मुल दत्तक घ्यावे की नाही?

Submitted by सख्या on 2 July, 2012 - 04:44

मित्रहो, मला लग्नानंतर मुलगी झाली होती पण जन्मल्यापासून ती आजारीच होती, चार महीन्यांची असताना गेली. माझ्या लग्नाला ३ वर्षे झाल्येत. दोन वर्षापासुन प्रयत्न करत आहोत. मिसेसला हृदयविकाराचा त्रास आहे. तेंव्हा चान्स घेण्याची पण भिती वाटते. बहुतेक आता घेणारच नाही.
मला मुल दत्तक घ्यायचं आहे. ६ महिन्याच्या आतलं बाळ मिळेल का? कुठे? कसे? काय कायदे आहेत त्यासाठी? इथे कुणी अनुभवी लोक आहेत का? घरचे बाकीचे लोक तयार होतील का? खुप प्रश्न आहेत.
मी,मिसेस फार डेस्प आहोत बाळासाठी. काय करावे? मुलीच्या आठवणीतुन अजुन बाहेर पडलो नाहीओत. शक्य असल्यास मुलगीच दत्तक हवी आहे.क्रुपया हेल्प करा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रैना & मैना, मस्त पोस्टस. मैना तुझं विशेष अभिनंदन.

माझ्या मैत्रिणीला एक मुलगी आहे, पण त्यांनी आधीच ठरवल्याप्रमाणे एक बाळ नुकतंच दत्तक घेतलं. खुप सार्‍या कायदेशीर बाबी आणि खुप सार्‍या फॉरमॅलिटीज पुर्ण कराव्या लागतात. कित्येक महिने ते वर्ष एवढा लांब काळ असतो. यामधे संस्थेची लोक घरी भेट देतातच शिवाय घरच्या लोकांनी बाळाला अनेकवेळा भेटणं बंधनकारक असतं. घरच्या लोकांना आणि आधीच्या मोठ्या भावंडाला कौन्सेलिंग वगैरे बरंच काही होतं. बाकी कित्येक बाबी ऐकुन माहित होत्या, पण एक गोष्ट मला विशेष अपिल झाली म्हणजे, संस्था बाळ दत्तक देताना शक्यतो फॅमिलीच्या रंगरुपाला मॅच होइल असं बाळ देण्याचा शक्य तितका प्रयत्न करते.
लॉजिक हेच कि बाळाला मोठं झाल्यावर आपण वेगळं दिसतो, या कुटुंबाचा भाग नाही आहोत हे सतत वाटु नये. शिवाय कल्पना करा कि सगळं कुटुंब सावळं आणि गोरंपान बाळ हातात तर बाहेरच्या लोकांच्याही तो फरक पटकन लक्षात येतो. किंवा गोर्‍यापान कुटुंबात सावळ्या मुलीला मोठेपणी (कदाचित) न्युनगंड वाटु शकतो. लुक्स, रंग हे बायोलॉजिकल पेरेन्टसचेही वेगळे असु शकतात पण शक्यतो या गोष्टी दत्तक घेताना टाळल्या तर हे मुल द्त्तक आहे हे पेरेन्टसला आणि त्या मुलाला विसरणं सोपं जात असेल.

उत्तम धागा, आणि उत्तम चर्चा.

दत्तक मूल घेतलेल्या सर्वच पालकांचे अभिनंदन ! इतर अनेकांप्रमाणेच मलाही या चर्चेची उत्सुकता आहेच.

अगदी अगदी. मनीमाऊ असा न्यूनगंड नक्की वाटतो. मी अजूनही माझ्या गोर्‍यापान चुलत बहिणींशी नीट बोलू शकत नाही.

धागा वाचत आहे!
रैना,मैना,बेफिकीर खरंच उत्तम पोस्ट्स!

चांगली चर्चा.
रैना, उत्तम पोस्ट, मैना आणि दत्तक मुल घेतलेल्या इतर सर्वच पालकांचे मनापासुन अभिनंदन.

बेफिकीरांचा वेगळा मुद्दाही पटला. मुल दत्तक घेण्याबाबत दोन्ही पालकांचे (माता-पिता) एकमत असणे गरजेचे आहे.

वत्सला | 3 July, 2012 - 11:29
बेफि, तुमची पोस्ट या विषयावरील एका महत्वाच्या पैलुवर प्रकाश टाकणारी नक्कीच आहे! त्यातला तुम्ही (तुमच्या पत्नीचा) मांडलेला विचार योग्य की अयोग्य हे सांगता येणार नाही.

>>>> नाही वत्सला, यात योग्य / अयोग्य काहीच नाही. विचाराची सुस्पष्टता असणं महत्त्वाचं.

नीधप | 3 July, 2012 - 11:50
या संपूर्ण प्रक्रियेत वैद्यकीय फॅक्टस सोडल्यास बाकीचे सगळे योग्य वा अयोग्य हे जोडप्यागणिक बदलणार.
स्वतःला जे जमतंय तेच महत्वाचं.
>>>> अगदी अगदी.

एक मुलगी झाल्यावर आम्ही दुसरी मुलगी दत्तक घेण्याचा विचार करत होतो. नवरा तयार होता, पण मला माझ्या मनाची खात्री नव्हती. मूल झालंच नसतं तर मी सहजपणे दत्तक घेऊ शकले असते. पण एक मुलगी स्वत:ची असताना, दत्तक घेतलेल्या बाळाला वाढवताना जर चुकुनही माझ्या मनात कधी "ही माझी नाही म्हणून ...." असा विचार आला असता तर मी स्वतःला माफ करू शकले नसते. या भयापायी पुढे तो विचार सोडून दिला. मला मुलाबाळांची फारशी आवड नाही हे कारणही बॅकग्राऊंडला होतंच.

माहितीत अनेक जोडप्यांनी दत्तक घेतलेली उदाहरणं आहेत आणि सगळ्या कथा सुखाच्याच पाहिल्या आहेत.

रच्याकने, हल्ली कुटुंबात आधी मुलगा (स्वत:चा वा दत्तक घेतलेला) असेल तर मुलगी आणि पहिली मुलगी असेल तर मुलगाच दत्तक घ्यावा लागतो असं काही आहे का?

सख्या आणि इतर अनेक दत्तक घेऊ इच्छिणारे यांच्यात एक महत्वाचा फरक आहे. सख्या यांचे पहिले अपत्य चार महिन्याचे झाल्यावर हे जग सोडून गेले. आधीचे नऊ व जन्मानंतरचे चार महिने असा एक वर्षाहून अधिक काळ त्यांना व त्यांच्या पत्नीला पालकत्व, अपत्यप्राप्ती , त्यासाठीची मानसिक, आर्थिक, वैद्यकीय तयारी आणि लळा या सर्वांचा समक्ष अनुभव आला.

ज्यांना अपत्य होतच नाही किंवा ज्यांना एक अपत्य असताना एखाद्या परक्या निराधार बालकाचे आयुष्य सुस्थितीत आणावे या हेतूने दत्तक घ्यायचे असते त्यांच्यात व सख्या यांनी सांगितलेल्या स्वानुभवात गुणात्मक फरक फार मोठा आहे.

सख्या यांच्या पत्नीसाठी व खुद्द सख्या यांच्यासाठी मूल असणे ही गरज खालील घटकांमधून निर्माण झालेली आहे:

१. आधीच्या मुलाचा लळा व त्यातून मिळणारे अमाप समाधान

२. निर्माण झालेली पोकळी व त्यामुळे आलेली सुन्नता, माया बरसवण्याच्या ऊर्मीला सुयोग्य व्यक्तीच नसणे

३. पुन्हा मूल होणे काही कारणाने अवघड असणे

४. कुटुंबाला पूर्णत्व यावे हाही एक उद्देश

दत्तक घेण्याच्या मानसिकतेत बरेच वैविध्यपूर्ण प्रकार दिसतात. त्यातील सख्या यांची मानसिकता ही 'तीव्र भावनिक' स्वरुपाची असल्याने तेथे 'दत्तक घेण्यातील काही संभाव्य धोके' या घटकाला विशेष महत्व नाही. जसे मामी यांनी त्यांचा स्वतःचा विचार व्यक्त केला आणि दत्तक घेतलेल्या मुलावर चुकून का होईना अन्याय तर होणार नाही ना याची चिंता वाटून त्यांनी तो निर्णय टाळला तसे सख्या यांच्याबाबतीत संभव नाही.

त्यामुळे साती म्हणतात त्याप्रमाणे वैद्यकीयदृष्ट्या 'ऑल क्लीअर' बालक इतकी अट पुरेशी आहे.

पण माझ्या अनुभवावरून असे म्हणावेसे वाटत आहे. (क्षमस्व, हे मत फारच वादग्रस्त वाटू शकेलही, पण तो माझा आणि यशःश्रीचा गेल्या पाच सात वर्षांचा अनुभव आहे, त्या आधीची वर्षे आम्ही या गोष्टीसाठी प्रयत्न करत होतो).

'की अपत्य नसतानाही आमचे जीवन अतिशय आनंददायी आहे. इन फॅक्ट, जबाबदार्‍या फारच कमी असल्याने आम्ही कदाचित इतर जोडप्यांना न मिळणारा एक वेगळाच आनंद मिळवू शकत आहोत. हे लिहिताना अपत्य असणे अधिक परीपूर्णतेकडे नेते याचे भान आहे. पण आज दिवस खूप बदललेले आहेत. ज्यांना मुले आहेत त्यांना एकटेही राहावे लागत आहे आणि ज्यांना मुले नाहीत ते अनेकांना हवेहवेसेही आहेत आणि त्यामुळे वेल सपोर्टेडही आहेत. कोल्ह्याला द्राक्षे आंबट या उक्तीनुसार वाईटातून चांगले काढत आहे असे वाटेलही, पण प्रयत्न थांबवताना आम्ही जो विचार केला तो हा, की आपण एकमेकांवर निरतिशय प्रेम करत आहोत आणि आपले आयुष्य जगत आहोत हेही कमी नाही. लळा आम्हाला प्रत्येक दुसर्‍याच्या मुलाचा लागला, पण आम्ही मोकळे मोकळे राहिलो. हे हेतूपुरस्पर करण्याइतकेही 'वर्थ' आहे असे वाटण्याइतपत आनंद मिळू शकतो'

अस्थानी प्रतिसाद मानला जाऊ नये अशी विनंती. आज वाटणारी ऊर्मी दोन वर्षांनी तेवढीच तीव्र असते असेही नाही. दत्तक घेण्यापासून परावृत्त करण्याचा हा प्रयास नाहीच, पण त्याविनाही एक आनंद निश्चीत असतो असे आपले माझ्यापुरते म्हणतो.

चर्चा भरकटू शकण्याचा दोष पत्करूनः

जन्माला घातलेल्या मुलांचे सर्व काही केल्यानंतर ती लांब निघून जाऊ शकतात. वेळेला उपलब्ध नाहीत असेही होऊ शकते. आणि त्यांच्या सर्व जडणघडणीच्यावेळी आपण मात्र स्वतःचा ऐन उमेदीचा काळ घालवतो. दुर्दैवाने आपल्या नशिबात मूल नसलेच, तर फार वाईटही वाटून घेऊ नये इतकेच म्हणण्यासाठी निबंध लिहिला

चर्चा खुप छान सुरु आहे. Happy

वाचतोय.
रैना, मैना व इतर खुप छान लिहिल आहे तुम्ही.
बेफीकीर यांच्या वेगळी बाजु दाखवणार्‍या पोस्टही चांगल्या आहेत.

बेफिकिर, सुंदर पोस्ट.

रच्याकने, हल्ली कुटुंबात आधी मुलगा (स्वत:चा वा दत्तक घेतलेला) असेल तर मुलगी आणि पहिली मुलगी असेल तर मुलगाच दत्तक घ्यावा लागतो असं काही आहे का?

बहुतेक असे आहे. माझ्या मैत्रिणीसाठी दत्तकाची माहिती काढताना मी हे वाचलेले. . पहिले मुल (स्वतःचे/दत्तक जसे असेल तसे) जर मुलगी/मुलगा असेल तर दुसरी मुलगी/मुलगा दत्तक घेता येत नाही, पण त्या दुस-याची गार्डियनशिप घेता येते. आपल्यासोबत घरात त्या दुस-या मुली/मुलाला ठेवता येते. दुसरा मुलगा/मुलगी मात्र दत्तक घेता येते.

दत्तक घेणे आणि गार्डियनशिप घेणे यात फरक आहे. या नियमात बदल झाला असल्यास माहिती नाही.

<< जन्माला घातलेल्या मुलांचे सर्व काही केल्यानंतर ती लांब निघून जाऊ शकतात. वेळेला उपलब्ध नाहीत असेही होऊ शकते. आणि त्यांच्या सर्व जडणघडणीच्यावेळी आपण मात्र स्वतःचा ऐन उमेदीचा काळ घालवतो. दुर्दैवाने आपल्या नशिबात मूल नसलेच, तर फार वाईटही वाटून घेऊ नये इतकेच म्हणण्यासाठी निबंध लिहिला >>

बेफिकीर, मनापासून पटली ही वाक्ये. Happy उत्तम पोस्ट.
मूल होत नाही आणि दत्तक घ्यायची मानसिक तयारी नाही अशा अवस्थेत हातात असलेलं आयुष्य झुरून काढण्यापेक्षा हा अ‍प्रोच खरंच खूप चांगला आहे.

दत्तक घेणे हा कितीही भावनिक प्रश्न असला तरी बुद्धीच्या निकषांवर घासूनच निर्णय घेतला गेला तर यशाची शक्यता जास्त.

बेफ़िकीर उत्तम पोस्ट. दुरून डोंगर साजरेच दिसतात प्रत्यक्ष चढताना मात्र धाप लागते. पण डोंगर चढलाच नाही तर त्यातली मजा कळणारच नाही. हे दोन्ही मुद्दे वास्तवच आहेत. आपली जातकुळी ओळखून योग्य पर्याय निवडावा.

छान चर्चा चालू आहे. सगळ्यांनीच छान लिहिले आहे. बेफि, तुमचं म्हणणं व्यवस्थित पोचतंय आणि पटतंय. Happy

'की अपत्य नसतानाही आमचे जीवन अतिशय आनंददायी आहे. इन फॅक्ट, जबाबदार्‍या फारच कमी असल्याने आम्ही कदाचित इतर जोडप्यांना न मिळणारा एक वेगळाच आनंद मिळवू शकत आहोत. हे लिहिताना अपत्य असणे अधिक परीपूर्णतेकडे नेते याचे भान आहे. पण आज दिवस खूप बदललेले आहेत. ज्यांना मुले आहेत त्यांना एकटेही राहावे लागत आहे आणि ज्यांना मुले नाहीत ते अनेकांना हवेहवेसेही आहेत आणि त्यामुळे वेल सपोर्टेडही आहेत. कोल्ह्याला द्राक्षे आंबट या उक्तीनुसार वाईटातून चांगले काढत आहे असे वाटेलही, पण प्रयत्न थांबवताना आम्ही जो विचार केला तो हा, की आपण एकमेकांवर निरतिशय प्रेम करत आहोत आणि आपले आयुष्य जगत आहोत हेही कमी नाही. लळा आम्हाला प्रत्येक दुसर्‍याच्या मुलाचा लागला, पण आम्ही मोकळे मोकळे राहिलो. हे हेतूपुरस्पर करण्याइतकेही 'वर्थ' आहे असे वाटण्याइतपत आनंद मिळू शकतो'

>>> अगदी पटलं. असं वाटणंही अगदी नैसर्गिक आहे.

बेफिकीर, दोन्ही पोस्ट अतिशय सुरेख. काळजावर दगड ठेवून लिहीले असणार तुम्ही.

इथे अस्थानी वाटेल कदाचित पण एकटे पालक असणार्‍या फॅमिलीज आणि तुमच्यासारखे काकाकाकू एकत्र आले तर मुलांना एकत्र कुटुंबात वाढताना जी नाती आवश्यक असतात ती मिळतील आणि मुलांच्या आयुष्यात मीनिंग फुल अ‍ॅडल्ट इन्फ्लुअन्स म्हणून येण्याचा अनुभव अश्या जोडप्यांना मिळेल. इट टेक्स अ व्हिलेज टू रेज अ चाइल्ड ह्यावर माझा जाम विश्वास आहे म्हणून लिहीते आहे.
मी दत्तक पुत्री, लग्नानंतर १६ वर्शे निपुत्रिक, एकटी पालक ह्या सर्वच भूमिकांमधून गेले असल्याने लिहीत आहे. कृपया राग मानू नये.

अश्विनीमामी, एक स्त्री असून तुम्ही जे लिहीत आहात ते माझ्या सर्व प्रतिसादांपेक्षा मला मौल्यवान वाटले. असो, एकमेकांच्या स्तुतीने धागा रूप बदलेल. ''इट टेक्स अ व्हिलेज टू रेज अ चाइल्ड '' हे वाक्य फार आवडले.

राग मानण्याचा प्रश्नच नाही

बेफीकीर, उत्तम पोस्ट.
पण दोघांपैकी एक जण खरंच आपल्याला काय पाहीजे म्हणून किंवा आपली जातकुळी काय हे ओळखायला असमर्थ असेल तर? कन्फ्युज असेल तर?

लळा आम्हाला प्रत्येक दुसर्‍याच्या मुलाचा लागला, पण आम्ही मोकळे मोकळे राहिलो >> लळा प्रत्येकच स्नेह्यांच्या मुलांचा लागतो, पण आपलं ते आपलंच असतं हे ही पक्कं माहीत आहे, मग ते दत्तक मुल का असेना.

रैना तुझ्या पोस्टीची वाट पहात आहे.

मित्रहो, अनेक धन्यवाद. सध्या पुण्यात आहे.
बेफीकीर्,रैना, मैना मनोबल उंचावले. मानसिक तयारी होणं हे खूप महत्वाचं आहे. सध्या अशी एक फेज आहे की निर्णय घ्यायचा तर आहे पण पुढे काय होईल हे कळत नाहीये. सगळं आपल्याला वाटेल तसच होईल का ही एक अनामिक भितीही आहे किंवा माझ्या स्वभावानुसार बाय्कोचे म्हणणे आहे की मीच अ‍ॅक्सेप्ट करु शकेन का? हे वाचून काही निर्णयाप्रत येउ असे वाटते.

मैना, ज्या पद्धतीने तुम्ही हे हॅण्डल करत आहात ते खरच कौतुकास्पद. रैना, छान माहिती आणि कौतुक तुमचंही

बेफिकीर, अतिशय सुरेख आणि पॉझिटिव्ह पोस्ट्स.

बेफिकीर,

तुमच्या प्रश्नांबद्दल

अनुवंशिक आजार-

हे अक्षरशः हजारो आहेत आणि सगळ्याच साठी जन्माच्या वेळी स्क्रिनींग करणे शक्य नसते. मग ते आपलं मूल असो का दत्तक.
इथे आमच्या गावात तरी मूल दत्तक देताना तपासणीकरता मेडिकल कॉलेजात, डिस्ट्रिक्ट हॉपिटलात आणले जाते तेव्हा आम्ही
१.ग्रोथ नॉर्मल आहे का
२.अ‍ॅपरंट काही कंजेनायटल अ‍ॅनोमली दिसतेय का?
३.सरकारी हॉस्पिटलातल्या साध्या ब्लड टेस्ट जसे हिमोग्लोबिन, ब्लड स्मिअर, एच आय वी,हिपॅटायटिस आणि किडनी व लिवर फंक्शन टेस्ट करतो. यात काही संशयस्पद असेल तरच पुढिल महागड्या टेस्ट
४. तपासताना शंका आल्यासच एकोकार्डिओग्राफी आणि सोनोग्राफी अ‍ॅब्डोमेन केले जाते अन्यथा नाही.

या सगळ्या तपासण्यातून सुटणारे शेकडो अनुवांशिक आजार आहेत. हे आपल्या स्वतःच्या मुलालाही अचानक येऊ शकतात. तेव्हा आपण नशीबाचा भाग म्हणून सोडतो ना?
मग इथेही सोडावा लागेल.

काही पालक मुद्दाम अंडर प्रिविलेज, शारिरीक व्यंग असलेल्या गटातील मुले दत्तक घेवून वाढवतात पण त्यात चॅरिटी किंवा धार्मिकता (मी पाहिलेली अशी व्यंग दत्तकाची एकूणेक उदाहरणे एका विशिष्ट धार्मिक गटातलीच आहेत)आणि आईबाप बनण्याची इच्छा किती हे सांगणं कठिण.

जेनेटिक पूल-

हा बराच वैयक्तिक प्रश्न.
मी एवढी काय ग्रेट लागून गेले की माझा जेनेटिक पूल जपला जावा असं मलाही वाटतं.
पण जेव्हा माझ्या सख्ख्या मुलाच्या दिसण्यात वागण्यात माझे, माझ्या खानदानाचे ट्रेटस दिसतात तेव्हा मला फारच आनंद होतो. खास करून नवर्‍याच्या तरूणपणीच्या वागण्याबोलण्यातले ट्रेटस जे हल्ली वयोमानानुसार आणि मॅच्युरिटीमुळे त्याच्यातही प्रत्यक्ष दिसत नाहीत ते मुलात बघताना काय वाटतं ते सांगता येत नाही.

पण बर्‍याच दत्तक पालकांच्यात आणि त्यांच्या मुलांतही आवाज,रंग, फेशीयल एक्सप्रेशन अगदी आई-बाबांसारखे दिसतात. वरती कुणीतरी म्हटल्याप्रमाणे शक्यतो कुटुंबियांच्या रंगरुपाशी मिळतं जुळतं बाळ देण्याचा प्रयत्न या संस्था करतातच पण तसं नसलं तरी सहवासाने असे गुण,छंद,आवडी आलेले पाहिलेत.

मला खात्री आहे, आपल्या रैना,मैना यांना नक्की बाळाचं हे अमकं तुझ्यावर/ तुझ्या नवर्‍यावर / सासरच्यांवर माहेरच्यांवर गेलंय अश्या छान छान काँप्लिमेंट्स ज्यांनाहे मूल दत्तक आहे हे माहिती नाही त्यांच्याकडून मिळाल्या असतील.

मलाच हल्ली लग्नानंतर ७ वर्षानी कुठे सासूबाईंबरोबर गेले तर तुझ्या आई का या असं विचारतात इतकं आमचं चालणं बोलणं आणि दिसणं मॅच झालंय. Happy
आम्ही हो सांगितल्यावर बघूनच कळतं असं म्हणतात. हे आमचे जात,धर्म्,भाषा,राज्य सगळं वेगळं असताना.

मग लहानपणापासून आपण आपल्यासोबत प्रेमाने आणि विचारपूर्वक(हे खास कारण बायॉलॉजिकल मूल आपण विचारपूर्वक, काही एक भूमिका ठेवून वाढवूच असं नाही,पण दत्तक मूल नक्कीच) वाढवलेले मूल नक्कीच आपले ट्रेटस्,सवयी काही प्रमाणात घेईल.

निर्मिती-
प्रत्येक छान गोष्ट आपण निर्माण केली असेल तरच आवडते असे थोडेच आहे. देवाने/निसर्गाने निर्माण केलेल्या
गोष्टीही आपल्याला अतिशय जास्त आवडतात काही वेळेस.

जन्मावेळची स्थिती-
आऊट ऑफ वेडलॉक किंवा बलात्कारातून जन्मलेल्या मुलाचं ते नको असणं मुलाच्या वाढित किंवा संस्कारात काहीच फरक घडवत नसतात.
अगदी वेडलॉकमध्ये जन्मलेली काही मुले सुद्धा आईवडिलांच्या मनाविरुद्ध, लग्नांतर्गत बळजोरी अशाप्रकारे जन्मलेली असतात. त्यांच्या अक्षरशः जन्मापर्यंत किंवा नंतरही एका किंवा दोन्ही पालकाना हे मूल झालं नसतं तर बरं असं वाटत असतं.
अशीही काही मुलं एकदम आईवडलांच्या आँख का तारा ते निकम्मा-नाकारा या रेंजदरम्यान कुठेही वाढतात.

वरती मामी म्हणतात तसं मूल वाढवणं ही माझी मानसिक गरज आहे का , आणि मूल आल्यावर मी त्याला १०० % देईन का याचं उत्तर जर दोन्ही पालकांकडून/ किंवा सिंगल पॅरेंटनी दत्तक घेतल्यास तिच्या/त्याच्याकडून हो असल्यासच दत्तक काय किंवा बायॉलॉजिकल काय मूल घरी आणावं,हेच खरं सुजाण पालकत्व.

अश्विनीमामी, वरची पोस्ट अगदी मनापासुन पटली.

साती, फार सुरेख पोस्ट आहे तुझी. माझ्या कन्फ्युज्ड मित्र-मैत्रिण कपलला नक्की ट्रान्सलेट करुन देइन. त्या दोघांनाही मुल दत्तक घ्यायचं आहे, पण एवढा एकच मुद्दा अडवुन होता. तुझ्या पोस्टने मी कन्विन्स झाले आहे, कदाचित ते दोघंही होतील. थँक्स ! Happy

छान चाललीये चर्चा.
मस्त पोस्ट साती. अगदी पटलं.
माझ्याही फार मनात होतं दुसरं मुल दत्तक घेण्याचं पण वर मामीने लिहीलय तसाच संभ्रम असल्याने पुढचा विचार खुंटला.

अकोला येथे आदर्श शीशु गॄह आहे
अगदी १ वर्षाच्या आतील मुले मुली आहे.
हव असल्यास फोन नं देईल

Pages