मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हार्डवेर मार्केट म्हणजे लोहार चाळ, तीथुन मागे मंगल्दास मार्केट म्हणजे कप्ड्यांचे मार्केट, तीथुन आणखी मागे म्हणजे एम जे मार्केट, कपड्याचे होल्सेल मार्केट ( एकाच वेळी कमीत्कमी एकाच डिझाईनेचे ५ ड्रेस घेतले तरच विकतात, त्याला आपण आपले फक्त लेबल लाउन विकायचे), नंतर रिटेल ड्रेसेस आणि बीड्स्/लेसेस, बाकीचे डिझाईन आयट्म्स साठी भुलेशवर असा माझा समज

ह्म्म तो सगळा एरिया जाम कन्फ्युजिंग आहे पण गृह वस्तू भांडार म्हणण्यात काहीही लॉजिक नाही.
बीडस, लेसेस, डिझाइन आयटम्स हे होलसेलवर घरासाठी कोणीही घेत नाही.

मामी मस्त धागा काढलास.

अग माझ्या मिस्टरांनी २ वर्षांपुर्वी जुन्या मुंबईचे फोटो आणि माहीती असलेल पुस्तक आणल होत. त्यांना ते परत आणायला सांगते व जमेल तशी माहीती टाकते. पुस्तकाचे नाव व लेखकही टाकते.

माझे आई-बाबा ८५-८६ च्या दरम्यान दहिसरला शिफ्ट झाले. त्यावेळी दहिसर-बोरिवलीत अनेक शेते, मळे होते.
दहिसर पूर्वेला विटांच्या भट्ट्या असायच्या. भातशेती खुप होती आणि हिवाळ्यात वाल्,उडीद यांची शेती व्हायची.
बोरिवलीला शिंपोली, वझीरा, बाभई अशी खरोखर गावे होती. आज इथे गेल्यावर तर तसे वाटणारदेखील नाही. तरी पण गावठाणे बर्‍यापैकी टिकून आहेत.

या गावांना ग्रामदेवता पण होत्या, आहेत. दहिसरपुर्वेला विद्यामंदिर शाळेजवळ "गावदेवी" चे देऊळ आहे, जी दहिसर गावाची ग्रामदेवता आहे.
दहिसरपुर्वेला रेल्वेस्टेशन जवळ भाटलादेवीचे देऊळ आहे, जी दहिसर पुर्वेकडच्या अनेक वाड्या, पाड्यांची ग्रामदेवता आहे.

माझ्या आईचे बालपण शिवडीला गेले. शिवडी किल्याजवळचा परिसरात पुर्वी अनेक अघोरी लोक (तांत्रिक-मांत्रिक) असत. आम्ही कधीच घाबरून त्याबाजुला गेलोच नाही. ख.खो. देव जाणे.

मालाड पश्चिम स्टेशन जवळ मोठा मासळीबाजार आहे. मार्वेवरुन आलेली मासळी घाऊक दरात मिळते. ३-४ जणांचा ग्रुप करुन जावे आणि मग आपसात वाटुन घ्यावे.
भाईंदर पश्चिमला पण असाच बाजार आहे. उत्तनची ताजी मासळी येते.
बोरिवली-दहिसरच्या कोळिणी तिथूनच मासे उचलतात अन विकतात.

मामी, मस्त धागा!

माझ्या मुंबईतील बर्‍याच आठवणी फाइव्ह गार्डन परिसर, पारसी कॉलनीशी निगडित! त्या भागात माझे बरेच पारसी मित्र मैत्रिणी राहायचे / राहतात. त्यांच्याकडे जाता-येता या परिसरातले खास 'पारसी' वातावरण मनावर बिंबत जातेच! खास करून त्या जुन्या धाटणीच्या इमारती, त्यांच्यावरचे नक्षीकाम, नक्षीदार बाल्कनीज, इमारतीतले लाकडी करकरणारे जिने, जुन्या वळणाची धडधडत जाणारी लिफ्ट आणि इमारतीच्या पॅसेजेस मधून भरून राहिलेला बेकिंग + कुकिंग + अगरबत्तीचा वेगळाच एक गंध... घरांमधील साधारण किमान ४०-५० वर्षांपूर्वीचे असणारे लाकडी फर्निचर, कपाटे, मोठे मोठे आरसे, खचाखच भरलेल्या शोकेसेस, लीला लेसचे फ्रिल असणारे नाजूक झुळझुळते पडदे.... Happy

फाइव्ह गार्डन परिसरात संध्याकाळी नटून थटून आपल्या गाड्यांमधून किंवा रस्त्याने आपल्या इवलुल्याश्या कुत्र्यांना घेऊन हिंडणार्‍या पारसी ललना, अग्यारीत जाताना कडक वेषात जाणारी पारसी कुटुंबे... इमारतीच्या खाली पार्किंगमध्ये किंवा रस्त्यावर आपल्या बाइक्स एका बाजूला घेऊन चकाट्या पिटणारी तरुणाई... ज्यांच्या वयाचा अंदाज करणे कठीण अशी हातात कधी काठ्या तर कधी आपल्या कुत्र्यांच्या साखळ्या घेऊन चालणारी आजोबा-आजी मंडळी...!!

मामी माझी पण ती फेवरेट जागा आहे.

माँडेगार, लिओपॉल्ड अश्या नावांनीच एकदम तरतरीत व्हायला होतं >> मध्ये माझा नवरा आणि मी दर दोन आठवड्यांनी माँडेगारला ब्रेकफास्ट करायला जायचो. तीथले पेंटींग्स बघत बसण माझ आवडिच काम.

फ्याशन स्ट्रीट आणि लिंकिंग रोड बद्दल ही लिवा कि कुनीतरी.

कालेज ला बंक मारुन काही घ्यायचे असो वा नसो FS ला जायचे म्हणजे कल्लाच करत होतो आम्ही, १०००रु भाव सांगितलेली फाटकी जीन्स जेव्हा २००रे ला घेऊन बाहेर पडणार , ५००/- चे गॉगल्स जेव्हा ५०रु ला घेतली जात होती तेव्हा कुठे समाधान होत होते.

नंतर संध्याकाळी इरॉस, स्टर्लिंग, New Excelsior होतेच.

गेटवे ते अफगाण चर्च ला जायचे जे रस्ता आहे, तिकडे ही भरपुर शॉपिंग आम्ही करत होतो.

कॉलेज सुटले आणि हे सर्व ही सुटले, आता तिथे आहे हे सर्व आहे कि नाही ते ही माहित नाही.

जागू- हरवलेली मुंबई या अरुण पुराणीकांच्या पुस्तकाबद्दल बोलताय का तुम्ही?

माँडेगारची पेंटिंग्ज- मारीओ मिरांडानी ती पेपर वर डि़झाईन्/ड्रा केली आणी नंतर दुसर्‍या पेंटर्सनी ती भिंतींवर रंगवली.

त्यांना ते परत आणायला सांगते व जमेल तशी माहीती टाकते. पुस्तकाचे नाव व लेखकही टाकते. >>> जागू, लेखकाची / प्रकाशकांची परवानगी घेऊन मग इथे टाक गं.

गुलालवाडीत देवांच्या मुर्त्या, पुजेची भांडी मिळतात ना?

फॅशन स्ट्रीट बरोबर चर्चगेटला रस्त्यावर मिळणारी जुनी पुस्तके यांना कोण विसरणार?

पार्ल्याला पुर्वेला पार्ले बुक डेपो जवळ जी रद्दीची दुकाने आहेत तिथे पण कॉलेजची पुस्तके, नोट्स अर्ध्या किंमतीत मिळतात.

वॉव मामी,हीरा,पाटील,नंदिनी,नीधप..मजा येतेय वाचायला.

नुस्त्या वांझोट्या खर्डेघाशीत दम नाही यार हो. जान के बारेमे बाते करनी हो तो जाम जरुरी है. ते ज्युकबॉक्सवाले ईराणी इतिहासजमा झाले, पण अट्टल मुंबईकराना मुंबईच्या आठवणीत रमण्यासाठी मुंबईत 'बसायला' तितकी आणि तशी जागा मिळु नये असच काही नाही. उन्हं उतरणीला भेटा, धोबीतलावच्या आसपास. भुलेश्वर, गुलालवाडी - रात्री ९ नंतर ह्याची खाबु गल्ली होत असे. ९२ च्या दंगलींनंतर सगळं बदललं. कधी कधी गप्पांच्या ओघात भान रहात नसे मग साडे तीन चार वाजता इथेच उदरभरणासाठी जावे लागे पायपीट करीत. इथे भांगेचे पापड मिळत. चालुन आधीची उतरल्यामुळे एखादा रिचवावाच लागे. मग तुडुंब होउन आमच्या होड्या गिरगावच्या किनार्‍याला लागत पहाटेच्या सुमारास. 'आज मेला वसईवाला लवकर आला का काय' करीत आई दार उघडीत असे.- काळबादेवी, दाणाबाजार, माधवबाग- इथली थंडाई, तीही अल्युमिनुम च्या लोट्यामधे, प्यावीच एकदा तरी. गोल देउळ करत गिरगावतुन नानाचौक, तिथुन मुंबईतला सगळ्यात जुना ह्युजेस रोडच्या फ्लाय ओव्हर खालुन नेपीअन सी रोड वरुन वरती वाळकेश्वर गाठु. वाटेत जमल तर महलक्ष्मी करु, देवळामागे पुर्वी नेहमीच्या ओळखीच्या लोकांना भांगेची थंडाईही मिळत असे. आता मिळते की नाही माहीत नाही. बाणगंगेचा परीसर पायाखलुन घालत सीरी रोड्वरुन थेट बाबुलनाथाच्या पायथ्याशी उतरु. विल्सन कॉलेज , गिरगाव चौपाटी वरुन क्वीन्स नेक्लेस करत पुन्हा फोर्टात निवांत विसावु कुठेतरी.

पुढच्या मैफलीच्या आधी, माझ्गाव, नाग्पाडा, डोंगरी , महमद अली रोड करत जेजे पालथं घालु. त्यानंतरच्या बैठकीना परळ-लालबाग-दादर, वाटेत वरळी सीफेसला घसा शेकुन घेउ हव त थोडा. ती मजा नाही राहीली सागरीसेतु सुरु झाल्यापासुन पण तरीही-. उजवीकडे के ई एम- शिवडी पुढे थोडं वर जाउन खालसा, वडाळा, षण्मुखानंद, माटुंग्याचं आनंद भुवन - मणीज करु. पुढे आहेच की बांद्रा बँड्स्टँड, माउंट मेरी, माहीम कोळीवाडा, माहीम चर्च, सर्वश्रुत कुप्रसिद्ध आणि दत्त साहेबांचा लाडका बेहरामपाडा.

तरी तळातलं कुलाबा, नेव्ही नगर, कोळीवाडा आधलं मधलं मराठा मंदीर, आर बी आय कॉलनी, लॅमिट्न रोड, बॅक रोड, ट्राम चा 'ओ' रूट, दंगलीत होरपललेला कुंभारवाडा, ठाकुरद्वार, पारसी डेअरी, प्रिन्सेस स्ट्रीट, क्रॉफर्ड मार्केट, खेत वाडीच्या १५ गल्या, नागपाडा झालच तरी गवळीची दगडी चाळ, भायखळा भाजी मार्केट गर्दीत हरवुनच गेलय. कारण ह्यां आणि अश्या अनेक हळव्या जागांना फक्त आठवणी आहेत ग्लॅमर नाही.

अजुन पुष्कळ आहे हो शिल्लक मुंबई. सुरुवात त करा.

त.टी : मामी, ते मुंबई म्हणजे हिकडे माहीम-बांद्रा, मधे शीव आणि तिकडे वडाळ्यापर्यंतच ठेवा जरा. बाकी पलिकडे आहेत ती 'उपनगर' . मुंबई नव्हे. कसे?

हा हा हा! पण मनापासुन सागतो. त्याला हलकटपणा म्हणा की काहीही. पलिकडच्या गावांना मुंबई म्हणायला मेली जीभ रेटतच नाही.

चर्चगेटला रस्त्यावर पुस्तके आता मिळत नाहीत. गेले ते दिन गेले!
>> आं???? खरे की काय??

मी आणि माझे एक अतिशय वरिष्ठ सहकारी रविवारी मुद्दाम चर्चगेटला येऊन (रोज मेलं ऑफिससाठी यायचोच पण रविवारी फक्त पुस्तक खरेदीसाठी)...

डॉकयार्डला असताना रमझानमधे रोज संध्याकाळी मोहम्मद अलि रोडवर भटकायला जाणे असा नित्यक्रम होता आमचा. सुलेमान बेकरीच्या इथून नाऩकटाई कुठेतरी छोट्याशा हॉटेलमधे चिकन आणि मग नंतर बिर्याणी आणि सर्वात शेवटी फिरनी.... यासर्वांसोबत खच्चून स्ट्रीट शॉपिंग आणि तीपण अगदी बार्गेनिंग करून करून. दुकानवाल्याने ड्रेस मटेरीअल ३०० चा सांगितला की आम्ही ५० रू. पासूनच विचारणार. मग अगदी वाद घालूघालून ते मटेरीअल १५० नाहीतर १६०मधे घ्यायचं...

वा वा.. हे अत्ताच पाहिलं. सुंदरच धागा काढला आहेस मामी, रोज लिहिलं यावर तरी कमी पडेल.

चर्चगेटचे इरॉसजवळचे पुस्तकांचे स्टॉल्स हलवलेत (ते सगळे पीएम रोडवर आहेत) पण हॉन्गकॉन्ग बॅन्केच्या फुटपाथवरचे, काळाघोडा ते सीएसटी दरम्यानचे बरेचसे तसेच आहेत. बाकीच्या गर्दीत हरवून गेलेत. फ्लोरा फाऊंटनच्या क्रॉसिंगवरचा सेकंडहॅन्ड पुस्तकवाला आहे तसाच.

ज्युकबॉक्सवाले ईराणी इतिहासजमा झाले>> खरय पण माँडेगार आणि चौपाटीवरच्या कॅफे आईडीअलमधे अजुन ज्युकबॉक्स आहे. बांद्रयाच्या टेम्टेशनमधेही काहीवर्षापुर्वीतरी होता. आता वयोमानाप्रमाणे अशा ठिकाणी फिरकणे कमी झालेय त्यामुळे कल्पना नाही

फ्लोरा फाऊंटनच्या क्रॉसिंगवरचा सेकंडहॅन्ड पुस्तकवाला आहे तसाच.>>हां... तीच जागा आमची फेवरेट होती. Happy

पलिकडच्या गावांना मुंबई म्हणायला मेली जीभ रेटतच नाही. > प.लि. U said it Wink

सगळ झालं तरी चोर बाजाराकडे कोणीच कस वळत नाही.

Pages