मराठी मनाचे अघोषित सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
===================================================
बाळासाहेबांच्या दु:खद निधनाआधी दोन दिवस त्यांची प्रकृती खालावली होती तेव्हा मातोश्रीच्या परिसरात गर्दी जमू लागली होती. त्यानंतरचा दिवस काहीसा दिलाश्याचा जात आहे तोवरच पुढच्या दिवशी त्यांचे निधन झाल्याचे जाहीर झाले. या बातमीनंतर मातोश्री, शिवसेना भवन व जेथे अंत्यविधी होणार असे जाहीर झाले त्या शिवाजी पार्ककडे विक्रमी संख्येने गर्दी जमू लागली.
या गर्दीकडे लक्ष वेधून या गर्दीचा पुढील स्थानिक राजकारणावर पडू शकणारा प्रभाव तसेच या गर्दीने पडू शकणारा पायंडा याबाबत काही मनात आले ते लिहायचा हा एक प्रयत्न आहे. आपल्या सर्वांच्या मतांचे स्वागत आहेच.
=========================
बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवाजी पार्क येथे काल जमलेल्या विराट व न भूतो गर्दीच्या सख्येबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र काही बातम्यांनुसार हा आकडा दहा लाख, पंधरा लाख व एकोणीस लाख यापैकी किंवा याच्या आसपासचा असावा असे दिसते.
कोणत्याही राजकारणाशी संबंधीत नेत्याच्या अंत्यदर्शनाला यापूर्वी एवढी गर्दी जमलेली नाही असेही सांगण्यात आले. (हेही शक्य आहे की कै. इंदिरा गांधी वा कै. राजीव गांधी हे राष्ट्रीय पातळीवरील नेते असल्याने त्यांच्या निधनानंतर जनमानसावर पडलेला प्रभाव व अंत्यदर्शनाची इच्छा ही विखुरली गेल्याने जाणवली नाही. पण तरीही) बाळासाहेबांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी उच्चांकी व अभूतपूर्व गर्दी जमली हे नाकारता येणार नाही. ही गर्दी शांत होती, शिवसेनेच्या एरवीच्या आक्रमक भूमिकेशी फारकत घेऊन जबाबदारीने वागणारी ही गर्दी दु:खाच्या सावटात आकंठ भिजलेली होती. या गर्दीला कोठेही स्वतःच्या शक्तीचे प्रदर्शन करायची इच्छा अर्थातच नव्हती. बंदुकांचे बार ऐकले आणि पेटत्या ज्वाळा दिसल्या की साश्रू चेहरा घेऊन खालमानेने निघून जायचे इतकाच या गर्दीचा हेतू होता.
ही गर्दी जमवलेली नव्हती. गर्दी जमावी यासाठी हाक देण्यात आलेली नव्हती. पण एवढी गर्दी जमेल असा अंदाज मात्र होता. त्या दृष्टीनेच यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आल्या होत्या.
ही गर्दी जमण्यामागची काही संभाव्य कारणे:
१. बाळासाहेबांमध्ये 'हा आपला नेता आहे, खास आपल्यासाठी आहे' असे वाटायला लावणारे काहीतरी रसायन होते.
२. बाळासाहेब हे प्रत्यक्षात सहज भेटतील असे मुळीच नसले तरीसुद्धा इतर कोणत्याही नेत्यापेक्षा 'बाळासाहेबांपर्यंत आपण आपले गार्हाणे सहज समक्ष घेऊन जाऊ शकतो' अशी धारणा निर्माण होण्याइतपत जादूई करिष्मा बाळासाहेबांमध्ये होता. यामुळे ते 'साक्षात जवळचे' नेते ठरत होते.
३. बाळासाहेबांचे राजकारण गुप्तपणे जातीवर आधारलेले असे नव्हते, जसे अनेक नेत्यांचे असते अशी धारणा समाजात आहे. उदाहरणार्थ, ब्राह्मणांसाठी भाजप व इतरांसाठी काँग्रेस असे काहीसे!
४. सक्रीय पद न भूषवल्यामुळे त्यांचे 'प्रेरणास्थान' हे 'अलिखित' राजकीय स्थान अबाधीत राहिलेले होते.
५. मार्मिकता, सडेतोड मुद्दे, खर्याला खरे म्हणण्याचा स्वभाव आणि प्रसंगी जहरी ठाकरी भाषेत एखाद्याचा जाहीर पाणउतारा करण्यातील 'त्या काळात' जाणवलेले नावीन्य यामुळे ते 'आम' माणसाला अधिक आपले वाटत.
६. समाज ढवळून काढणारे वक्तृत्व!
७. प्रत्यक्ष सामाजिक व राजकीय कार्य!
८. विविध क्षेत्रात असलेले घनिष्ट संबंध! (घनिष्ट हा शब्द बदनाम झालेला आहे, येथे तो सुयोग्य अर्थाने अभिप्रेत).
९. कितीही साथीदार फुटले तरी न वाकणारे व्यक्तीमत्व!
१०. राज ठाकरे बाहेर पडणे आणि मनसेने निवडणुकीत मुसंडी मारून शिवसेनेसकट सर्वांनाच अवाक करणे या घटनांनंतर बाळासाहेबांच्या बाबतीत खास असे काहीच घडलेले नसणे व त्यामुळे आलेली एक टाईम गॅप आणि तीनंतर एकदम त्यांचे अत्यवस्थ होणे! या गॅपमुळे मराठी माणसाला व इतरांनाही 'मध्यंतरी' काही टचच राहिलेला नव्हता अशी भावना निर्माण झाल्यामुळे काहीसे उचंबळून येणे! (अशीच एक टाईम गॅप राजेश खन्नांच्या बाबतीतही परिणामकारक ठरली होती असे वाटते).
११. हेड क्वॉर्टर्स मुंबईत असणे!
१२. शिवसेनेची जनमानसांत रुजण्याची प्रक्रिया इतर पक्षांच्या प्रक्रियेपेक्षा अधिक जलद व परिणामकारक ठरलेली असणे!
१३. मनसेच्या निर्मीतीनंतर शिवसैनिक समाजात 'उद्धव एकटे पडले' अशी एक भावना काही प्रमाणात निर्माण होणे.
१४. बाळासाहेबांसाठी आणि उद्धवसाठी राज ठाकरेंनी राजकीय वाद बाजूला ठेवून सहाय्यभूत ठरणे व हे शिवसैनिक व मनसे - सैनिक तसेच इतर सर्वांनी जवळून पाहणे! भारतातील व्यक्तीपूजक समाजमनावर या गोष्टीचा परिणाम होणे!
१५. खणखणीत आवाज बंद पडणे आणि नेहमीचा एखादा राजकीय नेता हरपणे या दोहोतील फरक! खणखणीत आवाज बंद पडल्यामुळे वाईट वाटणे हे पुन्हा आपल्या मातीतील माणसाच्या बाबतीत प्रकर्षाने होणे!
१६. लोकसंख्याच मुळात वाढलेली असणे व त्यामुळे आजवर झाली नाही अशी गर्दी जमणे!
१७. माध्यमांनी सेकंदासेकंदाचे दर्शन घडवल्यामुळे पाय आपोआप शिवाजीपार्ककडे वळणे! केव्हातरी आपणही शिवसैनिक होतो असेही वाटणारे त्यात सामील होणे!
या व अश्या अनेक कारणांनी ही गर्दी अचानक जमली. केवळ काही तासात एकाच भागात पंधरा ते वीस लाख जमा होणे व शांततापूर्वक वावरून काही काळाने निघून जाणे हा अचाट प्रकार या कारणांमुळे घडून आला.
==============================
या गर्दीचे झालेले व संभाव्य परिणामः
१. शिवसेनेचे राजकीय विरोधक / स्पर्धक यांचे चेहरे अवाक झालेले दिसत होते. हे असे काही होईल, इतक्या मोठ्या प्रमाणावर होईल याची कल्पनाच आलेली नव्हती. पंतप्रधानांनी भोजन समारंभ रद्द केला. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. येथपर्यंत ठीक, पण 'अलोट जनसागर' असे ज्याला सुयोग्यपणे संबोधले गेले त्या संख्येने, परिमाणाने जनता रस्त्यावर येईल हे अनेकांच्या ध्यानीमनीही नव्हते. प्रतिभाताईंनी तर 'ही गर्दी पाहून मला काय वाटले' तेच थेट सांगितले. ही गर्दी अपेक्षित असेलही, पण प्रत्यक्षदर्शींसाठी व खासकरून विरोधकांसाठी ती जवळपास 'भयकारक शक्तीप्रदर्शन' ठरली. हे शक्तीप्रदर्शन मुळीच हेतूपुरस्पर केलेले नव्हते. उत्स्फुर्तपणे व प्रेमाने लोकांनी आपापले व्यवहार बंद केले होते. दुकानांना बंद होण्याची दहशत नव्हती. इच्छा होती. विरोधकांच्या या अवाक होण्यामुळे 'मनसे बाजूला ठेवून निव्वळ शिवसेना' हा पुढील निवडणुकीत एक अनबीटेबल फॅक्टर ठरू शकेल इतपत परिस्थिती निर्माण झालेली आहे.
२. राज ठाकरे व त्यांच्या मनसेतील कार्यकर्त्यांच्या मनावर ताण आलेला असणार हे उघड आहे. यामागे राज यांनी 'माझ्या व्यक्तीमत्वात व यशात बाळासाहेबांचेच सर्वाधिक योगदान आहे' हे कबूल करणे आहे. अंत्ययात्रेपासून दोन तास बाजूला राहणे किंवा मागे मागे राहणे यातील (मी तसा वेगळा आहे) राजकारण 'नापास' झालेले स्पष्ट दिसले. हे राज यांचे अपयश मुळीच नाही. पण जनमानसावरील पकड या घटकाबाबत शिवसेना आणि मनसे यांच्यातील मोठी तफावत स्पष्ट होणे नक्कीच आहे.
३. अडवानी, शरद पवार व मुख्यमंत्री हे तिघे अंत्यदर्शनासाठी आलेले दिसत असताना आणखी एक बाब आढळली म्हणजे त्यांच्यासाठी कोणी खासकरून पुढे झाले नाही. सामान्य व्हिजिटर्सप्रमाणेच हे तिघे उद्धव व राज यांना अनुक्रमे भेटून पुढे गेले. असल्या सूक्ष्म बाबींचा प्रत्यक्षदर्शी व टीव्ही प्रेक्षक असलेल्या सामान्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो. मुंबई खरोखरच इतर कोणाच्याही बापाची नाही हे अगदी कोरले गेले. येथे निवडणुकीसाठी यायचे असेल तर आमच्या परवानगीने यावे लागेल असे काहीसे झाल्याचे वाटून गेले.
४. काही काळ, म्हणजे दोन तीन वर्षे मनसे व शिवसेना यांच्यात मनसेकडून होणारा राजकीय विरोध सौम्य होण्याची शक्यता आहे. कदाचित 'बाहेरून युती'सारखे काही होण्याचीही शक्यता आहे. याहीमागे जनमताचा रेटा असू शकेल. काही माणसे इकडची तिकडे झाल्यासही नवल नाही.
५. दुर्दैवाने असे आणखी एखाद्या नेत्याचे निधन झाले तर यापुढे कदाचित अश्या प्रकारचे शक्तीप्रदर्शन हेतूपुरस्परही करण्यात येईल. (देव करो व कोणाचे निधन न होवो, अर्थातच).
६. जे शेकडो सभांनाही दिसले नाही ते अंत्यदर्शनाला दिसले. अजिबात मनात नसतानाही परिस्थिती एन्कॅश झाल्यासारखे झाले. असा पायंडा पडण्याची शक्यता आहे.
७. माध्यमांना जवळपास छत्तीस तास इतर कोणतेही काम नव्हते. देशाची आर्थिक राजधानी, एखादे अजस्त्र उर्जाजनित्र बंद पडत जावे तशी अत्यल्प काळात बंद पडत गेली. पाठोपाठ पुण्यात शांतता पसरली. भारतीय राजकारणाने याची नोंद (अख्खी मुंबईच सडनली बंद पडण्याची) नक्कीच घेतली. शिवसेनेला यापुढे मनातल्या मनात दहा गुण जास्त देऊनच राजकीय खेळी खेळल्या जातील याची शक्यता आहे.
८. ढाण्या वाघच हरपल्यामुळे उद्धव ठाकरे यांना जनमानसातून आधाररुपी पाठिंबा मिळेल हे तर उघडच आहे. (हे पुन्हा भावनिक समाजाचे लक्षण, ते योग्य की अयोग्य हा भाग वेगळा आहे).
९. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे मृत्यूपश्चात बाळासाहेबांची प्रतिमा अधिकच उजळली आहे. त्यांच्या स्मृतींना मनात अग्रणी ठेवून शिवसैनिक काम करतील हेही जवळपास उघड आहे.
=================================
मला ही गर्दी एक विलक्षण संदेश वाटला. नकळतपणे व आपोआप दिला गेलेला. सामान्यांनी दिलेला. जो दिला जावा असे अजिबात आवाहन करण्यात आलेले नव्हते.
केवळ 'खूप गर्दी जमली होती' किंवा 'काय गर्दी का काय' असे म्हणून विसरून जाण्यासारखी ही गर्दी नव्हती हे नक्की. या गर्दीचे राजकीय व सामाजिक परिणाम होण्याची शक्यता आहे. आपल्याला काय वाटते?
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
योग
योग +१००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००.
अहो, मरणारे महान होते, याबाबत
अहो, मरणारे महान होते, याबाबत दुमत नाहीच..
प्रश्न आहे, तो उरलेली जिवंत माणसे आणि त्यांचे पक्ष ही लोकप्रियता कॅश करू शकतील का?
हेच आता त्यांच्या
हेच आता त्यांच्या उत्तराधिकार्यांना जपता येईल का ते बघायचे.
योग +१ हेच आता त्यांच्या
योग +१
हेच आता त्यांच्या उत्तराधिकार्यांना जपता येईल का ते बघायचे > लौकीकाअर्थाने जो उत्तराधिकारी आहे त्याला ते जमू शकते.
लेखाचा रोख गर्दीचे राजकारण असा दिसत आहे आणि इथेच थोडी गफलत होताना दिसतेय. एखाद्या वक्त्याच्या सभेला गर्दी लोटणे हे त्या वक्त्याचे सामर्थ्य... निवडणूक / मतदान ही वेगळी बाब आहे.
९०च्या दशकात भावनिक राजकारणा वर खूप जोर देण्यात आला होता. आता तो फॅक्टर तसा प्रभाव नाही पाडू शकणार. निदान शहरी भागातील जनता भावनिक राजकारणाला कंटाळलेली आहे. ग्रामिण भागात 'नोट पे वोट' प्रकार जो पर्यंत चालू रहाणार तो पर्यत सत्तांतर अशक्य आहे.
<टीव्हीवर दिसणार्या
<टीव्हीवर दिसणार्या देहबोलीनुसारतरी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना सामील करून घेत होते व सोबत ठेवत होते असे वाटले. पण बाळासाहेबांचे पार्थिव शिवसैनिकांनी उचलावे (विशेषतः राज हे फुटून व बंडखोरी करून बाहेर पडलेले आहेत या पार्श्वभूमीवर) ही भूमिका घेतली जाणे अगदीच अवास्तवही वाटत नाही. असे ऐकले की नारायण राणेंना मातोश्रीकडे फिरकू दिले गेले नाही. भुजबळांकडे राज ठाकरेंनी ढुंकूनही पाहिले नाही याचा उल्लेख वर हेम यांनी केलेलाच आहे. अश्या प्रकारच्या मानसिकतेत कोणी राज यांना तसे म्हणाले असेल का, यावर मनातून विश्वास ठेवावासा वाटत नाही, पण सांगता मात्र येत नाही.>
बाळासाहेबांचे (आणि बहुतेक मोठ्या राजकीय नेत्यांचे) त्यांची राजकारणातल्या विरोधकांशी वैयक्तिक संबंध सलोख्याचे होते/असतात. शरद पवारांना व्यासपीठावरून मैद्याचे पोते संबोधल्यावरही त्यांना स्नेही म्हणूनच वागवले. छगन भुजबळांनी गेल्या एक-दोन वर्षांत बाळासाहेबांची भेट घेऊन भरपूर गप्पा मारल्याच्या , जुन्या आथवणी जागवल्याच्या बातम्या त्या त्या वेळी आल्या होत्या. कुमार केतकरांच्या निखिल वागळेंबरोबरच्या गप्पांमधली एक आठवण: शिवसेनेचे राज्य असल्याच्या (१९९५-९९) काळात केतकरांनी बाळासाहेबांबरोबर एकाच व्यासपीठा बसून, त्यांच्याच सरकारच्या कामकाजावर टीका केली. सभा संपल्यावर केतकरांना शिवसैनिकांच्या रोषाला बळी पडावे लागू नये म्हणून बाळासाहेब त्यांना स्वतः हाताला धरून आपल्या मोटारीतून घेऊन गेले.
<तेव्हा भारताच्या आजवरच्या
<तेव्हा भारताच्या आजवरच्या इतीहासात पहिल्यांदाच असा मनुष्य-समुद्र एखाद्या नेत्याच्या अंत्ययात्रेला लोटला>पहिल्यांदाच? भारताच्या आजवरच्या की २४ x ७ टीव्हीच्या इतिहासात? लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेला त्यात्या काळातील लोकसंख्येच्या आणि वाहतूक-दळणवळण सुलभतेच्या संदर्भाने जनसागरच लोटले होते.
>>या गर्दीचे राजकीय व सामाजिक
>>या गर्दीचे राजकीय व सामाजिक परिणाम होण्याची शक्यता आहे. आपल्याला काय वाटते?
विशेष काहीही राजकीय वा सामजिक परिणाम होतील असे वाटत नाही. कारण आधीच्या पोस्ट मध्ये लिहीले तसे गर्दी (अर्थात सर्वसामान्य माणसे!) निवळ बाळासाहेबांच्या प्रेम/आदर/कृतज्ञता या पोटी आली होती.
यावरून एक निशंकपणे सिध्द होते: एरवी कुणालाही लोकं निवडून देतात असा आरोप लोकांवर केला जातो. पण लोकं त्यांचा खरा नेता कोण हे अगदी स्पष्ट जाणतात आणि त्याची किंमतही ठेवतात.
त्यामूळे लोकांसाठीचे व लोकांच्या मुलभूत हक्क व हिताचे राजकारण देखिल करता येते/केले जावे हाच लोकशाहीचा मूळ संदेश यातून पुनः एकदा अधोरेखित झाला ईतकेच!
पण दुर्दैवाने राजकीय संस्था(ने) व त्यांची मूल्ये ईतकी घसरलेली आहेत की मुळात बाळासाहेबांचे ऊदाहरण घेवून त्यातून पुढे असेच सुधारणांचे व जनहिताचे राजकारण करायला परिपोषक वातावरण आणि तशी जिद्द, अस्मिताच आज ऊपलब्ध नाही. ८०+ झाले तरी कधीतरी पंतप्रधान व्हावे म्हणून आपल्याच पक्षातील ईतरांचे पाय ओढणे, किंवा घराणेशाहीचे जोडे डोक्यावर नाचवत आपला मतीतार्थ साधणे, स्वार्थासाठी कुणाशीही कधिही कसल्याही प्रकारचे संगनमत करणे (common minimum program!) या व अश्या ईतर अनेक प्रवृत्ती आज राजकीय गणिते ठरवत आहेत.
सामजिक परिणाम एखाद्या महान व्यक्तीमत्वाच्या जाण्याने झाला असे सहसा होत नाही..
जे काही राजकीय वा सामजिक परिणाम घडून यायला हवे होते ते बाळासाहेबांच्या हयातीतच हवे होते.. पण दुर्दैव- कौटूंबिक कलह, पक्षांतर्गत भांडणे, बाहेरील ईतर मित्र/पक्षांनी केले जातीचे व स्वार्थाचे राजकारण (पवार, भुजबळ, राणे, ई.) यांमूळे निवडणूकीपुरती "युती" व "वडापावची गाडी" आणि "झुणका भाकर" यापलिकडे राजकीय वा सामाजिक परिणाम झाले नाहीत.
त्यांच्या पश्चात त्यांच्या प्रखर अस्मितेची धुरा खांद्यावर वाहून ज्या मुद्दे व मुल्यांसाठी त्यांनी आपली ठाम भूमिका व ईमान कधी सोडले नाही त्याच गोष्टींना त्यांचे ऊत्तराधिकारी किती "जपतात" एव्हडे घडलेले पहाणे देखिल पुरेसे आहे.. त्याच्या पुढे जाऊन काही राजकीय वा सामाजिक बदल्/ऊलथापालथ घडवून आणण्याएव्हडी क्षमता तूर्तास कुठेच दूरवर देखिल दिसत नाही.
शिवसेनेने मराठी माणसासाठी काय
शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केले?
मुख्य म्हणजे सदा न्यूनगंडाने पछाडलेल्या निम्नस्तरीय मराठी माणसाला एक आत्मविश्वास दिला. स्थानीय लोकाधिकार समित्यांद्वारे अनेक ठिकाणी निम्नस्तरीय नोकर्यांसाठी का होईना, मराठी माणसाचा शिरकाव झाला. बँका,इन्शुअरन्स, एअर-इण्डिया,फार्मा कंपन्या अशा अद्यापपावेतो अपरिचित जगाशी त्याचा परिचय झाला. आर्थिक क्षेत्र म्हणजे आपल्यासाठी अगदी 'नो नो' असतानाच्या काळी त्या अद्भुत विश्वाची दारे आपल्यासाठी किंचित किलकिली झाली. या संधीचा फायदा घेऊन कित्येक मध्यमवर्गीय या क्षेत्रात खूप वरती चढले. त्यांनी आपल्या मुलाबाळांना शिकवले, परदेशात धाडले. इतर लोक,विशेषतः गुजराती, कचेरीव्यतिरिक्तच्या वेळात छोटे-छोटे साइड्-बिझिनेस करतात, शेअर खरेदीविक्री करतात,गुंतवणूक करतात हे पाहून यातल्या काहींनी स्फूर्ती घेतली. एकंदरीत मराठी माणसासाठी आर्थिक व्यवहार म्हणजे केवळ तोंडात बोटे घालून बघण्याची अचंब्याची गोष्ट निदान मुंबईततरी राहिली नाही. मराठी माणूस 'पासपोर्ट' शब्द उच्चारला तरी थरथर कापू लागे तो आज ट्रॅवल्-टूरिझम च्या व्यवसायात बर्यापैकी पाय रोवून उभा आहे. रिक्शांचे परवाने,प्रवासी वाहनांचे परवाने मराठी माणसाला मिळू लागले. त्यातत्या रिक्शापरवान्यांचे चीज मराठी माणसाने केले नाही ही गोष्ट वेगळी. केटरिंग, इवेंट्-मॅनेज्मेंट या क्षेत्रातही मराठी माणसाला व्यासपीठ आणि बाजारपेठ मिळाली. याची सुरुवात वडापावाने झाली. असो बरेच आहे पण स्ध्या इतकेच पुरे.
अहो आश्चर्यम्! काल काही खाजगी
अहो आश्चर्यम्! काल काही खाजगी एफेम वाहिन्यांवर भक्तिसंगीत वाजत होते. आजही एका खाजगी वाहिनीवर रोजचीच गाणी वाजवताना दर गाण्यानंतर श्रद्धांजलीचे बिल्वदल चिकटवले जात होते, तेही तोडक्यामोडक्या का होईना मराठीतून. मराठी गाणी वाजवणे डाउनमार्केट आहे असे म्हटले गेल्याचा काळ फार जुना नाही.
याआधीचा शेवटचा ऑफिशियल दुखवटा बहुतेक १९८४ साली पाळला गेला असावा. तेव्हा खाजगी वाहिन्या नव्हत्या.
महाराष्ट्र टाईम्स सभार
महाराष्ट्र टाईम्स सभार :-
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ' विठ्ठल ' मानणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आपल्या याच दैवताच्या महायात्रेत अलिप्तपणे का वावरत होते, सगळ्या विधींपासून ते लांब-लांब का राहत होते, याचं कारण मनसेतील सूत्रांकडून समजलं आहे. '' मातोश्री ' तून बाळासाहेबांचं पार्थिव बाहेर आणताना, त्यांना खांदा देण्यास राजसाहेबांना मनाई करण्यात आल्यानं ते मनानं पार खचले होते आणि हे दुःख उराशी बाळगूनच त्यांनी महायात्रेत पायी प्रवास केला. ते महायात्रेत लांब-लांब राहत नव्हते, तर त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलं होतं ' , अशा तीव्र भावना मनसैनिकांमध्ये व्यक्त होत आहेत.
शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरेंना मंत्राग्नी देण्याच्या क्षणी उद्धव यांनी राज यांचा हात धरून त्यांना सोबत घेतल्याचं दृश्य सा-यांनीच पाहिलं. ते पाहून, शिवसेना-मनसे युतीचं स्वप्न पाहणा-यांच्या मनात आशेचा एक किरणही चमकला. बाळासाहेब असताना जे होऊ शकलं नाही, ते त्यांच्या पश्चात झाल्यास ती त्यांना अनोखी श्रद्धांजलीच ठरेल, इथपर्यंत विचार झाला. पण, ' मातोश्री ' निवासस्थानी, पडद्याआड मोठा बाका प्रसंग घडला. त्या नाट्यातून वेगळेच संकेत मिळत आहेत.
शिवाजी पार्कवर जाऊन, बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीचा आढावा घेऊन राज ठाकरे काल सकाळी ' मातोश्री ' वर पोहोचले. तोपर्यंत, तिथेही बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेची तयारी पूर्ण होत होती. त्याचवेळी, ' तू बाळासाहेबांना खांदा देऊ नकोस, बाळासाहेबांचं पार्थिव शिवसैनिक बाहेर घेऊन जातील ' , असं राज यांना विनम्रपणे सांगण्यात आल्याचं त्यांच्या निकटवर्तीयाकडून समजतं. खंर तर, पुतण्या या नात्यानं बाळासाहेबांना खांदा देण्याचा राज यांचा अधिकारच होता. पण, तू ठाकरे कुटुंबीय असलास ; तरी शिवसेनेसाठी परकाच आहेस, याची जाणीव करून देण्यासाठीच राजसाहेबांना अपमानित करण्यात आलं, असा संतापही त्यानं व्यक्त केला. या घडामोडींचा विचार केल्यास, शिवसेना-मनसेतील मतभेद अजूनही तीव्र असल्याचं स्पष्ट जाणवतं. त्यामुळे उद्धव-राज एकत्र येण्याची शक्यता अधिकच धुसर झाली आहे.
बाळासाहेबांची तब्येत बिघडल्यापासून राज सतत ' मातोश्री ' वर येऊन-जाऊन होते. पण, बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांना त्याच घरात अत्यंत विचित्र वागणूक मिळाल्याचं मनसेच्या एका नगरसेवकानं नमूद केलं. बाळासाहेबांना खांदा देता येणार नाही, हे कळल्यावर राजसाहेब दुखावले होते. स्मिताताईंनी त्यांना आपल्या खोलीत थांबण्याचं सुचवलं, पण राज तिथून सरळ बाहेरच पडले. बाळासाहेबांच्या महायात्रेत बाळासाहेबांच्या पार्थिवासोबत थांबणंही त्यांनी टाळलं. सुमारे दोन तास ते महायात्रेसोबत चालले आणि नंतर आपल्या गाडीनं, वांद्रे-वरळी सी लिंकमार्गे कृष्णकुंजवर पोहोचले, असा घटनाक्रमही एका सूत्रानं कथन केला. महायात्रेत राजासाहेबांसोबत ठाकरे कुटुंबातलं कुणीही नव्हतं, याकडेही त्यानं लक्ष वेधलं. दरम्यान, राज यांच्या पत्नी शर्मिला, आई कुंदाताई, मुलगा अमित आणि मुलगी उर्वशी हे बाळासाहेबांच्या पार्थिवासोबत होते.
' कृष्णकुंज ' वर पोहोचल्यानंतर राज ' स्टडी रुम ' मध्ये गेले आणि त्यांनी टीव्हीवरच बाळासाहेबांची महायात्रा पाहिल्याचं समजतं. बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारावेळी आपण शिवाजी पार्कवर पोहोचू, एवढंच उत्तर त्यांनी पत्रकारांना फोनवरून दिलं. त्यानुसार ते पोहोचले, तिथे त्यांनी उद्धव यांना सोबतही केली, बाळासाहेबांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, त्यांच्या अश्रूंचा बांधही फुटला, पण कुठेतही काहीतरी बिनसल्याचं जाणवत होतं. त्यातल्या ब-याच प्रश्नांची उत्तरं आता मिळाली आहेत. पडद्यामागे घडलेल्या या ' मानापमान ' नाट्याची मनसैनिकांमध्ये जोरात चर्चा आहे
सगळ्यात मोठे दुर्दैव हेच आहे
सगळ्यात मोठे दुर्दैव हेच आहे की बाळासाहेबांना जनतेची जी नाडी समजली होती, ती उद्धव ठाकरे यांना सापडलीच नाही.:अरेरे:
त्यांच्या आसपास वावरणारे लोक, ज्यांना राजकारण कशाशी खातात हेच समजत नाही, असे लोक त्यांना बहुतेक शिवसेना, सामान्य जनता आणी पर्यायाने ज्येष्ठ शिवसैनिकांपासुन दूर नेत आहेत.
मुंबईकरांना ती नावे माहीत आहेतच जे ज्येष्ठ नेते आता शिवसेनेतुन नाईलाजाने दूर गेलेत. ( नारायण राणे नाही, मी जर चुकत नसेल तर ते मला वाटत ते वामन महाडीक असावेत किंवा इतर )
नारायण राणेंबद्दल न बोलण बरे. छगन भुजबळांना बाळासाहेबांनी माफ केले पण राणेंचे काय? कुठे होते ते?
आणी हो नीलम गोर्हे कुठे होत्या? वरती कुणीतरी लिहीले आहेच मला वाटते.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17280283.cms
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी काल, रविवारी ' मुंबई बंद ' करण्याची गरज काय होती? अशी पोस्ट फेसबुक वॉलवर लिहिणा-या आणि ती कॉमेंट लाइक करणा-या तरुणीला पोलिसांनी तात्पुरती अटक करून सुटका केली. पालघरमध्ये ही घटना घडली.
पालघरच्या या दोन तरुणींना माहिती तंत्रज्ञान कायद्या २००० च्या कलम २९५-अ (धार्मिक भावना दुखावणे) आणि कलम ६४-अ अंतर्गत अटक करण्यात आली होती. या कॉमेंटवर आक्षेप सुरु झाल्यानंतर या तरुणीने फेसबुकवरून ही कॉमेंट काढून माफीसुद्धा मागितली होती.
दरम्यान, २००० शिवसैनिकांच्या जमावाने पालघरमध्ये या तरुणीच्या काकाच्या रुग्णालयावर हल्ला करून तोडफोड केली.
बाळासाहेबांचे निधन आणि त्याने
बाळासाहेबांचे निधन आणि त्याने (बहुतेक) निर्माण झालेली सहानुभुतीची लाट याचा फायदा मनसे, शिवसेना आणि भाजप यानी २०१४ साठी घेतला नाही तर पुढील वर्षानुवर्षे आघाडी सत्तेवर येत राहील हे जर माझ्यासारख्या राजकारणात ढ असलेल्या माणसाला कळते तर ते काय उद्धव, रा़ज इ. ना कळत नसेल?
आम्हाला मिळाले नाही तर तुम्हालाही मिळु देणार नाही ही वृत्ती जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत युतीने आपल्याला राज्य मिळेल हा विचारही मनात आणु नये. खरच युतीत शरद पवारांची (व्यक्ती नव्हे पण प्रवृत्ती) उणीव जाणवतेय. असा एखादा शरद पवार युतीत असता तर त्यानी नक्कीच यांच्यात काहीतरी समेट, काहीतरी "अरेंजमेंट" घडवुन आणली असती. प्रमोद महाजन असते तर त्यांच्याकडुनही आशा करता आली असती. पण सध्या उद्धव भोवतीचे कोंडाळे आणि राज भोवतीचे कोंडाळे त्यांचे कान भरुन त्याना एकत्र येण्यापासुन परावृत्त करत असतील तर यावेळीही २००९ ची पुनरावृत्ती होणारच आहे.
बाळासाहेबांबद्दल नुसते मुळुमुळु रडुन दु:ख व्यक्त करण्यापेक्षा त्याना काय हवे होते ते देण्यासाठी स्वतःच्या स्वार्थाचा, अहंकाराचा त्याग करण्याचा विचार करणारा कोणी माइ का लाल आहे का? का आपल्या स्वार्थापलीकडे कोणी कधी पाहणारच नाही?
त्या म.टा.च्या बातमीखाली
त्या म.टा.च्या बातमीखाली श्री. श्याम तेंडुलकर यांची ही प्रतिक्रिया वाचायला मिळाली -
....मी आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांनी प्रत्यक्ष आपल्या स्वतः च्या डोळ्यांनी पाहिलंय ते ह्या बातमीच्या अगदी विरुद्ध आहे. ते असे कि, उद्धव, जयदेव, राज आणि ह्या तीघांपैकी एकाचा मुलगा अशा चौघांनी बाळासाहेबांच्या पार्थिवाला सर्वप्रथम खांदा दिला, त्यानंतर इतरांनी खांदा दिला आणि पार्थिव रथापर्यंत आणून रथावर ठेवले. तसेच घरातील सर्व निकटची स्त्री-पुरुष मंडळी रथावर पार्थिवाच्या बाजूला, अंत्ययात्रेत शेवटपर्यंत असलेली करोडो लोकांनी प्रत्यक्ष आणि टी. व्ही. वर पाहिली आहेत. 'मातोश्री' येथून बाहेर कलानगर जंक्शन पासून अंत्य-यात्रेला सुरुवात झाल्यावर तेथे रस्त्यावर उसळलेल्या अभूतपूर्व आणि अथांग जनसागराला झालेल्या दुखःवेगामुळे बराच वेळ साहेबांची महा-अंत्ययात्रा पुढे सरकतच नव्हती आणि ती पुढे सरकण्यासाठी स्वतः उद्धाव नी राज ला रथाच्या पुढील बाजूस रस्त्यावरून पायी चालण्याची सूचना केली, जेणेकरून राज यांच्या पुढे पायी चालण्यामुळे 'महा-अंत्ययात्रा' नियोजित वेळेप्रमाणे लवकरात लवकर पुढे सरकेल.
**
मयेकर,
राजीव गांधी, शंकरदयाल शर्मा, ग्यानी झैलसिंह, वेंकटरमण हे वारले तेव्हाही सरकारी दुखवटा होता.
उद्धव, जयदेव, राज आणि ह्या
उद्धव, जयदेव, राज आणि ह्या तीघांपैकी एकाचा मुलगा अशा चौघांनी बाळासाहेबांच्या पार्थिवाला सर्वप्रथम खांदा दिला, त्यानंतर इतरांनी खांदा दिला आणि पार्थिव रथापर्यंत आणून रथावर ठेवले.
>>> हे इतर म्हणजे पोलिस. कारण अंतिम संस्कार शासकिय इतमामात असल्याने पोलिसांनी पार्थिव उचलून रथावर ठेवले हे आपण सर्वांनी पाहिले आहे.
खरंतर लेखाची वेळ जरा घाईची
खरंतर लेखाची वेळ जरा घाईची झाली पण जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे.. असो
शिवसेना मनसे एक होतील, भाजपशी युती टिकून राहिल, रिपचा बेभरवशी सपोर्ट कायम असेल आणि सहानुभुतीची लाट किंवा थेट मतदारांचा विश्वास (एवढे सगळे ऑड्स) जिंकून युतीची सत्ता येईल असे गृहीत धरले तरी मंत्रालये आणि विभाग सांभाळण्यासाठी आणि (रा.)काँग्रेससारख्या विरोधी पक्षाला कह्यात ठेऊ शकतील अशी माणसे पक्षात आहेत का हे आधी बघितले पाहिजे आणि नसल्यास येत्या काळात अशी माणसे नुसती तयारच नाही तर त्यांचे चेहरे जनतेसमोर पर्याय म्हणून ऊपलब्ध असले पाहिजेत.
मागच्यावेळी मंत्रीपद भुषवलेली मनोहर जोशी, सुरेश प्रभू, मुंडे, गडकरी ही फळी पुन्हा किती सक्रिय (राजकारणात नाही तर प्रशासनात) असेल ह्याची शंका आहे.
चव्हाण, पवार, पाटील, राणे, कदम, विखे, थोरात ह्या बड्या धेंडांना पर्याय देणारे चेहरे युतीकडे आहेत का नसल्यास युती ते तयार करू शकते का?
अबु आझमी वगैरे सारख्यांच्या नादाला लागून युतीचे नेते त्यांचा वेळ, शक्ती वाया घालवतात. कॉग्रेसी मंडळी सुद्धा ह्या आझमी सारख्या लोकांचा वापर दोन्ही ठाकरेंना व्यस्त ठेवण्यासाठी करते की काय अशी शंका येते.
चिन्मय, लोकं सामान्य
चिन्मय, लोकं सामान्य माणसाबद्दल गॉसिप करायला आणि कानगोष्टीसारखं पसरवायला मागेपुढे पहात नाहीत तर अशा प्रसिद्ध घराण्यांना तर याला किती तोंड द्यावं लागत असेल. सगळ्याचा विपर्यासच केला जातो डोकं तिरकं चालवून. जे काही लोकांना वाटलं त्यामागे काही वॅलिड कारण असेल असं का मनात येत नाही कुणाच्या?
तू जी प्रतिक्रिया इथे चिकटवली आहेस त्यात दिल्याप्रमाणेच घडलं असणार असं मलाही वाटतंय.
मटाला बातमी छापताना बातमीची
मटाला बातमी छापताना बातमीची शहानिशा करणे गरजेचे वाटले नाही का? की उगाच सनसनाटी बातम्यांच्या मागे हे पण? मग संध्यानंद, पुण्यनगरी आणि यात फरक तो काय.
टुनटुनजी, निलम गोर्हे
टुनटुनजी, निलम गोर्हे होत्या.. तुम्हाला दिसल्या नाहीत??
चिनुक्स, बरं झालं ती प्रतिक्रिया दिली!!
लेख छान वाटला. बरेच मुद्दे
लेख छान वाटला. बरेच मुद्दे छान मांडले असले तरी काही मोजके मुद्दे पटले नाहीत.
>>>५. दुर्दैवाने असे आणखी एखाद्या नेत्याचे निधन झाले तर यापुढे कदाचित अश्या प्रकारचे शक्तीप्रदर्शन हेतूपुरस्परही करण्यात येईल. (देव करो व कोणाचे निधन न होवो, अर्थातच).>>
वरचा मुद्दा अजिबात पटला नाही. बाळासाहेबांसारखा माणुसकी असलेला मनमिळाऊ नेता होणे नाही. त्यामुळे ईतर कोणत्याही नेत्याची त्यांच्याबरोबर तसुबरही तुलना केलेली पटतच नाही. उलट मला अस सतत वाटत होत की महाराष्ट्रातले झाडुन सगळे नेते मेले असते तर बर झाल असत पण बाळासाहेबांना देवाने घेऊन जायला नको होत.
असो आमच्या घरात तस कोणी शिवसैनिक नाही पण ६०-७० च्या दशकात माझ्या बाबांना बाळासाहेबांबद्दल प्रेम निर्माण झाल ते शेवटपर्यंत कायम होत अगदी आजारपणाने थकलेले असले तरी शिवसेनेला मत द्याययच या नुसत्या विचारानेच त्यांच्यात नवचैतन्य आलेल मी स्वतः अनुभवलय. बाळासाहेबांबद्दल असाच आदर ९२-९३ च्या दंगलीनंतर मला वाटु लागला. मुंबई अगदी सुरक्षित वाटायची त्यांच्या अस्तित्वामुळे. बाळासाहेबांची अंत्ययात्रा बघताना नकळत डोळ्यात अश्रु आले आणि मुंबईत नसल्याच दुखः वाटत राहील. खरच महाराष्ट्र खरया अर्थाने पोरका झालाय. आता बघु महाराष्ट्राच्या नशिबात काय वाढुन ठेवलय ते.....
>>>आंबा२ | 19 November, 2012
>>>आंबा२ | 19 November, 2012 - 19:21 नवीन<<<
आंबा २ हा काय प्रकार आहे? प्रत्येक सदस्याचे मूळ सदस्यनाम आंबा ठेवून पुढे सदस्यत्वाचा आकडा लिहावा असा फतवा तर नाही?
एकंदर चर्चा वाचून आता मलाच काही कळत नाही आहे.
(No subject)
बेफी, चांगला आढावा घेतलाय.
बेफी,
चांगला आढावा घेतलाय. काही मुद्दे पटले, काही नाही.
स्मिता ठाकरे दिसल्या नाहीत... होत्या काय( मी सदा सर्वकाळ टीवीवरील प्रक्षेपण पाहिले नाही.. म्हणून विचारतेय..)
एकंदरीत, आता पुढे महाराष्ट्राचे काय होणार प्रश्ण आहे..(ते दिसेलच..)
स्मिता ठाकरेही होत्या. सगळे
स्मिता ठाकरेही होत्या. सगळे होते.
बेफिकीर, चांगला लेख. बहुतेक
बेफिकीर, चांगला लेख. बहुतेक मुद्द्यांशी सहमत.
परिणामांचा पाचवा मुद्दा. मी अगदी हाच विचार करत होते.
आता इतर राजकीय नेत्यांच्या वारसदाराना एवढी मोठि अंत्ययात्रा काढायची जबाबदारी येईलच.
आंबा, फेसबुकवर त्या कमेंट्स इतक्या चांगल्या भाषेत नव्हत्या.
अर्थात त्या मुलीच्या काकांचं होस्पिटल यामुळे का तोडावं ते कळत नाही.
<अर्थात त्या मुलीच्या काकांचं
<अर्थात त्या मुलीच्या काकांचं होस्पिटल यामुळे का तोडावं ते कळत नाही.> यात न कळण्यासारखं काय आहे? बंद संपूर्ण उत्स्फूर्त होता तर चारचाकी/दुचाकीवरून भगवे झेंडे घेतलेले समूह ('चांगली' भाषा वापरायची म्हणून समूह) कशासाठी फिरत होते? अगदीच इमर्जन्सी असेल तरच सामान्य मुंबईकराने घराबाहेर पडावे असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले; हे कशाचे द्योतक आहे? हाच वारसा पुढे चालवला जाणार आहे का?
अगदीच इमर्जन्सी असेल तरच
अगदीच इमर्जन्सी असेल तरच सामान्य मुंबईकराने घराबाहेर पडावे असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले; हे कशाचे द्योतक आहे? >> १८ ते २० लाखाची गर्दी मॅनेज करायची असेल तर वाहतूकीच्या अथवा इतर सोयीसुविधांच्या दृष्टीने ते गरजेचे होते. सुट्टी आहे म्हणून लगेच वीकेंड स्पॉटला जाणारा एक वर्ग मुंबईमधे आहे, निवडणूकांच्या दिवशी पनवेल इथल्या ट्राफिकची हालत बघा कधीतरी.
मुंबईबाहेरूनदेखील जास्त प्रमाणात शिवसैनिक येत असल्याने त्यांना ट्राफिकची अडचण भासू नये हे देखील एक कारण. त्याला "बंद" काही पार्श्वभूमी असायची गरज नव्हती. शिवसेनेने कुठलाही बंद जाहीर केलेला नव्हता, मात्र शिवसेना ज्या ज्या उद्योगांमधे सक्रिय आहे तिथल्या कामगारांनी काम बंद ठेवले तर त्यामधे काही आश्चर्य वाटण्यासारखे नव्हते.
टीव्हीवर जी दृश्ये दिसत होती ती पाहता, मटामधली बातमी खोडसाळ वाटत आहे.
हे इतर म्हणजे पोलिस. कारण अंतिम संस्कार शासकिय इतमामात असल्याने पोलिसांनी पार्थिव उचलून रथावर ठेवले हे आपण सर्वांनी पाहिले आहे>>> सेना, त्याहीआधी पार्थिव मातोश्रीबाहेर आणताना दोन तीन पावलांवरती वेगवेगळ्या शिवसैनिकांनी खांदा देत असताना दिसले होते. आदेश बांदेकर आणि आदित्य ठाकरे मला ओळखू आले. पार्थिव मातोश्रीबाहेर आणून खाली ठेवले आणि मग पोलिसांनी शासकीय इतमाम चालू केला. पुन्हा अंत्यविधीच्या वेळेस पोलिसांनी बंदूकीच्या फैरी वगैरे झाडल्यावर उद्धव यांनी अग्नि दिला.
अर्थात त्या मुलीच्या काकांचं होस्पिटल यामुळे का तोडावं ते कळत नाही>>> कुणाचे तरी आधीचे काही पर्सनल स्कोअर असतील ते सेटल करायला असली कारणे शोधली असतील. फेसबूकचं म्हणायचं झालं तर भाऊबीजेच्या दिवसापासून "नेत्याला भेटण्यासाठी बॉलिवूड स्टार्स का जातात?" "हे सर्व दहशतीने चालू आहे" "इतके लोक पैसे देऊन बोलावले होते वाट्टं" (हे सर्वात भयाण लॉजिक), "बाळासाहेब मराठी लोकांचे नेते होते, बिगरमराठी लोकांनी का जावे?" इत्यादि अनेक मुक्ताफळे वाचलेली आहेत. शक्य होतील तिथे उत्तरे दिली आहेत. जिथे शक्य नाही, तिथे अकलेची कीव केलेली आहे.
दूध मिळाले नाही असा माझ्या
दूध मिळाले नाही असा माझ्या आठवणीतला हा पहिलाच बंद.
कारण, दूध संघाने दुधाचे संकलन
कारण, दूध संघाने दुधाचे संकलन न करण्याचा निर्णय आपणहून शनिवारी घेतला. संध्याकाळी सहाच्या सुमाराला निर्णय घेतला गेला. त्यानंतर टीव्हीवर बातम्यांमधे सतत दाखवत होते. आता दूध संघाला कुणी हातात भगवे झेंडे घेऊन दमदाटी केले ते मात्र माहित नाही.
दूध मिळाले नाही असा माझ्या
दूध मिळाले नाही असा माझ्या आठवणीतला हा पहिलाच बंद.
<<
<<
च्यायला काय भुक्कड माणूस आहे. स्वत: तहान भूकेची पर्वा न करता, असंख्य जनता त्या दिवशी रस्त्यावर उतरली होती. आणि या माणसाला दुधाची पडलेय. लोकांनी बंद ठेवला तो शिवसेनाप्रमुखांच्या प्रती असलेल्या आदरानी, त्यांच्या आदेशाने नव्हे.
Pages