मराठी मनाचे अघोषित सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
===================================================
बाळासाहेबांच्या दु:खद निधनाआधी दोन दिवस त्यांची प्रकृती खालावली होती तेव्हा मातोश्रीच्या परिसरात गर्दी जमू लागली होती. त्यानंतरचा दिवस काहीसा दिलाश्याचा जात आहे तोवरच पुढच्या दिवशी त्यांचे निधन झाल्याचे जाहीर झाले. या बातमीनंतर मातोश्री, शिवसेना भवन व जेथे अंत्यविधी होणार असे जाहीर झाले त्या शिवाजी पार्ककडे विक्रमी संख्येने गर्दी जमू लागली.
या गर्दीकडे लक्ष वेधून या गर्दीचा पुढील स्थानिक राजकारणावर पडू शकणारा प्रभाव तसेच या गर्दीने पडू शकणारा पायंडा याबाबत काही मनात आले ते लिहायचा हा एक प्रयत्न आहे. आपल्या सर्वांच्या मतांचे स्वागत आहेच.
=========================
बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवाजी पार्क येथे काल जमलेल्या विराट व न भूतो गर्दीच्या सख्येबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र काही बातम्यांनुसार हा आकडा दहा लाख, पंधरा लाख व एकोणीस लाख यापैकी किंवा याच्या आसपासचा असावा असे दिसते.
कोणत्याही राजकारणाशी संबंधीत नेत्याच्या अंत्यदर्शनाला यापूर्वी एवढी गर्दी जमलेली नाही असेही सांगण्यात आले. (हेही शक्य आहे की कै. इंदिरा गांधी वा कै. राजीव गांधी हे राष्ट्रीय पातळीवरील नेते असल्याने त्यांच्या निधनानंतर जनमानसावर पडलेला प्रभाव व अंत्यदर्शनाची इच्छा ही विखुरली गेल्याने जाणवली नाही. पण तरीही) बाळासाहेबांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी उच्चांकी व अभूतपूर्व गर्दी जमली हे नाकारता येणार नाही. ही गर्दी शांत होती, शिवसेनेच्या एरवीच्या आक्रमक भूमिकेशी फारकत घेऊन जबाबदारीने वागणारी ही गर्दी दु:खाच्या सावटात आकंठ भिजलेली होती. या गर्दीला कोठेही स्वतःच्या शक्तीचे प्रदर्शन करायची इच्छा अर्थातच नव्हती. बंदुकांचे बार ऐकले आणि पेटत्या ज्वाळा दिसल्या की साश्रू चेहरा घेऊन खालमानेने निघून जायचे इतकाच या गर्दीचा हेतू होता.
ही गर्दी जमवलेली नव्हती. गर्दी जमावी यासाठी हाक देण्यात आलेली नव्हती. पण एवढी गर्दी जमेल असा अंदाज मात्र होता. त्या दृष्टीनेच यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आल्या होत्या.
ही गर्दी जमण्यामागची काही संभाव्य कारणे:
१. बाळासाहेबांमध्ये 'हा आपला नेता आहे, खास आपल्यासाठी आहे' असे वाटायला लावणारे काहीतरी रसायन होते.
२. बाळासाहेब हे प्रत्यक्षात सहज भेटतील असे मुळीच नसले तरीसुद्धा इतर कोणत्याही नेत्यापेक्षा 'बाळासाहेबांपर्यंत आपण आपले गार्हाणे सहज समक्ष घेऊन जाऊ शकतो' अशी धारणा निर्माण होण्याइतपत जादूई करिष्मा बाळासाहेबांमध्ये होता. यामुळे ते 'साक्षात जवळचे' नेते ठरत होते.
३. बाळासाहेबांचे राजकारण गुप्तपणे जातीवर आधारलेले असे नव्हते, जसे अनेक नेत्यांचे असते अशी धारणा समाजात आहे. उदाहरणार्थ, ब्राह्मणांसाठी भाजप व इतरांसाठी काँग्रेस असे काहीसे!
४. सक्रीय पद न भूषवल्यामुळे त्यांचे 'प्रेरणास्थान' हे 'अलिखित' राजकीय स्थान अबाधीत राहिलेले होते.
५. मार्मिकता, सडेतोड मुद्दे, खर्याला खरे म्हणण्याचा स्वभाव आणि प्रसंगी जहरी ठाकरी भाषेत एखाद्याचा जाहीर पाणउतारा करण्यातील 'त्या काळात' जाणवलेले नावीन्य यामुळे ते 'आम' माणसाला अधिक आपले वाटत.
६. समाज ढवळून काढणारे वक्तृत्व!
७. प्रत्यक्ष सामाजिक व राजकीय कार्य!
८. विविध क्षेत्रात असलेले घनिष्ट संबंध! (घनिष्ट हा शब्द बदनाम झालेला आहे, येथे तो सुयोग्य अर्थाने अभिप्रेत).
९. कितीही साथीदार फुटले तरी न वाकणारे व्यक्तीमत्व!
१०. राज ठाकरे बाहेर पडणे आणि मनसेने निवडणुकीत मुसंडी मारून शिवसेनेसकट सर्वांनाच अवाक करणे या घटनांनंतर बाळासाहेबांच्या बाबतीत खास असे काहीच घडलेले नसणे व त्यामुळे आलेली एक टाईम गॅप आणि तीनंतर एकदम त्यांचे अत्यवस्थ होणे! या गॅपमुळे मराठी माणसाला व इतरांनाही 'मध्यंतरी' काही टचच राहिलेला नव्हता अशी भावना निर्माण झाल्यामुळे काहीसे उचंबळून येणे! (अशीच एक टाईम गॅप राजेश खन्नांच्या बाबतीतही परिणामकारक ठरली होती असे वाटते).
११. हेड क्वॉर्टर्स मुंबईत असणे!
१२. शिवसेनेची जनमानसांत रुजण्याची प्रक्रिया इतर पक्षांच्या प्रक्रियेपेक्षा अधिक जलद व परिणामकारक ठरलेली असणे!
१३. मनसेच्या निर्मीतीनंतर शिवसैनिक समाजात 'उद्धव एकटे पडले' अशी एक भावना काही प्रमाणात निर्माण होणे.
१४. बाळासाहेबांसाठी आणि उद्धवसाठी राज ठाकरेंनी राजकीय वाद बाजूला ठेवून सहाय्यभूत ठरणे व हे शिवसैनिक व मनसे - सैनिक तसेच इतर सर्वांनी जवळून पाहणे! भारतातील व्यक्तीपूजक समाजमनावर या गोष्टीचा परिणाम होणे!
१५. खणखणीत आवाज बंद पडणे आणि नेहमीचा एखादा राजकीय नेता हरपणे या दोहोतील फरक! खणखणीत आवाज बंद पडल्यामुळे वाईट वाटणे हे पुन्हा आपल्या मातीतील माणसाच्या बाबतीत प्रकर्षाने होणे!
१६. लोकसंख्याच मुळात वाढलेली असणे व त्यामुळे आजवर झाली नाही अशी गर्दी जमणे!
१७. माध्यमांनी सेकंदासेकंदाचे दर्शन घडवल्यामुळे पाय आपोआप शिवाजीपार्ककडे वळणे! केव्हातरी आपणही शिवसैनिक होतो असेही वाटणारे त्यात सामील होणे!
या व अश्या अनेक कारणांनी ही गर्दी अचानक जमली. केवळ काही तासात एकाच भागात पंधरा ते वीस लाख जमा होणे व शांततापूर्वक वावरून काही काळाने निघून जाणे हा अचाट प्रकार या कारणांमुळे घडून आला.
==============================
या गर्दीचे झालेले व संभाव्य परिणामः
१. शिवसेनेचे राजकीय विरोधक / स्पर्धक यांचे चेहरे अवाक झालेले दिसत होते. हे असे काही होईल, इतक्या मोठ्या प्रमाणावर होईल याची कल्पनाच आलेली नव्हती. पंतप्रधानांनी भोजन समारंभ रद्द केला. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. येथपर्यंत ठीक, पण 'अलोट जनसागर' असे ज्याला सुयोग्यपणे संबोधले गेले त्या संख्येने, परिमाणाने जनता रस्त्यावर येईल हे अनेकांच्या ध्यानीमनीही नव्हते. प्रतिभाताईंनी तर 'ही गर्दी पाहून मला काय वाटले' तेच थेट सांगितले. ही गर्दी अपेक्षित असेलही, पण प्रत्यक्षदर्शींसाठी व खासकरून विरोधकांसाठी ती जवळपास 'भयकारक शक्तीप्रदर्शन' ठरली. हे शक्तीप्रदर्शन मुळीच हेतूपुरस्पर केलेले नव्हते. उत्स्फुर्तपणे व प्रेमाने लोकांनी आपापले व्यवहार बंद केले होते. दुकानांना बंद होण्याची दहशत नव्हती. इच्छा होती. विरोधकांच्या या अवाक होण्यामुळे 'मनसे बाजूला ठेवून निव्वळ शिवसेना' हा पुढील निवडणुकीत एक अनबीटेबल फॅक्टर ठरू शकेल इतपत परिस्थिती निर्माण झालेली आहे.
२. राज ठाकरे व त्यांच्या मनसेतील कार्यकर्त्यांच्या मनावर ताण आलेला असणार हे उघड आहे. यामागे राज यांनी 'माझ्या व्यक्तीमत्वात व यशात बाळासाहेबांचेच सर्वाधिक योगदान आहे' हे कबूल करणे आहे. अंत्ययात्रेपासून दोन तास बाजूला राहणे किंवा मागे मागे राहणे यातील (मी तसा वेगळा आहे) राजकारण 'नापास' झालेले स्पष्ट दिसले. हे राज यांचे अपयश मुळीच नाही. पण जनमानसावरील पकड या घटकाबाबत शिवसेना आणि मनसे यांच्यातील मोठी तफावत स्पष्ट होणे नक्कीच आहे.
३. अडवानी, शरद पवार व मुख्यमंत्री हे तिघे अंत्यदर्शनासाठी आलेले दिसत असताना आणखी एक बाब आढळली म्हणजे त्यांच्यासाठी कोणी खासकरून पुढे झाले नाही. सामान्य व्हिजिटर्सप्रमाणेच हे तिघे उद्धव व राज यांना अनुक्रमे भेटून पुढे गेले. असल्या सूक्ष्म बाबींचा प्रत्यक्षदर्शी व टीव्ही प्रेक्षक असलेल्या सामान्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो. मुंबई खरोखरच इतर कोणाच्याही बापाची नाही हे अगदी कोरले गेले. येथे निवडणुकीसाठी यायचे असेल तर आमच्या परवानगीने यावे लागेल असे काहीसे झाल्याचे वाटून गेले.
४. काही काळ, म्हणजे दोन तीन वर्षे मनसे व शिवसेना यांच्यात मनसेकडून होणारा राजकीय विरोध सौम्य होण्याची शक्यता आहे. कदाचित 'बाहेरून युती'सारखे काही होण्याचीही शक्यता आहे. याहीमागे जनमताचा रेटा असू शकेल. काही माणसे इकडची तिकडे झाल्यासही नवल नाही.
५. दुर्दैवाने असे आणखी एखाद्या नेत्याचे निधन झाले तर यापुढे कदाचित अश्या प्रकारचे शक्तीप्रदर्शन हेतूपुरस्परही करण्यात येईल. (देव करो व कोणाचे निधन न होवो, अर्थातच).
६. जे शेकडो सभांनाही दिसले नाही ते अंत्यदर्शनाला दिसले. अजिबात मनात नसतानाही परिस्थिती एन्कॅश झाल्यासारखे झाले. असा पायंडा पडण्याची शक्यता आहे.
७. माध्यमांना जवळपास छत्तीस तास इतर कोणतेही काम नव्हते. देशाची आर्थिक राजधानी, एखादे अजस्त्र उर्जाजनित्र बंद पडत जावे तशी अत्यल्प काळात बंद पडत गेली. पाठोपाठ पुण्यात शांतता पसरली. भारतीय राजकारणाने याची नोंद (अख्खी मुंबईच सडनली बंद पडण्याची) नक्कीच घेतली. शिवसेनेला यापुढे मनातल्या मनात दहा गुण जास्त देऊनच राजकीय खेळी खेळल्या जातील याची शक्यता आहे.
८. ढाण्या वाघच हरपल्यामुळे उद्धव ठाकरे यांना जनमानसातून आधाररुपी पाठिंबा मिळेल हे तर उघडच आहे. (हे पुन्हा भावनिक समाजाचे लक्षण, ते योग्य की अयोग्य हा भाग वेगळा आहे).
९. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे मृत्यूपश्चात बाळासाहेबांची प्रतिमा अधिकच उजळली आहे. त्यांच्या स्मृतींना मनात अग्रणी ठेवून शिवसैनिक काम करतील हेही जवळपास उघड आहे.
=================================
मला ही गर्दी एक विलक्षण संदेश वाटला. नकळतपणे व आपोआप दिला गेलेला. सामान्यांनी दिलेला. जो दिला जावा असे अजिबात आवाहन करण्यात आलेले नव्हते.
केवळ 'खूप गर्दी जमली होती' किंवा 'काय गर्दी का काय' असे म्हणून विसरून जाण्यासारखी ही गर्दी नव्हती हे नक्की. या गर्दीचे राजकीय व सामाजिक परिणाम होण्याची शक्यता आहे. आपल्याला काय वाटते?
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
उद्धव ह्यांनी आपल्या वडिलांचे
उद्धव ह्यांनी आपल्या वडिलांचे परममित्र शरदरावजी पवार ह्यांचे मार्गदर्शन घ्यावे असे मला वाटते. >>>> शरद पवारांनी सल्ला दिलेला......पण तो ऐकला नाही त्याने...बाळासाहेबांसमोरच......त्या नंतर दोघांनी त्याला सल्ला देण्याचा नादात पडले नाही..पालथ्या घड्यावर पाणी आहे तो.......तो फक्त त्याचे पीएचेच ऐकतो......
शिवसेनेला उतरती कळा लागेल .
शिवसेनेला उतरती कळा लागेल . मनसेला चढती कळाच कधी लागणार नाही, त्यामुळे उतरत्या कळेचा प्रश्न येणार नाही.. वसई नगरपालिकेत शिवसेना राष्ट्रवादीकडून हरली आहे.. ठाणेसारख्या भगव्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी शिरलेली आहे.
मुंबईवर राज्य इतकी वर्षे याच लोकानी केले. तिथला मराठी टक्काही यांच्याच काळात कमी झाला. ( आणि पुन्हा मराठी टक्का कमी का झालायांच्या आरोळ्याही हेच लोक ठोकतात!
) लोकल / मराठी हे मुद्दे आता मुंबईत कुचकामी ठरणार आहेत. मराठी टक्का कमी झालेला आहे, त्याचे फळ हे पक्ष भोगतील.
बाळासाहेबांचा दरारा न राहिल्याने काही जुन्या पदाधिकार्यांचा स्वार्थही डोके वर काढू शकतो. त्याचा बंदोबस्त कसा करायचा ह्याची उद्धवना सदैव चिंता राहू शकते.
अगदी अनुमोदन .. शिवसेना आता अशा बांडगुळांचे साम्राज्य होणार आहे.
काल राज ठाकरेंनी घेतलेली "मी
काल राज ठाकरेंनी घेतलेली "मी पुढली व्यवस्था बघतो" ही भूमिका आणि उद्धवचं अंत्यविधींच्या वेळेला बधीर झाल्यासारखं होणं यावरून सध्या तरी दोघांच्याही मनात कुठलेही राजकीय विचार चालू नसावेत असं वाटत होतं. राजकीय खेळापेक्षा दोघांनाही पोरकं झाल्याची भावना येत होती हे त्यांच्या चेहर्यावरून जाणवत होतं. एकदा का सर्व संपलं की मग कदाचित राजकीय खेळांना वेग येइल.
सध्यातरी शिवसेना-मनसे एकत्र येणे कठीण आहे. कारण, आता प्रश्न शिवसेनाप्रमुख पदाचा आहे. इतके दिवस हे राज्-उद्धव असो ना भुजबळ्-राणे इत्यादि लोक असो, वाद हा कायम नं. २ च्या पदासाठी होता. नं,१ वरती बाळासाहेब कायम राहिले. आता सिंहासन रिकामे झाले आहे. बाळासाहेबांच्या इच्छेनुसार उद्धव आता प्रमुख होतील. आणि त्याच कारणासाठी तर राजने सेना सोडली होती. त्यामुळे त्याने परत सेनेमधे जाण्याचा प्रश्न येणार नाही.
राज ठाकरेकडे एक प्लस पॉइंट हा आहे की तो बाळासाहेबांची प्रतिकृती असल्यासारखा आहे. त्याचे हावभाव, वक्तृत्व, चेहरामोहरा आता सर्वांनाच बाळासाहेबांची आठवण देत राहील. राजकीय खेळ न समजणार्या पण बाळासाहेबांवर भरभरून प्रेम करणार्ञा कित्येक शिवसैनिकांना राज कदाचित आपलेसे वाटू लागतील.
पण आंबा, कालची संख्या
पण आंबा, कालची संख्या मतदानाला बाहेर पडली असती तर सत्ता सेनेची येईल इतपत अवस्था (कालपुरतीतरी) आली होती. बाळासाहेबांबाबतची सहानुभुती / आस्था / आदर / प्रेम / श्रद्धा कुठेतरी तरी दाखवतील ना शिवसैनिक?
बाळासाहेबांबाबतची सहानुभुती /
बाळासाहेबांबाबतची सहानुभुती / आस्था / आदर / प्रेम / श्रद्धा कुठेतरी तरी दाखवतील ना शिवसैनिक?
>>>> लगेचच निवडणुक असती तर नक्कीच फरक पडला असता. पण आता मध्ये खुप गॅप आहे, तेव्हा फारसा फरक पडेल असे वाटत नाही.
नंदिनी +१ पण आंबा म्हणतात
नंदिनी +१
पण आंबा म्हणतात त्याप्रमाणे केवळ मराठीचा मुद्दा राज ठाकरे ह्याच्यासुद्धा उपयोगी पडणार नाहीये आता. गेला आठवडाभर गावाकडे होतो तेव्हा कळले तिकडे उसाच्या दराचा मुद्दा महत्वाचा आहे.
ही हळहळ काही काळच राहील नंतर जनता त्या त्या वेळी ठरवील कुणाला उचलायचे आणि कुणाला धोबीपछाड द्यायची ते.
शिवाय ग्रामीण महाराष्ट्रात
शिवाय ग्रामीण महाराष्ट्रात हल्ली नेत्यांकडून मिळणार्या पैशांवर मतांचे सर्व ठरते... आमच्या गावच्या ग्रामपंचायतीचा निकाल नुकताच लागला आहे त्यावरून हे सिद्ध झाले. अर्थात हे सर्व ऐकीव पण खरे वाटलेले आहे.
बाळासाहेबांबाबतची सहानुभुती /
बाळासाहेबांबाबतची सहानुभुती / आस्था / आदर / प्रेम / श्रद्धा कुठेतरी तरी दाखवतील ना शिवसैनिक?
असे असते, तर वसईत सेना का हरली? शिवाय ती जत्रा सगळी शिवसेनेची नसेल. त्यात मनसेचाही वेगळा प्रवाह असेल ना? इतरही अनेक पक्षाचे लोक असतील. निवडणूक प्रचाराला येणारे पब्लिक आणि अंत्ययात्रेला येणारे पब्लिक हे एकाच मानसिकतेने येत नसतात.
वसईत सेना हारण्याआधी ते हयात
वसईत सेना हारण्याआधी ते हयात होते. मला असे म्हणायचे आहे की पुढील निवडणुकीत उद्धव ठाकरे 'बाळासाहेबांना श्रद्धांजली द्या व म्हणून शिवसेनेला मत द्या' हा मुद्दा करतील व त्याला भावनिकतेची जोड मिळेल अशी शक्यता आहे.
निवडणूक लगेच असली, तर असे होऊ
निवडणूक लगेच असली, तर असे होऊ शकते.
विरोधी पक्ष असा मुद्दा करू
विरोधी पक्ष असा मुद्दा करू शकणार नाहीत काय?
"बाळासाहेब होते तोवर शिवसेनेला निदान एक तात्विक बैठक तरी होती, आता सगळाच आनंदीआनंद आहे"
असे झाले तर त्याचे काय परीणाम होतील?
अगदी तुमच्याच शब्दात 'तात्विक
अगदी तुमच्याच शब्दात 'तात्विक बैठक' हा शब्दप्रयोग विरोधकांनी केला तर ते फसू शकतील कारण शिवसेनेची तात्विक बैठक आजही व पुढेही तीच राहणार आणि त्यावरच ते लढू पाहणार. मग जनता म्हणेल की उद्धव ठाकर्यांनी काय शिवसेनेचे वैचारिक अधिष्ठान बदलले थोडीच?
माझ्या मते उद्धव ठाकरेंना आधी
माझ्या मते उद्धव ठाकरेंना आधी एस्टॅब्लिश व्हायलाच बराच संघर्ष करावा लागेल.
शिवसेनेतल्या बर्याच ज्येष्ट नेत्यांना उद्धव ह्यांची विचारशैली पटत नाही हे स्पष्ट आहे आणि अशा नेत्यांनी शिवसेना बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून बांधलेली आहे. बाळासाहेब होते तोवर जरी कुणी उघडपणे उद्धवला विरोध दर्शविला नसला तरी आता तसे होणारच नाही ह्याची खात्री देता येत नाही.
"उद्धव आणि आदित्य ह्यांना सांभाळून घ्या" असे शिवसैनिकांना आवाहन बाळासाहेबांनी केले त्यामागे हे सर्व तर नसावे? इथे आदित्य ह्यांना सांभाळून घेण्याची विनंती म्हणजे सरळसरळ घराणेशाहीचा पुरस्कार नाही का? पुत्राच्या पाठोपाठ भविष्यात नातवाला शिवसेनेत उच्चपदस्थ बनवा असे ह्यातून सुचित होत नाही का?
शिवसेनेची तात्विक बैठक आजही व
शिवसेनेची तात्विक बैठक आजही व पुढेही तीच राहणार
कसली तात्विक बैठक?? यान्ना तात्विक बैठक असती तर मराठी टक्का ढासळला असता का?
तेच तर.. काँग्रेसचेही ढीगभर
तेच तर.. काँग्रेसचेही ढीगभर नेते आजवर मेले.. पण माझ्या मुलाला, नातवाला सांभाळून घ्या , अशी आर्त विनवणी कुणी केल्याचे ऐकीवात नाही.
तेच तर.. काँग्रेसचेही ढीगभर
तेच तर.. काँग्रेसचेही ढीगभर नेते आजवर मेले.. पण माझ्या मुलाला, नातवाला सांभाळून घ्या , अशी आर्त विनवणी कुणी केल्याचे ऐकीवात नाही.<<<
काँग्रेस त्या नेत्यांनी स्थापिलेली नव्हती. ते काँग्रेसच्या प्रवाहात मोठे होऊन मग मेले. इंदिरा गांधींनीही आधी अस्तित्वात असलेल्या कोंग्रेसमध्ये सहभागी होऊन मग नंतर 'इं काँ' हे नाव पुढे निर्माण झाले. हा भाग वेगळा की जवाहर ते राहुल (संभाव्य नेता) हा प्रवास सर्वश्रुत आहे ज्यात एका अ-भारतीय स्त्रीलाही स्थान मिळाले आहे. (भले सक्रीय पद घेतले नसो).
जो माणूस स्वतः पक्ष स्थापन करतो त्याच्या स्वरात आर्तता येणारच असे मला वाटते.
कसली तात्विक बैठक?? <<<
मी म्हणत नाही आहे तात्विक बैठक. पुढे विरोधक म्हणू शकतील असे विजय पाटील म्हणत आहेत.
पण माझ्या मुलाला, नातवाला
पण माझ्या मुलाला, नातवाला सांभाळून घ्या.... याचा दुसरा अर्थ हा पण होतो की काँग्रेसचा कुठलाच नेता येव्हड भावनिक नात नाही करु शकला जनतेसोबत......
आंबा १, तुमच्या प्रतिसादांचा
आंबा १,
तुमच्या प्रतिसादांचा रोख शिवसेना व मनसे हे पक्ष पात्र नसून काँग्रेस आहे असा काहीसा असावा. त्याबद्दल येथे कोणाचेच काही म्हणणेही नसावे. बाळासाहेबांच्या जाण्याने जनमानस एक श्रद्धा म्हणून शिवसेनेला आधार देईल का, राज आणि उद्धव यांच्यात काय होऊ शकेल, अश्या स्वरुपाचे मुद्दे येथे आहेत. तुमच्यामते काँग्रेससमोर हे दोन्ही पक्ष किरकोळ व नगण्य असल्यास त्यास कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही, कारण येथे तो प्रश्न नाही आहे.
सुशांत अगदी योग्य बोललात पण
सुशांत अगदी योग्य बोललात पण ते भावनिक नाते बाळ ठाकरे ह्या व्यक्तीसोबत होते जी आता हयात नाही. उद्धवला असे नाते कधी निर्माण करता येईल का हाच अवघड प्रश्न आहे.
निवडणुकांमधे मतदान करणारी जनता ही वेगळ्याच मानसिकतेची असते असे मला वाटते. अशी आवाहने जनतेला द्रववू शकत नाहीत असे वाटते.
अशी आवाहने जनतेला द्रववू शकत
अशी आवाहने जनतेला द्रववू शकत नाहीत असे वाटते.<<<
द्रववू शकतात याची उदाहरणे:
१. राजीव गांधींच्या निर्दय हत्येनंतर उरलेल्या दोन टप्प्यातील मतदान जवळपास पूर्णपणे काँग्रेसला झाले होते. त्याआधीच्या टप्प्यातील मतदान भाजपला झालेले होते. निवडणूक ऐन बहरात होती हे मात्र खरे, जे आत्ता ठाकरेंच्या बाबतीत नाही आहे.
२. इंदिरा गांधींच्या निर्दय हत्येनंतरच्या पुढच्या निवडणुकीत अशीच लाट आली होती. इतकेच नाही तर तिवारींसारखे ज्येष्ठ नेते असताना राजकारण, समाजकारण, भारत देश याचा कसलाही अनुभव नसलेल्या व केवळ सस्मित मुद्रेने सर्वांचे सांत्वन करणार्या एका हॅन्डसम युवकाला (राजीव गांधी) थेट पंतप्रधानपदी बसवून जगासमोर आपल्या लोकशाहीचे हसेही करून घेण्यात आले होते.
३. अडवानींनी देशभर काढलेल्या रथयात्रेमुळे व ती अडवण्यात आल्यामुळे भाजपची अशीच लाट आली होती.
तीनहीवेळा जनता द्रवली होती. कालांतराने आजची पिढी अधिक व्यावहारिक निर्णय घेत असल्यास सेनेच्या बाबतीत ते होणार नाही हे मात्र कबूल.
पण अजूनही तशी जुनी जनता आहे असे वाटते.
वसई नगरपालिकेत शिवसेना
वसई नगरपालिकेत शिवसेना राष्ट्रवादीकडून हरली आहे>> वसई-विरार महानगरपालिका आहे आणि तीथे राष्ट्रवादी नाही तर बहुजन विकास आघाडीची (हितेंद्र ठाकुर)सत्ता आहे जी वसै आणि विरार वेगळ्या नगरपालिका होत्या तेव्हाही होती त्यामुळे त्याचा संबंध शिवसेनेच्या घसरणीशी जोड्ण्याचे काही कारण नाही .(नाही म्हणायला याच भागात एक आमदार विवेक पंडित आहेत पण ते नावालाच शिवसेनेत आहेत , त्यानी निवड्णुक लढवली ती स्वतःच्या श्रमजीवी संघटनेच्या चिन्हावर लढवली होती).
छोट्या नगरपालिकामध्ये लोकल संघटना, लोकाल युत्या जास्त प्राभावी ठरतात.
वर कुणितरी म्हटल्याप्रमाणे वर्ष/दिडवर्षाचा कालावधी आहे विधानसभा/लोकसभा निवड्णुकीना. त्यामुळे सहान्भुतीच्या लाटेचा फायदा होणार नाही. मात्र राज ठाकरेनी बाळासाहेबांचे राजकारण पुढे नेणे त्यांच्यासाठी अॅडव्हांटेजस ठरू शकते. उदा. पूढील महिन्यात येणार्या पाकीस्तानी टिमला विरोध केला तर त्यातुन बाळासाहेबांची हिच इच्छा होती आणि ती पुरी करायची धमक फक्त मनसेत आहे असा स्ट्राँग संदेश जाऊ शकतो. त्यातुन आत्तापर्यंत कुप्णावर असलेले नेते/कार्यकर्ते त्यांच्या बाजुला जाऊ शकतात.
विदिपा माझही हेच म्हणन आहे की
विदिपा माझही हेच म्हणन आहे की शिवसेनेला उद्धव ठाकरेमुळ जिंकण केवळ अशक्य आहे.... त्यांना सध्याची सहानुभुती जिंकुन देऊ शकली असती पण पण पण विधानसभेच्या निवडणुकांना अजुन दिड वर्ष बाकी आहे..... आता उद्धव ठाकरेंपुढ विधानसभेत मताधिक्य मिळवण्यापेक्षा आहे तेच संख्याबळ टिकवण्याच आव्हान आहे. सध्यातर त्यांच्याकड विरोधीपक्ष नेते पद पण नाहीये.
अडवानींनी देशभर काढलेल्या
अडवानींनी देशभर काढलेल्या रथयात्रेमुळे व ती अडवण्यात आल्यामुळे भाजपची अशीच लाट आली होती..... असहमत... ही भाजप लाट नव्हती... ती काँग्रेसविरोधी लाट होती.... काँग्रेस नको म्हनुन भाजप असा प्रकार होता तो कारण तोपर्यंत जनता दल बरच कमकुवत झालेल होत
बेफि, मला काळाच्या
बेफि, मला काळाच्या मुद्द्याबाबतच बोलायचे होते.
अलिकडे गावातले निवडणुकीचे राजकारण फार जवळून पाहिले असल्याने मला असे वाटत आहे. जनताही आता खूप हुशार झाली आहे इतकेच म्हणायचे आहे. बाकी राज्यकर्ते कुणीही झाले तरी फरक पडत नाही ह्या मताचा मी आहे.
विजय पाटिल तुमच्याशी सहमत.
विजय पाटिल तुमच्याशी सहमत. दुर्दैवाने आता कुणी न्यायी, कणखर आणी सर्वसामान्यांशी निगडीत असा नेताच नाहीये.
दिसायला सगळे पक्ष वेगवेगळे
दिसायला सगळे पक्ष वेगवेगळे असले,त्यांची ध्येयधोरणं वेगवेगळी असली, नेते एकमेकांवर कुरघोडी करणारे(दिसत)असले तरी पडद्यामागे ह्या सगळ्यांचं साटंलोटं असतं हे आपल्याला कळत नाही..कळलं तरी वळत नाही आणि पचत तर मुळीच नाही....त्यामुळे कुणीही जिंकलं तरी आपल्या सामान्यांच्या जीवनात लक्षणीय असा काहीच फरक पडत नाही/पडणारही नाही.
जनताही आता खूप हुशार झाली आहे
जनताही आता खूप हुशार झाली आहे इतकेच म्हणायचे आहे. बाकी राज्यकर्ते कुणीही झाले तरी फरक पडत नाही ह्या मताचा मी आहे. >>> या विदिपांच्या आणि...
कुणीही जिंकलं तरी आपल्या सामान्यांच्या जीवनात लक्षणीय असा काहीच फरक पडत नाही/पडणारही नाही. >> या देवकाकांच्या मताला अनुमोदन.
विजय दिनकर पाटील, तुमचे
विजय दिनकर पाटील, तुमचे बरेचसे मुद्दे पटले.
गर्दी का जमली यातील
गर्दी का जमली यातील १०,११,१३,१६,१७ कारणे गैरलागू आहेत बाकी सर्व कारणे एकदम अचूक!
संभाव्य परिणामातः
२,३ गैरलागू
६: कुठलिही गोष्ट हा "प्रसिध्दीचा कार्यक्रम/संधी" मानणार्यांचे अचूक निदान
७: असंबध्द!
९: अंत्यदर्शनाला नेते आले म्हणून केवळ प्रतिमा ऊजळावी ईतके कमकुवत व्यक्तीमत्व व कर्तूत्व बाळासाहेबांचे नक्कीच नव्हते!
the crux is: करोडो पैसे ओतून निवडणूका जिंकता येतात, अनेक करोडोंचे घोटाळे करात येतात, पैसे ओतून समारंभाला लोक ट्रक मधून आणता येतात (अण्णा मेळावे..), पण स्वतःच्या अंत्ययात्रेसाठी कितीही पैसा मोजला तरी १० लाख काय एक लाख लोकं देखिल बळजबरीने आणता येत नाहीत.. कारण अशा बळजबरीने येणार्यांसाठी "परतभेट्/फायदा" हा गेलेल्या व्यक्तीकडून मिळणार नसतो!
तेव्हा भारताच्या आजवरच्या इतीहासात पहिल्यांदाच असा मनुष्य-समुद्र एखाद्या नेत्याच्या, बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला लोटला यातच बाळासाहेबांचं व्यक्तीमत्व, कर्तुत्व, लोकनेतेपण, जेतेपण, जाणतेपण, जनमानसावरील प्रभाव, आणि माणूसकीचे नाते जे त्यांनी अखेरपर्यंत जपले..... सर्व सर्व काही आलं.
पण स्वतःच्या अंत्ययात्रेसाठी
पण स्वतःच्या अंत्ययात्रेसाठी कितीही पैसा मोजला तरी १० लाख काय एक लाख लोकं देखिल बळजबरीने आणता येत नाहीत.. कारण अशा बळजबरीने येणार्यांसाठी "परतभेट्/फायदा" हा गेलेल्या व्यक्तीकडून मिळणार नसतो!
तेव्हा भारताच्या आजवरच्या इतीहासात पहिल्यांदाच असा मनुष्य-समुद्र एखाद्या नेत्याच्या, बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला लोटला यातच बाळासाहेबांचं व्यक्तीमत्व, कर्तुत्व, लोकनेतेपण, जेतेपण, जाणतेपण, जनमानसावरील प्रभाव, आणि माणूसकीचे नाते जे त्यांनी अखेरपर्यंत जपले..... सर्व सर्व काही आलं.>>>> योग +१०००...
Pages