रूप. अन अम्ही दोघे चौघे 'घाटी' कालेज सुटल्यावर खाली आलो, तर सायकल स्टँडवरच्या सगळ्या सायकली पडलेल्या! (हो, त्या काळी मुले सायकलवर बसून मेडीकल कॉलेजात येत. आमचे काही प्रोफेसर देखिल सायकलीवर येत असत) आम्ही दोघे तिघे त्या सायकलींच्या गुंत्यातून आपापली सायकल काढायच्या प्रयत्नात. या मुली फाडफाड अ‍ॅक्सेंटेड विंग्रजीत 'व्हॉट हॅपन्ड' म्हणून आम्हाला विचारू लागल्या. 'समबडी केम अँड पुश्ड द बाईक्स!' हे वाक्य त्यावेळी उत्तरादाखल बोललेले मला आठवते. (हे वाक्य जिला बोललो, ती एकारान्त अमुकतमुक -लिंबाजीरावांच्या भाषेत बर्का-) अन आजतागायत ती परिस्थिती वर्णन करण्यासाठी यापेक्षा जास्त चांगले ग्रामॅटिकली करेक्ट वाक्य मी बोलू शकलो असतो असे मला तरी वाटत नाही. Wink

त्यानंतर प्रयत्नपूर्वक इंग्रजी 'बोलणे' शिकलो. असंख्य इंग्रजी पुस्तके वाचली. इंग्रजी माध्यमातील मित्रांशी, चुकलो तर सांग या बोलीवर, फकस्त इंग्रजी बोलून, शिकलो. आज अनेकांना इंग्रजी शब्द शिकवू शकेन इतपत शब्दभांडार जमवले, अन सफाईदार बोलणे देखिल. पण कदाचित त्याक्षणी त्या लॉयलाईट कन्येला उद्देशून केलेला 'समबडी केम अँड' वाला वाक्यप्रयोग या अभ्यासाला कदाचित कारणीभूत असेल असेही मला वाटते.

इथवर माझी लाल केली, ती उदाहरणार्थ. हे सगळेच उदाहरण आहे असे समजून पुढे वाचू या.

आता या सगळ्यात माझे वैयक्तिक प्रयत्न आहेतच. इतरांच्या सो कॉल्ड पॉलिश्ड वागण्याने दचकून, दडपून न जाता त्यांच्या बरोबरीनेच नव्हे तर त्यांच्यापेक्षा अधिक चांगले करून दाखविण्याची उर्मी माझ्यात आली, ती कुठून? व हे मी करू शकलो ते कशाच्या जोरावर? याचा विचार, रूट कॉज अ‍ॅनालिसिस म्हणुन अपेक्षित आहे, असे मला वाटते.

हे अ‍ॅनालिसिस पुढच्या पोस्टीत. सध्या बी आर बी.

***
चैतन्य,
खालील तुमची पोस्ट अनावश्यक आहे हो Wink नसली तरी चालेल ~wink~

एव्हडी चर्चा कसली कळले नाही... मुळात 'ईंग्रजी यायलाच हवे तेही सफाईदार' ही कसोटी असेल आणि त्यात मुलाखतीस आलेले ऊमेदवार पात्र नसतील तर अर्थातच रिजेक्ट होणारच.

>>'आम्हाला फक्त हा इंग्लिशचाच एक प्रॉब्लेम आहे, तेवढा कराल ना दुर्लक्षित'!
हे तर अगदीच पटले नाही...

ज्या परीक्षेस बसायचे त्याची संपूर्ण तयारी आवश्यक आहेच, ती करणे ही जबाबदारी परीक्षेस बसणार्‍याची आहे. त्यात शैक्षणीक विषमता कुठून डोकावली? नाही ईंग्रजी येत तर शिका, पुढे चला. ऊगाच भावनिक कळवळ्या नकोत की फालतू सामाजिक वा आर्थिक विषमतेची कारणे नकोत.

संवाद कौशल्य, विश्वासपूर्ण देहबोली, हे सर्व कोकाटे क्लासेस किंवा cs courses करून वगैरे येते असा कुणाचा समज आहे का? अगदी ma, phd झालेल्या महाभागांचे ईग्रजी लिखाण व संवाद ऐकले तर भोवळ येईल असे अनुभव घेतले आहेत. with all due respect, many folks who work in so called IT companies at various levels, can't even write a simple technical report in clear and clean English.
Just get over it... move on..

Pages