Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16
निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.
कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.
मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान धागा. हिरा, भाऊ आणि
छान धागा. हिरा, भाऊ आणि इतरांच्या छान छान पोस्ट्स आणि माहिती.मेजवानी नॉस्टॅल्जिया सगळं एकत्र.
सायनला नातेवाईकांकडे जायचो तेव्हा तिथल्या एका बागेत जायचो संध्याकाळी खेळायला. तिथे टाइअल्सच्या पांढर्या कपच्या असतात तशा प्रकारच्या पायर्या होत्या त्यावर चढा उतरायला गम्मत यायची. ते उद्यान आहे फक्त सध्या तिथे गर्दुल्यांचा वावर वाढलाय असं ऐकतेय.
तिथून अफाट वेळा बसने नेहरू सायन्स सेन्टर आणि जास्त बजेट असेल तेव्हा प्लॅनेटेरियमला जाणं व्हायचं...:)
<< ती व्हॉईस ओफ इंडीया
<< ती व्हॉईस ओफ इंडीया रेस्टॉरंट्ची ईमारत. >> नतद्रष्टजी, तुम्ही तर काळजालाच हात घातलात !
राजकारण, पुस्तक- सिनेमावरील चर्चा, प्रेमभंग झालेल्या मित्राचं सांत्वन, वाडी-वाडीतील राड्यांचं विश्लेषण व 'मांडवळी', क्रिकेटवरच्या 'एक्सपर्ट कॉमेंटस', प्युअर भंकस...... हें सगळं सगळं केवळ 'अर्धा ब्रूनमस्का और पानीकम चाय'वर दीडदोन तास बिनधास्त करायचं मुंबईतलं स्वप्नवत ठीकाण म्हणजे इराण्यांची नाक्या-नाक्यावर वसलेलीं ' व्हॉईस ऑफ इंडिया' सारखीं हॉटेलं.[ अर्थात, पुण्यातही डेक्कनच्या 'लकी'सारखीं हॉटेलं असत पण पूर्वीच्या मुंबई इतकीं सर्वत्र विखुरलेलीं नक्कीच नसावीत]. आज मोबाईल, 'डिस्को' इत्यादींमुळें तरुणाईला मिळणारी अत्यावश्यक मोकळीक व 'स्पेस' जवळजवळ विनामूल्य पुरवण्याचं मोठ्ठं समाजकार्य करायलाच जणूं हे देवदूत इराणहून इथं आले असावेत; नाहीं तर, चहा-सिगरेटवर अख्खा दिवस टेबलं अडवून बसणारीं त्यावेळचीं आमच्यासारखीं आठदहा टोळकीं असं काय हो उत्पन्न देत होतीं असतील या हॉटेल्सना ! कांऊंटरवरचे गुबगुबीत गालाचे , धष्ठपुष्ठ व स्थितप्रज्ञ इराणी तरुणाईच्या पिढ्यानपिढ्याना जणूं आशिर्वाद द्यायलाच तिथं बसलेले असायचे !
गिरगांवच्या चाळींतल्या डबल रूममधे रहाणार्या कुटूंबांतील मुलांना मनमोकळ्या गप्पा मारायला अशी जागा असणं याचं आत्यंतिक महत्व काय होतं, याची खरी कल्पना माझ्यासारख्या तिथल्याना आज येते व त्या इराण्यांबद्दल अधिकाधीक कृतज्ञताही वाटते !!
न.द्र., बघ, बघ, जरा भाऊंकडे
न.द्र., बघ, बघ, जरा भाऊंकडे बघ, किती भरभरून आणि काय-काय छान-छान आठवणी जागवतायत... नाहीतर तू...!!
<< नाहीतर तू...!! >> अहो, असं
<< नाहीतर तू...!! >> अहो, असं नका हो म्हणूं ! मीं फक्त न.द्रं.ची री ओढलीय [ व चान्स मिळालाच तर त्यांची एखादी सिगरेटही ओढीन, फॉर द ओल्ड टाईम्स सेक ! ] !!!
गिरगांवच्या चाळींतल्या डबल
गिरगांवच्या चाळींतल्या डबल रूममधे रहाणार्या........ >>>>> कसं बोललात!
<<केवळ 'अर्धा ब्रूनमस्का और
<<केवळ 'अर्धा ब्रूनमस्का और पानीकम चाय'वर दीडदोन तास बिनधास्त करायचं मुंबईतलं स्वप्नवत ठीकाण... >>
कांऊंटरवरचे गुबगुबीत गालाचे ,
कांऊंटरवरचे गुबगुबीत गालाचे , धष्ठपुष्ठ व स्थितप्रज्ञ इराणी तरुणाईच्या पिढ्यानपिढ्याना जणूं आशिर्वाद द्यायलाच तिथं बसलेले असायचे ! >> +१
न.द्र., बघ, बघ, जरा भाऊंकडे बघ, किती भरभरून आणि काय-काय छान-छान आठवणी जागवतायत... नाहीतर तू...!! >> +१
<< ती व्हॉईस ओफ इंडीया रेस्टॉरंट्ची ईमारत. >> नतद्रष्टजी, तुम्ही तर काळजालाच हात घातलात ! >> +१ भाऊ.. गेल्या वर्षी पासून इराणी गटग करायच म्हणून नतद्रष्टच्या मिन्नितवार्या सुरु आहेत... पण मुहुर्त सापडेल तर शप्पथ... आता तुम्हीच काय ते मनावर घ्या..
गेल्या वर्षी पासून इराणी गटग
गेल्या वर्षी पासून इराणी गटग करायच म्हणून नतद्रष्टच्या मिन्नितवार्या सुरु आहेत >>> +१
पुर्वी सिंगल स्क्रिन थेटरांवर
पुर्वी सिंगल स्क्रिन थेटरांवर हाताने पेंट केलेले मोठ्ठे पोस्टर्स / कटऑऊट लागायचे, दादर ला रानडे रोड वरच्या एका वाडीत बाळक्रिशना आर्ट (balkrishna art) नावाचा स्टुडिओ होता (मुंबई कट्पीस की अशाच नावाचे दुकान होते त्या गल्लीत)तीथे एकाच वेळी कितितरी पोस्टर्स वर काम चालु असायचे. भिंतीला टेकउन ठेवलेले मांजरपाटाचे स्टेच केलेले कॅन्व्हास , त्यावर पांढरा टेक्स्चर पेंट (?) , त्य्वार ग्रीड काढुन चारकोल्/चॉकने हिरो /हीरोओइन्/व्हिलन यांचे चेहरे, ते रंगपण खास वेगळेच असायचे, व्हिलन थोडे हिरव्या, निळ्या, पिवळ्या रंगात असायचे. तीथे उभे राहुन मी तासंतास ते काम बघितले आहे, आत्त्ता तो स्टुडिओ तीथे आहे कि नाही हे ठाउक नाही, बहुदा नसावा कारण हल्ली अशी पोस्टर्स दिसत नाहित कूठेच
मस्त आठवण पाटिल.
मस्त आठवण पाटिल. प्लाझासमोरच्या त्या बोळातून रानडेरोडला जाताना ते काम दिसायचं. अर्धवट रंग चढलेले हिरो-हिरॉइन आणि पोस्टर पूर्ण झाल्यावरचे एकदम वेगळेच दिसायचे. ती पोस्टरं बघताना ह्याचं काम आपण पाहिलंय अश्या अर्थाचं काहीतरी वाटून वेगळीच भावना मनात निर्माण व्हायची.
मंजूडी- हो , N C केळकर
मंजूडी- हो , N C केळकर मार्गावर गुरुजी ब्रदर्स नावाचा स्टुडीओ होता (आहे) तीथे पण काही पोस्टर्स बघितली होती , त्यांच्या कडे पब्लीसीटी/डिस्प्लेची बाकी कामं जास्त होत असावीत या सिने पोस्टर्स पेक्षा.
मुंबई कट्पीस >>> पाटील, हो !
मुंबई कट्पीस >>> पाटील, हो ! मलाही ती पोस्टर्स आठवतात. आणि त्या दुकानाचं नाव बॉम्बे कटपीस असावं
असं पुसटसं स्मरतंय.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
कांऊंटरवरचे गुबगुबीत गालाचे , धष्ठपुष्ठ व स्थितप्रज्ञ इराणी तरुणाईच्या पिढ्यानपिढ्याना जणूं आशिर्वाद द्यायलाच तिथं बसलेले असायचे ! >>> व्वा ! किती समर्पक वर्णन आहे त्या इराण्यांचं.
इराणी हॉटेलचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, काळ्या रंगाने पॉलीश केलेल्या ठराविक डिझाईनच्या खुर्च्या आणि गोल टेबलं..... बर्याचदा या टेबलांवर गोल कापलेला (मळकट, पिवळसर झालेला) मार्बल टॉप असायचा.
केक मागवला तर काउंटरजवळच्या लाकडी शोकेसमधून ८-१० केक काढून ते एका मोठ्या सिरॅमिक डिशमधे

पेश केले जायचे. आपण जितके खाऊ तितक्याचे पैसे द्यायचे, बाकीचे परत जागेवर..... सगळीकडे एकच सिस्टीम.
गुरुजी ब्रदर्स नावाचा स्टुडीओ
गुरुजी ब्रदर्स नावाचा स्टुडीओ >>> छोट्या बोळातून आत शिरताना उसाचा रसवाला, आणि डॉ. जावळे यांचा
दवाखाना..... इथेच होता का हा स्टुडिओ ??
गुरुजी ब्रदर्स - N C केळकर
गुरुजी ब्रदर्स - N C केळकर मार्गावर शिवाजी मंदिर कडुन सेनाभवनाकडे जातान पलिअकडच्या पदपथावर आहे.
गुरुजी ब्रदर्स - N C केळकर
गुरुजी ब्रदर्स - N C केळकर मार्गावर शिवाजी मंदिर कडुन सेनाभवनाकडे जातान पलिअकडच्या पदपथावर आहे.>>> १-२ आठवड्यानंतर दादरला जाणार आहे तेव्हा बघतो.
<< एका वाडीत बाळक्रिशना आर्ट
<< एका वाडीत बाळक्रिशना आर्ट (balkrishna art) नावाचा स्टुडिओ होता>> पाटीलजी, मला वाटतं तो श्री.बाळकृष्ण वैद्य यांचा स्टुडियो होता. मीं बर्याच वेळां तिथं जावून रंगकाम बघत बसायचो म्हणून माझी चांगली ओळखही झाली होती त्यांच्याशीं. [ त्यांचा गांव हर्णै ( दापोली ) व कशेळीच्या घाटमाथ्यावर जें साई मंदिर बांधलंय त्याचे ते विश्वस्त आहेत, असं त्यांच्याकडूनच कळालं होतं]. कांही रंजक माहिती -
अशा प्रकारचे 'पोस्टर्स ' रंगवण्याची कला युरोपांत लुप्त झाल्याने वैद्यना तिथल्या कलाविद्यालयांत 'डेमो' देण्यासाठीं युरोप व इतर ठीकाणीं खास आमंत्रण देवून बोलावून घेतलं होतं. सिनेमाच्या पोस्टर्सचं काम कमी झाल्यावर त्यांचं मुख्य उत्पन्न होतं गोर्या लोकाना भारतीय पेहराव चढवून त्याच्या मोठ्या फ्रेम्स बनवून देणें !! भारतीय पेहरावाचं [ विशेषतः लग्न, सणासुदीला वापरावयाच्या ] म्हणे इतकं प्रचंड आकर्षण पर्यटकाना असतं कीं विमानतळावर असलेल्या सिनेमाच्या पोस्टरवरचा पेहराव आवडला तर तो पोस्टर बनवणार्या वैद्यंचं नांव, पत्ता शोधून ते त्याना भेटत; स्वतःचा किंवा पति-पत्नीचा फोटो देवून त्यांत स्वतःचा चेहरा तसाच ठेवून , त्या पोस्टरमधला पेहराव चढवून पर्यटक त्यांच्याकडून मोठ्या फ्रेम करून घेत. मीं वैद्यानीं केलेल्या अशा फ्रेम्स तिथं पाहिल्याही आहेत. कोणत्या कलेला कुठून मागणी येईल सांगणं कठीण !
वैद्य ती जागा सोडून पलिकडच्याच गल्लीत छोट्या जागेत जाणार आहेत हें त्यानी मला सांगितलंही होतं. पण नंतर मला त्यांची नवी जागा सहज शोधून मिळाली नाहीं . [ कुणाला सांपडलीच तर मला कळवा कारण मीं त्याना वाचायला दिलेलं बाबूराव पेंटर यांचं चरित्र मला परत हवंय !
]
Malahi tyanche kaam parat
Malahi tyanche kaam parat pahaayala aawdel
भाऊ, दारूखान्याबद्दल मस्त
भाऊ, दारूखान्याबद्दल मस्त माहिती दिलीत. याबद्दल काहीच माहीत नव्हतं.
हीरा, नेव्हीनगरचं वर्णन एकदम चपखल केलंत. आमचेही एक नातेवाईक सेनादलाच्या सेवेत होते. त्यामुळे माझे अजूनही अधूनमधून त्यांच्यासोबत कँटीनमध्ये जाणे होते. अगदी खोडरबर, घड्याळापासून ते दारवांपर्यंय सगळ्या वस्तू स्वस्तात उपलब्ध असतात. (तरीही त्याला कँटीन का म्हणतात?)
द्वारकानाथ संझगिरी ह्यांचा
द्वारकानाथ संझगिरी ह्यांचा फिल्मिदुनिया हा सामना मध्ये आलेला लेख वाचला , याबद्दल अधिक माहिती आवडेल . मला भगवान दादा आठवले, त्यांना दादरला बरेचदा पहिल्याच आठवतंय.
N C केळकर मार्गावर गुरुजी
N C केळकर मार्गावर गुरुजी ब्रदर्स नावाचा स्टुडीओ होता (आहे) तीथे पण काही पोस्टर्स बघितली होती , त्यांच्या कडे पब्लीसीटी/डिस्प्लेची बाकी कामं जास्त होत असावीत या सिने पोस्टर्स पेक्षा. >>>>> गोमांतकच्या लायनीत हा स्टुडियो आहे.
जे दत्तात्रय हॉटेल आता बंद होऊ घातलंय, त्यात भिंतीवर दोन अतिशय सुरेख म्युरल्स आहेत. देहू-आळंदीचा सीन आहे असं वाटतं. तर एकदा दत्तात्रयच्या मालकांना मी ती सुंदर म्युरल्स कोणी केलीत म्हणून विचारणा केली होती, त्यावेळी त्यांनी ती गुरुजी ब्रदर्सनी केली असल्याचं सांगितलं होतं.
वॉव..तुम्हा सर्वांच्या मुंबई
वॉव..तुम्हा सर्वांच्या मुंबई बद्दलच्या इतक्या इतक्या आठवणी वाचतेय कि आता मला आता मुंबई चे रस्ते,गल्ल्या डोळ्यासमोर दिसायला लागलेत
मस्त ,इंटरेस्टिंग, इन्फर्मेटिव धागा गो मामे...
न.द्र., बघ, बघ, जरा भाऊंकडे
न.द्र., बघ, बघ, जरा भाऊंकडे बघ, किती भरभरून आणि काय-काय छान-छान आठवणी जागवतायत... नाहीतर तू...!! फिदीफिदी >>> +१ तर काय लले
हा गोरेगावकर लेनच्या बाहेर पडाय्लाच तयार नाहीये..
भाऊकाकांच्या सगळ्याच पोस्टस मस्तय्त..
गजानन, ते सी.एस.डी. कँटीन,
गजानन, ते सी.एस.डी. कँटीन, स्टॉअर्स डिपार्टमेंट. त्यांना अनेक कर लागू होत नाहीत.
मामी, दत्तात्रेय ला मधे ५० वर्षे झाले म्हणून, काही दिवस त्या काळातल्या भावाने पदार्थ विकत होते. अट एकच, नोटा नाणी पण त्या काळातल्याच हव्या
त्याच्या समोरची स्टीलमॅनची बिल्डींग गेली, ते मात्र जरा पचवायला अवघड गेले.
मागच्या आठवड्यात चर्चगेटच्या
मागच्या आठवड्यात चर्चगेटच्या सुंदराबाई हॉलमध्ये सुरू असलेल्या आशिष बुक डेपोच्या पुस्तक प्रदर्शनाला गेले होते. त्या भव्य हॉलमधल्या खिडक्यांच्या वर असलेल्या झरोक्यांना खूप सुरेख स्टेन्ड-ग्लासेस लावल्या आहेत. मी लगेच कॅमेरात बद्ध केल्या - आपल्या या धाग्याकरता.
जवळून

छान. मुंबईतल्या काही चर्च मधे
छान.
मुंबईतल्या काही चर्च मधे सुंदर स्टेन्ड ग्लास पेंटींग्ज आहेत, सेंट थॉमस चर्चच्या आत मी काही फोटो काढले होते ते शोधुन टाकतो.
CST स्टेशन च्या खिड्कयांवर सुद्धा सुंदर स्टेन्ड्ग्ग्लास वर्क होते
लिलावतीमध्ये माणसांची चित्र
लिलावतीमध्ये माणसांची चित्र आहेत रिसेप्शनमध्ये स्टेन्डग्लासमध्ये.
मुंबईतल्या स्टेन्ड ग्लास
मुंबईतल्या स्टेन्ड ग्लास हेरिटेज आर्किटेक्चरवर एक फार सुंदर पुस्तक उपलब्ध आहे. स्टोरीज इन ग्लास- द स्टेन्ड ग्लास हेरिटेज ऑफ बॉम्बे- ज्यूड हॉलिडे
मुंबईच्या स्टेन्ड ग्लास हेरिटेज किंवा इतरही हेरिटेज आर्किटेक्चरबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिणार्यांकरता एक सुरेख ब्लॉगही आहे- बॉम्बे आर्किटेक्चर- अ टूर ऑफ सिटीज हेरिटेज होम्स
आता आज जरा आपण वरळी परिसरातून
आता आज जरा आपण वरळी परिसरातून धार्मिक सहल करूयात. केवळ तीनेक किलोमीटरच्या रस्त्यावर किती विविध प्रकारची आणि धर्मांची मंदिरं आहेत ते बघुयात. (सगळे फोटो GBB technology वापरून काढले असल्यामुळे फार आर्टिस्टिक वगैरे नाहीयेत.)
पहिला मान प्रभादेवीच्या सिद्धीविनायकाचा

सिद्धीविनायकाचा परिसर आता एखादी लष्करी छावणी असल्यासारखा दिसतो.


प्रभादेवीच्या सिद्धीविनायकाला नमस्कार करून पुढे आलं की लगेच रविंद्र नाट्य मंदिर लागतं.

पुढे सिग्नलला उजवीकडे अप्पासाहेब मराठे मार्गावर आलो की डाव्या हाताला (सारस्वत बँकेच्या हेडऑफिसनंतर) चैतन्य टॉवरचा एक छान उभा गणपती दिसतो. हा फक्त पुतळाच आहे (मूर्ती नाहीये) पण येणारेजाणारे त्याला भाविकपणे नमस्कार करतात.

पुढे ग्लॅक्सोच्या सिग्नलच्या जरा आधी उजवीकडे लागतं केदारेश्वर महादेवाचं मंदिर. बाहेर वाहनांची कितीही वर्दळ असू दे, इथे आत गेल्यावर अगदी शांत वाटतं. अगदी कोकणातल्या एखाद्या जुन्या मंदिरांची आठवण यावी असं साधंसुधं, स्वच्छ देऊळ आहे. हे असंच रहावं आणि जीर्णेद्धाराच्या नावाखाली याची वाट लागू नये असं वाटून जातं.

पूर्वी हा सिग्नल ओलांडल्या ओलांडल्या डावीकडच्या कोपर्यावर एका छोट्याश्या जागेत एक क्रॉस उभाकरून ठेवला होता. त्यापुढे नेहमी मेणबत्त्या जळत असत आणि भाविक एखाद मिनिट मान झुकवून उभे राहूनच पुढे जात. परवा या फोटोसेशनकरता शोधला तर तो आता तिथे नाहीये.
यानंतर डावीकडेच एक अजून छोटसं शंकराचं देऊळ आहे - काकड चेंबर्सच्या बाहेर. मुख्य मंदिराबाहेरच्या उजवीकडच्या छोट्याश्या मंदिरात मारूतीची मूर्ती आहे.

नंतर लागतं पोदार आयुर्वेदिक हॉस्पिटल. हे आरोग्यमंदिर.

इथून उजवीकडे वळून वरळी-सीफेसला जाता येतं. आणि त्या कोपर्यावरच आहे एक जपानी मंदिर. मी कधी आत गेले नाहीये. पण कुतुहल आहे. जायला हवं.

जपानी मंदिराजवळच आणि वरळी नाक्याच्या दिशेला जाताना उजवीकडे आणखी एक पुरातन महादेव मंदिर आहे - नीलकंठेश्वराचं. या दोन मंदिरांच्या मागच्या बाजूस एक जैन मंदिरही आहे (फोटो नाहीये).
आणि डावीकडे आहे सुप्रसिद्ध सिटी बेकरी - आद्य-खाद्यमंदिर. इथले ब्रुन्स मस्त असतात. शिवाय फ्रेशक्रीम पेस्ट्रीज, मूज, लोफकेक्स ... यम्मी यम्मी!

आता चला एकदम जोरात जाऊ या थेट हाजी अलीपर्यंत. हा अॅनी बेझंट रोड. इथेही रस्त्यात डावीकडे नेहरू प्लॅनेटोरियम (आणि त्यामागे नेहरू सायन्स सेंटर लागतं. पण सायन्स सेंटरचं प्रवेशद्वार इ.मोझेस रोडवर आहे.) दिसेल. हे ज्ञान-विज्ञान मंदिर. (फोटो नंतर टाकले जातील.)
पुढे लगेच डावीकडेच THE NATIONAL SPORTS CLUB OF INDIA (NSCI) दिसेल. आणि त्याशेजारीच महालक्ष्मी रेसकोर्स. ही दोन क्रीडामंदिरं. (यांचेही फोटो लवकरच टाकले जातील.)
हा समुद्रात वसलेला हाजी अलीचा दर्गा. फोटोत डावीकडे दिसतोय तो चिंचोळा रस्ता दर्ग्यापर्यंत गेलेला आहे. भरतीच्या वेळी हा रस्ता पाण्याखाली जातो आणि त्यावरून येणंजाणं बंद होतं. आतले लोकं आत आणि बाहेरचे बाहेर. भरती ओसरली की रहदारी पुन्हा सुरू.

हाजीअलीच्या अजून पुढे गेलो की येईल सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर. पण ते आतल्या बाजूला आहे त्यामुळे तेथपर्यंत काही गेले नाही. आपण त्यापेक्षा युटर्न घेऊन परत येऊ यात. परतीच्या वाटेवर पूनमचेंबर्सच्या नंतर येईल अजून एक शंकराचं देऊळ. हे जरासं उंचावर वसलेलं आहे.

याच्या बरोब्बर समोर आहे लवग्रोव उदंचन केंद्र. स्वच्छतामंदिर.



आणखी पुढे आलो की पुन्हा आपण वरळीनाक्याला येतो. इथे डावीकडे एक दर्गा आहे.

आणि त्या शेजारीच एक गुरुद्वाराही आहे.
सिद्धीविनायक आणि महालक्ष्मी या दोन अतिसुप्रसिद्ध मंदिरांच्या दरम्यानचा हा सर्व-धर्म-समभाव फेरफटका.
मामी, ब्येश्टच
मामी, ब्येश्टच
हे अप्पर वरळी! हाजीअली
हे अप्पर वरळी!
हाजीअली दर्ग्यासमोरचा 'ब्रिम्स्टोवॅड'च प्रकल्प नाही का फोटोबद्ध केला मामे?
आणि तो सुप्रसिद्ध ज्युसवाला? जरा बारकाईने बघितलं असतंस तर ज्युसवाल्याच्या बाहेर कदाचित सल्लू दिसला असता.
Pages