मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईत अनेक ज्यू लोक राहत असत. म्हणजे अजूनही काही आहेत पण इथून अनेक ज्यू इस्त्राईलला स्थायिक झाले आहेत. या ज्यू लोकांसंबंधी रोचक माहिती खाली दिलेल्या लिंकवर ऐकायला मिळेल. अलिबाग चे मूळ नाव एलिची बाग जे तिथे ज्याच्या बागा होत्या अश्या एका एलि नावाच्या श्रीमंत ज्यू माणसावरून पडलं आहे. तसंच मुंबईतील मसजिद बंदर हे चुकीचं नाव असून खरं नाव मशिद बंदर आहे जे देखिल एका ज्यू नावावरून पडलं आहे अशी माहिती देखिल जॉन पेरी सांगतात.

मराठी भाषिक ज्यूंचे महाराष्ट्राची माती आणि हिंदू संस्कृतीशी नाते : https://www.youtube.com/watch?v=pPAb-igw-mo

मस्जिद बंदरला एक जुने सिनेगॉग आहे.(उच्चार?) आणि एक सॅम्युएल स्ट्रीट आहे. ह्या सॅम्युएलचा इतिहास रंजक आहे. त्याला सगळे शामजी म्हणत. म्हणून औरंगजेबाने हिंदू समजून त्यांना कैद करून नेले होते.

ह्या सॅम्युएलचा इतिहास रंजक आहे. त्याला सगळे शामजी म्हणत. म्हणून औरंगजेबाने हिंदू समजून त्यांना कैद करून नेले होते. >>> इंटरेस्टिंग !

माझ्या आत्याला हा इतिहास माहीत होता की काय कोणास ठाउक. आत्या आणि काकांचा इतिहास पण रंजक आहे. कॉलेजमध्ये चोरी पकडली गेली तेव्हा तिनेही काकांची ओळख श्याम म्हणुन करून दिली होती. पुढे वर्षभराने कॉलेज संपले आणि लग्न करायची वेळ आली तेव्हा तिने डिक्लेअर केलं की काका, सॅम्युएल (सॅम - श्याम) होते. तोपर्यंत गोरागोमटा, अतिशय वेल मॅनर्ड, श्रीमंत आणि भरभराटीच्या बिझनेसचा मालिक (एकुणात जावई होण्यासाठी 100/100 गुण) असलेला मुलगा नाकारायला काहीच कारण उरलं नाही. मग लग्न झालं. आता ते दोघेही 70+ आहेत. पण अजुनही आत्यासाठी आणि आम्हा घरच्यांसाठी ते श्यामकाकाच आहेत.

बघते लिंक मामी. बाकी मशीद बंदर हेच नाव तोंडात असतं, मला मसजीद बंदर म्हटलं की फार अनोळखी वाटतं.

रोचक माहिती

बाकी मशीद बंदर हेच नाव तोंडात असतं >>>> हो, आम्ही जवळच राहत असल्याने बरेचदा नाव घेणे होते. माझ्याकडून स्टेशनचे पुर्ण नाव घेताना मशीद बंदर असे म्हटले जाते. पण ईतरवेळी नुसते मसजिद म्हटले जाते Happy

१४ जन्युअरी १९२२च्या माझ्या प्रतिसादात मी सॅम्युएल स्ट्रीट आणि शामजी विषयी काही लिहिले होते त्यात गडबड झाली आहे. दुरुस्तीची वेळ निघून गेल्याने नवीन प्रतिसाद लिहीत आहे.
सॅम्युएल स्ट्रीट वर एक सव्वादोनशे वर्षांचे जुने सिनेगोग आहे. त्या काळी लोकांना ती मशीद वाटत असे. ह्या ' मशिदी ' वरून पुढे जवळच्या रेल्वे स्टेशनचे नाव मस्जिद पडले . पुढच्या काळात तिथे मिनारा मस्जिद आणि जकेरिया मस्जिद अशा दोन मशिदी उभ्या राहिल्या आणि मूळच्या synagogueला लोक जुनी मस्जिद म्हणू लागले. हे सिनेगोग् बांधले होते सॅम्युएल एझिकेल ( Samuel Ezekiel) ह्या एका ज्यू गृहस्थांनी. त्यांचे स्थानिक नाव शामजी हसाजी दिवेकर असे होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या एका रेजिमेंट मध्ये ते आपल्या भाईबंदांसोबत भरती झाले. सुभेदार बनले. त्या काळी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मैसूर संस्थान ह्यांच्यात युद्धे होत. तिथे लढण्यासाठी सॅम्युएल आणि आणखी काही ज्यूजना पाठवले गेले. टिपूच्या फौजांनी त्यांना कैद केले आणि मृत्युदंड फर्मावला. शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी नेले जात असताना त्यांनी खूप गयावया करून आपली नावे हिंदू नसून ज्यू आहेत हे पटवून दिले. एका कथेनुसार टिपूच्या आईला ही नावे कुराणात आहेत हे आठवले म्हणा किंवा पटले म्हणा, ह्या लोकांना सोडून देण्यात आले. मग सॅम्यूएल् एझिकेल परतून मुंबईला आले. तिथे त्यांनी ज्यूंची वेगळी ओळख निर्माण व्हावी म्हणून आणि सुटका झाल्याची कृतज्ञता म्हणून एक सिनेगॉग इ.स. १७९६ साली बांधले. तेच त्याचे मुकादम नेमले गेले आणि मला वाटते वंशपरंपरागत ते पद त्यांच्याच घराण्याकडे आहे. ही जागा सध्याच्या छ. शिवाजी टर्मिनसपाशी होती. पुढे १८६० साली जी आय पी रेल वे सुरू झाल्यावर हे सिनागॉग सध्याच्या जागी हलवून त्याचे नूतनीकरण केले गेले. रस्त्याचे नावही सॅम्युएल एझीकेल स्ट्रीट ठेवले गेले.
- गूगल आर्काइव्हज वरून.

>>गोष्ट मुंबईची - Know Your City - Mumbai

सगळेच भाग मस्त आहेत याचे!!
जुन्या मुंबईबद्दल आपुलकी असणाऱ्या सगळ्यांनाच आवडतील हे बघायला!!

“गोष्ट मुंबईची - Know Your City - Mumbai”

मामी, अतिशय सुंदर लिंक! मनापासुन धन्यवाद!

मी मुळचा दादरचा असुनही मला या सिरीजमधे मिळालेली माहीती अजिबात माहीत नव्हती. ही मुंबईची सगळी माहीती, हा सगळा इतिहास ऐकुन/ बघुन खुप मस्त वाटले.

उदाहरणार्थ बेलार्ड इस्टेटमधल्या एपिसोडमधे तिथल्या “ नेव्हिल हाउस“ , “कॉन्ट्रॅक्टर हाउस“ व “कंस्ट्रक्शन हाउस“ चा इतिहास व माहीती ऐकताना नेव्हिल वाडिया, डिना वाडिया, नवरोसजी वाडिया , जारबाइ वाडिया , शापुरजी पालनजी, वालचंद हिराचंद या उत्तुंग व्यक्तींबद्दल थोडक्यात पण महत्वाची माहीती मिळाली.

माझा जन्म वाडिया हॉस्पिटलमधेच झाला असल्यामुळे ते स्थापन करणार्‍या वाडिया समुहाबद्दल “ नेव्हिल हाउस “ ची माहीती ऐकताना सर्व वाडिया समुहाला मी मनातल्या मनात वंदन केले. तसच बाँबे डाईंग या माझ्या लहानपणी खुप प्रसिद्ध असलेल्या कपड्याच्या कंपनीची स्थापना या वाडिया समुहानेच केली हेही कळले.

तसच “ कंस्ट्रक्शन हाउस“ “ बद्दलची माहीती ऐकताना वालचंद हिराचंद यांच्याबद्दल अनमोल माहीती मिळाली. माझ्या लहानपणी मुंबईत दोनच गाड्या होत्या. एक म्हणने अँबॅसेडर व दुसरी म्हणजे “ प्रिमिअर पद्मिनी“ इनफॅक्ट तेव्हा मुंबईतल्या बहुतेक सगळ्या टॅक्सीज “ प्रिमिअर पद्मिनी“ च्याच असायच्या. त्या प्रिमिअर पद्मिनी गाड्यांना वालचंद हिराचंद जबाबदार होते ते या एपिसोडमुळे कळले . तसच भोर घाटातले बोगदे बांधायलाही तेच कारणीभुत होते हे ऐकताना लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत माझ्या आजोळी , म्हणजे पुण्याला , डेक्कन क्विनने केलेल्या वार्‍यांची व खंडाळ्याच्या घाटाची व लोणावळ्याच्या मगनलाल चिक्कीची आठवण झाली. तसच रावळगाव कँडी व त्यांचा संबंध ऐकुनही मन लहानपणात हरवुन गेले. कारण लहानपण गरीबीत गेल्यामुळे महागाची “ कॅटबरी“ कधीच माझ्या नशीबी आली नाही पण फक्त ५ पैशात मिळणारे , क्लिअर प्लास्टिक रॅपर मधले रावळगाव मात्र खिशात बरेच वेळा असायचे. अश्या गरीबांना कँडी सहज उपलब्ध करुन देणार्‍या वालचंद हिराचंदांनाही हा एपिसोड बघताना मनातल्या मनात मी वंदन केले. तसच त्या बिल्डींगमधली शिल्प बनवणारे नारायण पानसरे यांनीच दादरच्या शिवाजी पार्क मधल्या अश्वारुढ शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला ही माहीतीही कळाली. माझी शाळा बालमोहन विद्यामंदिर ही या शिवाजी पार्कला लागुनच असल्यामुळे शिवाजी पार्क म्हणजे आमच्या शाळेचे बॅकयार्डच होते. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या त्या सुंदर पुतळ्याचे जवळजवळ रोजच आम्हाला दर्शन व्हायचे. त्या नारायण पानसरेंनाही मनातल्या मनात वंदन करुन झाले.

आणी शेवटी त्या एपिसोडमधे “ काँट्रॅक्टर हाउस“ बद्दलची माहीती ऐकताना शापुरजी पालनजी यांच्याबद्दल माहीती मिळाली. त्यांच्यातला व मुघल ए आझम या चित्रपटाचा संबंध तर कळालाच पण हेही कळले की ज्या ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडिअममधे मी माझ्या लहानपणी असंख्य रणजी ट्रॉफी मॅचेस बघीतल्या, ज्या ब्रेबॉर्न स्टेडिअममधे मी माझे लहानपणचे क्रिकेट “ आयडल“ मनोहर हर्डिकर उर्फ “ मन्या“, अजित वाडेकर, सुनिल गावस्कर, पद्माकर शिवलकर, एकनाथ सोलकर, अशोक मांकड यांचा खेळ पाहीला, ज्या ब्रेबॉर्न स्टेडिअमधे लहानपणी गर्दीत वडिलांचा हात घट्ट धरुन १९७१ मधे वेस्ट इंडीज व इंग्लंड दौर्‍यात विजयश्री मिळवुन परत आलेल्या अजित वाडेकरच्या भारतिय संघाच्या सत्कार सोहळ्याला मी गेलो होतो, ते ब्रेबॉर्न स्टेडिअम या शापुरजी पालनजी यांनीच बांधले! त्यासाठी शापुरजी यांनाही मी मनातल्या मनात वंदन केले.

परत एकदा मामी, या सुंदर लिंकबद्दल मनापासुन धन्यवाद!

Pages