मराठी मनाचे अघोषित सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
===================================================
बाळासाहेबांच्या दु:खद निधनाआधी दोन दिवस त्यांची प्रकृती खालावली होती तेव्हा मातोश्रीच्या परिसरात गर्दी जमू लागली होती. त्यानंतरचा दिवस काहीसा दिलाश्याचा जात आहे तोवरच पुढच्या दिवशी त्यांचे निधन झाल्याचे जाहीर झाले. या बातमीनंतर मातोश्री, शिवसेना भवन व जेथे अंत्यविधी होणार असे जाहीर झाले त्या शिवाजी पार्ककडे विक्रमी संख्येने गर्दी जमू लागली.
या गर्दीकडे लक्ष वेधून या गर्दीचा पुढील स्थानिक राजकारणावर पडू शकणारा प्रभाव तसेच या गर्दीने पडू शकणारा पायंडा याबाबत काही मनात आले ते लिहायचा हा एक प्रयत्न आहे. आपल्या सर्वांच्या मतांचे स्वागत आहेच.
=========================
बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवाजी पार्क येथे काल जमलेल्या विराट व न भूतो गर्दीच्या सख्येबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र काही बातम्यांनुसार हा आकडा दहा लाख, पंधरा लाख व एकोणीस लाख यापैकी किंवा याच्या आसपासचा असावा असे दिसते.
कोणत्याही राजकारणाशी संबंधीत नेत्याच्या अंत्यदर्शनाला यापूर्वी एवढी गर्दी जमलेली नाही असेही सांगण्यात आले. (हेही शक्य आहे की कै. इंदिरा गांधी वा कै. राजीव गांधी हे राष्ट्रीय पातळीवरील नेते असल्याने त्यांच्या निधनानंतर जनमानसावर पडलेला प्रभाव व अंत्यदर्शनाची इच्छा ही विखुरली गेल्याने जाणवली नाही. पण तरीही) बाळासाहेबांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी उच्चांकी व अभूतपूर्व गर्दी जमली हे नाकारता येणार नाही. ही गर्दी शांत होती, शिवसेनेच्या एरवीच्या आक्रमक भूमिकेशी फारकत घेऊन जबाबदारीने वागणारी ही गर्दी दु:खाच्या सावटात आकंठ भिजलेली होती. या गर्दीला कोठेही स्वतःच्या शक्तीचे प्रदर्शन करायची इच्छा अर्थातच नव्हती. बंदुकांचे बार ऐकले आणि पेटत्या ज्वाळा दिसल्या की साश्रू चेहरा घेऊन खालमानेने निघून जायचे इतकाच या गर्दीचा हेतू होता.
ही गर्दी जमवलेली नव्हती. गर्दी जमावी यासाठी हाक देण्यात आलेली नव्हती. पण एवढी गर्दी जमेल असा अंदाज मात्र होता. त्या दृष्टीनेच यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आल्या होत्या.
ही गर्दी जमण्यामागची काही संभाव्य कारणे:
१. बाळासाहेबांमध्ये 'हा आपला नेता आहे, खास आपल्यासाठी आहे' असे वाटायला लावणारे काहीतरी रसायन होते.
२. बाळासाहेब हे प्रत्यक्षात सहज भेटतील असे मुळीच नसले तरीसुद्धा इतर कोणत्याही नेत्यापेक्षा 'बाळासाहेबांपर्यंत आपण आपले गार्हाणे सहज समक्ष घेऊन जाऊ शकतो' अशी धारणा निर्माण होण्याइतपत जादूई करिष्मा बाळासाहेबांमध्ये होता. यामुळे ते 'साक्षात जवळचे' नेते ठरत होते.
३. बाळासाहेबांचे राजकारण गुप्तपणे जातीवर आधारलेले असे नव्हते, जसे अनेक नेत्यांचे असते अशी धारणा समाजात आहे. उदाहरणार्थ, ब्राह्मणांसाठी भाजप व इतरांसाठी काँग्रेस असे काहीसे!
४. सक्रीय पद न भूषवल्यामुळे त्यांचे 'प्रेरणास्थान' हे 'अलिखित' राजकीय स्थान अबाधीत राहिलेले होते.
५. मार्मिकता, सडेतोड मुद्दे, खर्याला खरे म्हणण्याचा स्वभाव आणि प्रसंगी जहरी ठाकरी भाषेत एखाद्याचा जाहीर पाणउतारा करण्यातील 'त्या काळात' जाणवलेले नावीन्य यामुळे ते 'आम' माणसाला अधिक आपले वाटत.
६. समाज ढवळून काढणारे वक्तृत्व!
७. प्रत्यक्ष सामाजिक व राजकीय कार्य!
८. विविध क्षेत्रात असलेले घनिष्ट संबंध! (घनिष्ट हा शब्द बदनाम झालेला आहे, येथे तो सुयोग्य अर्थाने अभिप्रेत).
९. कितीही साथीदार फुटले तरी न वाकणारे व्यक्तीमत्व!
१०. राज ठाकरे बाहेर पडणे आणि मनसेने निवडणुकीत मुसंडी मारून शिवसेनेसकट सर्वांनाच अवाक करणे या घटनांनंतर बाळासाहेबांच्या बाबतीत खास असे काहीच घडलेले नसणे व त्यामुळे आलेली एक टाईम गॅप आणि तीनंतर एकदम त्यांचे अत्यवस्थ होणे! या गॅपमुळे मराठी माणसाला व इतरांनाही 'मध्यंतरी' काही टचच राहिलेला नव्हता अशी भावना निर्माण झाल्यामुळे काहीसे उचंबळून येणे! (अशीच एक टाईम गॅप राजेश खन्नांच्या बाबतीतही परिणामकारक ठरली होती असे वाटते).
११. हेड क्वॉर्टर्स मुंबईत असणे!
१२. शिवसेनेची जनमानसांत रुजण्याची प्रक्रिया इतर पक्षांच्या प्रक्रियेपेक्षा अधिक जलद व परिणामकारक ठरलेली असणे!
१३. मनसेच्या निर्मीतीनंतर शिवसैनिक समाजात 'उद्धव एकटे पडले' अशी एक भावना काही प्रमाणात निर्माण होणे.
१४. बाळासाहेबांसाठी आणि उद्धवसाठी राज ठाकरेंनी राजकीय वाद बाजूला ठेवून सहाय्यभूत ठरणे व हे शिवसैनिक व मनसे - सैनिक तसेच इतर सर्वांनी जवळून पाहणे! भारतातील व्यक्तीपूजक समाजमनावर या गोष्टीचा परिणाम होणे!
१५. खणखणीत आवाज बंद पडणे आणि नेहमीचा एखादा राजकीय नेता हरपणे या दोहोतील फरक! खणखणीत आवाज बंद पडल्यामुळे वाईट वाटणे हे पुन्हा आपल्या मातीतील माणसाच्या बाबतीत प्रकर्षाने होणे!
१६. लोकसंख्याच मुळात वाढलेली असणे व त्यामुळे आजवर झाली नाही अशी गर्दी जमणे!
१७. माध्यमांनी सेकंदासेकंदाचे दर्शन घडवल्यामुळे पाय आपोआप शिवाजीपार्ककडे वळणे! केव्हातरी आपणही शिवसैनिक होतो असेही वाटणारे त्यात सामील होणे!
या व अश्या अनेक कारणांनी ही गर्दी अचानक जमली. केवळ काही तासात एकाच भागात पंधरा ते वीस लाख जमा होणे व शांततापूर्वक वावरून काही काळाने निघून जाणे हा अचाट प्रकार या कारणांमुळे घडून आला.
==============================
या गर्दीचे झालेले व संभाव्य परिणामः
१. शिवसेनेचे राजकीय विरोधक / स्पर्धक यांचे चेहरे अवाक झालेले दिसत होते. हे असे काही होईल, इतक्या मोठ्या प्रमाणावर होईल याची कल्पनाच आलेली नव्हती. पंतप्रधानांनी भोजन समारंभ रद्द केला. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. येथपर्यंत ठीक, पण 'अलोट जनसागर' असे ज्याला सुयोग्यपणे संबोधले गेले त्या संख्येने, परिमाणाने जनता रस्त्यावर येईल हे अनेकांच्या ध्यानीमनीही नव्हते. प्रतिभाताईंनी तर 'ही गर्दी पाहून मला काय वाटले' तेच थेट सांगितले. ही गर्दी अपेक्षित असेलही, पण प्रत्यक्षदर्शींसाठी व खासकरून विरोधकांसाठी ती जवळपास 'भयकारक शक्तीप्रदर्शन' ठरली. हे शक्तीप्रदर्शन मुळीच हेतूपुरस्पर केलेले नव्हते. उत्स्फुर्तपणे व प्रेमाने लोकांनी आपापले व्यवहार बंद केले होते. दुकानांना बंद होण्याची दहशत नव्हती. इच्छा होती. विरोधकांच्या या अवाक होण्यामुळे 'मनसे बाजूला ठेवून निव्वळ शिवसेना' हा पुढील निवडणुकीत एक अनबीटेबल फॅक्टर ठरू शकेल इतपत परिस्थिती निर्माण झालेली आहे.
२. राज ठाकरे व त्यांच्या मनसेतील कार्यकर्त्यांच्या मनावर ताण आलेला असणार हे उघड आहे. यामागे राज यांनी 'माझ्या व्यक्तीमत्वात व यशात बाळासाहेबांचेच सर्वाधिक योगदान आहे' हे कबूल करणे आहे. अंत्ययात्रेपासून दोन तास बाजूला राहणे किंवा मागे मागे राहणे यातील (मी तसा वेगळा आहे) राजकारण 'नापास' झालेले स्पष्ट दिसले. हे राज यांचे अपयश मुळीच नाही. पण जनमानसावरील पकड या घटकाबाबत शिवसेना आणि मनसे यांच्यातील मोठी तफावत स्पष्ट होणे नक्कीच आहे.
३. अडवानी, शरद पवार व मुख्यमंत्री हे तिघे अंत्यदर्शनासाठी आलेले दिसत असताना आणखी एक बाब आढळली म्हणजे त्यांच्यासाठी कोणी खासकरून पुढे झाले नाही. सामान्य व्हिजिटर्सप्रमाणेच हे तिघे उद्धव व राज यांना अनुक्रमे भेटून पुढे गेले. असल्या सूक्ष्म बाबींचा प्रत्यक्षदर्शी व टीव्ही प्रेक्षक असलेल्या सामान्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो. मुंबई खरोखरच इतर कोणाच्याही बापाची नाही हे अगदी कोरले गेले. येथे निवडणुकीसाठी यायचे असेल तर आमच्या परवानगीने यावे लागेल असे काहीसे झाल्याचे वाटून गेले.
४. काही काळ, म्हणजे दोन तीन वर्षे मनसे व शिवसेना यांच्यात मनसेकडून होणारा राजकीय विरोध सौम्य होण्याची शक्यता आहे. कदाचित 'बाहेरून युती'सारखे काही होण्याचीही शक्यता आहे. याहीमागे जनमताचा रेटा असू शकेल. काही माणसे इकडची तिकडे झाल्यासही नवल नाही.
५. दुर्दैवाने असे आणखी एखाद्या नेत्याचे निधन झाले तर यापुढे कदाचित अश्या प्रकारचे शक्तीप्रदर्शन हेतूपुरस्परही करण्यात येईल. (देव करो व कोणाचे निधन न होवो, अर्थातच).
६. जे शेकडो सभांनाही दिसले नाही ते अंत्यदर्शनाला दिसले. अजिबात मनात नसतानाही परिस्थिती एन्कॅश झाल्यासारखे झाले. असा पायंडा पडण्याची शक्यता आहे.
७. माध्यमांना जवळपास छत्तीस तास इतर कोणतेही काम नव्हते. देशाची आर्थिक राजधानी, एखादे अजस्त्र उर्जाजनित्र बंद पडत जावे तशी अत्यल्प काळात बंद पडत गेली. पाठोपाठ पुण्यात शांतता पसरली. भारतीय राजकारणाने याची नोंद (अख्खी मुंबईच सडनली बंद पडण्याची) नक्कीच घेतली. शिवसेनेला यापुढे मनातल्या मनात दहा गुण जास्त देऊनच राजकीय खेळी खेळल्या जातील याची शक्यता आहे.
८. ढाण्या वाघच हरपल्यामुळे उद्धव ठाकरे यांना जनमानसातून आधाररुपी पाठिंबा मिळेल हे तर उघडच आहे. (हे पुन्हा भावनिक समाजाचे लक्षण, ते योग्य की अयोग्य हा भाग वेगळा आहे).
९. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे मृत्यूपश्चात बाळासाहेबांची प्रतिमा अधिकच उजळली आहे. त्यांच्या स्मृतींना मनात अग्रणी ठेवून शिवसैनिक काम करतील हेही जवळपास उघड आहे.
=================================
मला ही गर्दी एक विलक्षण संदेश वाटला. नकळतपणे व आपोआप दिला गेलेला. सामान्यांनी दिलेला. जो दिला जावा असे अजिबात आवाहन करण्यात आलेले नव्हते.
केवळ 'खूप गर्दी जमली होती' किंवा 'काय गर्दी का काय' असे म्हणून विसरून जाण्यासारखी ही गर्दी नव्हती हे नक्की. या गर्दीचे राजकीय व सामाजिक परिणाम होण्याची शक्यता आहे. आपल्याला काय वाटते?
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
सत्य साईबाबांचे पण स्टेट
सत्य साईबाबांचे पण स्टेट फ्युनरल झाले होते त्यामुळे पद वगैरेची गरज नसावी
http://www.reuters.com/article/2011/04/27/us-india-guru-idUSTRE73Q1FZ201...
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होण्यासाठी कुठले पद भूषवलेले असावे लागते का...
>>कधीकधी लोकांच्या भावना पण लक्षात घेतल्या जात असतात. पद भूषवणार्यांना तर शासकीय इतमाम बाय डीफॉल्ट मिळतातच. सीमेवर शहीद होणार्यांनादेखील शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केला जातो.
सीमेवर शहीद होणार्यांनादेखील
सीमेवर शहीद होणार्यांनादेखील शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केला जातो.
त्याची शान अजुन जास्त असते.
पार्थिवावर पांघरलेला राष्ट्रध्वज लगेचच नातलगांना सुपुर्त केला जातो.
>> नंदिनी.. तो लष्करी इतमाम असतो.
आशुचँप >> राज्यसरकार (म्हणजे
आशुचँप >> राज्यसरकार (म्हणजे मुख्यमंत्री किंवा/आणि गृहमंत्री बहूतेक) व्यक्तीच्या एकंदर योगदानानुसार अश्या ईतमामाचा निर्णय घेऊ शकतात असे वाचले.
मदर तेरेसा आणि सत्यसाईबाबांचे अंत्यसंस्कारही शासकीय ईतमामातच झाले.
जॉर्ज फर्नांडिसही खूप आजारी आहेत असे ऐकले.
कुणाकडे त्यांची काही बातमी आहे का?
राज्यसरकार (म्हणजे
राज्यसरकार (म्हणजे मुख्यमंत्री किंवा/आणि गृहमंत्री बहूतेक) व्यक्तीच्या एकंदर योगदानानुसार अश्या ईतमामाचा निर्णय घेऊ शकतात असे वाचले.
मदर तेरेसा आणि सत्यसाईबाबांचे अंत्यसंस्कारही शासकीय ईतमामातच झाले.
अच्छा हे माहीती नव्हते....धन्यवाद
पार्थिवावर पांघरलेला
पार्थिवावर पांघरलेला राष्ट्रध्वज लगेचच नातलगांना सुपुर्त केला जातो.
<<
<<
परवाही बाळासाहेबांवर पांघरलेला राष्ट्रध्वज पोलीसांच्या सलामी नंतर लगेचच, उध्दव ठाकरेंकडे सुपुर्त करण्यात आला.
आता फेसबुक वर लिहिणार्या
आता फेसबुक वर लिहिणार्या मुलीना अटक करणार्या पोलिसाना निलंबित केलं म्हणे.
जसे की ते पोलिस स्वतःच्या मनाने गेले होते अटक करायला.
जामोप्या त्यांनी 'असे हजारो ठाकरे दररोज जन्मतात आणि दररोज मरतात त्यांच्यासाठी शहर बंद कशाला ?'
असे विचारले होते. त्या ' हजारो ठाकरे' शब्दात उर्मटपणा होता म्हणूनच लोकानी रान उठवले.
मुंबई तीन दिवस ऑलमोस्ट बंद होती. आजारी लोकांचे , लहान मुलाम्चे , प्रेग्नंट बायकांचे नक्की हाल झालेच असतील.
इथे माबोवरही वेगवेगळ्या धावत्या बाफवर 'बंद इतके दिवस नको' अशा चर्चा होत्याच की. पण आपण बाळासाहेबाम्बद्दल मनात आदर ठेऊन लिहित होतो.
त्यादिवशी समोर बाळासाहेबांची प्रेतयात्रा आणि टिव्हीवर मुलाखत देणारे त्यांच्यावर टिका करतायत असे विचित्र दृष्य दिसत होते. खासकरून सकाळचे संपादक एक चकार चांगला काढायला तयार नव्हते.
आता तर शिवाजी पार्कवरच्या नियोजित स्मारकावरुन तू तू मै मै चालु झालीय.
असो.
असे जे लिहितात ते मुद्दामच
असे जे लिहितात ते मुद्दामच दुसर्याला भडकवण्यासाठी लिहितात. इथे मायबोली वर काही कमी लोक नाहीयेत मुद्दाम कुचकट कारण नसताना हेटालाणीच्या भाषेत लिहितात वर असेकाही दाखवायचे की त्यात काय आहे. ज्यांना तसे बोलता येत नाही ते गुद्द्यांवर येतात आणि अजून वाईट ठरतात. ज्यांना हे बरोबर जमते ते सद्न्कडा तसेच करतात आणि सामान्य माणूस उत्तर देऊ शकता ना आल्याने शेवटी ठोकून काढतो. शेवटी ठाकरे जवळचे वाटायचे कारण तेच होते ना. ज्यांना बोलता येत नव्हते त्यांचे मन त्यांनी बरोबर ओळखले होते आणि त्यांच्या बरोबर आहेत हे त्यांना माहिती होते म्हणूनच तर बाळासाहेबांच्या एका हाकेला पेटून उठत होते. मग त्याने कायदा कसा आपल्या हातात घेतला म्हणून रोज टीव्ही वर बोंब मारायला हुशार आणि सज्जन मंडळी मोकळी. आता तर म्हणजे माकडांच्या हातात कोलीतच दिले आहे. त्यातुने एक मुस्लीम म्हणजे आता तर विचारायलाच नको.
'असे हजारो ठाकरे दररोज
'असे हजारो ठाकरे दररोज जन्मतात आणि दररोज मरतात त्यांच्यासाठी शहर बंद कशाला ?'
त्या वाक्यात तिला अटक करावी असे काय आहे? तेहिंदु हृदय सम्राट होते. हिंदु त्याना मान देत होते. शिवाय ते एका राजकीय पक्षाचे सर्वेसर्वा होते. दुसर्या धर्माच्या, दुसर्या पक्षाबद्दल आस्था असणार्या व्यक्तींना बंद नकोसा वाटला, आणि त्यानी लिहिले तर त्याना लगेच अटक करायची का? राजकीय लोकांवर कुणीही कधीही काहीही लिहितच असतो ना? http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17296545.cms
गंमत म्हणजे इथले लोक बाबासाहेबांच्या चित्राबाबत मात्र अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गुळणी घेऊन गप्प बसले होते. आता याच लोकाना त्या पोरीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य नाही.
तिच्या वाक्यात हजारो वगैरे काही शब्द नव्हता.. People like Thackeray are born and die daily and one should not observe a bandh for that. Respect is earned, not given and definitely not forced. Today Mumbai shuts down due to fear and not due to respect.”
http://abpmajha.newsbullet.in/maharashtra/thane-kaokon/22471-2012-11-20-...
छानच सर्वांगीण विचार करणारा
छानच सर्वांगीण विचार करणारा लेख अन विविधांगी प्रतिक्रियाही.
अकारण महाराष्ट्रद्वेष इतक्या वेळा अन इतक्या प्रकाराने मुंबईत तरी अनुभवास येतो.. त्याची ही प्रतिक्रिया. बाळासाहेबांना मराठीजनांनी दिलेली अफाट अचाट मानवंदना यातूनच आली कारण त्यांनी या सततच्या मानहानीतून मराठी समाजाला बाहेर काढले .
पण यातूनच प्रसंगांना चुकीचे वळण लागते,अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर टाच येते... हे विवेकपूर्वक टाळले पाहिजे कारण त्यातून चुकीचा संदेश जातो. नेतृत्वाचा कस इथेच लागतो.
एक अतीशय उत्तम लेख.
एक अतीशय उत्तम लेख. दुर्दैवाने पाकिस्तानी वृत्तपत्रात आला आहे पण असा लेख एकाही भारतीय वृत्तपत्रात असू नये हे काही चांगले लक्षण नाही. थोडक्यात असे बाळ ठाकरे पुन्हा पुन्हा होत राहतील.
http://dailytimes.com.pk/default.asp?page=2012\11\20\story_20-11-2012_pg3_2
एक्झेक्टली जामोप्या. यात
एक्झेक्टली जामोप्या.
यात भावना दुखावू शकतात. आणि शिवसैनिक हल्लागुल्लापण करू शकतात. पण धार्मिक भावना दुखावल्या म्हणून अटक करण्याची दुर्बुद्धी पोलिसाना व्हावी असं काय आहे?
साती >> भावना दुखावल्या
साती >> भावना दुखावल्या म्हणून नाही तर शांतता धोक्यात येईल असं विधान केल्याबद्दल पोलिसांनी प्रीकॉशन म्हणून अटक केली असं कळालं.
अटक केली नाही तर प्रकरण अजून चिघळेल आणि प्रतिसाद ईतरत्र ऊमटतील अशी शंका त्यांना वाटली असावी.
प्रसंग तेवढ्याच अटक-सुटकेवर संपला असावा अशी आशा.
चूक बरोबरचे संदर्भ भावनिक प्रसंगी लावता येतीलच असे नाही.
एक्झेक्टली जामोप्या.
एक्झेक्टली जामोप्या.

हा पुकारलेला बंद पूर्णपणे
हा पुकारलेला बंद पूर्णपणे भयाने होता... प्रेमाने नाही.... आमच्या गावीही गुंडांनीच बाजारपेठ बंद करायला लावली... Police थंड बघत होते..
चुकून "ळ" चा "ब" झाला असावा
चुकून "ळ" चा "ब" झाला असावा लिखाणात..
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17301921.cms
बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेची
बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेची स्थापना ही मुळात मराठी विरूद्ध मद्रासी वादातून झाली. पहिल्या दसरा-सभेत मद्रास्यांच्या होटेलांवर, दुकानांवर अन घरांवर हेल्ले चढविण्यात आले. त्या नंतर मराठी विरुद्ध कानडी असाही लढा काही दिवस लढला गेला. मग अचानक त्याना हिंदुत्वाची जाण झाली अन मराठी+कानडी+मद्रासी एकत्र येऊन मुसलमानांवर कसे तुटून पडलतील ही चाल बाळासाहेबानी खेळली. त्या नंतर कालचा शत्रुस्थानी असणारा मद्रासी अचानक हिंदूच्या रुपात याच मराठी लोकाना भाऊ बंद वाटू लागला.
१९८० च्या दरम्यान शिखांच्या व्यापा-यावर बंदी आणत बाळ ठाकरेनी परत एकदा वाद उभा केला. आणी-बाणीच्या वेळी मात्र इंदिराजीना सपोर्ट दिल्यामुळी हाच मुंबईकर बाळासाहेबांच्या मुळावर उठला होता हे ही तेवढेच खरे.
थोडक्यात बाळासाहेबांचा लढा नेमका कशासाठी होता हे तपासल्यास तो मराठी माणसासाठी नक्कीच नव्हता तर होत होता सत्तेसाठी हेच सिद्ध होते.
१९९५ ला सेना-भाजपा सत्तेत येण्याचं प्रमुख कारण होतं ते म्हणजे पवारांच्या विरोधातील स्टार प्रचारक गो.रा. खैरनार यांचा धडाका.
एकंदरीत सेनेचा प्रवास पाहिल्यास सेना ही मुंबईच्या बाहेर कधी फार प्रभावी नव्हती. तसं लोकसभा-विधानसभा निवडणूकीत मुंबईतही सेनेचा म्हणावा तसा प्रभाव कधी दिसला नाही.
बाळासाहेबांच्या भाषणाला लोटणारी अलोट गर्दी मतदानात कधीच रुपांतरीत झाली नाही. त्यांचं भाषण चवीने ऐकणारे त्याना सत्तास्थानी पाहताना एक असमर्थ व बायस व्यक्तीमत्व म्हणूनच पाहत, त्यामुळे मागच्या ४०-४५ वर्षात एक अपवाद सोडता सेनेला कधीच सत्ता मिळाली नाहे व या पुढेही ती मिळणे अशक्यप्राय वाटते.
पण त्याच्या अगदी उलटं चित्र आसपासच्या राजकारण्यांचं आहे.
१) ममता बॅनर्जी:- बाळेसाहेबांच्या तुलनेत सुमार गर्दी खेचणारी ममता मात्र कम्युनिस्टांचा बालेकिल्लाच गारद करत थेट बहूमत घेत मुख्यमंत्री बनते.
२) मायावती: उत्तर प्रदेश सारख्या ठाकूर व जमिनदारांच्या भूमीत सत्ता खेचून आणण्याची किमया करून दाखविली पण ठाकरे मात्र सत्तेच्या मोजपटटीन मोजल्यास ईथेही कमी पडतात.
३) मोदीनी गुजरातची सत्ता एकहाथी सांभाळली, जेंव्हाकी वक्ता म्हणून तेही ठाकरेच्या तोडीचे नाहीच.
४) नितिश कुमारांचही असच आहे.
५) जयललीता, मुलायमसिंग ते अनेक नेते आहेत जे वक्ता म्हणून बाळासाहेबांच्या पासंगालाही पुरत नाहीत पण सत्ता मिळविण्यात मात्र आघाडीवर राहिले.
परत मुळ प्रश्नावर येतो तो म्हणजे बाळासाहेबांचे ते प्रभावी अन गर्दी खेचू भाषण सत्ता मिळविण्यात नेहमीच अपयशी का ठरलं?
त्याची दोन कारणं आहेत.
१) बाळासाहेबांवर लोकानी कधीच विश्वास टाकला नाही कारण सुरुवातीपासूनची त्यांची कोलांटउड्या मारण्याची व पेटवा पेटवी (ज्याला केतकर राडा म्हणायचे) करण्याचे वृत्ती मराठी माणसाला कधी भावलीच नाही.
२) शरद पवार नावाचं एक बलाढ्य, धोरणी व संयमी नेतृत्व त्याचं काळात महाराष्ट्राला लाभलं हे या मातीच भाग्य होतं. अन्यथा सत्ता सेनेकडे गेलीच असती.
बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेची
बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेची स्थापना ही मुळात मराठी विरूद्ध मद्रासी वादातून झाली.
<<
<<
अरेरे कीती हा अज्ञानीपणा.
बाकी चालूदे.
( नो कमेंट) --- ( लालशाहला
( नो कमेंट)
--- ( लालशाहला लाइक केले तर माझ्यावर हल्ला होईल का, या संभ्रमात पडलेला आंबा.)
उत्स्फुर्तपणे व प्रेमाने
उत्स्फुर्तपणे व प्रेमाने लोकांनी आपापले व्यवहार बंद केले होते. दुकानांना बंद होण्याची दहशत नव्हती. >>
बेफिकीर साहेब,
ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया नव्हती. त्या मागे होता मागीत ४० वर्षाचा गाढा अनुभव, व्यवहारिक शहाणपणा व भीती. अनुभव राड्याचा, अनुभव दगड फेकीचा अन अनुभव तोडफोडीचा. शहाणपणा म्हटलात तर दुकानाचं नासधुस करून गेण्यापेक्षा दोन दिवस दुकान बंद ठेवणे हा शहाणपणा होता. व्यवहाराचं म्हणाल तर दुकानवाले व्यापारी आहेत त्याना या बंदमधून फायदाचा झाला(चालू ठेवल्यास होणा-या नुकसानीच्या बदल्यात) अन भीतीच मात्र बोलायची गरज नाही...
सर्वांच्या मतांचा आदर आहे.
सर्वांच्या मतांचा आदर आहे.
http://epaper.pudhari.com/det
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=321196&boxid=15214511&pgno=2&u...
माझ्या मतेही
माझ्या मतेही अंत्य-संस्कारासाठी झालेली अलोट गर्दी हे बाळासाहेबांवरील सामान्य माणसाच्या प्रेमापोटी होती.
पण सर्व शहरांमधे पाळला गेलेला बंद हा काही प्रमाणात उत्स्फूर्ततेने असला तरी बहुतांशी शिवसेनेच्या दहशतीमुळे व संभाव्य आपत्तीला टाळण्यासाठी होता.
अफाट लोकप्रीयता असलेल्या एखाद्या श्रेष्ठ नेत्याच्या बाबतीत त्यांच्या अनुयायांकडून अशा प्रकारचे ‘excesses’ ( प्रतीशब्द?) घडू शकतात.
दक्षिणेतले नेते गेल्यावर
दक्षिणेतले नेते गेल्यावर त्यांचे चाहते स्वतःला जाळून घेतात.
मला त्या मुलींना अटक करायची
मला त्या मुलींना अटक करायची गरज अजीबात नव्हती असेच वाटते. वरती आंबा ने लिहीलेलेच जर त्या मुलींनी लिहिले असेल तर अटक करण्यासारखे काहीच नाहीये त्यात. फारतर पोलिसांनी चौकशी करून, समाजावून त्यांना सोडून देणे गरजेचे होते.
मनरी +१
शिवसेनेची आणि खरेतर बहुतेक सर्वच राजकीय पक्षांची दहशत सर्व सामान्य लोकांना माहिती आहेच. त्यामुळे बंद केवळ उस्फुर्त होता असे वाटत नाही.
लाल बदशहांचे शेवटचे मुदा क्र
लाल बदशहांचे शेवटचे मुदा क्र २ सोडून सगळे पोस्ट लाईक करत आहे. तरिही मराठी नेता म्हणून बाळासाहेबांविषयी प्रेम आहेच. कुठल्याही मुद्द्यावर का होईना आणि त्यांच्या कुठल्याही आकांक्षेपायी का होईना मराठी माणसास मुंबईत शिवसेनेचा आधार होता.
सत्ता मिळल्यान्तरच्या काळात त्यांनी जर राजचे ग्रूमिंग करून त्याला उत्तराधिकारी घोषित केले असते आणि धुर्तपणे पुढिल राजकारण खेळले असते तर मी शिवसेनेलाच शेवटपर्यंत मत दिले असते.
(आता इथे हा पक्षच नाही पण मी महाराष्ट्रात असते तर नक्कीच)
शरद पवार समर्थ नेता नाहीत हे त्यांनीच वेळोवेळी दाखवून दिले आहे. शेतकर्यांसाठी तर कुर्हाडिचा दांडा प्रकार आहेत.
साती प्रतिसादास पूर्णतः
साती प्रतिसादास पूर्णतः अनुमोदन.
अलोट जनसागर - पुढे? मराठी
अलोट जनसागर - पुढे?
मराठी मनाचे अघोषित सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
.............सोनियाजींनी यावयास हवे होते. जनमानसावर फार मोठा परिणाम झाला असता. (आपल्या मित्रांचा विचार न करता बाळासाहेबांनी महामहिम राष्ट्रपतींना बिनशर्त पाठिंबा दिलेला होता. तसेच केवळ मराठीच्या अस्मितेपोटी पूर्व राष्ट्रपतींनाही आपला पाठिंबा दिलेला होता. असे धाडसी निर्णय केवळ बाळासाहेबच घेऊ जाणे.) असो!
..............आता बाळासाहेबांच्या अखेरच्या इच्छेनुसार राज-उद्धव यांनी एक व्हावे असे वाटते. किमान आगामी विधानसभेसाठी एक प्रयोग करून पाहावा. उद्धवजींनी सेनाप्रमुखपदी राहावे व राजने मुख्यमंत्री व्हावे. जर सुदैवाने असे घडले तर पाच वर्षात महाराष्ट्राचा असा बेंचमार्क विकास घडावा की, पुढेमागे कोणतेही सरकार आले तर त्यांनी त्या पावलावर पाऊल ठेवून चालले पाहिजे. जर असे घडले तर ती स्व. बाळासाहेबांना खऱ्या अर्थाने परिपूर्ण श्रद्धांजली ठरेल. (आणि हेच उपरोक्त प्रश्नाचे उत्तर ठरावे.)
आता बाळासाहेबांच्या अखेरच्या
आता बाळासाहेबांच्या अखेरच्या इच्छेनुसार राज-उद्धव यांनी एक व्हावे असे वाटते. किमान आगामी विधानसभेसाठी एक प्रयोग करून पाहावा. उद्धवजींनी सेनाप्रमुखपदी राहावे व राजने मुख्यमंत्री व्हावे. जर सुदैवाने असे घडले तर पाच वर्षात महाराष्ट्राचा असा बेंचमार्क विकास घडावा की, पुढेमागे कोणतेही सरकार आले तर त्यांनी त्या पावलावर पाऊल ठेवून चालले पाहिजे. जर असे घडले तर ती स्व. बाळासाहेबांना खऱ्या अर्थाने परिपूर्ण श्रद्धांजली ठरेल. (आणि हेच उपरोक्त प्रश्नाचे उत्तर ठरावे.)
सहमत!
चुकून बहुमत मिळालं नाही तर राजना विरोधी पक्षनेतेपद मिळेल.
मग उद्धव काय करतील?
Pages