मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावली, टि. आय. एफ. आर. च्या गेटच्या आत जायला परवानगी लागेल, पण काही प्रदर्शन / कार्यक्रम असेल तर
जाता येते.
त्या गेटच्या आधी, बसेस संपतात. गेटच्या डाव्या हाताला एक छोटेसे रम्य उद्यान आहे आणि शंकराचे देऊळ आहे. तिथे जाता येते.

कोणालाही जाता येते की परवानगी लागते? > US Gulf Clubला जायला परवानगी लागते हे नक्की.

दिनेशदा... कुलाब्यातील प्रसिद्ध गार्डन कोणतं?

हिरा, भाऊ, दा... तुमच्या कडून अग्यारी बद्दल माहिती वाचायला आवडेल.

नेवी नगरमध्ये आर्.सी.चर्च पर्यंत सहज जाता येते. तिथे काम करणारा नोकरवर्ग बाहेरूनच येतो. पण प्रत्येकाला ओळखपत्र दिलेले असते. आतल्या रस्त्यांवरून संशयास्पद न दिसता सरळ चालत राहिले तर फारसे कोणी अडवत नाहीत. पण परिसराकडे निरखून बघत राहिले तर मात्र गस्ती जवान हटकतात. तसेही नेवीनगर बहुतेक बाबतीत स्वयंपूर्ण आहे. सैन्यदलांच्या सर्व वसाहती अशाच असतात. सिविलियन्सशी फारसा संपर्क न येणार्‍या. जीवनावश्यक वस्तू आणि फ्रिज, टीवी वगैरे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या त्यांच्या कँटीनमध्ये सवलतीच्या दरात आणि उत्तम दर्जाच्या मिळतात. वसाहतीतील घरांची दुरुस्ती, प्लम्बिंग वायरिंग वगैरे कामांसाठी सैन्यदलातील. कर्मचारीच नेमलेले असतात. घरांतील फर्निचर वगैरेची दुरुस्तीही तेच करतात कारण हे फर्निचर सैन्यदलाने पुरवलेले असते सैनिकाच्या हुद्द्यानुसार लहानमोठे घर आणि फर्निचर मिळते..पूर्वी घरांमध्ये सर्वंट्स क्वार्टर्स असायच्या. त्यामुळे नोकरवर्गही तिथेच राही. मुंबईतल्या जागेच्या टंचाईमुळे या क्वार्टर्सना पर्यायाने या नोकर्‍यांना खूप मागणी असे. एखाद्याला इथे घरकामाची नोकरी मिळाली तर त्याचे पूर्ण कुटुंब या प्रशस्त खोल्यांत रहायला येई. एखाददोघे जण 'साहेबांकडे' काम करीत, बाकीचे इथे आयते राहून इतरत्र नोकरी करीत. क्वचित एखादा साहेब या नोकरांना उणे पगार देई. म्हणजे इतक्या सगळ्या सोयी-सवलती (मोफत पाणी, वीज, ऐसपैस जागा वगैरे) मिळण्यासाठी नोकराकडूनच थोडीफार रक्कम साहेब वसूल करी. नोकरांनाही राशन सवलतीमध्ये मिळे. . एकंदरीत उत्तम दर्जायुक्त जीवन जगता यावे यासाठी सैन्यदलांमध्ये विशेष काळजी घेतली जाई, जाते. मुलांवरही शिस्तीचे, रीतीभातींचे उत्तम संस्कार होतात. ही मुले 'वेल्-ग्रूम्ड'' बनतात. आताशी जागेच्या एकंदर टंचाईमुळे घरे थोडीशी लहान झाली आहेत आणि नोकरांच्या जागेतही काटछाट झाली आहे असे ऐकून आहे.
उरलेल्या दोन्ही जागांत परवानगीशिवाय प्रवेश नाही.

इंद्रधनुष्य, सागर उद्यान- बीपीटी गार्डन. इथे अनेक वृक्ष आहेत आणि मुख्य म्हणजे प्रत्येक झाडावर नामफलक आहे. वृक्षप्रेमींसाठी मोठीच सोय आणि मेजवानी आहे.

हीरा आणि भाऊ दोघेही अतिशय वेचक आणि वेधक माहिती देताहेत. स्मित >> +१०० फारच मस्तय्त पोस्टी अतिशय माहितीपूर्ण.. Happy

जवाहर आयलंड (पुर्वीचं बुचर आयलंड) पाहिलंय का कुणी? आपण मुंबईतच आहोत असं वाटतंच नाही. इकडे मात्र स्पेशल परमिशन लागते. आम्हाला स्टडी टुरचा एक भाग म्हणून नेलं होतं तिथे आणि ऑइल टँकर (तेलवाहू जहाज) आतून फिरवून अगदी टेक्निकल बाबींसकट दाखवलं होतं. जहाजं लागतात ती जागा सोडली तर तिथे भरपूर झाडी आहे. छोट्याश्या नावेतून या बेटावर जावं लागतं. लगेहाथ आम्ही एलिफंटालाही गेलो होतो. त्या सुमारास समुद्रात तेलगळती झाली होती आणि तेलाचा तवंगही एलिफंटाजवळच्या समुद्रात पहायला मिळाला होता.

कोणालाही जाता येते की परवानगी लागते? > US Gulf Clubला जायला परवानगी लागते हे नक्की >>+१.
नेव्ही नगरमधल्या ऑफिसर्सच्या वसाहती ह्या आत जाऊन बघितल्या तर मूंबईमधे आहोत असे वाटणार नाही.

सही लिहिताय रे सर्व लोक. Happy
कधी काळी मला मुम्बै म्हणजे पैसे छापणारे मशीन अस काहितरी एक काल्पनिक चित्र डोक्यात होतं.
ते किती हुकलेलं आणि ऐकीव , पुर्वग्रहदुषित मतं आहे ह्याचा अनुभव हळुहळु येत होताच.
ह्या धाग्याने मुम्बैला एक चेहरा मोहरा दिलाय.
सर्वांचे आभार Happy

उत्तराबद्दल सगळ्यांनाच धन्यवाद. Happy
म्हणजे काही ठिकाणांबद्दल नुसतेच वाचुन समाधान मानावे लागणार तर. पण ते ही नसे थोडके. कधीकाळी संधी आलीच तर जाता येईल.

नेव्हीनगर, टीआयएफआरची वर्णनं वाचून मलाही सावलीसारखाच प्रश्न पडला होता. (आणि आता त्याचं उत्तरही सावलीच्या उत्तराप्रमाणेच आहे :हाहा:)

<<....वेचक आणि वेधक माहिती देताहेत.>> इथल्या टपल्यानीही मीं सुखावतो; मग कुणीं मधेंच माझ्या लिखाणाला बरं म्हटलं - अन तेंही मला इथल्या मातब्बरांच्या पंक्तीला बसवून - तर हुरळून जाणारच ना मीं ! धन्यवाद.

daarukhaanaa.JPG

ससुन डॉ़क, अफगाण चर्च, RC चर्च या भागात फिरता येते , बधवार पार्क कडे येताना आणि येक मोठे cathedral आहे (नाव लक्षात नाही)
TIFR कॉलोनीत बर्‍याचदा पण खुप उशिरा रात्री गेलोय त्यामुळे लिहण्यासारखे काही नाही

भाऊ Biggrin

भाऊ काका Lol

काल सहज आठवलं माझ्या बंगाली रूममेटच्या मते, दारूखाना हे नक्की बंगाल्याचा बार असणार. कारण फक्त बंगाल्यांमधेच "दारू खातात!!!!!"

भाउ Rofl

म्यूझियममधल्या अनेक वस्तू टाटा कुटुंबीयांकडून भेट मिळालेल्या आहेत.>>>>>>>>कालच म्युझियमला जाउन आलो. Happy

<< म्यूझियममधल्या अनेक वस्तू टाटा कुटुंबीयांकडून भेट मिळालेल्या आहेत>> म्युझियमच्या संग्रही नंतर प्रसिद्धी पावलेल्या अनेक कलाकारांचीं सुरवातीचीं जुनीं, दुर्मिळ चित्रंही आहेत [म्युझियममधे प्रदर्शित न केलेलीं ]. अशाच चित्रांच्या एका प्रदर्शनांत [म्युझियम आर्ट गॅलरीत] मला बाळ गायतोंडेंचं सुरवातीचं एक जलरंगातलं अप्रतिम व दुर्मिळ 'फिगरेटीव्ह' चित्र पहायला मिळालं होतं. राजस्थानी स्त्रियांचं सोलेगांवकरांचं एक जलरंगातलं सुरेख चित्रही त्याच प्रदर्शनात होतं. अर्थात, यांतली कांहीं चित्रंही टाटा किंवा इतर कलारसिक कुटूंबांकडूनही म्युझियमला मिळाली असावीत.

आख्खा धागा चाळला आज.... जबरदस्त माहिती मिळाली इकडे Happy
भाऊ, तुमच्या पोस्ट्स खरच खूप माहितीपूर्ण आहेत!

बाळ गायतोंडे :). भाऊ फार कमी लोकं आहेत जी गायतोंडेंचा उल्लेख त्यांच्या या नावाने करतात.

टाटांकडून भेट मिळालेल्या देशी-विदेशी कलावस्तुंचं स्वतंत्र दालन आहे म्युझियममधे. अत्यंत दुर्मिळ मिनिएचर्सही आहेत त्यात.

<< "साकी"नाकाही टाका त्यात >> ' वन फॉर द रोड' म्हणत मग बायकोच मला घरातून हुसकून रस्त्यावर टाकेल, त्याचं काय ! Wink
<< भाऊ फार कमी लोकं आहेत जी गायतोंडेंचा उल्लेख त्यांच्या या नावाने करतात.>> मला वाटलं होतं कीं गायतोंडेंबद्दल आत्यंतिक आदर असणारे याच नांवाने त्यांचा उल्लेख करतात. [ गायतोंडेंना गिरगांवात माझ्या लहानपणीं - व तेही इतके प्रचंड मोठे कलाकार असल्याचं जगाला कळण्यापूर्वीं- जवळून पाहिलं होतं. त्यावेळींही ते रंग- आकारांच्या आपल्या दुनियेतच सदा तंद्री लागल्यागतच असायचे. अर्थात, त्याना 'बाळ' म्हटल्याचं हें समर्थन मात्र नाहीं. Wink ]

हे ग्रेट आहे. खरं तर मी लिहिणारच होते की गिरगावात ते रहात असताना त्यांना ओळखणारे 'बाळ' हे संबोधन वापरतात. दिल्लीला गेल्यावर ते 'गाय' झाले.

तुम्ही जवळपास रहात होतात का त्यांच्या? इथे अस्थानी वाटत असेल तर मला कृपया मेल कराल का या संदर्भातल्या तुमच्या सगळ्या आठवणी? तुमच्या सवडीने करा. < sharmilaphadke@gmail.com >

<<तुम्ही जवळपास रहात होतात का त्यांच्या?>> होय. पण वर म्हटल्याप्रमाणे ते नेहमीं आपल्या तंद्रीतच असत मात्र त्याला शिष्ठपणाचा दर्प अजिबात नसे. त्यांचं रहाणं नीटनेटकं असे, कपडे गिरगांवांत विसंगत वाटावे असे बहुधा भडक रंगाचे असत. दिवसाचा बहुतेक वेळ ते त्यांच्या ब्रीच कँडीच्या स्टुडिओच्या आसपासच असत, हा आमच्या भटकंती गँगचा शोध होता. त्यांचे सावंत नांवाचे आर्टिस्ट मित्र कधीतरी त्यांच्याकडे येत व त्यांच्याबरोबर बाहेर जाताना मात्र ते कांहीसे खुललेले व आपल्यातीलच एक आहेत असं वाटे. माझ्या एका मला थोडासा सिनीयर असलेल्या मित्राबरोबर त्यांचं क्वचित बोलणं होई व त्या मित्राच्या सांगण्यावरून त्यांचं वाचन खूप होतं असं जाणवे. माझ्याशींच नव्हे तर तिथल्या इतर कुणाशीं त्यांचा संपर्क होता असं नाहीं वाटत. त्यामुळें यापलिकडे त्यांच्याबद्दल माझ्या तरी कांहीं आठवणी नाहीत.
[ गिरगांवातल्या व मुंबईतल्या चाळीं चाळींत अशीं अनेक प्रतिभावान माणसं पेरलेलीं असत इतकं सांगण्यापुरतं हें विषयांतर क्षम्य ठरावं ].
<< याला म्हणतात जातीचा पत्रकार >> पाटीलजी, निश्चिंत रहा; कोणता बॉल खेळायचा व कोणता सोडायचा यासाठी कधीं कधीं सुनील गावसकरही मलाच कन्सल्ट करत असे ! Wink

मागे शिमेटाच्या चाळींचा उल्लेख झाला होता. आमची एक दूरची नातलग तिथे रहात असे. नंतर बांधलेल्या हौंसिंग बोर्डाच्या बिल्डींगच्या तूलनेत ते बांधकाम फारच मजबूत होते. एकच खोली पण बरीच ऐसपैस होती. शिंदेवाडीपण तसेच. हौसिंग बोर्डाच्या मात्र बर्‍याच इमारती आता नव्याने बांधल्यात.

माझे आईवडील ज्या इमारतीत १९५० च्या दरम्यान रहायला आले ती लालबागची श्रॉफ बिल्डींग अजून तग धरुन आहे. त्या घरातच आमचे मित्र श्रुंगारे काका रहात असत. त्यांच्याकडे आम्ही बर्‍याच वेळा जात असू. त्यावेळच्या
शांत मालाडमधून, त्यावेळच्या गजबजलेल्या लालबाग मधे यायला खुप मजा वाटायची. आता त्या श्रॉफ बिल्डींगसमोर फ्लायओव्हर झालाय.

---

पुर्वी फोर्ट मधल्या अनेक बिल्डींगमधे पाणीपुरवठा नव्हता. विद्यापिठाच्या भिंतीलगत जी विहीर आहे, तिथले
पाणी, भट लोक हंड्याने पोहोचवत असत. ती विहीर अजून वापरात आहे. भट लोकांचा, भरपूर वेलची / मसाला घातलेला गोडमिट्ट चहा, तिथे फेमस होता. बॅलार्ड पियर / नरीमन पाँईट भागात पुर्वी खाद्यपदार्थांच्या गाड्या फारच कमी असत. एखादाच सँडविचवाला / फ्रुट प्लेटवाला दिसे. ऑडीटच्या काळात त्यांचा आधार वाटे.

तिथली पारश्यांची विहीर पण बरीच जूनी आहे. मेघना पेठेने तिच्यात प्रेतं टाकतात, असे खोडसाळ विधान केले होते. ती विहीर पवित्र असून तिचे पाणीदेखील पितात.
मलबार हिल मधली त्यांची दफनाची जागा, गुगलवर अजून दिसते.
आता पारशी फारच कमी दिसतात पण मी त्यांच्यासोबत काम केले आहे. खुप प्रेमळ असत ते लोक.

मनःपूर्वक धन्यवाद भाऊ.

पाटील अहो त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. एकतर त्यांचं वडिलांसोबत अजिबात जमत नसल्याने ते स्वतः (म्हणजे गायतोंडे) पुढील काळात कोणत्याही मुलाखतीत किंवा अनौपचारिक बोलण्यातही त्यांच्या गिरगावातल्या दिवसांचा उल्लेख करण्याचं शक्यतोवर टाळतच असत. तसेही ते स्वतःबद्दल फारच कमी बोलत. त्यामुळे जितकी मिळेल तितकी माहिती जमा करायची आपणच. गिरगावातल्या त्यांच्या त्यावेळच्या शेजार्‍यांनी फार अप्रतिम आठवणी सांगितल्या होत्या. असो,. हे फारच अस्थानी आता. मात्र पुन्हा एकदा धन्यवाद भाऊ.

कूल अक्षय च्या लिंक मधे ११ सेकंदापासुन ते १६ सेकंद पर्यंतची मंङळी गोरेगांवकरांच्या चाळीतली आहेत. बाजुला दिसते आहे ते गिर्गाव पोर्तुगिज चर्च, आणि बॅकग्राउंडला आहे, अनेक रम्य, उदास, हसर्‍या, रडक्या, संतापलेल्या, तणावातल्या, वादावादीच्या, भांडखोर, एकाकी, दाटीवाटीच्या संध्याकाळी जिथे घालवल्या ती व्हॉईस ओफ इंडीया रेस्टॉरंट्ची ईमारत. ह्या सगळ्या वेळी कायम, जेव्हा हाक मारेन तेव्हा कायम सोबतीला असायची ती खरी सोबतीण एकच. सिगरेट! हल्ली २-४ वर्ष व्हॉईसम्धे धूम्रपान करु देत नाहित. अन्याय अन्याय म्हणतात तो ह्यापेक्षा आणखी काय असु शकतो.

Pages