Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16
निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.
कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.
मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सरकता जिना चालू असताना खूपच
सरकता जिना चालू असताना खूपच अपूर्वाईने वडिल तो दाखवायला आम्हाला घेऊन गेले होते.आता मॉलमधे सगळीकडेच हे सवयीचे वाटत असले तरी त्यावेळी आम्हाला फारच मजा वाटली होती आणि माझ्या आठवणीनुसार एकाच बाजुने तो गिरगाव चौपाटीवरचा जिना सरकता होता. नक्की आठवत नाही पण बहुतेक चढताना असावा.
गेटवेवरून मुंबई बंदरात
गेटवेवरून मुंबई बंदरात फेरफटका मारून आणणार्या लाँचेस व शीडाच्या होड्या हें मुंबईचं एक महत्वाचं आकर्षणच. समुद्राची हवा खात , लाँचच्या हेलकाव्यातून विविध आकाराच्या , प्रकारच्या बोटी बघत मारलेल्या अर्घ्या-पाऊण तासांच्या या फेरफटक्याने किती ताजं तवानं व्हायला होतं ! पूर्वीं तर आमचा हा आवडता छंदच असे.
एकदां इंग्लडच्या आरमारातील सदिच्छा भेटीवर आलेली एक 'एअरक्राफ्ट कॅरीअर' गेटवेसमोरच बंदराच्या मध्यभागीं नांगर टाकून होती. ती लाँचमधून पहाण्याकरतां गर्दीही उसळली होती व लाँचसाठी मोठी रांगही लागली होती. बाजूलाच शीड्यांच्या छोट्या होड्यांचे खलाशीही ती बोट दाखवून आणतो अशी ओरडून जाहिरात करत होते. रांगेला कंटाळून मीं पटकन जावून अगदीं सुटतच असलेल्या तशा एका होडीत बसलो. इतर उतारू कोकणातल्या किनारपट्टीवरचीं मुंबै बघायला आलेलीं मुस्लिम कुटुंबच होतीं.
होडी धक्क्याच्या आडोशाबाहेर येवून शीडं फुगवून धांवायला लागली तशी तिच्या जोरदार हेलकाव्यांची व माझ्या छातीतल्या धडधडीची स्पर्धाच सुरूं झाली. लाँचसाठी रांगेत ताटकळणारे लोकच किती शहाणे आहेत हेंही उमगलं. पण अंगावरचीं मुलं असणार्या होडीतल्या त्या मुस्लिम बायका मात्र बिनधास्त बसल्या होत्या. त्यामुळे चेहर्यावरची भिती लपवणं हा मला आणखी एक ताप झाला होता. उसळणारं पाणी व होडीचे हेलकावे याकडे दुर्लक्ष करत मग मी त्या 'एअरक्रॅफ्ट कॅरीअर'कडेच लक्ष केंद्रीत केलं. ती कॅरीअर जवळ येऊ लागली तसं मनातली भितीही कुतूहलापुढे नांगी टाकूं लागली. तीच्यापासून हांकेच्या अंतरावर आमची होडी आली इतक्यांत तिच्या डेकवर एकदम धांवपळ सुरूं झाली. बंदुकी घेवून नाविक रेलींगकडे आले; मोठ्या कर्ण्यातून मग आमच्याकडे पहात तिथून ओरडा सुरूं झाला- " गेट बॅक.. गेट बॅक ! ". मी होडीच्या खलाशाना म्हटलं, आपल्याला तात्काळ मागे वळायला सांगताहेत, नाही तर शूटींग पण करतील ! खलाशीही बावचळले; सुकाणूंने होडी पटकन उलट्या दिशेला वळवणं आतां अशक्य होतं. मग एका खलाशाने प्रसंगावधान राखून शीडाची दिशा सर्रकन बदलली. एक-दोन मिनीटं मग त्या होडीने भर समुद्रात जें तांडव केलं तें आठवून आजही मी हादरतों ! पण त्यावेळीं मीं खरा सांवरलो तें त्या गोंधळातही होडीतल्या त्या मुस्लिम कुटुंबाच्या निर्विकार चेहर्यांकडे बघून. जैतापूरच्या खाडीच्या आसपासच्या त्या मुस्लिम कुटूंबप्रमुखाने होडीतून उतरताना मला हंसत त्याचं कारण सांगितलं, ' अपनेकु तो ये क्या, रोजकाच हय !'.
भाऊ, भारी आठवणी. वरती कुणीतरी
भाऊ, भारी आठवणी.
वरती कुणीतरी सत्यम-शिवम-सुंदरम या थेट्रांबद्दल लिहिलंय - ते सत्यम-शिवम-सचिनम आहे (ना?)
आम्ही शाळेत असताना ही थेट्रं खूप प्रसिध्द होती.
शिवाय ग्रॅण्ट-रोडचं एक थिएटर होतं, स्टेशनजवळच, आत शिरलं की दोन्ही बाजूंनी वर जायला जिने नव्हे, तर रॅम्प होते, त्यावर लाल जाड गालिचे घातलेले, (जाड सतरंज्या असाव्यात, गालिचे कुठले परवडायला!) वरती झुंबरं लटकलेली, आम्ही ८५-८६ साली एकदा ठाण्याहून तिथं जाऊन 'फांसले' हा सिनेमा पाहिला होता
आमचे बाबा याबाबतीत भलतेच उत्साही!
आत शिरल्या-शिरल्याच मला आणि मंजीला ते थिएटर प्रचंड आवडलं होतं. नाव आठवत नाही. आता नसावं ते.
ते सत्यम-शिवम-सचिनम आहे>>>
ते सत्यम-शिवम-सचिनम आहे>>> हो!
आम्ही शाळेत असताना ही थेट्रं खूप प्रसिध्द होती.>> अय्या! मी शाळेत असतानाही ही थेट्रं प्रसिद्ध होती.
म्हणजे आपली प्रसिद्धी बराच काळ टिकवून होती ही थेट्रं.
ग्रॅण्ट-रोडचं एक थिएटर होतं>> लिबर्टी का? हम आपके है कौनवालं??
हम आपके है कौनवालं?? >>>
हम आपके है कौनवालं?? >>> याबद्दल माहिती नाही. 'हम आपके है कौन' रिलीज झाला तेव्हा आमची वयं थेट्रं-बिट्रं आवडण्याच्या पलिकडे गेलेली होती. लास्ट आठवण तीच ८५-८६ सालची.
ग्रँटरोडला एक शालिमार नावाचं
ग्रँटरोडला एक शालिमार नावाचं थेटर पण होतं.
अगं लिबर्टीला हम आपके है कौन
अगं लिबर्टीला हम आपके है कौन वर्षभर चालू होता म्हणे. म्हणून मी त्याची खूण सांगितली.
पण लिबर्टी चर्नी रोडला उतरून एका घुमटाकार इमारतीवरून उजवीकडे वळल्यावर लागतं, म्हणजे तू म्हणतेस ते लिबर्टी नसावं. पण लिबर्टीची आतली रचना बहुतेक तू वर्णन केल्याप्रमाणेच आहे, आता आठवत नाही नीट. हम आपके है कौन बघून य वर्ष लोटली.
गिरगाववाले सांगतील काय ते.
द्रष्ट्याला माहिती असेल
द्रष्ट्याला माहिती असेल याबद्दल नक्की...
एक नॉव्हेल्टी होतं
एक नॉव्हेल्टी होतं ग्रँटरोडला.
लिबर्टी चर्चगेट-मरिन लाईन्सला
लिबर्टी चर्चगेट-मरिन लाईन्सला आहे ना?
आईला विचारलं. ती म्हणतेय -
आईला विचारलं. ती म्हणतेय - बहुतेक लिबर्टी.
मग लले तुम्ही मरिन लाईन्सला
मग लले तुम्ही मरिन लाईन्सला उतरुन गेला असाल.
भाऊ, राणीच्या बागेतही
भाऊ, राणीच्या बागेतही बोटींगची सोय होती. आठवतेय ? आता तिथे हरणे आणि मगरी आहेत.
तिथेच एक ओपन एअर थिएटरही आहे. आता बंद पडलेय ( पण अजून पाडलेले नाही. ) शाहीर साबळ्यांची काही नाटके तिथे बघितली आहेत मी.
फोर्ट युनिव्हर्सिटीच्या आवारातले उर्वशीचे झाड ही अशीच एक रम्य आठवण. अगदी फूटपाथनजीक होते ते झाड.
जानेवारी फेब्रुवारीमधे बहर आला कि झाडावरुन ओघळणारी मीटरभर लांबीची केशरी झुंबरे आणि त्यावरची ती अप्रतिम फुले !
आता ते झाड तिथे नाही पण राणीच्या बागेत, बंगल्याच्या आवारात एक आणि मुद्दाम जोपासलेली ( बार्किंग डीयरच्या पिंजर्यासमोरची ) दोन झाडे मात्र आता तशीच बहरतात.
लिबर्टी चर्चगेट-मरिन लाईन्सला
लिबर्टी चर्चगेट-मरिन लाईन्सला आहे ना? >> हो तिथेच हम आपके लागलेला वर्षभर मला आठवतेय त्याप्रमाणे. त्याची कथा इथे वाचा
http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-05-17/mumbai/31748204_1...
<<शिवाय ग्रॅण्ट-रोडचं एक
<<शिवाय ग्रॅण्ट-रोडचं एक थिएटर होतं, स्टेशनजवळच, आत शिरलं की दोन्ही बाजूंनी वर जायला जिने नव्हे, तर रॅम्प होते, त्यावर लाल जाड गालिचे घातलेले, (जाड सतरंज्या असाव्यात, गालिचे कुठले परवडायला!) वरती झुंबरं लटकलेली, >>
मिनर्वा...
<< भाऊ, राणीच्या बागेतही
<< भाऊ, राणीच्या बागेतही बोटींगची सोय होती. आठवतेय ?>> होय, दिनेशदा. मुद्दाम बनवलेल्या छोट्या कालव्यातून होडीतून फिरायची सोय होती तिथं. आजूबाजूला बदकंही पाण्यात असत. मुलाना खूपच आकर्षण असे त्याचं.
राज, मिनर्व्हा बाँबे सेंट्रल
राज, मिनर्व्हा बाँबे सेंट्रल स्टेशनजवळ आहे. "शोले"चं राहतं घर.
मी दहावीला असताना शोले रिलीज
मी दहावीला असताना शोले रिलीज झाला आणि बी.कॉम. होईपर्यंत तिथेच होता. तो साधी प्रिंट आणि ७० एम एम असा दोन्ही प्रकारे रिलीज झाला होता. साधी प्रिंट बघितलेले लोक, परत ७० एम एम बघत.
आता जिथे नक्षत्र मॉल आहे तिथे कोहीनूर थिएटर होते. ते काय किंवा ऑपेरा हाऊस काय, जरा अवकळाच आली होती. पण तिथे मोठमोठी हाताने रंगवलेली पोस्टर्स लावली जात. ( फ्लेक्स प्रिंटींगचा शोध लागायचा होता. )
टिळक ब्रिजवर तर रांगेने अशी पोस्टर्स असत..
मुंबईत काही ठिकाणी रोज किंवा आठवड्याभरात बदलणारे मेसेज असत. मुद्दाम जाऊन वाचावे असे.
१) चर्चगेटला नाना चुडासामा यांचे घर
२) एअर इंडीया बिल्डींगजवळचा त्यांचा बोर्ड
३) दादर पोर्तुगीज चर्च वरचे सुविचार
४) माहीम चर्च जवळचे सुविचार
५) दादर टी टी वरची अमूल ची जाहीरात
दिनेशदा, होय. डॉल्फिन्सचं
दिनेशदा, होय. डॉल्फिन्सचं शिल्पं आहे पोदारच्या सिग्नलला. त्या सिग्नलवरून वरळी सीफेसला गेलं की प्रॉमिनेड वर समोरच आर के लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'चा पुतळा समुद्राकडे बघत उभा असलेला दिसेल.
आधी तो एका बाकावर बसलेला होता. मग काही कारणानं तुटल्यावर आता त्याला उभा केलाय.
त्या सीफेसच्या सिग्नलवरच्या ट्रॅफिक आयलंडवर काही रंगित, मजेशीर फुलंही फुलली आहेत.
ग्रॅन्टरोड स्टेशन जवळचं थिएटर
ग्रॅन्टरोड स्टेशन जवळचं थिएटर नाझ असू शकेल.
प्रचि,व्यंचि,अनमोल
प्रचि,व्यंचि,अनमोल लिंक्स,पेंटिन्ग्ज,
.रसिकतेने टिपलेले बारकावे,
सगळ्यांनी उत्साहाने,मोकळेपणानं दिलेल्या आठवणी..
'' आभारी आहे मी ''महानगरी महालक्ष्मी मुंबाबाई म्हणतेय.ऐकू येतंय का कुणाला ?
माहीम ला एक 'श्री' टॉकिज होत.
माहीम ला एक 'श्री' टॉकिज होत. तिथे फक्त ईग्लीश सिनेमे लागायचे.
आमच्या वांद्र्यात इंग्लिश
आमच्या वांद्र्यात इंग्लिश सिनेमे हिल रोडवर न्यू टॉकिजमध्ये लागायचे.भाभा हॉस्पिटलच्या शेजारी. मी अन आई जायचो कधीमधी. वांद्र्यातल्या कॉन्व्हेंट शाळा तर मुलांना गटागटाने घेऊन जायच्या फॅमिली एंटरटेनर क्लासिक चित्रपटांना. आता तिथे ग्लोबस उभं आहे.त्यातही थिएटर आहे, पण ते वलय नाही..अगदी होम थिएटरची तत्कालीन आवृत्ती होती ती.
ते थिएटर अप्सरा तर
ते थिएटर अप्सरा तर नसाव?
दिनेशदा, फोर्ट युनिवर्सिटी मध्ये उर्वशीचे एक झाड आहे. मधल्या लॉन च्या मध्यभागी आहे. ते मला वाटते मूळ झाडापासून कलम केलेले असावे. कारन त्याचा खूप मोठा वृक्ष झालेला नाही अजून. नुकताच फुलांचा बहर येउन गेलाय पण अजूनही काही चुकार फुले झाडावर रेंगाळताहेत आणि रंगीबेरंगी गुलाबी शेंगाही.
मsssस्त धागा आहे हा. मी वाचत
मsssस्त धागा आहे हा. मी वाचत होते पण आज "सरकत्या जिन्या" मुळे आले. मी पाहिलेला पहिला सरकता जिना तोच तो गिरगावचा. मी लहान असताना खास मला जिना दाखवायला नेले होते.
हिरा, अप्सरा पण असू शकेल.
हिरा, अप्सरा पण असू शकेल. ग्रँटरोड परिसरात खूप थेटरं होती. ललीने तो सिनेमा नक्की कुठे पाहिला ते कळल्याशिवाय कुणाला चैन पडणार नाहिये
ललीने तो सिनेमा नक्की कुठे
ललीने तो सिनेमा नक्की कुठे पाहिला ते कळल्याशिवाय कुणाला चैन पडणार नाहिये <<

शिवाय ग्रॅण्ट-रोडचं एक थिएटर
शिवाय ग्रॅण्ट-रोडचं एक थिएटर होतं, स्टेशनजवळच, आत शिरलं की दोन्ही बाजूंनी वर जायला जिने नव्हे, तर रॅम्प होते, त्यावर लाल जाड गालिचे घातलेले, (जाड सतरंज्या असाव्यात, गालिचे कुठले परवडायला!) वरती झुंबरं लटकलेली, आम्ही ८५-८६ साली एकदा ठाण्याहून तिथं जाऊन 'फांसले' हा सिनेमा पाहिला होता
आमचे बाबा याबाबतीत भलतेच उत्साही!
>> लले तू मुंबई सेंट्रलच्या 'मराठा मंदिर' मध्ये गेल्तीस का?
<< माहीम ला एक 'श्री' टॉकिज
<< माहीम ला एक 'श्री' टॉकिज होत. तिथे फक्त ईग्लीश सिनेमे लागायचे.>> हो, तिथंही गिरगांवाहून मुद्दाम सिनेमा बघायला आलो होतो आम्ही, बहुतेक सुरवातीचा जेम्स बाँडचा. [कधीं कधीं किती बालीश व हास्यास्पद कल्पना असतात आपल्या 'लॉयल्टी'च्या; आमच्या दक्षिण मुंबईतली थियेटर्स सोडून दुसरीकडे सिनेमासाठी जावं लागावं हें खूप खटकायचं तेंव्हां आम्हाला ! तसंच, केळेवाडीतल्या साहित्यसंघाच्या नाट्यगृहाशिवाय इतर ठीकाणी नाटक पहाणं हेंही बेइमानी केल्यासारखंच वाटायचं त्यावेळीं !!
]
मुंबईतील आगळंच व्यक्तीमत्व असलेलं एक थियेटर होतं वरळीचं ' लोटस' ! वरळी नाक्यावरून 'ऑपेरा हाऊस'कडे बसने येताना ज्या ठीकाणीं हाजी अली दर्गा व महालक्ष्मी देवळाचा कळस याचं प्रथम दर्शन घडतं, नेमक्या त्याच सुंदर 'स्पॉट' वसलेलं हें छोटं, टुमदार व कांहीसं स्वतःला उच्चभ्रू समजणारं थियेटर होतं. निवडक सिनेमाच, विशेषतः बंगाली, बहुधा इथं दाखवत असावेत कारण तसं तें थियेटर भरवस्तीलगत नव्हतं. एकदां आम्ही इंग्लीश सिनेमांच्या गप्पा मारताना मधेंच आमचा एक कलंदर, रसिक मुस्लिम मित्र पुटपुटला, 'घरकी मुर्गी , दाल बराबर !' . त्याला संदर्भ विचारला तर, ' शामको चलो मेरे साथ ' म्हणत संध्याकाळी घेवूनच गेला आम्हाला 'लोटस'ला; बंगालीतला पहिला सिनेमा आम्ही तिथं पाहिला -"पाथेर पांचाली "! त्यानंतर अर्थातच," अरे, 'लोटस'को क्या दिखा रहे है ", ही आमची नेहमीची आदरयुक्त विचारणाच असायची त्या मित्राकडे !! [हेंही थियेटर पडद्याआड गेलं, हें वेगळं सांगायला नको]
नाही, मराठा-मंदीर,
नाही, मराठा-मंदीर, मिनर्व्हाला कुण्णी कुण्णी नेलं नाही आम्हाला तेव्हा...
'फांसले' पाहायला आम्ही ग्रॅण्ट रोडला उतरूनच गेलो होतो, हे नक्की. आणि आधी तिथे उतरून, अन्य काही कामं करून मग चर्चगेट-मरीन लाईन्सला गेलो होतो - असंही नव्हे. स्टेशनवरून लगेच थिएटर गाठलं होतं हे पण नक्की आठवतंय.
कालपासूनच्या नावांना 'हेच असावं बहुतेक' असं होत नव्हतं मला... पण आज 'अप्सरा'चं नाव वाचून तसं झालंय. 'अप्सरा'च असावं ते.
ललीने तो सिनेमा नक्की कुठे पाहिला ते कळल्याशिवाय कुणाला चैन पडणार नाहिये
Pages