मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असामी, त्यातूनच शर्मिलाने चेटूक वगैरे बद्दलच्या पुस्तकांबद्दल विचारलं आणि म्हणून ते इतके विविध विषय आलेत चर्चेमधे. Happy

अखेर अनेक दिवस पेंडिंग पडलेलं अंताजीची बखर (नंदा खरे) वाचलं. आवडलं. पण अपेक्षेइतकं नाही. म्हणजे ग्रेट!! वगैरे वाटलं नाही किंवा भारावूनही गेले नाही. कदाचित तो त्या काळात जेवढा क्रांतिकारक इतिहास टिप्पणीचा प्रयोग (तत्कालीन मराठी साहित्य संदर्भात) तितकासा आता दोन दशकांनंतर वाटला नसेल. निदान माझ्यापुरता.
कादंबरी अगदी टिपिकल डीकन्स्ट्रक्शनिस्ट आहे. पेशवाई काळाकडे नव्याने बघायला उद्युक्त करणारी. किंवा खरंतर 'माणसांच्या पातळीवर' त्या ऐतिहासिक व्यक्ती-घटनांना खेचून आणणारी. आणि प्रस्तावनेत लिहिलंय तसं मराठीतल्या 'भव्य-दिव्य' पण पोकळ वाटणार्‍या ऐतिहासिक कादंबर्‍यांवरचा जालीम उतारा म्हणून अगदी मस्तच!

मुळात जो वाचक इंग्लिश/युरोपीअन साहित्याशी (फक्त पल्प फिक्शन किंवा थ्रिलर्सशी नव्हे) परिचित आहे त्याला हे असं डीकन्स्ट्रक्शनिझम फारसं नवं नाही. अगदीच काही नाही तरी ज्यांनी अ‍ॅस्टेरिक्स ची कॉमिक्स वाचली आहेत त्यांनाही नवं नाही. (आणि माझा इतिहासविश्लेषणपद्धतींशी असलेला परिचय हाही माझ्या दृष्टीकोनाला कारणीभूत असणारच) नंदा खरे ही त्यांचं प्रेरणास्थान कुठलं हे अगदी मोकळेपणे सांगतात (नाहीतर आपल्याकडे चटकन कुणी पाश्चात्त्य विचारांकडून/पुस्तकांकडून घेतलेली प्रेरणा कुणी स्पेसिफिकली विचारल्याशिवाय उघड करत नाहीत. अगदी थोर्थोर लेखकराव सुद्धा... मराठी वाचक, जे प्रत्येकवेळा इंग्लिश वाचायला जातातच असं नाही, ते मग त्यांच्या बौद्धिक 'ओरिजिनॅलिटी' मुळे थक्क वगैरे होतात!असोच.). फक्त ही सगळी विचारचौकट मराठेशाही इतिहासाला लावणं हे धाडसाचंच काम आहे. कारण आपण ऐतिहासिक व्यक्तींना माणसं म्हणून बघायलाच तयार नसतो. खरेंनी प्रस्तावनेत हे फार छान शब्दांत मांडलंय..

तळटीपाही खूप उत्तम रीतीने लिहिल्यात. पण मधेच दोन पानं मराठ्यांनी केलेल्या अत्याचारांचे संदर्भ कुठे येतात त्या टीपा मला रसभंग करणार्‍या तर वाटल्याच पण कुठेतरी आधीचा मजकूर लगेच जस्टिफाय करायचा, डिफेन्ड करायचा प्रयत्न वाटला. त्याची काही गरज नव्हती. हे संदर्भ्/जादाची माहिती शेवटी इतर संदर्भांबरोबर आलेली जास्त योग्य वाटली असती.

एरवी ऐतिहासिक कादंबर्‍यांमधे तपशीलाच्या चुकांना फारसा वाव नसतो. इथे तशा चुका नाहीत पण तरीही काही बारीक सारीक विसंगती/चुका आहेत. त्या मराठी वाचकांना चटकन न लक्षात येणार्‍या आहेत. त्याने वाचनानंदात फरकही पडत नाही. पण आता बंगाली जाणून घेऊन वाचताना मला काही गोष्टी, शब्द खटकले. खर्‍यांनी इतकी मेहेनत घेतली तशी एखाद्या बंगाली माणसाशी काही तपशीलांबद्दल बोलले असते तर या गफलती झाल्या नसत्या असं वाटतं -
एक म्हणजे प्लासीच्या लढाईच्या आधी अंताजी रसगुल्ले खातो असा उल्लेख आहे. (एकोणीसाव्या शतकात प्रथम रसगुल्ले बनवले गेले हे काही गुप्तज्ञान नाही)
दुसरं म्हणजे जानेवारीच्या सुमारास तो हिलसा मासा खातो. हे शक्य नाही कारण सरस्वतीपूजेच्या आधी हिलसा खात नाहीत
तिसरं म्हणजे काही अपवाद सोडता बहुतेक सर्व बंगाली स्थळांचे आणि काही पदार्थांचे इंग्लिश उच्चार वापरले आहेत. जो माणूस बंगालात इतका काळ राहिला आहे त्याने बंगाली उच्चार न वापरणं हे अशक्य आहे. उदा: बंगाली माणूस हिलसा ला इलिश म्हणतो, लिचीला लिचू, डमडम नाही तर दमदम, इ.

एकुणात पुस्तक आवडलंय आणि पुढच्या पुणे ट्रिपला बखर अंतकाळाची सुद्धा घेणार. पण सार्वकालिक आवडत्यांमधलं अजून तरी झालं नाहीये.

एक स्वप्नरंजन - कधीकाळी शिवाजीच्या काळावरसुद्धा असं काही लिहिण्याएवढा आणि ते त्याच दृष्टीकोनातून समजून वाचण्याएवढा मराठी वाचक/समाज प्रगल्भ होईल का? बेबंदशाही लिहिणारे औंधकर आज केवळ जिवंत नाहीत म्हणून आणि लोक इतकी जुनीपुराणी नाटकं वाचत्/करत नाहीत म्हणून संस्कृतीरक्षकांच्या तावडीतून सुटले आहेत!!!!

मला हे पुस्तक रैनानी सांगितल्यापासून मला घ्यायचं होतं. पण मी चक्क विसरुन गेले होते. आता तू लिहिल्याबरोबर दोन्ही पुस्तकांची फ्लिपकार्टावर ऑर्डर नोंदवलीये.

ललिताप्रितीचं पुस्तकपण घ्यावं म्हणून बघितलं तर फ्लिपकार्टवर आउट ऑफ स्टॉक दाखवताहेत. Sad

उत्तम परिचय! धन्यवाद. या सुट्टीत नक्की वाचणार.
तू शेवटच्या पॅरात म्हणतेस तसे डिकन्स्ट्रक्शन लिहिल्यावर दुबई-लंडन इत्यादि ठिकाणी 'एक्झाईल'मधे उर्वरित आयुष्य काढण्याइतकी मराठी लेखकांची अजून ऐपत नाही!!!

'तत्वमसि' वाचून झाले. शैलजाने लिहिल्याप्रमाणे नर्मदा काठावर घडणारी ही कादंबरी - धृव भट यांची.

पहिला २/३ भाग अगदी मस्त झालाय. पाश्चात्य संस्कृतीत रमलेला नायक, त्याची भारतीय संस्कृतीशी होत जाणारी ओळख आणि त्यातून सुरू झालेला आत्मशोध हा सगळा प्रवास उत्तम उतरलाय.

पण शेवटी जेंव्हा ल्युसी भारतात येते तेंव्हा पाश्चात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती यातला फरक उलगडून दाखवणे तेवढे छान नाही आलय. आणि त्या नादात लेखक मूळ विषयापासून बाजूला गेलाय असे वाटले. आत्मदर्शनाच्या ध्यासाने नायकाला पछाडलय असे वाटायला लाऊन नर्मदा-दशर्नापाशी जेंव्हा कादंबरी संपते तेंव्हा गोंधळायला होते.

पण पुस्तक एकदा तरी वाचायलाच हवे असेच आहे. Religion, धर्म आणि संस्कृती यातला फरक अलगद उकलून दाखवलाय. अत्यंत हालाखीत जगणार्‍या लोकांकडे असलेली हिमालयाएवढी दानत बघून कधीकधी स्वतःची लाज वाटते. 'पुरीया डाकन भयी' हे वाचल्यावर अंधश्रद्धेपुढे हतबल व्हायला होते. स्वतःच्या भावाच्या वधानंतर 'बित्तु नको बित्तुबंगाच म्हणा' असे म्हणणारा बित्तु डोळ्याच्या कडा ओल्या करतोच.

सुरुवातिला (तांत्रिकतेत आडकल्यामुळे) थोडा रुक्ष वाटलेला अनुवाद पुढे अप्रतिम होत गेलाय. आदिवासी भाषेच्या लहेजातली वाक्य आणि त्यांचा अनुवाद हि द्विरुक्ती होतेय असे वाटत असताना मी त्या लहेजाच्या प्रेमात कधी पडलो ते मलाच कळले नाही. आणि त्याचा मराठी अनुवाद काही ठिकाणी आवश्यकच आहे नाही तर अर्थ न कळल्याने वाचनाची लिंक तुटली असती. इतक्या सुंदर अनुवादाकरता अंजनी नरवणे यांना धन्यवाद द्यायलाच हवेत.

पुस्तक सुचवल्याबद्दल शैलजाचे आभार. Happy

'तत्वमसि' वाचून झाले. शैलजाने लिहिल्याप्रमाणे नर्मदा काठावर घडणारी ही कादंबरी - धृव भट यांची.

>> माधव प्लीज याचा आय एस बीएन नंबर द्याल का?

नंदिनी, 81-7766-405-0 हा त्याचा आय एस बी एन नंबर आहे.पुस्तक बुकगंगावर उपलब्ध आहे. मी तिथूनच मागवले.

धन्यवाद, माधव. दोन तीन दिवसांत मागवेन पुस्तक. बूकगंगावरून या आधी कधी मागवली नाहीत पुस्तकं.

फ्लिप्कार्ट म्हणजे भ.म्ह्.टो झालंय सध्या!!!

'साद देती हिमशिखरे' वाचलं महिन्यापूर्वी. अफाट आहे. किती सोप्या पद्धतीने तत्वज्ञान सांगितलय. लेखकाला व गुरुदेवांना __/\__

लोलिता : व्लादिमिर नाबोकोव्ह ****

लहानपणी वर्गातील मुलांना किंवा शेजारच्या मोठ्या मुलांना नेहमी BHMB म्हणताना ऐकले होते. म्हणजे बडा होके माल बनेगी. अर्थात हे मुलींच्या बाबतीतच. आजूबाजूलाही खूप मुली BHMB टाईप असतात हे नंतर जसे जसे मोठा झालो तसे जाणवले. हळू हळू मला लहान मुलींच्या बाबतीत तसे काहीसे सुदैवाने वाटेनासे झाले. पण काहींच्या बाबतीत मात्र हे जाणवणे व त्यांना सारखे न्याहाळणे वा नजरेतून किंवा प्रत्यक्षात उपभोगणे ही स्टेज संपत नाही. BHMB सारखाच इंग्रजी मध्ये अशा मुलींना एक शब्द आहे तो म्हणजे Nymphet ! लोलिता पुस्तकातील मुख्य कॅरेक्टर अर्थातच डलोरिस हेज ही Nymphet आहे. दुसरे मुख्य किंवा तिच्यापेक्षाही जास्त तोलाचे कॅरेक्टर म्हणजे हम्बर्ट हम्बर्ट हा व्यक्ती. त्याला ह्या Nymphet बद्दल अतोनात प्रेम असते.

हम्बर्ट हम्बर्ट हा एक मिडल एजड युरोपियन डिव्होर्सी. तो पुढे अमेरिकेत जातो. तिथे तो एका घरी किरायाने राहातो. त्या घरी डलोरिस आणि तिची विधवा आई राहत असते. हम्बर्टचे अर्थातच लो वर प्रेम बसते पण त्याला तिच्या आईला कसे दुर करावे ह्या चिंतेत तो असतो. पुढे तो तिच्या आईशी लग्न करतो आणि कथा अनेक वेगवेगळे वळणं घेते. त्यांनी पुढचे दिवस कसे काढले हे सर्व येतं पण त्याची मांडणी ही अंगावर शहारे आणणारी आहे. एकाच वेळी हे पुस्तक रॉक सॉलिड तर त्याचवेळी दुसर्‍या कोणाला बोअरिंग वाटू शकते.

इंग्रजी भाषेशी नाबोकोव्हचा खेळ पाहिल्यास हे इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट पुस्तक का आहे हे कळते. प्रत्येक साधी गोष्ट एवढ्या सुंदरपणे मांडली आहे की बरेचदा वाचक हम्बर्ट हम्बर्टशी सहानुभूती बाळगतो.

ह्या क्लासिक बद्दल कधी दोन शब्द लिहावे असे वाटले नव्हते. पण ते पुस्तक कुठेतरी " शेक यू टू द कोअर" कॅटॅगिरीमध्ये असल्यामुळे अजूनही मनात आहे.

वरदा, 'अंताजीची बखर'बद्दल (विसंगती कळल्या नाहीत, पण बाकी) माझंही असंच झालं. प्रस्तावना वाचून बेहद्द खूश झाले होते, सुरुवातही मज्जेची वाटली, नंतर मात्र - एकदा ते लिहिण्यामागची 'फिलॉसॉफी' लक्षात आल्यावर - नुसते बदलते तपशील वाचणं 'मोअर ऑफ द सेम' कॅटेगरीत जाऊन बोअर झालं.

Chanakya's Chant - By Ashwin Sanghi

चांगलं पुस्तक आहे. Recommended to read.

इंग्रजी भाषेशी नाबोकोव्हचा खेळ पाहिल्यास हे इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट पुस्तक का आहे हे कळते. प्रत्येक साधी गोष्ट एवढ्या सुंदरपणे मांडली आहे की बरेचदा वाचक हम्बर्ट हम्बर्टशी सहानुभूती बाळगतो<< +१.

केदार, मी सध्या ओथ ऑफ वायुपुत्राज वाचत आहे. निम्म्याने वाचून झालंय पुस्तक. पहिल्या दोन पुस्तकांपेक्षा तिसरं जास्त आवडलं मला. Happy

"टु सर विथ लव्ह" हे लीना सोहनी अनुवादित पुस्तक वाचल.छान आहे.शिक्षक आनि टारगट मुल.. वेगळी शाळा... वेगळी धोरणे... नायकाच कृष्णवर्णीय असल्यामुळे नाकारल जाण.छान मांडल आहे.प्रास्ताविकेत काही काही प्रसंग वाचताना रडु येत अस लेखिकेने लिहल आहे.. मी मात्र शेवटच्या पान वाचताना रडले.

'टू सर विथ लव्ह' खरंच सुंदर पुस्तक आहे.. एक समाजशास्त्रीय प्रयोगच मांडलाय म्हणता येईल त्या प्रयत्नाला..

नंदिनी शेवट कसा वाटला ते कळव. माझ्या मते पुस्तकाने तिथे मार खाल्ला.

From the Mixed-Up Files of Mrs. Basil E. Frankweiler - E. L. Konigsburg

OMG! अमेझिंग पुस्तक. खरे तर हे पुस्तक लहान मुलांसाठी आहे. ( एज ग्रूप १० -१२) पण अर्थातच मी हे त्या एज ग्रुप मध्ये वाचले नसल्यामुळे आणि मुलगी एव्हिड की काय अशी रिडर असल्यामुळे तिच्यासाठी आणले आणि काही तासात संपवले. जस्ट अमेझिंग !

बहुचर्चित 'उत्सुकतेने मी झोपलो' उत्सुकतेने वाचलं आणि अ‍ॅज इस एक्स्पेक्टेड, निराशा झाली. म्हणजे त्यांना नक्की काय म्हणायचं होतं? मला कोणी सारांश सांगेल का? समजावून घ्यायचा प्रयत्न करेन.

मला तरी नुसतेच शब्दबंबाळ वाटले. उत्सुकता मात्र जागृत ठेवतात ते, आता काहीतरी होईल, अजून दहा पानांनी काहीतरी होईल करत वाचक वाचत जातो आणि काहीच घडत नाही!

अजून दहा पानांनी काहीतरी होईल करत वाचक वाचत जातो आणि काहीच घडत नाही!>>> Lol मला पण ते पुस्तक फार शब्दबंबाळ वाटलं...

बाकी पुस्तकाचं शीर्षक एकदम अ‍ॅप्ट आहे. Happy

उत्सुकतेने मी झोपलो ही कथाही नाही आणि तिला पात्रही नाहीत म्हणजे पात्र आहेत आणि नाहीत ही. आणि तरी ती गुंफलेली आहे. ह्या कथानकात खरेतर गुंतन्यासारखे काहीच नाही, कधी कोणाला तर कधी कोणाला पडेल वाटत असते. ही एक वेगळी(च) शैली आहे जी गुंतवून ठेवते. तू म्हणतेस तशी उत्सुकता जागृत ठेवते. आणि नेमके तेच कारण श्याम मनोहरांच्या सर्वच कादंबर्‍याबद्दल म्हणता येईल. काही तरी विचित्र अशी गुंफण ते बांधतात व त्यातून एक वेगळाच, स्वतः मध्येच बघण्याच्या संदेश त्यांच्या कादंबर्‍या देतात. मुलभूत गरजा, किंवा अगदी काव्यमय भाषेत म्हणायचे तर ' माणसाचे जगणंच" हे केंद्र्स्थानी ठेवून ते लिहितात त्यामुळे कादंबरीत गुंतले तरी पात्रात गुंतत नाही. हा फॉर्म खूप जनांना दुर्बोध वाटतो. पण त्यांच्या कादंबर्‍याह्या फिलॉसॉफी सांगत असतात.

समजावून घ्यायचा प्रयत्न करेन. >>. त्याची गरज नाही कारण अमुक एक कादंबरी मला समजलीच पाहिजे असा अट्टहास नको. कधी कधी ते लेखन आपल्यासाठी नसतंच त्यामुळे आपलं काही बिघडत ही नाही. युलिसिसचा नाद मी असाच सोडला आहे. Happy आणि त्यांचीच कळ ही अनेकांना भावली, पण मला नाही. तर 'खूप माणसं आहेत' मला आवडली.

ही वरची पोस्ट सहजच. श्याम मनोहरांबद्दल एकुण जनरल.

व्हिव्हिड नाय एव्हिड. Wink
लोलिता मी दोनेक आठवड्यांपूर्वी ग्रंथालयातून घेताघेता राहिले. उगाच आपला बायस. आज ही पोस्ट वाचून मुद्दाम गेले घ्यायला तर उपलब्ध नव्हते. पण वाचेन आता नक्की. धन्यवाद केदार.

व्हिव्हिड नाय एव्हिड >> Lol Lol

युलिसिस वरून आठवले, जेम्स जॉयसचेच डब्लिनर्स हे पुस्तक वाचत आहे. अफलातून आहे.

चांगले लिहिलेस केदार. <त्यामुळे कादंबरीत गुंतले तरी पात्रात गुंतत नाही.> हे पटले.

कादंबरी मला समजलीच पाहिजे असा अट्टहास नको. >> नाही, असे नव्हते म्हणायचे. या फोरमवर अनेकांचे एकाच विषयावरचे वेगवेगळे व्ह्यूज वाचले, की आपोआपच आपलं मत आपल्याशीच तपासलं जातं. दर वेळेला समोरचा बोलत आहे, ते बरोबरच आहे/ नाही असं नसतं. पण किमान ती बाजू समजते तरी. म्हणून विचारलं. थॅन्क्स.

पण किमान ती बाजू समजते तरी. म्हणून विचारलं. >> +1 आणि आय नो की तुझा समजलीच पाहिजे असा अट्टहास नाही. Happy मे बी तो शब्द मी नीट लिहला नाही. पण वी आर ऑन सेम पेज. Happy

'उत्सुकतेने मी झोपलो' केवळ तुम्हाला विचार करायला भाग पाडत नाही तर तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती,नातेसंबंध आणी घटना यांच्याकडे पाहण्याचा नवा द्ष्टीकोन,एक नवीन 'फ्रेम ऑफ रेफरन्स' देते.
माझ्या दृष्टीने ते एक 'ऑल टाईम ग्रेट' आहे

उत्सुकतेने मी झोपलो म्हणजे सुमाधुरी ना Happy वरच्या आगाउच्या पोष्टीला अनुमोदन.

केदारभौ तुम्ही डब्लिनर्स वाचत आहात त्याबद्दल सा. न.. जॉइस हा न उलगडलेल्या लेखकांपैकी एक.. त्याची फिनेगन्स वेक तर अक्षरशः पहिल्या ३-४ पानातच बाजूला ठेवावी लागली.

Pages