अलोट जनसागर - पुढे?

Submitted by बेफ़िकीर on 19 November, 2012 - 00:52

मराठी मनाचे अघोषित सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

===================================================

बाळासाहेबांच्या दु:खद निधनाआधी दोन दिवस त्यांची प्रकृती खालावली होती तेव्हा मातोश्रीच्या परिसरात गर्दी जमू लागली होती. त्यानंतरचा दिवस काहीसा दिलाश्याचा जात आहे तोवरच पुढच्या दिवशी त्यांचे निधन झाल्याचे जाहीर झाले. या बातमीनंतर मातोश्री, शिवसेना भवन व जेथे अंत्यविधी होणार असे जाहीर झाले त्या शिवाजी पार्ककडे विक्रमी संख्येने गर्दी जमू लागली.

या गर्दीकडे लक्ष वेधून या गर्दीचा पुढील स्थानिक राजकारणावर पडू शकणारा प्रभाव तसेच या गर्दीने पडू शकणारा पायंडा याबाबत काही मनात आले ते लिहायचा हा एक प्रयत्न आहे. आपल्या सर्वांच्या मतांचे स्वागत आहेच.

=========================

बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवाजी पार्क येथे काल जमलेल्या विराट व न भूतो गर्दीच्या सख्येबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र काही बातम्यांनुसार हा आकडा दहा लाख, पंधरा लाख व एकोणीस लाख यापैकी किंवा याच्या आसपासचा असावा असे दिसते.

कोणत्याही राजकारणाशी संबंधीत नेत्याच्या अंत्यदर्शनाला यापूर्वी एवढी गर्दी जमलेली नाही असेही सांगण्यात आले. (हेही शक्य आहे की कै. इंदिरा गांधी वा कै. राजीव गांधी हे राष्ट्रीय पातळीवरील नेते असल्याने त्यांच्या निधनानंतर जनमानसावर पडलेला प्रभाव व अंत्यदर्शनाची इच्छा ही विखुरली गेल्याने जाणवली नाही. पण तरीही) बाळासाहेबांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी उच्चांकी व अभूतपूर्व गर्दी जमली हे नाकारता येणार नाही. ही गर्दी शांत होती, शिवसेनेच्या एरवीच्या आक्रमक भूमिकेशी फारकत घेऊन जबाबदारीने वागणारी ही गर्दी दु:खाच्या सावटात आकंठ भिजलेली होती. या गर्दीला कोठेही स्वतःच्या शक्तीचे प्रदर्शन करायची इच्छा अर्थातच नव्हती. बंदुकांचे बार ऐकले आणि पेटत्या ज्वाळा दिसल्या की साश्रू चेहरा घेऊन खालमानेने निघून जायचे इतकाच या गर्दीचा हेतू होता.

ही गर्दी जमवलेली नव्हती. गर्दी जमावी यासाठी हाक देण्यात आलेली नव्हती. पण एवढी गर्दी जमेल असा अंदाज मात्र होता. त्या दृष्टीनेच यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आल्या होत्या.

ही गर्दी जमण्यामागची काही संभाव्य कारणे:

१. बाळासाहेबांमध्ये 'हा आपला नेता आहे, खास आपल्यासाठी आहे' असे वाटायला लावणारे काहीतरी रसायन होते.

२. बाळासाहेब हे प्रत्यक्षात सहज भेटतील असे मुळीच नसले तरीसुद्धा इतर कोणत्याही नेत्यापेक्षा 'बाळासाहेबांपर्यंत आपण आपले गार्‍हाणे सहज समक्ष घेऊन जाऊ शकतो' अशी धारणा निर्माण होण्याइतपत जादूई करिष्मा बाळासाहेबांमध्ये होता. यामुळे ते 'साक्षात जवळचे' नेते ठरत होते.

३. बाळासाहेबांचे राजकारण गुप्तपणे जातीवर आधारलेले असे नव्हते, जसे अनेक नेत्यांचे असते अशी धारणा समाजात आहे. उदाहरणार्थ, ब्राह्मणांसाठी भाजप व इतरांसाठी काँग्रेस असे काहीसे!

४. सक्रीय पद न भूषवल्यामुळे त्यांचे 'प्रेरणास्थान' हे 'अलिखित' राजकीय स्थान अबाधीत राहिलेले होते.

५. मार्मिकता, सडेतोड मुद्दे, खर्‍याला खरे म्हणण्याचा स्वभाव आणि प्रसंगी जहरी ठाकरी भाषेत एखाद्याचा जाहीर पाणउतारा करण्यातील 'त्या काळात' जाणवलेले नावीन्य यामुळे ते 'आम' माणसाला अधिक आपले वाटत.

६. समाज ढवळून काढणारे वक्तृत्व!

७. प्रत्यक्ष सामाजिक व राजकीय कार्य!

८. विविध क्षेत्रात असलेले घनिष्ट संबंध! (घनिष्ट हा शब्द बदनाम झालेला आहे, येथे तो सुयोग्य अर्थाने अभिप्रेत).

९. कितीही साथीदार फुटले तरी न वाकणारे व्यक्तीमत्व!

१०. राज ठाकरे बाहेर पडणे आणि मनसेने निवडणुकीत मुसंडी मारून शिवसेनेसकट सर्वांनाच अवाक करणे या घटनांनंतर बाळासाहेबांच्या बाबतीत खास असे काहीच घडलेले नसणे व त्यामुळे आलेली एक टाईम गॅप आणि तीनंतर एकदम त्यांचे अत्यवस्थ होणे! या गॅपमुळे मराठी माणसाला व इतरांनाही 'मध्यंतरी' काही टचच राहिलेला नव्हता अशी भावना निर्माण झाल्यामुळे काहीसे उचंबळून येणे! (अशीच एक टाईम गॅप राजेश खन्नांच्या बाबतीतही परिणामकारक ठरली होती असे वाटते).

११. हेड क्वॉर्टर्स मुंबईत असणे!

१२. शिवसेनेची जनमानसांत रुजण्याची प्रक्रिया इतर पक्षांच्या प्रक्रियेपेक्षा अधिक जलद व परिणामकारक ठरलेली असणे!

१३. मनसेच्या निर्मीतीनंतर शिवसैनिक समाजात 'उद्धव एकटे पडले' अशी एक भावना काही प्रमाणात निर्माण होणे.

१४. बाळासाहेबांसाठी आणि उद्धवसाठी राज ठाकरेंनी राजकीय वाद बाजूला ठेवून सहाय्यभूत ठरणे व हे शिवसैनिक व मनसे - सैनिक तसेच इतर सर्वांनी जवळून पाहणे! भारतातील व्यक्तीपूजक समाजमनावर या गोष्टीचा परिणाम होणे!

१५. खणखणीत आवाज बंद पडणे आणि नेहमीचा एखादा राजकीय नेता हरपणे या दोहोतील फरक! खणखणीत आवाज बंद पडल्यामुळे वाईट वाटणे हे पुन्हा आपल्या मातीतील माणसाच्या बाबतीत प्रकर्षाने होणे!

१६. लोकसंख्याच मुळात वाढलेली असणे व त्यामुळे आजवर झाली नाही अशी गर्दी जमणे!

१७. माध्यमांनी सेकंदासेकंदाचे दर्शन घडवल्यामुळे पाय आपोआप शिवाजीपार्ककडे वळणे! केव्हातरी आपणही शिवसैनिक होतो असेही वाटणारे त्यात सामील होणे!

या व अश्या अनेक कारणांनी ही गर्दी अचानक जमली. केवळ काही तासात एकाच भागात पंधरा ते वीस लाख जमा होणे व शांततापूर्वक वावरून काही काळाने निघून जाणे हा अचाट प्रकार या कारणांमुळे घडून आला.

==============================

या गर्दीचे झालेले व संभाव्य परिणामः

१. शिवसेनेचे राजकीय विरोधक / स्पर्धक यांचे चेहरे अवाक झालेले दिसत होते. हे असे काही होईल, इतक्या मोठ्या प्रमाणावर होईल याची कल्पनाच आलेली नव्हती. पंतप्रधानांनी भोजन समारंभ रद्द केला. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. येथपर्यंत ठीक, पण 'अलोट जनसागर' असे ज्याला सुयोग्यपणे संबोधले गेले त्या संख्येने, परिमाणाने जनता रस्त्यावर येईल हे अनेकांच्या ध्यानीमनीही नव्हते. प्रतिभाताईंनी तर 'ही गर्दी पाहून मला काय वाटले' तेच थेट सांगितले. ही गर्दी अपेक्षित असेलही, पण प्रत्यक्षदर्शींसाठी व खासकरून विरोधकांसाठी ती जवळपास 'भयकारक शक्तीप्रदर्शन' ठरली. हे शक्तीप्रदर्शन मुळीच हेतूपुरस्पर केलेले नव्हते. उत्स्फुर्तपणे व प्रेमाने लोकांनी आपापले व्यवहार बंद केले होते. दुकानांना बंद होण्याची दहशत नव्हती. इच्छा होती. विरोधकांच्या या अवाक होण्यामुळे 'मनसे बाजूला ठेवून निव्वळ शिवसेना' हा पुढील निवडणुकीत एक अनबीटेबल फॅक्टर ठरू शकेल इतपत परिस्थिती निर्माण झालेली आहे.

२. राज ठाकरे व त्यांच्या मनसेतील कार्यकर्त्यांच्या मनावर ताण आलेला असणार हे उघड आहे. यामागे राज यांनी 'माझ्या व्यक्तीमत्वात व यशात बाळासाहेबांचेच सर्वाधिक योगदान आहे' हे कबूल करणे आहे. अंत्ययात्रेपासून दोन तास बाजूला राहणे किंवा मागे मागे राहणे यातील (मी तसा वेगळा आहे) राजकारण 'नापास' झालेले स्पष्ट दिसले. हे राज यांचे अपयश मुळीच नाही. पण जनमानसावरील पकड या घटकाबाबत शिवसेना आणि मनसे यांच्यातील मोठी तफावत स्पष्ट होणे नक्कीच आहे.

३. अडवानी, शरद पवार व मुख्यमंत्री हे तिघे अंत्यदर्शनासाठी आलेले दिसत असताना आणखी एक बाब आढळली म्हणजे त्यांच्यासाठी कोणी खासकरून पुढे झाले नाही. सामान्य व्हिजिटर्सप्रमाणेच हे तिघे उद्धव व राज यांना अनुक्रमे भेटून पुढे गेले. असल्या सूक्ष्म बाबींचा प्रत्यक्षदर्शी व टीव्ही प्रेक्षक असलेल्या सामान्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो. मुंबई खरोखरच इतर कोणाच्याही बापाची नाही हे अगदी कोरले गेले. येथे निवडणुकीसाठी यायचे असेल तर आमच्या परवानगीने यावे लागेल असे काहीसे झाल्याचे वाटून गेले.

४. काही काळ, म्हणजे दोन तीन वर्षे मनसे व शिवसेना यांच्यात मनसेकडून होणारा राजकीय विरोध सौम्य होण्याची शक्यता आहे. कदाचित 'बाहेरून युती'सारखे काही होण्याचीही शक्यता आहे. याहीमागे जनमताचा रेटा असू शकेल. काही माणसे इकडची तिकडे झाल्यासही नवल नाही.

५. दुर्दैवाने असे आणखी एखाद्या नेत्याचे निधन झाले तर यापुढे कदाचित अश्या प्रकारचे शक्तीप्रदर्शन हेतूपुरस्परही करण्यात येईल. (देव करो व कोणाचे निधन न होवो, अर्थातच).

६. जे शेकडो सभांनाही दिसले नाही ते अंत्यदर्शनाला दिसले. अजिबात मनात नसतानाही परिस्थिती एन्कॅश झाल्यासारखे झाले. असा पायंडा पडण्याची शक्यता आहे.

७. माध्यमांना जवळपास छत्तीस तास इतर कोणतेही काम नव्हते. देशाची आर्थिक राजधानी, एखादे अजस्त्र उर्जाजनित्र बंद पडत जावे तशी अत्यल्प काळात बंद पडत गेली. पाठोपाठ पुण्यात शांतता पसरली. भारतीय राजकारणाने याची नोंद (अख्खी मुंबईच सडनली बंद पडण्याची) नक्कीच घेतली. शिवसेनेला यापुढे मनातल्या मनात दहा गुण जास्त देऊनच राजकीय खेळी खेळल्या जातील याची शक्यता आहे.

८. ढाण्या वाघच हरपल्यामुळे उद्धव ठाकरे यांना जनमानसातून आधाररुपी पाठिंबा मिळेल हे तर उघडच आहे. (हे पुन्हा भावनिक समाजाचे लक्षण, ते योग्य की अयोग्य हा भाग वेगळा आहे).

९. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे मृत्यूपश्चात बाळासाहेबांची प्रतिमा अधिकच उजळली आहे. त्यांच्या स्मृतींना मनात अग्रणी ठेवून शिवसैनिक काम करतील हेही जवळपास उघड आहे.

=================================

मला ही गर्दी एक विलक्षण संदेश वाटला. नकळतपणे व आपोआप दिला गेलेला. सामान्यांनी दिलेला. जो दिला जावा असे अजिबात आवाहन करण्यात आलेले नव्हते.

केवळ 'खूप गर्दी जमली होती' किंवा 'काय गर्दी का काय' असे म्हणून विसरून जाण्यासारखी ही गर्दी नव्हती हे नक्की. या गर्दीचे राजकीय व सामाजिक परिणाम होण्याची शक्यता आहे. आपल्याला काय वाटते?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राज ठाकरे यानी मी किंग मेकर आहे, किंग नाही असे बोलल्याचे अंधूकसे आठवते. त्यामुळे ते मुख्यमंत्री / आमदार होणार नाहीत, असे वाटते.

मग उद्धव काय करतील?
<<
<<
जाऊ द्या हो सातीतै तुम्ही कशाला टेंशन घेताय, बघून घेतील त्यांचे ते काय करायचे, काय नाही ते. नाहीतरी वर तुम्ही हे म्हटले आहेच<< धुर्तपणे पुढिल राजकारण खेळले असते तर मी शिवसेनेलाच शेवटपर्यंत मत दिले असते.
(आता इथे हा पक्षच नाही पण मी महाराष्ट्रात असते तर नक्कीच)>>

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17319255.cms

मनसे म्हणते स्मारक इंदु मिलात उभारा.... त्यापेक्षा राज ठाकरेंच्या मालकीच्या कोहिनूर मिलाच्या जागेत का नाही उभारत स्मारक?

हरिहर | 22 November, 2012 - 12:03
>>
सोनियाजींनी यावयास हवे होते. जनमानसावर फार मोठा परिणाम झाला असता. (आपल्या मित्रांचा विचार न करता बाळासाहेबांनी महामहिम राष्ट्रपतींना बिनशर्त पाठिंबा दिलेला होता. तसेच केवळ मराठीच्या अस्मितेपोटी पूर्व राष्ट्रपतींनाही आपला पाठिंबा दिलेला होता. असे धाडसी निर्णय केवळ बाळासाहेबच घेऊ जाणे.) असो!
<<

सोनियाजी व काँग्रेसच्या एकूणच काळजीपायी, व काँग्रेसची मते वाढावीत म्हणून तुम्ही म्हटलात ते जरी योग्य असले, तरी मा. शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या गेल्या विजयादशमीच्या भाषणात एकूणच गांधी फ्यामिलीस उद्देशून जे काय म्हटले आहे, ते पहाता सोनियाजी आल्या असत्या असे आपणास वाटते काय?

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या स्पर्धेने आणि कशालाही त्यांच्ये नाव देण्याच्या नगरसेवक पातळीवरून येणार्‍या सूचनांचा पाऊस पाहता बाळासाहेबांच्या जाण्याने निर्माण झालेल्या वातावरणाचे गांभीर्य नष्ट होत नाही काय ? ह्या बालीश स्पर्धेत जोशीबुवा अग्रभागी असावेत हे दुर्दैब नव्हे काय?

सेनापती | 22 November, 2012 - 18:52

कृपया मटाच्या बातम्या देउन इथे मते मांडू नका. अतिशय बेभरोश्याच्या बातम्या आहेत त्यांच्या.
<<

हे कोणत्या प्रतिसादाच्या संदर्भात आहे? मी मा. शिवसेनाप्रमुखांच्या रेकॉर्डेड भाषणाबद्दल बोलत होतो, जे या दसर्‍याला सर्व मराठी वाहिन्यांनी वाजवले व मी ऐकले.

इब्लिस | 22 November, 2012 - 18:24

विजयादशमीच्या भाषणात एकूणच गांधी फ्यामिलीस उद्देशून जे काय म्हटले आहे, ते पहाता सोनियाजी आल्या असत्या असे आपणास वाटते काय?

म्हणूनच म्हणतोय की त्यांनी यावयास हवे होते. लोकमानसामध्ये वेगळा संदेश गेला असता. या ठिकाणी स्व. इंदिराजी असत्या तर त्या नक्की आल्या असत्या.
(°सोनियाजी व काँग्रेसच्या एकूणच काळजीपायी°, हे नमन कशासाठी ? "तुम्ही म्हटलात ते जरी योग्य असले तरी" एवढे म्हणले असते तरी चालले असते.)

बाय द वे आपला एक विषय (विज्ञान संपते तेथे.....) पेंडिग आहे, त्यावर चिंतन व लिखाण चालू आहे. लवकरच पोस्ट करीन.

हरिहरा,
अर्धवट बोलणे सोडा हो.
उरलेल्या अर्ध्या भागाचे काय? ते भाषण ऐकलेत काय?
ऐकले असेल, तरीही सोनियाजी व काँग्रेसच्या एकूणच काळजीपायी का होईना, सोनियाजींनी यायला हवे होते असे तुम्हाला कसे वाटू शकते? त्यांच्या जागी तुम्ही असतात तर काय केले असते?

इब्लिस | 23 November, 2012 - 00:52
हरिहरा,................एकूणच काळजीपायी का होईना,

इब्लिसा
माझा दुसरा पॅरा जरा वाचा.......
मुख्य म्हणजे, पहिल्या पॅरामध्ये अर्धा ग्लास रिकामा आहे असे म्हणण्याऐवजी अर्धा ग्लास भरलेला आहे असे म्हणलेले आहे. जाऊ दे ! तुमच्या नाही लक्षात यायचं. फार डोक्याला ताप करून घेऊ नका. आपली काळजी घ्या!

Pages