सौ. वीणाताई श्रीकांत सहस्रबुद्धे (थर्ड आय असोसिएशनच्या संचालिका) यांच्या कार्याशी ओळख: संयुक्ता मुलाखत

Submitted by dhaaraa on 25 March, 2012 - 21:26

नशिबाने जरी जग दाखवणे नाकारले तरी आपल्या मनःचक्षूंनी जग पाहू इच्छिणार्‍या दृष्टीहीनांसाठी तिसर्‍या डोळ्याच्या रुपात आपुलकीने मदतीचा हात पुढे करण्यार्‍या नाशिकच्या 'थर्ड आय असोसिएशन' (पुर्वाश्रमीची थर्ड आय फाऊंडेशन) या दृष्टीहीनांसाठी, विशेषतः दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी कार्यरत असलेल्या संस्थेची, आणि संस्थेच्या कामाची ओळख मायबोलीकरांना करून देण्याचा हा माझा प्रयत्न! गेली १४ वर्षे विविध अडचणींवर मात करून नेटाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणार्‍या या संस्थेच्या संचालिका आहेत - सौ. वीणा श्रीकांत सहस्रबुद्धे! इथे येणार्‍या दृष्टीहीनांना 'अंध' म्हणून न हिणवता, त्यांच्या 'माणूस' असण्याचा आदर ठेवून 'प्रकाशयात्री' असे संबोधले जाते.

जरी प्रकाशयात्रींचे पुनर्वसन हे एकट्या-दुकट्याने करण्याचे काम नसले, तरी प्रकाशयात्रींना शिक्षणाने समृद्ध केल्यास त्यांचे आयुष्य जास्तीत जास्त सहज-सोपे करता येणे, नक्कीच शक्य आहे. आणि म्हणूनच संस्थेचं मुख्य काम प्रामुख्याने विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षणाशी निगडीत बाबींवर चालते. इथे प्रामुख्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचे, तसेच शक्य तितक्या अभ्यासेतर पुस्तकांचे ध्वनीमुद्रण, आणि त्यांचं नि:शुल्क वितरण करणे, प्रकाशयात्रींना मानाने जगण्यासाठी मदत करू शकतील, त्या सर्व गोष्टी जसं की, त्यांच्या कौटुंबिक/सामाजिक जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी जमेल तितकी मदत करणे, त्यांच्या छंदांच्या वृद्धीसाठी त्यांना योग्य मार्ग दाखवणे, जगरहाटीत टक्के-टोणपे खाऊन थकलेल्यांचं-खचलेल्यांचं समुपदेशन करणे, त्यांना संगणक प्रशिक्षण देणे, नवनविन सॉफ्टवेअर्स शिकवणे, त्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा-परिक्षांची तयारी करवून घेणे, विषय समजण्यासाठीच्या चर्चा-वाद-विवाद करणे, आणि अशाच विविध अडचणींवर मात करण्यासाठी मार्ग शोधणं, असली अगणित कामं या संस्थेत चालतात - जेणेकरून त्यांनी आणि अर्थात आम्हीसुद्धा, आतल्या नजरेने डोळसपणे जगावं. म्हणूनच वीणाकाकूंनी संस्थेचं ब्रीद वाक्य हे 'अंतर्दृष्टी: परमो लाभः' निवडलं आहे.

या संस्थेच्या अशा अनेक लहान-सहान बाबींविषयी ओळख करून देण्यासाठी वीणाताईंची मी घेतलेली मुलाखत मायबोलीकरांसाठी इथे देत आहे. सध्या त्यांचा उजवा हात बनून त्यांच्या प्रत्येक कामास हातभार लावणार्‍या, दृष्टीहीन असलेला, संस्थेचा माजी विद्यार्थी आणि सध्याचा खंदा कार्यकर्ता 'अरविंद'चाही उल्लेख अधून-मधून होईल.

'थर्ड आय'विषयी/वीणाताईंविषयी आलेले लेख/विडीयोज या मुलाखतीच्या शेवटी दिलेले आहेत.

'थर्ड आय असोसिएशन'च्या नावातील ‘थर्ड आय’चा अर्थ काय आहे?
वीणाताई:
आपल्याला ज्या विद्यार्थ्यांचे नैसर्गिकपणे मिळालेले डोळे काही कारणाने गेले आहेत अशा दृष्टिहीन मुलांना ज्ञानाचा तिसरा डोळा मिळवून द्यायचा आहे, म्हणून संस्थेचे नाव आपण 'थर्ड आय असोसिएशन' ठेवले आहे. आधी ते फाउंडेशन होतं, पण रजिस्ट्रेशनमधे त्या लोकांनी परवानगी दिली नाही, म्हणून ते 'असोसिएशन' केलं.

तुमचा हा वेगळ्या वाटेवरचा प्रवास कसा सुरू झाला?
वीणाताई:
१९९८ साली काम सुरू करण्याचा मुख्य कारण हे होतं की, चाळीशीत हार्मोनल चेंजेसमुळे मला आलेलं नैराश्य! आणि ते अशासाठी होतं, की शाळेमध्ये अभ्यास आणि अभ्यासेतर उपक्रमांमध्ये अतिशय हुशार विद्यार्थिनी, म्हणून मी प्रसिध्द होते. काहीतरी वेगळं करेन, अशा सगळ्यांच्या अपेक्षा होत्या. पण तसं काही घडलं नाही, आपली हुषारी वाया गेली, असं नैराश्य आलं होतं. घराशेजारी असणारी के. जे. मेहता हायस्कूलमधले ब्लाइंड युनिट्समध्ये लहानमोठ्या मुलांना, सरांना मी पहायचे. मग असं वाटायचं, 'दोन मिनिटांसाठी घरात अंधार झाला तर आपण धडपडतो, उभं आयुष्यं ही लोकं कसं काढत असतील?! देवानं आवाज ऐकला म्हण, किंवा काही म्हण, माझ्या घराजवळून जाणार्‍या नाशिक-पुणं हायवे क्रॉस करून देण्याच्या निमित्ताने तिथल्या बाविस्करसरांशी ओळख झाली. लोक म्हणतात की गुरू भेटावा, आणि तो गुरू त्यादिवशी भेटला. त्या दृष्टीहीन गुरूने त्यांच्या या डोळस शिष्येला मार्ग दाखवला. त्यांच्या मार्गदर्शनाने सुरूवातीला विद्यार्थ्यांची ‘मदतनीस’ म्हणून काम सुरू केले आणि तेव्हापासून आजतागायत १४ वर्षांचा प्रवास कसा झाला ते कळलंसुध्दा नाही.

चौदा वर्षं झाली ताई?
वीणाताई :
हो, चौदा वर्षं झाली बेटा! बाविस्करसरांनी ध्वनीमुद्रण(रेकॉर्ड) कसं करायचं, कॅसेट्स कशा करायच्या शिकवलं. लहानपणीच नाटकांच्या कामांची, व्हॉइस मॉड्युलेशनची सवय होती. आवाजाचा खणखणीतपणा होता. या सगळ्याचा उपयोग कामामध्ये झाला. पहिली आठ वर्षं शेजारच्या भिंतींनाही माहिती नव्हतं मी काय करतेय. लोकं इतकं मूर्खात काढायचे… म्हणायचे, 'काय काम करतेय? नवरा चांगला बँकेत आहे. खावं, प्यावं, आराम करावा,… हे सोडलं आणि कशाच्यातरी मागे लागते.' कारण एक समजच आपल्या समाजात असा आहे की, दृष्टीहीनांकडे काही करण्याची क्षमताच नाही. पूर्वी तर अंध मुलं जन्माला आली की, भीक मागायलाच सोडून दिली जायची. आता तीच लोकं मला विचारतात, '१४ वर्षं झाली, तुम्हाला कंटाळा नाही का आला?'

मी पण तुम्हाला हेच विचारणार होते. १४ वर्षं टिकून राहिली तुमची आस?
वीणाताई:
कारण येणारा प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. वेगळ्या परिस्थितीतून आलेला असतो. त्याची धडपड पाहिली की, आपल्या जगण्याला काहीतरी उमेद येते. आपण सतत रडत राहतो, आम्हाला हे आहे, ते नाही. ही मुलं कुठे कुठे जातात, काय काय करतात! अरविंदसारखा मुलगा आज कामा हॉस्पिटलला टेलीफोन ऑपरेटर आहे. नुसतं तेवढंच नाही तर, स्वतः दृष्टीहीन असताना तो दुसर्‍या एका दृष्टीहीन मुलाचं शिक्षण करतोय! खरंतर मोठ्या मोठ्या दानशूर लोकांबरोबर त्याची बरोबरी झाली पाहिजे. हीच जगण्याची प्रेरणा झाली की नाही?

मग तुम्ही एकटीपासून सुरू करून ‘थर्ड आय असोसिएशन’पर्यंत कसं पोचलात?
वीणाताई:
कसं व्हायचं, की मुलं समाजकल्याणच्या हॉस्टेल्सवर राहणारी होती. तिथे माउथ पब्लिसिटी झाली. मग हळूहळू मुलं यायला लागली. २००३-२००४मध्ये पण सकाळी ८ ते दुपारी ४ वाचन करायची आणि ४ नंतर मी रेकॉर्डिंगला बसायची. पहिल्यापासूनचं एक स्वप्न होतं, की जी कोणी, दोन येवोत, चार येवोत, चाळीस येवोत की चारशे येवोत, या मुलांनी पायांवर उभं राहता येण्यासाठी काहीतरी शिकलं पाहिजे. एवढी एक धडपड मात्र जरूर केली. पुढे प्रवीण दवणेसरांनी संपूर्ण महाराष्ट्राला या कामाची ओळख करून दिली, की असंही काम असतं.

दवणेसरांना कसं कळालं?
वीणाताई:
२००४च्या डिसेंबरला दवणेसरांचा नाशिकमधला पहिला कार्यक्रम होता. २००४ च्या जानेवारीपासून सकाळमध्ये त्यांच्या शिदोरी नावाच्या सदरामधे 'थेंबातलं आभाळ' खाली ते लेख लिहायचे. यात त्यांनी खूप निरनिराळ्या क्षेत्रातले, निरनिराळ्या कामांविषयी लेख लिहिलेले होते. या मुलांना मी अवांतर, अभ्यासाव्यतिरिक्तचं वाचून दाखवायचे. आम्ही 'असा मी असामी' वाचलं, नंतर जयवंत दळवींचं 'सारे प्रवासी घडीचे’ वाचलं. दवणेसरांचा हा जो रोजचा लेख यायचा, तो मी त्यांना वाचून दाखवायची. सरांची भाषा खूप छान आहे. म्हणून मुलांना सरांचं एक आकर्षण निर्माण झालं. सरांचा कार्यक्रम नाशकातच आहे म्हटल्यावर मुलांना सरांना भेटायचं होतं… मग त्यांना फोन केला आणि सर आले इथे, विशेष म्हणजे! त्यांनी तीन तास या मुलांसाठी काढले - खूप गप्पा मारल्या मुलांशी… आणि मग लेख लिहिला - 'काळोखातील इंद्रधनुष्यं' नावाचा! या लेखाने उभ्या महाराष्ट्राला आमच्या कामाची ओळख झाली, आणि खूप लोकं मदतीला पुढे आले.

आधी तुम्ही एकटीने सगळं करत होता. जेव्हा खूप सारी मदत आली, तेव्हा भांबावल्यासारखं नाही झालं?
वीणाताई:
हो तर, भांबावल्यासारखं झालं ना, कारण काहीच माहिती नाही की अशा तऱ्हेची संस्था असू शकते. लोकांनी भराभरा कंप्यूटर्स दिले, कोणी आणखी काही. माझी मैत्रीण चॅरिटी कमिशनरच्याच ऑफिसमधे होती. तिने मला सांगितलं, 'वीणा, असं नुसतं वस्तू जमवून, किंवा डोनेशन घेऊन चालत नाही. आपल्याला रजिस्ट्रेशन लागतं. उद्या उठून कोणी काड्या केल्या तर, तुला तिथे नेऊन उभं करतील आरोपी म्हणून.' २००४ मध्ये मग आम्ही रजिस्ट्रेशन केलं.

प्रकाशयात्री ही संकल्पना का मांडाविशी वाटली?
वीणाताई:
दोन्ही डोळ्यांना दिसत नाही ती मुलं शिक्षण घेऊन प्रकाशाकडे जात आहेत, म्हणून आमचं म्हणणं की ती प्रकाशयात्री आहेत. आयुष्यातला प्रकाश शोधायचाय - कुठल्या रुपानी? तर ज्ञान घेऊन, पायावर उभं राहून, स्वतःच्या आयुष्याला घडवित आहेत.

TEA1.jpg
'थर्ड आयचे प्रकाशयात्री'

संस्थेची ध्वनीमुद्रण(ऑडियो रेकॉर्डिंग) कार्यपद्धती कशी चालते?
वीणाताई:
NAB(National Association for Blind) मुलांना सीडीप्लेयर, टेप रेकॉर्डर उपलब्ध करून देते. ध्वनीमुद्रण करणार्‍या तायांना(संस्थेत स्वयंसेविकांना ‘ताई’ म्हणतात) पुस्तकं, कॅसेट, टेपरेकॉर्डर सगळंच आम्हीच द्यायचो. तेव्हा विद्यार्थ्यांना कॅसेट द्यायचो, पण आता सीडी देतो. आता एक कॅसेट कॅप्चर करायची असेल(कॅसेटचं रुपांतर संगणकाच्या फाईलमध्ये करायचे असेल), तर ते तासभराचं काम असतं. मग तो जो एकेक तास वाढतो, त्याने काम लांबतं. आताशा संगणक घरोघर आढळतो. मग आता ऑडॅसिटी (फ्री सॉफ्टवेअर) डाऊनलोड करून देतो आणि त्याच्यावर ध्वनीमुद्रण कसं करायचं ते शिकवतो. ध्वनीमुद्रण झालं की त्या ते आपल्याला पेनड्राइव्हवर आणून देतात.

मुद्दाम ह्याची आकडेवारी सांगते, ज्यामुळे ही मुलं नक्की काय करतात, हे वाचकांना लक्षात येईल. १५० पानांचं पुस्तक कॅसेटवरती करायचं असेल, तर आपल्याला १२ ते १५ कॅसेट्स लागतात. मुक्त विद्यापीठाचे प्रत्येक वर्षाला ६ विषय असतात. ६ विषयांमधून प्रत्येक विषयाची ३ पुस्तकं. आणि प्रत्येक पुस्तकाच्या जवळ जवळ १० कॅसेट्स होतात. मुक्त विद्यापीठात शिकणारी मुलं एका वर्षात जवळ जवळ १८०-२०० कॅसेट्स ऐकतात. एवढं सगळं नुसतं ऐकून अभ्यास करतात ही मुलं! काही अडलं तर पुन्हा मागे जाऊन ऐका, हे आहेच. पुर्वी जी कॅसेट १२ रुपयांना पडायची ती आता २४ रुपयांना पडते, त्यामुळे कॅसेट्स खर्चिक पडतात. मग फक्त एकाच वर्षाला १२ रुपये/२४ रुपये गुणिले १८० कॅसेट्स, इतका खर्च खूप जास्त होतो. आता mp3 मध्ये रुपांतर केल्याने एका सीडीत भरपूर डाटा देता येतो - जवळ जवळ तीन पुस्तकं एकाच सीडीत बसतात.

आणि अभ्यासक्रम बदलला तर…
वीणाताई:
तर पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागते. सगळा बदललेला अभ्यासक्रम पुन्हा ध्वनीमुद्रित करण्यात एखादं वर्ष सहज जातं. कारण नविन अभ्यासक्रम सुरू झाल्यावर पुस्तके बाजारात येईस्तोवर बर्‍याचदा परिक्षाच जवळ आलेली असते. पुस्तकं मिळाली की ती मुलं धावतपळत ती पुस्तकं आणतात. आम्हाला ध्वनीमुद्रिणाला तेव्हा उपलब्ध स्वयंसेवक, वेळ अशा विविध अडचणींना एकाच वेळी तोंड द्यायचे असते. ज्यांना वेळेवर मिळू शकत नाहीत, ते मग जुन्या पद्धतीने कुणाला तरी वाचून दाखवण्याची विनंती करून त्या वर्षीचा अभ्यास पूर्ण करतात.

आता महाराष्ट्रातल्या ९ विद्यापीठांचे अभ्यासक्रम (पुणे, एसएनडीटी, मुक्त, उत्तर महाराष्ट्र, बाबासाहेब आंबेडकर, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, सातारा) आपण ध्वनीमुद्रित करतो.

संपादन वगैरे कामं कोण करतं?
वीणाताई:
ते अरविंद करतो. अरविंद आणि शोभा. संपादन म्हणजे नको ते आवाज, ओवरलॅपिंग, अधलं-मधलं अडखळणं, वगैरे काढून टाकतो. मग त्याच्या mp3 सीडीज बनतात. मुलांसाठी रिवाईंडिंग करणं सोपं जावं, म्हणून अरविंद संपादन करतानाच निरनिराळे ट्रॅक्स तयार करून सीडी बनवतो. मग या ट्रॅक्सवर सहज पुढे-मागे करता येतं. सांगायला अभिमान वाटतो की, सध्या तरी 'अभ्यासक्रमातील ट्रॅक्ससकटची सीडी' ही फक्त थर्ड आयचंच वैशिष्ट्य आहे. Happy

मुद्दाम अरविंदची माहिती सांगते एवढ्यासाठी, की अरविंदला नजर (vision) १०% आहे. पण M.A. (history) आणि दोनदा MPSC उत्तीर्ण आहे तो! आता तो कामा हॉस्पिटलला टेलीफोन ऑपरेटरची नोकरी करतो. नाशिकहून रोज up-down करतो मुंबईला, आणि मग फावल्या वेळामध्ये तो संस्था सांभाळतो. कॅप्चरिंग करतो, ध्वनीमुद्रण(रेकॉर्डींग) करतो, संपादन करतो.

अरविंद तुम्हाला कसा भेटला?
वीणाताई:
अरविंद २००५च्या जानेवारीमधे मला पहिल्यांदा भेटला. तेव्हापासून काय गेल्या जन्मीचे नाते असेल मला माहिती नाही, पण तो कुठलीही छोटीमोठी गोष्ट मला फोन करून सांगायचा. जेव्हा २००७मध्ये माझं संस्था करायचं पक्कं झालं, माझ्याकडे बरीच मदत गोळा झाली होती, मग मी अरविंदला बोलवून घेतलं. आज जवळजवळ दोन-अडीच वर्षं होऊन गेली, तो आमच्याजवळ आहे.

आता संस्थेत जी मुलं येतात ती सगळी कुठल्या इयत्तेतली असतात?
वीणाताई:
बारावीपर्यंत NABकडून त्यांना ब्रेलमधली अभ्यासाची सगळी पुस्तकं, साधनं उपलब्ध आहेत. बारावीनंतर त्यांना थेट प्रवाहात सोडल्यासारखं होतं. तुम्हा-आम्हालाही मार्गदर्शन करायला लागतंच नं, असंच त्या मुलांना आम्हाला सांगायला लागतं. म्हणून आम्ही FY, SY, TY, MA, UPSC, MPSC, NET, SET आणि सगळ्या स्पर्धा परिक्षा, यासाठीचं ध्वनीमुद्रण करतो. नवीन काही कळलं की, अरविंदच्या ओळखीतली जी जी मुलं पात्रतेची आहेत, तो या मुलांना SMS करतो, कुठल्या जागा आहेत, कुठले फॉर्म्स भरायचे. ही एक आणखी सुविधा आम्ही सुरू केलीय, की कुठल्या-कुठल्या जागा भरायच्या आहेत, ज्यांना ज्यांना फोन करून सांगता येईल, ते तो त्यांना सांगतो. इथे कॉल्स येणार आहेत, अमक्या दिवशी अमक्या ठिकाणी परीक्षा आहे, अर्ज भरा. अर्ज भरून द्यायची सुविधादेखिल अरविंद ऑनलाईन अर्ज भरून देतो.
कमी दृष्टी(low vision) असणार्‍या प्रकाशयात्रींना आपण low vision apparatus देतो आणि वापर शिकवतो. साधारण ७००० रुपयांचे हे यंत्र असते, ज्यायोगे त्यांना लेखनिकाच्या मदतीशिवाय लिहिता येते. आमच्याकडे broadband आहे. ४ कंप्यूटर्स आम्ही LAN केलेले आहेत. जास्तीत जास्त सुविधा द्यायचा आमचा प्रयत्न आहे.
शिवाय आम्ही नेत्रदानाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतो. लोकांकडून त्याचे अर्ज भरून घेण्याचे काम आम्ही करतो.

तुमचं काम महाराष्ट्रभर पसरवायला तुम्हाला खास मेहनत घ्यावी लागली का, की फक्त माउथ पब्लिसिटी पुरेशी होती?
वीणाताई:
अगदी माउथ पब्लिसिटी! दवणेसरांच्या लेखानी महाराष्ट्रभर पोचायला हातभार लावला. त्यामुळे आता अगदी सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, नागपूर, अमरावती, नगर इथून फोन येतात. त्यांच्या सीडीजच्या ज्या गरजा असतील, त्याप्रमाणे आम्ही सीडीज करून पाठवतो.

फोन करणार्‍या संस्था असतात, की मुलंच?
वीणाताई:
कधीकधी मुलंच फोन करतात.

मुलांना कळतं कसं ? दवणेसरांचा लेख प्रसिध्द झाला तो साध्या वृत्तपत्रामधे. दृष्टीहीन मुलांपर्यंत हे पोचतं कसं?
वीणाताई:
लाभार्थी मुलं सांगतात, 'या या मॅडमकडून कॅसेट्स करून घेतल्या होत्या. आवाज चांगले आहेत, चांगलं ध्वनीमुद्रण करतात.' मग मुलं आमचे नंबर घेऊन स्वतः आम्हाला फोन करतात. ही दृष्टीहीन लोकसंख्या सगळ्या भारतभर एकमेकांना किमान नावानं ओळखणारी आहे. त्यांना माहिती आहे - अमुक एक व्यक्ती कोण आहे. नावं सांगा आणि मुलं म्हणतात, 'याला मी ओळखतो, हा मला माहिती आहे.' इतकं strong network आहे.

हे खेड्यापाड्यात पण तेवढंच strong आहे?
वीणाताई:
हो हो. अरविंदसारखी मुलं काय करतात? अरविंद जेव्हा तिकडे जातो, तेव्हा तो त्याच्या मित्रांना हे सांगतो. अरविंदला तर सरकारी GR/ DR पण पाठ असतात. त्याच्या जोरावर भांडायलाही ही मुलं कमी करत नाहीत मग!

नोकरी मिळताना त्यांना कुठल्या प्रकारच्या अडचणी येतात?
वीणाताई:
तोंडी परिक्षा(Viva) जिथे घेतल्या जातात, तिथे यांना डावललं जातं. खरा लाभार्थी यापासून दूरच ठेवला जातो. अरविंदसारखी स्वतःला सिद्ध करणारी मुलं आहेत, ती त्याच्यामधे टिकून राहिली. म्हणजे आता अरविंदची जी नोकरी आहे त्याचं कसं झालं, ही पहिली ५ ते ७ दृष्टीहीन मुलं मेरिटमधे आलेली आहेत, ज्यांचे मार्क्स ९५%च्या वरती होते. त्या लोकांनी या मुलांना डावलायचं ठरवलं होतं. अरविंदनी नेटवरून सगळी माहिती काढली, लातूरच्या एका वकिलांना गाठलं आणि त्यांनी स्टे-ऑर्डर आणली होती! आधी आमचे निकाल काय आहेत ते पहा, आणि मगच हे करा. सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे ही मुलं ‘ओपन कॅटॅगरी’तून बसलेली होती. त्यांनी सांगितलं नव्ह्तं, की आम्ही दृष्टीहीन(Visually impaired) आहोत. कोर्टानी आदेश दिला, की 'या मुलांनी कुठलंच भांडवल केलेलं नाहीये विकलांग आरक्षणाचं, आता तुम्हाला आधी या लोकांना नोकर्‍या द्यायला लागतील.' म्हणून ती नोकरी त्यांना मिळालेली आहे.

पण प्रत्येक वेळी एवढा लढा देणं प्रत्येकाला शक्य नसतं...
वीणाताई:
आणि माहिती नसते. धनंजय भोळे म्हणून आमचा कलीग पुण्यात युनिव्हर्सिटीत कोऑर्डीनेटर म्हणून आहे, त्याने आम्हाला स्पष्टच सांगितलं आहे, 'तुम्हाला जिथे जिथे म्हणून झगडायची वेळ येईल, तिथे तिथे तुम्ही मला सांगा. मी बघीन काय करायचं ते. अगदी राष्ट्रपतींपर्यंत जायची माझी तयारी आहे.' पण बाकी लोक तेवढा उपयोग करून घेत नाहीत नं.

संस्थेत येणार्‍या मुलांची पार्श्वभूमी काय असते?
वीणाताई:
आपल्याकडे कुपोषणामुळे गरिबी आणि अंधत्त्व ह्यांचं पक्कं नातं आहे. गरोदरपणी योग्य आहार, किमान ताजं अन्न न मिळता नेहेमी शिळं/कमी अन्न खाल्ल्याने जर बाळाला अंधत्त्व आलं तर बापासहीत सगळेजण त्याचं खापर आईवरच फोडतात. हातावरचं पोट असतं. मग आईबापांचा जीव कितीही तुटला त्या मुलांसाठी, तरी हात धरून बसता येत नाही नं? त्या मुलांना सांभाळायचं कसं, तर लुटूपुटू करायचं. 'तू बसून रहा रे बाबा, हे करू नकोस, ते करू नकोस…'! एखादा धडाडीचा मुलगा असतो, धडपडणारा, तो स्वतः काहीतरी शिकतो. नाही तर मग ही मुलं एका ठिकाणी बसवून गोळेच्या गोळे तयार होतात. चवथ्या-पाचव्यावर्षी शाळेत नेऊन एकदा टाकले, की आईबाप पण हुश्श्यं करतात. पण त्या शाळेत येण्यामागे संस्कारांचं देणं काही आहे का, तर ‘नाही’! कारण इतक्या लहान वयापासून जी मुलं हॉस्टेलमधे येऊन रहातात, त्यांची मानसिकता काय होत असेल, याचा आपण खूप डोळसपणानी विचार केला पाहिजे. आपली मुलं १८-२० वर्षांची होऊन कॉलेजला जायला तयार होत नाहीत, होस्टेलला रहात नाहीत, किंवा आईबाप पाठवत नाहीत. उलटपक्षी, ही मुलं खेड्यापाड्यातून आलेली, गरीब कुटुंबातली असतात, घर सोडून राहतात, दिवाळी आणि मे महिना यांमधे फक्त नाइलाज म्हणून घरी जाणार. त्याही वेळामध्ये धुडकावलं जाणार. पगारी नोकरांकडून यांचं संगोपन होणार. मोठे झाले की, समाजाच्या लाथा खाणार आणि यातून तुम्ही अपेक्षा कराल की, ते मूल सरळमार्गी असावं! जे काय रुजलेलं असतं, प्रबळ असतं, त्यालाच खतपाणी घातलं जातं तिथे. मग हे जे काय पहातात उघड्या जगातलं, तशी तशी मुलं तयार होतात. आपल्याकडेही एखादा मुलगा होतो खुनी, दरोडेखोर त्याच्यामागचे संस्कारही तसेच असतात नं?

जी मुलं चांगल्या घरांमधनं, आर्थिक स्थिती चांगली असलेल्या घरांमधनं आलेली आहेत, ती इतकी आळशी झालेली आहेत की, स्वतःची कामं स्वतः करतच नाहीत. या मुलांचं आधी आईवडील करत राहतात, मार्ग शोधत नाहीत आणि मग नंतर एक वेळ अशी येते, की त्यांच्याने होत नाही, मग संस्था शोधायच्या, मग त्यांच्या सवयी बदलायच्या! लहानपणापासूनच त्यांना स्वावलंबी बनवण्याचं भान आपल्याला हवंच. मग आम्ही सांगत राहतो की, मुलांना स्वतःची कामं स्वतः करू द्या.

जसं आपण डोळस माणसं प्रत्येक माणसाबद्दल आकस धरून असतो - हा माझ्याशी असं वागला, तो माझ्याशी असं वागला. ही मुलं तर सगळ्या समाजाबद्दल आकस धरून आहेत, की आम्हाला डोळस माणसं धड वागवत नाहीयेत. आणि का नसावा..? सततची हेटाळणी आणि लैंगिक अत्याचारापर्यंत केसेस जातात. हा असा जर प्रवास असेल तर साहजिकच ते तुमच्यावर अविश्वास दाखवणार आणि लोकं म्हणतात, 'ही मुलं आमचं ऐकत नाही, ही मुलं आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत.' का ठेवावा? तुम्ही ठेवाल का अशा परिस्थितीत विश्वास?

डोळे नाहीत म्हणून त्यांच्याकडून सद्वर्तनाची अपेक्षा समाज करत राहतो. जे काय चांगलं वागायचं ते तुम्ही वागायचं, आणि फायदा घ्यायला आम्ही आहो. सगळ्यांच्या बाबतीत हेच पाहिलेलंय. या मुलांना वापरून घेतलं जातं. कुठलीही असू देत -दृष्टीहीन असू देत, मूक-बधीर असू देत. या सगळ्यांच्या जीवावरती संस्था चाललेल्या आहेत. समजा आता मी ३५ मुलं पटावरती दाखवली तर ग्रँन्ट्स मिळतात. मदत केल्यावर मुलं पायावर उभं राहतीलही, पण शेवटचा मुलगा उभा राहील तेव्हा आमच्या अस्तित्वाचं काय, या विचाराने सामाजिक संस्थाच त्यांना मागे खेचतात. नीट पुढे पाठवायचं नाही, नीट ट्रेनिंग्ज द्यायची नाहीत. ही मुलं गणितं वगैरे इतकी सुंदर करू शकतात. पण गणिताचं, सायन्सचं त्यांना काही शिकवायलाच तयार नाहीये. का म्हणून आम्ही शिकवायचं, अशी मानसिकता आहे.

अशा संस्थांमधून मुलं आली की तुम्ही त्यांना कसं समजवता?
वीणाताई:
आपला स्वतःचा आदर्श आपण त्यांच्या डोळ्यांसमोर ठेवायचा. अरविंद आणि शोभा कसं आम्हा दोघांना पाहून व्यवस्थित वागतात, किंवा वागायचा प्रयत्न करतात. त्यांच्यात जी काही कमतरता आहे, ती दूर करायचा प्रयत्न करतात. त्यांनादेखिल वेळोवेळी ते सांगावं लागतं की, 'बाळा, आपल्याला स्वाभिमानानी जगायचं आहे.'

स्वाभिमानाचं कधी दुसरं, चुकीचं टोक गाठलं जातं का या मुलांकडनं?
वीणाताई:
आहे नं! काही मुलं तशी पण आहेत! आम्हाला कुणाची गरज नाहीये म्हणणारी. तेव्हा थोडसं समजवायला लागतं , 'बाळा, आयुष्यात आपली जे काय अवलंबित्व आहे, ते स्वीकारायलाच पाहिजे. कुणा एकाचा हात धरून तुम्ही चाला.’ लेखनिकाच्या (रायटर्स)बाबतीत मुलांना सांगायला लागतं, 'एकच लेखनिक(रायटर) घेऊन चालावं, म्हणजे विचार जुळतात. समन्वय व्यवस्थित होतो.' प्रयत्न करतात मग मुलं, पण हे समजवायलाही पाहिजे नं! आपल्या डोळसांना ज्या गोष्टी समजत नाही, त्या ह्या मुलांकडून त्यांना या गोष्टींची उपजत समज यावी, ही अपेक्षा करणं किती चुकीचं आहे.

काम सुरू केलं तेव्हा 'हे तर कधी अपेक्षितच नव्हतं' असे काही धक्के होते का? डोळसांकडून किंवा अंधांकडून?
वीणाताई:
डोळसांकडूनच जास्त बसले. मला नाउमेद करण्याचा प्रयत्न जास्त करण्यात आला. तुम्ही काय काम करणार? आणि बाई होते नं! सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि माझी टक्कर तिथे होती - एक ‘बाई’ म्हणून आपण जेव्हा संस्था उभी करतो, तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडतो - 'अरे बाप रे! हे कोण सावरेल?' म्हणून! मी कटाक्षाने पाळलं “कोणाच्या जवळच गेले नाही.” सगळ्यात महत्त्वाचं : फार वैरही केलं नाही, फार गळ्यात गळेही घातले नाही. माझ्या पध्दतीने मी स्वतःवर खूप बंधनं घालून घेतली. मला घरातून बाहेर जायचं नाहीये, मला राजकारणी लोकांशी संबंध नको आहेत. त्यामुळे तो प्रश्न मला कधी आला नाही.
अर्थात या सगळ्या प्रवासात मला माझे यजमान श्री. श्रीकांत सहस्रबुद्धे, आणि माझी मुलं - निखिल आणि अभिषेक, यांची खंबीर साथ होती, म्हणूनच मी हे करू शकले आहे.

संस्थेतल्या सगळ्या सुविधा मोफत आहेत, मग आर्थिक गणित कसं काय जमवलंत?
वीणाताई:
आर्थिक गणितासाठी पहिल्यापासूनच असं होतं, की माझी चूल काही त्याच्यावर चालणार नव्हती, किंवा मला चालवायची सुध्दा नव्हती. तेव्हा मोफत करत आले. सगळ्यांना उघडपणे हेच सांगितलं की, मला माझ्यासाठी कुठलाही पैसा नको आहे. मला ह्याच मुलांसाठी हवं आहे. सढळ हातानी देणारे पण भेटले, आणि रितसर आम्ही त्याची पोचपावतीपण देत गेलो. हिशोब देत गेलो, म्हणून तो कधी प्रश्न आला नाही. म्हणून तर बँक ऑफ महाराष्ट्रनी खाडकन २ लाख ९६ हजार मंजूर केले नं? खरं तर माझे यजमान बँक ऑफ महाराष्ट्रमधे होते, पण ते म्हणाले, 'मी अजिबात मध्ये पडणार नाही. संस्था म्हणून तुला काय करायचं ते तू कर.' मग मी सरळ परेरासाहेबांना २ वर्षांपूर्वीच्या जानेवारीत भेटून आले. त्यांनी आम्हाला निधी उपलब्ध करून दिला. त्यातून आम्ही ब्रेल प्रिंटर आणि त्याला लागणार्‍या काँफिगरेशनचा पीसी(computer) घेतला. हा प्रिंटर ताशी ३४० पेजेस एंबॉस करू शकतो, पण त्यामुळे तापतोही. त्यासाठी एसी घ्यावा लागला.

त्यानंतर महाराष्ट्र सेवा समितीचे जगन्नाथ वाणींनी (अण्णा) १ लाखाचं डोनेशन दिलं, त्यातून जवळजवळ ८८ हजाराचा UPS घेतला. पुण्याचे जोशी फाऊंडेशनचे पेंडसेकाकांनी डबिंग मशीन आणि अंधांसाठी खास संगणक दिले, तर प्रदिप देशमुखांनी ब्रेल कंवर्टर, स्कॅनर, एंबॉसर आणि ३ संगणक पाठविले. मुंबईच्या कुलकर्णीसरांनी ३ संगणक दिले, तर नाशिकच्या चढ्ढाअंकलनी या सगळ्यांसाठी टेबले-खुर्च्या दिल्यात. एवढ्या सामानाला ठेवायला शेजारच्या अमृत कुलकर्णींनी स्वतःचा ७०० स्क्वेअरफूटचा फ्लॅट उपलब्ध करून दिला. छाया कुलकर्णींनी वर्षभराचे भाडे दिले. सध्या संस्थेच्या जागेचे भाडे बिडवानी ट्रस्ट, मुंबई देतात. शिवाय खोचेकाका, पुण्याचे हर्डीकरकाकांसारखे आर्थिक निधी देणारे दाते भेटले. एवढी माणसं सोबत आहेत, अजून काय पाहिजे ना?

या मुलाखतीच्या गृहपाठाचा भाग म्हणून इतरत्र प्रसिद्ध झालेले संस्थे/तुमच्याविषयीचे लेख वाचताना ‘वैभव पुराणिक’ किंवा ‘अविनाश मोरे’ अशी नावं वाचली, ही सुरवातीच्या बॅचची मुलं होती. ती मुलं आता येतात का?
वीणाताई:
हो हो. अकरावी-बारावीपासूनची मुलं आहेत ही सगळी! फोनवरून संपर्कात असतात किंवा कार्यक्रमांच्या निमित्तानी भेटतो, पण असं काही येणं जाणं रहात नाही.

आता वैभव M.A. झाला. स्टेटबँक ऑफ हैद्राबादला लिपिक म्हणून लागला. तसंच आमच्याकडचा संदेश आणि अंजली - ते दोघं बँक ऑफ बरोडाला ऑफिसर म्हणून लागले. आमचा संदीप कडवे सर्व शिक्षा अभियानामधे आहे. आमच्या साधनाला नगरला सर्व शिक्षा अभियानामधे उत्कृष्ट शिक्षिकेचं पारितोषिक मिळालंय. या मुलीला पूर्ण अंधत्व आहे, पण ती इतकं सुंदर ते काम करते आहे! असे सगळेजण काहीना काही कामामध्ये. जो तो स्वतःच्या पायावर उभा आहे. आमचा पुंडलीक B. Ed.ला महाराष्ट्रात पहिला आला - ६३ टक्क्यांनी. आता त्याला ७६% पडलेत M.Ed.ला! आमची स्वाती महाराष्ट्रात दुसरी आली B. Ed.ला! ती आता अमरावतीला शाळेमधे सर्व्हीस करते. नंतर आमची दिपाली वाघमारे तर अॅमवेच्या प्रॉजेक्टला रायपुरला गेली. दीड वर्षांसाठी ती अॅडव्हान्स कंप्यूटरच्या कोर्सला गेली, आणि मग सगळं केलं.

आम्ही ढकलायचं काम करतो. 'इथे अमकं अमकं आहे… प्रयत्न करून पहा.' त्याच्याव्यतिरिक्त सध्या आम्ही काही करू शकत नाही नं! थर्ड आय असोसिएशनचा मूळ उद्देशच हा आहे, की विद्यार्थ्यांना त्यांचं आयुष्य चांगल्याप्रकारे व्यतित करता यावं. एकदा का पायावर उभं राहिलं की, संस्था म्हणून जबाबदारी संपते आमची. सध्याही आमच्या शोभाचं शिक्षण पुण्याचे फडणीस इंफ्रास्ट्रक्चरच्या साहील फाऊंडेशनचे विनय फडणीस यांनी प्रायोजित(स्पॉन्सर) केलं आहे.

दृष्टीहीनांचे काही प्रकार असतात का? आणि त्यांच्या दिसण्याच्या कुवतीने त्यांना होणारा त्रास आणि त्यावरचे उपाय बदलतात का?
वीणाताई:
प्रकार तर असतातच.. आणि जितके प्रकार तितके त्रासही असतातच. जसं की काहींना कमी नजर(low vision) असते, काहींना रेटिनाचा त्रास असतो, किंवा मायोपिया असतो. काहींच्या बाबतीत तर डोळे पूर्ण ठीक असूनही मज्जातंतूच (nerves) खराब/कमकुवत असतात. अशा लोकांची शस्त्रक्रिया होऊ शकत नसते, पण ते मृत्यूनंतर नेत्रदान करू शकतात. आपल्या स्वाती-साधना आहेत ना, त्यांचा हाच प्रकार आहे. स्वाती तर माझ्या मागे लागलेली असते, जर जिवंतपणी मी नेत्रदान करू शकले, असे तुम्हाला कळाले तर मी लगेच माझे डोळे दान करीन. किमान माझ्या डोळ्यांचा कुणालातरी फायदा होईल. आपल्याकडे जास्तीचे काही असले तरी, आपण कुणाला सहज काही देऊ शकत नाही, ह्यांच्याजवळ जे नाही, तेही त्यांची द्यायची तयारी असते... किती कौतुकास्पद गोष्ट आहे ही?

त्रासाचं म्हणशील तर Low vision असलेल्यांना अचानक प्रखर प्रकाश डोळ्यावर आला, किंवा भर उन्हात फिरणं झालं/तिखट खाणं झालं की, त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. काहींना काहीच होत नाही, तर काहींची हळूहळू दृष्टी क्षीण होत जाते. सगळ्यात जास्त (मानसिक) त्रास आधी डोळस असून अपघातात अंधत्व आलेल्यांना परिस्थितीशी जुळवून घेताना होतो.

तुमच्या मते दृष्टीहीनांनी पांढरी काठी वापरावी का?
वीणाताई:
मुळात पांढरी काठी दृष्टीहीनांसाठी नसून डोळसांसाठी आहे, ही महत्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे. समोरची व्यक्ती 'दृष्टीहीन' आहे, ह्याचं ते द्योतक्/सूचक आहे. दृष्टीहीनांना हालचालीला सोपे जावे, हे फार शुल्लक कारण आहे. पण डोळस चालकाने पांढरी काठी हातात असलेल्या दृष्टीहीनाला उडवले, तरच कायद्याने त्याची त्या दृष्टीहीनाला भरपाई मिळते. आताशा वाढलेली बेशिस्त वाहतूक बघता पांढरी काठी त्यांच्यासाठी गरजेचीच आहे. दृष्टीहीन मुलींना तर छेडछाड वगैरे प्रकाराला कराटे येत नसेल, तर अशा घटनांना सामोरं जाताना ऐन वेळी स्वसंरक्षणासाठी ही काठीच वापरावी लागते, किंवा काठी हातात नाही, म्हणून दृष्टीहीन मुलांना गर्दीत कुणाची तरी उगीच छेडछाड केलीस, असं समजून लोकं चोपू शकतात. तेव्हा दृष्टीहीनांनी पांढरी काठी वापरावीच.

आता नविन येणार्‍या मुलांच्या अडचणी बदलल्या आहेत का?
वीणाताई:
मुलांच्या अडचणी तशाच आहेत, कारण मूळ शिक्षण नाही ना? खरी अडचण जागरूकता आणि शिक्षण/ज्ञान यातच आहे. येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला परत परत तेच सांगावं लागतं. तुमच्यासाठी या सोयी-सुविधा आहेत, तुम्ही हे-हे करू शकता - वारंवार सांगून त्यांच्या मनात बिंबवावं लागतं... मुंबई-पुण्यातली मुलं इतकी व्यवस्थित शिकलेली, आपल्या पायावर उभी राहतात. दिल्लीत तर खूप मुलं अगदी अ‍ॅडवान्स कंप्युटर कोर्स करतात, पण नाशिक-औरंगाबाद-बीड-नांदेड-परभणी हा जो भाग आहे, त्यात या मुलांच्या शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीत अत्यंत मागासलेला आहे. मग आमचा सगळा प्रयत्न इकडे अंतर्गत भागात चाललेला आहे की, इथून मुलं कशी सुशिक्षित होतील. सध्या तरी आम्हाला कर्णोपकर्णी प्रसिद्धीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे मी जिथे जाते, तिथल्या अंधशाळा बघून येते. मी जबलपूर ते अमदाबादमधल्या सगळ्या अंधशाळांना भेट दिलेली आहे. त्यांच्याकडचं जे जे चांगलं आहे, ते ते आम्ही इथे अंमलात आणत गेलो. त्याचे परिणाम म्हणूनच की काय, संस्थेत येणार्‍या, मुलांची संख्या नेहेमीच वाढती आहे. हळू हळू का होईना, आमचा भौगोलिक विस्तार वाढतोय. ज्याचा नविन मुलांना अर्थात फायदा होतोच.

लोकप्रभाच्या एका मुलाखतीत तुम्ही 'आम्हाला सरकरी अनुदानं नको' असं म्हटलंय. अनुदानांना विरोध का?
वीणाताई:
नकोत असे नाही, सरकारी अनुदानं आतापर्यंत आम्ही घेतले नाहीत. काही वेळा असं होतं ना, मुलाखत देताना आपण बोलतो एक आणि त्याचा अर्थ वेगळा निघतो. शिवाय संपादन-छ्पाई-यातही कधी कधी गोंधळ होऊ शकतो. सरकारी मदत मिळणार असेल, तर हवीच आहे. पण ज्यावेळी ती मुलाखत दिली, तेव्हा आम्हाला कुणीच ओळखत नव्हतं ना? आणि सरकारी मदतीसाठी ओळखी शोधणे, प्रयत्न करणे, तिथपर्यंत जायचा मार्ग पाहिजे, हे सगळं काहीच माहिती नव्हतं. आता हळूहळू ती लोकंही ओळखतात. जसं की आता आम्ही 'फेअर अॅन्ड लव्हली फाऊंडेशन'ची खास मुलींसाठीची शिष्यवृत्ती इथल्या पात्रतेच्या मुलींना मिळावी, हा प्रयत्न करतो आहोत.

संस्थेच्या विद्यार्थ्यांना घेऊन तुम्ही गंगोत्रीची सहल केलीत. त्याविषयी सांगा.
वीणाताई:
नागपूरच्या सक्षमच्या लोकांनी ती सहल आयोजित केली होती. मग मुलांना गंगोत्री बघताना वर्णन सांगितलं. त्याच्याआधी २००५ साली हा प्रयोग मी पुण्यात केला होता. प्रसाद वनपाल म्हणून आमचा मित्र आहे, त्याने राहण्या-खाण्याची सोय केली होती. त्यावेळी आम्ही मुलांना घेऊन पर्वतीला, विमानतळावर गेलो होतो. पर्वतीला पितळी सिंह मुलांनी हात लावून पाहिला. विमानतळावर गेलो तेव्हा त्यांना विमानाची संकल्पना सांगितली. हा अनुभव असल्याने वर्णन केल्यावर ही मुलं समजू शकतात, हे कळालं होतं. मग गंगोत्रीला धबधब्याखाली मुलं उभी राहिली. तुषार म्हणजे काय, पाणी अंगावर पडतं म्हणजे काय, अशा सगळ्या गोष्टी स्पर्शाने त्यांना 'दाखवल्या'. त्यांच्यासाठी तो अविस्मरणीय अनुभव होता.


DSCN2272.JPG
गंगोत्रीच्या सहलीचा आनंद लुटणारी मुले

गंगोत्रीच्या सहलीच्यावेळी नागपूरला ओरिसाच्या 'मुकुंद'च्या एका डोळ्यावर झालेली शस्त्रक्रिया मला पाहता आली. दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही त्याला रंगीबेरंगी फुलं घेऊन गेलो होतो आणि तुला सांगते, तो मुलगा इतका आनंदित होता की, त्या १७-१८ वर्षाच्या मुलाने ‘पहिल्यांदा पाहिले’, हे बघूनच आमच्या अंगावर काटा आला होता. सुंदर अनुभव होता.

इतर संस्थांच्या सहाय्यने थर्ड आय विस्तारीत वाढवण्याचा विचार केला आहे का?
वीणाताई:
अर्थात असा विचार चालू आहेच. पण आम्ही इथे नाशिकमध्ये, दुसरी संस्था दुसरीकडे कुठे. नेट सर्फिंग करणारं कोणी नाही, यासारख्या आमच्या कमतरता आम्हाला अशा वेळी त्रासदायक ठरतातच. खरं तर जग एवढं जवळ आलेलं आहे, पण आम्ही तंत्रज्ञानात मागे पडतोय. आता त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत.

संस्थेमार्फत मुलांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर पुस्तकं कशी मिळतात?
वीणाताई:
एक तर आम्ही आधीपासूनच जमेल तसे त्यांना पुस्तके वाचून दाखवतो. शिवाय मागल्या वर्षी ५ डिसेंबरला संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त, आम्ही ब्रेलमधील ३ पुस्तकांचे प्रकाशन केले: प्रविण दवणेसरांचे 'घडणार्‍या मुलांसाठी', भारती ठाकुरांचे 'नर्मदा परिक्रमा' आणि श्रीकृष्ण जोगळेकरआजोबांचे 'विचारपुष्प'! शिवाय उमेश जेरे, सुखदा पंतबाळेकुंद्री यांनी तयार केलेल्या 'प्रज्ञा' नावाच्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने ५००-५५० पुस्तके ब्रेलमध्ये प्रकाशित करायचा विचार आहे. त्यापैकी १० पुस्तके ब्रेल आणि ऑडिओ पुस्तकांच्या रुपात मे २०१२मध्ये प्रकाशित करीत आहोत.
तसंही अनिल अवचट, मीना प्रभू, वीणा गवाणकर या लेखकांनी त्यांच्या पुस्तकांच्या ब्रेल रूपांतरासाठी संमती दिलेली आहे, पण ते प्रत्यक्षात यायला वेळ लागतोय.

वाचक थर्ड आयला कशी मदत करू शकतात?
वीणाताई:
बर्‍याच प्रकारे मदत करता येईल. जसं की ध्वनीमुद्रणाला मदत, किंवा तुमच्याकडे असलेल्या कौशल्याचा जर आपल्या संस्थेसाठी उपयोग होत असेल तर त्यात मदत(जशी आमची वेबसाईट बनवायची आहे), किंवा एखादी अभिनव कल्पना जशी एखाद्या ठिकाणची सहल वगैरे… जेव्हा कधी शक्य असेल तेव्हा, शक्य असेल तिथे, मदत करता आली, तर स्वागतच आहे.

आर्थिक मदत मिळाली तर, काही प्रकल्प लवकर येऊ शकतील. जसं की, सध्या अशोक सप्रेकाकांनी भूमितीचा कंपास शोधून काढलाय, ज्यायोगे ही मुलं अगदी अचूक मोजमाप करू शकतील. जमले तर या कंपासच्या निर्मितीसाठी आणि मुलांना मोफत वितरणासाठी निधी जमवायचा, असे प्रयत्न चाललेत. किंवा सध्या आमचा कंप्युटर्स-इंटरनेटचा सेटअप आहे. त्याचा प्रकाशयात्रींसाठी ‘कॉल सेंटर’ किंवा ‘प्रशिक्षण केंद्र’ म्हणून वापर करण्याचा विचार आहे.
कॉल सेंटर म्हणजे, ज्या प्रकाशयात्रींना काही माहिती हवी असेल, अर्ज भरून हवे असतील, स्पर्धा-परिक्षांची तयारी करण्यासाठी मदत हवी असेल, ते इथे फोन करतील, आम्ही ती ती माहिती त्यांना पुरवू.
प्रशिक्षण केंद्र म्हणजे, जर १०-१० प्रकाशयात्रींची बॅच करून त्यांना आठवड्याभरच्या निवासी संगणक प्रशिक्षण शिबीरात बोलावले, की ज्यात संगणक आणि काही सॉफ्टवेअर्सचे प्रशिक्षण देता येईल. यासाठी शिकवणारी माणसे आणि अर्थात निवासी शिबीरासाठी लागणारी आर्थिक मदत लागेल.
बर्‍याच कल्पना आहेत. तसे अजूनही काही प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर आहेत, पण आताच सांगणे संयुक्तिक होणार नाही.

दृष्टीहीनांच्याबाबतीत सामान्य माणसाला काय करता येईल??
वीणाताई:
जेव्हा तुम्ही त्या मुलांबरोबर राहता, तेव्हा त्यांना आधी ‘आपलं’ म्हणा. काय आहे ना, धडधाकट माणसांना एक प्रकारचा अहंकार असतो की, दुर्दैवाचे दशावतार माझ्या वाट्याला येणार नाहीयेत. पण आपण हे विसरतो की, पुढचा क्षणाने आपल्या ताटात काय वाढून ठेवलंय, हे कुणालाच माहिती नसतं. साधं भिंतीवर डोकं आपटून, घरात पाय घसरून पडून लोकांची दृष्टी गेलेली पाहिली आहे. कित्येक लोक घरातल्या घरात लहानशा अपघातात हात-पाय गमावून आयुष्यभर विकलांग होतात, यावर आपण उपाय शोधतो ना?तेव्हा आपण आपलं माणूस नाही ना टाकून देत? आपण सांभाळतो ना आपल्या माणसाला? नाही का? आमच्या मुलांना लोकं म्हणतात, तुम्ही गणित शिकायचं नाही, तुम्ही सायन्स शिकायचं नाही. आपण सगळे सायन्स शिकून वैज्ञानिक बनलो का? किंवा गणित शिकून रँगलर बनलो का? पण हे प्राथमिक शिक्षण झालं पाहिजे ना? या मुलांचा शिक्षणाचा हक्क आपण कोण म्हणून नाकारतो? एकिकडे 'वाचन संस्कृती, वाचन संस्कृती' म्हणत ओरडायचं आणि आमची मुलं वाचायला बघतात, तर ब्रेल मधली पुस्तकं का उपलब्ध नसतात आमच्यासाठी? आज मीना प्रभूंसारख्या लेखिकेने जगभराचे वर्णन शब्दबद्ध केलंय, पुलंचा विनोद, जयवंत दळवींच्या कादंबर्‍या, अशी विविध पुस्तकं केव्हा आणि कशी आमची मुलं वाचणार? आपण सामान्यांनीच त्यांना मदत केली पाहिजे. त्यांची कीव/हेटाळणी करणं सोडून त्यांच्यासाठी जमेल तिथे मदतीचा हात पुढे करा.

TEA2.jpg
संस्थेच्या प्रकाशयात्रींसमवेत वीणाताई एका महिलादिनाच्या निमित्ताने.

मागच्या वर्षी ४ फेब्रुवारी २०११ रोजी रुकडीकर महाराज ट्रस्ट, कोल्हापूर, यांनी वीणाताईंना 'माऊली आनंदी पुरस्कार' ह्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले. यापुर्वी हा पुरस्कार राणी बंग, सिंधुताई सपकाळ, नजिमा हुजरुक यांना मिळाला आहे. वीणाताईंच्या इतर पुरस्कार, तसेच संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या यशस्वी प्रवासाची, आणि इतर माहिती इथे मिळेल.

वाचकांना वीणाताईंना संपर्क साधावयाचा असल्यासः
सौ. वीणा श्रीकांत सहस्रबुद्धे
पत्ता: ५, निसर्गप्रकाश सोसायटी, के. जे. मेहता माध्यमिक शाळेशेजारी, नाशिकरोड, नाशिक ४२२१०१.
फोनः ०२५३-२४६८८६७, ०९८९०२५१००९
इमेलः veena.thirdeye@gmail.com

राजू परुळेकरांनी 'संवाद' या त्यांच्या ई-टीव्हीवर प्रसारित झालेल्या समाजात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणार्‍या व्यक्तींच्या मुलाखतींच्या कार्यक्रमातही वीणाताईंची मुलाखत घेतली होती, त्या कार्यक्रमाचा विडीयो इथे सापडेल.

कदाचित तुम्ही या संस्थेविषयी किंवा वीणाताईंविषयी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये आधीच वाचले असेल. त्याची यादी: https://picasaweb.google.com/110628393694610508907/soSapH

  1. सकाळ २००४
  2. सकाळ २००७-१
  3. गावकरी २००७
  4. लोकसत्ता २००७ : http://loksatta.com/daily/20071120/nv05.htm
  5. सकाळ २००७-२
  6. लोकमत २००७
  7. लोकप्रभा २००७ : http://loksatta.com/lokprabha/20080118/karya.htm
  8. Times of India 2007-1
  9. Times of India 2007-2
  10. Money Life (Finance Magazine) 2009 : http://www.moneylife.in/article/5048.html
  11. आयबीएन लोकमत : http://www.ibnlokmat.tv/showvideo.php%3Fid%3D36241

मुलाखतकारः dhaaraa (पहिलीच मुलाखत असल्याने चुभूदेणे. )
संपादनासाठी अरुंधती कुलकर्णीचे आणि टंकलेखनासाठी सहाय्य केल्याबद्दल मृण्मयीचे मनःपूर्वक धन्यवाद. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच ग्रेट.......!!!

या संस्थेचा आणि वीणाताईंचा, त्यांच्या कार्याचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद. असं काही वाचलं कि नतमस्तक व्हावंसं वाटतं. पुण्यात देखील निवांत नावाची संस्था आहे मीराताई बडवेंची.. अशीच.

एक सांगायचं राहीलं ..मुलाखत चांगली घेतली आहे.

अमेझिंग आहे सगळंच. वीणाताईंची आणि त्यांच्या कार्याची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद धारा !

वीणाताईंची आणि थर्ड आय फाउंडेशनची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद! धारा, खूप छान मुलाखत.
अकु आणि मृण्मयी तुमचेही आभार.

वीणाताईंची आणि थर्ड आय फाउंडेशनची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद!

धारा, पहिलीच मुलाखत पण खूप छान घेतलियेस Happy

धारा, अत्यंत सुंदर झाली आहे मुलाखत!

वीणाताईंचं कार्य अफाट आहे यात वाद नाही, पण मुलाखतीचं रेकॉर्डिंग ऐकताना शब्दाशब्दातून जाणवते ती त्यांची या कार्यामागची तळमळ! अतीशय पोटतिडकिनं बोलल्या आहेत. 'आमची मुलं' काय काय करतात याबद्दल सांगताना, त्यांचं, त्यांच्या यशाचं कौतूक करताना, मुलांबद्दल खूप आत्मीयता जाणवते.

बेस्ट. सुरेख मुलाखत धारा. वे टु गो.
अरुंधती आणि मृण्मयी- तुमचेही आभार.

वीणाताईंच्या वाक्यावाक्यातला प्रामाणिकपणा तर बेहद मस्त आहे. प्रेरणा महत्त्वाची, वाटा आपोआप सापडत जातात.
२००४ मध्ये मग आम्ही रजिस्ट्रेशन केलं. >>> असंच बर्‍याचशा संस्थांचे होते. आणि तेच योग्य आहे.

एकुण किती मुलं आहेत संस्थेत/ संस्थेशी संबंधित सध्या?

असं काही वाचलं की खरच वाटतं, हे जग किती सुंदर आहे, करण्यासारख्या किती गोष्टी आहेत, अन आपण कुठे कमी पडतोय. वीणाताईंच्या कार्याला, थर्ड आय असोसिएशन आणि सर्व प्रकाशयात्रींना मनापासून शुभेच्छा! Happy

छान झाली आहे मुलाखत!! वीणाताईंच्या अपरिमित कष्टांचे व चिवट, झुंजार प्रवासाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे! धाराने त्यांच्या या व्यतिरिक्त चालणार्‍या समाज कार्याविषयीही एकदा सांगितले होते. खूपच प्रेरणादायी आहे त्यांचे कार्य. कितीतरी स्त्रिया चाळिशीनंतर जी पोकळी येते त्यात हरवून जातात, पण वीणाताईंनी त्यांचा स्वतःचा मार्ग शोधला.... आणि त्याचबरोबर असंख्य प्रकाशयात्रींना ज्ञानाचा मार्ग खुला करून दिला!! ग्रेट! Happy

धारा,
खूप सुंदर मुलाखत. छान बोलल्या आहेत वीणाताई. त्यांची काही काही वाक्यं आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखी आहेत.

काय आहे ना, धडधाकट माणसांना एक प्रकारचा अहंकार असतो की, दुर्दैवाचे दशावतार माझ्या वाट्याला येणार नाहीयेत<<<< इथून पुढचा पॅरा मनाला एकदम भावतो आणि पटतो.

धन्यवाद सगळ्यांचे. Happy

शब्दांच्या मर्यादेमुळे, थर्ड आयचे बरेचसे लहानसहान प्रकल्प, किंवा विशेषतः वीणाताईंचे कितीतरी पैलू, वेगवेगळ्या स्वरूपातली कामं, याविषयी मला सांगताही आलेले नाहीत. मूळ घेतलेली मुलाखत खूपच मोठ्ठी (जवळ जवळ याच्या ५ पट) होती, ती काटछाट करत एवढी करताना माझी कायच्या काय दमछाक झाली. आता हीच मुलाखत मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात माझ्या आणि काकूंच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून, सगळ्या आजी-माजी-भावी प्रकाशयात्रींना ऐकवायचा बेत आहे. तेव्हा त्या फाईलचा दुवा इथेही टाकीन.

अकुचे आणि मृचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. अकुला मागे म्हटल्याप्रमाणे ही मी घेतलेली पहिली आणि शेवटची मुलाखत असेल, कारण मुलाखत घेताना मी इतके विविधरंगी घोळ करत होते की, विचारू नका. वीणाकाकूंचा संयम मोठा की त्यांनी माझे हे सगळे प्रताप सहन करत, मला सांभाळून घेत, मुलाखत दिली. पत्रकारांना/मुलाखतकारांना खरंच मानलं पाहिजे, ते येर्‍या-गबाळ्याचे काम नसते, हे पक्कं पटलंय.

फार सुंदर मुलाखत! दृष्टीहीनांचे जग सोपे नसणार ह्याची जाणीव तर होतीच पण ह्या मुलाखतीमुळे ते आहे त्यापेक्षा सोपे करायला किती प्रचंड मेहनत घेतली जाते हे फार चांगल्या प्रकारे वाचायला मिळाले. तुम्हा तिघींचे खुप आभार.

मुलाखत छान घेतली आहे.
एक प्रश्न :
" ... 'माणूस' असण्याचा आदर ठेवून 'प्रकाशयात्री' ..." असे वेगळे नाव देण्याचे काय प्रयोजन? नुसते माणूस म्हणायला काय हरकत आहे?

आवडली मुलाखत ! धारा,मृण्मयी,अरुंधती यांचे आभार !

मस्त झालीय मुलाखत .
नेमके प्रश्न विचारलेत अन वीणाताईंनी उत्तरं पण अगदी मुद्देसूद दिली आहेत.
त्यांच्या कामाचं, चिकाटीचं कौतुक वाटतं.

मायबोलीच्या / संयुक्ताच्या एखाद्या उपक्रमाद्वारे त्यांना मदत करू शकतो का ?

छान मुलाखत.
त्यांच्या ह्या कार्याला, थर्ड आय असोसिएशन ला आणि सर्व प्रकाशयात्रींना खुप खुप शुभेच्छा..

मायबोलीच्या / संयुक्ताच्या एखाद्या उपक्रमाद्वारे त्यांना मदत करू शकतो का ?>> +१

धन्यवाद सर्वांचे!

भास्कर, " ... 'माणूस' असण्याचा आदर ठेवून 'प्रकाशयात्री' ..." असे वेगळे नाव देण्याचे काय प्रयोजन? नुसते माणूस म्हणायला काय हरकत आहे?>>>>>>> माणूस म्हणून वागवले जात नाही, म्हणून किमान नविन ओळख - जी आदराची असेल, अशी ओळख मिळावी, यासाठी वगळे नाव दिलेय. शिवाय वीणाताईंनी सविस्तर सांगितले आहेच उत्तरात.

मायबोलीच्या / संयुक्ताच्या एखाद्या उपक्रमाद्वारे त्यांना मदत करू शकतो का ? >>>> हो. नक्कीच करू शकतो. वाचक थर्ड आयला कशी मदत करू शकतात? या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी आपल्याला पर्याय दिले आहेतच, तेव्हा आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण मदत करुयात. Happy