Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16
निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.
कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.
मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पेटीट लायब्ररी म्हणजे डी एन
पेटीट लायब्ररी म्हणजे डी एन रोड वरची HSBC च्या बाजुची?
http://tenets.zoroastrianism.
http://tenets.zoroastrianism.com/7_Islands_of_Bombay.pdf
<< डेव्हिड ससून लायब्ररीची
<< डेव्हिड ससून लायब्ररीची माहिती त्या लायब्ररीच्या वेबसाईट खूप छान दिली आहे. >> माहितीबद्दल धन्यवाद.
<< मुंबईचं सुप्रसिध्द ससून डॉक्स... >> मुंबईचा मुख्य 'फिश लँडींग पॉईंट' ! एकदां तरी सकाळीं प्रत्येकाने - विशेषतः प्रत्येक मासेखाऊने - भेट द्यावी असाच; " काय मासळीबाजार मांडलाय ? " या उक्तीचा अर्थही संदर्भासहीत स्पष्ट होईल !!!
<< पेटीट लायब्ररी म्हणजे डी एन रोड वरची >> होय.
एका रिसेप्शनच्या निमित्ताने
एका रिसेप्शनच्या निमित्ताने मुंबईच्या दक्षिण टोकाला असलेल्या US Golf Clubला जाण्याचा योग आला. तो पुर्ण परिसर नेव्हीच्या अखत्यारीत येतो. तिथलं नेव्हीच वातावरण पाहून वेगळ्याच जगात आल्याचा भास होतो. हा Golf Club पार दक्षिण टोकाला असल्यामुळे सावधगिरी म्हणून त्याला १० मिटर उंचीची Compound wall आहे. भिंती शेजारील बाकड्यांवरुन खाली फेसाळाणार्या समुद्राचे दर्शन होते. संध्याकाळच्या निरव शांततेत तिथला सुर्यास्त अनुभवणे ही गर्दीत कोंडलेल्या मुंबईकरासाठी एक पर्वणीच असते.
मुंबई बंदराचा एक
मुंबई बंदराचा एक वैशिष्ठ्यपूर्ण भाग म्हणजे 'दारुखाना' . पोर्ट ट्रस्टने फक्त 'शिप-ब्रेकींग' साठी राखीव ठेवलेला [ महाराष्ट्रातील एकमेव] गोदीभागातला एक छोटासा कोपरा . इथं वीज, पाणीपुरवठा किंवा इतर कांहीच कायमस्वरुपी सुविधा जाणीवपूर्वकच पुरवलेल्या नाहीत [ कित्येक दशकं तात्पुरती सोय म्हणूनच ही जागा वापरली जातेय; या उद्योगाचा ओंगळपणा व प्रदूषण यांच्याशीं असणारा घनिष्ठ संबंध , हें कारण असावं. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वेब-साईटवरही ओझरता उल्लेखच सापडतो बंदराच्या या भागाचा ! ]. पण कोट्यावधीचा हा उद्योग इथं अविरत चालतो. एका वेळीं केवळ ४-५ छोट्या- मध्यम आकाराच्याच बोटी लागतील एवढीच जागा आहे तिथं. साधारण तीन-चार महिन्यांसाठी एका बोटीच्या विघटनासाठी ठराविक जागा आंखून भाड्याने देण्यात येते. मग छोटसं लांकडी केबिन बांधून संबंधित उद्योजक- व्यापारी स्वतःचं तात्पुरतं कार्यालय तिथं उभारतो. काम संपलं कीं ती जागा होती तशी परत पोर्ट ट्रस्टच्या ताब्यांत द्यावी लागते; केबिन, भंगार याचा लवलेशही न ठेवतां.
जगात कुठेही जुनी बोट विकत घ्यायची, कशीबशी मुंबई बंदरात आणायची, दारुखान्यात आल्यावर वेगवेगळ्या भंगारवाल्याना डेकचं लाकूड, केबिन्समधलं साहित्य, इलेक्ट्रीकल,सॅनिटरी उपकरणं इ.इ. विकायचं. मग बॉयलर काळजीपूर्वक काढून तो गरजू कारखान्याला विकायचा; मग बोटीचे पोलादी पत्रे मोठ्मोठ्या तुकड्यात कापून काढून ते विकायचे. [नवीन पोलाद करण्याच्या खर्चात यामुळे कमालीची बचत होते]. असा आहे थोडक्यात हा 'रिसायक्लींगचा' उद्योग.
दारुखान्यात बोटी पाण्यातून किनार्यापर्यंत येत नाहीत. कारण कांठापासून जवळजवळ दोन- अडीचशेंहून अधिक मीटर अंतरापर्यंत कित्येक मीटर खोल असा दाट गाळ सांठलेला आहे. बोटी दोरखंडानी बांधून त्या घट्ट गाळातून खेंचून किनार्यालगत आणाव्या लागतात. त्यांतच दोन-तीन दिवस जातच असावेत. मग बोटीचं विघटन वरच्या बाजूने चालूं होतं. वेगवेगळे भंगारवाले येवून आपापली स्पेश्यालिटी असलेलीं उपकरणं सफाईने काढून घेवून जातात. [बोटीवरचं 'डेकवूड' हें उत्तम प्रतीचंच लांकूड असावं लागतं; ' वूडन बॅडमिन्टन कोर्ट'साठी मोठी किंमत देऊन हें वापरलेलं मीं पाहिलंय ]. मग रिकाम्या झालेल्या बोटीचे जाड पोलादी पत्रे कापून काढायचं व ते क्रेनच्या सहाय्याने ट्रकवर चढवून नेण्याचं अत्यंत जिकीरीचं काम सुरूं होतं. खालीं दाट चिखल, कसल्याही सुविधा नाहीत अशा अवस्थेत असिटीलीनचे सिलॆंडर वापरून तिथं हें जोखीमभरं काम करणं हें येरा गबाळ्याचं काम नव्हे.
जगांत शेकडों बोटी कालबाह्य होऊन अशा 'कबरस्थाना'च्या इंतजारात असतात; लाखों टन तयार पोलाद अगदीं स्वस्तांत या उद्योगामुळें उपलब्ध होतं. पाकिस्तान, बांगलादेश इथं खूप मोठ्या प्रमाणात 'शिपब्रेकींग' चालतं. आपल्याकडे गुजरातने ह्याकरतां 'अलंग'सारख्या राखीव जागा तयार केल्या आहेत. अर्थात, या उद्योगाला चांगल्या व वाईट दोन्ही बाजू आहेतच.
[ मी एका मित्राबरोबर कांहीं कामाकरतां दहा-बारा वर्षांपूर्वीं दारुखान्याला गेलों होतो. मग कुतूहलापोटीं मुद्दाम एक पूर्ण दिवस तिथं घालवला होता. तिथल्या वरील वस्तुस्थितींत आजही फ़रक पडला असण्याची शक्यता कमीच. तसं 'दारुखाना' हें कांही प्रेक्षणीय स्थळ नव्हे पण मुंबईत आपल्या नजरेआड काय काय चालत असतं, याची एक झलक म्हणून हें सांगावसं वाटलं ] ]
भाऊकाका मस्त पोस्ट टाकलीत
भाऊकाका मस्त पोस्ट टाकलीत
भाऊकाका, काय पोस्ट टाकलीत.
भाऊकाका, काय पोस्ट टाकलीत.
तुअम्च्या पोस्टमधून अजिबात न पाहिलेली मुंबईदेखील दिसते.
दारूखान्याला माझे वडील अधून मधून "मटेरीअलच्या कामाला जातोय" असं सांगत असत. एकदा त्यांनी असंच बोलता बोलता शिप ब्रेकिंगबद्दल सांगितलं तेव्हापासून आम्ही मुलं "दारूखान्याला ना? भंगार गोळा करायला" असं चिडवायचो त्यांना. हल्ली या असल्या कामांसाठी माझे बंधुराज पण जातात.
दारूखानामधे पूर्वी मु.म्बई किल्ल्याचा दारूसाठा ठेवायचे म्हणे. नक्की माहित नाही.
संपूर्ण नेवीनगर ही मुंबईतली
संपूर्ण नेवीनगर ही मुंबईतली एक अद्भुत जागा आहे. आधीच्या अफ्घान चर्च पासूनच या जागेचे गारुड सुरू होते. नंतर आर्.सी.चर्च (रोमन कॅथ्लिक चर्च.) दोन्ही वास्तू भव्य. एक जागती, एक न वापरती. अफ्घान चर्चचा ओसाड भव्यपणा एकदा अनुभवण्याजोगा आहे. नंतर आय्.एन्.एस्.अश्विनीचा विस्तीर्ण परिसर. एक जवळचे नातेवाईक नौसेनेत वरिष्ठ जागी होते. त्यांच्याकडे वरचेवर जाणे होई. त्यामुळे या परिसराशी खूपच गट्टी जमली होती. फाउन्टनवरून पकडलेली बस म्यूझिअमवरून कुलाब्यात शिरे. मग इलेक्ट्रिक हाउ़झ, कुलाबा कॉझ्वे, कुस्रो बाग करीत स्ट्रँडवरून ससून डॉक्स आणि कुलाबा पोस्ट ऑफिस कडे आली की मुंबईचा कोलाहल अचानक मागे पडे. इलेक्टिक हाउझपासूनच डाव्या बाजूच्या छोट्या गल्ल्यांच्या टोकाला .समुद्रदर्शन होऊ लागे. जमीन चिंचोळी होऊ लागलीय याची स्पष्ट जाणीव होई. दुसर्या रस्त्याने म्हणजे वुडहाउस रस्त्याने (आताचा नाथालाल पारेख रस्ता)मार्गाने एक बस येई.(मला वाटते तीन नंबर. की एकशे बावीस?). तेव्हा कफ परेडचे रेक्लमेशन झाले नव्हते. त्यामुळे हा संपूर्ण रस्ता समुद्राचा वारा अंगावर घेत घेत मागे पडे. बधवर पार्क समोर समुद्र फेसाळत असे. त्यात मच्छीमारांच्या होड्या लाटांवर हिंदकळताना दिसत. मार्गामध्ये एक धोबीघाटही होता. रस्त्याच्या कडेने बाके ठेवलेली असत. त्यावर विशेषतः पारसी लोक समुद्राची हवा खात बसलेले असत. त्यातले काही बाक अजूनही आहेत पण समुद्र मात्र नाहीय. तो खूप दूर गेलाय. या रस्त्यावरचे चिराग दीन चे दुकान गूढरम्य वाटे. आतली तुरळक पण निवडक वर्गातली गिर्हाइके वेगळ्याच दुनियेतली भासत.
इथल्या वास्तव्यात एकदा आजारी पडल्यामुळे आमच्या नातेवाईकांबरोबरच आय. एन. एस. अश्विनीचेही आदरातिथ्य स्वीकारण्याचा योग आला होता. संपूर्ण दगडी बांधणीच्या बैठ्या इमारती, त्यांमधले सुंदर आखीव-रेखीव रस्ते, कडूलिंबाची उंच वाढलेली झाडे, प्रशस्त वरांडे, समोर समुद्राची गाज, अतितत्पर कर्मचारीवर्ग, खाण्यापिण्याची चंगळ(न्याहारीला भलेमोठे चीझचे तुकडे, फळे अथवा फळांचा रस, बरोबर पॉरिजसारखा एखादा गोड पदार्थ, पंजाबी पद्धतीचे तितकेच दमदार जेवण, चहाबरोबर उंची बिस्किटे, मोठाले दुधाचे ग्लास वगैरे वगैरे.) या सरबराईनेच रोगी निम्मा बरा होत असेल. पण झटपट इलाज आणि झटपट डिस्चार्ज अशी पद्धत नव्हती. तपासण्याही पुन्हापुन्हा केल्या गेल्या आणि ऑपरेशननंतरही जवळजवळ दहा दिवस ठेवून घेतले गेले. सर्वप्रकारे बरे झाल्याची खात्री डॉक्टरांना पटल्यानंतरच सुटका झाली. तिथली मेस, क्लब, कॅन्टीन्(स्टोअर) यावरही पुष्कळ लिहिण्यासारखे आहे.
भाऊ, हिरा, मस्त पोस्टी.
भाऊ, हिरा, मस्त पोस्टी.
बांग्लादेशातल्या 'शिप-ब्रेकिंग'बद्दल नुकताच डिस्कवरी चॅनलवर एक कार्यक्रम पाहिला होता. तिथलं कामाचं स्वरूप भाऊंनी लिहिल्याप्रमाणेच होतं साधारण.
('शिप-ब्रेकिंग' ही बांग्लादेशातली प्रथम क्रमांकाची इण्डस्ट्री आहे म्हणे! :अओ:)
इंद्रधनुष्यजी व हीरा यानी
इंद्रधनुष्यजी व हीरा यानी सांगितलेला सुखद अनुभव कुलाब्याच्या टीआयएफआरच्या समुद्रकांठच्या सुंदर लॉन्सवरही येतो. << या रस्त्यावरचे चिराग दीन चे दुकान गूढरम्य वाटे. >> खरं तर 'इलेक्ट्रीक हाऊस' ओलांडलंच कीं एका वेगळ्याच गूढमय वातावरणात शिरल्यासारखंच वाटतं. पूर्वीं - फार पूर्वीं म्हणा हवं तर- 'स्ट्रँड'ला सिनेमासाठीं गेल्यावर आम्ही तिथं खूप भटकायचो. पण सतत दबल्यासारखं वाटायचं, जें मुंबईच्या इतर कोणत्याही भागात आम्हांला कधींच वाटलं नाही. कारण मात्र नाही उमजत.
<<भाऊकाका, काय पोस्ट टाकलीत >> नंदीनी, खात्रीच होती तुमच्या तात्काळ प्रतिसादाची !! चंद्रावर जावून आल्यावर मीं त्यावरची पोस्ट टाकली असती तरी कदाचित तुमचा प्रतिसाद आला नसता ;पण बोटींबद्दल कांही लिहील्यावर ..... !!!
हिरा, टि.आय.एफ.आर. मधे माझ्या
हिरा, टि.आय.एफ.आर. मधे माझ्या आत्याचे मिस्टर होते. त्यांच्यामूळे आतूनही ते बघता आले. त्यांचा असा वेगळा किनारा आहे. तिथे खोट्या बदामाची आणि समुद्रफळाची खुप झाडे आहेत. त्यावेळी जयंत नारळीकर पण तिथे रहात होते.
टि.आय.एफ.आर. चेच एक हॉस्पिटल अणुशक्ती नगर जवळही आहे. तिथे पण अशा खास सुविधा आहेतच.
००००००००००
भाऊ, मुंबईत शिप ब्रेकिंग होते हे माहीत नव्हते. भावनगरजवळच्या अलंग ला मोठे यार्ड आहे. त्या गावात दुसरे काहीच नाही. पिण्याचे पाणी पण बाहेरुन आणावे लागते. पण तिथला समुद्र उथळ असल्याने तिथे हा उद्योग फोफावला.
बोटीवरच्या लोकांचा असा समज असतो कि बोट सोडताना तिच्यावरची कुठलीच वस्तू सोबत न्यायची नाही.
त्या सामानासकटच तिचा लिलाव होतो. मग हे सामान तिथे रस्त्यावर विकायला येते.
<< पण तिथला समुद्र उथळ
<< पण तिथला समुद्र उथळ असल्याने तिथे हा उद्योग फोफावला.>> खरंय, दिनेशदा. मला वाटतं बर्याच बोटी तिथं इंजीन चालूं ठेवून उथळ पाण्यातून आणून वाळूत घुसवतां येतात. खूप इच्छा असूनही तिथं जाणं मात्र राहूनच गेलं, हें खरं.
हीरा मस्त वर्णन नेव्हीनगरचं.
हीरा मस्त वर्णन नेव्हीनगरचं. टीआयएफार मधलं डॉ,भाभांनी केलेलं आर्ट कलेक्शन हा एक अमूल्य ठेवा आहे. प्रोग्रेसिव्ह ग्रूप चळवळीतल्या चित्रकारांच्या चित्रांचा सर्वात बेस्ट डिस्प्ले तिथे आहे. तो परिसरच इतका कलात्मक आहे. सुंदर वृक्षराजी, शांत समुद्रकिनारा. विज्ञान आणि कला यांचा अपूर्व संगम टीआयएफार संकुलात साधला आहे.
भाऊ तुमच्या पोस्ट्सही खजिना आहेत.
भाऊ, एकदा आमच्या धडपड्या
भाऊ, एकदा आमच्या धडपड्या शेजार्यांनी (नेमके आपलेच शेजारी धडपडे, व्यवहारकुशल,घासाघीसतज्ज्ञ, चतुर का असतात? कधीतरी आपला शेजारी आपल्यापेक्षा बावळट निघालाय का?) एक उंची आणि सुंदर डिनर्-सेटअगदी कमी भावात 'मिळवला होता', त्याची गोष्ट घरात बरीच गाजली होती. सेट खरेच सुंदर होता आणि तो कमी किंमतीत मिळवून दाखवल्यामुळे त्या शेजार्याचा भाव बरेच दिवस वधारलेला होता. आपल्या घरातल्यांना हे असे कधीच का जमत नाही यावरही चर्चा झाली होती. शेवटी त्या सेटचा उगम दारूखाना होता आणि तो सेट बहुधा वापरलेला होता हे कळल्यावर वातावरण शांत झाले.
भाऊ, दारुखान्याची माहिती
भाऊ, दारुखान्याची माहिती अफाटच. हे अजिबात माहित नव्हतं आणि इतर कोठून ऐकायला मिळण्याचा संभवही नव्हता. धन्यवाद.
हीरा आणि भाऊ दोघेही अतिशय वेचक आणि वेधक माहिती देताहेत.
भाऊ आणि हिरा - स्टार्स ऑफ द
भाऊ आणि हिरा - स्टार्स ऑफ द बीबी.
शर्मिला फडके, डॉ. भाभा हे
शर्मिला फडके, डॉ. भाभा हे एक मर्मज्ञ कलारसिक होते. टी आय एफ आर आणि बी,ए.आर्.सी या दोन्ही ठिकाणी त्याचा प्रत्यय येतो. किंबहुना प्रत्येक पारसी हा कलावस्तूंविषयी प्रेम असणारा आणि त्याची योग्य ती निगा राखणारा असतो म्हटल्यास वावगे ठरू नये. एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतरची पहिली काही वर्षेपर्यंत एअर्-इंडियाचाही आब होता. त्यांचा स्वागतकक्ष अभिरुचिपूर्ण होता असे त्या न-कळत्या वयातही जाणवले होते.
हे पारसी केवळ रसिकच असतात असे नव्हे तर ते कलाकृतींचे आणि कलाकारांचे मोठे आश्रयदातेही असतात. सध्या फेरोझा गोदरेज आणि गोदरेज कुटुंबांतील इतर सदस्य यात आघाडीवर आहेत. टाटा-गोदरेज प्रमाणे इतरही काही बडे उद्योगपती कलांचे आश्रयदाते बनू पहात आहेत.पण कित्येकदा हे कलाप्रेम बेगडी असावे असे त्यांचे संग्रह पाहिल्यावर(हे क्वचितच म्हणा) आणि त्याविषयीच्या बातम्या वाचल्यावर( हे नेहमीचेच म्हणा) मत होते. टाटा आणि गोदरेज गट या कामाविषयी अगदी प्रसिद्धी पराङ्मुख आहेत.
इंद्रधनष्य ने सांगितलेल्या यु
इंद्रधनष्य ने सांगितलेल्या यु एस गॉल्फ क्लब मध्ये मी ही एक रिसेपशन अटेंड केलंय (नोव्हेंबर २००९ साली), फारच रम्य वातवरण आहे, असं वाटतं भर समुद्रात रिसेपशन चे पार्टी होत आहे. रिसेप्शन रात्रौ उशीर ९.०० ला सुरु झाले, आम्हास निघायला रात्रीचे ११.०० - ११.१५ झाले होते. स्वतः ची गाडी असल्यास उत्तम नाही तर फार त्रास होतं.
नेव्ही नगर ला सगळे बस रिकामी होते, नेव्ही नगर ते यु एस गॉल्फ क्लब चे एंट्रेंस पायी चालत गेल्यास २०-२५ मिनीटे लागतात, एंट्रेंस ला चेकिंग होतं, एंट्रेंस ते रिसेपशन चे मैदान परत पायी चालत गेल्यास २०-२५ मिनीटे.
नेव्ही नगर हुन चर्चगेट / सी एस टी स्टेशन साठी शेवटचे बस बहुधा ११.०० वाजता चे आहे, रात्री रस्ता निर्मणुष्य असतं. सोबत महिला वर्ग किंवा एकटी स्त्री असल्यास पर्स मध्ये स्वरक्षणासाठी काही न काहीतरी जरुर ठेवावे.
तसं 'दारुखाना' हें कांही
तसं 'दारुखाना' हें कांही प्रेक्षणीय स्थळ नव्हे पण मुंबईत आपल्या नजरेआड काय काय चालत असतं, याची एक झलक म्हणून हें सांगावसं वाटलं > +१ भाऊ मस्तच...
तिथल्या वरील वस्तुस्थितींत आजही फ़रक पडला असण्याची शक्यता कमीच. >>> मागिल महिन्यात दारुखान्याला जाण्याचा योग आला... त्या अरुंद रस्त्यातून ट्रक आणि ते ट्रेलर कसे काय मार्ग काढतात देव जाणे. पावसाळ्यात तिथले लोक कसे काय जगत असतील?
दुकान मकान सगळ एकच... दुकानांना कांउटर नसतोच.. थेट वेअर हाऊस... आत बाहेर सगळी कडे भलेमोठे साखळदंड, चेन, बॉयलर्स काय नी किती...
पण सतत दबल्यासारखं वाटायचं, जें मुंबईच्या इतर कोणत्याही भागात आम्हांला कधींच वाटलं नाही. कारण मात्र नाही उमजत. >> +१
यु एस गॉल्फ क्लब = United
यु एस गॉल्फ क्लब = United Services Golf Club
आभार, अश्विनी के. भाऊंच्या
आभार, अश्विनी के.
भाऊंच्या पोस्ट्स त्यांच्या व्यंगचित्रांइतक्याच मनोवेधक,माहितीपूर्ण आणि अभिनिवेशहीन असतात. इतरही अनेक जणांनी (त्यात तुम्हीही येता) उदा. नंदिनी, दिनेशदा कितीजणांची नावे घेऊ?-सर्वांनीच हा धागा वाचनीय करण्यात हातभार लावलेला आहे. यात धागाकर्त्यांचाही मोठा वाटा आहेच.(आभारप्रदर्शन खूप लांबले की कंटाळवाणे होते म्हणून पूर्णविराम.)
हिरा, आपल्या म्यूझियममधल्या
हिरा, आपल्या म्यूझियममधल्या अनेक वस्तू टाटा कुटुंबीयांकडून भेट मिळालेल्या आहेत.
नेव्ही नगर ला सगळे बस रिकामी
नेव्ही नगर ला सगळे बस रिकामी होते, नेव्ही नगर ते यु एस गॉल्फ क्लब चे एंट्रेंस पायी चालत गेल्यास २०-२५ मिनीटे लागतात, >> अगदी... संध्याकाळी टॅक्सीने आलेल्या पाहुण्यांना रात्री परताना खूपच घाम गाळावा लागला होता. :p
परळ मधिल वाडिया हॉस्पिटल आणि राजा एडवर्ड स्मारकाचे वैशिष्ठ्य पुर्ण बांधकाम बघायला बरेच हौशी पर्यटक येतात.
<< त्या अरुंद रस्त्यातून ट्रक
<< त्या अरुंद रस्त्यातून ट्रक आणि ते ट्रेलर कसे काय मार्ग काढतात देव जाणे. >> इंद्रजी, मला तर खूपच खटकलेला हा मुद्दा लिहायचाच होता पण लिखाण पाल्हाळिक होईल या भितीने नाही तो मांडला. चेंबूरच्या आंतल्या बाजूला जो रिफायनरीजचा भाग [तुर्भे ] येतो तिथंही ज्या रस्त्यांवर केमिकल्स/ पेट्रो-केमिकल्सच्या टँकर्सची खूप वर्दळ असते त्या अरुंद रस्त्यांची प्रचंड दुर्दशा पाहिल्यावरही माझ्या मनात हाच विचार आला होता ! योजक: तत्र दुर्लभ: !!
टी.आय.एफ.आर. च्या बसेस असतात.
टी.आय.एफ.आर. च्या बसेस असतात. विनामूल्य असतात. आम्ही आत्याकडे गेलो कि त्याच बसने येत असू.
---
भाऊ, तरी सध्या तिथली वाहतूक कमी झालीय म्हणायची. आम्ही आलो त्यावेळी सायन ट्रॉम्बे रोडवर सल्फरच्या ट्रक्सची खुप वाहतूक व्हायची. आम्ही रस्त्यावर पडलेले सल्फरचे खडे गोळा करुन आणायचो आणि मस्त रंगात जळतात म्हणून जाळत बसायचो. त्या धुराने सदाफुलीची गुलाबी फुले पांढरी करायचो.
अर्थात त्या धुराने खोकला पण व्हायचा. त्या काळात खुपच प्रदूषण असे तिथे. पुढे त्या चिमणीची उंची बरीच वाढली आणि चेंबूरमधे जाणीवपूर्वक झाडे लावली गेली. आता तितकासा त्रास होत नाही. ( किंवा आम्ही त्याला सरावले, असे म्हणू या. )
चुनाभट्टीच्या पुलाजवळ ज्या झोपड्या आहेत तिथे खुपच हातभट्ट्या लागलेल्या असायच्या. दूरवर तो दर्प जाणवायचा. बर्याच वेळा त्या हटवल्या जात तरी परत परत होत. आता मात्र दिसत नाहीत. शिवडीच्या खाडीतून गलबते पुर्वी तिथपर्यंत, शिंपले घेऊन येत आणि तिथे चुना तयार केली जाई, म्हणून ते नाव पडले, असे म्हणतात.
त्या काळात महेश मांजरेकर स्ट्रगल करत होता त्या काळात चुनाभट्टीलाच रहात होता. अगदी बसस्टॉपवरही दिसे तो. ( त्यावेळी तो "डॉक्टर तूम्हीसुद्धा", "ध्यानीमनी" अशा व्यावसायिक नाटकात असे. )
चुनाभट्टीच्या फाटकाचा त्रास मात्र आम्हाला अजून होतो. तिथे फ्लायओव्हर व्हायची शक्यता कमीच आहे.
पण लाईन कमी आणि जिने चढावे लागत नाहीत, म्हणून व्हीटीला जायचे असेल, तर आम्ही कुर्ल्यापेक्षा, चुनाभट्टीला जाणे सोयीस्कर मानतो.
हिरा आणि भाऊकाका तुमच्या
हिरा आणि भाऊकाका तुमच्या पोस्टी भारी. अजिबात माहित नसलेली मुंबई तुमच्यामुळे माहिती होतेय.
<< एअर्-इंडियाचाही आब होता.
<< एअर्-इंडियाचाही आब होता. त्यांचा स्वागतकक्ष अभिरुचिपूर्ण होता असे त्या न-कळत्या वयातही जाणवले होते. >> माझ्या मित्राचे काका [ पाटकर] हे प्रथितयश आर्टीस्ट होते.[ पूर्वीच्या मेट्रो सिनेमात भिंतींवर जीं 'म्युरल्स' होतीं तीं त्यानी व त्यांच्या जेजेच्या सहकारी व विद्यार्थ्यानीं मिळून केलीं होतीं. ] मीं बर्याच वेळां त्याना गिरगांवात लांबलचक 'म्युरल्स'वर काम करताना पहात बसत असे. बहुतेक वेळां तीं खास एअर इंडियाच्या वेगवेगळ्या ठीकाणच्या स्वागतकक्षांसाठीं असल्याचं ते मला सांगत .
भाऊकाका, माझ्यासाठी मुंबई हे
भाऊकाका, माझ्यासाठी मुंबई हे आजही माझगांव, रे रोड, प्रिन्सेस गेट, एलो गेट, भाऊचा धक्का इतपतच मर्यादित आहे.
त्यातही भाऊचा धक्का म्हणजे अगदी घरचं अंगण असल्यासारखं बागडलेय तिथे.
काय मस्त पोस्ट्स
काय मस्त पोस्ट्स आहेत.
नेव्हीनगर, टी.आय.एफ.आर. या आणि वर लिहीलेल्या बर्याच जागी कोणालाही जाता येते की परवानगी लागते?
परवानगी लागते.
परवानगी लागते.
Pages