मुल दत्तक घ्यावे की नाही?

Submitted by सख्या on 2 July, 2012 - 04:44

मित्रहो, मला लग्नानंतर मुलगी झाली होती पण जन्मल्यापासून ती आजारीच होती, चार महीन्यांची असताना गेली. माझ्या लग्नाला ३ वर्षे झाल्येत. दोन वर्षापासुन प्रयत्न करत आहोत. मिसेसला हृदयविकाराचा त्रास आहे. तेंव्हा चान्स घेण्याची पण भिती वाटते. बहुतेक आता घेणारच नाही.
मला मुल दत्तक घ्यायचं आहे. ६ महिन्याच्या आतलं बाळ मिळेल का? कुठे? कसे? काय कायदे आहेत त्यासाठी? इथे कुणी अनुभवी लोक आहेत का? घरचे बाकीचे लोक तयार होतील का? खुप प्रश्न आहेत.
मी,मिसेस फार डेस्प आहोत बाळासाठी. काय करावे? मुलीच्या आठवणीतुन अजुन बाहेर पडलो नाहीओत. शक्य असल्यास मुलगीच दत्तक हवी आहे.क्रुपया हेल्प करा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यात आहात का? माझी वहिनी शिशूआधार संस्थेत काम करते तिच्या कडून डीटेल घेउन तुम्हाला कळविते. जरूर घ्या दत्तक. मी पण दत्तक गेलेली मुलगी आहे. मुलगी व आईवडील ह्या दोघांसाठी हे विन विन प्रपोजल असते. पण मिसेस ना लहान मुलाचे करायला जमेल ना? त्या दमतील. तुम्ही बेबीकेअर साठी पण तयारी करून ठेवा बेबी घरी येण्या आधी. ऑल द बेस्ट.

इथे अजून जाणकार सल्ला नक्की मिळेल.

प्रथम तुमचे मनापासुन अभिनंदन.........किमान तुम्ही दत्तक घेण्याचा विचार तरी सुरु केलात........
.
.
मनपुर्वक शुभेच्छा....... तुमच्या पुढील वाटचाली साठी.............

प्रथम तुमचे मनापासुन अभिनंदन.........किमान तुम्ही दत्तक घेण्याचा विचार तरी सुरु केलात........>>++१११

भारतीय समाज सेवा संस्था येथून माझ्या भावाने सहा महिन्यांपूर्वी चार महिन्यांची मुलगी दत्तक घेतली आहे. ती फार गोड आहे. ते तिघेही जण व आम्ही सगळेच बाळराजाच्या आगमनाने अतिशय खूष आहोत.

मी मुलगा (२ महिने ८ दिवसांचा असताना) दत्तक घेतला आहे. आता तो बराच मोठा आहे पण आमचा अनुभव अतिशय चांगला आहे.
संस्थेचे नाव- सोफोश, पुणे.
भरपूर कागदपत्रे असतात. ती नियमाप्रमाणे आपणही पूर्ण करावीत. त्यामुळे बाळाचा स्विकार करण्याची पक्की पायाभरणी होते. 'आम्हाला बाळ हवे आहे' या विचारापेक्षा वेगळा जबाबदार विचार या प्रॉसेसमधून तयार होतो. बाकी बर्याच गोष्टी संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत सांगितल्या जातात, ज्या प्रत्येक कुटुंबासाठी वेगळ्या असतात. खर्चही प्रत्येक कुटुंबाच्या अर्थाजनाप्रमाणे ठरवलेला असल्याने ते बघावे लागेल. माझा तरी सरकारी संस्थेचा अनुभव अगदी चांगला होता.
आत्ता तुमच्या विचारणेमुळे मला लक्षात आले की आपण बाळ दत्तक घेतले होते. अन्यथा आपल्याला झालेले किंवा दत्तक घेतलेले असे निदान आपल्या तरी लक्षात रहात नाही. Happy
आमच्या घरच्या (सासर व माहेर) नातेवाईकांनी बाळाचे स्वागत दणक्यात केले. आपण जितक्या आनंदाने बाळाचा स्विकार करू तश्याच प्रकारे बाहेरचे लोकही स्विकार करतात. मुलाचे, बारसे, मुंजही मोठ्या हौसेने केली व झाडून सगळे नातेवाईक हजर होते. मुलाला मोठा झाल्यावर प्रेमाने पण प्रामाणिकपणे सगळी माहिती हळूहळू सांगितली. त्याने त्याच्या स्वभावानुसार दोनेक महिन्यात पूर्ण स्विकारली. तोपर्यंत त्याला व आम्हाला मानसिक कसरत करावी लागली, ती केली. सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. प्रत्येक भारतभेटीत संस्थेला भेट देणे असतेच. संस्थेचा आधारगट आहे. मुलांसाठी शारिरीक व मानसिक कष्ट मात्र भरपूर असतात, जे सगळ्या मुलांसाठीच असतात असे वाटते.

मैना आपले मनपुर्वक अभीनंदन...योग्य आणि धाडसी निर्णय.... आपल्या सारखे पालक .. सर्वांना मिळो....

माझ्या बहिणीनेही एक मुलगी एका संस्थेमधून दत्तक घेतली आहे. कागदपत्रे भरपूर असतात पण संस्थाचालक नीट मार्गदर्शन करतात.

अन्यथा आपल्याला झालेले किंवा दत्तक घेतलेले असे निदान आपल्या तरी लक्षात रहात नाही
++++१

मैना+१.

या विषयावर कधीचा एक लेख लिहीणार होते तो पडलाय तसाच नेहमीप्रमाणे. थोडी माहिती.
ही प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नाही. टप्पे येणेप्रमाणे (जमले तर रोज एका मुद्यावर लिहीन)
१) मानसिक तयारी
हा काही लोकांसाठी सर्वात वेळखाऊ असतो. सर्वात महत्त्वाचा.
आमच्याबाबतीत हा प्रश्नच कधी उद्भवला नाही, पण लोकांना खूप वेळ लागतो. कधी जोडप्यापैकी एकाला.
दत्तक पालकत्व स्विकारलेल्या काही व्यक्तिंशी बोलल्यास मदत होऊ शकते.

१अ) घरातील इतरांची तयारी
भारतात तरी मूल कुटुंबात येते, त्यामुळे कुटुंबातील इतर व्यक्तिंचीही मानसिक तयारी महत्त्वाची.
विरोध फार असेल घरी तर मूल घ्यायचे की नाही (आणि अशा जोडप्याला द्यायचे की नाही) हा प्रश्न उद्भवू शकतो.
कारण सरळ आहे. जर बाळाला कुटुंबात कायम सापत्न वागणूक मिळाली तर तिचा परिणाम काय होऊ शकतो?
प्रसंगी सर्व कुटुंबाचा रोष/ विरोध पत्करुन ही जवाबदारी स्विकारण्यास आपण सक्षम आणि खमके आहोत ना इतकी तरी मनाची तयारी झाली पाहिजे माझ्यामते.
काही कुटुंबात फार उत्साह नाही, फार विरोध नाही अशी परिस्थिती असते, ती बाळाच्या आगमनाने येणार्‍या आनंदासोबत पालटु शकते.
आणि अर्थातच काही कुटुंबात अतिशय आनंदाने या निर्णयाला सर्वांचा सपोर्ट असतो.
(सर्व चांगल्या संस्थांमध्ये 'सोशलवर्कर्स' ना ही पाहणी करायचे काम असते. नंतर लिहीते)

१ब) स्वतःची मानसिक तयारी
स्वत: म्हणजे जोडप्यातील दोघांची असे गृहित धरले आहे. तसेच बायोलॉजिकल मुल होऊ शकत असतानाही/ किंवा मूल असतानाही ज्यांना दत्तक पालकत्त्व स्विकारायचे आहे अशांसाठी.
नवराबायको पैकी एकाचीही मानसिक तयारी नसेल (ही मानसिक तयारी जोडप्यापैकी एकाची कमीअधिक असु शकते. पण नसेलच तर) तर काय हा प्रश्न बर्‍याच लोकांना भेडसावतो. अर्थातच सोपे उत्तर नाही. पण जोडीदाराची तयारी नसती तर मी तरी या वाटेला गेले नसते.
'मी या बाळाला आपल्या मुलासारखे प्रेम/न्याय इ.इ देऊ शकेन का?' हा प्रश्न लोकं विचारतात. मला उत्तर माहित नाही.
आमच्या कोषात 'आपला', 'रक्ताचा', 'जाती/धर्माचा' वगैरे कसलेच घटक नव्हते त्यामुळे सोपे गेले अगदी. स्वतःच्या जीनपुलचे खूप fascination असते काही जणांना (ते फार जास्त महत्त्वाचे असु शकते. That's OK.) त्यांना जास्त अवघड जाऊ शकते हे मी पाहिले आहे.
आणि आपण जेवढे स्वतःला ओळखतो तेवढे इतर कोण ? मानसिक द्वंद्वामुळे दत्तक न घेऊ शकणार्‍यांचे प्रमाण जास्त आहे आणि ते चांगले आहे.
'आया हूं तो सब बंधन तोडके' इतकी पूर्वतयारी झालेली बरी (असे मला वाटते) Happy

१ब.१) हरतर्‍हेने डॉक्टरी प्रयत्न इ.इ. झाल्यावर मूल होत नाही म्हणुन, शेवटचा पर्याय म्हणुन या पर्यायाकडे वळणार्‍यांबाबत वाढीव वय हा घटक असु शकतो. CARA guidelines नुसार आणि simply common sense नुसार पालक निवृत्त होईपर्यंत मूल सज्ञान व्हायला हवे हे लक्षात असु द्या. जितका जास्त वेळ लागेल तितके वय वाढणार. (आता प्लीज इथे वाढिव वयातील बायोलॉजिकल पालकांबाबतचा मुद्दा काढु नका. वाढिव म्हणजे किती ते तुम्ही आपल्या फिटनेसनुसार ठरवा. तुम्ही चाळिसाव्या वर्षी बाळ होऊ दिले तर तो तुमचा प्रश्न आहे, पण दत्तक हवे असेल तर age factor ला वेटेज असते. सर्व नियमांना संस्थेनुसार आपल्याकडे अपवाद असतातच. हो ओळखीने काहीही होऊ शकते.)

या कॅटेगरीतले पालक बर्‍यापैकी अगतिक झालेले असतात आणि त्यांच्या हे लक्षात येत नाही की इथुन पुढे सुद्धा वेळ लागणार आहेच.
आणि हे खरे तर सग्ळ्यांनीच लक्षात ठेवायला हवे. या प्रक्रियेत वेळ लागू शकतो. किती ते नंतर सांगते.

(माझ्या मर्यादित आकलनावर आधारित. काही वर्षांच्या मर्यादित अनुभवांवर, इतर दत्तक पालकांशी झालेल्या चर्चांवर आणि होतकरु द.पालकांशी झालेल्या संवादांवर आणि आम्हाला पालकत्व स्विकारुन काही काळ लोटल्यावर.)

फीडबॅकनुसार पुढे लिहीन किंवा उडवेन.

अन्यथा आपल्याला झालेले किंवा दत्तक घेतलेले असे निदान आपल्या तरी लक्षात रहात नाही. <<<
मैना, फारच सहज आणि छानपणे मांडलेत हे.
थोडक्या शब्दात आणि सहजपणे छान सांगितलेत. आवडलंच.

सख्या,

आपल्या मुलीचे आजारपणामुळे चारच महिन्यात निधन झाले हे दु:ख कोणाच्याच नशिबी कधीच येऊ नये.

मातृत्वाचे सर्व टप्पे पार करून आपल्या शरीरातून एका नवीन शरीराला व आत्म्याला चैतन्यरूप देऊन जगात आणणे आणि एखादे मूल दत्तक घेणे हे खरे तर जमीन आसमानासारखेच.

पण मातृत्व लाभूनही ते मूल जगले नसल्याने मातेच्या मनाची मातृत्वाची ओढ व अपुरेपणाचे शल्य हे किती दारूण असेल ते ती माताच जाणो.

अशा वेळेस व पुन्हा अपत्यप्राप्ती अवघड असल्यास दत्तक घेण्याचा विचार ही खरे तर एक विवशता असते, पण अर्धवट बाल्य आपल्या घरात नांदून परलोकी गेल्यामुळेआलेल्या खिन्नतेवर आणि सुन्नतेवर तो एक मानवी उपाय ठरतो.

आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे व आपुलकीच्या व अपत्याच्या जडणघडणीच्या इच्छेमुळे जगातील एका (कदाचित निराधार) बालकाचे नशीब नक्कीच पालटेल. यापेक्षा पालक व बालक या दोहोंसाठी अधिक सुखद काय असणार.

आपल्यातील दिलदार, सकारात्मक व प्रेमळ पालकांना अभिवादन व आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना!

=======================

दत्तक घेताना मात्र अनेक अडचणी येतात.

१. तेथे अक्षरशः रांग लागलेली असू शकते. दोन दोन, तीन तीन वर्षे लागू शकतात.

२. ही प्रक्रिया क्लिष्ट असते

३. दत्तक घेण्यात येणारे मूल हे जरी त्याच्या 'मातीचा गोळा' या स्थितीपासून आपल्याकडे आपल्या संस्कारात वाढणार असले तरी त्याची निर्मीती ही अनेकदा (समाजाच्या दृष्टीने, काहीशी) विचित्र कारणांमधून झालेली असते. (हे केवळ वास्तव - मला माहीत असलेले - लिहायचे म्हणून नोंदवत असून यात कोणताही घाबरवण्याचा अथवा इतर हेतू नाही). ते मूल अनेकदा एकतर्फी इच्छेच्या संभोगातून किंवा अनैतिक संबंधांमधून जन्माला आलेले असते. (यात मुलाचा वा नवीन पालकांचा दोष काहीच नाही). आज शास्त्र इतपत पुढारलेले आहे की आपण खुळ्या संकल्पनांना अंधश्रद्धा म्हणून दूर सारू शकतो. पण एक मान्य व्हावे,की जेनेटिक जडणघडण ही आपला ठसा त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यावर पाडतच राहते. ही अंधश्रद्धा नाही.

४. अशा संस्थांशी बोलल्यानंतर जाणवते की कित्येक कुमारी माता किंवा इतर माता, ज्या डिलीव्हरीआधी त्या संस्थेत राहात असतात, त्या मूल झाल्यानंतर ते मूल अक्षरशः त्या संस्थेत टाकून तेथून पळून जातात. याचे कारण त्यांना ते मूल स्वतःलाच नको असते. (याची कारणे विभिन्न असतात व त्या कारणांना आपण चांगली कारणे मानत नाही). (अर्थात, याचा परिणाम त्या मुलाच्या आयुष्यावर वगैरे होते नाही, पण ते मूल आपल्याला मिळण्यामागे ते मूल त्याच्या आईला नको असणे हे कारण बरेचदा नवीन आईसाठी मनस्तापदायक ठरू शकते. तिच्या - म्हणजे दत्तक घेणार्‍य अनवीन आईच्या - मनातून तो विचार जाऊ शकत नाही.) अशा संस्था आयडेंटिटी लपवत असल्या तरीही अनेक गोष्टी मुळातच सर्वज्ञात असतात.

एकंदरीत, जी आपली निर्मीती नाही तिला आपण आपली निर्मीती मानणे आणि जगालाही मानायला लावणे आणि हे सर्व करत असताना दत्तक घेतले असल्याची जाणीव मनातून दूर जाऊ न शकणे हे एखाद्या पुरुषासाठी फारसे नसले तरी स्त्रीसाठी त्रासदायक ठरू शकते.

एवढे असूनही मोठ्या प्रमाणावर मुले दत्तक घेतली जातात याचे कारण अपत्य असण्याची इच्छा इतर सर्व घटकांवर मात करते. ती मुले व ते पालक आनंदाने जगतानाही दिसतात.

शेवटी मानवाच्या आयुष्यात सहवासाचे प्रेम आणि लळा या बाबी प्रत्यक्ष रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ ठरतातच. जसे परदेशी असलेला स्वतःचा मुलगा दहा वर्षे भेटला नाही तरी चालेल पण शेजारचे लहान बाळ एक दिवस खेळायला आले नाही तर चुकल्याचुकल्यासारखे वाटणे.

सगळे लिहिले कारण मीही त्यातूनच गेलो होतो. मला स्वतःला दत्तक ही संकल्पना मान्य होती, पण माझ्या पत्नीला ती कधी मान्य झाली नाही. तिच्या समजुती तिच्यापाशी, असे म्हणून मी कधी विचार लादले नाहीत.

शुभेच्छा

-'बेफिकीर'!

मूल दत्तक घेतलेल्या सर्व पालकांचे अभिनंदन आणि कौतुक.
मला ह्या धाग्याचा पुढेमागे उपयोग होणार आहे.
एक मुलगी दत्तक घ्यायची हा विचार लग्नाआधीपासूनच माझ्या मनात आहे. पण नवर्‍याला मात्र ही कल्पना अजूनही पचत नाहीये. त्यामुळे निर्णय लांबला आहे.
त्याचे मुद्दे त्याच्या दृष्टीने बरोबर आहेत, पण मला स्वतःला स्वतःसाठी ते अगदीच गौण वाटतात.
दोघांची तयारी झाल्याशिवाय निर्णय घेऊ नये हे मात्र १०० टक्के पटतंय.
मैना आणि रैना, छान पोस्ट.
रैना, पुढच्या पोस्टींची वाट पाहत आहे. Happy

मैना व रैना - आपले मन:पूर्वक अभिनंदन. अतिशय सुयोग्य, सुजाण आणि धाडसी निर्णय. आपल्यासारखे पालक सर्वांना मिळोत.
तुमचा हा अनुभव मोकळेपणाने इथे दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

मैना, रैना ग्रेट!
अभिनंदन.

बेफिकीर दुसरी बाजू , जी चुकीची किंवा बरोबर हा प्रश्न नाही , मांडायचे धाडस दाखवलेत. अभिनंदन. पत्नीवर आपली मते लादली नाहीत याबद्दलही अभिनंदन.

मूल जर शारिरीक, मानसिकदृष्ट्या नॉर्मल असेल ( याची वैद्यकीय तपासणी करून मिळते दत्तक घेण्यापूर्वी ) तर मूल कसल्या संबंधातून , कुठल्या परिस्थितीत जन्माला आलंय याचा त्याच्या पुढिल आयुष्यात काही फरक पडत नाही.

सख्या, तुम्ही कायदेशीर मार्गाने दत्तक घेणार असाल तर कुठल्याही माम्यताप्राप्त संस्थेत तुम्हा दोघांच्याही शरिरिक आर्थिक आणि मानसिक सामर्थ्याची पडताळणी होईलच. शिवाय तुमच्या पश्चात कुणी रिलायबल व्यक्ती तुमच्या मुलाची काळजी घ्यायला तयार आहे का ते ही अ‍ॅफडेविट करून द्यावे लागेल. तुमच्या पत्नीला हृदयविकार आहे असे म्हनता तर त्या हा एक मूल सांभाळण्याचा शारिरीक, मानसिक स्ट्रेस सहन करू शकतात का ते ही तपासून घ्या.

साती, असे अनुवंशिक विकार नसतात का की जे पुढील आयुष्यात डोकावतील. माहीत नाही म्हणून विचारले. तसेच, जीन्सबाबत तुमचे म्हणणे काय तेही माहीत करून घ्यायचे आहे

<<<तुमच्या पत्नीला हृदयविकार आहे असे म्हनता तर त्या हा एक मूल सांभाळण्याचा शारिरीक, मानसिक स्ट्रेस सहन करू शकतात का ते ही तपासून घ्या.>>>

हे पटले

सध्या वाचतेय. रुणुझुणू प्रमाणे माझी ही मुलगी दत्तक घेण्याची फार इच्छा आहे. मी एकुलती एक आहे. त्यामुळे मला दोन मुलं असावीत असे वाटते. पण स्वतःचा मुलगा असतांना दुसर्‍या बाळाशी घरातील सगळे ( मी धरुन ) समान वागणूक देऊ शकु का ह्याची सध्या चाचपणी करतेय. ह्या धाग्याचा नक्कीच फार उपयोग होईल.

धन्यवाद मामी, मी पोस्ट लिहिल्यानंतर काही काळ निर्माण झालेल्या सन्नाट्यामुळे मला वाटले मी भलतेच लिहून गेलो

बेफि, तुमची पोस्ट या विषयावरील एका महत्वाच्या पैलुवर प्रकाश टाकणारी नक्कीच आहे! त्यातला तुम्ही (तुमच्या पत्नीचा) मांडलेला विचार योग्य की अयोग्य हे सांगता येणार नाही.

या संपूर्ण प्रक्रियेत वैद्यकीय फॅक्टस सोडल्यास बाकीचे सगळे योग्य वा अयोग्य हे जोडप्यागणिक बदलणार.
स्वतःला जे जमतंय तेच महत्वाचं.

Pages