कर्माची फळं

Submitted by मृण्मयी on 2 April, 2012 - 16:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ वाट्या नारळाचं दूध.
१ वाटी कैरीचा कीस (आंबटपणाचा अंदाज यावा म्हणून चाखून बघावी.)
४-६ तिखट हिरव्या मिरच्या
२ पेरं आलं
५-६ लसूणपाकळ्या
१ लहान चमचा जिरं
१ वाटी चणाडाळ
१ मोठा चमचा धणेपूड
१ मोठा चमचा काश्मिरी तिखट
१ चमचा तिखट
१ लहान चमचा हळद
मूठभर कोथिंबीर
चवीनुसार मीठ
चवीनुसार साखर
चमचाभर साजुक तूप
६-७ कढिलिंबाची पानं
तळायला तेल (किंवा गोळे उकडायला / वाफवायला पाणी.)

क्रमवार पाककृती: 

फळं:
चणाडाळ ४-५ तास भिजत घालावी

भिजलेली डाळ, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, धणेपूड, मीठ, हळद, तिखट एकत्र करून शक्य तितकं कमी पाणी घालून बारीक वाटून घ्यावी.

या डाळीचे सुपारीएवढे गोळे करून तेलात खरपूस तळून घ्यावे. (गोळे फार घट्टं वळू नयेत. वाटलेली डाळ नीट फेटून घेतली आणि अलगदपणे गोळे वळले तर दडस होणार नाहीत.)

तळण टाळायचं तर हे गोळे चाळणीवर १०-१५ मिनिटं वाफवून किंवा उकळत्या पाण्यात शिजवून घेता येतील.

आमटी:
नारळाचं दूध आणि सालं काढून किसलेली कैरी एकत्र करून बारीक वाटून घ्यावं.

कढत तुपात जिरं तडतडवून गोडलिंबाची पानं घालावी.

वाटण फोडणीत ओतून उकळी आणावी. चवीनुसार मीठ (आंबत वाटल्यास साखर) घालून उकळू द्यावं. साराइतपत पातळ करायला थोडं आधणाचं पाणी घालावं.

गोळे आमटीत सोडून आणखी एक उकळी आणावी.

गरम भाताशी ओरपावं.

वाढणी/प्रमाण: 
२-३ माणसांना
अधिक टिपा: 

आमटीतले गोळे अत्यंत झणझणीत होतील. तेव्हा भातावर घेताना पोटाच्या ऐपतीनुसार गोळे फोडून आमटीत कुस्करावे.

आमटीत जितके गोळे कुस्कराल तितकी ती तिखट होत जाणार. जपून खावी. कर्माची फळं...

माहितीचा स्रोत: 
कढीगोळे या पारंपारिक पाककृतीत बदल.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झणझणीत एकदम. मला कढी विशेष आवडत नाही ( कढीतले गोळे आवडतात ) पण नारळाचे दूध आणि असे वडे म्हणजे काय बिशाद आहे न आवडायची. मस्तच पाककृती Happy

कुणी घरी जेवायला आलं असेल तर मेनू काय या प्रश्नाला "कर्माची फळं" हे नाव भारीये. Proud

कढीगोळेऐवजी कधीतरी करून बघता येइल.

छान.

धन्यवाद!

फोटो पुढल्या आठवड्यात टाकते.

>>कस सुचलं हे नाव?? Biggrin
आवो, आत्ता कसं सांगायचं यान्ला? Proud

Pages