मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवातीला मुंबईच्या बसेसना क्रमांक नसत. त्याऐवजी इंग्रजी अक्षरे असत. एक नंबर हा ए-१ एक्स्प्रेस होता. पूर्वी लिमिटेडला एक्स्प्रेस म्हणत. ए-१ हा प्राइम रूट होता. अगदी मुंबईच्या उत्तरसीमेपासून दक्षिण टोकापर्यंत धावणारा. त्यानंतर गोरेगावच्या ओशिवडे खाडीपर्यंतचा भाग महामुंबईत सामील झाला. ओशिवड्याच्या पुलापाशी मोकळी जागा होती. तिथपर्यंत एक बस येई. मला वाटते ८४ म्हणजे ओ-२ एक्स्प्रेस असावी. तिथेच वळण (रिवर्स) घेई आणि थोडे थांबून परत निघे. ती फाउंटन पर्यंत जाई. त्यापुढील भागात बेस्ट नव्हती. मागच्या बाजूला दारे असलेल्या प्राय्वेट गाड्या असत. ओशिवडे पूल रम्य होता खाडीवरचा वारा गार आणि शुद्ध होता. वेसाव्याचा डोंगर पार्श्वभूमीवर दिसे. पुलापासून पुढे अंधेरीपर्यंत घोडबंदर रोड (आताचा स्वामी विवेकानंद रोड) डोंगरातून जाई आणि वळणावळणांचा असे. जोगेश्वरीत मुख्यत्वेकरून तबेले असत, आताही आहेत. डोंगरातून एस्.वी रोड वर उतरणार्‍या वाटा होत्या, त्या थेट वेसाव्याला आणि सध्याच्या लोखंडवालाच्या जवळपास घेऊन जात. अर्थात तेव्हा तिथे काहीच नव्हते. अंधेरीला ढाके कॉलनीपलीकडे शेती होती. जुन्या पश्चिम अंधेरीचे सुंदर वर्णन ना.सी. फडके यांच्या कलंकशोभा (संक्षिप्त न केलेली आवृत्ती) मध्ये आहे. .

गव्हर्नर्स पॅलेस - गिरगांवात लहानपण गेलेलं. चौपाटी, मलबार हिल हें तर होम पीचच. मलबार हिलच्या टोंकावरच्या गव्हर्नरच्या बंगल्याचं आकर्षणही असायचं व तिथल्या गूढतेमुळे तो खुपायचाही; त्या बंगल्याच्या जवळपास जाणंही सुरक्षा व्यवस्थेमुळे शक्य नसायचं. वडील आम्हां भावंडाना पोहणं शिकवायला कधींतरी
चौपाटीवर घेवून जात. शिकवणं संपलं कीं आम्हाला वाळूत बसायला सांगून स्वतः पोहायला समुद्रात खूप आंतवर जात. अगदीं गव्हर्नरच्या बंगल्यानजीक. मागे वळताना आम्हांला हात उंचावून दाखवत. ते पट्टीचे पोहणारे म्हणून आम्हाला तशी कांही भिती नसे पण गव्हर्नरच्या बंगल्याजवळ गेले म्हणून पकडलं तर, याची मात्र काळजी असे !

थोडा मोठा झालो. आमच्या काकानी नवीन गाडी घेतली व आपल्या मुलाना व आम्हाला गाडीत बसवून मलबार हिलची सफर घडवली. मीं त्याना म्हटलं, आम्हाला तो गव्हर्नरचा बंगला आंतून नाही तर निदान जवळून तरी पहायची खूप इच्छा आहे. काकानी डोळे मिचकावले व गाडी त्या बंगल्याच्या गेटकडे नेवून त्या अरुंद जागेत ती मागे वळवायचा आटोकाट प्रयत्न करतोय असं भासवलं. तिथल्या पोलीसानाही त्यांची धडपड बघवत नव्हती, हें लक्षात आल्यावर ते खालीं उतरले व खिशातील शासकीय अधिकारी असल्याचं 'आयडेंटीटी कार्ड' पोलीसाना दाखवत फक्त गाडी वळवण्यापुरतं आंत जाऊं देण्याची विनंति केली. गाडी आंत गेल्यावर अगदीं बंगल्याजवळ नेवून मगच त्यानी ती वळवली ! काय धन्य वाटलं आम्हाला त्या दिवशीं !

फॅ स्ट्री ची जन्मकथा ही मला पण माहित नव्हती.
मस्त आठवणी.
फॅस्ट्री हा ओंगळपणा की गरज की अजून काही याबद्दल माझी मते सर्व बाजूंना तस्मात तिकडे घुसणेच नको Happy

<< फॅस्ट्री हा ओंगळपणा की गरज की अजून काही याबद्दल.... >> ताजमहाल पहाताना कुणा शायराला तो बांधणार्‍या अर्धपोटी मजूरांचीच तीव्रतेने आठवण झालीच ना ; म्हणून काय जगातल्या आश्चर्यांच्या यादीतून ताजमहालवर काट थोडाच मारलाय !! फक्त, असाही एक दृष्टीकोन असूं शकतो हें लक्षात येणं महत्वाचं !!! Wink

मी दृष्टीकोन नाकारत नाहीये. चर्चा नाकारतेय कारण मला सगळ्याच बाजू काही प्रमाणात बरोबर वाटतात.
तरूण मुलामुलींना कमी खर्चात स्टायलिश, ट्रेण्डी दिसावेसे वाटणे हे ही मला चुकीचे वाटत नाही.
असो. Happy

<< तिथे खाली उतरून ताज लँडस एंडच्या पुढे अनेक सिनेमातून दाखवलेली वांद्र्याच्या किल्ल्याची जागा आहे........बॅंडस्टँडलाच एक छोटसं रोस्टॉरंट आहे. >> मामींशीं १००% सहमत. गेलीं २५-३० वर्षं माझ्या हा आवडीचा स्पॉट ! आजही कधींतरी तिथं जावून मनाची बॅटरी चार्ज करतों. वांद्रे- वरळी लिंक तिथून पहाणं ही लेटेस्ट अ‍ॅडीशन ! पूर्वीं टपरीटाईप असलेलं तें रेस्टॉरंट आतां बरंच सुधारलंय व तिथलं ग्रील्ड सॅडविच व चहा समोर ठेवून सूर्यास्त पहात बसणं ही तर एक अनुभूतिच !!
[ सूर्यास्ताकडे पाठ करून शाहरुख खान व सलमान खान यांच्या दर्शनासाठी तिथें ताटकळत उभी असलेली मंडळी बघितली कीं 'स्टार' शब्दाचा अर्थही पुरेपूर उमगतो ! Wink ]

कोणे एके काळी रात्रीच्या वेळी माहिम कडून वांद्र्याला जाताना बिकेसीच्या तोंडावरील ओफन थिएटर मधिल दिसणारे चित्र-पट म्हणजे लहान थोरांच्या कुतुहलाचा विषय... ट्रेनच्या प्रवासा दरम्यानही त्या दिशेला थोडासा प्रकाश दिसला तरी लोक स्वतःला धन्य समजत. Happy

इंद्रधनुष्य,
अगदी खरंय. आम्हीदेखील लहानपणी मुद्दाम विंडो सीट पकडुन ओफन थिएटरची झलक पाहत असु आणि त्यानंतर सांताक्रुझ्-पार्ल्यामध्ये विमानतळावरची विमाने.
त्यातही एखादे विमान लँड वा टेक ऑफ होताना दिसले, की स्वतःला धन्य समजत असु.

कोणे एके काळी रात्रीच्या वेळी माहिम कडून वांद्र्याला जाताना बिकेसीच्या तोंडावरील ओफन थिएटर मधिल दिसणारे चित्र-पट म्हणजे लहान थोरांच्या कुतुहलाचा विषय >>>>> +१

कोणे एके काळी रात्रीच्या वेळी माहिम कडून वांद्र्याला जाताना बिकेसीच्या तोंडावरील ओफन थिएटर मधिल दिसणारे चित्र-पट म्हणजे लहान थोरांच्या कुतुहलाचा विषय >>>>> अगदी अगदी

वांद्रे स्टेशन ते अणुशक्ती नगर चालणारी ३७१ बस खास त्यासाठी आम्हाला प्रिय होती. मी तर त्या थिएटरमधे "गौतम गोविंदा" हा चित्रपट देखील पाहिला. त्याच्या पडद्याच्या मागेच, आमचे स्नेही श्री गुप्ते रहात असत.

त्या वळणावर भडक पिवळ्या रंगात रंगवलेला एक बंगला होता ( अजूनही आहे वाटतं ) त्यावर कधीतरी भागवत असे नाव वाचल्याचेही आठवतेय. पण तो बंगला, रंग आणि नाव यात काहीतरी गूढ वाटत असे.

T जंक्शनच्या जवळ आहे 'पिवळा बंगला'. हल्ली त्यावर पाटी पाहिली होती 'बंगला विक्रीस काढलेला नाही' अश्या टाइपची. त्याच्या आजुबाजुला गॅरेजेस आणि संगमरवर वगैरे मिळायची दुकानं आहेत आता.

नाही बा. आम्ही सकाळी ८ आणि दुपारी ५ ला बिस्किटांचा भोंगा ऐकतो. दुपारच्या भोंग्याच्या आगेमागे बराच वेळ गोडुस खरपुस वास पण पसरतो.
त्या वासाचा कंटाळा येऊन गेल्या दोन वर्षात पार्लेजी खाल्लेले नाही. Happy

<<<चित्र-पट म्हणजे लहान थोरांच्या कुतुहलाचा विषय... ट्रेनच्या प्रवासा दरम्यानही त्या दिशेला थोडासा प्रकाश दिसला तरी लोक स्वतःला धन्य समजत.>>> +१
मावशी दादरला रहायची तिच्या कडून घरी येताना ट्रेनच्या खिडकीत मुद्दाम उजव्या बाजूला उभी राहायचे त्या ओपन थिएटरची आणि विमानतळाची झलक पाहायला.

पूर्वी आमच्या बाल्कनीतून विमान टेक ऑफ घेताना दिसायचं पण नंतर बिल्डींगच जंगल वाढल आणि मग विमानाचा तो टेक ऑफ चा रूट दिसेनासा झाला:(

लहानपणी आम्ही सांताक्रूझला असलेल्या लायन्स बागेत जायचो तिथे असलेल्या बोईङ्ग विमानात बसायला, तिथे ट्रेन सुद्धा होती आणि ह्या सगळ्या आठवणीत कामाला नेहरू पार्कातला म्हातारीचा बुट कसा विसरत येईल? विचित्र कल्पना असायच्या लहानपणी , म्हातारीचा बूट इथे हरवलाच कसा? तो बूट एवढा मोठा तर म्हातारी केवढी मोठी असेल ?

मला पार्ले ग्लुकोजची बिस्कीट अजूनही प्रिय आहेत , बहुते क पार्ले ग्लुकोज आणि पार्ला अस समीकरण डोक्यात फिट्ट बसल्यामुळे असेल

आमच्या इर्ल्याच्या सोसायटीच्या परिसराचे भूमीपुजनाच्या, बांधकामाच्या दरम्यानचे ( ६५-६९) फोटो बघितले होते मधे. शेतामधेच बिल्डींग बांधतायत असं वाटतं.
इर्ला गाव बहुतेक सगळं गोवन किरिस्तावांचं. काही टुमदार घरं अजूनही आहेत.

तरूण मुलामुलींना कमी खर्चात स्टायलिश, ट्रेण्डी दिसावेसे वाटणे हे ही मला चुकीचे वाटत नाही.>>>>>>>>>>> मी अ‍ॅग्री करते......मी कॉलेज मधे असताना....एफ एस, लिंकिंग ,हिल वरुनच खरेदी करायची.....लिमिटेड पॉकेट मनी असणार्यांना अजुन ऑप्शन नव्हता.... आणि तिथेही चांगला स्टफ मिळतो.... माझी एक मैत्रीण या सर्व स्ट्रीट्स वरुन खरेदी करायची आणि त्यात काही फेरफार करुन त्यांना अधिक छान बनवुन ( चमकवुन ) स्वताच्या फॅशन बुटिक मधे ७-८ पट जास्त किंमतीला विकायची....अजुनही करतेच.....

अजूनही दररोज सकाळी ९ वाजता हे भोंगे वाजतात म्हणे. कोणी ऐकलेत? > हो मयेकर रोज ऐकतो आम्ही... परळच्या हाफकीन इनस्टिट्यूट मधला ९चा भोंगा म्हणजे माझी ऑफिसला निघायची तिसरी घंटा... तसेच दुपारी १२चा भोंगा पण वाजतो.

बाबल्या... Lol

बाई, असच ते 'गेलेलं, झालेलं, केलेलं' पण भयंकर खटकतं कानापेक्षा मनाला. आणि असल्या धेडगुजरी भाषेला कुणी बोली आहे-चालतं, हे होणारच वगैरे सुमार समर्थनं दिली की आणखीनच त्रास होतो. 'विचारांची शुद्धतेसाठी भाषेच्या शुद्धता जा पाया आहे!' असं कुणीसं म्हटल्याचं स्मरतय! Proud

जुने फोटो बघायला मस्त वाटतय, विशेषत भारती बिर्जे यांचे Happy सगळ्यान्ना धन्यवाद इथे दिल्याबद्दल.

अवांतरः
>>>> सिंधी निर्वासित आले आणि मुंबईची रया गेली. तोवर मुंबई खरंच अतिशय टुमदार होती. (असं ऐकून आहे) <<<<
अशी अर्धवट ऐकिव माहिती अनुभव/अनुभूती शिवाय जाहीरपणे मान्डू नये! सिन्धी निर्वासितान्चा अन मुम्बईच काय, भारतातील कोणतेच शहर/गाव बकाल होण्याचा/रया जाण्याचा काहीही संबंध नाही.
आता बकालपणाला जबाबदार कोण हा येथिल विषय नाही, म्हणून इथेच थाम्बतो. फक्त अपुर्‍या माहितीनिशी अनावश्यक व सपशेल चूकीची/अन्यायकारक टिपण्णी अजाणताही होऊ नये हे सुचवित आहे.

इरले गाव हे मुळात जास्त करून ईस्ट इंडिअन क्रिस्टिअनांचे. त्यातूनही 'मिस्क्विटा' आडनाववाल्यांचे. पूर्व पारल्यातल्या जुन्या गावठाणातही मिस्क्विटागल्ली आहे. इथेही काही तुरळक बंगले दिसतात दाटीवाटीने उभे असलेले. इरल्यामध्ये दोन गावठाणे. एक पौड गाव आणि दुसरे सेंट जॉन.( जॉन नावाविषयी खात्री नाही.) यांची रहाणी आणि भाषा खूपशी वसईच्या आगरी-भंडारी लोकांसारखी.( आता मात्र सर्व बदलले आहे. आता इंग्लिश ही मातृभाषा आहे.) यांच्या सोयरिकी वान्दरे, वेसावे, मरोळ्,सान्ताक्रुझ, चकाला, वाकोला (कोळीवाडी) अशा जवळजवळच्या साष्टी प्रांतातल्या. इरल्यातल्या पारंपरिक लग्नात अजूनही गावच्या विहिरीवरून समारंभाने पाणी आणून त्यात उंबराच्या टहाळ्या( आणखीही चार झाडांच्या असत पूर्वी) घालून त्यानी नवरदेवावर पाणी शिंपडायचा विधी एक प्रमुख विधी असतो. त्याला 'उंबराचे पाणी' म्हणतात.
विले पारले चे इंग्लिश स्पेलिंग ville parle असे अगदी आताआतापर्यंत होते. त्यातल्या विल्ले विषयी कुतूहल आहे. ब्रिटिश लोक सहसा ळ च्या उच्चारासाठी डबल एल वापरत. मग हे पूर्वी विळ्ळे असावे का? आणि महिकावतीच्या बखरीमधले वाहिन्नळे हेच विहिन्ळे-विंहिंळे-विळ्ळे-विळे झाले असावे का?आगरी लोकांच्या बोलीत ड आणि ळ चा र होतो. त्या अंगाने विन्ह्ळेचे विंधळे-विड्ळे-विर्ले-इर्ले असेही झालेले असू शकते. पारल्याचा इतिहास गेल्या शतकात आणि नुकताच याही शतकात प्रसिद्ध झालेला आहे .तो कोणी वाचला आहे काय? तो लिहितेवेळी ही शक्यता विचारात घेतली गेली होती किंवा कसे? माझ्याकडे ही पुस्तके नाहीत, कोणी वाचली असल्यास अधिक माहिती द्यावी.
ता.क. कित्येक बहुजनांच्या तोंडी विर्ले-पार्ले असा जोड उच्चार अगदी ८०-८५ सालापर्यंतही ऐकला आहे. कित्येकवेळा शब्दांची जुनी रूपे बहुजनांच्या भाषेत टिकून असतात, अभिजनांच्या भाषेत मात्र बदलतात.

असच ते 'गेलेलं, झालेलं, केलेलं' पण भयंकर खटकतं कानापेक्षा मनाला. <<< +१००००००००००

ईस्ट इंडिअन क्रिस्टिअनांचे << ओह. मला वाटले होते गोवन.

हिरा, तुम्ही फार मस्त माहिती देताय. कुठेतरी एकत्र लिहून ठेवा ना लेखरूपाने.

>>>> लिंब्या परप्रांतियाना चांगलं बोलला .... लिंब्या सुधारला. <<<<<
अन हे सान्गायला इतक्यातच या आयडीचा पुनर्जन्म घेतला होय तुम्ही? Proud वा वा. छान.
या चान्गल्या चालू धाग्याचे हे विषयच नाहीत, सबब इथे पुरे!
जरा दुसरीकडे कुठे भेटा, म्हणजे परप्रान्तियान्च्या बकालपणाशी असलेल्या संबंधान्च्या सविस्तर विश्लेषणाचे बाळकडू तुम्हाला पाजतो. नुकताच जन्म झालेल्या आयडीन्ना ते बाळकडू आवश्यकच अस्ते असे (कोणसेसे) आयुर्वेदाचार्य सान्गून गेलेत.

बाबु, नीधप, नतद्र्ष्ट + १
मला मुलींनी मी गेली केली बोलली असे म्हटले की जाम त्रास होतो.

मुंबईत भेटणार्‍या खास माण्सांबद्दल लिहायचे होते कुठे लिहावे? आज सक्काळी ६.०२ ला मी खाली बेसमेंट लेव्हल ला फिरायला गेले होते. तर मागून एकदम आवाज आला एक्स्युज मी मॅड्म. पाहिले तर पोरगेला दूधवाला सायकल वर दोन जड पिशव्या, मी सरकल्यावर शिस्तीत थँक्स म्हणून कामाला गेला. टोटली अन एक्स्पेक्टेड असल्याने मला आनंदाचा माइल्ड धक्का बसला. मुंबईकरांचे वर्क एथिक, दुसृयाच्या भानगडीत न पडण्याची , तरीही मदतीला येण्याची सवय. मोजके बोलणे, वक्तशीर पणा. मेहनती स्वभाव वाखाणण्यासारखे आहे. वेगळा मुंबईतील माणसे व अनुभव असा बाफ काढा की.

पोस्टएलिजिबल होण्यासाठी : माझी एक आवड्ती जागा आमचे पी थ्री. हवेशीर, हिरवळ उत्तम लँड्स्केप.
मुंबईत आहोत असेच वाटत नाही. बिल्डरने सर्व झाडे तशीच ठेवल्याने सावली भरपूर आहे.

Pages