अलोट जनसागर - पुढे?

Submitted by बेफ़िकीर on 19 November, 2012 - 00:52

मराठी मनाचे अघोषित सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

===================================================

बाळासाहेबांच्या दु:खद निधनाआधी दोन दिवस त्यांची प्रकृती खालावली होती तेव्हा मातोश्रीच्या परिसरात गर्दी जमू लागली होती. त्यानंतरचा दिवस काहीसा दिलाश्याचा जात आहे तोवरच पुढच्या दिवशी त्यांचे निधन झाल्याचे जाहीर झाले. या बातमीनंतर मातोश्री, शिवसेना भवन व जेथे अंत्यविधी होणार असे जाहीर झाले त्या शिवाजी पार्ककडे विक्रमी संख्येने गर्दी जमू लागली.

या गर्दीकडे लक्ष वेधून या गर्दीचा पुढील स्थानिक राजकारणावर पडू शकणारा प्रभाव तसेच या गर्दीने पडू शकणारा पायंडा याबाबत काही मनात आले ते लिहायचा हा एक प्रयत्न आहे. आपल्या सर्वांच्या मतांचे स्वागत आहेच.

=========================

बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवाजी पार्क येथे काल जमलेल्या विराट व न भूतो गर्दीच्या सख्येबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र काही बातम्यांनुसार हा आकडा दहा लाख, पंधरा लाख व एकोणीस लाख यापैकी किंवा याच्या आसपासचा असावा असे दिसते.

कोणत्याही राजकारणाशी संबंधीत नेत्याच्या अंत्यदर्शनाला यापूर्वी एवढी गर्दी जमलेली नाही असेही सांगण्यात आले. (हेही शक्य आहे की कै. इंदिरा गांधी वा कै. राजीव गांधी हे राष्ट्रीय पातळीवरील नेते असल्याने त्यांच्या निधनानंतर जनमानसावर पडलेला प्रभाव व अंत्यदर्शनाची इच्छा ही विखुरली गेल्याने जाणवली नाही. पण तरीही) बाळासाहेबांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी उच्चांकी व अभूतपूर्व गर्दी जमली हे नाकारता येणार नाही. ही गर्दी शांत होती, शिवसेनेच्या एरवीच्या आक्रमक भूमिकेशी फारकत घेऊन जबाबदारीने वागणारी ही गर्दी दु:खाच्या सावटात आकंठ भिजलेली होती. या गर्दीला कोठेही स्वतःच्या शक्तीचे प्रदर्शन करायची इच्छा अर्थातच नव्हती. बंदुकांचे बार ऐकले आणि पेटत्या ज्वाळा दिसल्या की साश्रू चेहरा घेऊन खालमानेने निघून जायचे इतकाच या गर्दीचा हेतू होता.

ही गर्दी जमवलेली नव्हती. गर्दी जमावी यासाठी हाक देण्यात आलेली नव्हती. पण एवढी गर्दी जमेल असा अंदाज मात्र होता. त्या दृष्टीनेच यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आल्या होत्या.

ही गर्दी जमण्यामागची काही संभाव्य कारणे:

१. बाळासाहेबांमध्ये 'हा आपला नेता आहे, खास आपल्यासाठी आहे' असे वाटायला लावणारे काहीतरी रसायन होते.

२. बाळासाहेब हे प्रत्यक्षात सहज भेटतील असे मुळीच नसले तरीसुद्धा इतर कोणत्याही नेत्यापेक्षा 'बाळासाहेबांपर्यंत आपण आपले गार्‍हाणे सहज समक्ष घेऊन जाऊ शकतो' अशी धारणा निर्माण होण्याइतपत जादूई करिष्मा बाळासाहेबांमध्ये होता. यामुळे ते 'साक्षात जवळचे' नेते ठरत होते.

३. बाळासाहेबांचे राजकारण गुप्तपणे जातीवर आधारलेले असे नव्हते, जसे अनेक नेत्यांचे असते अशी धारणा समाजात आहे. उदाहरणार्थ, ब्राह्मणांसाठी भाजप व इतरांसाठी काँग्रेस असे काहीसे!

४. सक्रीय पद न भूषवल्यामुळे त्यांचे 'प्रेरणास्थान' हे 'अलिखित' राजकीय स्थान अबाधीत राहिलेले होते.

५. मार्मिकता, सडेतोड मुद्दे, खर्‍याला खरे म्हणण्याचा स्वभाव आणि प्रसंगी जहरी ठाकरी भाषेत एखाद्याचा जाहीर पाणउतारा करण्यातील 'त्या काळात' जाणवलेले नावीन्य यामुळे ते 'आम' माणसाला अधिक आपले वाटत.

६. समाज ढवळून काढणारे वक्तृत्व!

७. प्रत्यक्ष सामाजिक व राजकीय कार्य!

८. विविध क्षेत्रात असलेले घनिष्ट संबंध! (घनिष्ट हा शब्द बदनाम झालेला आहे, येथे तो सुयोग्य अर्थाने अभिप्रेत).

९. कितीही साथीदार फुटले तरी न वाकणारे व्यक्तीमत्व!

१०. राज ठाकरे बाहेर पडणे आणि मनसेने निवडणुकीत मुसंडी मारून शिवसेनेसकट सर्वांनाच अवाक करणे या घटनांनंतर बाळासाहेबांच्या बाबतीत खास असे काहीच घडलेले नसणे व त्यामुळे आलेली एक टाईम गॅप आणि तीनंतर एकदम त्यांचे अत्यवस्थ होणे! या गॅपमुळे मराठी माणसाला व इतरांनाही 'मध्यंतरी' काही टचच राहिलेला नव्हता अशी भावना निर्माण झाल्यामुळे काहीसे उचंबळून येणे! (अशीच एक टाईम गॅप राजेश खन्नांच्या बाबतीतही परिणामकारक ठरली होती असे वाटते).

११. हेड क्वॉर्टर्स मुंबईत असणे!

१२. शिवसेनेची जनमानसांत रुजण्याची प्रक्रिया इतर पक्षांच्या प्रक्रियेपेक्षा अधिक जलद व परिणामकारक ठरलेली असणे!

१३. मनसेच्या निर्मीतीनंतर शिवसैनिक समाजात 'उद्धव एकटे पडले' अशी एक भावना काही प्रमाणात निर्माण होणे.

१४. बाळासाहेबांसाठी आणि उद्धवसाठी राज ठाकरेंनी राजकीय वाद बाजूला ठेवून सहाय्यभूत ठरणे व हे शिवसैनिक व मनसे - सैनिक तसेच इतर सर्वांनी जवळून पाहणे! भारतातील व्यक्तीपूजक समाजमनावर या गोष्टीचा परिणाम होणे!

१५. खणखणीत आवाज बंद पडणे आणि नेहमीचा एखादा राजकीय नेता हरपणे या दोहोतील फरक! खणखणीत आवाज बंद पडल्यामुळे वाईट वाटणे हे पुन्हा आपल्या मातीतील माणसाच्या बाबतीत प्रकर्षाने होणे!

१६. लोकसंख्याच मुळात वाढलेली असणे व त्यामुळे आजवर झाली नाही अशी गर्दी जमणे!

१७. माध्यमांनी सेकंदासेकंदाचे दर्शन घडवल्यामुळे पाय आपोआप शिवाजीपार्ककडे वळणे! केव्हातरी आपणही शिवसैनिक होतो असेही वाटणारे त्यात सामील होणे!

या व अश्या अनेक कारणांनी ही गर्दी अचानक जमली. केवळ काही तासात एकाच भागात पंधरा ते वीस लाख जमा होणे व शांततापूर्वक वावरून काही काळाने निघून जाणे हा अचाट प्रकार या कारणांमुळे घडून आला.

==============================

या गर्दीचे झालेले व संभाव्य परिणामः

१. शिवसेनेचे राजकीय विरोधक / स्पर्धक यांचे चेहरे अवाक झालेले दिसत होते. हे असे काही होईल, इतक्या मोठ्या प्रमाणावर होईल याची कल्पनाच आलेली नव्हती. पंतप्रधानांनी भोजन समारंभ रद्द केला. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. येथपर्यंत ठीक, पण 'अलोट जनसागर' असे ज्याला सुयोग्यपणे संबोधले गेले त्या संख्येने, परिमाणाने जनता रस्त्यावर येईल हे अनेकांच्या ध्यानीमनीही नव्हते. प्रतिभाताईंनी तर 'ही गर्दी पाहून मला काय वाटले' तेच थेट सांगितले. ही गर्दी अपेक्षित असेलही, पण प्रत्यक्षदर्शींसाठी व खासकरून विरोधकांसाठी ती जवळपास 'भयकारक शक्तीप्रदर्शन' ठरली. हे शक्तीप्रदर्शन मुळीच हेतूपुरस्पर केलेले नव्हते. उत्स्फुर्तपणे व प्रेमाने लोकांनी आपापले व्यवहार बंद केले होते. दुकानांना बंद होण्याची दहशत नव्हती. इच्छा होती. विरोधकांच्या या अवाक होण्यामुळे 'मनसे बाजूला ठेवून निव्वळ शिवसेना' हा पुढील निवडणुकीत एक अनबीटेबल फॅक्टर ठरू शकेल इतपत परिस्थिती निर्माण झालेली आहे.

२. राज ठाकरे व त्यांच्या मनसेतील कार्यकर्त्यांच्या मनावर ताण आलेला असणार हे उघड आहे. यामागे राज यांनी 'माझ्या व्यक्तीमत्वात व यशात बाळासाहेबांचेच सर्वाधिक योगदान आहे' हे कबूल करणे आहे. अंत्ययात्रेपासून दोन तास बाजूला राहणे किंवा मागे मागे राहणे यातील (मी तसा वेगळा आहे) राजकारण 'नापास' झालेले स्पष्ट दिसले. हे राज यांचे अपयश मुळीच नाही. पण जनमानसावरील पकड या घटकाबाबत शिवसेना आणि मनसे यांच्यातील मोठी तफावत स्पष्ट होणे नक्कीच आहे.

३. अडवानी, शरद पवार व मुख्यमंत्री हे तिघे अंत्यदर्शनासाठी आलेले दिसत असताना आणखी एक बाब आढळली म्हणजे त्यांच्यासाठी कोणी खासकरून पुढे झाले नाही. सामान्य व्हिजिटर्सप्रमाणेच हे तिघे उद्धव व राज यांना अनुक्रमे भेटून पुढे गेले. असल्या सूक्ष्म बाबींचा प्रत्यक्षदर्शी व टीव्ही प्रेक्षक असलेल्या सामान्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो. मुंबई खरोखरच इतर कोणाच्याही बापाची नाही हे अगदी कोरले गेले. येथे निवडणुकीसाठी यायचे असेल तर आमच्या परवानगीने यावे लागेल असे काहीसे झाल्याचे वाटून गेले.

४. काही काळ, म्हणजे दोन तीन वर्षे मनसे व शिवसेना यांच्यात मनसेकडून होणारा राजकीय विरोध सौम्य होण्याची शक्यता आहे. कदाचित 'बाहेरून युती'सारखे काही होण्याचीही शक्यता आहे. याहीमागे जनमताचा रेटा असू शकेल. काही माणसे इकडची तिकडे झाल्यासही नवल नाही.

५. दुर्दैवाने असे आणखी एखाद्या नेत्याचे निधन झाले तर यापुढे कदाचित अश्या प्रकारचे शक्तीप्रदर्शन हेतूपुरस्परही करण्यात येईल. (देव करो व कोणाचे निधन न होवो, अर्थातच).

६. जे शेकडो सभांनाही दिसले नाही ते अंत्यदर्शनाला दिसले. अजिबात मनात नसतानाही परिस्थिती एन्कॅश झाल्यासारखे झाले. असा पायंडा पडण्याची शक्यता आहे.

७. माध्यमांना जवळपास छत्तीस तास इतर कोणतेही काम नव्हते. देशाची आर्थिक राजधानी, एखादे अजस्त्र उर्जाजनित्र बंद पडत जावे तशी अत्यल्प काळात बंद पडत गेली. पाठोपाठ पुण्यात शांतता पसरली. भारतीय राजकारणाने याची नोंद (अख्खी मुंबईच सडनली बंद पडण्याची) नक्कीच घेतली. शिवसेनेला यापुढे मनातल्या मनात दहा गुण जास्त देऊनच राजकीय खेळी खेळल्या जातील याची शक्यता आहे.

८. ढाण्या वाघच हरपल्यामुळे उद्धव ठाकरे यांना जनमानसातून आधाररुपी पाठिंबा मिळेल हे तर उघडच आहे. (हे पुन्हा भावनिक समाजाचे लक्षण, ते योग्य की अयोग्य हा भाग वेगळा आहे).

९. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे मृत्यूपश्चात बाळासाहेबांची प्रतिमा अधिकच उजळली आहे. त्यांच्या स्मृतींना मनात अग्रणी ठेवून शिवसैनिक काम करतील हेही जवळपास उघड आहे.

=================================

मला ही गर्दी एक विलक्षण संदेश वाटला. नकळतपणे व आपोआप दिला गेलेला. सामान्यांनी दिलेला. जो दिला जावा असे अजिबात आवाहन करण्यात आलेले नव्हते.

केवळ 'खूप गर्दी जमली होती' किंवा 'काय गर्दी का काय' असे म्हणून विसरून जाण्यासारखी ही गर्दी नव्हती हे नक्की. या गर्दीचे राजकीय व सामाजिक परिणाम होण्याची शक्यता आहे. आपल्याला काय वाटते?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>
दूध मिळाले नाही असा माझ्या आठवणीतला हा पहिलाच बंद.<<<

आम्ही शनिवारीच आणून ठेवले. मात्र लोकांनी उस्फूर्तपणे पाळलेला बंद विचार करायला लावणारा होता.

आता ईमेल वर एक कविता वाचली, कवीचे नाव खाली नमूद केलेले नाही, एखाद्यावर अपार भक्ती असेल, तरच अशी कविता होऊ शकते असे मात्र नक्की वाटले... इथे देते आहे, विषयांतराबद्दल क्षमा मागून.

डबडबलेल्या अश्रुनीशी,
महाराष्ट्र सारा उभा,
डोळे उघडून साहेब तुम्ही,
एकदाच फक्त बघा....!
 
...काय केली चूक आम्ही,
कशाची दिलीत सजा,
बुद्धिबळाच्या पटावरून आज,
राजाच झालाय वजा....!
 
मातोश्रीच्या 'त्या' खिडकीतून,
हात आम्हास कोण करणार?
रणरणत्या ह्या उनात आता,
छत्र आम्हावर कोण धरणार....?
 
तुमचा काय हो साहेबच तुम्ही,
स्वर्गात पण तुमचीच चालणार,
पण "उठ माझ्या मर्द मावळ्या",
आता आम्हास कोण म्हणणार....?
 
पहायचं आम्ही कुठे तुम्हाला,
''मार्मिक''पणे बोलताना?
वाजवायच्या कशा टाळ्या आता,
शब्दांना तुमच्या झेलताना....?
 
इथून पुढे दसरा ही आता,
शिमग्यासारखाच भासेल,
कारण शिवतीर्थावर डरकाळी फोडणारा,
माझा वाघ तिथे नसेल....!
 
व्यंगाचे तुम्ही चित्रकार पण,
तुम्हास नव्हते कुठले व्यंग,
खेळायचे तुम्ही सप्तरंगाशी,
पण भगवाशीच तुमचा संग....!
 
वाघ होता एकलाच आमुचा,
बाकी माकडाचाच खेळ सारा,
भगवे होते ते वादळच जणू,
कसली वावटळ अन कसला वारा....!
 
भगव्या ध्वजाचं ओझं त्या,
आता आम्ही कसं पेलायचं,
गेलात करून पोरकं आम्हांस,
आम्ही साहेब कुणाला म्हणायचं ....!

अनामिक

कविता अगदी आतून रचलेली आहे.
मोठी मोठी लोकं अंत्ययात्रेला कोणत्या भावनेने आली होती हे सांगणं कठिण आहे. पण लाखावर आलेली सामान्य जनता ही फक्त बाळासाहेबांच्यावर असलेल्या आतोनात भक्ती, प्रेमामुळे व आदरामुळे आली होती यात वाद नाही.

'अलोट जनसागर-पुढे?' --- चिंतन कमी अभिनिवेश जास्त.

पहिली सतरा(शेसाठ) कारणे- बरीच ओढून ताणून, काही ननविन, काही बालिश, काही अतर्क्य.
'पुढे' ची भाकितं बाळबोध.

असो. चर्चेत रस नाही.

मात्र लोकांनी उस्फूर्तपणे पाळलेला बंद विचार करायला लावणारा होता.
>>>>> आमच्या गावाकडेही अगदी लहान गावांमधील दुकानेही दुकानदारांनी उस्फूर्तपणे बंद ठेवली होती. तिथे काय कोणी नव्हते धमकवायला. बाळासाहेबांच्या प्रति असलेला आदरच होता तो.

पांढरपेश्या आणि इंग्रजालेल्यांना बाळासाहेब कधीच पटले नाहीत आणि आवडले नाहीत. इतके लोक कसे आले ह्या मागचे लॉजिक दिल्लीत बसून चर्चा करणाऱ्यांना कसे काय कळायचे. त्यामुळे जळजळ होते आहे आणि मग दहशतीचे कारण पुढे करून सगळ्यालाच एक वेगळा रंग दिला जातो आहे. तसेही अमराठी लोकांना बदडले असल्याने त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना मुंबई मध्ये येऊन पोटापाण्यासाठी भीती खाली राहावे लागते हा त्यांच्यावरच अन्याय पण त्यांच्यामुळे बाकीच्यांच्यावर अन्याय होत ते दिसत नाही. मुळातच हा फरक आहे रे आणि नाही रे मधला आहे. मग काहीही करून स्वतावाराचा अन्याय तो अन्याय असा सगळा मामला आहे.

लोकसत्ते मध्ये सूर्याची पिल्ले नावाचा अग्रलेख काल आला आहे. काही अंशी तो बरोबर आहे. सेना नेत्यांना एक आवाहन करून अत्यावशक सेवा चालू द्यात असे आवाहन करायला हरकत नव्हती.

परवा शिवसेनाप्रमुखांच्या मृत्युनंतर वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रीया दाखवत होत्या त्यात सर्वात आवडलेली प्रतिक्रीया होती ती राष्ट्रवादीचे प्रमुख श्री शरद पवार यांची.

ती प्रतिक्रीया अशी होती. "एक दिलदार मित्र हरवला"
"महाराष्ट्राचा ज्वाज्वल्य अभिमान, मराठी माणसाच्या हितासाठी पाहीजे ती किंमत देण्याची भुमिका, आणि भारताच्या बद्दल सुध्दा महाराष्ट्राचे योगदान देण्याची परिस्थिती आली तरी देशाच्यासाठी हवे ते योगदान देण्याच्या संबधाची त्यांची तयारी हे बाळासाहेंबांचे वैशिष्ट होते. मराठी भाषेसाठी, मराठी तरुणांसाठी, मराठी माणसांठी, मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी अनेकवेळी त्यांनी संघर्षाची भुमिका घेतली. या संघर्षाच्या भुमिकेमध्ये अनेक वेळेला आम्हा लोकांचे आणि त्यांचे मैत्रीचे घनिष्ट संबध असले तरी, आम्हा लोकांवर सुध्दा त्यांच्या ठाकरी भाषेमध्ये मुक्तपणाने हल्ले करण्यामध्ये त्यांनी कधी काटकसर केली नाही. तशी आम्ही लोकांनीसुध्दा त्याना तशीच प्रतिउत्तरे दिली होती. ही टिकाटीप्पणी आयुष्यभर चालली, पण ही टिकाटीप्पणी असली तरी व्यक्तीगत सलोखा, व्यक्तीगत लोभ याच्यामध्ये बाळासाहेबांनी कधी अंतर येऊ दिले नाही. एकाद्या व्यक्तीचे दिलदार मन कसे असावे, याची प्रचिती बाळासाहेबांच्या व्यक्तिगत संबधामध्ये आल्याच्यानंतर अनेकांना समजले. काही प्रश्नांच्या बाबतीत आम्ही संघर्ष केला, काहींच्या बाबतीत आम्ही एकत्र आलो. त्यांनी शिवसेनेची स्थापना केली त्यावेळी हजारो लोक शिवाजीपार्कवर जमले होते. त्यावेळी मी माझ्या पक्षाचे, काँग्रेस पक्षाचे काम करत होतो. आणि त्यावेळी माझे निवासस्थानही जवळच खेरगल्ली, दादर येथे होते. त्यामुळे शिवाजीपार्क वर जाऊन लांबुनच त्यांची ती पहीली सभा मी स्वत: पाहीली व ऐकली होती. शिवसेनेचा जन्म, तीच्या पाठीमागची भुमिका, मराठी माणसाच्या हीताचा आग्रह आणि त्याबद्दल अगदि परखडपणे केलेले मार्मिकमधील लिखाण आणि जबरदस्त व्यंगचित्रकारिता यांचा परिणाम काही पानांच्या लेखांपेक्षासुध्दा अधिक सृजन माणसांवर व्हायचा याचे दर्शन बाळासाहेबांनकडून सातत्याने होत होते. त्यांच्या या प्रयत्नांतून महानगर पालिकेची सुत्र त्यांच्याकडे अनेक वर्षे आली आणि एकदा राज्याची सुत्रे त्यांच्या आणि त्यांच्या सहकार्‍यांकडे आली. सत्ता हातात आल्यानंतर त्याचा उपयोग विधायक कामांसाठी व्हावा हा दृष्टीकोन त्यांचा होता. आणि हे करत असताना सत्तेच्या स्थानांपासून बाजूला रहाण्यासंबधीची त्यांची भूमिका जी त्यांनी आयुष्यभर घेतली त्यात त्यांनी कधीही तडजोड केली नाही. आज अलिकडेपासून त्यांची प्रकृती बरि नव्हती. दोनचार महीन्यापूर्वी लिलावती हॉस्पीटल मध्ये असताना मी त्यांना भेटायला गेलो तेंव्हा पाच ते दहा मिनिटे बसायचे असे ठरवून गेलो पण जवळपास दिडतास मुक्तपणाने आम्ही गप्पा मारल्या. त्यानंतरही बर्‍याचवेळा मी त्यांना भेटायला गेलो. पण दिवसेन दिवस त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती आणि त्याची प्रचंड अस्वथता त्यांच्या मनात होती. एक झुंझार व्यक्तिमत्व, एक लढाऊ माणूस, मनाचा दिलदार, सामन्य माणूस आणि तरुणपिढी बद्दल मनात प्रचंड आस्था असलेला आणि वाघासारखी झेप टाकून लढवय्याची भुमिका घेणारा हा आयुष्याच्या अखेरच्या काळामध्ये प्रकृतीची साथ नसल्यामुळे अत्यंत अस्वथ असायचा. बाळासाहेब आज नाहीत. पण बाळासाहेबांनी राज्याला दिलेले योगदान त्याचे स्मरण, हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा हीस्सा ठरल्याशिवाय राहणार नाही याचा मला विश्वास आहे."

---शरद पवार

छान लेख आहे.
काही मुद्दे पटले नाहीत तरीही बाकीचे मुद्दे योग्यच

>>पांढरपेश्या आणि इंग्रजालेल्यांना बाळासाहेब कधीच पटले नाहीत आणि आवडले नाहीत. इतके लोक कसे आले ह्या मागचे लॉजिक दिल्लीत बसून चर्चा करणाऱ्यांना कसे काय कळायचे. त्यामुळे जळजळ होते आहे आणि मग दहशतीचे कारण पुढे करून सगळ्यालाच एक वेगळा रंग दिला जातो आहे. तसेही अमराठी लोकांना बदडले असल्याने त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना मुंबई मध्ये येऊन पोटापाण्यासाठी भीती खाली राहावे लागते हा त्यांच्यावरच अन्याय पण त्यांच्यामुळे बाकीच्यांच्यावर अन्याय होत ते दिसत नाही. मुळातच हा फरक आहे रे आणि नाही रे मधला आहे. मग काहीही करून स्वतावाराचा अन्याय तो अन्याय असा सगळा मामला आहे.>> +१००

अनेकांना रोजगार मिळाला बाळासाहेबांमुळे, त्यामुळे एखाद दिवस, तेही ते गेल्याच्या दुसर्‍या दिवशी दूध नाही मिळाले तर हरकत नाही असे वाटते.

>>तेही ते गेल्याच्या दुसर्‍या दिवशी दूध नाही मिळाले तर हरकत नाही असे वाटते.
Happy
सामाजिक परिणामांची हीच अपेक्षित सुरुवात तर नव्हे?

@बेफिकिर
>>काँग्रेस त्या नेत्यांनी स्थापिलेली नव्हती. ते काँग्रेसच्या प्रवाहात मोठे होऊन मग मेले. इंदिरा गांधींनीही आधी अस्तित्वात असलेल्या कोंग्रेसमध्ये सहभागी होऊन मग नंतर 'इं काँ' हे नाव पुढे निर्माण झाले. हा भाग वेगळा की जवाहर ते राहुल (संभाव्य नेता) हा प्रवास सर्वश्रुत आहे ज्यात एका अ-भारतीय स्त्रीलाही स्थान मिळाले आहे. (भले सक्रीय पद घेतले नसो). <<

सहमत.
काँ मध्ये नेतेपद वंशपरंपरेने दिले जावे असा अलिखित नियम तीत सामील होणार्‍या सर्वांना मान्य असतो.
सोनियाने सक्रीय होण्याचे नाकारले म्हणून नरसिंहराव पंप्र झाले.

लोकांनी बंद ठेवला तो शिवसेनाप्रमुखांच्या प्रती असलेल्या आदरानी, त्यांच्या आदेशाने नव्हे >>>>>>>>>>>>> आमच्या ईथेतरी अर्ध्या तासात वीस बाईकवर चाळिसजण फिरत होते रात्रीपर्यंत. जबरदस्तीने काहि दुकानं बंद केली गेली. बातमी जाहिर झाल्यावर एका तासात दुकाने बंद नाहि केली म्हणून दोन दुकानात तोडफोद केली. एका रीक्षावाल्याने सांगितलं अख्खी रीक्षा जाण्यापेक्षा एक-दोन दिवसाचं उत्पन्न गेलेलं चालेल. Sad काहि ठिकाणी गटागटाने लोकं उभी राहुन गरीबांना दम भरत होती. पगारदार लोकांकरीता ठीक आहे पण ज्यांच्याकरीता दिवसाचे १०० रुपये पण महत्त्वाचे आहेत ते कशाला बंद पाळतील. पण त्यांना पण जबरदस्तीने घरी बसावं लागलं.

@भान | 20 November, 2012 - 13:50 नवीन
लोकांनी बंद ठेवला तो शिवसेनाप्रमुखांच्या प्रती असलेल्या आदरानी, त्यांच्या आदेशाने नव्हे >>

खरंच आहे की हे!

>> पगारदार लोकांकरीता ठीक आहे पण ज्यांच्याकरीता दिवसाचे १०० रुपये पण महत्त्वाचे आहेत ते कशाला बंद पाळतील. पण त्यांना पण जबरदस्तीने घरी बसावं लागलं. <<

यात थोडे तथ्य आहे. आदर असला तरी हातावर पोट असलेल्यांची अशी पंचाईत होते.

त्या मुलीने लिवले होते म्हणे .. ..

"Respect is earned, not given and definitely not forced. Today Mumbai shuts down due to fear and not due to respect".

तोडफोड करणार्‍यांनी ते सिद्ध करुन दाखवले , असे म्हणावे का?

सेना नेत्यांना एक आवाहन करून अत्यावशक सेवा चालू द्यात असे आवाहन करायला हरकत नव्हती.
>>> असे आवाहन रामदास कदम आणि संजय राउत यांनी केले होते.

अनेकांना रोजगार मिळाला बाळासाहेबांमुळे, त्यामुळे एखाद दिवस, तेही ते गेल्याच्या दुसर्‍या दिवशी दूध नाही मिळाले तर हरकत नाही असे वाटते.>>>>>>>>>>>>>
अरे बाबा ,, ह्याच मुद्यावरुन माझा फेसबुक वर एका मुलाशी भरपुर वाद झाला ... त्याचे म्हण्ने..
१ ... बंद कशाला करायला हवा होता ?
२ ... फोर्सफुली तो देखिल
३... डेमोक्रसी मुद्दा
४.... व्यक्ति स्वातंत्र हिरावलए गेले त्याचे .. का तर म्हणे त्याला त्या दिवशी कुठे जायचे होते मित्रांर्बरोबर .. व बळजबरी त्याला घरात बसावे लागले ..
५.... एवढा मोठा नेता असेल तुम्च्या साठी .. ते मला तसे वाट्लेच पाहिजे असे नाहि ...
फेसबुकावर त्याने पोस्टवर पोस्ट टा़कायला चालु केले गर्दिच्या बंद च्या विरोधात ..
हे सांगायला नको ... की तो मराठी नव्ह्ता ..
का कोण जाणे पण मला काल एक गोष्ट प्रकर्षाने जाणिवली ती मह्ण्जे ...
तो ओबामा जिंकला ... अमिताभ चा वाढ्दिवस असला ... कुठल्या पॉप सिंगर चे निधन झाले ... वगैरे वगैरे .. प्रतेक जणाची चढाओढ स्टेट्स मधे मोठेपणाने लिहयला ... पण माझ्या फेस्बुक मधे काल अत्यंत थोड्या लोकांनी rip हे शब्द लिहायचे देखिल कष्ट घेतले नाही ...
माझा इतका संताप संताप होत होता ...
मला राज्कारण अजिबात कळत नाहि ...त्याचा अभ्यास देखिल नाहि .. किंवा लिहायचा अजिबात अनुभव नाहि .. पण मी माझे मुद्धे मांड्त आहे ..
आप्ल्याला महाराष्त्राचा खरोखर विकास करावयाचा असेल तर
१... प्रथ्म सर्व मराठी माणसाने एक्त्र येणे ... ( जात पात हा मुद्दा बाजुला काय विसरुन जावे)
मराठी भाषिक आहे हे महत्वाचे मग तो कुठल्याहि समाजाचा असो ..
२.. महाराष्ट्र म्हण्जे कोकण उत्तर दक्शिण मराठ्वाडा विधर्भ ... हे सर्व भाग माझे आहेत ह्यातिल सर्व मराठी लोक माझे आहेत ..

तेव्हा ह्या सर्वच भागांचा उतकर्ष म्हणजेच महाराष्ट्राचा उतकर्ष ........

मराठी अस्मिता अचूक वेळीं परिणामकारकपणे जागृत करणार्‍या एका सच्च्या मराठी नेत्याला मराठी माणसाने उत्स्फुर्तपणे व कृतज्ञतेने केलेला अखेरचा मुजरा, याव्यतिरिक्त त्या ' अलोट जनसागरा'त भविष्यातील वाटचालीच्या दिशा शोधणं खरंच अर्थपूर्ण होईल का, हा मला सतावणारा प्रश्न आहे. उद्धव व राज एकत्र यायचे असतील किंवा नसतील ,यांत या जनसागराचा असा कांही खास परिणाम असेल असं मला तरी नाही वाटत. या जनसागराच्या आत्यंतिक भावना बाळासाहेबांपुरत्याच 'व्यक्तीनिष्ठ' होत्या व प्रसंगानुरूपच होत्या; आतां, नेहमीच्या पक्षनिष्ठ भावना व विचार त्याची जागा घेऊनच पुढचं राजकारण चालेल, हा माझा अंदाज आहे.

स्थानिक पक्षाची / लिडरशीपची पोकळी भरुन काढायची संधी साधायचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करेल . बाळासाहेबांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने श्रद्धांजलीच्या जाहिराती दिल्या होत्या ,कदाचित त्या याचसाठी असतील.

या जनसागराच्या आत्यंतिक भावना बाळासाहेबांपुरत्याच 'व्यक्तीनिष्ठ' होत्या व प्रसंगानुरूपच होत्या; आतां, नेहमीच्या पक्षनिष्ठ भावना व विचार त्याची जागा घेऊनच पुढचं राजकारण चालेल, हा माझा अंदाज आहे.<<< अचूक.

सेना नेत्यांनी अंत्यविधी झाल्यावर लगेच मेडिकल दुकाने, अत्यावश्यक सेवा चालू ठेवा अशी विनंती केलेली टीव्हीवर ऐकली.

हिंदूमधे आलेला मार्कंडेय कटजूचा लेख अक्षरश: चीड आणणारा आहे. माणूस मेला त्याबरोबर वैरदेखील हे आपण मानतो. एम एफ हुस्सैन मेला तेव्हा बाळासाहेबांची प्रतिक्रिया काय होती ते आठवा. त्या हुसैनच्या चित्रांवरून वादंग माजवणारे पण हेच "गुंड लोक" होते. त्यावेळेला हुसैनच्या नावाने गळे काढून रडणार्‍ञांना आता इतकी सुसंस्कृतता नाही, की माणूस गेल्यावर लगेच त्याच्या नावाने शिव्या वाहताय? सध्या एलिट लोकांमधे मेल्यावर मग "तो किती वाईट्ट्ट्ट्ट्ट होता, भारताच्या एकतेला त्यापासून कित्त्त्त्त्ती धोका होता" हे बोलायला सुरूवात केली आहे. अरे, एवढा राग होता तर, जिवंत असताना बोलायचं होतंत. तेव्हा डरकाळ्या ऐकून घाबरत होतात, मेल्यावर कसली मर्दुमकी गाजवता.

<<अर्थात त्या मुलीच्या काकांचं होस्पिटल यामुळे का तोडावं ते कळत नाही>>> कुणाचे तरी आधीचे काही पर्सनल स्कोअर असतील ते सेटल करायला असली कारणे शोधली असतील.>>

पालघरमध्ये काही शिवसैनिकांना यासाठी अटक झाली आहे आणि एका सेनापदाधिकार्‍याच्या शोधात पोलिस आहेत.

asheechsantapjanak ndtv chee ek clip baghitalee. joparyant kuNeetaree lawyer BaLasahebanbaddal kahee baahee bolali toparyant nivedika kahee bolalee nahee paN Sanjay Narvekar BaLasahebachyaa bajune bolu lagale tar mhaNe tyanchyabaddal bolu naka! :raag: tee jee koN lawyer baya hotee tee tar 'baaL Thakare' asaa ullekh karat hotee! Atishay raag!

मला एक मूलभूत शंका आहे...
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होण्यासाठी कुठले पद भूषवलेले असावे लागते का...
कारण मी अशी चर्चा ऐकली की पोलीसांनी दिलेली २१ फैरींची सलामी, तिरंगा लपेटणे आदी फक्त मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा सेवादलातील व्यक्तींनाच दिले जातात...
बाळासाहेबांच्या बाबतीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला नाही एवढेच, बाकी सगळे शासकीय इतमामातच होते...
कुणी याबाबत माहीती देऊ शकेल काय

Pages