मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, शैलजा - म्हणूनच जरा शांतपणे लिहिन म्हणते. अगदी एखादा परिच्छेदच लिहिन पण मुद्दाम लिहावसं वाटतंय.

ह्म्म.. लिही. मला जरासा धक्काच बसला होता ते पुस्तक वाचून. भागवतांनी सतत above all वागावं वगैरे माझी अपेक्षा मुळीच नाही, पण हे पुस्तक वाचल्यावर कोतेपणा हेच आलं मनात आणि मलाच अपराधी वाटलं असं वाटल्याबद्दल Sad बाईंची इतर पुस्तकं वाचून - अगदी पाकृच देखील - आठवले तसे लिहिणार्‍या ह्याच बाई हे मानायला कठीणच गेलं. पुन्हा दुसरी बाजू कळायची कशी?

सध्या सुनंदा गोसावींचं अशोक शेवडेंनी शब्दांकन केलेलं 'माझ्या नवर्‍याच्या बायका' हे पुस्तक वाचतेय. कसलं भन्नाट लिहिलंय.... पहिली चारच प्रकरणं (अनुक्रमणिकेतली, लफडी नव्हेत) वाचून झालीत. पण सुनंदा गोसावींची जिद्द आणि धारीष्ट्य यांचं कौतुक करावंसं वाटतं.

माधव मोहोळकरांचं गीतयात्री वाचलं. स्वातंत्र्याआधीचा चौदा- पंधरा वर्षाचा आणि स्वातंत्र्यानंतरचा साधारण तेवढ्याच काळामधील गाण्यांबद्दल, गायक - गायिका आणि शायर, गीतकार ह्यांच्याबद्दलचे नऊ लेख ह्या पुस्तकांत आहेत. मौज, सत्यकथा, अबकडई ह्या दिवाळी अंकांत, महाराष्ट्र टाईम्समध्ये हे लेख आधी प्रकाशित झालेले आहेत. लिखाण अत्यंत मनापासून आणि आत्मियतेने केलेलं आहे, हे जाणवतं. अनेक जुन्या गाण्यांचे उल्लेख पुस्तकात आहेत. गाणी आणि कलाकारांच्या संबंधित अशा लेखकाच्या स्वतःच्या आठवणीही मधून मधून सांगितल्या आहेत. एकूणात मला आवडलं हे पुस्तक.

लान्स आर्मस्ट्रॉंग प्रकरण गाजत असतानाचा डेव्हीड वॉल्श या क्रीडापत्रकाराने लिहीलेले सेव्हन डेडली सिन्स हे पुस्तक वाचण्यात आले. जेव्हा लान्सने कॅन्सरनंतर पुनरागमन केले आणि टूर जिंकली तेव्हाच वॉल्शला यात काहीतरी काळेबेरे असल्याची शंका आली. आणि त्यानंतर त्याने त्यावर शोध घेऊन एक पुस्तकही प्रकाशित केले..आणि लान्सने त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावाही ठोकला. या सगळ्याने पेटून उठलेल्या वॉल्शने डोपिंगची पाळेमुळे खणून काढली आणि सज्जड पुरावा सादर केला आणि ज्याची परिणीती सगळ्यांना माहीती आहेच.
या सगळ्या मेहनतीची ही कहाणी म्हणजे हे पुस्तक...पण मला तितकेसे भावले नाही. याचे कारण नक्की कशा पद्धतीने लान्सने डोपिंग केले याची तपशीलवार माहीती वॉल्शने दिलेले नाही. पुस्तक प्रकाशित झाले त्यावेळी प्रकरण न्यायप्रविष्ट होते म्हणून असेल कदाचित.
पण पुस्तक बर्यापैकी भरकटत जाते किंवा मला फक्त लान्स आणि लान्सबद्दलच माहीती हवी असल्याने तसे वाटले असावे. एकदा वाचायला हरकत नाही.
आधी इट्स नॉट अबाउट बाईक वाचून झाले होतेच आणि ते वाचून जबरदस्त प्रभावित होऊन सायकल चालवायला सुरुवात केली. त्यानंतर आता लान्सचेच एव्हरी सेकंद काऊंटस वाचतोय...
त्याची लिहीण्याची शैली इतकी जबरदस्त आहे की आता त्याने स्वत जाहीर कबुली दिली असली तरी पुस्तक वाचताना असे वाटत राहते अरे नाही यार...त्याने हे करणे शक्य नाही....
आणि याच कारणासाठी त्याचा अतिव संताप येतोय... माझ्यासारख्या अनेक जणांची जे त्याच्यामुळे इन्स्पायर झाले त्यांची त्याने घोर फसवणूक केली आहे.

मध्यंतरी लाईफ ऑफ पाय पण वाचण्याचा प्रयत्न केला...१० पाने जेमतेम वाचू शकलो..अतीव कंटाळा आला आणि ठेऊन दिले.
आर्यवर्त क्रॉनिकल्स गोविंदा १ हे मेलुहाच्या धर्तीवरचे नविन पुस्तकही तसेच...आता ही बहुदा लाटच आलीये...शिवा झाला गोविंदा झाला आणि रामा कधी येतोय बघुया
अर्थात तरीपण अमिशचे ओथ ऑफ वायुपुत्राज वाचण्याची इच्छा आहे.

धारा,
ते पुस्तक वाचून संपल्यावर हाती काही लागलेच नाही. हे अनुभव सार्वजनिक करण्याचा सुनंदाबाईंचा उद्देश कळला नाही. राजा गोसावींची ह्या लिखाणाला पूर्ण परवानगी होती, पण एकाही बाईचं नाव लिहायचं नाही अशी त्यांची अट पाळलेली आहे. मग आता तेव्हाचा काळ उलटून गेल्यानंतर जर तुम्ही एकत्र गुण्यागोविंदाने नांदताय, तर आता ते अनुभव लोकांसमोर आणून नवर्‍याची (आणि परीणामी स्वतःचीही) बदनामी करण्यासारखंच झालं नाही का? त्याकाळी ते धाडसाचं ठरलं असेलही, पण आता आपल्या पिढीला वाचून चीडच येईल, राजा गोसावींची नव्हे; सुनंदाबाईंचीच आणि ते अनुभव शब्दबद्ध करणार्‍या अशोक शेवड्यांचीही. ती लेखमाला आधी चित्रानंदमधे (मासिकात की पाक्षिकात) लिहिली होती, आणि त्यानंतर पुस्तकरूपात आणली.
पुस्तकपरीचय लिहिण्याची माझी अजिबात इच्छा नाही. Happy

हे अनुभव सार्वजनिक करण्याचा सुनंदाबाईंचा उद्देश कळला नाही. आता तेव्हाचा काळ उलटून गेल्यानंतर जर तुम्ही एकत्र गुण्यागोविंदाने नांदताय, तर आता ते अनुभव लोकांसमोर आणून नवर्‍याची (आणि परीणामी स्वतःचीही) बदनामी करण्यासारखंच झालं नाही का? त्याकाळी ते धाडसाचं ठरलं असेलही,

>>> बराच काळ उलटून गेल्यावर, नंतर पुन्हा गुण्यागोविंदानी नांदायला लागल्यावरही त्या विशिष्ट काळातल्या घटना, तेव्हा सोसावे लागलेले अपमान, नैराश्य, दु:ख, संताप हे सगळं मनातून गेलेलं नसणारच नक्की. लोकप्रिय, प्रसिद्ध नवर्‍याची कारकीर्द जगासमोर आल्यावर त्यांच्या बायकोला आपलंही आयुष्य जगासमोर यावं, तो उलटून गेलेला काळ,त्या काळातलं त्यांना दाखवावं लागलेलं धाडस(?), त्यांची फ्रस्ट्रेशन्स इत्यादीसकटचं स्वतःच आयुष्य लोकांनाही कळावं असं वाटलेलं असण्याची शक्यता नाही का? प्रसिद्ध नवर्‍याच्या बायकोचा त्याच्या प्रसिद्ध झालेल्या कारकिर्दीत काहीना काही वाटा असतोच, त्याचे श्रेय तिला बरेचदा नाकारले गेलेले असते, ते श्रेय या मार्गाने मिळवण्याचाही प्रयत्न असू शकतो अशी आत्मचरित्र म्हणजे.

मी पुस्तक वाचलेलं नाही. आणि मंजुडी हे फक्त तुझ्याच पोस्टला उद्देशून असे अजिबात नाही. पण प्रसिद्ध नवर्‍याची बायको त्या नवर्‍याचं गुण-गान गाणारी, बरेचदा त्याचे दोषच दाखवणारी, त्याला बदनामी करणारी आत्मचरित्र लिहून नेमकं काय मिळवते हा प्रश्न वारंवार उपस्थित होत असतो. जणू तिला तसं करण्याचा अधिकारच नाही अशा अधोरेखित अर्थाने. याच संदर्भातलं पोस्ट मी आधीही कधीतरी टाकलं होतं. आत्ता रहावलं नाही म्हणून पुन्हा लिहिते आहे.

जयपूरमध्ये गेले दहा वर्षे साहित्य मेळावा भरवतो त्या विल्यम डर्लिँपल याचे 'व्हाईट मुघलस्' वाचतोय . हैद्राबादच्या निझामाच्या दरबारात ब्रिटिश रेसिडेंट एजंट असणाऱ्या जेम्स कर्कपैटरिकचे तिथल्या मंत्र्याच्या भाचीवर प्रेम जडते त्यावर लिहिलेला कादंबरीवजा इतिहास पाचशे पानांत संदर्भ टिपणांसह ओघवत्या भाषेत लिहिला आहे . "इतिहासकारांना इतिहास आणि कादंबरीकारांना कादंबरी कशी लिहायची" हे शिकवणारे पुस्तक .इतिहास कंटाळवाणा असतो हा भ्रम दूर होतो .

ही टीका आहे मनोहर परि यावरही झाली होती म्हनजे सुनीताबाईंनी पुलंचे जे काही दोष दाखवले आहेत त्याबद्दल आणि मतभेताचे मुद्दे सार्वजनिक केल्याबद्दल. काहीना तो पुलंचा प्रतिमाभंग वाटला होता.

हेन्री जेम्स यांच्या 'अमेरिकन' चा अनुवाद,अनुवादक चक्क गंगाधर गाडगीळ, 'संघर्ष' नाव, मॅजेस्टिक बुक स्टॉल..पाल्हाळिक,पण गुंतवून ठेवणारा वाचनानुभव.

हहच्या पोस्टीवरून राशा मागवले. ते आज जवळपास एक-दोन बैठकीत वाचले. लिहिण्याची शैली हलकी व खुमासदार आहे. सुरुवातीचा अर्धा-६०% भाग सुंदर जमला आहे. पण शेवटी 'संपवण्याच्या' (क्लोजर) नादात फार हिंदी सिनेमासारखे झाले आहे. एव्हड्या भल्या मोठ्या सोविएतमध्ये तीच ती मंडळी पुन्हा पुन्हा भेटणे, त्यांचे एकमेकांचे घोळके-व्यावहारीक संबंध जमणे वगैरे जाम ओढून ताणून लिहिल्यासारखे वाटले. एकदा वाचण्यास ठिक ठिक पुस्तक.

दुपारपासून युवराज सिंगचे 'the test of my life - from cricket to cancer and back' हे पुस्तक वाचले. सुरेख आहे. शारदा उग्राने उत्तम लिहिले आहे (प्रस्तावना सोडल्यास कुठेही शारदा उग्राचे नावही नसणे खटकले. खरेतर सहलेखक म्हणुन तिचे नाव असणे गरजेचे होते). युवराजने अत्यंत प्रामाणिकपणे हे कथन केले आहे. नक्कीच वाचण्यासारखे आणि प्रेरणादायी.

मी हे वरपर्यंत स्क्रोल करून बघितले व नाद सोडून दिला. त्यात टण्याला आवडले म्हणजे काहीतरी हेवी असणार हा ही एक समज Happy

मी हे वरपर्यंत स्क्रोल करून बघितले व नाद सोडून दिला>> +१.

त्यातून सध्या मी द नेम ऑफ द रोझ हे भंजाळू पुस्तक वाचतंय. मोठ्या कष्टाने "वाचूच न शकलेली पुस्तकं" मधे याची एंट्री होऊ नये म्हणून प्रयत्न करतेय. पण बरेचसे रेफरन्सेस लक्षात येत नाहीत. मग जय गूगल बावा/

पुस्तक संपलं वाचून की मगच सिनेमा बघ, नंदिनी Happy
सिनेमा जास्त अ‍ॅक्शन ओरिएन्टेड आहे (साहजिकच) पण पुस्तक केवळ महान लिहिलंय. फक्त त्याची पुढची सगळी पुस्तकं महाबोर, रीपीटिटीव्ह आहेत

वरदा, त्या काळाबद्दल अथवा त्या मॉंक्सबद्दल जास्त माहित नाही.. त्यामुळे जेमतेम दोन पानं सलग वाचू शकतेय. हेच पुस्तक आमच्या दिनू तपकिर्‍याने कसं लिहिलं असतं असा एक वेगळाच ट्रॅक डोक्यात चालू असतं ते वेगळंच. Happy

हे फक्त तुझ्याच पोस्टला उद्देशून असे अजिबात नाही.>> शर्मिला, मला असं अजिबात वाटणार नाही. Happy

त्यांना असं लिहिण्याचा अधिकार नाही असं म्हणण्याचा माझा उद्देश नाही. मला खटकलं काय तर मूळात त्यांचं लग्न झालं ते सुनंदाबाईंच्या पुढाकारामुळेच. राजाभाऊंनी त्यांच्यावर आपलं प्रेम आहे, लग्न करायचं आहे इत्यादी भावना अजिबात व्यक्त केलेल्या नव्हत्या. आणि एकूणच त्याविषयीचं वर्णन वाचताना मला असं वाटून गेलं की सुनंदाबाईंनी हे लग्न त्यांच्यावर लादलं. मग पुढे राजा गोसावी त्यांच्या मूळ स्वभावानुसार वागले असतील तर त्यात नवल ते काय. त्या पुस्तकात वापरलेली भाषा अजिबात अपील होणारी नाही, किंवा वर्णन केलेले प्रसंग आताच्या काळात अतिशय विसंगत वाटतील. ती लेखमालिका आधी चित्रानंदमधे प्रकाशित झाली होती, त्याकाळी अर्थातच गाजली होती, पण पुन्हा पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचा उद्देश कळला नाही. Happy
ते पुस्तक कोणीतरी आईला वाचायला दिलं होतं म्हणून माझ्याही वाचनात आलं.

जेव्हा मी पुस्तक वाचायला सुरुवात केली तेव्हा मलाही माहिती नव्हती त्या काळाबद्दल. पण मी एकदा हातात घेतल्यावर मधे खाली ठेवत नाही (शिवाय तेव्हा हाताशी गूगल नसायचं - १९९७ मधे). पण कुठे अडखळायला झालं नाही. सगळे संदर्भ पहिल्यांदाच लक्षात आलेही नसतील पण त्याने कुठं काही अडलं नाही. ते तसं अडू नये याची काळजी प्रत्येक लेखक घेणारच की. अगदी सगळ्या युरोपिअन्सनाही तेराव्या शतकातला इतिहास माहित असेलच असं कुठे असतं? ते एक थ्रिलर आहे आणि असं मधे मधे ऑफ ट्रॅक झालीस तर वाचनाच्या ओघात खंड पडेल असं नाही का वाटत?
म्हणजे हे आपलं मला वाटतं म्हणून लिहिलं - तू कसं वाचावंस हा तुझा प्रश्न Happy Light 1

मी पुस्तक नाही वाचलंय. फिल्म मात्र माझ्या अतिशय आवडत्या फिल्म्सपैकी एक आहे.
मला ती फिल्म अ‍ॅक्शन ओरिएण्टेड वगैरे नाही वाटली. उत्तम प्रकारे केलेली केलेली ऐतिहासिक रहस्यकथा अशी वाटली.

पुस्तकांवरून केलेले सिनेमे पुस्तकांच्याइतके ग्रेट नसतात किंवा करूच नयेत असं मत बरेचदा वेगवेगळीकडे उमटलेलं दिसतं (कोणा एकाचं नाही. अनेकांचं!)
मला वाटतं हा माध्यमबदल आहे आणि पुस्तकाने तुम्हाला दिलेला अनुभव एक्झॅक्ट तसाच फिल्मकडून मिळणं शक्य नाही. त्या अपेक्षेने फिल्म बघणंही योग्य नाही. फिल्मच्या दोन तासांच्या काळात एक कथा सादर करायची असते सर्व तपशीलांसकट तेव्हा पुस्तकाचा अनुभव आणि फिल्मचा अनुभव वेगळा असणारच हे मान्यच करायला हवे.

पुस्तक वाचलेलं असेल तर फिल्म आवडणार नाही, फिल्म पाह्यली असेल तर पुस्तक आवडणार नाही वगैरे असतंच. पुस्तकावरून प्रेरणा घेऊन केलेली अमुक कलाकृती एवढाच रेफरन्स ठेवावा मधे. ते बरं.

(हे वरदाच्या पोस्टवर उत्तर म्हणून नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नये.)

मला वाटतं हा माध्यमबदल आहे आणि पुस्तकाने तुम्हाला दिलेला अनुभव एक्झॅक्ट तसाच फिल्मकडून मिळणं शक्य नाही. त्या अपेक्षेने फिल्म बघणंही योग्य नाही. फिल्मच्या दोन तासांच्या काळात एक कथा सादर करायची असते सर्व तपशीलांसकट तेव्हा पुस्तकाचा अनुभव आणि फिल्मचा अनुभव वेगळा असणारच हे मान्यच करायला हवे.>> हज्जारो मोदक Happy

अगं, तू पुस्तक वाचलंस की कळेल मी त्या फिल्मला अ‍ॅक्शन ओरिएन्टेड का म्हणतेय ते.. म्हणजे ते खूनसत्र आणि रहस्य हे पुस्तकाच्या थीमचा 'एक' भाग आहेत. त्याचा कथापट हा मुळात चर्च, ज्ञानसंपादन, त्यावरचा सिलेक्टिव अ‍ॅक्सेस, त्यावरचा धर्मसत्तेचा ताबा. प्री रेनेसाँ युगात हळूहळू येणार्‍या वैचारिक बदलांची नांदी कशी दिसायला लागलीये आणि अशा अनेक संबंधित गोष्टींनी बनलाय. ते सग्ळं प्रत्येक वेळा दृश्यमाध्यमात आपण दाखवू शकणारच नाही Happy

वरदा, मी तसंच रेटत पुढे वाचत जाऊ शकेन. पण पहिल्या दीडशे पानांमधे खूप वेळा अडखळतेय. मुळात मला ते चर्चेस, त्यांची रचना आणि ती पूर्ण संस्कृती मला अगदीच अपरिचित आहे.

पण तू म्हणतेस तसं प्रत्येक संदर्भ गूगलत राहिलं की ऑफ ट्रॅक मात्र बर्‍याचदा होतेय. Happy

या पुस्तकाचा एक सुंदर रीव्ह्यु

फक्त त्याची पुढची सगळी पुस्तकं महाबोर, रीपीटिटीव्ह आहेत>>> त्याचं हेच एक पुस्तक प्रचंड गाजलंय ना? बाकीची पुस्तकांबद्दल कुठे फारसं वाचलेलं नाही.

मला वाटतं हा माध्यमबदल आहे आणि पुस्तकाने तुम्हाला दिलेला अनुभव एक्झॅक्ट तसाच फिल्मकडून मिळणं शक्य नाही. त्या अपेक्षेने फिल्म बघणंही योग्य नाही. फिल्मच्या दोन तासांच्या काळात एक कथा सादर करायची असते सर्व तपशीलांसकट तेव्हा पुस्तकाचा अनुभव आणि फिल्मचा अनुभव वेगळा असणारच हे मान्यच करायला हवे.>> नी, बरोबर. अगदी एखाद्या पुस्तकावरून मालिका काढली आणि पुस्तकामधील प्रत्येक घटनेला प्रामाणिक ठेवली तरी माध्यमबदल होताना काहीवेळा अ‍ॅडॅप्टेशन होणारच.

ह्म्म मग नक्कीच वाचायला हवं पुस्तक.
प्री रेनेसाँ बद्दल आमच्या विषयाच्या अंगाने येणारी थोडीशी माहिती आहे.

चर्च, ज्ञानसंपादन, त्यावरचा सिलेक्टिव अ‍ॅक्सेस, त्यावरचा धर्मसत्तेचा ताबा <<
याचे संदर्भ येतात सिनेमात पण ते जाणवायला किंचित तरी या सगळ्याची माहिती पाहिजे हे नक्की.

हो. तो राजकाशानाचा ब्लॉग आहे. Happy

वरदा, तेरेको एक और क्वेश्चन पूछना है. ख्रिश्चन धर्मामधे सिम्बॉल्स साइन्स या गोष्टींना इतके महत्त्व का दिलेले असते कायम? इतर धर्मांमधेदेखील असे साईन्स आणि सिम्बॉल्स असतात मग त्यावरून रहस्यकथा का लिहिलेल्या नसतात? Happy प्रश्न यडपट आहे हे मान्य आहे पण प्रश्न पडलेला मात्र आहे.

Pages