मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आदिनाथ हरवंदे लिखित 'लालबाग' ही कादंबरी कुणी वाचली आहे काय?
रविवारी या पुस्तकाच्या ३र्‍या आवृत्तीचं ठाण्यात प्रकाशन होतं. अशोक हांडे, डॉ.महेश केळुस्कर, कवि अरूण म्हात्रे वगैरे जुने लालबागकर आले होते. कार्यक्रम खूप छान झाला. अशोक हांडे खूप भारावून जाऊन लालबागच्या जुन्या आठवणींत रमले होते. त्यांनी आपल्या प्रकट स्मरणरंजनानं कार्यक्रम मुळी काबीजच केला.
कार्यक्रमाच्या ठिकाणी पुस्तक चाळलं. लालबाग-परळ, गिरणगावबद्दल, तिथल्या संस्कृतीबद्दल मिळेल ते वाचायला मला आवडतं, लगेच वाचलंही जातं. पण हे पुस्तक त्वरित विकत घ्यावं असं प्रथमदर्शनी वाटलं नाही.
कुणी वाचलं आहे का? तर कृपया लिहा.

ललिता, मी वाचले आहे. वाचण्यासारखे आहे नक्कीच. त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीचे व राजकारणाचे वर्णन चांगले वाटले मला. मुंबईच्या राजकीय नेत्यांबद्दलही बरीच नवीन माहिती मिळाली होती.

टिंकर... चा अनुवाद वाचून सांगतो मीही.

धूळपाटी वाचतेय. वेगवेगळे लेख आहेत हे लक्षात घेतलं तरी इतकं निरुद्देश आत्मचरित्र याआधी वाचलं नाही. प्रस्तावना एकदम खणखणीत आहे आणि ती वाचल्यावर पुस्तकाबद्दल अपेक्षा वाढतात. पण प्रत्यक्षात काहीच हाती लागत नाही.

जगन फडणीस यांनी लिहिलेले 'महात्म्याची अखेर' वाचले. अनेक संदर्भग्रंथ, तत्कालीन वृत्तपत्रे यांचा आधार घेऊन हे पुस्तक लिहिले आहे. फाळणी आणि पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देणे यासाठी गांधींना जबाबदार धरून त्यांचा खून करण्यात आला या तर्कसंगतीतला फोलपणा दाखवण्यासाठी हे पुस्तके लिहिले गेले. प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे माहीत नसलेल्या, क्वचित नवल वाटेल अशा अनेक गोष्टी हे पुस्तक वाचून कळल्या.
'उत्तर देण्यासाठी' लिहिलेले पुस्तक असल्याने म्हणून की काय तोच मजकूर पुन्हा पुन्हा येत राहतो; वेगवेगळ्या प्रकरणांतच नाही तर एकाच परिच्छेदातही. शेवटची दोन प्रकरणे 'हिंसेचे राजकारण' आणि 'विचारसरणी' मात्र त्यामानाने बंदिस्त आहेत.

पुस्तकात संदर्भासाठी दिलेले अनेक ग्रंथ टु रीड यादीत गेले आहेत.

>>> प्रस्तावना एकदम खणखणीत आहे आणि ती वाचल्यावर पुस्तकाबद्दल अपेक्षा वाढतात. पण प्रत्यक्षात काहीच हाती लागत नाही.
--- :(, काही वर्षांपूर्वी हे पुस्तक मिळवण्यासाठी खटपट केली होती; पण बहुधा आऊट ऑफ प्रिंट असल्याने मिळालं नव्हतं. आता वाचताना अपेक्षा काहीशा कॅलिब्रेट करून वाचायला हवं.

>>> पुस्तकात संदर्भासाठी दिलेले अनेक ग्रंथ टु रीड यादीत गेले आहेत.
--- ह्या संदर्भयादीबद्दल वाचायला आवडेल. काही ठळक नावं सांगू शकाल का?

अनेक पुस्तके गाजलेली/प्रसिद्ध अशीच आहेत.
गिल्टी मेन ऑफ पार्टिशन : डॉ राममनोहर लोहिया, फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट -
डॉमिनिक लॅपिए व लॅरी कॉलिन्स, इंडिया विन्स फ्रीडम - मौलाना आझाद, भारतीय राष्ट्रवादाचा विकास : न.र.फाटक, स्वामी विवेकानंद - ग्रंथावली संचयन, सत्तांतर -गोविंद तळवलकर, गांधी - प्रा. नलिनी पंडित
गांधींच्या निकटवर्तियांनी लिहिलेली : महात्मा गांधी द लास्ट फेज - प्यारेलाल आणि महात्मा - डी.जी. तेंडुलकर.

पुस्तकासाठी फडणीसांनी न्या.कपूर‍ आयोगाच्या अहवालाचा आधार घेतला आहे. या आयोगाच्या कामकाजाचे वार्तांकन करणारे ते एकटेच पत्रकार होते असाही उल्लेख आहे.

झैदींच "डोंगरी ते दुबई" नुकतच वाचून झालं. उत्तम पुस्तक आहे, भरपूर माहिती समजली.
नलिनी जोशींच " राणीच्या राज्यात" अगदीच बाळबोध वाटल.

माझे आवडते संगीतकार ओ.पी. नैयर यांच्यावरचे पुस्तक दिसले म्हणून उत्सुकतेने वाचायला घेतले. घोर निराशा झाली. प्रल्हाद आवळसकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव 'ओ पीं नैयर आणि मी' असे असले तरी हे सगळा प्रकाशझोत 'मी'वरच आहे. पुस्तक वाचून ओपींबद्दल, माणूस किंवा संगीतकार म्हणून, फारच थोडे नवे काही वाचायला मिळाले. लहानपणापासून गाणी ऐकण्यासाठी आणि फक्त तेवढ्यासाठी म्हणून सिनेमे पाहण्यासाठी म्हणून काय खटपटी-लटपटी केल्या त्याचे वर्णन, पुढे ओपींशी भेट व्हावी म्हणून केलेल्या खटपटींचे वर्णन, भेट झाल्यावर त्यांच्याशी जुळलेल्या स्नेहबंधाचे वर्णन.बास.
लहान वयात कानावर पडणार्‍या संगीतातून एकाच संगीतकाराच्या रचना तेवढ्या झपाटून टाकतात (त्या वयात संगीतकार म्हणजे काय हेही कळत नसताना??), त्या संगीतकाराच्या रचनांपैकी दोन गायकांच्याच(शमशाद-गीता यांचा, त्यांनी गायलेल्या गाण्यांचा संपूर्ण अनुल्लेख) तेवढ्या रचना कशा आठवतात हे कळले नाही. अर्थात अर्पणापत्रिका ओपी-रफी-आशा या त्रिमूर्तीवर प्रेम करणार्‍या संगीत रसिकांना अशी आहे. तरीही....
ओपींच्या संगीताबद्दल १६० पानी पुस्तकात विखरून फार तर दीड-दोन पान मजकूर. तोही त्यांच्या संगीतातील खुबींबद्दल त्यांनाच काय काय ऐकवले आणि त्यांनी त्या ऐकण्या-बोलण्याचे कसे कौतुक केले अशा थाटात.

कालच अकुपार वाचून संपवली. गीरच्या पार्श्वभूमीवर एका चित्रकाराच्या आत्मशोधाची गोष्ट फारच भावली. खुप साध्या सरळ प्रसंगांमधून नायकाला आयुष्याचे तत्त्वज्ञान उलगडत जाते.
गीर, आसपासचा परिसर, सिंह, तेथे राहणारे लोक, त्यांच्या श्रद्धा, त्यांचे परस्पर संबंध, सिंहांविषयीचे प्रेम अशा अनेक गोष्टींमधून कथा पुढे सरकत राहते आणि सहजपणे बरेच काही सांगत राहते.
नायकाबरोबर आपल्यालाही काहितरी नवीन गवसतयं असा अनुभव येत राहतो.

एक प्रसंग सांगितल्याशिवाय राहवत नाही :
धानू टुरिस्टना सिंहाच्या हल्ल्यापासून वाचवताना जखमी होतो. त्यावेळी ज्यांना वाचवण्यासाठी धानू हा धोका पत्करतो ते मात्र त्याला तिथेच सोडून पळून जातात. नायकाला ह्या गोष्टीचा प्रचंड संताप येतो. पण धानू आणि त्याची आई मात्र न रागवता नायकाला सांगतात की स्वभावधर्मानुसार प्रत्येकजण वागतो. अशा प्रसंगात पळून जाणे हाच त्या लोकांचा स्वभाव आहे, त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे?

'अकुपार' नावाच्या कासवाची कथाही प्रथमच कळली हे पुस्तक वाचताना.
पण काही इतर कामांमुळे वाचताना मधे मधे खूप खंड पडत होता. एकदा पुन्हा नीट आणि सलग वाचणार आहे. अजून काहीतरी नवीन नक्कीच सापडेल Happy

ह्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल शैलजा ह्यांचे मनापासून आभार! Happy

अकूपार आणि तत्वमसि ही ध्रूव भटांची पुस्तकं मराठीत कोणी अनुवादीत केली आहेत? कोणते प्रकाशन? उपलब्ध आहेत का?

शर्मिला,
अकुपारः अंजली नरवणे, मेहता पब्लिशिंग.

मला अकुपार क्रॉसवर्ड्स मधे मिळाले, तत्वमसि आणि सागरतीरी काही मिळाली नाहीत.
शिवाय क्रॉसवर्ड्स सेल चालू असल्याने २०% ऑफ मिळाले. Happy

श्याम मनोहरांचे 'खेकसत म्हणणे आय लव्ह यू' वाचले. आवडले पण 'उत्सुकतेने मी झोपलो' इतके नाही.
अजब, धमाल फॉर्म हे त्यांचे वैशिष्ठ्य आहेच पण ग्रेट भाग हा की ते त्या फॉर्मच्या गमतीमधे अडकून पडत नाहीत. त्यांची पात्रे त्याबाहेर येऊनही आपल्याशी बोलतात.
बहुतेक मुद्दे 'उत्सुकतेने..' मधलेच आहेत पण त्याबद्दलची लेखकाची असोशी इतकी तीव्र आहे की बोअर होत नाही. सामान्य जीवनाचे, एखाद्या प्रसंगाचे अत्यंत डीटेल वर्णन करताकरता एकदम लख्ख वीजेसारखे डोक्यात प्रकाश पाडणारे वाक्य ही खास शाममनोहरी मजा मात्र आहेच आहे!!
'तुम्ही एकांतवासात कधी गेला होतात?' हा माझ्यादृष्टीने हा पुस्तकाचा 'टेक अवे' प्रश्न आहे.

खरे आहे. श्याम मनोहरांची पुस्तकं म्हणजे कधी कधी गटण्यासारखे एखादे वाक्य लिहून काढून आठवणीत ठेवावे असे आहे. एक कळ सोडले तर मला त्यांची बहुतेक पुस्तकं आवडली आहेत.

अशात अनेक पुस्तकं वाचली. पण त्यातील Netaji in Nazi Germany हे Romain Hayes ह्यांचे पुस्तक उल्लेख करण्याजोगे.

पुस्तकाचा उद्देश नाझी जर्मनी आणि नेताजी असा असला तरी त्यातून गांधी - नेताजी, नेताजी - जपान, नेताजी - फॅसिस्ट मुसोलिनी असे अनेक पदर उलगडत जातात. तत्कालीन भारतीय अन जागतिक राजकारणाकडे एका वेगळ्या नजरेने हे पुस्तक पाहावयास भाग पाडते. मस्ट रिड कॅटॅगिरी.

डॉ. श्रीराम लागूंचे 'लमाण' वाचले.
'झिम्मा' बद्दलच्या चर्चेदरम्यान लमाणचा उल्लेख आला होता आणि चिन्मयने सुचवले होते म्हणून लमाण वाचायची उत्सुकता होती. झिम्मा नुकतेच वाचलेले असल्याने हे पुस्तक वाचत असताना दोन्ही पुस्तकांची तुलना केली जात होती.
नाटकांबद्दल लागूंनी विजयाबाईंपेक्षा फारच त्रोटक आणि कोरडं लिहिलं आहे. काही ठिकणी काही नाटकांचा नुसताच उल्लेख येतो.. त्यांच्याबद्दल अजून वर्णन असतं (कथा, दिग्दर्शनातले बारकावे, प्रयोग बसवताना तसच करताना आलेल्या अडचणी वगैरे) तर जास्त आवडलं असतं.
सेन्सॉरशिप बद्दलचं विस्तृत विवेचन खूप पटण्याजोगं आहे. तसच नाट्यप्रवासाबद्दल लिहिताना त्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितीवरच्या टिपण्ण्याही काळ समजून घ्यायला मदत करतात.
एकंदरीत झिम्मा इतकं नाही आवडलं पण पुस्तक संग्राह्य नक्कीच आहे.

"द गूड अ..र्थ" वाचतोय....सुरुवात तर जबरी वाटतेय!
चीन मधलं एक आगळं वेगळं जग उभं राहतय.

सध्या नाथमाधवांचे विरधवल वाचते आहे. थोडी वेगळ्या पध्द्तीची लेखनशैली आहे. मोठ्या भावाला तो भाऊ वडील आहे असे संबोधन किंवा आईला, 'प्रियकर आई' असे संबोधन वापरले आहे. जुनी मराठी शैली वाचताना खरंच मजा येते आहे. विशेष म्हणजे 'आता कथेचा नायक काय म्हणतो ते पाहुया' अशी वाक्यरचना सतत वापरली आहे, त्याचे मात्र फार हसु येते. पण कादंबरी उत्तम आहे.

टिंटेसोस्पाबद्दलच्या पूनमची पोस्ट (आणि त्यापुढच्या सगळ्याच पोस्टी) आज वाचल्या.

पूनमने पुस्तकाबद्दल अगदी नेमकं लिहिलं आहे. मी बरेच दिवस ते पुस्तक जवळ बाळगून होते. आधी लिहिल्याप्रमाणे त्यात गुंतून जाऊन वाचणं जमतच नव्हतं. पण ललीची भेट होणार, तिला पुस्तक पर करायचंय हे कळल्यावर अगदी मानेवर खडा ठेवून वगैरे नेटाने पुस्तक वाचून काढलं. कटकारस्थानं, त्यांचा लावलेला छडा, गुप्तहेर इत्यादी विषय मला वाचायला आवडतात, पण आपण वाचत असलेल्या पुस्तकाचा विषय 'हा' आहे, हे जवळपास पाऊण पुस्तक वाचून झाल्यावर कळते.
पूनमने लिहिल्याप्रमाणे ललीने अनुवाद मात्र अगदी सुयोग्य, चपखल केला आहे. खरंतर या पुस्तकाबद्दल स्वतंत्र बाफवर लिहायला हवं, मायबोलीकरांपैकी बर्‍याच जणांचं हे पुस्तक वाचून झालंय. पण कोणीच पुस्तकपरीचय लिहिलेला नाही. (खाल्ल्या पार्टीला लोकं जागत नाहीत म्हणजे काय! Wink )

तत्वमसिचा अनुवादही नरवण्यांचाच आहे. रसिकमध्ये उपलब्ध असेल शर्मिला.
माधवी, तुम्हांला अकुपार आवडले हे वाचून खूप छान वाटले. तत्वमसिही असेच सुरेख पुस्तक आहे. सागरतीरी मात्र मिळत नाही.

धन्यवाद शैलजा. दोन्ही पुस्तकं इंटरेस्टींग वाटताहेत खूपच. मॅजेस्टीकमधे मिळतील बहुधा. आजच पहाते. तुला अरुण खोपकरांची पुस्तके मिळाली का?

नाही मिळालीत अजून पण पुढच्या आठवड्यात चौकशी करा म्हणालेत.
ही दोन्ही अकुपार आणि तत्वमसि चांगली आहेत पुस्तकं. जरु पहा.

मी इतक्यात वाचलेलं आणि आवडलेलं पुस्तक म्हणजे डॅडी लाँगलेग्ज. फार मजा आली हे पुस्तक वाचायला.

आता मी Agony and Ecstacy वाचायला घेतलंय.

हं, टिंकर टेलर सोल्जर स्पाय... मी खूप वर्षांपूर्वी वाचलंय. जॉन ल कारचं द स्पाय हू केम इन फ्रॉम द कोल्ड हे जास्त गाजलेलं असलं तरी हे पुस्तकपण मला तितकंच आवडलं होतं. पण एकुणातच ल कार तितक्या असोशीने वाचला नाही हेच खरं..
मीन्वा, अ‍ॅगनी अ‍ॅन्ड एक्स्टसी आवडलंय. तुला पण आवडेल.
नंदिनी - द नेम ऑफ द रोझ भंजाळलीस तरी पूर्ण कर. मस्तच आहे

मध्यंतरी दुर्गा भागवतांचं आठवले तसे (परत एकदा) वाचलं. त्याविषयी चार ओळी लिहायच्यात पण आत्ता वेळ नाहीये. नंतर लिहिन

आठवले तसे हे तेच पुस्तक आहे ना? ज्यात त्यांनी तक्रारीच तक्रारी केल्या आहेत? ते पुस्तक मला खूप बायस्ड वाटले.

वरदा, हो. हे पुस्तक पूर्ण करणार आहे. पण या असल्या पुस्तकांचा फॉन्ट एवढा छोटा का ठेवतात कळत नाही. एखादं भिंग विकत घ्यावं म्हणते आता...

Pages